Wednesday, January 31, 2018

मून अँड सिक्सपेन्स – २१

त्याच्या पसंतीच्या रेस्तोराँमध्ये आम्ही गेलो. वाटेत मी वर्तमानपत्र घेतलं. आम्ही जेवण मागवलं. सँ गामिएची बाटली समोर ठेऊन वर्तमानपत्राचा अंक उघडून मी वाचायला सुरवात केली. आम्ही शांतपणे जेवलो. तो अधे-मधे माझ्याकडे बघत होता ते मला जाणवत होतं पण मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. संभाषणाला सुरवात त्याने करावी असा माझा प्रयत्न होता.
“वर्तमानपत्रात काही खास बातमी?” आमचं जेवण संपता संपता त्याने विचारलं.
त्याच्या आवाजावरून तो किंचीत चिडून बोलत असावा असा मला संशय आला आणि आतून फार बरं वाटलं.
“मला नाटकाची परीक्षणं वाचायला आवडतात.” मी म्हटलं आणि वर्तमानपत्राची घडी करून ते बाजूला ठेवलं.
“जेवण छान होतं.”
“कॉफी इथेच घेतली तर बरं होईल नाही का?”
“चालेल.”
आम्ही सिगार शिलगावल्या. मी शांतपणे धुम्रपान करत होतो. अधून मधून तो माझ्याकडे बघून मिश्किलपणे हसत होता. मला कसलीच घाई नव्हती.
“आपण मागे भेटलो होतो त्यानंतर तू काय करत होतास?” सरते शेवटी त्याने विचारलं.
सांगणयासारखं माझ्याकडे काही नव्हतं. थोडी मेहनत, थोडं साहस, थोडी गंमत. इकडे तिकडे केलेली मुशाफिरी. साहित्य आणि साहित्यिकांचे आलेले चार अनुभव. स्ट्रिकलंडला त्याच्याबद्दल चुकुनही काही विचारायचं नाही याची मी मुद्दाम काळजी घेत होतो. तो काय करत होता याच्यात मी आता पर्यंत अजिबात रस दाखवला नव्हता. शेवटी माझ्या चिकाटीला फळ आलं. त्याने स्वत:विषयी बोलायला सुरवात केली. स्वत:चं मन नीट व्यक्त करताना त्याला जमत नव्हतं. गेल्या पाच वर्षात त्याने कोणत्या हालअपेष्टा भोगल्या हे नीट कळण्यासाठी मला त्याच्या तुटक बोलण्यातील गाळलेल्या जागा अंदाजाने भराव्या लागल्या. तो कसा आहे हे जाणून घेण्यात एक लेखक म्हणून मला रस होता. त्यासाठी तर मी मुद्दाम थांबलो होतो. पण ते असं तुकड्या तुकड्याने अर्घवट हाती लागत होतं. त्यामुळे माझी निराशा झाली. त्याचं बोलणं ऐकणं आणि त्याचा अर्थ लावणं म्हणजे एखादं फाटलेलं हस्तलिखीत वाचण्यासारखं ते होतं. त्याला पावला पावलावर कडा संघर्ष करावा लागला होता. इतरांना जे भयंकर कष्टप्रद वाटलं असतं त्याचं त्याला काहीच वाटलं नव्हतं. स्ट्रिकलँड कोणत्याही सुखसोईंच्या बाबतीत अगदी उदासीन असे. या दृष्टीने तो इतर इंग्लीश लोकांच्या तुलनेत फार वेगळा होता. घाणेरड्या जागेत रहायचं त्याला काहीच वाटत नसे. आपल्या अवती भोवती छान छान गोष्टी असण्याची गरज त्याला वाटत नसे. तो रहात होता त्या खोलीच्या वॉलपेपरचे पोपडे उडाले आहेत हे त्याच्या लक्षातही आलं नव्हतं. बसण्यासाठी खुर्चीची गरज त्याला पडत नसे. एका बारक्याश्या किचन स्टूलवर त्याचे काम भागत असे. त्याची भूक चांगली होती. पण ताटात काय आहे याची त्याला फिकीर नसे. समोर अन्न आले की ते ग्रहण करणे मग ते काहीही असो, नसले तरी चालेल. सहा महिने त्याने फक्त दूध पाव खाऊन काढले होते. त्याच्या विषयवासना तीव्र होत्या. तरीही तो स्त्रियांच्या बाबतीत उदासीन असायचा. एकांतवासाने त्याचे हाल होत नसत. ज्या फकिरी बाण्याने तो जगत होता त्याचे कौतुकच केले पाहिजे.
लंडनवरून येताना आणलेले थोडेफार पैसे संपल्यावर त्याचे हाल कुत्रा खाईना. त्याचं एकही पेंटींग विकलं गेलं नव्हते. पैसे मिळवण्यासाठी म्हणून त्याने दुसरे मार्गही चोखाळून पाहिले. पॅरीसच्या रंगेल रात्रींची सफर करायला लंडनमधून येणाऱ्या खेडवळ प्रवाशांचा गाईड म्हणून त्याने थोडे दिवस काम केलं होतं, हे एकदा त्याने मला विषादाने सांगितलं. हे काम त्याच्या कुचेष्टेखोर स्वभावाला साजेसे होते. एव्हाना पॅरीसच्या त्या कुप्रसिद्ध भागाची त्याला चांगलीच माहिती झाली होती. कायद्याने बंदी असलेल्या गोष्टी करण्यात रस असलेला कोणी इंग्लीशमन मिळतो का ते शोधताना एकदा त्याला बुलेवार द ला मॅदलीनवर रात्र काढावी लागली होती. एकदा नशीबाने त्याला लंडनहून जीवाचं पॅरीस करायला आलेल्या पाच सहा मित्रांच टोळकं मिळालं पण त्याच्या अवताराकडे बघून त्या मंडळींनी पळ काढला. त्याच्यावर विश्वास ठेऊन तो नेईल तिकडे त्याच्या मागोमाग जाण्याचं धाडस करण्याची कोणाचीच तयारी नव्हती. त्यानंतर त्याला इंग्लाडला निर्यात करायच्या औषधांच्या लेबलांवरील फ्रेंच मजकुराचं इंग्लीश भाषांतर करण्याचं काम मिळालं. पॅरीसमधील कामगारांच्या संपात त्याने घरांना रंग लावण्यासाठी हातात ब्रश घ्यायला मागे पुढे पाहिलं नाही.
ते काहीही असलं तरी त्याच्या चित्रकलेत खंड पडला नव्हता. स्टुडियोचा कंटाळा आल्याने तो घरीच काम करीत असे. कॅनव्हास आणि रंग घ्यायला लागणाऱ्या पैशात त्याने कधीच काटकसर केली नाही. खरं पाहाता त्याला दुसरं काहीच लागत नसे. त्याला चित्र रंगवताना खूप अडचणी येत. पण दुसऱ्याची मदत घ्यायला तो कधीच तयार नसे. त्यामुळे ज्या तांत्रिक अडचणींवर मागच्या पिढीतील चित्रकारांनी अगोदरच मात केली होती अशा साध्या साध्या गोष्टीतून स्वत:च चुकत माकत शिकायला त्याला खूप वेळ लागत असे. त्याला काही तरी साधायचं होतं. काय ते मला कळलं नाही. त्यालासुद्धा ते कितपत माहित होतं याची शंकाच आहे. तो कशाने तरी झपाटलेला असावा हे जे माझं पहिलं मत होतं ते कायम झालं. तो जे काही करायचा त्याने त्याचं डोकं ठिकाणावर आहे असं कोणाला वाटलं नसतं. स्वत:ची चित्रं दुसऱ्याला दाखवून त्याचं मत विचारण्यात त्याला रस नसायचा. कारण त्याला स्वत:लाच ती फारशी आवडत नसावीत. तो स्वप्नांच्या दुनियेत विहार करत असावा. वास्तवाशी त्याला काही देणं घेणं नव्हतं. मला असं वाटायचं की पेंटींग करताना त्याच्यातील हिंस्रपणा उफाळून वर येत असावा. अंतर्दृष्टीला जे दिसत आहे ते सर्व कॅनव्हासवर उतरवण्याच्या नादात तो सर्वस्व विसरून स्वत:ला झोकून देत असावा. ते एकदा संपलं की तो ते पेंटींगही विसरून जात असला पाहिजे. मला वाटतं की त्याने क्वचितच त्याचं पेंटींग पूर्णत्वाला नेलं असेल. निर्मितीच्या उर्जेची ज्वाला विझून गेल्यावर त्याचा त्या निर्मितीतील रस संपून जात असावा. त्याने जे केलं त्याने त्याचे कधीही समाधान होत नसले पाहिजे. अंत:चक्षूंना दिसणाऱ्या पेंटींगसमोर कॅनव्हासवर उतरलेलं पेंटींग त्याला कस्पटासमान वाटत असे.
“तू तुझी पेंटींग प्रदर्शानात का पाठवत नाहीस? आपल्या पेंटींगबद्दल दुसऱ्यांना काय वाटतं ते आपल्याला कळावं असं तुला वाटत नाही काय?”
“तुला वाटतं?”
या दोन शब्दातून त्याने जी तुच्छता व्यक्त केली होती त्याला तोड नव्हती.
“तुला प्रसिद्धी नको आहे का? प्रसिद्धी ही एक गोष्ट अशी आहे की कोणताही कलाकार तिच्यापासून फार काळ उदासीन राहू शकत नाही.”
“लहान मुलासारखं बोलू नकोस. एका फालतू माणसाच्या मताला मी जेथे किंमत देत नाही तेथे अनेक फालतू लोकांची गर्दी झाली म्हणून मी त्यांच्या मताला किंमत द्यावी हे कितपत योग्य आहे.”
“तुझं डोकं उलटंच चालतं हे मात्र खरं आहे.”   
“प्रसिद्धी कोणाला मिळत नाही? समीक्षक, लेखक, शेअर बाजारातील दलाल, स्त्रिया.”
“जी माणसं तुला ओळखत नाहीत अशांनी तुझी पेंटींग पाहिली आणि त्यांना काही वाटलं, त्यांच्या भावना उचंबळून आल्या तर तुला समाधान वाटणार नाही का? लोकांच्या मनावर राज्य करायला सगळ्यांनाच हवं असतं. आपला प्रभाव दुसऱ्यावर पडलेला कोणाला आवडणार नाही?”
“हा शुद्ध भावनांचा खेळ, मेलोड्रामा झाला.”
“तुझी चित्रं चांगली आहेत किंवा वाईट आहेत याने तुला काय फरक पडतो?”
“मुळीच फरक पडत नाही. मला फक्त मला जसं दिसतं तसंच रंगवायचं असतं.”
“समज मी एका समुद्रातील एखाद्या निर्जन बेटावर आहे. तिथे जर माझं लिखाण वाचणारा दुसरा कोणी नसेल तर मला लिहीता येईल असं मला वाटत नाही.”
स्ट्रिकलँड बराच वेळ काही बोलला नाही. त्याच्या डोळ्यात विचित्र चमक होती. जणू काही तो एक अद्भूत अनुभूती घेण्यात मग्न असावा.
“कधी कधी अथांग सागरावरील एखाद्या निर्जन बेटावर मी आहे. तेथील डोंगर, दऱ्या, नदी नाले, चित्रविचित्र झाडेझुडपे, पशुपक्षी, नि:शब्द शांतता मला खुणावत आहेत असं मला वाटतं. मला हवं ते कदाचित तेथे मिळू शकेल कोण जाणे?”
तो जे बोलला ते शब्द प्रत्यक्षात वेगळेच होते. तो विशेषणांच्या ऐवजी हातवारे करून सांगायचा. बोलता बोलता तो मध्येच थांबायचा. बऱ्याच ठिकाणी त्याला काय सांगायचं असावं ते मी माझ्या शब्दात व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.
“गेल्या पाच वर्षांचा विचार करता जे झालं ते ठीक होतं असं वाटतं का?”
त्याने माझ्याकडे पाहिलं. मी काय म्हणतोय ते त्याच्या ध्यानात आलं नव्हतं असं मला त्याच्या नजरेवरून वाटलं. मी अधिक खुलासा केला.
“तू तुझा सुखी संसार, घर सोडलंस. बऱ्यापैकी पैसे तुझ्या गाठीला होते. इथे पॅरीसमध्ये तू सडत आहेस. जर हा निर्णय घेण्याची परत एक संधी मिळाली तर तू पाच वर्षांपूर्वी जो निर्णय घेतला होतास तोच निर्णय घेशील?”
“बहुधा.”
“तू अजून तुझी बायको, मुलं यांची काहीच चौकशी केली नाहीस. तुला त्यांची आठवण येत नाही का?”
“नाही.”
“तू एका शब्दापेक्षा जास्त शब्द वापरलेस तर बरं होईल. तुझ्यामुळे त्यांच्यावर दु:खाचा जो डोंगर कोसळला आहे त्याचा तुला कधी एक पळभर तरी पश्चाताप वाटला होता का?”
तो किंचीत हसला आणि त्याने मान हलवली.
“मला वाटतं तुला अधून मधून भूतकाळाची आठवण आल्याशिवाय रहात नसावी. मी गेल्या सात आठ वर्षांच्या पूर्वीचा काळाविषयी विचारत नाही. त्याही पूर्वीच्या काळाविषयी, जेव्हा तू तुझ्या बायकोला पहिल्यांदा भेटलास, तुझं तिच्यावर प्रेम बसलं, आणि मग तिच्याशी लग्न केलंस, तिला पहिल्यांदा जेव्हा बाहूपाशात घेतलंस, पहिलं चुंबन घेतलंस.”
“मी भूतकाळाचा विचार करत नाही, फक्त चालू वर्तमानकाळाचा विचार करतो.”
त्याने दिलेल्या उत्तराचा पहिल्यांदा अर्थ लागत नव्हता, पण थोडा विचार केल्यावर त्यात थोडं तथ्य आहे असं वाटू लागलं.
“तू सुखी आहेस का?” मी विचारलं.
“मी सुखी आहे.”
याच्यावर बोलण्यासारखं काही नव्हतं. मी गप्प बसलो आणि त्याच्याकडे रोखून पाहिलं. त्याने माझ्या नजरेला नजर भिडवली. त्याचे डोळे चमकले.
“मला वाटलं तू माझ्यावर टीका करशील.”
“मूर्खपणा आहे,” मी तात्काळ उत्तर दिलं. “एखाद्या अजगरावर टीका करण्याचा काही उपयोग असतो का? मला फक्त तुझ्या डोक्यात काय चालू आहे ते जाणून घेण्यात रस आहे.”
“तू फक्त एक व्यावसायिक साहित्यिक म्हणून माझ्याकडे बघतोयस.”
“होय, एका साहित्यिकाच्या शुद्ध व्यावसायिक दृष्टीकोनातून.”
“तसं असेल तर तू कशाला माझ्यावर टीका करण्यात तुझा वेळ खर्च करशील? तुला फक्त माझी शवचिकित्सा करण्यात रस आहे. तू अगदी भयंकर आहेस.”
“कदाचित म्हणूनच तुझं माझं जमत असावं.” मी टोमणा मारला.
तो कोरडं हसला. त्याच्या हसण्याचं योग्य वर्णन करायला माझ्याकडे शब्द असते तर बरं झालं असतं. त्याचा चेहेरा एक क्षणभर उजळला. त्याचा चेहेरा सहसा गंभीर असायचा किंवा तो कोणाचा तरी उपहास किंवा कुचेष्टा करतोय असं वाटत असायचं. त्याच्या ऐवजी त्याच्या चेहेऱ्यावर हसू फुटायला लागलं होतं. उन्मादाने हसावं तसं. क्रूर नाही आणि प्रेमळही नाही. कामांध, अमानवी वाटेल अश्या त्याच्या त्या भयंकर हास्यामुळे मी त्याला विचारलं:
“तू पॅरीसला आल्यावर कोणाच्या प्रेमात वगैरे पडलास की नाही?”
“तसल्या मुर्खपणाच्या गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ नाही. प्रेम आणि कला या दोन्ही गोष्टी करण्यासाठी आयुष्य पुरं पडणार नाही.”
“तुझ्याकडे पाहिलं की तू वैरागी वगैरे असशील असं वाटत नाही.”
“प्रेमासारख्या फालतू गोष्टींची मला किळस वाटते.”
“मनुष्य-स्वभाव म्हणजे एक वैतागच असतो नाही.”
“तू माझ्याकडे बघून असा का हसतोयस?”
“कारण तुझ्यावर माझा विश्वास नाही.”
“तू एक महामूर्ख आहेस.”
त्याचा अंदाज घ्यायला मी थांबलो.
“माझ्याशी असली थापेबाजी करण्यात काय अर्थ आहे?”
“तुला काय म्हणायचंय?”
मी हसलो.
“तुला आता स्पष्टच सांगतो. इतके दिवस मला वाटत होतं की तुझ्या टाळक्यात काही शिरत नसावं. हे सगळं कायमचं संपलंय असा समज तू करून घेतला आहेस. तू इकडे पॅरीसला तुझ्या मनाला येईल तसं वागतोयस. तुला वाटतं की तू आता मुक्त झाला आहेस. तुझे हात आकाशाला भिडले आहेत. पण तसं नाही. अचानक तुझ्या लक्षात येतं की तुझे पाय मातीचेच आहेत. चिखलात लोळायचा तुला झटका आलाय. दारू पिताना तुला भान रहात नाही. वासनेने अंध होईपर्यंत तू दारू ढोसतोस. मग तुला एक बाई सापडते. गावंढळ, सामाजिक दृष्ट्या खालच्या दर्जाची, अशिक्षित आणि मूर्ख, दोन पायाच्या जनावरासारखी. मग तू तिच्या देहावर एखाद्या जंगली श्वापदासारखी झडप घालतोस.”
काहीही न करता अगदी निश्चलपणे तो माझ्याकडे अगदी टक लावून पहात होता. मी त्याच्या डोळ्याला डोळे भिडवले आणि मी त्याच्याशी हळू हळू बोलायला सुरवात केली.
“यात चमत्कारिक काय ते मी तुला सांगतो. हे सगळं संपतं तेव्हा तुला देहाच्या पावित्र्याची आठवण होते. तू आत्म्यासारखा मुक्त विहार करतोस. सौंदर्याच्या अनुभूतीला तू एखादी सैंद्रिय गोष्ट असल्यासारखा स्पर्श करायला जातोस. हवेची झुळूक, पानांची सळसळ, निर्झराची खळखळ यांनी तू मोहरून जातोस. आपण स्वत:च परमेश्वर आहोत असं तुला वाटायला लागतं. हे कसं होतं ते तू मला समजावून सांगू शकशील का?”
माझं बोलणं पूर्ण होईपर्यंत त्याची नजर माझ्यावर खिळून होती, ती नंतर बाजूला वळली. त्याचा चेहेरा भकास दिसत होता, पोलीसांच्या कोठडीत अनन्वीत छळाने मृत्यु पावलेल्या कैद्यासारखा. तो गप्प होता. आमचा संवाद संपला हे मला कळलं.

