Friday, October 12, 2018

मुलँ रूज - ४२

मोंमार्त्र ह्या गांवठाणाचा कायापालट करू पाहणारा एक जादूगार मोंमार्त्रच्या वस्तीतच फिरत असे, याची कोणालाही कल्पना नव्हती. तो एक जाडजूड शरीरयष्टीचा मध्यमवयीन इसम होता. डोक्यावर विरळ केस, त्यावर कडा दुमडलेली चुरगळलेली हॅट, किंचित करड्या झालेल्या मिशा, अंगात स्वस्तातला ओव्हरकोट या वेशात तो अगदी शांतपणे फिरताना आढळत असे. अशा अवतारात तो शहरी पोशाख केलेला एखादा शेतकरी किंवा फार तर जिल्ह्याच्या गावातल्या सरकारी कारकुनासारखा दिसत असे.
हेन्रीची आणि त्याची एका संध्याकाळी ल एलीसमध्ये गाठ पडली. कॅनकॅन नृत्य मोठ्या रंगात आले होते. हेन्री आपल्या नेहमीच्या टेबलावर बसून त्या नर्तिकांचे स्केच करण्यात दंग होता. एवढ्यात एक अनोळखी इसम त्याच्या टेबलापाशी आला आणि अगदी नम्रतेने डोक्यावरची हॅट काढून त्याला अभिवादन केले.
‘‘माझं नाव झिडलर. चार्लस्‌ झिडलर.’’
हेन्रीने नजर वर केली. ‘‘मस्य, प्लीज बी सीटेड.’’ स्केच काढता काढता तो पुढे म्हणाला, ‘‘मी तुलूझ्‌ लोत्रेक. थोडी वाइन घेता का.’’
‘‘नो थँक्स.’’ थोडा वेळ हेन्रीचे स्केच काढणे न्याहाळून झाल्यावर तो म्हणाला, ‘‘मी गेले महिनाभर रोज संध्याकाळी येथे येतोय. तुम्ही जेव्हा जेव्हा येथे असता तेव्हा सारखी कॅनकॅनची चित्रं काढीत असता.’’
‘‘तुम्ही अल्सेशिअन दिसताय,’’ हेन्रीने त्याच्या उच्चारांवरून त्याला विचारले, ‘‘माझा एक मित्र आहे मॉरीस जॉय्यां म्हणून. तुमच्या ओळखीचा असेल.’’
‘‘मी अल्सॅकचा ही गोष्ट खरीय पण तुमच्या मित्राचा आणि माझा परिचय नाही. तसा परिचय असण्याची शक्यतासुद्धा कठीण आहे, अर्थात त्याचं बालपण माझ्यासारखं गरिबीत गेलं असतं तर कदाचित आमचा परिचय झाला असता.’’
झिडलर आत्यंतिक गरिबीतून स्वकष्टाने परिस्थितीशी झगडत वर आला होता. वयाच्या सातव्या वर्षापासून पोट भरण्यासाठी तो ढोर मेहनतीची कामे करीत असे. वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत त्याला लिहिता-वाचतासुद्धा येत नव्हते. शालेय शिक्षण नसले तरी पैशाचे महत्त्व तो पुरेपूर उमगून होता. पैसे मिळवण्यासाठी त्याने काय काय केले त्याची कहाणी त्याने हेन्रीला थोडक्यात सांगितली. हेन्री त्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होता. त्याच्याकडे शेतकऱ्यासारखी ढोर मेहनतीची तयारी आणि बोलण्यात रोखठोकपणा होता.
‘‘तुम्हाला हा नृत्यप्रकार खूप आवडलेला दिसतोय.’’ झिडलर हळूच पुढे म्हणाला, ‘‘तुम्हाला कल्पना आहे या कॅनकॅनमधूनसुद्धा खूप पैसा मिळवता येईल.’’
‘‘कॅनकॅनमध्ये पैसे मिळून मिळून ते कितीसे मिळणारायत?’’
