Monday, October 22, 2018

मुलँ रूज - ७०

घोडागाडी एका बाजूच्या गल्लीत वळली आणि एका साध्यासुध्या दिसणाऱ्या दुकानासमोर थांबली. त्या दुकानावर सोनेरी अक्षरात रंगवलेली पाटी होती. गॅलेरी ज्वाय्याँ’. हेन्री काचेचा दरवाजा ढकलून आत शिरला. पुढची दोन दालने ओलांडून हेन्री मागच्या ऑफिसमध्ये गेला. मॉरीस टेबलावर काहीतरी लिहिण्यात दंग होता. त्याने डोके वर करून पाहिले.
‘‘बाँज्यूर हेन्री. ओह, नॉम दे दियू! परत दारू प्यायला सुरुवात केलीस?’’
‘‘दारू कुठे प्यायलोय मी. फक्त दोन ॲपरटीफस्‌ घेतलीयत सकाळपासून. फार तर तीन झाली असतील.’’
‘‘कोणाला थापा मारतोयस. तुझे डोळे आणि चेहेरा सांगतोय तू किती प्यायलायस ते.’’
‘‘मी बसलो तर तुझी काही हरकत नाही ना? मी बसल्यावर तुला काय प्रवचन द्यायचे ते दे.’’
हेन्री एका खुर्चीवर बसला आणि म्हणाला, ‘‘मी इकडे येता येता विचार करीत होतो. माझी गेली पाच वर्षं नुसती फुकट गेलीयत. आणि याला एका परीने तूच कारणीभूत आहेस. तूच माझी मिसीयाशी ओळख करून दिली होतीस आठवतंय? तेव्हापासून मी फारसं काही करू शकलो नाही.’’
‘‘सभ्य लोकांच्या जगात तुझी ऊठबस व्हावी म्हणून मी तुझी तिच्याशी ओळख करून दिली. वाटलं होतं तुझ्या चार ओळखी झाल्या, मोठ्या लोकांत ऊठबस वाढली, थोडी प्रसिद्धी मिळावी की तुझं पिणं कमी होईल. पण झालं उलटंच. तुझं पिणं वाढलं आणि पेंटिंग कमी झालं.’’
बाजूला पडलेल्या वर्तमानपत्रातील एका बातमीकडे लक्ष वेधत हेन्री म्हणाला, ‘‘हे वाचलंस ना. आपल्या उद्याच्या प्रदर्शनाविषयी काय छापून आलंय ते. तरुण आणि धाडसी चित्रकाराचा पहिलाच वन मॅन शो. तरुण व धाडसी चित्रकार अशी बॅलड रिॲलिस्तपासून तयार केलेली बिरुदावली हे पत्रकार माझ्या नावामागे किती दिवस लावणार आहेत कोण जाणे. मी पाऊणशे वर्षांचा म्हातारा झालो तरी हे मला तरुण आणि धाडसी चित्रकार म्हणत राहाणार आहेत की काय.’’
‘‘पाऊणशे? या गतीने दारू ढोसत राहिलास तर वयाची चाळिशी गाठलीस तरी नशीब समज.’’
‘‘कोनॅकने काही होत नाही. रफाएल, कॉरेज्जो, वॉत्तो दारू पीत होते तरी ते भरपूर जगले. ते जाऊ दे. तुला जे काही प्रवचन झोडायचं असेल ते झोडून एकदा मोकळा हो बरं. म्हणजे तूही सुटलास आणि मीही सुटलो.’’
आपल्या या मित्राला कसे समजवावे या विचारात मोरीस थोडा वेळ गप्प राहिला. ‘‘कित्येक वेळा मला वाटतं की जाणूनबुजून आपल्या करीयरची वाट लावायची असं तू ठरवलेलं दिसतंय. परवा त्या ऑपेरा बॉलला कोणत्या फालतू बाईला बरोबर घेऊन आलास. नुसता बरोबर घेऊन आलास असं नाही. वर सर्वांशी माझी आल्बीतील मावशी म्हणून आवर्जून ओळख करून द्यायची काय गरज होती? अशाने तुझी काय इज्जत राहिली?’’
‘‘ओह. तू त्या मादाम पोतीएरोंबद्दल बोलतोयस. एक तर ती फालतू बाई नाहीय. तिचा स्वतंत्र व्यवसाय आहे आणि त्यात ती बऱ्यापैकी पैसा कमावते. दुसरं म्हणजे तिला ऑपेरा बॉलला यायची खूप इच्छा होती. त्या दिवशी तिने कपडेसुद्धा अगदी टिपटॉप केले होते. शिवाय ती माझी मावशी म्हणून खपून जाण्यासारखी होती.’’
