Tuesday, October 16, 2018

मुलँ रूज - ५२

हेन्रीला जाग आली तेव्हा शेकोटीत जळणाऱ्या सरपणावरून मादाम ल्युबेत येऊन गेल्याचे त्याला कळले. ती आली तशीच परस्पर काही न बोलता निघून गेली. तिच्या या गप्प राहण्यामुळे तिची झाल्या प्रकाराबद्दलची नाराजी दिसून येत होती. बाहेर पाऊस पडत होता. वातावरणात मरगळ होती.
त्याने शेजारी झोपलेल्या त्या मुलीकडे उशीवरून मान वळवून पाहिले. हाताची उशी करून शांतपणे ती झोपली होती. नेहमी सार्वजनिक बागेतल्या एखाद्या बाकड्यावर नाहीतर दुकानाच्या वळचणीला किंवा अशीच कुठेतरी जागा मिळेल तिथे हाताच्या घडीची उशी करून झोपण्याची सवय असली पाहिजे. ज्या दिवशी गिऱ्हाईक मिळेल त्या वेळी एखाद्या भिकार हॉटेलातल्या कापूस बाहेर आलेल्या फाटक्या गादीवर. आजच्यासारखा मऊ-मुलायम बिछाना क्वचितच तिच्या वाट्याला आला असेल. तिचे ओठ किंचित विलग झाले होते. एक स्तन उघडा पडला होता. तिच्याकडे पाहून त्याला क्लाऊटच्या पेंटिंगमधल्या तरुण कुमारिकांची आठवण झाली. थोड्या वेळाने ती उठेल व निघून जाईल. कुठे ते देवच जाणे. पुन्हा पोलिसांचा ससेमिरा चुकवत, पावसात भिजत, थंडीत कुडकुडत दिवसभर या गल्लीतून त्या गल्लीत धावपळ करीत, दुपारच्या जेवणाला गाडीवरून पळवलेले एखादे फळ, नाहीतर पाण्याच्या घोटाबरोबर कोरडा पाव. रात्री चार-पाच फ्रँकसाठी आपला देह एखाद्या अनोळखी इसमाच्या स्वाधीन करायचा. कधी कधी रात्रीच्या आसऱ्याच्या बदल्यात फुकटसुद्धा. जसा काल रात्री आपल्याला मिळाला तसा. आज रात्री दुसऱ्या कोणासमोर तरी ही कपडे उतरवेल आणि तो अनोळखी इसम तिच्या कोवळ्या लुसलुशीत देहाचा भोग घेईल.
तिचा सुंदर देह कोणालाही मोहित करेल असा असला तरी तिच्या स्वभावात प्रेम आणि आपुलकी यांचा लवलेशही नव्हता. आपल्या बोलण्याचे दुसऱ्याला काय वाटेल याची तिला फिकीर नव्हती. तिच्या वागण्या-बोलण्यात उर्मटपणा ठासून भरलेला होता. पण त्याच बरोबर तिच्या रोमारोमांत एक प्रकारचा उत्तानपणा भरलेला होता त्यामुळे हेन्रीला तिचे आकर्षण टाळता आले नाही.
तिला जेव्हा जाग आली तेव्हा तो इझलपाशी उभा होता. आळस देऊन पुरा होताच तिने त्याच्याकडे उद्धटपणे एक सिगरेट मागितली. रागाची तिडीक त्याच्या मस्तकात गेली. एवढीसुद्धा रीतभात हिला नाही. तो काहीतरी बोलणार होता पण थोड्या वेळात ती जाणारच आहे तर कशाला उगाच वाद घालून स्वतःला त्रास करून घ्या अशा विचाराने त्याने आपल्या रागाला आवर घातला.
‘‘ऊठ आता. केवढी दुपार झालीय बघ.’’
तिने सिगरेट शिलगावून एक खोल झुरका घेतला. ‘‘ही सगळी चित्रं तुम्हीच काढलीयत का?’’ ती सभोवताली भिंतीवर लटकवलेले कॅनव्हास बघत होती. तिच्या नजरेत ना कौतुक होते ना साधे कुतूहल. ‘‘काय करता हो या सगळ्या चित्रांचे?’’
‘‘विकतो.’’ तो थंडपणे म्हणाला.
‘‘कधी गिऱ्हाइक भेटते का? किती पैसे भेटतात एकेका चित्राला?’’
त्याने कॅनव्हासवरील नजर काढून तिच्याकडे एक दृष्टिक्षेप टाकला. ती अजूनही कपडे न घालता संपूर्ण नग्नावस्थेत बसून होती. त्याने काठीच्या टोकाने जमिनीवर पडलेली चड्डी तिच्याकडे भिरकावली व म्हणाला, ‘‘घाल ती चड्डी आणि ऊठ तिथून.’’
ती तशीच आढ्याकडे नजर लावून बसून राहिली. तिचा तो वर वळलेला चेहरा ढगाळ दुपारच्या परावर्तित मंद प्रकाशात किंचित उजळलेला दिसत होता. तिचे डोळे फिकट बदामी रंगाचे होते. तिचे खांदे जरासे वर आलेले, काखा जांभळट, त्याला वाटले तिला तीच पोज घ्यायला सांगून चटकन एखादे स्केच करावे. पण त्याने स्वतःला आवरले.
‘‘ते काय तुम्ही डोईवर घातलंय.’’ तिने विचारले.
‘‘ही माझी काम करताना घालायची हॅट आहे. ब्रश पुसायला चटकन हाताशी मिळते.’’
‘‘काय येड्यावानी दिसताय.’’
‘‘हे बघ. तुझ्यावर बघायची कोणी सक्ती केलेली नाही. आता ते कपडे एकदाचे अंगावर चढव आणि चालू लाग. मला पुष्कळ काम आहे.’’ तो वैतागून म्हणाला.
‘‘तुम्हाला जरा पण मस्करी केलेली चालत नाही. मी काही बोलले की केवढे ओरडता.’’ ती त्याच्या जवळ जाऊन लाडीक नजरेने बघत म्हणाली. तिचे समोरच्या दरवाजाकडे लक्ष गेले.
‘‘काय आहे तिकडे?’’ तिने विचारले.
‘‘माझी खोली आणि बाथरूम.’’
तिने धावत जाऊन दरवाजा उघडला. ‘‘प्लीज. मला अंघोळ करायला द्याल का या बाथरूममध्ये. अंघोळ झाल्यावर मी चकाचक साफ करून देईन. प्लीज एकदा तरी करू दे ना.’’ लहान मुलाला नव्या खेळण्याविषयी वाटते त्या उत्सुकतेने तिने विचारले.
त्याचे अंतर्मन त्याला सांगत होते नको. तिला घालवून दे. पण त्याच्या स्वैर मनाने त्याच्या ताब्यातून निसटून परस्पर परवानगी देऊन टाकली. होकाराचे शब्द त्याच्या तोंडून केव्हा बाहेर पडले ते त्याचे त्यालाच कळले नाही.
‘‘पण लवकर बाहेर ये.’’ स्वतःच्या मनावर ताबा मिळवण्याची केलेली केविलवाणी धडपड.
आतून नळाच्या तोट्या इकडे तिकडे फिरवल्याचे व पाण्याचे चित्रविचित्र आवाज येत होते. मधूनच गाण्याची लकेर. नळ बंद होत नाही म्हणून तिने त्याला बाथरूममध्ये बोलावले. ती टबमधल्या पाण्यात मजेत खेळत होती. आयुष्यात पहिल्यांदाच एवढ्या थाटात स्नान करायला मिळाले असावे. रस्त्यावरचे अनाथ मूल पंचपक्वान्नावर तुटून पडावे तसे दृश्य दिसत होते. तिचा चेहरा अधिकच बालिश वाटत होता. तिचे सुकुमार स्तन नुकत्याच वयात आलेल्या मुलीसारखे दिसत होते. एकदा तिने आपले केस सावरण्यासाठी म्हणून हात वर केला त्या क्षणी ती लुव्हरमधल्या एखाद्या शिल्पासारखी भासली. आणखी एक रात्र. फक्त एकच.
‘‘मला माहितेय तुम्ही मला तुमच्या बाथरूममध्ये काल रात्री का येऊ दिलं नाही ते.’’ ती आपल्या छातीला साबण चोळीत म्हणाली. ‘‘तुमच्या या छान छान वस्तूंना मी हात लावून घाण करीन म्हणून भीती वाटली तुम्हाला. तुम्हाला मी आवडत नाही. म्हणूनच तुम्ही माझ्या आंगावर सारखे ओरडत असता.’’
तिने डोळ्याच्या कोपऱ्यातून त्याच्याकडे पाहिले.‘‘पण मी तुमच्याशी काल रात्रीला चांगले वागले की नाही? तुम्ही कबूल करायचा नाही. तुम्ही तो चष्मा लावला नाहीत तर अगदी हिरो दिसाल.’’ ती काहीतरी असंबद्ध बडबडत होती.
‘‘काय फरक पडतो मला तू आवडलीस की नाही त्याने? तुझं काम झालंय. पोलिसांच्या तावडीतून तुझी सुटका झाली. रात्रीपुरता आसरा मिळाला. आता लवकर आटप आणि निघ इथून.’’
‘‘आंघोळ झाली की निघतेच. आजच्या रात्रीला पुन्हा येईन, तुम्हाला पाहिजे असेल तर.’’
मोहाचा हा क्षण टाळला पाहिजे. तिला नको म्हणून सांग. तिला फक्त रात्रीपुरता निवारा हवाय. ही बाथरूम, हा मऊ उबदार बिछाना, वर तुझे पैसे यापलीकडे तिला काही देणंघेणं नाहीय. पण त्याचे स्वैर मन भोगाच्या एका रात्रीची मागणी करीत होते. फक्त एक रात्र. त्याने चष्मा काढून पुसायला सुरुवात केली.
‘‘अहो, तुम्ही अजून मला माझं नावसुद्धा इचारलं नाहीत. माझं नाव मारी. तुमचं?’’
‘‘हेन्री.’’
‘‘फार छान नाव आहे. शोभतं तुम्हाला.’’
मारी. किती साधे पण गोड नाव आहे नाही? तिला थोडी चांगली वागणूक मिळाली की तिला सभ्य गृहस्थ व तिचे ते मवाली मित्र यातील फरक कळून येईल. इतकी वर्षे बिचारीने थंडी, भूक, भय यांचा सामना करीत रस्त्यावरच्या कुत्र्याच्या एखाद्या बेवारशी पिल्लासारखे दिवस काढले असतील. त्यात इतरांकडून सतत होणारी हिडीसफिडीस. उगाच नाही तिच्या स्वभावात एवढा तुसडेपणा आला. सारखे मारत राहिले तर कुत्र्याचे बेवारशी पिल्लूसुद्धा दिसेल त्याला चावत सुटते. हिला थोडेसे प्रेमाने वागवले पाहिजे. म्हणजे ती तिचा भूतकाळ विसरेल. तिचा स्वभाव जोखण्यात आपली केवढी चूक होत होती. वरवर बघता ती केवढी अप्पलपोटी, दुष्ट आणि मूर्ख वाटते. थोडी अशिक्षित आहे खरी. लहानपणी शाळेत जायला मिळाले नसेल. परिस्थितीचे टक्केटोणपे खाल्ल्यामुळे स्त्रियांच्या स्वभावातील नैसर्गिक ऋजुता आत खोल गाडली गेली असेल. परिस्थितीत बदल झाल्यावर हळूहळू ती वर येईलही.
त्याने तिला अंग पुसायला आपला टॉवेल दिला तेव्हापासून त्याचे मतपरिवर्तन व्हायला सुरुवात झाली. तिच्या हालचालीत एक नजाकत होती. तिचे टबमधून पाणी निथळत्या अंगाने बाहेर येणे, अंग पुसणे, तसेच नग्नावस्थेत आरशासमोर उभे राहून आपले दाट सोनेरी केस विंचरणे या सर्वात विलक्षण मोहकता होती. हे सर्व करताना तिची टिटवीसारखी सतत वटवट चालू होती. रस्त्यावरच्या भटक्या मुलांना नकला करण्याची एक उपजत देणगी मिळालेली असते. तिने पाटूची जी नक्कल केली ती फारच थोर होती. ओठावर फणी धरून तिने पाटूचा भसाडा आवाज काढला. त्याची यथेच्छ टवाळी केली. हेन्रीची ब्रश पुसून रंगाने बरबटलेली हॅट डोक्यावर तिरपी ठेवून एका हाताने आपली योनी झाकत दुसरा हात डोक्यावर ठेवून आरशात बघत तोंड वेडेवाकडे करीत तिने जी फक्कड पोज दिली ती बघून हेन्रीला हसू आवरेना.
त्याने जेव्हा पैसे देऊ केले तेव्हा तिने ते घ्यायला नकार दिला.‘‘मी तुम्हाला कबूल केलं होतं की मी पैसे घेणार नाही म्हणून.’’ हो-ना करता करता ती जेव्हा पैसे घ्यायला राजी झाली तेव्हा शंभर फ्रँकची नोट हातावर पडलेली पाहून ती उडालीच. बिचारी आयुष्यात प्रथमच शंभराची नोट हाताळत होती.

No comments:

Post a Comment