Saturday, October 13, 2018

मुलँ रूज - ४५

नव वर्षाचे स्वागत मागच्या वर्षाप्रमाणे आपल्या आईच्या सोबतीत करण्याचे हेन्रीने ठरविले. ३१ डिसेंबरला संध्याकाळी तो आईच्या घरी जाऊन पोचला. दुपारीच त्याने आईच्या आवडीचा शुभ्र गुलाबांचा गुच्छ परस्पर पाठवून दिला होता. जेवणाच्या वेळी वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी दोघेही जण कसोशीने प्रयत्न करीत होते. वादाचे विषय आज काढायचे नाहीत असे जणू काही ठरवूनच ते एकमेकांना भेटत होते. हेन्रीने मुद्दाम होऊन मादाम ल्युबेतचा विषय काढला.
‘‘मागच्या महिन्यात थोडीशी सर्दी झाली तर मादामनी केवढा रुद्रावतार धारण केला होता. मला बिछान्यातून बाहेर पडू द्यायला तयार नव्हत्या. सारख्या उशाशी बसून होत्या. कपाळावर पोटीस बांधून त्यांनी मला अगदी भाजूनच काढलं. शिवाय ऊठसूट ती लापशी पिण्याची जबरदस्ती. शेवटी एकदाची सर्दी गेली म्हणून सुटलो नाही तर त्या लापशीत बुडून मेलो असतो. सगळ्यात कमाल म्हणजे त्यांनी मला उशाशी बसून संपूर्ण थ्री मस्केटीयर्स वाचून दाखविले.’’
मादाम ल्युबेतचे कुरबुरीच्या स्वरातील बोलणे आणि लटके रागावणे याची एक छान नक्कल त्याने आईला करून दाखविली. आई बळेबळे हसली. जेवणानंतर ते दोघेजण कॉफी पिण्यासाठी म्हणून बैठकीच्या खोलीत गेले. कॉफीपान चालू असताना त्यांनी हवापाणी व जुन्या नोकराचाकरांविषयी जुजबी गोष्टी केल्या. संभाषणाचा ओघ हळूहळू आटत गेला. ते दोघे एकमेकांसमोर मूकपणे बसले होते. आई हातात घेतलेल्या विणकामात दंग होती. तिच्या तोंडावर शेकोटीचा तांबूस प्रकाश पडला होता. संभाषणासाठी एखाद्या निरुपद्रवी विषयाच्या शोधात तो विस्तवाकडे थंड नजरेने बघत होता.
हेन्रीने मोंमार्त्रमध्ये आपले बस्तान हलवल्यानंतर त्या मायलेकरांमध्ये एक प्रकारचा दुरावा आला होता. दोघांचे जग आता एवढे भिन्न झाले होते की परस्परांविषयी आत्मीयता वाटावी असा रक्ताचे नाते सोडल्यास एकही समान दुवा त्यांच्यात राहिला नव्हता. तरीही एकमेकांच्या भावनांना जपण्याचा भयंकर गुंतागुंतीचा खेळ ती दोघे मोठ्या कौशल्याने खेळत होती. त्याने चित्रकलेला वाहून घेण्याचे ठरविले होते. त्यासाठी त्याने जी जीवनशैली स्वखुशीने अंगीकारली होती ते तिला कदापि आवडणार नाही, हे तो पूर्णपणे जाणून होता आणि म्हणूनच त्याचा कोणताही उल्लेख करण्याचे तो कटाक्षाने टाळत होता. दोघेही आपापल्या वाट्याचे दुःख एकट्याने भोगत होते. दुराव्यामुळे परस्परसंबंधात कोरडेपणा आला असला तरी मायेचा ओलावा अजून शिल्लक होता. आई मुलाच्या प्रेमाचा अनादी अनुबंध अविनाशी असल्यामुळेच टिकून राहिला होता.
‘‘ममा, मी तुम्हाला एक आनंदाची बातमी देणार आहे. ब्रुसेल्समधली सोसायटी द विंग पुढच्या महिन्यात एक प्रदर्शन भरविणार आहे. त्यांनी त्या प्रदर्शनात माझी पेंटिंग ठेवण्यासाठी मला आमंत्रण दिलंय.’’
‘‘अरे वा! शाबास. तुम्हाला खूप आनंद झालेला दिसतोय.’’ हातातील विणकाम चालू ठेवत ती म्हणाली.
त्याने आपल्या जाड भिंगांच्या चष्म्यामधून आईकडे विषण्णपणे पाहिले. बिचारी. खेळ किती काळजीपूर्वक खेळला तरी तिला त्याचे मनापासून काही अप्रूप नाही हे त्यातून लपत नव्हते. सोसायटीकडून आमंत्रण येणे हे मोठ्या सन्मानाचे समजले जाते, हे तिला माहीत नव्हते ना तिने सोसायटीविषयी काही अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. तिच्या दृष्टीने त्याचे मद्यपान, वेश्यागमन, समाजातल्या खालच्या थरांतील लोकांमधील ऊठबस ही जीवनशैली अभिजनवर्गाच्या दृष्टीने अतिशय निंदनीय होती. मोंमार्त्रमध्ये राहून मिळवलेले मानसन्मान तिच्या लेखी फारशी दखल घेण्याच्या लायकीचे नव्हते. ह्याच कारणामुळे हेन्रीने आपण होऊन आपल्या चित्रकलेविषयी आईला काहीही सांगितले नव्हते. तरी त्याविषयी काहीतरी तिच्या कानावर गेले असेल असे त्याला वाटले. उदाहरणार्थ, त्याचे सँ लझारचे मुखपृष्ठ. प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या बहुतेक सगळ्या नियतकालिकांनी ते छापले होते. आर्ट गॅलरीमध्ये अधूनमधून दिसणारी त्याची पेंटिंग, त्याचे कौतुक करणारी समीक्षा, कदाचित यातील काहीही तिच्या कानावर गेले नसणार, नाही तर कधी ना कधीतरी तिच्या बोलण्यात याचा उल्लेख आला असता. म्हणून मोठ्या उत्साहाने तो सोसायटीविषयी तिला माहिती देऊ लागला.
