Friday, October 5, 2018

मुलँ रूज - २६

वरवर पाहता हेन्रीचे दिवस असे मजेत जात होते. पण आतल्या आत तो स्त्रीसुखासाठी आसुसला होता. पण ते कसे मिळणार हा मोठाच प्रश्न होता. त्याच्या बहुतेक मित्रांना मैत्रिणी होत्या. कायमची मैत्रीण नसली तरी तात्पुरती मिळवणे काही फारसे कठीण नसे. ल एलीसमध्ये जायचे, कोणाला तरी डोळा मारून नृत्यासाठी बोलवायचे, नाचता नाचता तिच्या नकळत कोपरा गाठायचा आणि हळूच चुंबन घ्यायचे. मग एक-दोन दिवसात खोलीवर घेऊन जाण्यापर्यंत प्रगती होत असे. पण यासाठी नाचता येणे आवश्यक होते. त्यामुळे हा सर्वमान्य मार्ग बाद झाला.
दुसरा मार्ग म्हणजे रस्त्यावरचा. रस्त्यावर भरपूर संधी उपलब्ध असत. बऱ्याच स्त्रियांना ते सुख हवे असते. जर तुम्ही सतत प्रयत्न करीत राहिलात तर कधी ना कधी कोणीतरी भेटतेच. साधा सरळ हिशेब. रॅचो या बाबतीत तरबेज होता. प्लास पिगाल ते प्लास क्लिशी या रस्त्यावर बरेच मासे त्याच्या गळाला लागले होते. पण हेन्रीला कसे जमणार? त्याने धीर करून कोणाला गाठलेच तर त्याच्या विचित्र देहयष्टीकडे पाहून ती स्त्री काय प्रतिसाद देईल याची शंकाच. एकूण हा मार्गसुद्धा जमण्यासारखा नव्हता.
शेवटचा मार्ग म्हणजे वेश्यागृह. ल पेरोक्वेत ग्रि. एकदा मित्रांबरोबर माडी चढून झाली होती. वर जाण्यासाठी एक अरुंद मोडकळीला आलेला जिना होता. वर दिवाणखान्यात फाटका गालिचा अंथरलेला होता. भिंतीवर क्लिओपात्राचे तैलरंगातील भडक बटबटीत पेंटिंग टांगलेले होते. बसायला लालभडक रंगाचा ठिकठिकाणी उसवलेला कोच. वातावरणात स्वस्त पर्फ्युमचा उग्र दर्प दरवळत होता. भडक रंगरंगोटी केलेल्या मुली. झिरझिरीत वस्त्रांखालचे त्यांचे नग्न देह. त्यांच्या हाताचा थंडगार विळविळीत स्पर्श. चुंबन घेण्याच्या नुसत्या कल्पनेनेच एखाद्याला वांती व्हायची. पुढचा शृंगार दूरच राहिला. तेथल्या वातावरणात एक प्रकारचा उग्र दर्प भरलेला असायचा. सार्वजनिक मुतारीसारखा.
एकच मार्ग होता. स्वप्ने बघण्याचा. रात्रभर तो या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत असे. नजरेसमोर एखाद्या तरुणीचं विवस्त्र शरीर तरळत असे. सर्वांगाची आग आग व्हायची. ही एक नवीनच वेदना सुरू झाली होती. पण सांगणार कोणाला? ही आग आपली आपणच सहन करत आला दिवस ढकलायचा. हळूहळू सवय होऊन जाईल.
रॅचोची ज्युली नावाची एक मैत्रीण होती. रॅचोचा मित्र म्हणून हेन्रीलासुद्धा ती ओळखायची. मार्च महिना उजाडेपर्यंत रॅचोचा ज्युलीमधला रस संपला. रॅचो सांगत होता,
‘‘सुरुवातीला नुसता स्पर्श जरी झाला तरी ताबडतोब अंग चोरून घ्यायची. हातात हात घेतला तर हात झटकून टाकायची. ओठावर नुसते ओठ टेकायला गेलं तर तोंड फिरवून घ्यायची. पहिल्यांदा तिचे स्तन दाबायला गेलो तर तिने थोबाडीतच मारली. बिछान्यावर घेतली तर मांड्या अशा काही आवळून धरल्या की काय बिशाद आहे पुढे घुसशील. शेवटी चक्क मारामारीच व्हायची. बोचकारायची काय, गुद्दे काय मारायची. काय सांगू तुला. त्यातच खरी मजा यायची. आता ती मारामारी संपली आणि ती मजाच गेली. विश्वास बसणार नाही एवढी ती आता बदलली आहे. खोलीवर येईपर्यंत आता तिलाच धीर निघत नाही. खरंही वाटत नाही की महिन्या दोन महिन्यांपूर्वी ही एक अनाघ्रत कुमारिका होती म्हणून.’’
