Saturday, October 6, 2018

मुलँ रूज - २९

ॲतेलीएच्या शेवटच्या दिवशी आपापली एंट्री सॅलूनमध्ये पाठवून दिल्यावर सर्वजण एखादी परीक्षा संपल्याच्या आनंदात ओग्युस्तिनामध्ये जेवायला गेले. सर्वांनी मिळून एकत्र घालवलेली ती शेवटची संध्याकाळ होती. जेवण झाल्यावर ला नुव्हेलमध्ये यथेच्छ बीयरपान. असा दिवस परत येणार नाही याची त्यांना कल्पना होती. हास्यविनोद, चेष्टामस्करी यांना ऊत आला होता. नंतर सर्वजण मिळून ल एलीसमध्ये गेले. प्रत्येकाने आपापली मैत्रीण पकडली व नृत्याला सुरुवात केली. हेन्री एकटाच बापुडवाणा होऊन कोपऱ्यात बसला. शेवटी तगमग असह्य होऊन तो तेथून हळूच सटकला. उद्विग्न मनःस्थितीत तो ब्रासेरी मोंसेत जाऊन कधी पोचला ते त्याचे त्यालाच कळले नाही.
त्याने घाबरत घाबरत इकडेतिकडे पाहिले. काय होईल ते होऊ दे. या खेपेला सरळ विचारून मोकळे व्हायचे असे त्याने ठरवले. धीर येण्यासाठी त्याने ॲबसिंथ मागवली. ग्लास समोर येताच त्याने साखरेचा एक खडा त्यात टाकला. पण खडा नीट विरघळण्याच्या आत त्याने ग्लास एका घोटात रिकामा केला. पोटात जाळ उठला व थोडा धीर आला. समोरच्या एका बाईकडे त्याने हळूच पाहिले. थोडी वयस्कर व बेढब दिसत होती. पण म्हणूनच तयार होईल असा विचार करून त्याने तिच्याकडे मोर्चा वळवला. जवळ जाऊन मोठ्या अदबीने विचारले,
‘‘मादम्वाझेल, माझ्याबरोबर ड्रिंक घ्यायला आवडेल का तुम्हाला.’’
तिने एकवार त्याच्या हातातल्या काठीकडे व त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले व म्हणाली, ‘‘तुम्हाला दिसत नाहीय का मी कामात आहे ते.’’
हेन्री वरमून तसाच स्तब्ध उभा राहिला.
‘‘आरशात कधी स्वतःचा मुखडा पाहिलायत का? मला ड्रिंक घ्यायला बोलावायला आलात ते.’’
तिचे हेटाळणीचे उद्‌गार त्याच्या कानात तप्त शिशासारखे शिरले. त्याच्यासारख्या कुरूप, फेंगड्या पायांच्या बुटबैंगणाबरोबर दोन घटका घालवायला एखादी म्हातारी वेश्यासुद्धा तयार नव्हती. त्याच्या शारीरिक दुःखात एका नव्या दुःखाची त्या दिवसापासून भर पडली. स्त्रीसुख आपल्याला कधीच उपभोगायला मिळणार नाही या जाणिवेने तो व्याकूळ झाला.
काठी टेकत, पाय फरफटत, अपमानित, व्यथित मनाने तो लॉजवर परतला. देगासच्या स्टुडिओत अजून दिवा जळत होता. त्याची सावली खिडकीच्या तावदानावर पडली होती. दूर कित्येक खिडक्यांमधून दिवे जळताना दिसत होते. या क्षणी पॅरीसमध्ये हजारो युग्मे एकमेकांच्या मिठीत मैथुनमग्न असतील. हे शारीरिक व्यंग, खुजेपण, कुरूपता आपल्याच वाटेला का यावी की कोणतीही स्त्री आपल्याला कधीही जवळ करणे शक्य नाही.
हेन्री तू नुसता बुटका नाहीयेस. जोडीला कुरूपसुद्धा आहेस हे कधीही विसरू नकोस.
निराशेच्या खोल गर्तेत त्याला दुःखाचे कढ येत होते. त्याच्या गालावरून उष्ण अश्रू वाहू लागले.
ममा, मला तेव्हाच का मरू दिलं नाहीस? का जगवलंयस मला जिवाचा एवढा आटापिटा करून.

No comments:

Post a Comment