Tuesday, October 23, 2018

मुलँ रूज - ७२

सर्वजण निघून गेल्यावर हेन्री एकटाच मागे उरला. त्याने एका कॅफेत जाऊन जेवण घेतले व नंतर फॉलीज बर्जेरामध्ये जाऊन बसला. लामोर अ व्हेनीसचा शेवटचा अंक चालू होता. रिआल्टोवरील पूल, खाली गोंडोला वगैरेचा सेट लावलेला होता.
ऑर्केस्ट्रावर प्रेमगीताची आर्त धून वाजविली जात होती. गायिका तारसप्तकात गात होत्या तर नर्तिका व्हेनेशियन वेषभूषेत एक हात कंबरेवर, दुसरा हात उंचावत नाचत होत्या. पुलाखाली गोंडोला डोलत होता. लय हळूहळू टिपेला पोचली, सिंबल्सचा झणत्कार झाला व टाळ्यांच्या कडकडाटात पडदा पडला.
हेन्री थिएटरबाहेर पडला. रात्रीचे बारा वाजले होते. रस्त्यावर शुकशुकाट होता. आणखी एखादा पेला झोकण्याच्या बेताने तो कॅफे रीशमध्ये गेला. शेवटचा खेळ आटोपल्यावर नाटकातील कलाकार मंडळी तेथे ओनीयन सूप प्यायला जात. तेथे वातावरण अगदी मोकळे असे. चंदेरी दुनियेतील छोटे-मोठे सितारे खेळीमेळीने एकमेकांना पहिल्या नावाने हाक मारताना दिसत. या कॅफेत वरिष्ठ कलाकार मंडळी आपला बडेजाव थोडा वेळ विसरत. रात्रपाळीचे वार्ताहर व गॉसिप लेखक कोणाकडे काय बातमी मिळतेय इकडे अगदी कान लावून असत. कित्येक वेळा मोठमोठ्या करारमदारांचा मसुदा इथल्या टेबलावर बसून नक्की होई. हेन्रीला एकटा बसलेला पाहून जेन ॲव्हरील त्याच्या टेबलावर आली. तिने ओनीयन सूप, स्क्रँबल्ड एग्ज व कॉफी मागविली.
(कॅफे रीशमध्ये बसून सूप द ल्योनो घेणे हा पॅरीसला भेट देणाऱ्या पर्यटकांचा एक कार्यक्रम असतो.)
‘‘मला एक डबल ब्रँडी.’’ हेन्री.
‘‘अहो, तुम्हाला झालंय तरी काय? बघावं तेव्हा आपले दारू पीत असता. मी कधी तुम्हाला खाताना पाहिलेच नाहीय.’’
‘‘तूसुद्धा प्रवचन झोडायला लागलीस. खूप दमलोय मी. जरा निवांतपणे एखादा पेला पिऊ देशील की नाही?’’
‘‘अशाने लवकरच प्रकृतीची वाट लागेल. ते काही नाही चालायचं. आता माझ्याबरोबर तुम्हीसुद्धा काहीतरी खाऊन घ्या.’’ तिने हेन्रीसाठी सूप व एग्ज मागविली.
‘‘मला एक पोस्टर करून हवंय. कराल माझ्यासाठी?’’
‘‘मी तुला मागेच सांगितलंय की मी पोस्टर करणं बंद केलंय म्हणून आणि तुला नव्या पोस्टरची गरज काय? सध्या आहे ते ठीक आहे की.’’
‘‘ते तुम्ही झिडलरसाठी केलं आहे. तुम्ही एवढ्या जणांना पोस्टर करून दिलेली आहेत. पण माझ्यासाठी म्हणून एकही केलं नाहीत. हे बघा, पुढच्या वर्षी मी लंडनला शो करणार आहे. तेव्हा त्या इंग्लिश लोकांच्या नजरेत भरेल असं काहीतरी नवीन हवंय.’’
