Thursday, October 18, 2018

मुलँ रूज - ५७

मार्च महिना हा हेन्री व मारी यांच्या संबंधातील त्यातल्या त्यात सुखाचा काळ ठरला. वसंत ऋतूच्या चाहुलीबरोबर तिचा मूळ स्वभाव उसळी मारून वर आला. ती स्वतःच्या भूतकाळाविषयी बोलायची बंद झाली. तिची नजर पुन्हा भावशून्य दिसू लागली. एखादे जनावर हिवाळ्याच्या दीर्घ निद्रेतून हळूहळू जागे व्हावे तसा तिच्या वर्तनात फरक दिसू लागला. तिचा स्वभाव लहरी झाला. अस्वस्थता वाढली. तासन्‌तास ती खिडकीतून बाहेर बघत बसे, नाही तर कोचावर पडून राही.
ती कंटाळली असेल. त्याने आपल्या मनाची समजूत घातली.
एके दिवशी त्याने तिच्यासाठी एक महागडा ड्रेस घेतला. तिने तो पाहिल्यासारखा करून दूर भिरकावून दिला. प्रत्येक गोष्टीत ती त्याचा हिरमोड करू लागली. कुठे जायचे असेल तर आयत्या वेळी काहीतरी खुसपट काढून हट्टाने घरी बसायची, फिरायला बाहेर पडले तर त्याला दम लागलाय हे दिसत असूनसुद्धा मुद्दाम होऊन लांबच्या ठिकाणी जायची व त्याला पायपीट करायला भाग पाडायची व त्याच्या हळू चालण्याला हिणवायची.
ती कितीही वाकड्यात शिरली तरी तो संयमपूर्वक सरळ वागत होता.
‘‘चल. आज व्हेर्सायला जाऊन येऊ.’’
‘‘काय वाढून ठेवलंय तिथं?’’
‘‘आज हवा चांगली पडलीय. एखादे नाटक पाहू. नाही तर ऑपेरा किंवा कन्सर्ट.’’
‘‘नको. एका बुटक्याबरोबर लंबूटांग बाईला हातात हात घालून चालताना लोकं टकामका बघतात ते मला बिल्कूल आवडत नाही. काय करायचं ते इथे घरी करा.’’
तिचे हे वाव्‌ताडन ऐकून त्याला अधिकच खुज्यासारखे वाटू लागले. कंटाळ्याने कोंडल्यामुळे तिच्या स्वभावातील क्रौर्य उफाळून वर आले होते. जोडीला गरिबांना श्रीमंतांविषयी वाटणारी पुरातन असूया. केवळ गंमत म्हणून किंवा वेळ घालवायचे साधन म्हणून ती पदोपदी त्याचा अपमान करू लागली. त्याला छळण्याची एखादी क्लृप्ती शोधण्यात तिला स्फुरण यायचे. त्याच्या नीटनेटकेपणाची, स्वच्छतेच्या कटाक्षाची ती खिल्ली उडवीत असे.
‘‘माझ्या माहितीत एक माणूस हाय. दहा ठिकाणी ठिगळे लावलेले फाटके कपडे घालतो. अंघोळ पण आठवड्यातून एकदा केली तर केली, पण दिसतो कसा अगदी मर्द हिरो. अवो, मुळात असावं लागतं. ते नसलं तर एवढे झ्याक-पाक, भारी कपडे करून काय बी उपयोग होत नाई.’’
त्याला चिडवण्यासाठी म्हणून खुजा, खुरटा, बुटका असे शब्द ती सारखे आपल्या बोलण्यात वापरे. त्याच्या व्यंगाचा उल्लेख करण्याची एकही संधी ती सोडत नसे. दोघांची वारंवार भांडणे होत. तिच्या उद्दामपणाने तो थक्क होई. कारण नसताना ती भडकायची. उगाच आरडाओरडा करीत अर्वाच्य शिव्या देणे नित्याचे होते. हा सगळा तमाशा पहायला जिन्यावर लोक जमा होत. मादाम ल्युबेतच्या डोळ्यांतून टिपे गळत.
