Saturday, October 27, 2018

मुलँ रूज - ८१

ॲबसिंथ
‘‘ॲबसिंथ. नॉम दे दियू. प्लीज व्हिक्टर. जल्दी लाव.’’
‘‘मस्य तुलूझ्‌. खूप झाली आतापर्यंत. आता पुरे करा.’’
‘‘ए. तू कोण मला सांगणारा? तू तुझं काम कर. ॲबसिंथ आण लवकर.’’
‘‘या दारुड्यांना समजावण्यात काही अर्थ नसतो.’’ व्हिक्टर काउंटरवर बसलेल्या कॅशियरला उद्देशून म्हणाला.
‘‘जल्दी लाव.’’ हेन्री बसल्या जागेवरून जोरात ओरडला आणि पाठोपाठ हवा निघून गेलेल्या फुग्यासारखा फसकन समोरच्या टेबलावर पडला.
‘‘साली रोजची कटकट आहे. किती प्यायची याला काही सुमारच नाही. चढली की खिशातून एक पत्र काढतो, वाचतो आणि चक्क रडायला लागतो. दर वेळेला पत्र तेच असतं, पण रडणं मात्र असं की जणू काही एखादी दुःखद घटना घडलेली कळली असावी. आता एकदा वाचलं, समजलं, रडलं, भरपूर दारू प्यायली की संपलं सगळं. रोज तेच तेच दुःख नव्याने काय चघळत बसायचं?’’
‘‘प्रेमभंगाचं काहीतरी प्रकरण असलं पाहिजे. त्याशिवाय कोणी त्यात इतका बुडून जाणार नाही.’’
‘‘दुःख कोणाला नसतं काय. जन्माला आलेल्या प्रत्येकाच्या वाट्याला काही ना काही तरी दुःख येतंच. म्हणून सगळेच स्वतःला दारूत बुडवून घेत नाहीत. याने नुसता उच्छाद मांडलाय. रडतो काय, आरडाओरडा काय, भसाड्या आवाजात गाणं काय. एवढंच नव्हे तर कधी कधी मारामारीसुद्धा करण्याची सुरसुरी येते याला. आता एक फुंक मारली तर उडून जाईल असा याचा अवतार. पण करणार काय? पाटूसाहेबांचा मित्र पडला. त्यांनी इथल्या सगळ्या बिस्ट्रोच्या मालकांना दम देऊन ठेवलाय. मस्य माझे मित्र आहेत. त्यांना कसलाही त्रास होता कामा नये. म्हणून सहन करावं लागतं. माझ्या वाटेला आलेलं दुःख म्हणशील तर हेच आहे. म्हणून मी काय हा गल्ला सोडून प्यायला सुरुवात करू.’’
व्हिक्टर हसला. एवढ्यात हेन्रीचे ओरडणे त्याला ऐकू आले.
‘‘माझी ॲबसिंथ कुठेय? विसरलास की काय?’’
व्हिक्टर ॲबसिंथचा प्याला घेऊन हेन्रीच्या टेबलाकडे गेला.
‘‘पाटूसाहेबांनी सांगितलंय...’’
‘‘तेल लावत गेला तुझा पाटूसाहेब. डुक्कर कुठला. मी कुठे व किती पितोय याची काळजी करणारा तो कोण? हे बघ मित्रा, मला एक सांग, बायकांविषयी तुझं काय मत आहे?’’
‘‘मला बायकांचा काही फार अनुभव नाही. पण माझ्या बायकोपुरतं बोलायचं झालं तर ती झोपेत घोरते. एवढंच नव्हे तर चक्क शीळ घालत गाणंसुद्धा म्हणते.’’
‘‘यावर एक अगदी साधा उपाय आहे. माझ्या एका मित्राची बायकोसुद्धा अशीच घोरत असे. त्याने काय केलं माहितेय. एक उशी तिच्या तोंडावर बांधून ठेवली. घोरण्याचा आवाजच काय अगदी श्वासोच्छ्‌वासाचासुद्धा आवाज यायचा बंद झाला. म्हणजे प्रश्न कायमचा सुटला.’’ असे म्हणून हेन्री जोरजोरात हसायला लागला. हसता हसता त्याला धाप लागली, श्वास कोंडला, डोळ्यांसमोर अंधारी आली, बुबुळे दिशाहीन फिरली, सर्वांगातून कळा येऊ लागल्या, पोटात ढवळू लागले. पित्तरस अन्ननलिकेतून हळूहळू वर सरकू लागला. तोंडात कडवट चव गोळा झाली. डोक्यात हातोडीचे घाव बसू लागले. त्याने दोन्ही हातांनी डोके गच्च दाबून धरले. पोटातल्या ढवळण्याचा एक आवेग संपला. त्याला क्षणभर बरे वाटले. पण दुसऱ्याच क्षणी तोंडात लाळ गोळा होऊ लागली. ताबडतोब काठी उचलून तो लटपटत मुतारीकडे गेला. त्याने दरवाजा उघडला. भपकन वास आला. त्या वासाने पोटातला द्रव बूच उघडलेल्या शॅम्पेनसारखा फसफसून बाहेर आला. त्याला भडाभडा उलटी झाली. डोक्यातील ठणका असह्य झाला. पाय लटपटू लागले. भिंतीचा आधार घेत कसाबसा तोल सावरीत तो उभा होता. पुन्हा पुन्हा उलटी झाल्यावर आवेग शांत होत गेला. त्याने रुमाल काढून दाढीला लागलेली लाळ पुसली. थोडा वेळ वाट पाहून अत्यंत सावधतेने जपून पावले टाकीत तो आपल्या टेबलावर गेला व तिथेच डोके टेकून झोपी गेला. थोड्या वेळाने पाटू आला व त्याने त्याला लॉजवर पोचविले.
(फोटो - ॲबसिंथची बाटली, रेडियम ग्लास, ॲबसिंथ स्पून, साखरेचा खडा)
(एकोणीसाव्या शतकात पॅरीसमधील कलाकारांमध्ये ॲबसिंथ हे मद्य चटकन चढणारी नशा आणि स्वस्त किंमत यामुळे खूप लोकप्रिय होते. नशा जास्त येण्यासाठी या मद्यात काही वनस्पतींचा अर्क मिसळला जाई. हे मद्य रेडियमचे क्षार मिसळलेल्या काचेच्या पेल्यामधून देत. भोके असलेल्या चमच्यावर साखरेचा खडा ठेऊन पेल्यात ॲबसिंथ ओतण्याची पद्धत होती. अंधारात रेडिममुळे ॲबसिंथचा पेला चमके. त्यामुळे ॲबसिंथच्या पेयपानाला एखाद्या विधीचे स्वरूप येई. पण या मद्याचे व्यसन फार लवकर लागे आणि बऱ्याच जणांना अपस्माराचे झटके येत. हे लक्षात आल्यावर पुढे या मद्यातील घातक घटकांवर व रेडियम ग्लासेसवर बंदी घालण्यात आली. लोत्रेकच्या आवडते ॲबसिंथ व कोनॅकचे कॉकटेल अर्थक्वेक या नावाने प्रसिद्ध आहे.)



No comments:

Post a Comment