‘‘पण बॉलला आलेली बरीच मंडळी तुझ्या सगळ्या मावशांना चांगले ओळखत होती. ही नवी मावशी कोण आहे, तिचा काय व्यवसाय आहे हे तिने कितीही चांगले कपडे केले असले, खानदानीपणाचा आव आणला असला तरी त्यांनी अंदाजाने बरोबर ओळखलं होतं. तिला बॉलला आणून तू एका अलिखित संकेताचा भंग केलास. तुझ्या ओळख करून देण्याने त्यांचा अवमान झाला. तुझ्यापाठी ते काय बोलत होते याची तुला कल्पना आहे काय?’’
‘‘लोक पाठीमागे बोलतात. मी कोणाकोणाला अडवू? दुसऱ्यांची हेटाळणी केल्याने जर त्यांच्या संभाषणात रंग भरणार असेल तर करू दे त्यांना तसं. मॉरीस, मी तुला मागेच सांगितलंय. ल फ्लुर ब्लां या एकाच जागी मला खरी विश्रांती मिळते आणि शांतपणे पेंटिंग करता येतं. अधूनमधून तिथल्या मुली येतात गप्पा मारायला. तुला खरं वाटणार नाही त्यांच्या गप्पा किती निर्मळ असतात ते. शिवाय तिथे मिळणारे जेवणही खूप चांगलं असतं ते वेगळंच. वेश्यागृहात राहण्यात केवढी गंमत असते ते प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय तुला कधीच कळणार नाही.’’
‘‘न अनुभवताच मला कळतंय काय गंमत येते ती.’’मॉरीस उपहासाने हसून म्हणाला.
‘‘डोंबल. तुला काय कळणार? हे बघ त्या सगळ्या तथाकथित चारित्र्यवान लोकांसारखा हलकटपणा करू नकोस. मला म्हणायचंय की वेश्यांच्या जीवनाचे खरेखुरे चित्रण त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावरच करता येतं. त्यांचे चेहेरे, गप्पा मारताना त्यांच्या चेहऱ्यावरचे विविध भाव, त्यांच्या शारीरिक हालचाली ह्यांचे निरीक्षण त्यांच्या भावजीवनाचा एक भाग झाल्याशिवाय नुसतं स्टुडिओत बसून मॉडेलला पोज देऊन करता येणार नाही. आपल्या समाजजीवनाचा हा भाग अविभाज्य असला तरी आजवर तो बहिष्कृत असल्यासारखा आहे. अगदी पेंटिंगचा विषय म्हणूनही.’’
‘‘उगाच नाही समीक्षक तुला व्हेलाक्वेझ ऑफ व्होर्स म्हणतात.’’
‘‘मला हे माहीत नव्हतं. पण तसं असेल तर मी हा माझा बहुमानच समजेन. हे बघ मॉरीस, थोडा वेळ तुझ्या त्या ख्रिश्चन सोवळेपणाच्या कल्पना बाजूला ठेव. स्टुडिओत बसून नग्न मॉडेलचे चित्र काढणे आणि वेश्यागृहात बसून नग्न वेश्येचे चित्र काढणे ह्यात नैतिकदृष्ट्या काय फरक आहे तो मला कधी कळला नाही. पण कलात्मकदृष्ट्या खूप फरक आहे. म्युझियममधला पेंढा भरलेला वाघ, प्राणीसंग्रहालयातल्या पिंजऱ्यातील वाघ आणि जंगलातील वाघ यात जो फरक आहे तोच फरक यात आहे. तुला एक गंमत सांगतो. स्टुडिओत चित्रकारासमोर जी मॉडेल कपडे काढायला आढेवेढे घेत नाही ती बिछान्यात त्याच्याबरोबर झोपण्यासाठी कपडे काढताना लाजते. जी वेश्या तिच्या गिऱ्हाईकांसमोर बिनदिक्कत नग्न होईल ती चित्रकाराला पोज देण्यासाठी कपडे काढताना लाजून चूर होते.’’