‘‘आजपर्यंत तुझी जवळपास एक डझनभर तरी पोर्ट्रेट्स मी केली असतील. ती कुठे गेली? स्केचीस्‌ किती केली असतील त्याची तर गणतीच नाही.’’
‘‘माझ्या पोर्ट्रेटचा मला काय उपयोग? ते विकत घेऊन माझ्या संग्रहात ठेवणं मला काही परवडण्यासारखं नाहीय. पोस्टर करून दिलंत तर काही फायदा. हेन्री, प्लीज. लंडनचा हा शो खूप महत्वाचा आहे. तुमच्या पोस्टरने नशीब फळफळतं असा इतिहास आहे. व्हेट गिलबर्ट, लुआ फ्युलर आणि कोण ती आयरीश बया मे मिल्टन का बेलफोर्ट. काय आहे तिच्याकडे? स्टेजवर मांजरीसारखी म्यॉँवम्यॉँ करत नुसती फिरत असते. हसायला काय झालंय तुम्हाला?’’
‘‘विशेष काही नाही. मनात आलं एका बाईने दुसऱ्या बाईला कधी चांगलं म्हटलंय?’’
तेवढ्यात मे बेलफोर्ट एका मध्यमवयीन गृहस्थाच्या हातात हात घालून आली.
‘‘सटवीला शंभर वर्षं आयुष्य आहे. आज आपला बँक अकाउंट बरोबर घेऊन आलेली दिसतेय.’’
वेटरने सूप व एग्ज आणून ठेवले. तिने सावकाशपणे खायला सुरुवात केली. जेन ॲव्हरील मुलँमध्ये आल्यापासून हेन्री तिला ओळखत होता. तिचे नृत्यातील उपजत गुण तिने मेहनतीने जोपासले होते. सामान्य परिस्थितीतून आलेली एक नर्तिका आता एक प्रसिद्ध नटी होऊ पाहत होती. हेन्री तिच्या नृत्यकौशल्यावर फिदा होता. त्या दोघांची अतिशय जिव्हाळ्याची मैत्री होती.
‘‘मस्य हेन्री, तुम्ही काही खात का नाही? सारखं पिणं चाललंय. ही कोनॅक तुमचा जीव घेईल एके दिवशी.’’
‘‘प्लीज जेन. मी जास्त पितो. एवढं पिणं चांगलं नव्हे. कबूल आहे. पण आता हे पिणं बंद करणं कठीण आहे. तू किंवा आणखी कोणी कितीही प्रयत्न केला तरी काही उपयोग होत नाही. मलाही वाटतं थांबवावं, पण नाही जमत.’’
त्याच्या निबर चेहऱ्याकडे तिने पाहिले. त्याची ती दाढी आणि पुढे आलेले ओठ यामुळे त्याच्या कुरूपतेत भर पडली होती.
‘‘हेन्री. एकटेपणा खायला उठतो तर दारू पिणं हा काही एकच उपाय नाहीय. तुमच्याबरोबर तुमची कला तर आहे.’’