Tuesday, January 30, 2018

मून अँड सिक्सपेन्स – २०

स्ट्रिकलँड ज्या कॅफेत जायचा त्या कॅफेत दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मला घेऊन जायला डर्क स्ट्रोव्ह तयार झाला. मी पॅरीसमध्ये पाच वर्षांपूर्वी स्ट्रिकलँडबरोबर ज्या कॅफेत ऍबसिंथ पित बसलो होतो तेच हे कॅफे आहे का हे जाणून घेण्यात मला रस होता. तो अजून त्याच कॅफेत जात असेल तर याचा अर्थ तो आळशी आहे, त्याला कोणताही बदल नको असतो किंवा त्याचा स्वभावच तसा असेल.
“तो बघ. तिथे बसला आहे.” आम्ही कॅफेत पोचताच स्ट्रोव्ह म्हणाला.
ऑक्टोबर महिना असला तरी हवा अजून गरम होती. फुटपाथवरच्या टेबलांवर गर्दी होती. मी इकडे तिकडे नजर फिरवली. पण स्ट्रिकलँड मला दिसला नाही.
“तो बघ. त्या कोपऱ्यात बुद्धीबळाचा डाव मांडून बसला आहे.”
एक माणूस टेबलावर बुद्धीबळाचा पट मांडून त्यावर झुकून बसला होता. भली मोठी फेल्ट हॅट आणि तांबूस दाढी सोडून मला काही दिसत नव्हतं. टेबलांच्या गर्दीतून वाट काढत आम्ही त्याच्या जवळ गेलो.
“स्ट्रिकलँड.”
त्याने मान वर करून पाहिलं.
“ए जाड्या. काय पाहिजे तुला?”
“मी तुझ्या जुन्या मित्राला घेऊन आलो आहे. तुला भेटायला.”
स्ट्रिकलँडने माझ्याकडे एक दृष्टीक्षेप टाकला. त्याने मला ओळखलं नसावं. त्याने परत बुद्धीबळाच्या पटाकडे नजर वळवली.
“बस इथे. पण आवाज करू नकोस.”
त्याने पटावर एक चाल केली आणि तो खेळात गढून गेला. बिचारा स्ट्रोव्ह कावरा बावरा होऊन माझ्याकडे बघू लागला. माझा तोल ढळू न देता मी बसलो. ड्रिंक मागवलं आणि स्ट्रिकलँडचा डाव संपेपर्यंत शांतपणे बसून राहिलो. त्याचं निरीक्षण करण्याची संधी आयतीच चालून आली होती आणि ती मला दवडायची नव्हती. त्याला एरवी पाहिला असता तर मी ओळखलंच नसतं. एकतर त्याच्या अस्ताव्यस्त वाढलेल्या दाढीने त्याचा अर्धाअधिक चेहेरा झाकलेला होता. त्याचे केसही खूप लांब वाढले होते. पण सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे तो अगदी बारीक झाला होता. त्यामुळे त्याचे ते आढ्यताखोर लांब नाक जास्तच उठून दिसत होतं. त्याची गालफडं वर आली होती. त्याच्या अवघ्या शरीरावर प्रेतवत अवकळा आली होती. मी पाच वर्षांपूर्वी त्याला भेटलो होतो तेव्हा जो सूट तो वापरत होता तोच सूट त्याने आजही घातला होता. इतक्या वर्षांच्या वापराने फाटलेला, डागाळलेला, विरलेला सूट त्याच्या हडकुळ्या शरीरावर टांगल्यासारखा वाटत होता. अस्वच्छ हात, वाढलेली नखं, लांब-रूंद हाडांची मोळी बांधल्यासारखा देह. एके काळी तो धिप्पाड शरीराचा इसम होता हे त्याच्या या अवस्थेत ओळखू येणं कठीण होतं. पण तो सगळं लक्ष खेळावर केंद्रीत करून ज्या पद्धतीने बसला होता त्यामुळे तो एखाद्या मजबूत माणसासारखा वाटत होता. त्यामुळे तो रोडावला आहे हे पटकन माझ्या लक्षात आलं नाही.
आपली चाल केल्यानंतर तो खुर्चीला पाठ टेकून ताठ बसला आणि त्याने आपल्या समोर बसलेल्या प्रतिस्पर्ध्याकडे टक लावून पाहिलं. तो एक जाडा, दाढी-दिक्षित, फ्रेंच माणूस होता. त्याने समोरच्या पटाचं थोडा वेळ निरीक्षण केलं आणि अस्फुट हसला. पटावरील सगळे मोहरे त्याने गोळा करून खोक्यात ढकलले, स्ट्रिकलँडला शिव्या दिल्या, वेटरला बोलावून ड्रिंकचे पैसे दिले आणि निघून गेला. स्ट्रोव्हने त्याची खुर्ची टेबलाजवळ ओढून घेतली.
“आता आपल्याला बोलायला हरकत नाही.” स्ट्रिकलँड म्हणाला.
स्ट्रिकलँडने आपले डोळे त्याच्यावर रोखले. त्याच्या नजरेत एक मिश्किलपणा होता. मला वाटलं तो काहीतरी खोचक बोलण्याच्या विचारात असावा. पण काही न सुचल्यामुळे तो गप्प बसला.
“मी तुझ्या जुन्या मित्राला तुला भेटायला घेऊन आलो आहे.” स्ट्रोव्हने मोठ्या उत्साहात परत सुरूवात केली.
स्ट्रिकलँड एक मिनीटभर माझ्याकडे टक लावून बघत होता. मी एक अक्षरही तोंडातून काढलं नाही.
“मी याला उभ्या आयुष्यात पाहिलेलं नाही.”
तो असं का म्हणाला असावा ते मला कळलं नाही. पण त्याच्या डोळ्यात ओळख पटल्याची अंधूक खूण पाहिल्याची मला खात्री होती. इतक्या वर्षात खजील होण्याची ही माझी पहिलीच खेप होती.
“तुमची पत्नी थोड्या दिवसांपूर्वी मला भेटली होती. तिची खुशाली कळावी असं तुम्हाला वाटत नाही का?”
तो किंचीत हसला. त्याने डोळे मिचकावले.
“आपण एकदा इथे गप्पा मारत बसलो होतो नाही का.” तो म्हणाला. “किती दिवस झाले असतील त्याला?”
“पाच वर्ष.”
त्याने आणखी एक ऍबसिंथ मागवली. आम्ही पॅरीसमध्ये कधी भेटलो, आमच्या भेटीत स्ट्रिकलँडचा विषय योगायोगाने कसा निघाला वगैरे तपशील स्ट्रोव्ह घडाघडा सांगत होता. स्ट्रिकलँड ऐकत होता की नाही ते मला सांगता येणार नाही. त्याने माझ्याकडे एक दोन वेळा वळून पाहिलं. पण तो आपल्याच विचारात दंग होता. स्ट्रोव्ह बडबडत नसता तर कठीण होतं. अर्ध्या तासाने डचमॅनने घड्याळात पाहिलं आणि त्याला एक काम आहे आणि त्यासाठी त्याला निघणं भाग आहे असं जाहीर केलं. जाताना त्याने येतोस का असं मला विचारलं. स्ट्रिकलँडकडून काहीतरी ऐकायला मिळेल असा विचार करून मी आणखी थोडा वेळ थांबेन असं सांगितलं.
तो जाड्या गेल्यावर एकेरीवर येत मी म्हणालो:
“डर्क स्ट्रोव्हला वाटतं की तू एक महान चित्रकार आहेस.”
“त्याला काय वाटतं याची मी पर्वा करत असेन असं तुला का वाटतं?” तेवढ्याच सहजतेने तोही एकेरीवर आला.
“तुझी पेंटींग बघायला मिळतील का?”
“माझी पेंटींग मी तुला का दाखवावीत?”
“कदाचित त्यातलं एखादं पेंटींग मला विकत घ्यावसं वाटेल.”
“पण विकावं असं मला वाटलं नाही तर?”
“तुला पैसे कितपत मिळतात?” मी हसत हसत विचारलं.
तो गालातल्या गालात हसला.
“मी कसा दिसतोय?”
“अर्धपोटी, भुकेला.”
“मला भूक लागलीच आहे.”
“चल तर मग जेवू या.”
“मला एवढं का बोलावतोयस?”
“उपकार म्हणून नाही.” मी थंडपणे उत्तर दिलं. “तू जिवंत आहेस की उपाशीपोटी तडफडतोयस याला माझ्या लेखी काडीचीही किंमत नाही.”
त्याचे डोळे पुन्हा चमकले.

“चल मग. मला चांगलं जेवण हवंच आहे.”