‘‘अगदी बख्खळ,’’ हेन्री गोंधळात पडलेला पाहून तो पुढे म्हणाला, ‘‘त्यासाठी कॅनकॅनचे व्यापारीकरण करावे लागेल. मग बघा पैशाचा कसा पाऊस पडायला लागेल ते.’’
‘‘मी काहीतरी बरळतोय असं समजू नका. अशा व्यापारीकरणाला लागणारा अनुभव मला आहे. हिप्पो सर्कसचे नाव ऐकलेय तुम्ही. त्याचा मी मालक आहे’’
त्या रात्री ब्रासेरीमध्ये जेवताना झिडलरने हेन्रीसमोर आपली योजना मांडली.
‘‘गेले वर्षभर मी काहीतरी नवीन करण्याच्या विचारात आहे. या सर्कसमध्ये आता काही दम राहिलेला नाही. किमान दहा लाख फ्रँक सुटतील असं काहीतरी मला हवंय.’’
‘‘दहा लाख फ्रँक. तुमची उडी खूप मोठी दिसतेय.’’
‘‘होय. आणि हे पैसे ह्या कॅनकॅनमधून मी मिळवणार आहे.’’ त्याच्या बोलण्यात एक दुर्दम्य आत्मविश्वास होता.
चलो इस बात पर हो जाय असे म्हणून दोघांनी आपले ग्लास उंचावून रिकामे केले.
‘‘मी सगळ्या गोष्टींचा नीट विचार केलाय. पुढल्या वर्षी एक्स्पोझिशन आहे. त्या निमित्ताने हजारो, लाखो लोक पॅरीसमध्ये येतील. पॅरीसमध्ये त्यांना बघण्यासारखे काय आहे?’’
‘‘एक्स्पोझिशन. त्यासाठी तर ते पॅरीसला येणार आहेत.’’
‘‘एकदा तो काळाकभिन्न निग्रो, बसक्या नाकाचा चिनी, साप व गारुड्याचा खेळ, हत्ती, उंट हे सगळं बघून त्या पोलादी टॉवरच्या टोकावर जाऊन पॅरीसचं विहंगमावलोकन करून झालं की मग पुढं काय? एकदा दिवस मावळला अंधारून आलं की मग काय करणार?’’
झिडलरने खिशातून विझलेल्या सिगारचे एक थोटूक बाहेर काढले आणि न शिलगावता तसेच ओठात धरून ठेवले. ‘‘मनुष्य साधारणतः सहवासप्रिय असतो. त्याला एकट्याला लवकरच कंटाळा येतो. त्याला करमणुकीची गरज असते. ती काही त्याला स्वतःला निर्माण करता येत नाही. दुसऱ्या कोणीतरी ती पुरवावी लागते. आणि सर्व प्रकारच्या करमणुकींमधला महत्वाचा घटक म्हणजे स्त्री. बाकी कशाला काही अर्थ नसतो. माझ्या वीस वर्षांच्या शो बिझनेसमध्ये मी जे काही शिकलो असेन तर ते हे. करमणुकीच्या कोणत्याही कार्यक्रमात बाई आणली की मग पैसा वाहायलाच लागला म्हणून समज. तुम्हाला हा सगळा मूर्खपणा वाटेल. पण एक लक्षात ठेवा. लोक मूर्खच असतात. आणि म्हणूनच मला कॅनकॅनमधून प्रचंड पैसा मिळेल याची खात्री आहे.’’
‘‘कॅनकॅनची सुरुवात या इथे ल एलीसमध्येच झाली आणि गेली दहा-बारा वर्षं तरी तो येथे चालू आहे. तुमच्या म्हणण्यात काही तथ्य असेल तर याचा मालक डेस्प्रेझ एव्हाना पॅरीसमधला एक गब्बर माणूस व्हायला पाहिजे होता.’’