‘‘मॉडेलच्या स्टँडवर बसलेली न्यूड ही एक विवस्त्र स्त्री असते. तुम्ही तिचं पेंटिंग करता तेव्हा ते एक लैंगिक भावना चाळवणारं पेंटिंग होतं. त्याची लायकी एखाद्या घाणेरड्या अश्लील पिक्चर-पोस्टकार्डापेक्षा जास्त नसते. पण अशा पेंटिंगला तुम्ही एक कलाकृती म्हणून डोक्यावर घेऊन नाचता. वेश्यागृहातील न्यूड ही एक वेगळीच चीज असते. तिच्यावर कसलाही दबाव नसतो. अगदी निःसंकोचपणे तिचा वावर चालू असतो. ती उठते, बसते, चालते. मधेच मांजरीसारखी झक्कपैकी अंग ताणून आळस देते. एडनच्या बागेतील ईव्ह अशाच सहजतेने वावरली असेल. तेथे तुम्हाला स्त्रीच्या नग्न देहाची विविध रूपे दिसतात आणि लक्षात येतं की स्त्री देह म्हणजे कपडे लटकविण्याचा नुसता हँगर नाहीय. तिच्या देहावर नितळ कांती आहे, दोन हात आहेत, दोन पायांवर तो उभा आहे. चित्रकाराला हवी असलेली कोणतीही पोज देण्याची क्षमता असलेला देह. नग्न स्त्री हसताना तिचं पोट कसं दिसतं हे तू पाहिलंयस? हास्याला सुरुवात बेंबीपासून होते आणि मग ते शरीरभर पसरत जातं. हसताना कुल्ले कसे थरथरतात, पायाचे चवडे कसे धनुष्यासारखे ताणले जातात. एकदा एका मुलीला डॉक्टरने तपासताना सांगितलं की तुला उपदंश झालाय. ते ऐकताच तिच्या चेहेऱ्यावर प्रेतकळा आली. पण त्यापेक्षा तिच्या मांडीचा स्नायू कसा आखडला गेला त्यावरून तिची प्रतिक्रिया जास्त चांगली उमगत होती. कलेचा आविष्कार, निर्मिती ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. कलाकृती निर्माण झाल्यानंतर तू ती बघत असतोस. कलाकृती विकणे हा तुझा व्यवसाय आहे. तू एक जाणकार रसिक आहेस हे मान्य. तरीही तुझी भूमिका वेगळी. तुला नाही कळणार हे सगळं.’’
‘‘ठीक आहे. नाही कळणार. पण तुझी भूमिका एवढी स्पष्ट आहे तर तुझी ही वेश्यांची पेंटिंग तू वरच्या मोठ्या हॉलमध्ये लावण्याऐवजी लपूनछपून तळघरात का लावतोयस? लोकांच्या टीकेची तू कधीपासून पर्वा करायला लागलास?’’
‘‘कोणाच्या टीकेला मी भीक घालत नाही. पण उगाचच कोणाचे कुतूहल मला चाळवायचं नाही. ज्यांना माझी भूमिका समजू शकेल अशा मोजक्या लोकांनाच मी खाली तळघरात बोलावलंय. मुलँ रूजच्या पोस्टरच्या वेळी केलेली चूक मला यावेळी परत करायची नाहीय. त्या पोस्टरमुळे केवढा गहजब उडाला आणि मुलँ रूजमधील माझी निवांतपणे बसायची जागा गेली. आता माझ्या पेंटिंगमुळे उगाच मादाम पोतिएराँची बदनामी व्हायची. ती काही चित्रकारांसाठी लॉजिंग बोर्डिंग उघडून बसली नाहीय. आता चर्चा पुरे. सगळी तयारी झालीय ना? खायची-प्यायची काय व्यवस्था आहे? कोनॅक किती आणलीय?’’
‘‘पोहता येईल एवढी भरपूर आहे, पण जास्त पिऊन गोंधळ घालू नकोस म्हणजे झालं.’’
‘‘काही घाबरू नकोस. माझ्या पाहुण्यांची येण्याजाण्याची व्यवस्था मागच्या दरवाजाने केलीय. तुला वर कळणारसुद्धा नाही खाली काय चाललंय ते. मग तर झालं. तशी अगदी मोजकीच मंडळी येणारायत. मिसीया. जेन ॲव्हरील, पण या नट्यांचा काही भरवसा नाही. देगाला बोलावलंय. पण प्रदर्शनाला म्हणून तो येणं कठीण आहे. तो गर्दी टाळत असतो. तो आलाच तर व्हिसलरला घेऊन येईल.’’