मून अँड सिक्सपेन्स – १९

मी पॅरीसला आल्याचं स्ट्रोव्हला कळवलं नव्हतं. त्याच्या स्टुडियोच्या दारावरची घंटा वाजवली तेव्हा दार उघडायला स्वत: डर्क स्ट्रोव्ह आला. एक क्षणभर त्याने मला ओळखलंच नाही. नंतर तो आनंदाश्चर्याने ओरडला आणि मला आत घेतलं. एवढ्या उत्साहात स्वागत झाल्याने मी थोडा खूश झालो. त्याची बायको शेगडीजवळ बसून पायमोज्याला रफू करत होती. मला बघून ती झटकन उठून उभी राहिली. त्याने तिची ओळख करून दिली.
“तुला आठवतं ना? मी ज्याच्याबद्दल नेहमी बोलायचो तो हा माझा मित्र.” नंतर माझ्याकडे वळून म्हणाला: “तू येणार आहेस ते मला का नाही कळवलंस.? इथे येऊन किती दिवस झाले? किती दिवस रहाणार आहेस? एक तासभर आधी आला असतास तर बरोबरच जेवलो असतो.”
त्याने माझ्यावर प्रश्नांचा भडिमार केला. त्याने मला खुर्चीवर बसवलं. मी टेकायचा तक्क्या असल्यासारखा माझ्या पाठीवर थपडा मारल्या. माझ्या पुढ्यात केक, सिगार आणि वाईन ठेवली. तो मला काही बोलूच देत नव्हता. त्याच्याकडे व्हिस्की नसल्याचं त्याला वाईट वाटत होतं. त्याला माझ्यासाठी कॉफी बनवायची होती. आणखी काय काय करता येईल या विचाराने त्याने डोकं खाजवलं. आनंदातिशयाने त्याचा चेहेरा खुलला आणि तो हसायला लागला. उत्साहाच्या भरात माझा पाहूणचार करण्यात त्याची एवढी तारांबळ झाली की त्याच्या रंध्रा रंध्रातून घामाच्या धारा वाहू लागल्या.
“तू जरा सुद्धा बदललेला नाहीस.” मी हसत हसत म्हणालो.
त्याचा एकूण अवतार पूर्वीसारखाच दिसत होता. तो जाडा आणि ठेंगू होता. तरूण होता. तिशीच्या आतला. पण अकाली टक्कल पडलेलं होतं. गोल चेहेरा, गोरापान रंग, गोबरे गाल आणि लालचुटूक ओठ. निळे टपोरे डोळे त्यावर सोनेरी काड्यांचा चष्मा. त्याच्या भुवया एवढ्या बारीक होत्या की त्या जवळ जवळ दिसतच नसत. त्याला बघून रूबेन्सच्या पोर्ट्रेट मधल्या जाड्या, गोलमटोल डच बनियांची आठवण व्हायची.
मी जेव्हा त्याला सांगितलं की माझा पॅरीसमध्ये थोड्या काळासाठी स्थयिक होण्याचा विचार आहे आणि त्यासाठी मी एक अपार्टमेंट भाड्याने घेतलं आहे तेव्हा मी त्याला माझा बेत अगोदरच का सांगितला नाही म्हणून तो माझ्यावर रागावला. त्याने मला याहून चांगलं घर बघून दिलं असतं, त्याचं फर्नीचर मला वापरायला दिलं असतं, मी फर्नीचर विकत घेण्याची गरज नव्हती, त्याने मला घर लावायला मदत केली असती वगैरे वगैरे. मी त्याला मला मदत करण्याची संधी दिली नाही हे काही खऱ्या मित्रत्वाचे लक्षण नव्हे म्हणून तो माझ्यावर लटकेच रागावला. इतका सगळा वेळ मिसेस स्ट्रोव्ह तिचं शिवण-टिपण करत बसली होती. त्याचं बोलणं ऐकताना ती गालातल्या गालात हसत होती.
“माझं लग्न झालंय पाहिलंस का. माझी बायको कशी आहे?”
तो तिच्याकडे पाहून हसला. त्याने चष्मा सावरून नीट नाकावर ठेवला. घामामुळे तो सारखा नाकाखाली घसरत होता.
“मी काय सांगणार तुझी बायको कशी आहे ती?” मी हसत हसत म्हणालो.
“डर्क. काही तरीच काय.” मिसेस स्ट्रोव्ह किंचीत लाजत हसली.
“आहे की नाही माझी बायको छान. माझ्या मित्रा माझं ऐक. वेळ फुकट घालवू नकोस. शक्य तितक्या लवकर लग्न करून घे. मी जगातील सर्वात सुखी मनुष्य असेन. ती तिथे कशी बसलीय बघ. एक छान पैकी चित्र काढता येईल. शेदाँ? मी जगातील सगळ्या सुंदर स्त्रियांना पाहिलं आहे. पण मादाम डर्क स्ट्रोव्हहून जास्त सुंदर एकही नाही.”
“तुम्ही जर गप्प बसला नाहीत तर मी निघून जाईन हं.”
“मों पेतीत शॉ.” माझी छकुली ती ... तो म्हणाला.
ती थोडीशी लाजली. त्याच्या आवाजातील आर्जवाने तिला अवघडल्यासारखं झालं होतं. त्याच्या पत्रातून तो त्याच्या बायकोच्या अतिशय प्रेमात आहे हे मला कळलं होतं. त्याची तिच्यावरची नजर हटत नव्हती. तिचं त्याच्यावर प्रेम होतं की नाही ते तिच्या नजरेत दिसत नव्हतं. या बिचाऱ्या पात्राच्या कोणी प्रेमात पडणं तसं कठीणच होतं. तिच्या हसऱ्या डोळ्यांवरून तरी ती प्रेमळ असावी असं वाटत होतं. पण ती अबोल असावी असं वाटत होतं. तिच्या अबोलपणाच्या आत खोल कुठेतरी तिच्या खऱ्या भावना लपल्या असण्याची शक्यता होती. तो तिच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. त्यामुळे त्याला ती अति सुंदर दिसत होती. पण त्याला वाटत होतं तेवढं तिचं सौंदर्य उन्मादक वगैरे काही म्हणता आलं नसतं. ती उंच होती. तिचा करड्या रंगाचा ड्रेस साधा असला तरी अंगासरशी बेतलेला असल्यामुळे तिचं सौष्ठव उठून दिसत होतं. तिची देहयष्टी शिंप्यापेक्षा शिल्पकाराला जास्त आवडली असती. नुकतेच विंचरून मोकळे सोडलेले गडद तपकीरी रंगाचे दाट केस, नितळ कांती, शांत करडे डोळे. ती नाकी डोळी नीटस असली तरी तिच्यात खास असं काही नव्हतं. रूढार्थाने तिला सुंदर खचितच म्हणता आलं नसतं. ती सुरेखही नव्हती. पण स्ट्रोव्हने शेदाँचा जो उल्लेख केला होता तो विनाकारण केला नसावा. तिच्यावरून मला शेदाँने एप्रन आणि हॅट घातलेल्या ज्या साध्या-सुध्या गृहीणींना आपल्या पेंटींगमधून अमर केलं आहे त्याची आठवण झाली. स्वयंपाक, भांडीकुंडी, कपडे धुणं, केर-वारा अशा दिवसभराच्या घरकामात ती ज्या गंभीरपणाने मग्न असायची त्यामुळे त्या घरकामाला एक नैतिक अधिष्ठान प्राप्त झालं होतं. ती बुद्धीमान किंवा बहुश्रुत असावी असं दिसत नव्हतं. ती अबोल आणि गंभीर होती. त्याच्यामागे काही तरी रहस्य दडलेलं असावं असं मला सतत वाटत होतं. तिने डर्क स्ट्रोव्हशी लग्न केलं याचं मला राहून राहून आश्चर्य वाटलं. ती मूळची इंग्लीश होती. पण तिच्याकडे पाहून ती नक्की कोणत्या सामाजिक स्तरातून आली असावी ते सांगता येत नव्हतं. तिची कौटुंबिक पार्श्वभूमी, लग्नाआधी ती काय करत होती वगैरे गोष्टी मी मुद्दाम होऊन चौकशी केल्याशिवाय मला ठाऊक होणं शक्य नव्हतं. ती अगदी कमी बोलत होती. पण जेव्हा ती बोलत होती तेव्हा ती अगदी मंजूळ आवाजात बोलत होती. तिच्या बोलण्यात एक उपजत निरागसता होती.
मी स्ट्रोव्हला तो काय काम करतो ते विचारलं.
“नोकरी? छ्या. मी फक्त पेंटींग करतो. पूर्वी कधी केली नव्हती एवढ्या पेंटींगचं काम सध्या माझ्या हातात आहे.”
आम्ही त्याच्या स्टुडियोत बसलो होतो. त्याने इझलवर लावलेल्या एका पेंटींगकडे निर्देश करून मला ते बघायला सांगितलं. मी ते बारकाईने पाहू लागलो. त्यात रोमन चर्चच्या पायऱ्यांवर बसलेल्या इटालियन शेतकऱ्यांचं चित्रण केलं होतं. इटलीच्या कम्पाना प्रांतात ऐतिहासिक काळी जशी वेशभूषा प्रचलित होती तसे कपडे त्या शेतकऱ्यांनी घातलेले दाखवले होते. 
“तू सध्या याच्यावर काम करत आहेस?”
“रोमसारखी मॉडेल काय इथेही मिळतात. फक्त तशी वेशभूषा केली की झालं.”
“हे पेंटींग फारच छान जमलंय.” मिसेस स्ट्रोव्ह म्हणाली.
“माझ्या या अडाणी बायकोला वाटतं की मी एक मोठा चित्रकार आहे.”
तो ओशाळून हसला. तरीही त्याच्या हसण्यातून त्याला झालेला आनंद लपत नव्हता. त्याची नजर इझलवर लावलेल्या कॅनव्हासवर रेंगाळली. जो स्वत: इतका जाणकार होता, दुसऱ्यांच्या कामाबद्दल त्याचे मत सहसा चुकत नसे, अशा माणसाला स्वत:चं काम किती फालतू आणि टुकार दर्जाचे आहे ते कळू नये हे आश्चर्यकारक होतं.
“तुमची बाकीची पेंटींग दाखवा ना.” ती म्हणाली.
“दाखवू?”