‘‘ल एलीसबद्दल मला काही सांगू नका.’’ झिडलर तुच्छतेच्या सुरात म्हणाला, ‘‘काय भिकार जागा आहे ही. अशा ठिकाणी इंग्लिश किंवा अमेरिकन पाऊल तरी ठेवतील का? धड बारसुद्धा इथे नाही. याच्या मालकाला मी चांगला ओळखतो. शो बिझनेस कशाशी खातात हे त्याच्या गावीसुद्धा नाही. तो एका सोन्याच्या खाणीवर बसलाय. पण कसा तर एखाद्या आंधळ्यासारखा. तो त्यातले फक्त दगडगोटेच विकतोय. सोनं त्याला दिसतच नाहीय. पण लवकरच त्याचे डोळे उघडतील नि त्याला हात चोळत बसावं लागणार आहे.’’
‘‘कसं काय?’’ हेन्रीने विचारले.
‘‘कारण या सगळ्या पोरींना मी माझ्या नव्या नृत्यगृहामध्ये घेणार आहे. विशेषतः त्या गोलमटोल चिकन्या पोरीला. ती पाठीवर केसांचा बुचडा बांधते ती. काय नाव तिचं?’’
‘‘ला गुल्वी.’’
‘‘काय ठसक्यात नाचते ती. सध्या या ल एलीसच्या बाहेर तिला फारसं कोणी ओळखत नसणार. माझ्याकडे आली की बघ सगळ्या पॅरीसमध्ये तिचं नाव होईल. माझं हे नवं नृत्यगृह अगदी भव्य असणार आहे. इथल्यापेक्षा चौपट नर्तिका आणि तेवढाच मोठा वाद्यवृंद. आणि महत्वाचे म्हणजे एक आलिशान बार असेल तिथे. खरी कमाई बारमध्येच आहे.’’
‘‘तुम्ही कोणत्या बाजूला बसता त्यावर ते अवलंबून असतं.’’ हेन्री डोळे मिचकावत म्हणाला.
‘‘बारमध्ये वेगवगळ्या दर्जेदार मद्यांबरोबरीने चांगल्या बारटेंडरची गरज असते. या कामात पुरुषांपेक्षा स्त्रिया दसपट अधिक चांगल्या असतात. आणि माझ्या मनात जी आहे ती तर शंभर पटीने चांगली आहे. काय चलाख आहे ती. एका नजरेत तिला कळतं कोणाला काय व किती पाजायची ते. कोणाला चढलीय, कोण हातघाईवर येणाराय, कोण रडणाराय हे लक्षात घेऊनच तिचं काम चालू असतं. त्यामुळे सहसा विचका होत नाही. आणि दिसायलासुद्धा काय सुरेख आहे म्हणून सांगू. एकदा ती पेला भरू लागली की देखते रहो. आणि सगळ्यांत महत्वाचं म्हणजे ती अतिशय प्रामाणिक आहे.’’
‘‘कुठे आहे तुमची ही सर्वगुणसंपन्न साकी.’’
‘‘फॉलीज बर्जेरा. तुम्ही गेलायत तिकडे कधी? तिचं नाव सारा. दरमहा शंभर फ्रँक. वर गल्ल्यातील पाच किंवा दहा टक्के द्यावे लागले तरी बेहत्तर.’’
‘‘इतका वेळ आपण दारूविषयी नुसते बोलतोय तर कोरडं राहून कसं चालेल? और एक हो जाय. मी कोनॅक घेणार आहे. तुम्हाला काय मागवू?’’
‘‘नो थँक्यू मस्य. मला बीअर ठीक आहे.’’
हेन्रीची कोनॅक येताच झिडलरने आपली योजना पुढे सांगायला सुरुवात केली. ‘‘मी फक्त बारवरच थांबणार नाहीय. तेथे एक छोटेसे रेस्तोराँ असेल. मध्यभागी लोकांना नृत्य करण्यासाठी एक खूप मोठी जागा मोकळी सोडण्यात येईल. दररोज ठरावीक वेळी तेथे एक शो होईल.’’