जेन ॲव्हरील जेव्हा तिच्या नव्या प्रियकराबरोबर निघून गेली तेव्हा पहाटेचे दोन वाजून गेले होते. कॅफेसमोर रेंगाळत असलेल्या घोडागाडीत हेन्री चढला व गाडीवानाला त्याने उगाच कुठेतरी जायला सांगितले. थोडा वेळ मॅक्झीममध्ये नंतर आयरीश अमेरिकन बार. गाडीत बसल्यावर त्याला पॉल गोगँची आठवण झाली. एकेकाळी तो असाच अस्वस्थ असायचा. भरतकाम केलेले लालभडक रंगाचे जॅकेट घालून तो बुलेव्हारवर भटकताना आढळायचा. त्याच्या काकाने त्याच्या नावे तेरा हजार फ्रँक ठेवले होते. त्यामुळे तो अगदी छानछोकीने राहायचा. आपल्या ताहिती पेंटिंगनी आपण पॅरीसमध्ये खळबळ उडवून देणार आहोत अशा वल्गना करीत फिरायचा. इकडून तिकडून जमा केलेल्या सटरफटर पॉलीनेशियन कलावस्तू दाखविण्याच्या निमित्ताने स्टुडिओत चहापाटर्या करण्यात थोडे दिवस गेले. शेवटी गुत्त्यात बसून दिवस ढकलण्याची पाळी आली. कोट, टाय, हॅट, ग्लोव्हज सगळा जामानिमा गेला. फाटके जॅकेट, ठिगळ लावलेली पँट व समोर ॲबसिंथची बाटली. खिशात दमडी नाही. पन्नाशी उलटलेली, तेरा हजार फ्रँक केव्हाच संपलेले. ताहितीला जाऊनही फारसे यश हाती लागलेले नव्हते. शरीराला जडलेले रोग, मोडलेला पाय, तोंडात अपयशामुळे आलेली कडवट चव, डोक्यात विरलेली स्वप्ने व कुरतडणाऱ्या आठवणी. बिचारा पॉल गोगँ. मनाने व शरीराने पिचलेला, दारिद्र्याने गांजलेला. आता या घटकेला तो काय करीत असेल बरे?
विचारांच्या तंद्रीत हेन्रीला थोडा वेळ डुलकी लागली. घोडागाडी अगदी संथपणे चालली होती. त्याने डोळे किलकिले करून पाहिले. आकाशात थोडे फटफटू लागले होते. इतका वेळ काळ्याभोर शाईसारख्या दिसणाऱ्या आकाशात दगडी पाटीचा करडेपणा दिसू लागला होता. दूर क्षितिजावर सीन नदीच्या पार्श्वभूमीवर नोत्र दॅमची धूसर आकृती दिसत होती.

‘‘कोचर. ल फ्लूर ब्लां.’’
रू द मुलँ ही पॅरीसमधील एक छोटीशी गल्ली होती. इतकी क्षुल्लक की बहुतेक नकाशांत ती दाखवलेलीसुद्धा नसे. गेल्या बाजारी कोणतीही महत्वाची घटना रू द मुलँमध्ये घडली नव्हती. ना एखादा खून ना खळबळजनक गुन्हा किंवा रस्त्यावर रक्ताचा सडा पडेल अशी एखादी ऐतिहासिक कत्तल. नेपोलीयन पॅरीसभर एवढा हिंडला, पण त्याचे पाय या गल्लीला कधी लागले नव्हते. दगडी भिंतींच्या आणि लोखंडी सज्जांच्या इमारती यामुळे वातावरण अठराव्या शतकातील वाटत असे. एकूण वस्ती कनिष्ठ मध्यमवर्गीयांची. या गल्लीत आजूबाजूच्या वातावरणाशी विसंगत अशी एक हवेली होती. ही हवेली एका धनाढ्य सावकाराने त्याच्या अंगवस्त्राच्या निवासासाठी शहरापासून थोडीशी लांब अशी बांधली होती. सावकाराच्या मृत्यूनंतर थोड्याच दिवसांत त्याचे रूपांतर मध्यमवर्गीयांना राहायला भाड्याने जागा दिलेल्या वाड्यात झाले. कालांतराने