‘‘हा बेल्जियन कलाकारांचा एक गट आहे. दरवर्षी ते एखाद्या नव्या अप्रसिद्ध अशा एक-दोन कलाकारांना बोलावतात. त्यांच्या आमंत्रणाचे महत्त्व अशासाठी की त्यांनी निमंत्रित केलेले सर्व परदेशी कलाकार पुढे प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोचले. उदाहरणार्थ, रेन्वा, व्हिसलर, सार्जंट, रोदँ. हा बहुमान मिळणारा मी सर्वात तरुण चित्रकार ठरेन.’’ त्याने मोठ्या आशेने आईकडे पाहिले.
‘‘हे मला माहीतच नव्हतं. फारच छान!’’
‘‘ल फिगारोच्या समीक्षकाने या निमित्ताने एक लेखच लिहिलाय. तो म्हणतो...’’
हळूहळू त्याची आशा मावळत गेली. कलेतील वास्तववाद, इम्प्रेशनीझम, पोस्ट-इम्प्रेशनीस्ट प्रवाह वगैरे गोष्टी तिने समजून घ्याव्यात अशी काही त्याची अपेक्षा नव्हती. इतरांनी केलेल्या कौतुकाची तिने साधी दखल घेतली असती तरी त्याला ते चालले असते. पण तिच्या लेखी तो एक अपयशी चित्रकार होता. कितीही लाडका असला म्हणून काय झाले त्याच्या पेंटिंगवर सँलोंच्या मान्यतेचे शिक्कामोर्तब नव्हते. शेवटी ती समाजातील उच्चभ्रू अभिजनवर्गाची एक घटक होती. या वर्गाची खास अशी एक अभिरुची तयार झालेली असते. त्यानुसार तिचे काही पूर्वग्रह तिच्या नकळत पक्के झाले होते. उदारहणार्थ, कॉन्झर्व्हेटरीमध्ये शिकून तयार झालेला तो चांगला संगीतकार, कॉमेडी फ्रँक्वामध्ये काम करतो तो चांगला अभिनेता, ऑपेरात गातो तो चांगला गायक, ज्या चित्रकाराची पेंटिंग सँलोंसाठी निवडली जातात तो चांगला चित्रकार असे तिचे समीकरण होते. कलेतील नव्या प्रवाहाबद्दल ती संपूर्ण अनभिज्ञ होती.
आपली निराशा लपवीत वेळ मारून नेण्यासाठी त्याने संभाषणाचे सूत्र पुढे रेटले. प्रदर्शनात पाठवायच्या पेंटिंगमध्ये काही पोर्ट्रेटचा समावेश केला होता. त्यात पेरॉक्वेमधल्या वेश्यांच्या पोर्ट्रेटबरोबरच मादम्वाझेल दिहो नामक एका उच्चभ्रू स्त्रीचे एक पोर्ट्रेट होते. त्याने त्याविषयी सविस्तर माहिती दिली. पण पेरॉक्वेमधल्या वेश्यांच्या पोर्ट्रेटबद्दल त्याने तोंडातून चकार शब्दही काढला नाही.
ह्या दिहो बाईसाहेब एक उच्चकुलीन विधवा होत्या. फावल्या वेळात त्या पियानोच्या शिकवण्या करीत असत. दर शनिवारी संध्याकाळी त्यांच्या घरी संगीताची एक छोटीशी मैफल भरे. साथीला त्यांचे दोन भाऊ असत. थोरला बसून वाजवायचा तर धाकटा फ्लूट. देगा त्या मैफलींना न चुकता हजर असे. त्याला संगीताची अतिशय आवड होती. विशेषतः मोझार्ट. दिहो कुटुंबीयांविषयी जेवढी म्हणून लांबण लावता येईल तेवढी त्याने लावली. किती सुसंस्कृत माणसे आहेत ती. त्यांच्या घरी केवढ्या मोठमोठ्या लोकांची ऊठबस होत असते. वगैरे वगैरे...
थोड्याच वेळात त्यांच्या संभाषणावर शांततेचा पडदा पडला. शांतता. बोलायच्या राहून गेलेल्या अनेक गोष्टींची. त्या अवघडलेल्या स्तब्धतेत एक एक क्षण कसाबसा पुढे सरकत होता. मँटलवर ठेवलेल्या ॲलबॅस्टर घड्याळाच्या टिकटिकीसारखा एकसुरी, नीरस, कंटाळवाणा.
‘‘आज तुम्ही आलात तर किती बरं वाटलं म्हणून सांगू. पण तुम्हाला दुसऱ्या एखाद्या ठिकाणी जायचं असेल. तुमचा असा जास्त वेळ घेणं बरं होणार नाही...’’ आई मोठ्या खिन्नतेने पण सुज्ञतेने म्हणाली.
‘‘हॅपी न्यू ईयर ममा.’’ त्याने निरोपादाखल आईच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि तो मोठ्या जड अंतःकरणाने तिथून उठला.

No comments:

Post a Comment