‘‘शो आणि डान्सिंग प्लोअर वर.’’
‘‘होय. लोक नाचून नाचून कंटाळतात. तेव्हा विरंगुळा म्हणून ठरावीक वेळेला हा शो होईल. प्रेक्षकांच्या मधे. फॉलीज बर्जेराप्रमाणे स्टेजवर नव्हे. फॉलीज बर्जेरामध्ये नाचणाऱ्या मुलींच्या तंगड्या बघण्यासाठी लोकांना दुर्बिणी घेऊन बसावं लागतं. माझ्या या नृत्यगृहात मुली अगदी प्रेक्षकातच जाऊन नाचतील. इतक्या जवळ की कोणाला वाटलं तर कुल्ल्यावर एखादी चापटीसुद्धा मारता येईल. शोची सरुवात होईल युत्ते गिल्बर्टच्या गाण्याने. नाव ऐकलंयत कधी?’’
हेन्रीने नकारार्थी मान हलविली.
‘‘नाही ना. आता ऐकाल. मी तिला एका छोट्या कॅफेमध्ये गाताना पाहिलंय. तिची स्वतःची अशी एक खास शैली आहे. गाताना तिची नजर खाली झुकलेली असते. जशी एखादी अनाघ्रत कुमारिकाच जणू. पण चावट गाणी अशी फक्कड म्हणते की हात न लावताच गुदगुल्या व्हाव्यात. आमच्या तालमी सुरू होतील तेव्हा तुम्हाला बघायला बोलवीनच. एकदा लोक रंगात येऊ लागले की मग त्यांना थोडी ड्रिंक्स द्यायची. मग आयेशाचा नाच. नाव ऐकलंय कधी?’’
हेन्रीच्या प्रतिक्रियाची वाट न बघताच तो आपली योजना पुढे सांगायला लागला. आयेशाचा कंबर लचकवीत केलेला नाच. नंतर ॲक्रोबॅटीक्स. तंग कपड्यातल्या पीळदार शरीराच्या पुरुषांनी केलेल्या कसरती. हे मात्र खास महिलावर्गासाठी म्हणून. आणि सगळ्यांत शेवटी कॅनकॅनचा जल्लोश.
 ‘‘तुमची योजना अगदी डोळ्यांत भरण्यासारखी आहे. पण ती पोलिसांच्या डोळ्यांत खुपली तर काय हो.’’
हेन्रीचा आक्षेप त्याने हात उडवून वाटेला लावला. त्याच्या चेहेऱ्यावर किंचित आठी उमटली. ‘‘तुम्हाला काय वाटलं, एवढ्या मोठ्या योजनेत मी या गोष्टीचा विचार केला नसेल. सगळी योजना तपशीलवार तयार आहे. गेले कित्येक महिने रात्रंदिवस मी याचाच विचार करत आहे. पण एक दिवस असा येतो की आपलं मन कोणासमोर तरी उघडं करावं असं वाटू लागतं. हे बघा आपला परिचय फक्त तासाभराचा. पण तुम्हाला बघता क्षणी तुमच्याबद्दल का कोण जाणे मला विश्वास वाटू लागला. कदाचित स्केच करतानाची तुमची तन्मयता बघून असेल.’’
थोडा वेळ शांततेत गेला. झिडलरने हेन्रीच्या डोळ्यांत पाहत विचारले, ‘‘मस्य लोत्रेक, कशी काय आहे माझी योजना?’’
‘‘तुमचा आत्मविश्वास वाखाणण्यासारखा आहे. तुमचे हे नियोजित नृत्य, नाट्य, मद्यपान गृह वगैरे कुठे बांधणार आहात?’’
‘‘या इथेच. मोंमार्त्रमध्ये.’’