त्याचे मित्र त्याची एवढी टिंगल करत तरीही त्याच्या पेंटींगची कोणी तारीफ केली तर ती ऐकायला तो उत्सुक असे. म्हणून तो आपली पेंटींग पाहुण्यांना दाखवण्याचा कधी आळस करत नसे. त्याने गोट्या खेळणाऱ्या, कुरळ्या केसांच्या, दोन लहान मुलांचं पेंटींग आणलं.
“किती गोड मुलं आहेत ना?”
नंतर त्याने मला आणखी पेंटींग दाखवली. पॅरीसमध्ये आल्यावरसुद्धा तो रोममध्ये वर्षानुवर्ष काढायचा तशीच जुन्या कालबाह्य शैलीतील, बेगडी, बटबटीत, कलाबूत लावल्यासारखी कलाकुसर असलेली पेंटींग काढायचं त्याने थांबवलं नव्हतं हे माझ्या लक्षात आलं. आजूबाजूच्या वास्तवाकडे डोळेझाक करून विकली जातात म्हणून फक्त रंजनप्रधान, कल्पनारम्य चित्र रंगवत बसणं हा तद्दन खोटेपणा होता. ही सगळी कलाकुसर वरवरची होती. पण तरीही डर्क स्ट्रोव्ह एवढा सज्जन आणि प्रामाणिक माणूस शोधून सापडला नसता. यातील विरोधाभासाचा उलगडा कसा करणार.
हे विचारावं असं मला कसं सुचलं ते सांगता येत नाही.
“चार्ल्स स्ट्रिकलँड नावाच्या चित्रकाराशी तुझी कधी गाठ पडली आहे का?”
“तो तुझ्या ओळखीचा आहे?” स्ट्रोव्ह ओरडला.
“तो एखाद्या हलकट जनावरासारखा आहे.” त्याची बायको म्हणाली.
स्ट्रोव्ह हसला.
“मा पुर्व्ह शेरी.” माय पुअर डार्लिंग. तो तिच्या जवळ गेला आणि त्याने तिच्या हाताचं चुंबन घेतलं. “तिला तो आवडत नाही. तू स्ट्रिकलँडला ओळखतोस. किती विचित्र योगायोग आहे हा.”
“मला असंस्कृत माणसं आवडत नाहीत.” मिसेस स्ट्रोव्ह म्हणाली.
डर्क हसत हसत माझ्याकडे वळला आणि त्याने खुलासा केला.
“त्याचं असं झालं. मी एके दिवशी त्याला माझी पेंटींग बघायला बोलावलं. तो आल्यावर त्याला मी माझ्याकडची सगळी पेंटींग दाखवली.” स्ट्रोव्ह क्षणभर घुटमळला. स्वत:च्या फजितीची गोष्ट त्याने मला सांगायला सुरवातच का केली ते मला कळलं नाही. एकदा सांगायला सुरवात केलेली गोष्ट पुढे सांगताना त्याला अवघडल्यासारखं झालं. “त्याने एक एक करून माझी सगळी पेंटींग पाहिली... त्याने एक शब्दही तोंडातून काढला नाही. मला वाटलं त्याने त्याचं मत सगळी पेंटींग बघून झाल्यावर शेवटी सांगण्यासाठी म्हणून राखून ठेवलं असावं. शेवटी मी म्हणालो ही एवढीच पेंटींग आहेत. त्यावर शांतपणे तो म्हणाला मी तुझ्याकडे वीस फ्रँक उधार मागायला आलो होतो.”
“आणि यांनी खरंच त्याला पैसे काढून दिले.” त्याची बायको संतापाने म्हणाली.
“मी एकदम उडालोच. मला नाही म्हणवेना. त्याने मी दिलेले पैसे खिशात घातले, मान डोलावली आणि आभार मानून सरळ निघून गेला.”
ही गोष्ट सांगणाऱ्या डर्क स्ट्रोव्हचा कोरा करकरीत, अचंबित, मूढ चेहेरा बघून हसू आवरणं कठीण होतं.
“त्याने माझ्या पेंटींगना भिकार आहेत असं म्हटलं असतं तरी मला त्याचं काही वाटलं नसतं. पण तो काहीच म्हणाला नाही. त्याने त्याचं कोणतेच मत व्यक्त केलं नाही. एका शब्दानेही.”
“आणि तरी तुम्ही ही गोष्ट सांगत बसला आहात.” त्याची बायको म्हणाली.
स्ट्रिकलँड स्ट्रोव्हशी ज्या अपमानास्पद रीतीने वागला त्याची चीड येण्याऐवजी स्ट्रोव्हच्या फजितीचं हसू मला अधिक येत होतं हे अधिक शोचनीय होतं.
“त्या माणसाचं तोंडसुद्धा मी पुन्हा बघणार नाही.”
स्ट्रोव्ह मान डोलवत हसला. त्याची विनोदबुद्धी परत आली होती.
“पण तो एक मोठा चित्रकार आहे. फार मोठा आहे हे सत्य काही बदलणार नाही.”
“स्ट्रिकलँड?” मी ओरडलो. “मी जो स्ट्रिकलँड म्हणतोय तो हा असणं शक्यच नाही.”
“तांबूस दाढी. थोडा आडव्या अंगाचा. इंग्लीशमन.”
“मी जेव्हा पाच वर्षांपूर्वी त्याला पाहिलं होतं तेव्हा त्याला दाढी नव्हती. पण त्याने दाढी राखली तर ती तांबूस रंगाची असू शकेल. मी ज्याच्या विषयी तुला विचारत होतो तो पेंटींग करायला लागलेल्याला फार तर पाच एक वर्ष झाली असतील.”
“तोच तो. फार मोठा चित्रकार आहे तो.”
“अशक्य.”
“माझी पारख कधी चुकली आहे का?” डर्कने मला विचारलं. “तो एक विलक्षण प्रतिभेचा चित्रकार आहे. माझी खात्री आहे. आजपासून शंभर वर्षांनी आपल्या दोघांच नाव घेतलं गेलंच तर ते आपण चार्ल्स स्ट्रिकलँडला ओळखत होतो म्हणून घेतलं जाईल.”
मी थक्क झालो. त्याच वेळी मी उत्तेजितही झालो होतो. मला त्याच्याबरोबरचं माझं बोलणं आठवलं.
“त्याचं काम आपल्याला बघायला मिळेल का?” मी विचारलं. “त्याला काही यश मिळालं, त्याचं नाव झालं का? तो कुठे रहातो?”
“यश म्हणशील तर त्याला अजून ते मिळालेलं नाही. त्याचं एकही पेंटींग अजून विकलं गेलं नसावं. त्याच्याबद्दल कोणाशी बोललं तर लोक हसतात. पण तो फार मोठा कलाकार आहे याची मला खात्री आहे. हेच लोक एकेकाळी मॅनेलासुद्धा हसायचे. कोरॉचं तर शेवटपर्यंत एकही पेंटींग विकलं गेलं नव्हतं. तो कुठे रहातो ते मला माहित नाही. पण त्याला भेटायचं असेल तर ते आपल्याला शक्य आहे. संध्याकाळी सातच्या सुमारास तो ऍव्हेन्यु द क्लिशीवरच्या एका कॅफेमध्ये असतो. जर तुला वेळ असेल तर आपण उद्या जाऊ.”
“मला भेटायला त्याला आवडेल की नाही ते सांगता येत नाही. तो एक गोष्ट विसरण्याचा प्रयत्न करत आहे. त्याची आठवण त्याला करून द्यायचा माझा विचार आहे. ते काहीही असो. मी येईन. त्याची पेंटींग बघायला मिळण्याची काही शक्यता आहे का?”
“त्याच्याकडची पेंटींग बघायला मिळण्याची शक्यता विचारशील तर बहुधा नाहीच. पण माझ्या माहितीचा एक छोटा चित्रविक्रेता आहे. त्याच्याकडे त्याची दोन तीन पेंटींग बघायला मिळतील. पण तू माझ्या शिवाय एकटा जाऊ नकोस. तुला कळणार नाहीत. मी स्वत: तुला दाखवीन.”
“डर्क. तुम्ही माझ्या सहनशक्तीचा अंत बघत आहात.” मिसेस स्ट्रोव्ह म्हणाली. “ज्याने तुमचा एवढा अपमान केला त्याच्या पेंटींगची एवढी तोंड फाटेस्तोवर स्तुती तुम्ही करताच कशी?” ती माझ्याकडे वळून म्हणाली. “तुम्हाला माहित आहे? काही डच माणसं आमच्याकडे यांची पेंटींग घ्यायला आली होती. तेव्हा यांनी त्यांना स्ट्रिकलँडची पेंटींग घ्यायचा आग्रह केला. ते त्याची पेंटींग दाखवायला स्वत: होऊन त्यांना घेऊन गेले होते.”
“त्याची पेंटींग तुम्हाला कशी वाटतात?” मी हसत हसत विचारलं.
“भयंकर.”
“लाडके. तुला त्यातलं काही कळत नाही.”
“तरी एक बरं झालं. तुमची ती डच माणसंच भडकली. त्यांना वाटलं तुम्ही त्यांची मस्करी करत आहात.”
डर्क स्ट्रोव्हने त्याचा चष्मा काढून पुसला. त्याच्या चेहेऱ्यावरून उत्साह उतू जात होता.
“सौंदर्य ही जगातील एक अमूल्य गोष्ट आहे. ती वाटेत जाता येता सहज मिळेल अशी रस्त्यावर पडलेली सापडेल असं लोकांना का वाटतं? कलाकार त्याच्या आजूबाजूला पडलेल्या पसाऱ्यातून सौंदर्याची निर्मिती मोठ्या जाणीवपूर्वक करत असतो. त्याच्यासाठी त्याला खूप कष्ट पडतात. त्याच्या हातून जी निर्मिती होते त्याचं आकलन करणं हे येरा गबाळ्याचं काम नसतं. कलेची समज येण्यासाठी कलाकार ज्या निर्मिती प्रक्रियेतून गेला असेल त्या प्रक्रियेतून रसिकाला तावूनसुलाखून जावं लागतं. कलाकाराने संगीताची एक सुरावट तुमच्यासमोर सादर केलेली असते. तुमच्यापाशी जर तरल कल्पनाशक्ति आणि संवेदनशीलता नसेल तर ती ऐकू येणं कठीण आहे.”
“तुमची पेंटींग मला कां आवडतात? अगदी पहिल्याप्रथम पाहिली तेव्हापासून मला ती आवडत आहेत.” मिसेस स्ट्रोव्ह म्हणाली.

