Sunday, October 28, 2018

मुलँ रूज - ८३

डॉक्टर सेलामीनचे मेझाँ द साँते हे आरोग्यधाम श्रीमंतांची वस्ती असलेल्या एका शानदार उपनगरात होते. हे वेड्यांचे इस्पितळ आहे असा संशय बघणाऱ्याला चुकूनसुद्धा आला नसता. मेरी ॲन्तोनिएतच्या परिवारातील एकाच्या मालकीची, अठराव्या शतकातील ती एक प्रचंड वास्तू होती. सभोवताली उत्कृष्ट निगा राखलेली भली मोठी बाग होती. तेथे डॉक्टर सेलामीन त्यांच्या श्रीमंत रुग्णांवर उपचार करीत. असे असले तरी हेन्रीला ती जागा मुळीच आवडली नाही. त्याच्या तीन आठवड्यांच्या वास्तव्यात तो अगदी पार कातावून गेला होता. तेथील लांबलचक अंधारे कॉरिडॉर, दात विचकून कृत्रिम हसणारे डॉक्टर, पांढऱ्या पोशाखातील परिचारक, अंधाऱ्या रहस्यमय खोल्या. त्यांच्या बंद दरवाजांच्या आडून ऐकू येणारी कारस्थानी कुजबुज. रात्री मिणमिणत्या प्रकाशात तर ती वास्तू झपाटल्यासारखी दिसे. दिवसा नयनरम्य दिसणारी बाग रात्रीच्या फिकुटलेल्या चांदण्यात भयाण वाटे. झाडांच्या पानांची सळसळ, भरीला जवळच्या रानातील प्राण्यांचे काळीज गोठवणारे आवाज. रात्रीचे वातावरण एखाद्या कबरस्तानासारखे असे.
मार्च महिन्यातील ती एक टळटळीत दुपार होती. हेन्री जाडजूड गजांच्या खिडकीतून बाहेरच्या तळपत्या आकाशाकडे पाहत होता. त्याच्या मनाचा असह्य कोंडमारा होत होता. येथून काहीतरी करून पळून गेले पाहिजे असे त्याला वाटू लागले, पण ते जवळ जवळ अशक्य होते. खोलीला बाहेरून कडी लावलेली होती. बाहेर एक पहारेकरी खुर्चीवर शांतपणे पेपर वाचीत बसला होता. खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या कोणाशी बोलण्याचा प्रयत्न केला तर कोणीही त्याला प्रत्युत्तर करीत नसे. ओरडून लक्ष वेधण्याच्या प्रयत्नांनासुद्धा यश मिळाले नाही. कारण बाहेरच्या जगाच्या दृष्टीने तो एक मनोरुग्ण म्हणजे वेडा होता. तेथील डॉक्टरांनी एखाद्या डिटेक्टिव्ह किंवा वकिलापेक्षा जास्त सफाईने त्याच्याविषयी सगळी माहिती पद्धतशीरपणे गोळा केली होती. घरातील झुरळे मारण्यासाठी त्याने घरात केरोसीन ओतून ठेवले होते, समुद्रकिनाऱ्यासारखे वातावरण स्टुडिओत असावे म्हणून कित्येक पोती वाळू त्याने फरशीवर पसरून ठेवली होती. एकदा भिकाऱ्याचे सोंग घेऊन द्युरँद रूएलच्या दारात उडवलेली धमाल, कोणत्या पार्टीला कोणता चित्रविचित्र पोशाख करून गेला होता वगैरे सगळ्या गोष्टी त्यांनी खणून काढून त्यांची एक बारीकसारीक तपशीलवार जंत्री केली होती. नंतर या सगळ्याला एकदा लॅटिनमध्ये नावे दिली की मग त्याला वेडा ठरविणे सोपे होते.