‘‘एक्स्पोझिशनपासून जरा दूरच होईल नाही का?’’
‘‘जरा लांब वाटलं तरी मोंमार्त्र हीच त्याला योग्य जागा होईल. एकतर हे ठिकाण शांत व निसर्गसुंदर आहे. शिवाय इथलं स्वच्छंदी व बाहेरख्याली जीवन. स्वतःच्या देशात जी मौजमजा ज्यांना करता येत नाही ती बाहेर पडल्यावर मिळाली तर त्यासाठी ते कोणतीही किंमत मोजायला तयार होतील. दुसरी महत्वाची बाब म्हणजे इथलं कलाकारांचं वास्तव्य व त्यांची बोहेमियन जीवनशैली. प्रवाशांच्या दृष्टीने कलाकारांचं जीवन भलतंच रोमँटिक असतं.’’
‘‘खरंय. पुष्कळ कलाकार तसे असतातही,’’ हेन्री हसत हसत म्हणाला, ‘‘मोंमार्त्रमध्ये अगोदरच नृत्यगृहांची खूप गर्दी झालीय याचा तुम्ही विचार केला आहे का?’’
‘‘मस्य, मी म्हणतो तशा प्रकारची वैविधता देणारं एकही नाहीय. इथेच नव्हे तर अगदी लंडन ते सॅनप्रॅन्सिस्कोपर्यंत सगळ्या जगात शोधून सापडणार नाही. माझ्या स्वप्नातील या जागेत नृत्यगृह, आर्ट गॅलरी व वेश्यागृह यांचा मिलाफ बघायला मिळेल. इमारतीची रचना अगदी आगळीवेगळी असेल. एखाद्या पवनचक्कीसारखी. तिचा रंग लाल अगदी अंतर्बाह्य लाल. पॅरीसमध्ये लाल रंगाची एकही इमारत नाहीय. लाल रंग रात्री उठून दिसतो, त्यात स्त्रियांचे सौंदर्य खुलून उठते आणि पुरुषांची वासना उद्दिपित होते. इमारतीवर एक पवनचक्कीचे फिरते पाते बसवण्यात येणार आहे. त्यावर अमेरिकेतील हजारो इलेक्ट्रिक बल्ब बसविण्यात येतील. अर्थात लाल रंगाचे. ही रोषणाई अगदी दहा मैलांवरूनसुद्धा दिसेल. एक चित्र मनात रंगवून तर पाहा.’’
झिडलर थोडा वेळ गप्प होता. रात्रीच्या वेळी चमचमणाऱ्या लालचुटूक दिव्यांचे पवनचक्र फिरताना त्याच्या नजरेसमोर तरळू लागले. त्याने हातातला बीअरचा पेला उंचावला व पिऊन रिकामा केला व दुसऱ्या हाताने मिशांना चिकटलेला फेस पुसत पुढे म्हणाला, ‘‘सहा-सात महिन्यांत माझे नृत्यगृह चालू होईल. एक्स्पोझिशनला येणाऱ्या सगळ्या इंग्लिश व अमेरिकन प्रवाशांना त्या निमित्ताने फ्रान्समधील प्रख्यात नृत्यगृह पाहता येईल. आणि मग जगप्रसिद्ध व्हायला कितीसा वेळ. सर्व बारीकसारीक तपशील तयार आहेत अगदी नावासकट. काय नाव असेल? ओळखा पाहू.’’
‘‘काही सांगता येत नाही बुवा.’’ हेन्रीने कबुली देत हातातला कोनॅकचा पेला मोठ्या झोकदारपणे उंचाविला.
झिडलरनेही फार न ताणता बीअरचा पेला उंचावत जाहीर केले, ‘‘मुलँ रूज. मस्य नीट लक्षात ठेवा. थोड्याच दिवसांत हे नाव जगभर सर्व शौकिनांच्या तोंडी असेल. मुलँ रूज.’’

No comments:

Post a Comment