रॅचोचे बिछान्यातले पराक्रम हेन्री लक्षपूर्वक ऐकत होता. आपल्याला अशी मजा कधीच उपभोगता येणार नाही या कुशंकेने तो हादरून गेला.
‘‘एरवी कशी आहे ज्युली?’’
‘‘तशी मुलगी चांगली आहे रे. पण म्हणून काय जन्मभर झेंगट मागे लावून घ्यायचं? उत्तर ध्रुव गाठण्यासाठी माणसाने कितीही आटापाटा केला तरी एकदा ध्रुवावर पाऊल ठेवल्यावर तिथेच बैठक मारून बसत नाही कोणी.’’
रॅचोबरोबर ज्युलीला लगट करताना हेन्रीने बऱ्याच वेळा पाहिले होते. त्यांचे चाळे बघून हेन्रीचे मन थोडेसे चाळवले जायचे. ज्युली रात्री स्वप्नात यायची आणि त्याला अपराध्यासारखे वाटायचे. पण आता तिला रॅचोने कटवल्यावर त्याला रोज तिची स्वप्ने पडायला लागली. स्वप्नामध्ये रॅचोच्या जागी तो स्वतः असायचा. या स्वप्नातल्या कामक्रीडेने त्याचा कामज्वर अधिकच चाळवला गेला.
एकदा मनाचा मोठा धीर करून हेन्री प्लास पिगालवरील ब्रासेरी मोन्से या कॅफेत गेला. तो भाग मोंमार्त्रमध्ये मोडत असला तरी चित्रकार मंडळी तिकडे फारशी फिरकत नसत. व्यापारी, दुकानदार, विक्रेते वगैरे मंडळींचे ते एक आवडते ठिकाण होते. त्याने तिथे पाऊल टाकल्याबरोबर भीत भीत इकडे तिकडे पाहिले. एकही ओळखीचा चेहेरा नव्हता. चटकन एक कोपऱ्यातले टेबल निवडून त्याने बेनेडिक्टाइन मागवली. ग्लासच्या दांड्याशी चाळा करीत हळूच चोरट्या नजरेने त्याने एक चौफेर दृष्टिक्षेप टाकला. आजूबाजूला काही मुली घोटाळताना दिसल्या. म्हणजे त्याने निवडलेले ठिकाण योग्य होते. पण यातली कोणती मुलगी तशी असेल. ती सुवर्णकेशी की ती कृष्णकेशी. ती शेलाटी की ही जाडी ढोल. ती कोवळी करकरीत की ही निबर काकूबाई. इशारा करण्याचा धीर होत नव्हता. जी पहिल्यांदा येईल तिला घेऊ.