त्या दरिद्री मंडळींचे घरभाडे वारंवार थकू लागले. त्यामुळे एक एक करून ते सोडून गेले. त्यांच्या जागी रस्त्यावरच्या गावभवान्या येऊन राहू लागल्या. ज्यांना आपली जागा सोडायची नव्हती त्यांनी घरभाडे परवडावे यासाठी वेश्या व्यवसाय पत्करला. कालपरत्वे त्या हवेलीचे रूपांतर एका वेश्यागृहात झाले. दुसऱ्या नेपोलीयनच्या कारर्किर्दीत त्या इमारतीला बरकतीचे दिवस आले. दरबारी मंडळी अधूनमधून तेथे मुक्कामाला येऊ लागली. बड्या धेंडांच्या सेवेत तेथील मुली कोणतीही कमतरता ठेवत नसत. उच्च नैतिक मूल्यांचा घोष करणाऱ्या प्रजासत्ताकवाद्यांनी सत्ता काबीज केल्यानंतर साहजिकच जुन्या सरंजामशहांच्या नैतिक अधःपतनाच्या दर्शक अशा बाबींवर त्यांचा रोष झाला. त्यांनी वेश्यांचा व्यवसायाचा परवाना रद्द करण्याचे ठरविले. तेव्हा तेथील वेश्यांची प्रतिनिधी अशी एक मादाम प्रजासत्ताकवादी नेत्यांना जाऊन भेटली. ल प्लूर ब्लांमधील सगळ्या मुली या मूलतः प्रजासत्ताकवाद्यांच्याच बाजूच्या आहेत, असे तिने शपथेवर सांगितले. पूर्वी त्या सरंजामवाद्यांच्या सेवेत होत्या हे खरे असले तरी तो एक जबरदस्तीचा मामला होता. रोज रात्री झोपताना मस्य तीएरचा फोटो उशीखाली ठेवूनच त्या झोपायच्या. आता क्रांतीनंतर त्यांनी ते फोटो उघडपणे भिंतीवर लावले आहेत आणि प्रजासत्ताकवाद्यांपैकी कोणीतरी पाहुणा येण्याची त्या सगळ्या आतुरतेने वाट पाहत आहेत.
या प्रकरणाचा विचार करण्यासाठी सरकारने चौकशी करण्याचे ठरविले. आता चौकशी म्हटली की मुळापासून व्हायला पाहिजे. म्हणून काही सरकारी अधिकाऱ्यांनी जातीने ल फ्लूर ब्लांला भेट दिली, चौकशी केली आणि ते परत गेले. थोड्या दिवसांनी अधिक चौकशीसाठी नवीन अधिकारी येऊन गेले. अशी चौकशी वारंवार होत राहिली, पण परवाना रद्द करण्याचे नाव आता कोणी काढीत नसे.
हेन्रीने जेव्हा ल फ्लूर ब्लांमध्ये पाऊल ठेवले तेव्हा रात्र ओसरत आली होती. मादाम पोतीएरों आपल्या खुर्चीत भकास नजरेने बसली होती. तिच्या मांडीत तिचा आवडता कुत्रा टुटु डोके मुडपून शांतपणे झोपला होता. मादाम पोतीएरोंला घडवताना निसर्गाचे सौंदर्याकडे साफ दुर्लक्ष झाले होते. तिचा देह म्हणजे जणू मूर्तिमंत कुरूपता होती. देह बटाट्याच्या पोत्यासारखा, चेहेरा एखाद्या डुकरिणीची आठवण करून देणारा. असे असले तरी ती स्वभावाने अतिशय प्रेमळ होती. एकाकी हेन्रीवर ती मायेची पखरण करीत असे.
(कुत्र्याला मांडीवर घेऊन बसलेली मादाम पोतीएरों व शेजारी तिचा नवरा असे लोत्रेकने केलेले एक पोर्ट्रेट आल्बीमधील म्युझियममध्ये आहे.)
मादामशी थोडा वेळ गप्पा मारून झाल्यावर हेन्री वर जाऊन झोपला. सकाळी जरा उशिराने उठल्यावर बघतो तो बिछान्यात शेजारी एल्सा झोपली होती.
