Monday, August 20, 2018

अपसमज आणि अपशब्द


दुसऱ्या प्रदेशात रहाणाऱ्या लोकांबद्दल आपले काही पूर्वग्रह असतात. हे पूर्वग्रह आपल्या बोलण्यात नेहमी येत असतात आणि हळू हळू ते आपल्या भाषेचा एक भाग होऊन जातात. उदाहरणार्थ चिकट मारवाडी, पठाणी व्याज, गौडबंगाल. दुसऱ्या प्रदेशात रहाणारे लोक जर शत्रू प्रदेशातील असतील तर मग बघायलाच नको. त्यांचा उल्लेख करताना त्यांचा अपमान होईल अशा तऱ्हेने भाषा वाकवली जाते. आपले स्वघोषीत सेनापती शेजारच्या पाकिस्तानातील लोकांचा उल्लेख करताना त्यांना पाकड्या म्हणतात. हा बालिशपणा रुळला नाही हे आपले आपले सुदैवच म्हणायचं. आदेशाने लादलेले शब्द जनमानसात रुजले नसले तरी रस्त्यावर निर्माण झालेले शब्दांपैकी काही शब्दांना प्रमाण भाषेत स्थान मिळते. काळ पुढे गेला, परिस्थिती बदलली तरीही ते शब्द मात्र तसेच रहातात. जसे पठाणी करणारे सावकार आता गेले तरी भरमसाठ जबरी व्याजाला पठाणी व्याज हा शब्दप्रयोग कायम राहिला. इंग्रजांच्या पूर्वग्रहांचा इतिहास असाच इंग्लीश भाषेत कायमचा कोरला गेला आहे.
इंग्लंडच्या उत्तरेला हॉलंड आणि दक्षिणेला फ्रान्स ही शेजारी राष्ट्र आहेत. आज जरी हॉलंडची ओळख एक शांतताप्रिय राष्ट्र अशी असली तरी सोळाव्या शतकातील डचांनी व्यापार आणि नौकानयनात मोठी मजल गाठली होती. त्याकाळात ह़ॉलंड हे युरोपातील एक मोठी आर्थिक सत्ता होती. त्यांचे नौदलही सामर्थ्यशाली होते. हॉलंड हे वसाहती आणि साम्राज्य विस्तारातील इंग्लंडचे थेट प्रतिस्पर्धी राष्ट्र. डच इस्ट इंडिया कंपनीची स्थापनाही ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीच्या बरोबरीनेच झाली होती. सहाजिकच सोळाव्या शतकात व्यापारी आणि सागरी वर्चस्वासाठी इंग्लंडची स्पर्धा प्रामुख्याने हॉलंडशी होती. दोन्ही देशात अगदी मोठमोठी युद्धं झाली अशातला भाग नसला तरी या स्पर्धेमुळे डचांना जेथे तेथे कमी लेखण्याची सुप्त भावना इंग्लीश भाषकांत होती. त्यामुळे त्यांची हेटाळणी करता करता कित्येक नवे शब्द प्रयोग रूढ झाले. त्यातील बरेच आजही प्रचलित आहेत.
उदाहरणार्थ Dutch courage. मद्यपान करून नशेत तर्र झालेल्या कोणत्याही लुंग्या-सुंग्या माणसात जे धैर्य येते ते म्हणजे Dutch courage. ज्या मेजवानीत पाहूणे जेवायला बसण्यापूर्वीच यजमान स्वतःच दारू पिऊन तर्र होतो ती मेजवानी म्हणजे Dutch feast. जेथे कोणतीही comfort नसते ती Dutch comfort. Dutch wife म्हणजे मोठी उशी अथवा लोड. समलिंगी जोडप्यांमधील स्त्री ही आणखी एक अर्थच्छटा Dutch wife ला आहे. वेश्येला Dutch widow, तर खडूस आणि हेकट माणसाला इंग्लीश लोक Dutch uncle म्हणतात. कंजूष लोक बाहेर हॉटेलात जेवायला गेले की मित्रांचे पैसे आपल्याला द्यावे लागू नयेत Going Dutch ही  पद्धत अवलंबतात. म्हणजे प्रत्येकाने आपापले पैसे द्यायचे.
