Saturday, October 20, 2018

मुलँ रूज - ६५

फेब्रुवारीतील एका दुपारी पॉव्हियाँ द ला प्रेस मधल्या एका खोलीत हेन्री, जॉर्ज सुराला व्हिन्सेट व्हॅन गॉगची पेंटिंग लावायला मदत करीत होता. हेन्री कॅटल़ॉगमधून एक एक नंबर वाचून दाखवीत होता तर सुरा भिंतीवर खिळे मारून एक एक नीट लावण्यात गुंतला होता.
‘‘ह्याचा नंबर काय आहे?’’ सुराने विचारले. त्याच्या तोंडात भिंतीवर मारायचे खिळे होते, हातात हातोडी तर काखोटीला कॅनव्हासची गुंडाळी.
‘‘अठ्ठावीस. सायप्रस. थोडं डावीकडे लाव.’’
सुराने कॅनव्हास सरळ केला व भिंतीवर लावला. हेन्री आपल्या जाड भिंगांच्या चष्म्याआडून डोळे बारीक करून पेंटिंग बघत होता. मागे येऊन सुरा त्याला सामील झाला.
‘‘रंगसंगतीच्या दृष्टीने पाहिले तर ही रंगयोजना साफ चुकीची ठरेल, पण काय विलक्षण परिणाम साधलाय म्हणतोस.’’
‘‘जणू काही अग्नी प्रलयाच्या हिरव्या ज्वाळाच!’’ हेन्री त्या झपाटल्यासारख्या वाटणाऱ्या सायप्रस वृक्षाकडे बघून म्हणाला. ‘‘विचार कर ही किमया त्याने काही तासांत साध्य केलीय. तुला ठाऊक आहे आर्ल्समधल्या त्याच्या फक्त दोन महिन्यांच्या वास्तव्यात त्याने पन्नास पेंटिंग केलीत ते आणि त्याला तुझ्यासारखं पॉइंटॅलिस्ट व्हायचं होतं. बिचारा.’’
‘‘काय म्हणतोस? दोन महिन्यांत पन्नास कॅनव्हास?’’ सुरा आश्चर्याने म्हणाला. बोलता बोलता त्याला खोकल्याची उबळ आली. त्याचा श्वास कोंडला.
‘‘मों व्ह्यू. अरे यार. हा खोकला साधा दिसत नाहीय. वेळीच इलाज कर.’’ त्याच्या खोकण्याकडे पाहून हेन्री काळजीच्या सुरात म्हणाला.
‘‘विशेष काही नाही. काल रात्री स्टोव्ह विझल्यावर उठून पेटवायचा आळस केला. त्यामुळे थंडी बाधली. ते जाऊ दे. तुला कळलं का पॉल गोगँ पुढच्या महिन्यात ताहीतीला जाण्याची तयारी करतोय ते.’’
‘‘नक्की चाललाय ना?’’ हेन्री सिगरेट शिलगावीत म्हणाला, ‘‘गेली दहा वर्षे तो तेथील नारळांची झाडं आणि त्याखाली बसलेल्या अर्धनग्न स्त्रिया यांच्याविषयी बोलतोय. तू बघ. तो लवकरच कंटाळेल आणि परत येईल. जसा मार्तीनेकवरून परत आला तसा. तिकडे तो आयुष्याभर राहाण्याची प्रतिज्ञा करून गेला होता, पण उन्हाळ्यात फार उकडतं म्हणून वर्षाच्या आत परत आला.’’
‘‘त्याच्यासाठी एक मेजवानी आयोजित केली आहे.’’
‘‘माझी खात्री आहे. स्टेशनवर जाताना तो बँड वाजवत जाईल. मोठा नाटकी माणूस आहे तो. कोणतीही गोष्ट तो सरळ साधेपणाने करणार नाही.’’
‘‘तुला तो फारसा आवडलेला दिसत नाहीय.’’ सुरा हेन्रीकडे डोळ्यांच्या कोपऱ्यातून बघत म्हणाला.
‘‘व्हिन्सेंटशी तो आर्ल्समधे ज्या तऱ्हेने वागला ते मला मुळीच आवडलं नाही. व्हिन्सेंटला त्याने स्वतःला मास्टर म्हणायला सांगितलं. त्याचा तो एकूण अवतार, भरतकाम केलेली जर्सी, नक्षीदार चढाव. त्याच्याकडे टॅलंट जरूर आहे, पण व्हिन्सेंटच्या निम्म्यानेसुद्धा नाही. त्याचं तू जॅकोब स्ट्रगलिंग वुईथ एंजल्स पाहिलंस. असं वाटतंय की एंजल्स जॅकोबची जणू काही नाडी परीक्षा करतायत आणि त्याचं ते यलो ख्राईस्ट. माझ्या मते त्याची ही धार्मिक विषयांवरची पेंटिंग म्हणजे शुद्ध बकवास आहे. एखाद्या