पण मारी प्रकरण तुटेपर्यंत कधीच ताणत नसे. त्याच्या संतापाने हद्द गाठलीय हे लक्षात येताच ती आपला पवित्रा बदलून त्याची क्षमा मागे. अगदी हातापाया पडायलासुद्धा कमी करीत नसे. त्यानेही भागले नाही तर ती आपले ठेवणीतील अस्त्र बाहेर काढी. ती जवळ येताच तिच्या स्पर्शाच्या, चुंबनाच्या जादूने त्याचा सगळा संताप, अपमान विरघळून जाई. मग दोन दिवस शांततेत जात.
अशाच एका दिवशी त्याने तिला पोर्ट्रेटसाठी पोज द्यायला सांगितले. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने अगदी तात्काळ मान्य केले.
‘‘माझं पेंटिंग? अगदी खरंखुरं?’’ तिचा विश्वास बसेना.
‘‘होय. अगदी अस्सल. ऑईलपेंटमध्ये.’’
आनंद आणि उत्साह तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. ती बाथरूममध्ये गेली आणि तासाभराने भडक मेकअप करून बाहेर आली. तिने तो पन्नास फ्रँकला घेतलेला काळा वेल्व्हेटचा ड्रेस घातला होता आणि खांद्यावर पिसांची झूल पांघरली होती. तिचा तो अवतार बघताच तो वैतागला. तो ड्रेस बदलायला सांगावे असे त्याच्या तोंडावर आले होते, पण वाद नको म्हणून त्याने काही सांगायचे टाळले. हेन्री देत असलेली पोज न घेता तिने स्वतःहून एक पोज घेतली. ‘‘मी किनई या बाजूने छान दिसते,’’ असे म्हणून केस सारखे करीत तिने एक फाकडू पोज घेतली. तिच्या आविर्भावातील सहजता जाऊन ती ठोकळ्यासारख्या एखाद्या टिनपाट मॉडेलसारखी दिसायला लागली. हेन्रीने कामाला सुरुवात करण्याच्या उद्देशाने स्टूल इझलजवळ ओढून घेतले.
तासाभरात ती कंटाळली. ‘‘असं एका जागी नुसतं बसून राह्याला लय कंटाळा येतो. तुमी काम जरा पटापट आटपून घ्या.’’ आणखी थोडा वेळ गेल्यावर तिने त्याला सरळ विचारले, ‘‘तुम्ही या कामाला किती पैसे देता?’’
‘‘मी सहसा मॉडेल वापरून काम करीत नाही, पण बाहेर या कामाला साधारणतः दिवसाला पाच फ्रँक देतात.’’
‘‘तर मग तेवढे पैसे तुम्ही मला देयला पाहिजेत. कारण तुम्हीच माझं चित्र काढतो म्हणाला.’’ त्याने कपाळावर हात मारला. तिच्या या धंदेवाईक बेरकी वृत्तीचा त्याला तिटकारा होता. पाटूने तिला दिलेली सडक्या फळाची उपमा अगदी योग्य होती.
‘‘मी तुला हे पोर्ट्रेट देणार आहे. ते पुरेसे होणार नाही का? शिवाय तुला दर दिवसाचे पाच फ्रँक मी देतो ते कुठे गेले?’’
‘‘ते तुमच्याबरोबर नुसते राहाण्याचे. काही काम करायला सांगितले तर त्याचे वर तीन फ्रँक पडतील आणि पेंटिंगसाठी तुमच्या पुढ्यात बसायचे पाच तर तुम्हीच कबूल केलेयत.’’
‘‘एक तास पण पोज दिली नाहीस तर हिशेब करायला लागलीस.’’
‘‘ते तुमचं तुम्ही बघून घ्या. मी काय तुमच्या पाठी लागले नव्हते मला ठेवून घ्या म्हणून.’’ ती ताडकन उठली आणि त्याच्या जवळ येऊन कॅनव्हास बघू लागली. ‘‘वा! काय काढलंयत हे कापडावर. मी किती छान दिसते. या चित्रात कसं ध्यान दिसतंय. मला वाटलंच होतं की तुम्हाला चित्रसुद्धा नीट काढायला जमत नाही.’’
‘‘गेट आऊट!’’ शेवटी त्याच्या संतापाचा स्फोट झाला, ‘‘चालती हो येथून. एक क्षणभरसुद्धा तुझं तोंड बघायची माझी इच्छा नाहीय.’’