‘‘आज मी सोडून सगळ्या पोरींना गिऱ्हाईकं भेटली. मला एकट्याने झोप येईना म्हणून तुझ्या शेजारी येऊन झोपले.’’ एल्साने उठल्यावर खुलासा केला. एल्सा व्हिएन्नाची होती. एकेकाळी ती खूप सुंदर दिसायची. आता तिच्या तारुण्याचा बहर ओसरला होता. हेन्रीने उठल्याबरोबर तिचे पोर्ट्रेट करायला घेतले. दिवसभर ती हेन्रीच्या खोलीत आळसावल्यासारखी बसून गप्पा मारीत होती. लहानपणच्या व्हिएन्नातील आठवणी, तेथील सुंदर रस्ते, बीअर गार्डन्स, इमारती, वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी चुलत्याने केलेला बलात्कार सगळे काही ती अगदी त्रयस्थपणे सांगत होती. मधेच हेन्रीच्या पिण्यावर तिची टीका चालू होती.
(लोत्रेकने केलेले एल्सा द व्हिएन्नीज्‌हे पोर्ट्रेट आल्बीमध्ये आहे.)
दुपार टळल्यानंतर एक एक जणी उठून तयार व्हायला लागल्या. आळसावलेल्या, केस मोकळे सोडलेल्या अशा त्या मधूनच हेन्रीच्या खोलीत डोकावायच्या. थोडा वेळ पेंटिंग बघ, जांभया देत उगाच खाली रस्त्यावर बघ असे वेळ काढणे चालू होते. एवढ्यात त्यांना रस्त्यावरून पायघोळ डगला घातलेला एक पाद्री जाताना दिसला.
‘‘तो पाद्री पाहिलास का? त्या डगल्याखाली त्याने पँट घातली असेल का?’’ एल्साने गमतीने विचारले.
‘‘त्या डगल्याखाली पँट आहे की नाही ते वरून कसं कळणार, पण तू स्कर्टच्या आत चड्डी घातलेली नाहीस हे त्याला खालून दिसलं आणि तो वर आला तरच आपल्याला कळेल की त्याने पँट घातलीय की नाही?’’
सगळ्या जणी मनापासून हसल्या. वातावरणातील मरगळ पळून गेली. पाद्रीबोवांच्या पोशाखावरून विषय देवाची प्रार्थना करताना बसून करावी की गुडघे टेकून करावी यावर गेला. वादविवादात दोन तट पडले आणि मग एकच खडाजंगी उडाली. एकमेकांना शिव्या देत, एकमेकांची उणीदुणी काढत, आईबाप, भाषा, प्रांत, देश, वांशिक पोटभेद यांचा उद्धार करीत एवढा गदारोळ उडाला की प्रकरण एकमेकींच्या झिंज्या उपटण्यावर जाणार की काय असे वाटण्याची पाळी आली. देवाची प्रार्थना कशी करावी यावरून झालेल्या भांडणातील शब्द पाद्रीबोवांच्या कानावर गेले असते तर त्यांना नक्कीच झीट आली असती. भाषातज्ज्ञांना युरोपातील सगळ्या भाषांतील शिव्यांचा अभ्यास एकाच ठिकाणी करता आला असता.
ते निरर्थक भांडण हेन्री शांतपणे बघत होता. रोज रोज मनाविरुद्ध करावा लागणारा शरीरसंबंध, अंधःकारमय भविष्य, पापी जीवन जगत असल्याची पोखरणारी जाणीव यामुळे त्या सर्वांचा स्वभाव अत्यंत चिरचिरा झाला होता. त्यात भर एकत्र राहण्याची. त्यामुळे क्षुल्लक कारणावरून चालू झालेली भांडणे नेहमी विकोपाला जात. हेन्रीने त्या भांडणाऱ्या पापाच्या जोगिणींचे हावभाव पटापट आपल्या स्केचबुकात उतरविले. तेवढ्यात लॉड्रीवाला आला आणि त्या निमित्ताने उगाचच चालू झालेले भांडण तसेच अचानक थांबले.
(लोत्रेकचे लाँड्रीमॅन हे पोर्ट्रेट आल्बीमधल्या म्युझियममध्ये आहे.)


No comments:

Post a Comment