थोड्या वेळात तिथली पद्धत त्याच्या लक्षात आली. गिऱ्हाईकाने ड्रिंक मागविले की तेथे बसलेल्यांपैकी एखादी मुलगी हळूच उठून त्याच्या जवळ जाऊन लाडीक हसून त्याला वाजले किती ते विचारायची. त्याने जर भिंतीवरच्या घड्याळाकडे बोट दाखवले तर प्रकरण तेथेच संपायचे. पण जर त्याने खिशातून घड्याळ काढून वाजले किती ते सांगितले तर ती हळूच त्याच्या शेजारच्या खुर्चीवर बसे. मग खुर्ची थोडी जवळ घेत घड्याळे कशी बेभरवशाची असतात, एकदा मी दिलेली वेळ कशी चुकली वगैरे काहीतरी बोलून संभाषण चालू करायची. असे संभाषण करताना मधूनच ती अस्पष्ट स्पर्श करे. बोलता बोलता तिचा हात चुकून मांडीवर पडायचा आणि सरकत सरकत वर जाऊ लागायचा. या वेळी दोन गोष्टी होण्याची शक्यता असायची. एक म्हणजे तो पुरुष मी बायकोची नाही तर दुसऱ्या कोणाची वाट पाहत आहे असे अचानक जाहीर करायचा. ताबडतोब पँटीच्या बटनांकडे गेलेला तिचा हात झरकन खाली येई. दुसरी शक्यता म्हणजे तो पुरुष एखादे ड्रिंक तिच्यासाठी मागवे. मग तिचा हात तिथेच रेंगाळे आणि पुढच्या वाटाघाटींना सुरुवात होई. त्याच्यासारख्या मर्द पुरुषाला बघून तिला राहावले नाही. जवळच एक वाजवी दराचे हॉटेल आहे. अगदी स्वच्छ आणि मऊमऊ गाद्या. संपूर्ण समाधानाची हमी दिली जाई. मग पुढे सौद्याला सुरुवात होई. सर्वांना माहितीय वीस फ्रँक. तू मला कोण समजलीस? टुरिस्ट की एखादा अमेरिकन. चला तुम्हाला म्हणून पंधरा. पंधरा खूप जास्त होतात. सगळ्या जणी पाच घेतात. मी पाचवाल्यांतली वाटते का? मी किती तरुण आहे. माझ अंग काही त्यांच्यासारखे ढिले पडलेले नाहीय. शेवटी हो-ना करता करता दहा फ्रँकवर सौदा पटे. कोणाला सांगू नका मी दहा फ्रँकमध्ये तुमच्याबरोबर आले म्हणून. तुमच्यासारख्या मर्द माणसाला सुख देताना मलासुद्धा मजा येईल म्हणून दहा फ्रँकला मी तयार झालेय.
सौद्याची बोलणी चालू असताना तिचा हातही वाटाघाटीचे काम चालू ठेवी. त्यामुळे कधी कधी सौदा तिला फायद्याचा पडे. मग दोघे जण आपापला ग्लास एका घोटात संपवून उठत. नंतर अर्ध्या-पाऊण तासात ती एकटीच रेस्तराँमध्ये परत येई. तोंडाला पावडर, ओठांना रंग वगैरे लावून नव्या गिऱ्हाइकाची वाट बघणे पुन्हा चालू होई.
हा प्रकार इतक्या झटपट होत होता की हेन्रीच्या लक्षात येईपर्यंत एक तास सहज निघून गेला. पण तेवढ्या वेळात हेन्रीकडे आपण होऊन कोणीही आले नाही. त्याला वाटले की त्या मुलींना वाटत असेल की आपण बच्चा आहोत. त्याच्यासमोर एक मुलगी सिगारेट फुंकत बसली होती. त्याने ग्लासाने टेबलावर हळूच आवाज करून तिचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. तिच्याशी नजरानजर होताच आपल्या ओठांची सूचक हालचाल केली. तिने त्याच्याकडे आपादमस्तक पाहत सिगारेटचा एक मोठा झुरका घेतला. एक क्षणभर थांबून त्याच्या दिशेने धुराचा लोट सोडत तिने हळूच आपली मान दुसरीकडे वळवली.
ते पाहून त्याच्या संतापाचा पारा वर चढला. कानशिले गरम झाली. हातातला ग्लास थरथरू लागला. छातीत धडधडू लागले. साल्या या दीडदमडीच्या रांडा. पाच-दहा फ्रँकसाठी कोणाच्याही खाली पडणाऱ्या. पण आपल्याकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही. त्याला आपली कुरूपता विदारकपणे भेडसावू लागली. पैसे घेऊनही आपल्याबरोबर झोपायला कोणी तयार होत नाही याची जाणीव होताच दुःखाच्या आवेगाने त्याला भरून आले. आवंढा घशात अडकला. श्वास क्षणभर थांबला. मोठ्या प्रयासाने त्याने स्वतःला सावरले. त्याने झटकन हातात काठी घेतली. कोचावरून थरथरत उठला व तात्काळ बाहेर पडला.

No comments:

Post a Comment