“लाडके, तू आता झोपायला जा. मी याला जरा सोडून येतो.”


Artist: Jean-Baptiste Chadrin
Title: Maid, Date: circa 1791
Medium: oil on canvas,

Source: Wikipadia

Monday, January 29, 2018

मून अँड सिक्सपेन्स – १८

पॅरीसमध्ये रहायला गेल्यावर पहिल्याच आठवड्यात स्ट्रिकलँड आणि माझी भेट झाली.
रू द डॅम मधील एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावरचे एक छोटेसे अपार्टमेंट मला मिळाले होते. जुन्या फर्नीचरच्या दुकानातून शंभर एक फ्रँकला आवश्यक ते फर्नीचर घेऊन घर सजवले. कन्सर्जला सांगून मी घराची साफसफाई आणि सकाळच्या कॉफीची व्यवस्था करून घेतली. तेथून मी सरळ डर्क स्ट्रोव्ह या माझ्या जुन्या मित्राला भेटायला गेलो.
डर्क स्ट्रोव्ह डच होता. त्याला पाहून एक तर हसू तरी फुटतं किंवा ही वल्ली इथे कुठे उपटली असं वाटून त्याची अडचण तरी वाटायला लागते. देवाने त्याला विदुषकाचं रूप देऊन पाठवलं होतं. तो चित्रकार होता पण अगदी टुकार. आमची पहिली भेट रोममध्ये झाली होती. त्यावेळी तो काढायचा ती चित्र मला अजूनही आठवतायत. जगातल्या सगळ्या फालतू गोष्टीत त्याला अमाप उत्साह असायचा. त्याचं कलाप्रेम अशावेळी उतू जायचं. बर्नीनी आणि पिआझा दी स्पाग्ना येथील मूळ चित्रांच्या भव्यतेने, अतुलनीय सौंदर्याने बिलकूल दबून न जाता, त्या चित्रकारांचं सामर्थ्य आपली कुवत काय यांचा कसलाही विचार न करता तो बिनदिक्कत त्यांच्या नकला करायला घ्यायचा. त्याच्या स्टुडियोमध्ये त्याने रंगवलेले कॅनव्हास टांगलेले होते. मोठ्या डोळ्यांचे, मोठ्या हॅट घातलेले मुच्छड शेतकरी, फाटके कपडे घातलेली केविलवाणी दिसणारी गरीब अनाथ मुलं, चर्चच्या पायर्यांवर बसलेल्या किंवा सायप्रसच्या झाडांमागे लपलेल्या रंगीबेरंगी पेटीकोट घातलेल्या स्त्रिया. रेखाटन अचूक, रंगसंगती हुबेहुब. फोटोग्राफ आणि पेंटींग यातील फरक कळणार नाही, बटबटीत वाटावं इतकं काटेकोर. व्हिला मेडिसी मधील इतर चित्रकारांनी त्याला ‘ल मैत्र द ला बोएत अ शकुला’ मास्टर ऑफ चॉकलेट बॉक्स असं नाव ठेवलं होतं. त्याची चित्रं पाहिल्यावर क्लॉड मॉने, एदुआर मॅने वगैरे इंप्रेशनीस्ट चित्रकार होऊन गेले आहेत की नाही याची शंका यावी.
“मी फार मोठा चित्रकार आहे असा उगाच आव आणत नाही.” तो म्हणायचा. “मी काही मायकेल अँजेलो नाही म्हणून माझ्यात काही नाही असं नाही. माझ्यात काही तरी आहे म्हणून लोक माझी चित्रं विकत घेतात. त्यांना त्याच्यापासून आनंद मिळतो. माझ्या ग्राहकात सगळ्या प्रकारचे लोक आहेत. फक्त माझ्या देशात हॉलंडमध्येच आहेत असं नाही तर नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क सगळ्या देशात आहेत. माझ्या गिर्हाइकांत व्यापारी वर्ग जास्त आहे. या देशात हिवाळ्यात थंडी किती कडक असते आणि दिवसा किती अंधारलेलं असतं ते तुम्हाला सांगायला नको. माझ्या चित्रात मी इथला इटलीतला निसर्ग रंगवतो. हा निसर्ग त्यांना आवडतो कारण त्यांच्या देशात त्यांना तो सहसा बघायला मिळत नाही, तो ते माझ्या पेंटींगमधून बघत असतात.”
डर्क स्ट्रोव्ह आपल्या भूमिकेला शेवटपर्यंत तसाच चिकटून राहिला. आजूबाजूच्या क्रूर वास्तवाकडे त्याने कधीच लक्ष दिलं नाही. त्याच्या लेखी इटली म्हणजे स्वप्नील प्रेमकथा आणि ऐतिहासिक अवशेषांचा देश होता. आपल्या चित्रांतून त्याने आदर्शवत वाटतील असेच विषय हाताळले. तो एक गरीब बिचारा विक्रीसाठी म्हणून चित्र काढणारा, सामान्य कुवतीचा चित्रकार होता. कसंही असलं तरी ते त्याचं प्रामाणिक ध्येय होतं. त्याच्या निष्पाप, प्रेमळ आणि गंमतीदार स्वभावामुळे तो हवा हवासा वाटत असे.
इतरांच्या दृष्टीने डर्क स्ट्रोव्ह हा उपहास आणि टिंगल टवाळीचा विषय होता. पण मला तसं वाटत नसे. त्याचे सहकारी त्याच्या चित्रांची टिंगल करत. पण त्याची चित्रं कशी का असेनात त्यांचे त्याला बर्यापेकी पैसे मिळत. त्याची टिंगल करणारे हे मित्र त्याच्या पैशांवर चैन करायला मात्र बिनदिक्कत पुढे येत. तो उदार स्वभावाचा होता. त्याला निर्लज्जपणे हसणारे त्याचे मित्र त्याच्याकडे पैसे मागताना मात्र अतिशय उद्धटपणाने वागत. तो खूप भावनाप्रधान होता. तो कोणतीही गोष्ट चटकन मनाला लाऊन घेई. पण त्याच्या स्वभावात असं काही तरी विचित्र होतं की त्याच्याकडून फायदा झाला तरी त्याची जाणीव ठेवावी असं कोणाला वाटत नसे. त्याच्याकडून पैसे उकळणं हे एखाद्या लहान मुलाकडून पैसे चोरण्याइतकं सोपं होतं. पण त्याच्या मूर्खपणाचा राग येई. एखादी श्रीमंत बाई आपली दागदागिन्यांनी भरलेली व्हॅनिटी बॅग कॅबमध्ये विसरून गेलेली पाहून जसा आपल्या कलेचा अभिमान असणार्या अट्टल चोराला जसा राग येईल तसं त्याला लुटणार्या मित्रांना त्याच्याकडे पैसे मागताना वाटत असे. देवाने त्याला बुद्धी दिली नव्हती पण त्याला संवेदनाशीलता द्यायला मात्र तो विसरला नव्हता. मित्रांच्या चेष्टा मस्करीमुळे त्याला मानसिक व शारीरिक दृष्ट्या खूप त्रास होई. त्याचे मित्र त्याला छळण्यासाठी नाना युक्त्या-प्रयुक्त्या रचत. आणि हे सारखं चालू असे. यात त्याची नेहमी फजिती उडून त्याचा अपमान होई. तरीही त्याची चेष्टा करणार्यांवर त्याने कधीही डूख धरला नाही. हा त्याचा अति चांगुलपणा. साप चावला तरी त्या अनुभवाने तो कधी शहाणा झाला नाही. उलट बरं वाटल्यावर त्याने त्या सापाला उचलून मांडीवर घेतलं असेल. पोट दुखेपर्यंत हसवणार्या फार्सिकल नाटकासारखं त्याचं आयुष्य म्हणजे एक शोकांतिका होती. मी मात्र त्याला कधी हसायचो नाही. त्याबद्दल तो माझा आभारी असायचा. मी त्याच्या गोष्टी सहानुभूतीने ऐकायचो. त्यामुळे त्याला कोणी कसा त्रास दिला याच्या साद्यंत कथा तो मला ऐकवायचा. त्या एवढ्या विचीत्र असायच्या की त्याची कींव यायची. पण जेवढी कींव जास्त तेवढं हसूही जास्त यायचं.
  तो चित्रकार म्हणून कितीही सामान्य असला तरी त्याची कलेची अभिरूची मात्र अतिशय उच्च दर्जाची होती. त्याच्या बरोबर आर्ट गॅलेरींना भेट देणं हा एक संपन्न अनुभव असे. प्रदर्शनाला जाताना त्याचा उत्साह उतू जायचा. त्याची चित्रांची पारख अचूक असे. तो धर्माने कॅथॉलिक होता. ओल्ड मास्टर्सचं महत्व तो जाणून होता आणि आधुनिक कलेबद्दल त्याला सहानुभूती होती. तो चांगला गुणग्राहक होता. एखाद्या कलाकृतीत जर काही स्फुल्लिंग असेल तर त्याला ते ताबडतोब ओळखता येई. तो स्तुती करताना हात आखडता घेत नसे. एवढी अचूक पारख असलेला दुसरा कोणी मला आजतागायत भेटलेला नाही. इतर चित्रकारांच्या तुलनेत तो जास्त सुशिक्षित होता. बहुतेक कलाकारांना आपली कलाशाखा सोडली तर इतर कलाशाखांमधलं काहीही माहित नसतं. त्याचं तसं नव्हतं. साहित्य आणि संगीतातील रूचीमुळे त्याच्या चित्रकलेच्या आकलनात एक वेगळीच खोली होती. माझ्यासारख्या नवशिक्या तरूणाला तर त्याचा सल्ला आणि मार्गदर्शन अतिशय मोलाचं होतं.
मी रोम सोडल्यानंतरही त्याच्या संपर्कात होतो. दोन एक महिन्यातून त्याचं मोडक्या-तोडक्या इंग्लीशमधून लिहीलेलं लांबलचक पत्र मला येई. त्याचं पत्र वाचताना उत्साहाने फसफसत, हातवारे करत बोलणारी त्याची छबी नजरेसमोर यायची. मी पॅरीसमध्ये यायच्या अगोदर त्याचं लग्न झालं होतं. त्याने मोंमार्त्रमध्ये स्टुडियो थाटला होता. मी गेल्या चार वर्षात त्याला भेटलो नव्हतो. त्याच्या बायकोला मी यापूर्वी कधी पाहिले नव्हते.