‘‘मी बरी जाईन माझे पैसे घेतल्याशिवाय.’’ त्याने चिडून तिच्या अंगावर भिरकावलेले पाच फ्रँकचे नाणे तिने वरच्या वर झेलले व दोन पावलांत तिने दरवाजा गाठला. ‘‘एक मिनिटसुद्धा तुमच्याबरोबर काढण्याची माझी ही इच्छा नाही. तुम्हाला माझी संगत हवी असेल तर स्वतःसाठी एक पायांची जोडी आणि चांगला चिकना चेहरा कुठे मिळाला तर घेऊन या.’’ असे म्हणून तिने दाणकन दरवाजा आपटला व घराबाहेर पडली.
नंतर तासाभरात ती परत आली. माझे चुकले, मला माफ करा असे म्हणून तिने चक्क त्याचे पाय धरले.
‘‘घरात बसून बसून माझं डोचकं फिरल्यावाणी झालं होतं. माझ्या बहिणीच्या काळजीने माझ्या जीवाला घोर लागलाय. फक्त एकदाच सॅबॅस्टोपलला जाऊन तिला भेटून येते.’’
ही शुद्ध थाप होती. वास्तविक तिला तिच्या सॅबॅस्टोपलच्या मित्रमंडळींना भेटून आपले बँकेतील खातेपुस्तक दाखवून मी कसे एका श्रीमंत बुटक्याला गटवलंय त्याची फुशारकी मारायची होती. तिने एक श्रीमंत बकरा गळाला लावलाय ही बातमी कळली तर बेबेरने तिला परत घरात घेतले असते.
त्याने निरुपाय म्हणून एकदा परवानगी दिली तर ती रोज दुपारची सटकायला लागली. रात्री परत यायला उशीर झाला तर बहिणीच्या नावावर काहीतरी थाप मारून वेळ मारून न्यायची, पण कधीतरी तिच्या तोंडून तिचे भांडे फुटत असे, पण तरीही त्याला तिच्या थापांवर विश्वास बसल्याचे नाटक चालू ठेवावे लागे. नाही तर भांडणाला आमंत्रण.
मारी दिवसा गाव भटकायला जायला लागल्याचा एक फायदा म्हणजे त्याला दुपारची थोडी शांतता मिळू लागली. त्याने पुन्हा कामावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला ते जमेना. तो दिवसभर स्टुडिओत काही न करता स्वस्थ बसून असायचा. अशा एका निवांत दुपारी स्टुडिओच्या दरवाजावर बार्ताझार पाटू येऊन उभा राहिला. त्याच्याबरोबर त्याची मुलगी होती. वय वर्षे वीस, लांबोडे नाक, पुढे आलेले दात व कपाळावर मुद्दाम ओढून काढलेली काळ्या केसांची बट. तिच्या त्या भावी नवऱ्याबद्दल सहानुभूती वाटावी असेच तिचे रूप होते.
‘‘आम्ही पोर्ट्रेट करण्यासाठी आलोयत. अर्थात तुम्हाला वेळ असेल तरच, मस्य तुलूझ.’’ पाटू मोठ्या अदबीने म्हणाला.
सतत तीन दिवस खपून हेन्री ते पोर्ट्रेट करीत होता. पोर्ट्रेट पूर्ण होताच त्या रांगड्या शिपाईगड्याचे डोळे अश्रूंनी भरून आले.
(द पोलीसमन्स डॉटरया नावाचे हे पोर्ट्रेट मॉरीस ज्वाय्याँच्या कॅटलॉगप्रमाणे बर्नहेमच्या संग्रहात आहे.)
त्याने मुलीच्या लग्नाचे आमंत्रण अगत्यपूर्वक दिले. जाता जाता मागे वळून तो म्हणाला, ‘‘ती पोरटी अजून गेलेली दिसत नाहीय. पावडरचा वास येतोय.’’
हेन्रीने निर्जीवपणे मान डोलावली.
‘‘माझा सल्ला तुम्हाला पटलेला दिसत नाहीय. तुमची मर्जी. पण तुम्हाला जर ती कधी त्रास देऊ लागली तर मला सांगा. ताबडतोब तिची रवानगी सँ लझारला करीन.’’
(द पोलीसमन्स डॉटर – तुलूझ लोत्रेक – तैलरंग, कार्डबोर्ड, ६७x५० सेमी, १८९२)
हॅम्बुर्ग म्युझियम

No comments:

Post a Comment