सुरुवातीचे काही दिवस त्याला रात्री कॉटवर पट्ट्यांनी बांधून ठेवीत. दारूच्या थेंबासाठी शरीराचा कणन्‌कण आसुसलेला असे. रात्रभर तो किंचाळत असे. कोणीही एकजण ओरडू लागला की आजूबाजूच्या खोल्यांमधील रुग्णसुद्धा ओरडू लागत. किंचाळण्याच्या भेसूर आवाजाने ऐकणाऱ्याच्या जीवाचा थरकाप होई. पण तेथील पहारेकरी व परिचारक अगदी स्वस्थ असत. आपल्या किंचाळण्याचा काहीही परिणाम होत नाही हे कळल्यावर हेन्री शांत झाला. इतका शांत की काय हवे नको ते सांगायलासुद्धा तोंडातून शब्द फुटत नसे. परिणामी त्याच्या केसपेपरवरची घातकी वेडा अशी नोंद बदलून निरुपद्रवी वेडा अशी करण्यात आली. त्याची खोली बदलण्यात आली. कॉटला बांधून ठेवणे बंद झाले.
एके दिवशी मोठ्या मिनतवारीने त्याला बागेत फिरण्याची परवानगी मिळाली. बागेत काही चाळे करायचे नाही असे बजावून सांगण्यात आले. म्हणजे तो वेडा आहे आणि वेडा म्हटला की काहीतरी वेडे चाळे करणारच हे सर्वांनी एवढे गृहीत धरलेले पाहून त्याच्या अंगावर शहारे आले. तिथे त्याला पहिल्यांदाच बागेत पाय ठेवायला मिळाला होता. त्याने बागेत फिरणाऱ्या एकदोघांबरोबर बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या हरवलेल्या नजरा, विक्षिप्त हालचाली यावरून त्याच्या लक्षात आले की त्या बागेत फिरणारे बहुतेक रुग्ण अगदी ठार वेडे आहेत. वेड्यांची बाग. तो नखशिखांत हादरला. त्याला व्हिन्सेंटची आठवण झाली. अशा वेड्यांच्या सहवासात थोडे दिवस काढले तर शहाणासुरता माणूससुद्धा लवकरच ठार वेडा होईल.
बागेत फिरता फिरता त्याला एक पीस मिळाले. त्याने पहारेकऱ्याला मस्का मारून एक शाईची दौत व कागद मिळवले. दौत व कागद हातात मिळताच त्याने चित्रे काढायला सुरुवात केली. सर्कसची चित्रे. तास-दोन तास कसे गेले ते कळलेच नाही. त्याने काढलेली चित्रे पहारेकऱ्याला आवडली. त्यामुळे त्याने ती त्याला देऊन टाकली.
दोन दिवसांनी त्याला ऑफिसमध्ये बोलावण्यात आले. थोडेसे तपासल्यावर डॉक्टर म्हणाले, ‘‘फारच छान. तुमच्यात खूपच सुधारणा झालेली दिसतेय. भूक वगैरे चांगली लागते ना? आणखी थोडी विश्रांती मिळाली की तब्येत लवकरच टुणटुणीत होईल. तुम्ही सर्कसची जी स्केच केलीत ती आम्ही पाहिली बरं का.’’
‘‘सर्कस माझा आवडीचा विषय आहे. मी खूप सर्कशी पाहिल्या आहेत.’’
‘‘फारच सुंदर चित्र काढलीयत तुम्ही. कशावरून कॉपी केलीत.’’
‘‘कॉपी करायला इथे माझ्याकडे आहे काय? मोठ्या मिनतवारीने मला कागद मिळाले.’’
‘‘काय सांगता काय? नुसत्या स्मरणशक्तीवर विसंबून तुम्ही ही चित्रे काढलीत? तुमच्या मनाच्या या अवस्थेत?’’
‘‘मनाची अवस्था. मी मद्यपी आहे, पण माझे डोके शाबूत आहे. स्मरणशक्तीला काहीही धाड भरली नाहीय. तुम्ही काहीही विचारा. सगळ्या घटना अगदी तारीखवार मला आठवतायत. पाहिजे तर परीक्षा घेऊन बघा.’’
‘‘आमच्या फाईलवरच्या नोंदीप्रमाणे...’’