चोर बाजारातील लबाड आणि उद्धट फेरीवाल्याबरोबर किंमतीत घासाघीस करण्याचा प्रयत्न केल्यास तो किंमत कमी करण्याच्या ऐवजी किंमत वाढवून सांगतो असा अनुभव आपल्या पैकी बहूतेकांना असेलच. अशा प्रकारे अवाजवी फुगवून किंमत सांगण्याच्या प्रकाराला इंग्लीश लोकांनी Dutch reckoning असं नाव ठेवलं. लिलावाला सुरवात करताना लिलाव पुकारणारा एक किमान किंमत जाहीर करतो आणि नंतर जमलेले ग्राहक त्यांची बोली क्रमशः चढ्या भावाने वाढवत जातात हे आपल्या सगळ्यांना महित आहे. पण Dutch auction मध्ये हे उलट होतं. म्हणजे लिलाव पुकारणारा एक खूप वरची किंमत जाहीर करतो व क्रमाक्रमाने उतरवत जातो. मासेमारी करण्यापेक्षा माश्यांच्या व्यापारात अधिक फायदा आहे हे डच लोकांनीच इंग्लीश लोकांना दाखवून दिलं. डच इस्ट इंडिया कंपनी ही जगातली पहिली जॉईंट स्टॉक कंपनी. व्यापारामध्ये डचच जास्त अघाडीवर होते. इंग्लीश लोकांना डचांबद्दल वाटणाऱ्या असुयेचं रूपांतर कदाचित दुस्वासात झालं असेल.
तीनशे वर्ष चालू असलेली ही निंदानालस्ती शेवटी डच सरकारच्या लक्षात आली. एव्हाना हे निंदाव्यंजक शब्द इंग्लीश भाषेत चांगलेच रुळले होते. इंग्लीश भाषेत सुधारणा करायला डच सरकारला खूपच उशीर झाला होता. त्यापेक्षा आपल्या देशाचे नाव बदलणं सोपं होतं. त्यामुळे त्यांनी १९३४ मध्ये इंग्लीश भाषिक देशात काम करणाऱ्या त्यांच्या राजदूतांना आपल्या देशाचा उल्लेख The Netherlands असा करण्याच्या सुचना दिल्या आणि तसा नियमच बनवून टाकला.
डचांनीसुद्धा इंग्लीश लोकांना त्यांच्या डच भाषेत अशीच नावे ठेवली असतील, पण इंग्रजांना ते समजणं शक्य नाही कारण त्यांच्या लेखी डच भाषा ही Double Dutch म्हणजे न समजणारी भाषा आहे. हे आपण कोणत्याही दक्षिण भारतीय भाषेची जशी अंडू गंडू म्हणून हेटाळणी करतो त्या प्रकारचं.
 इंग्लीश लोकांचं वेल्स लोकांशी काय वैर आहे कळत नाही. Welsh rabbit हा काय प्रकार आहे. एखाद्याने जेवणाचं आमंत्रण दिल्यावर आपण मोठ्या अपेक्षेने त्याच्याकडे जावं तर त्याने साधं पिठलं भात वाढून आपली बोळवण करावी. सशाच्या मटणाचा रस्सा खाऊ घालतो म्हणून बोलवायचं आणि साधा चीज टोस्टवर बोळवण करावी तशातला हा प्रकार म्हणता येईल. घरातल्या फरशीवर काहीतरी सांडून पडलेल्या डागांना Welsh carpet म्हणतात. Welsh diamond म्हणजे साधे रंगीत काचेचे मणी आणि Welsh comb म्हणजे बोटांनी केस विंचरणे.