मून अँड सिक्सपेन्स – १७

मध्यंतरी पाच एक वर्ष गेली. त्या दरम्यान मी काही काळासाठी पॅरीसमध्ये स्थाईक होण्याचा निर्णय घेतला होता. लंडनमध्ये राहून माझ्या कारकीर्दीची वाढ खुंटली होती. दररोज उठून त्याच त्या गोष्टी करत रहाण्याचा मला कंटाळा आला होता. माझे मित्रसुद्धा माझ्यासारखेच निष्क्रिय आयुष्य कंठत होते. त्यांच्यापासून नवीन शिकावं असं काही राहिलं नव्हतं. आमची भेट होई तेव्हा ते काय बोलणार आहेत याचा अंदाच मी आधीपासूनच करू शकत असे. त्यांच्या प्रेमप्रकरणातसुद्धा तोच तोचपणा भरलेला असायचा. आमची अवस्था एका टर्मीनसपासून दुसर्या टर्मीनसपर्यंत फेर्या मारणार्या ट्रॅमकारसारखी झाली होती. एका फेरीत किती प्रवासी चढउतार करतील ते सुद्धा सवयीने अचूक सांगता यायचं. आयुष्य अगदी शिस्तीत आणि आरामात चाललं होतं. मला अचानक झटका आला. मी माझं छोटं अपार्टमेंट सोडून दिलं. किडूक मिडूक जे सामान होतं ते फुंकून टाकलं आणि पॅरीसमध्ये जाऊन आयुष्याला नव्याने सुरवात करण्याचा निश्चय केला.
निघण्यापूर्वी मी मिसेस स्ट्रिकलँडला जाऊन भेटलो. मी गेल्या कित्येक दिवसात तिला भेटलो नव्हतो. तिच्यात बराच बदल झालेला दिसला. तिचं वय तर वाढलेलंच होतं, पण ती बारीकही झाली होती. मला वाटलं तिच्या स्वभावातही बदल झाला असावा. तिचा व्यवसाय उत्तम चालला होता. तिने चॅन्सेलरी लेनमध्ये एक ऑफिस घेतलं होतं. टायपिंगचं काम स्वत: करण्याऐवजी तिने चार मुलींना नेमलं होतं. त्याच्या दुरूस्ती करण्यात तिचा बराच वेळ जात असे. नीटनेटकेपणा तिच्या अंगातच होता. निळ्या आणि लाल शाईचा वापर करून ती चुका दुरूस्त करून घ्यायची. अंतिम मसुदा ती चांगल्या कागदावर टाईप करून बाईंडिंग करून देत असे. नीटनेटकेपणा आणि अचूकपणासाठी तिचं नाव झालं होतं. तिला पैसासुद्धा बर्यापैकी मिळत असावा. जगण्यासाठी काम करून पैसे कमावावे लागणं हे प्रतिष्ठितपणाचं लक्षण नाही असं, का कोण जाणे तिला अजूनही वाटत असे. आपण उच्चकुलीन आहोत हे तिला अप्रत्यक्षरित्या सुचवायचं असावं. आपला सामाजिक दर्जा अजूनही घसरलेला नाही हे दाखवण्यासाठी ती आपल्या बोलण्यात अधून मधून मोठ्या प्रतिष्ठीत लोकांची नावं मोठ्या खुबीने पेरत असे. स्वत:च्या पायावर उभं रहाण्यातील धडाडी आणि व्यावसायिक कौशल्य या गुणांचा कोणालाही अभिमान वाटला असता पण तिला  मात्र या गुणांची लाजच वाटत असावी असं तिच्या बोलण्यातून नकळत ध्वनीत होई. त्यापेक्षा साऊथ केनींग्स्टनमध्ये राहाणार्या के.सी. कडे आज रात्री आपल्याला जेवायला जायचं आहे याचा तिला जास्त आनंद वाटत असे. आपला मुलगा केंब्रिजला शिकत आहे हे सांगताना ती खूष होई. आपल्या मुलीला नृत्याचं आमंत्रण द्यायला मुलांची रांग लागते हे सांगताना ती लाजेने किंचीत चूर होई. मी तिला मूर्खासारखं विचारलं:
“तुमची मुलगी तुमच्या व्यवसायात येणार आहे का?”
“मुळीच नाही. तिला हवं असलं तरी मी तिला ते करू देणार नाही.” मिसेस स्ट्रिकलँडने उत्तर दिलं. “ती एवढी सुंदर आहे की तिला चांगल्या गर्भश्रीमंत घरातला नवरा मिळण्यात मुळीच अडचण येणार नाही.”
“मला वाटलं तुम्ही एकट्याने एवढी दगदग करता. तिची तुम्हाला मदत होईल.”
“ती सुंदर आणि आकर्षक असल्यामुळे तिने नाटकात काम करावं असं बर्याच लोकांनी तिला सुचवलं. पण मी मात्र त्याला कधीच मान्यता देणार नाही. बहुतेक मोठे नाटककार माझ्या चांगले परीचयाचे आहेत. तिला एखादी भूमिका करायची असेल तर उद्याही मिळू शकेल. अगदी प्रमुख भूमिकासुद्धा. पण त्या तसल्या लोकांत मी तिला मिसळू देणार नाही.”
तिच्या मोठेपणाच्या कल्पनेने माझ्या अंगावर काटा आला.
“तुमच्या पतीराजांची काही खबरबात?”
“त्यानंतर मला एक शब्दसुद्धा कळलेला नाही. कोणास ठाऊक त्यांचं कसं चालंलय. काही बरंवाईट झालं असलं तरी मला कळायला काही मार्ग आहे का?”
“मी आता पॅरीसला रहायला जातोय. त्यांच्याशी कधी गाठ पडलीच तर मी तुमच्याबद्दल त्यांना काय सांगू.”
तिने मिनीटभर विचार केला.
“त्यांना जर खरंच काही हवं असेल तर मी मदत करायला तयार आहे. मी तुम्हाला पैसे पाठवीन. त्यातले त्यांना लागतील तसे थोडे थोडे द्या.”
“असं केलंत तर तुमची त्यांच्यावर मोठी मेहरबानी होईल.”

नवर्याविषयी वाटणार्या अनुकंपेने तिने हे पैसे देऊ केले नव्हते हे मला माहित होतं. आयुष्यात भोगलेल्या दु:खामुळे माणसाच्या स्वभावात उमदेपणा येतो हे काही तितकंसं खरं नसतं. कदाचित सौख्यामुळे एक वेळ उमदेपणा येऊ शकेल, पण दु:खामुळे बहुतेक वेळा माणसातील क्षुद्र वृत्ती आणि खुनशीपणा वाढीला लागतो.

मून अँड सिक्सपेन्स – १६

त्यानंतर लवकरच मिसेस स्ट्रिकलँडने आपण ताठ कण्याची स्त्री आहोत हे दाखवून दिलं. तिने आपलं दु:ख स्वत:जवळच ठेवलं. तीच ती कर्मकहाणी ऐकून लोकांना कंटाळा येतो हे तिने ओळखलं होतं. ती जेव्हा बाहेर जात असे तेव्हा तिच्या दुर्दैवाची दया येऊन तिच्या मैत्रीणी तिची चांगली विचारपूस करत. पण ती स्वत:चा आब राखून असायची. ती मोठ्या धीराची बाई होती. ती आपल्या दु:खाचा फार दिवस बाऊ करत बसली नाही. तिचं वागणं कोणाच्या नजरेत येत नसे. ती आनंदी असायची पण तिला निर्लज्ज म्हणता आलं नसतं. स्वत:चं दु:ख उगाळत बसण्याऐवजी ती इतरांच्या सुख-दु:खात सहभागी होई. स्वत:च्या नवर्याचा उल्लेख करायची कुठे वेळ आली तर ती त्याच्याबद्दल सहानुभूतीने बोलत असे. तिच्या या वर्तनामुळे मी कोड्यात पडलो. एके दिवशी तीच मला आपण होऊन म्हणाली:
“चार्ल्स पॅरीसला एकटेच आहेत असा तुमचा जो ग्रह झालाय तो साफ चुकीचा आहे याची मला खात्री पटलीय, माझ्या ओळखीच्या माणसांकडून ... मी तुम्हाला त्यांची नावं सांगणार नाही ... मला माहिती मिळाली आहे की इंग्लंडमधून जाताना ते एकटे नव्हते.”
“हे फारच थोर आहे. कोणत्याही खाणाखूणा मागे न ठेवता पळून जाण्याएवढी हुशारी होती म्हणायची त्यांच्याकडे.”
तिने रागाने मान फिरवली.
“मला एवढंच म्हणायचं होतं की कोणी म्हटलं की ते पळून गेले आहेत तर त्यांचं म्हणणं खोडून काढाण्याच्या फंदात पडू नका.”
“त्याची काही काळजी करू नका.”
तिने विषय बदलला. जणू तिच्या लेखी त्याला काही महत्व नव्हतं. तिच्या मित्रमंडळींकडून एक नवीनच अफवा माझ्या कानी आली. त्यांच्याकडून असं ऐकायला मिळालं की चार्ल्स स्ट्रिकलँड एकदा एम्पायरमध्ये बॅले बघायला गेला असताना एका फ्रेंच नर्तिकेच्या प्रथमदर्शनी प्रेमात पडला आणि सरळ तिचा हात धरून पॅरीसला पळून गेला. या गोष्टीचा उगम कसा आणि कुठे झाला ते काही मला कधी कळलं नाही. पण यामुळे मिसेस स्ट्रिकलँडच्या प्रतिष्ठेला फारसा धक्का न पोचता उलट तिला मिळणार्या सहानुभूतीचा ओघ वाढला. तिने विचारपूर्वक ठरवलेल्या योजनेचा हा एक भाग असावा. कर्नल मॅक-अँड्रयु जे म्हणत होते की तिच्याकडे एक कपर्दिकही नाही त्यात मात्र अतिशोयक्तीचा भाग मुळीच नव्हता. तिला लवकरात लवकर स्वत:च्या पायांवर उभं रहाणं भाग होतं. बरेचसे लेखक तिच्या ओळखीचे होते आणि तिने या गोष्टीचा फायदा घ्यायचं ठरवलं. मुळीच वेळ फुकट न घालवता तिने टायपिंग आणि शॉर्टहँड शिकून घेतलं. ती सुशिक्षित असल्याने तिने त्यात चांगली प्रगती केली. काम मिळवताना तिने लोकांच्या सहानुभूतीचा चांगलाच उपयोग करून घेतला. तिच्या मित्रांनी तिला काम द्यायला आणि इतरांकडे तिच्या नावाची शिफारस करायला सुरवात केली.

