Wednesday, October 17, 2018

मुलँ रूज - ५४

तो लॉजवर परतला तेव्हा मादाम ल्युबेतने जेवणाचे टेबल नीट लावून ठेवले होते. खोलीचा स्वच्छ केर काढला होता. फुले फुलदाणीत नीट रचून ठेवली होती. शेकोटीत लाकडे जळत होती. ती कोपऱ्यातल्या खुर्चीत शांतपणे बसून होती. ती काही बोलली नाही तरी तिच्या नजरेतील नापसंती त्याला जाणवल्यावाचून राहिली नाही. ठीक आहे. फक्त आजची रात्र. उद्यापासून मारीला जायला सांगू.
‘‘इकडे बघितलं का?’’ दरवाजातूनच मारी ओरडली. वेल्व्हेटचा एक स्वस्तातला ड्रेस तिच्या अंगावर होता आणि खांद्यावर पिसांची झूल.
‘‘कशी दिसते मी?’’ दोन्ही हातांनी ड्रेस उचलून वर धरत एक हलकी गिरकी घेत ती म्हणाली.
रात्रीचे बारा वाजून गेले होते. हेन्री सोफ्याच्या एका टोकाला बसला होता. कोनॅकची बाटली पायाशी आडवी पडली होती. गेले पाच तास तो जागा राहून वाट पहात होता. कुठे जिन्यावर पाऊल वाजले की त्याचे हृदय उचंबळून यायचे आणि प्रत्येक वेळी पदरी पडलेली निराशा तो कोनॅकच्या घोटाबरोबर गिळायचा. ही रांड आता काही येत नाही. नक्कीच ती तिच्या याराला भेटायला गेली असणार आणि काल रात्रीच्या सगळ्या घटना मीठमसाला लावून सांगत बसली असेल. एका दाढीवाल्या बुटक्याच्या मदतीने पोलिसांच्या हातातून ती कशी निसटली. कुचेष्टेने हसत तिने त्याच्या चालण्याची नक्कलही केली असेल. वर निघताना त्याने दिलेली शंभर फ्रँकची कोरी करकरीत नोट त्याच्या हवाली केली असेल.
पण तिला आलेली बघताच त्याच्या मनात चिंता, संताप आणि आनंद या भावना एकाच वेळी दाटून आल्या.
‘‘काय झालंय तुम्हाला? बरं वाटत नाहीय का? गप्प का असे? हे कपडे पाहिलते का माझ्या अंगावरचे? कसे आहेत? मी माझ्या मित्राकडून एकदम स्वस्तात आणलेत. फक्त पन्नास फ्रँक पडले. ’’
‘‘या टुकार ड्रेसला पन्नास फ्रँक. कोणाला बाता मारतेस? फार तर दहा फ्रँक पडले असतील. ते जाऊ दे. किती वेळ वाट बघतोय मी? जेवणाचे काय? सातला येणार होतीस तू.’’
‘‘दहा फ्रँक. कपड्यातलं काय कळतं तरी तुम्हाला. हात लावून बघा तर. असली खरंखुरं वेल्वेट आहे हे.’’ ती सोफ्यावर त्याच्याजवळ त्याला खेटून बसत म्हणाली. हेन्रीने चिडून तिचा दंड पकडला व तिला ढकलून दिले. त्याच्या हाताच्या पोलादी पकडीतील ताकदीचे तिला आश्चर्य वाटले.
‘‘या ड्रेसपायी दुपारी मी खूप फिरले. संध्याकाळी मी बहिणीकडे गेले होते. तर ती तापाने अंथरूण धरून बसलेली. मला खूप म्हणत होती आलीस तर आजच्या दिवस राहून जा, पण मी म्हणाले की, तुम्हाला शब्द दिलाय म्हणून.’’
‘‘काही तरी फेकाफेक करू नकोस. तुझा तो ड्रेस, मैत्रीण आणि बहीण गेले उडत. तिथे टेबलावर जेवण ठेवलंय. हवं तर जेवून घे. मी खूप थकलोय. मला झोपू दे आता.’’ हेन्री त्राग्याने म्हणाला व कपडे न बदलता पलंगावर जाऊन डोळे मिटून आडवा झाला. मारी त्याच्याशेजारी जाऊन निजली व त्याच्या अंगाभोवती हात टाकला. तिचा उष्ण श्वास त्याच्या मानेवर जाणवला. तिचे स्तन त्याच्या कुशीत दबले गेले. त्याने तिच्या शरीराच्या विळख्यातून स्वतःला सोडवण्याचा दुबळा प्रयत्न केला, पण तिने आवेगात घेतलेले चुंबन व तिच्या पायांच्या कैचीत त्याचा प्रतिकार कोलमडून पडला.
रात्रभर त्याचा झगडा चालू होता. त्याचे मन विरुद्ध तिचे शरीर. कधी चिडून ओरडणे तर कधी आर्जव. तिने कशालाही दाद न देता आपला देह त्याच्या देहावर झोकून दिला. गिऱ्हाइकाला फसवण्यासाठी म्हणून शोधलेल्या नवनव्या युक्त्या वापरून तिने त्याची वासना जागृत केली. शेवटी कामतृप्तीनंतरच्या क्लांत अवस्थेत त्याला गाढ झोप लागली.
सकाळी जाग आल्यावर किलकिलत्या डोळ्यांनी त्याने तिच्याकडे पाहिले. पाटूने काहीही सांगितलेले असू दे, किंवा मादाम ल्युबेत कितीही डोळे वटारून पाहू दे, काय फरक पडणार आहे? या घटकेला मारी माझ्या कुशीत झोपलेली आहे. तिच्या देहाचा भोग मी केव्हाही घेऊ शकतो. आता, आज रात्री आणि पुढे कितीही वेळा.
त्याने डोळे मिटले. अंतरीचा संघर्ष संपला होता. रात्रभरची रणधुमाळी संपल्यावर ज्याप्रमाणे रणांगणावर पहाटेची शांतता पसरते तशी शांतता त्याच्या चेहऱ्यावर पसरलेली दिसत होती. पराभवानंतरची शांतता.

No comments:

Post a Comment