वेल्श लोकांना नावे ठेवून झाल्यानंतर इंग्लीश लोक आयरीश लोकांकडे वळले. आता आयरिश लोकांना इंग्लीश इतके बिनमहत्वाचे समजत की Irish या शब्दाचा फालतू किंवा Nonsense ह्या व्यंगात्मक अर्थाने वापर होऊ लागला.
फ्रान्स हा इंग्लंडचा परंपरागत शत्रू. फ्रेंच हे लंपट आणि लबाड असतात असा समस्त इंग्रजांचा ठाम समज. त्यामुळे कंडोमला (निरोध) इंग्लीशमध्ये French letter अशी संज्ञा आहे. तसेच ऑफिसमध्ये विनाकारण मारलेल्या दांडीला French leave. गंमत म्हणजे फ्रेंच अशा दांडीला filer a la’ anglaise असं म्हणतात.
आपल्या शेजारी देशांची सरळ त्या देशाच्या नावानेच हेटाळणी करून कंटाळा आल्यावर इंग्रजांनी आपला तिरस्कार व्यक्त करण्याठी टोपणनावे शोधून काढली. उदाहरणार्थ ते डच लोकांचा उल्लेख Frog असा करतात. कारण हॉलंडची भूमी ही पाणथळ असल्याने तेथे बेडूक उदंड सापडतात. जर्मन लोकांना Kraut म्हणजे जर्मन भाषेत cabbage अशा अर्थी. इंग्लीश लोकांच्या मते जर्मन लोक रानटी असंस्कृत असतात. त्यांना हिणवण्यासाठी पहिल्या महायुद्धाच्या सुमारास त्यांचा उल्लेख Hun असा करू लागले. हे हूण म्हणजे आजच्या ऑस्ट्या-हंगेरीच्या प्रदेशातील ज्या रानटी टोळ्यांनी रोमन साम्राज्याचा आणि त्यांनी उभारलेल्या सुंदर शहरांचा विध्वंस व विनाश केला त्यांपैकी एक.
हे कितीही असलं तरी इतिहास आणि भाषा यांनी सर्वात जास्त क्रूर थट्टा कोणाची केली असेल तर ती पूर्व युरोपातील स्लाव्ह वंशीयांची. स्लाव्ह वंशीय बल्गेरीयन लोकांची शेकडो वर्ष त्यांच्या शेजाऱ्यांशी लढण्यात गेली. दक्षिणेला बायंझटाईन तर उत्तरेला रोमन साम्राज्य अशा कैचीत ते सापडले होते. बायझंटाईन सम्राट बॅसिल तर Bulgur slayer या नावाने ओळखला जायचा. त्याने एका युद्धात १५००० बल्गेरियन लोकांना कैद केले आणि त्यातील शेकडा नव्व्याण्णव जणांचे डोळे फोडून त्यांना आंधळे केलं आणि सोडून दिलं. घरी परत जाताना कोणीतरी रस्ता दाखवायला हवा म्हणून शंभराव्या कैद्याचे डोळे न फोडता त्याला तसंच सोडून दिलं होतं. बायझंटाईनांच्या तावडीतून वाचले तर त्यांना पकडून गुलाम करायला रोमन टपलेलेच होते. या स्लाव्ह लोकांचा दर वेळेला पराभव व्हायचा आणि जेते त्यांना जबरदस्तीने मजूर म्हणून पकडून घेऊन जायचे. त्यामुळे Slav ह्या शब्दाचा Forced labourer या अर्थाने वापर होऊ लागला. यावरूनच इंग्लीश मधील गुलाम या अर्थाचा Slave हा शब्द आला. हे गरीब बिचारे स्लाव्ह वंशीय युरोप मधील सर्वांचेच गुलाम होते. पश्चिम युरोपमधील सगळ्या भाषेतील गुलाम या अर्थाच्या शब्दांचे स्लाव्ह या शब्दाशी साधर्म्य आहे.

संदर्भ – ‘The Etymologicon – A Circular Stroll Through the Hidden Connections of the English Language, First published by - Icon Books Ltd, Distributed in India - Penguin’