मॅक-अँड्रयुना मूल नव्हतं. प्राप्त परीस्थितीत त्यांनी मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी स्वत:च्या अंगावर घेतली. मिसेस स्ट्रिकलँड स्वत:च्या पोटापुरतं कमवू लागली. तिने तिचा मोठा फ्लॅट आणि फर्निचर विकलं आणि ती वेस्टमिन्सटरमध्ये दोन छोट्या खोल्या घेऊन राहू लागली. ती एवढी हुशार होती की लवकरच तिचा जम बसून ती यशस्वी होईल याची मला खात्री होती.

Saturday, January 27, 2018

मून अँड सिक्सपेन्स – १५

मी लंडनला जाऊन पोचतो न पोचतो तोच एक तातडीची सूचना माझी वाट पहात होती. मिसेस स्ट्रिकलँडने जेवण झाल्यावर ताबडतोब मला त्यांच्या घरी बोलावलं होतं. तिच्याकडे कर्नल मॅक-अँड्रयु आपल्या पत्नीला घेऊन आला होता. मिसेस स्ट्रिकलँडची बहीण तिच्यापेक्षा वयाने थोडी मोठी होती, दिसायला साधारणत: तिच्यासारखीच पण थोडीशी निस्तेज, चेहेर्यावर सगळं ब्रिटीश साम्राज्य आपल्या खिशात आहे असा आविर्भाव. बहुतेक वरिष्ठ अधिकार्यांच्या बायकांना आपण आकाशातून पडलो आहोत असं वाटत असते. तिच्या शिष्टाचारांवरून आणि बोलण्यातील ढंगावरून तिचे उच्चकुलीन संस्कार आणि सैनिकी पेशावरचं प्रेम लपून रहात नव्हतं. पण तिने घातलेला गाऊन किंमती असला तरी याप्रसंगी तो गबाळ्यासारखा वाटत होता.
मिसेस स्ट्रिकलँड अस्वस्थ दिसत होती.
“तुम्ही काय बातमी आणली आहेत ती मला पहिल्यांदा सांगा.”
“मी तुमच्या पतीराजांना भेटलो. मला वाटतं परत यायचं नाही हा त्यांचा निर्धार पक्का आहे.” मी थोडं थांबून पुढे बोललो. “त्यांची चित्रकार होण्याची इच्छा आहे.”
“तुम्हाला काय म्हणायचंय?” मिसेस स्ट्रिकलँड आश्चर्याने किंचाळली. तिचा विश्वास बसत नव्हता.
“त्यांना अशा गोष्टीत रस आहे याची तुम्हाला पूर्वी कल्पना नव्हती का?”
“तो वेडपट असल्याशिवाय असं म्हणणार नाही.” कर्नल ओरडला.
मिसेस स्ट्रिकलँडच्या कपाळावर आठ्या पडल्या. ती काही तरी आठवण्याचा प्रयत्न करत होती.
“आता मला आठवतंय. आमच्या लग्नाच्यापूर्वी ते रंगपेटी घेऊन काहीतरी करायचे. पण ती रिकामपणाची कामगिरी म्हणतात ना तसलं काही तरी होतं. कसेतरी रंग फासलेले असायचे. त्यावरून आम्ही त्यांच्या खूप फिरक्या घ्यायचो. कला वगैरे असल्या गोष्टीत त्यांना मुळीच गती नव्हती.”
“मला चित्रकार व्हायचंय म्हणे. काही तरी सांगायचं म्हणून त्यांनी ठोकून दिलं असेल.”
मिसेस स्ट्रिकलँड बराच वेळ विचार करत होती. मी तिला जे सांगितलं ते तिच्या मनाला पटत नव्हतं. तिच्यावर कोसळलेल्या आपत्तीनंतर मी पहिल्यांदा तिच्या घरी गेलो तेव्हा घरात जो अस्ताव्यस्तपणा दिसत होता तो जाऊन सगळ्या वस्तू जागच्या जागी लावलेल्या होत्या. तिच्यातील गृहिणीने तिच्या दु:खावर मात केलेली दिसत होती. मी स्ट्रिकलँडला पॅरीसमध्ये नुकताच भेटलो होतो. तिथे तो कोणत्या परीस्थितीत रहात होता त्याची कल्पना येथे लंडनमधल्या त्याच्या घरी बसून येणं शक्य नव्हतं. तसेच त्याच्या व्यक्तिमत्वातील, स्वभावातील परस्परविरोधही येथे बसून लक्षात आले नसते.
“त्यांना जर चित्रकारच व्हायचं होतं तर तसं त्यांनी आम्हाला कधीच का सांगितलं नाही?” मिसेस स्ट्रिकलँडने विचारलं. “तशा प्रकारची महत्वाकांक्षा असती तर मी तरी त्याला विरोध केला नसता.”
मिसेस अँड्रयुने तिचे ओठ घट्ट आवळून धरले होते. मला वाटतं तिला तिच्या बहिणीचा कलाकारांकडे बघण्याचा सहानुभूतीचा दृष्टीकोन आवडत नसावा. तिच्या मते कलाकार असणं हा चेष्टेचा विषय असतो.
मिसेस स्ट्रिकलँड पुढे म्हणाली:
“जर यांना चित्रकलेत थोडी जरी गती असती तर मीच त्यांना उत्तेजन दिलं नसतं का? त्यासाठी काहीही त्याग करायला माझी तयारी होती. शेअर ब्रोकरची पत्नी म्हणवून घेण्यापेक्षा एका चित्रकाराची पत्नी म्हणवून घ्यायला मला जास्त अभिमान वाटला असता. जर मुलांची जबाबदारी नसती तर कोणत्याही तडजोडी करायला माझी हरकत नसती. या फ्लॅटमध्ये मी जेवढी सुखी आहे तेवढ्याच सुखात मी चेल्सीमधल्या एखाद्या लहानशा स्टुडियोत राहून संसार केला असता.”
“बहिणाबाई, तुझ्या इतका संयम माझ्याकडे नाही,” मिसेस अँड्रयु म्हणाली. “म्हणे मला चित्रकार व्हायचंय. या सगळ्या थापांवर तुझा विश्वास बसलाय की काय.?”
“मला वाटतं की ते सगळं खरं असावं,” मी पुटपुटलो.
मी एखादा विनोद केला असावा अशा नजरेने तिने माझ्याकडे पाहिलं.
“कोणताही पुरूष एखाद्या स्त्रीच्या प्रेमात पडल्याशिवाय वयाच्या चाळीसाव्या वर्षी नोकरी, धंदा, घरदार, बायको, मुलं यांना सोडून चित्रकार व्हायला जाणार नाही. मला वाटतं तुझ्या एखाद्या कलाकार मैत्रीणीने त्याच्या डोक्यात काहीतरी भरवून दिलं असेल आणि झाले असतील हे घोड्यावर स्वार.”
मिसेस स्ट्रिकलँडचे गाल मत्सराग्नीने लाल झाले होते.
“ती दिसायला कशी आहे?”
मी क्षणभर थांबलो. मला माहित होतं की मी जे सांगणार होतो त्याने बॉम्बगोळा फुटणार होता.
“त्यांच्या बरोबर कोणतीही स्त्री होती असं मला तरी आढळलं नाही.”
मी जे सांगितलं त्याच्यावर मॅक अँड्रयु पति-पत्नीचा मुळीच विश्वास बसला नाही. मिसेस स्ट्रिकलँड उठून उभी राहिली.
“तुम्हाला असं म्हणायचंय का की ती बया तुम्हाला त्यांच्या बरोबर दिसली नाही.”
“तेथे कोणीही नव्हतं. ते एकटेच रहातात.”
“माझा यावर विश्वास बसत नाही.” मिसेस मॅक-अँड्रयु जवळपास ओरडल्याच.
“मला स्वत:लाच जायला हवं होतं. मी पैजेवर सांगतो. मी असतो तर तिला पाताळातूनही शोधून काढलं असतं.” कर्नल म्हणाला.
“तुम्हीच गेला असता तर फार बरं झालं असतं.” मी त्याला झोंबावं म्हणून बोललो. “तुमची सगळी गृहीतकं चुकलेली आहेत. ते कोणत्याही महागड्या हॉटेलात रहात नसून ते दरिद्री वस्तीतीतल एका लहानशा हॉटेलमध्ये अगदी भिकार्ड्यासारखे रहात आहेत. ते पॅरीसला जाऊन मौज मजा करत आहेत असं वाटत नाही. बहुधा त्यांच्या जवळ फारसे पैसेसुद्धा नसावेत.”
“यामागे आपल्याला माहित नाही असं एखादं कारण असेल असं तुम्हाला वाटतं का? उदाहरणार्थ पोलिसांचा ससेमिरा चुकवायला तर ते पॅरीसला जाऊन लपले नसतील?”
या कल्पनेने सगळ्यांच्या मनात एक आशेचा किरण लुकलुकला. पण मी त्यात नव्हतो.
“पण तसं असतं तर त्यांनी त्यांच्या भागीदाराला आपला पत्ता दिला नसता.” मी कडवटपणे म्हणालो. “ते काहीही असलं तरी मला एका गोष्टीची खात्री आहे ती म्हणजे ते कोणाचाही हात धरून पळून गेलेले नाहीत. तसेच ते कोणाच्याही प्रेमात पडले नसावेत. त्यांच्या बोलण्यावरून तरी तसं जाणवत नव्हतं.”
माझ्या बोलण्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्याआधी सर्वजण थोडा वेळ थांबले.
“तुम्ही म्हणता ते खरं असेल तर मला वाटत होतं तेवढं हे प्रकरण सुधारण्याच्या पलीकडे गेलं आहे असं काही म्हणता येणार नाही.” मिसेस अँड्रयु म्हणाली.
मिसेस स्ट्रिकलँडने आपल्या बहिणीकडे पाहिलं पण ती काहीच बोलली नाही. ती पांढरी फटक पडली होती. डोळ्यांखाली काळी वर्तूळ आली होती. तिच्या चेहर्यावरचे भाव मला वाचता आले नाहीत. मिसेस अँड्रयु पुढे म्हणाली:
“काही नाही, त्यांना फक्त एक झटका आला असेल. एक ना एक दिवस येईल डोकं ताळ्यावर.”
“ऍमी तू स्वत:च का जात नाहीस.” कर्नलने सुचना केली. पॅरीसमध्ये तुला एखादं वर्ष रहायला काय हरकत आहे. मुलांचा सांभाळ आम्ही करू. तो कंटाळेल आणि आज ना उद्या लंडनला यायला तयार होईल. तुझ्या पॅरीसला जाण्याने फारसं काही नुकसान होणार नाही झाला तर फायदाच होईल.”
“तसं करणं बरोबर होणार नाही.” मिसेस अँड्रयु म्हणाली. “त्यांना हवं ते सगळं मनासारखं करूं दे. एक दिवस ते स्वत:च कंटाळतील. मग बघा कसे कुत्र्यासारखे कुल्ल्यात शेपटी घालून झक्कत घरी परत येतील ते.” तिने तिच्या बहिणीकडे थंड नजरेने पाहिलं. “संसार करताना तू फारशी हुशारी दाखवली नाहीस. सगळे पुरूष मूर्ख असतात. फक्त त्यांना कसं हाताळायचं ते ठाऊक असलं की झालं.”