‘‘आग लागो तुमच्या फाईलींना. तुमच्यासमोर मी उभा आहे ते तुम्हाला दिसतेय ना? मी काय बोलतोय ते ऐकू येतंय ना? का तुमचे डोळे, कान फुटलेयत?’’
त्याचा आवाज चढल्यावर तो डॉक्टर गप्प झाला. आपल्या सहायकाकडे बघून गालातल्या गालात हसला.
‘‘मला वेडा समजता की काय तुम्ही? माझी परीक्षा का घेत नाही? मी वेडा नाहीय. काय समजलात?’’
तो जेवढा आरडाओरडा करीत होता तेवढेच ते सगळे डॉक्टर शांत होते.
‘‘तुम्ही खरंच शहाणे आहात.’’डॉक्टर गुळचट हसत म्हणाला, ‘‘फक्त तुम्हाला थोडी विश्रांतीची गरज आहे. दोनतीन महिन्यांत...’’
‘‘काय म्हणता तीन महिने!’’ हेन्री बेंबीच्या देठापासून ओरडून म्हणाला, ‘‘या वेड्यांच्या इस्पितळात डांबून मला अगदी पार वेडा करून टाकाल तुम्ही. तुमचा विचार काय आहे? मला बरं करायचा की पुरता वेडा करायचा? माझी कोणतीही परीक्षा घ्या. मी तुम्हाला सिद्ध करून दाखवीन की माझं डोकं ठिकाणावर आहे.’’
तो मोठ्याने ओरडत होता. एक दांडगट परिचारक आला व त्याला बखोटीला धरून कुत्र्याच्या पिल्लासारखा उचलून घेऊन गेला. त्याची अवस्था अगदी केविलवाणी झाली. कितीही सांगितले, विनवण्या केल्या तरी त्या आरोग्यधामात ते अरण्यरुदनच ठरत होते. बाहेरच्या कोणत्याही माणसाला भेटण्याची त्याला परवानगी नव्हती त्यामुळे त्याला बाह्य जगाशी संपर्क साधणे अशक्य होते. हे सगळे त्यांच्या उपचारपद्धतीचा भाग आहे हे एकदा लक्षात आल्यावर त्याने आरडाओरडा करणे बंद केले. अगदी मोजके बोलण्याचा त्याने प्रघात ठेवला. थोड्याच दिवसात डॉक्टरांनी त्याच्या फाईलमध्ये तो सुधारत असल्याची नोंद केली आणि त्याला आईला भेटण्याची परवानगी मिळाली. आईला बघताक्षणी हेन्रीला रडू कोसळले.
‘‘ममा! प्लीज मला येथून सोडवा. इथे हे लोक मला ठार वेडा करतील.’’
‘‘हे बघा. माझा अगदी नाइलाज होता. मी तुम्हाला येथे आणून ठेवलं नसतं तर डॉक्टरांना कायद्याप्रमाणे तुमची रवानगी एखाद्या सरकारी इस्पितळात करावी लागली असती.’’
‘‘होय ममा, तुमचं खरंय.’’ हेन्री खाली मान घालून शांतपणे म्हणाला. त्याने आईला कसेही करून आपल्याला येथून बाहेर काढायला सांगायचे ठरविले होते. पण त्याच्या लक्षात आले की डॉक्टरांनी तिला त्याची फाईल दाखवली असावी. त्यांच्या उपचार पद्धतीनेच तो बरा होईल हे त्यांनी तिला पटवून दिले असणार. आधीच त्याने तिला भरपूर मनस्ताप दिला होता. त्यात आणखी भर टाकण्याची त्याची इच्छा नव्हती.
‘‘ठीक आहे. तुम्ही भेटलात यातच मला खूप आनंद झालाय. तुम्ही जे काही माझ्यासाठी करतायत ते माझ्या भल्यासाठीच आहे याची मला खात्री आहे.’’
‘‘रिरी, माँ पेतीत, थोडा धीर धरा. यातून तुम्ही लवकरच बरे व्हाल. देवाची करुणा भाकत जा. त्याला सगळं दिसतं.’’

No comments:

Post a Comment