‘‘ठीक आहे. जर इथे वर दुकानात कोणी तुझी चौकशी करायला लागला तर मी काय सांगायचं? उदाहरणार्थ, कामोंदो. तुला माहीत आहे का? ते एक मोठे संग्राहक म्हणून ओळखले जातात. ते म्हणाले होते, सध्या सर्बियाचे राजेसाहेब पॅरीसमध्ये आहेत. त्यांना काही पेंटिंग घ्यायची आहेत आणि ते त्यांना त्यात मदत करतायत.’’
‘‘फुटव त्यांना काहीतरी सांगून. सांग मी आजारी आहे. त्यापेक्षा सांग लोत्रेक मेला म्हणून. मग नक्कीच माझं एखाददुसरं पेंटिंग विकत घेतील. जिवंत चित्रकारापेक्षा दिवंगत चित्रकाराच्या पेंटिंगला दसपट अधिक मोल येतं.’’
‘‘आणि जर समज त्याच्याबरोबर दस्तुरखुद्द राजेसाहेब जातीने आले तर.’’
‘‘त्यांना सांग मी खाली तळघरात आहे म्हणून. गरज असेल तर येतील खाली पायऱ्या उतरून.’’
‘‘हेन्री, तू अगदी पक्का अहंमन्य आहेस.’’
‘‘नक्की काय ते ठरव. थोड्या वेळापूर्वी मी वेश्यांशी जवळीक करतो, मादाम पोतीएरोंला घेऊन मी ऑपेराला आलो म्हणून मी पायरी सोडून वागतो असं तुला वाटत होतं आणि आता तुझ्या या बाल्कनच्या राजेसाहेबांना भेटायला मी वर येत नाही म्हणून मी अहंमन्य झालो. बरा न्याय आहे.’’
‘‘अहंमन्य नाही तर दुसरं काय म्हणायचं. मला एक सांग, त्या दिवशी मस्य द्युरँद रूएलसाहेबांची एवढी मस्करी तू का केलीस?’’
हेन्रीला जोरात हसू आले.‘‘ओह. म्हणजे त्यांनी तुला सगळी हकिगत सांगितली वाटतं?’’
‘‘होय, पण त्या वेळी ते हसत नव्हते. अगदी गंभीरपणे ते सांगत होते.’’
‘‘अरे, ती एक गंमतच झाली. पण ती त्यांनी आपण होऊन ओढवून घेतली. त्यांना माझ्या स्टुडिओमध्ये यायचं होतं पेंटिंग बघायला. सध्या माझा मुक्काम मादाम पोतीएरांकडे असतो आणि तसं बघायला गेलं तर तोच माझा स्टुडिओ म्हटला पाहिजे. मी त्यांना तिचा पत्ता दिला. पण तिथल्या मुलींना द्युरँदसाहेब माझे पाहुणे आहेत हे सांगायचं राहून गेलं. ते आत शिरले तेव्हा त्यांचा चेहेरा तू पाहिला हवा होतास. सगळ्या पोरी त्यांच्याभोवती गोळा झाल्या व त्यांना आपल्याकडे ओढू लागल्या. ते आपले परोपरीने सांगतायत की ते दुसऱ्या कामासाठी आले आहेत. पत्ता बरोबर आहे ना? माझं लग्न झालंय. मला तसलं काही करायचं नाही. त्यांची ती त्रेधातिरपीट पाहून माझी हसून हसून मुरकुंडी वळली.’’
‘‘तुला कल्पना असेलच की मस्य द्युरँद रूएल हे पॅरीसमधील एक मोठे आर्ट डीलर आहेत आणि ते काय करू शकतात याचीही तुला कल्पना असेलच. त्यांनी आपल्या स्टुडिओला भेट द्यावी म्हणून सगळे चित्रकार पायघड्या पसरून त्यांची आर्जवे करीत असतात आणि तुझ्याकडे ते आपण होऊन येत होते तर तू त्यांना मादाम पोतीएरांच्या कोठीवर बोलावलंस.’’
‘‘त्यांची मस्करी करण्याचा माझा उद्देश नव्हता. जे घडलं ते नकळत झालं. ते दुखावले असेल तर मला माफ कर. आता मी तुझा मित्र असल्यामुळे तुझ्या धंद्यावर याचा काही परिणाम होणार नाही ना? तसं असेल तर मी आपला चंबूगबाळं आवरून निघून जातो कसा.’’

No comments:

Post a Comment