शेअर दलालाने आदिवासींसारखे साधे आदिम पातळीवरचे जीवन जगण्याचा अट्टहास धरायचा तोसुद्धा एवढा गाजावाजा करून हे शुद्ध ढोंग वाटतं. त्यापेक्षा आपला हेन्री रुसॉ परवडला. तो बोअर जरूर करतो, पण तो प्रामाणिक तरी आहे. त्याची ती जंगलाची पेंटिंग पाहिलीस? अगदी सीध्यासाध्या शैलीतील आहेत, पण विलक्षण परिणाम साधून जातात. एक दिवस जाऊ या त्याच्या स्टुडिओत. पण गोगँविषयी विचारशील तर माझं कदाचित चुकत असेल, पण मला वाटतं की तो जाणूनबुजून तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतोय. एकीकडे तो भोळेपणाचा आव आणतो, पण दुसरीकडे आपली हुशारी लोकांच्या नजरेत भरावी असाही त्याचा प्रयत्न चालू असतो. मला या खोट्या भोळेपणाचा राग येतो. अर्थात असं माझं मत आहे.’’
‘‘कदाचित त्याला अजून स्वतःचा शोध लागला नसेल.’’ सुरा मोठ्या उदारपणे म्हणाला.
‘‘ताहीतीमध्ये त्याचा हा शोध संपेल अशी आशा आपण करू या.’’ हेन्री खांदे उडवीत म्हणाला, ‘‘आता गप्पा पुरे झाल्या. कामाला लागू या. क्रमांक एकोणतीस. सनफ्लॉवर्स.’’
सुराला पुन्हा एकदा खोकल्याची जोरदार उबळ आली.
‘‘माझी छाती अगदी पिंजून निघतेय.’’ बऱ्याच वेळाने त्याला बोलवले तेव्हा तो म्हणाला, ‘‘मला पूर्वी असं कधी झालं नव्हतं.’’
‘‘तू आता घरी जाऊन विश्रांती घे पाहू. तुझी आई काळजी करत असेल. ही पेंटिंग लावायचे काम आपण उद्या करू या.’’ दुसऱ्या दिवशी सुरा पॅव्हेलियनवर येऊ शकला नाही. कारण तो तापाने फणफणून घरी झोपला होता.
१० मार्चला सॅलां दी आर्टिस्ट इंडिपेंडंटसचे उद्‌घाटन झाले. प्रदर्शनाला आलेल्या प्रेक्षकांच्या चेष्टामस्करीने पॅव्हेलियनचा हॉल गजबजून गेला. झकपक पोशाखातील रुसॉ येणाऱ्या-जाणाऱ्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घ्यायला धडपडत होता.
‘‘हे बघा. माझं नाव हेन्री रुसॉ. मी पूर्वी सैन्यात सार्जंट होतो. नंतर कस्टम्समध्ये ऑफिसर होतो. हे माझ्या पेंटिंगमधले झाड पाहिलंत ना? किती छान दिसतंय. दिवाणखान्यात लावले तर शोभेल. फक्त पंचवीस फ्रँक. बावीससुद्धा चालतील. अहो, वीस तरी द्या. कॅनव्हास आणि रंगांची किंमत तरी सुटायला हवी. अठरा...’’
व्हिन्सेंटच्या पेंटिंगकडे कोणी ढुंकूनही पाहिले नाही. जॉर्ज सुराने समुद्रकिनाऱ्याचा देखावा त्याने विकसित केलेल्या पॉइंटॅलिस्ट शैलीत काढला होता. एखाद्या वाफेने धुरकटलेल्या काचेच्या तावदानाआडून पाहावे तसे वाटत होते. प्रदर्शनात या कॅनव्हासची खूप टवाळी केली गेली. समीक्षकांनी कॉन्फेट्टी पेंटिंग म्हणून त्याची संभावना केली. कॉन्फेट्टी पेंटिंग हे संबोधन नंतर थोडे दिवस खूप लोकप्रिय झाले होते. पण ही उपेक्षा आणि उपहास त्या चित्रकाराच्या कानी गेला नाही. कारण तेव्हा तो रुग्णशय्येवर आसन्नमरण अवस्थेत तळमळत होता. हेन्रीला जेव्हा कळले की तो शेवटच्या घटका मोजतोय तेव्हा तो तात्काळ त्याच्या घरी गेला, पण उशीर झाला होता.


(या प्रदर्शनातील आणि या प्रकरणात उल्लेखलेली बहुतेक सर्व पेंटींग गुगल इमेज / विकीमिडियावर उपलब्ध आहेत. जिज्ञासूंनी ती इंटरनेटवरून जरून पहावी)

No comments:

Post a Comment