मिसेस अँड्रयुने सर्व स्त्री जातीचं लाडकं मत मांडलं. पुरूष आपल्या प्रिय स्त्रीला सोडून जाताना नेहमीच रानटीपणाने वागतात. पण या बाबतीत दोष द्यायचा तर तो स्त्रियांनाच द्यावा लागेल. प्रेमाला काही कारण नसतं हेच कारण प्रेमामागे असतं.
मिसेस स्ट्रिकलँडने एक एक कडून सगळ्यांकडे पाहिलं.
“ते कधीच परत येणार नाहीत.”
“आता आपण काय ऐकलं ते नीट लक्षात घे. त्यांना इथल्या आरामशीर जीवनाची सवय झाली आहे. सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी विनासायास मिळत होत्या, सभोवती काळजी घेणारी माणसं उभी होती. त्या तसल्या दळीद्री हॉटेलमध्ये ते किती दिवस काढतील? शिवाय त्यांच्याकडे पैसेही नाहीत. त्यांना परत यावेच लागेल.” मिसेस अँड्रयु.
“ते जर एखाद्या बाईबरोबर गेले असते तर ते परत येण्याची शक्यता होती. दोन नाही तर तीन महिन्यात ते तिला कंटाळतील. पण जर ते प्रेमात पडल्यामुळे गेले नसतील तर काही खरं नाही.” मिसेस स्ट्रिकलँड.
“अरे बापरे. हा खूपच गुंतागुंतीचा मामला दिसतोय.” कर्नल म्हणाला. ज्या गोष्टी सैनिकीपेशाशी संबंधित नसतील त्या गोष्टींबाबत त्याची नावड त्याच्या बोलण्यातून व्यक्त होत होता. “डोरोथीने सांगितलेलं तुला पटत नाही का? ती म्हणाल्याप्रमाणे तो एक ना एक दिवस परत येईल. तो जे काही करतोय त्याच्या कृत्यांचा घडा भरल्याशिवाय रहाणार नाही.”
“पण मला ते परत यायला नको आहेत.”
“ऍमी!”
मिसेस स्ट्रिकलँडच्या संतापाचा उद्रेक झाला. तिचा चेहेरा पांढरा फटक पडला. भराभर बोलल्याने तिला श्वास लागला होता.
“ते जर कोणा स्त्रीच्या प्रेमात पडून असते आणि तिचा हात धरून पळून गेले असते तर एक वेळ मी त्यांना माफ केलं असतं. संसाराच्या अर्ध्यावर पुरूषांचं दुसर्या स्त्रीच्या प्रेमात पडून भरकटणं स्वाभाविक आहे असं मी समजले असते. त्यासाठी मी त्यांना फारसा दोषही लावला नसता. म्हटलं असतं की नवरा थोडा भरकटत गेलाय. पुरूष या बाबतीत अगदी दुबळे असतात. उलट स्त्रिया मात्र पक्कया बनेल असतात. हा स्त्री आणि पुरूषातील महत्वाचा फरक असतो. पण हे प्रकरण वेगळंच दिसतंय आणि त्याचीच मला प्रचंड चीड येतेय. आता मात्र मी त्यांना कधीही माफ करायचं नाही असं ठरवलंय.”
कर्नल आणि त्याची पत्नी तिची समजूत घालत होते. तिच्या बोलण्याने त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. तिची मनस्थिती ठीक नसावी अशी त्यांना शंका आली. काय बोलावं त्यांना काही समजेना.
“मी काय म्हणतेय ते तुम्हाला कळतंय ना?” मिसेस स्ट्रिकलँड स्फुंदत स्फुंदत मला म्हणाली.
“सांगता येणं कठीण आहे. नवरा एखाद्या स्त्रीच्या मागे लागला तर एक वेळ पत्करलं पण तो एखाद्या ध्येयाच्या वगैरे नादी लागला तर बघायला नको. बाईची भानगड परवडते, तिच्या झिंज्या तरी उपटता येतात पण या ध्येय वगैरे भानगडींचं आपण काय वाकडं करू शकतो असंच ना?”
मिसेस स्ट्रिकलँडने ज्या नजरेने माझ्याकडे बघत होती ती मैत्रीची होती असं म्हणता येणार नाही. पण तिने माझ्या प्रश्नाला उत्तर दिलं नाही. कदाचित मी तिच्या वर्मावर बोट ठेवलं असावं. ती खालच्या आवाजात थरथरत बोलत होती.
“त्यांचा मला प्रचंड तिटकारा वाटतोय. आयुष्यात कोणाचाही एवढा तिरस्कार करण्याचा प्रसंग माझ्यावर येईल असं मला कधी वाटलं नव्हतं. तुम्हाला माहित नसेल, हे प्रकरण कितीही लांबत गेलं तरीही शेवटी त्यांच्या हृदयात मीच असेन असं वाटून इतके दिवस मी माझं समाधान करून घेत होते. मला वाटायचं आयुष्याची अखेर जवळ आल्यावर जरी त्यांना माझी आठवण झाली तरी मी त्यांच्याकडे एका पायावर गेले असते. एखाद्या आईने करावा तसा मी त्यांचा सांभाळ केला आहे. काहीही झालं तरी माझं त्यांच्यावरचं प्रेम कायम आहे आणि शेवटपर्यंत ते तसंच राहील हे मी त्यांना पत्रात लिहून कळवलं होतं. मी त्यांना मनाने कधीच माफ केलं होतं.”
आपली प्रिय व्यक्ति मृत्युशैयेवर शेवटचा श्वास घेत असताना स्त्रियांना चांगलं वागण्याचं नेहमीच भरतं येतं. अशा वेळी माझी थोडी फसगत होते. आयुष्याची दोरी थोडी लांबल्यामुळे अशी संधी जर हुकली तर त्यांना चुकल्यासारखं वाटेल.
“पण आता सगळं संपल्यात जमा आहे. माझ्या लेखी ते आता एखाद्या परक्या इसमासारखे आहेत. निष्कांचन अवस्थेत, उपाशी पोटी तडफडून, एकाकी अवस्थेत, एखाद्या महाभयंकर रोगाने सडून त्यांना मरण आलं तर किती बरं होईल असं आता मला वाटायला लागलंय.”
यावर स्ट्रिकलँडने जे सुचवलं होतं ते तिला सांगणं योग्य होईल असं मला वाटलं.
“जर तुम्हाला घटस्फोट घ्यायचा असेल तर त्याला त्यांची हरकत नाही. त्यासाठी जे आवश्यक असेल ते सर्व करायला ते तयार आहेत.”
“मी त्यांना का म्हणून मोकळं सोडू?”
“त्यांना स्वत: होऊन घटस्फोट हवा आहे असं नाही. उलट घटस्फोट घेणं तुम्हाला सोईस्कर असेल असं त्यांना वाटतंय.”
मिसेस स्ट्रिकलँडने मान डोलावली. माझ्या बोलण्याने तिची थोडी निराशाच झाली असावी. त्याकाळी मला माणसं बाहेरून दिसतात तशीच वागतात असं वाटायचं. एरवी सुंदर आणि आनंदी दिसणारी स्त्री सूडभावनेने पेटून उठलेली पाहून माझी निराशा झाली. क्षुद्रता आणि उदात्तता, दुस्वास आणि औदार्य, दुष्टावा आणि प्रेम हे गुण एकाच व्यक्तित एकाच वेळी वास करून असतात हे कळायला मला इतकी वर्ष लागली.
मिसेस स्ट्रिकलँडचा अपमानाने झालेला मनक्षोभ शांत करण्यासाठी काही तरी प्रयत्न करून बघावा असं मला वाटलं.
“हे बघा. तुमच्या पतिराजांना कोणत्यातरी अज्ञात अशा बाह्य शक्तिने झपाटलं आहे. ते त्यांचे राहिलेले नाहीत. ती शक्ति तिचे उद्देश पूर्ण करून घेण्यासाठी त्यांचा वापर करून घेत आहे. ते जे काही करत आहेत त्यासाठी त्यांना जबाबदार धरणं कितपत योग्य ठरेल याची मला शंका आहे. त्या झपाटलेपणाने त्यांची अवस्था कोळ्याच्या जाळ्यात सापडलेल्या माशीसारखी झाली आहे. कोणीतरी त्यांना भारलेलं आहे. या बाबतीत काही विचीत्र गोष्टी माझ्या वाचनात आलेल्या आहेत. त्यात एक व्यक्तिमत्व दुसर्या शरीरात प्रवेश करून त्या शरीरातील मुळच्या व्यक्तिमत्वाला हाकलून लावतं. त्या शरीरातील आत्म्याची घुसमट होते. पूर्वीच्या काळी असा प्रकार झाला असता तर चार्ल्स स्ट्रिकलँडना सैतानाने झपाटलं आहे असं म्हटलं गेलं असतं.”
मिसेस अँड्रयुने तिच्या गाऊनच्या चुण्या झटकून सारख्या केल्या. तसं करताना तिच्या हातातील सोन्याच्या बांगड्या घरंगळून तिच्या मनगटावर आल्या.
“हे खूपच ताणल्यासारखं वाटतंय,” ती फणकार्याने म्हणाली. “ऍमी नवर्याला फारच गृहीत धरून चालत होती. तिने आपल्यापाठी एवढे उपद्व्याप लावून घेतले नसते तर तिला थोडा तरी संशय आलाच असता. आता ऍलेकच्या मनात वर्षभर काहीतरी खदखदत आहे आणि मला त्याची साधी कुणकुणसुद्धा लागली नाही असं कधी तरी होऊ शकेल का?”
कर्नल शून्यात नजर लावून बसला होता आणि मी तो वरून दिसतो तेवढा खरंच भोळा असेल का याचा विचार करत होतो.
“तुम्ही काहीही म्हणा, त्याने चार्ल्स एक हृदयशून्य पशू आहेत हे सत्य बदलत नाही.” मिसेस अँड्रयु माझ्याकडे रोखून पहात होती. “ते आपल्या बायकोला सोडून का गेले ते मी सांगते तुम्हाला. स्वत:चा शुद्ध स्वार्थ. दुसरं काही नाही.”
“असा खुलासा करणं अगदीच सोपं आहे.” मी म्हणालो खरा, पण मला वाटतं याने कसलाही खुलासा होत नव्हता. नुकताच प्रवासातून आल्याने मी खूप थकलो होतो. मी जाण्यासाठी उठलो. मिसेस स्ट्रिकलँडने मला थांबवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही.