Monday, October 8, 2018

मुलँ रूज - ३५

दुसऱ्याच दिवसापासून हेन्रीने धडाक्याने कामाला सुरुवात केली. एकाच वेळी तीन-चार कॅनव्हास त्याने करायला घेतले. सकाळी अगदी दिसायला लागल्यापासून ते संध्याकाळी अगदी बाहेर अंधारून येऊन इझलवर काळोख पडेपर्यंत तो काम करत राही. हळूहळू त्याचा हात बसू लागला. दिवसेंदिवस रेखाटनातली सफाई वाढू लागली. त्याच्या कामाचा झपाटा विलक्षण होता.
दिवस कामात कसा निघून जाई ते कळत नसे. पण संध्याकाळ मात्र अस्वस्थ करणारी असे. विसरू पाहाव्यात पण विसरता न येणाऱ्या आठवणी खायला उठत. स्टुडिओत जसा अंधार दाटू लागे तशा गतस्मृती कुजबुजून त्याच्या भोवती पिंगा घालू लागत. अंधारात पेटणाऱ्या एकुलत्या एक दिव्याभोवती झुंबड उडवून देणाऱ्या पतंगांसारख्या. थंडगार भिंतीतून आठवणींची दृश्ये झिरपत त्याच्या डोळ्यांसमोर तरंगू लागत आणि सापासारखे वेटोळे करीत त्याच्या भोवती ठिय्या मारून बसत. अशा वेळी हेन्री डोक्यावर हॅट घालून चटकन बाहेर सटके.
अशाच एका संध्याकाळी त्याने ला नुव्हेलीत चक्कर टाकली. तिथल्या सर्व परिचित गोष्टी आता अपरिचित वाटू लागल्या होत्या. ज्या कॅफेतील वातावरण दोन वर्षांपूर्वी जिवंत वाटायचे तेच वातावरण आता एखाद्या गुत्त्यातल्या गोंगाटासारखे वाटत होते. जेथे पाऊल टाकताच चित्तवृत्ती प्रफुल्लीत होत असत तिथे आता पाय टाकताच मरगळ आली. आज तेथे बरेच नवे चेहरे दिसत होते. हेन्रीला पाहून त्या नव्या विद्यार्थ्यांची रंगात आलेली चर्चा मधेच थांबली. सॅलूनमध्ये एकदा आपटी खाऊन झाल्यावर आता याचे तिथे काय काम आहे असा एकूण आविर्भाव त्यांच्या नजरेत होता. जुने चित्रकार एक तर त्यांच्या स्वतःच्याच प्रश्नांमध्ये मशगूल होते नाहीतर डॉमिनो खेळण्यात तरी. एकूण कोणालाही त्याच्याकडे लक्ष द्यायला फुरसत नव्हती. मोंमार्त्रमधल्या अनेक अपयशी आणि बेकार लोकांपैकी एक. वय वर्षे बावीस. काहींच्या मानाने तरुण तर काहींना वयस्कर. तेथे बसलेल्यांपैकी कोणालाही त्याच्याशी मैत्री जोडण्यात किंवा गप्पा मारण्यात रस नव्हता.
प्रत्येक संध्याकाळी हेन्रीची एक दिशाहीन भटकंती चालू व्हायची. गर्दीमध्येसुद्धा त्याला एकाकीपणाची जाणीव सतत पोखरत असायची. कधी कधी तो एकटाच फर्नांदोच्या सर्कशीला जाऊन विदूषक, घोडेस्वार, शिकवलेले कुत्रे, रंगीबेरंगी तंग पोशाखातील कसरतपटू यांचे तासन्‌तास निरीक्षण करत बसे.
एका संध्याकाळी तो ल एलीसमध्ये जाऊन बसला. बराच वेळ कोणाचेही लक्ष त्याच्याकडे गेले नाही. शेवटी मालकाचे लक्ष त्याच्याकडे गेले. तो आपण होऊन त्याच्या टेबलावर येऊन बसला. त्याने तक्रारींचे चऱ्हाट त्याच्यापुढे लावले.
‘‘आमचा धंदा आजकाल साफ बसलाय. तुम्हाला सांगायची गरज नाही. आमच्या धंद्याला या मुलींची अप्रत्यक्ष मदत होत असते. त्यातल्या बऱ्याच मुली थोडाफार धंदाही करतात. चार पैसे मिळतात बिचाऱ्यांना. बार्ताझार पाटू नावाचा नवा हवालदार या भागात बदलून आलाय. एकदम कडक काम आहे. कार्डाबिगर धंदा करणाऱ्या पोरींच्या अगदी हात धुऊन मागे लागलाय. तुम्हाला माहीत नसेल. पॅरीसमध्ये वेश्याव्यवसाय करणाऱ्या मुलींची नोंदणी करून त्यांना एक कार्ड दिलं जातं. प्रत्येकाने हे कार्ड नेहमी जवळ बाळगलं पाहिजे असा नियम आहे. पण ते कार्ड घ्यायचं म्हणजे फार कटकटी असतात. कोणी बिगरकार्डाची मुलगी धंदा करताना सापडतेय का ते तपासायला हा डँबीस पाटू युनिफॉर्म न घालता साध्या कपड्यात सगळीकडे कुत्र्यासारखा वास घेत फिरत असतो. कोणी जर अशी सापडलीच तर तात्काळ तिची रवानगी सँ लाझरच्या सुधारगृहात झालीच म्हणून समजा. साध्या कपड्यात असल्यामुळे याला चटकन ओळखता येत नाही. त्यामुळेच तर सगळी पंचाईत झालीय. उघडपणे काहीच करता येत नाही. आता तुम्हीच सांगा. असं युनिफॉर्म न घालता फिरणं नैतिकदृष्ट्या योग्य आहे का?’’
कधी कधी तो बुलेव्हारमधील ब्रासेरीमध्ये जाऊन बसे. हॅट डोळ्यांवर ओढलेली, पाय खुर्चीवरून अधांतरी लोंबकळतायत अशा अवस्थेत तो तासन्‌तास बसून राही. कंटाळून जांभया देत, वर्तमानपत्र वाचत, वेटर्सची धावपळ बघत, उगाच कोणाची तरी वाट बघत असल्यासारखा. कधी उगाचच हाताला चाळा म्हणून स्केचबुकमध्ये रेखाटन करी. मधेच चष्मा पुसता पुसता चष्म्याच्या काचेत त्याला आपला कुरूप चेहरा दिसायचा. वाटायचे आईच्या म्हणण्यात किती तथ्य होते. तुला एकटे एकटे वाटेल.
एके दिवशी त्याने बसून बसून कंटाळा आला म्हणून सहजपणे कोनॅक मागवली. एक पेला. मग आणखी एक. थोड्या वेळाने पुन्हा आणखी एक. कोनॅक पिता पिता एक विलक्षण गोष्ट घडली. त्याचे पाय दुखायचे थांबले. महत्वाचे म्हणजे त्याच्या मनावरचे मळभ दूर झाले.
हॅट कोण लंगडा आहे. मी एका सुंदर मुलीबरोबर नृत्य करत आहे. ती सुंदरी माझ्या अंगाशी लगट करतेय. अगदी ल एलीसमधल्या पोरींसारखी. तिचे मस्तक माझ्या खांद्यावर विसावलेय. नृत्याच्या प्रत्येक पावलाबरोबर ती माझ्या बाहुपाशात शिरतेय.

No comments:

Post a Comment