Sunday, October 7, 2018

मुलँ रूज - ३३

वसंत ऋतू संपून उन्हाळा सूरू झाला तरी त्या वर्षी रॅचोच्या नशिबात एकही काम नव्हते. सर्व उन्हाळा अगदी फुकट गेला होता. नाही म्हणायला एकदा स्टुडिओतून घरी जाताना त्याला मोंमार्त्रच्या कबरस्तानाच्या फाटकाजवळ एक मुलगी दिसली.
रॅचो त्याची कर्मकहाणी हेन्रीला सांगत होता, ‘‘माझ्या मॅडोनाच्या चित्रासाठी पोज देशील का म्हणून सुरुवात करून मी माझं नेहमीचं भाषण ठोकलं. तोंडावरून ती फारशी हुशार दिसत नव्हती. थोडीशी बहिरी पण असावी असं वाटत होतं. पण स्वभाव मात्र अगदी फुलासारखा कोमल आहे. ती हॉटेलमध्ये कॅशियर आहे. अर्थात तिच्या सांगण्यावर विश्वास ठेवायचा झाला तर. मुली कधी खरं बोलतील आणि कधी थापा मारतील ते तसं कळणं कठीण असतं. मी तिचं एक पोर्ट्रेट केलंय. कॅनव्हासच्या तुकड्यावरचं स्केच म्हण फार तर. मी ते तिला दिलं तेव्हा ती रडायलाच लागली.’’
‘‘छान पोरगी आहे. तू बघच एकदा,’’ रॅचो प्रेमळपणे हसला, ‘‘बेर्थ तिचं नाव.’’
काही क्षण विचारहीन शांततेत गेले. शेवटी आपल्या हाताचे पंजे गुडघ्यांवर ठेवत तो म्हणाला, ‘‘तू काय करायचं ठरवलंयस.’’
‘‘पेंटिंग. दुसरं काय करणार?’’
‘‘तुझं एक बरंय. तुझ्यामागे आमच्यासारखी पोटापाण्याची काळजी नाहीय. तुझ्या मनाला येईल तेव्हा मनाला येईल तशी पेंटिंग तू करू शकतोस. तुला ओग्युस्तिनातली ती पोरगी आठवतेय. तिचा चेहरा तुला पारदर्शी वाटला होता आणि तिच्या मानेवर तुला हिरव्या रंगाची सावली दिसली होती.’’
‘‘सगळं काही स्पष्ट आठवतंय.’’ हेन्री मोठ्या आत्मविश्वासाने बोलत होता, ‘‘आता मला हव्या त्या हिरव्या, निळ्या कसल्याही रंगांच्या प्रायमरी शॅडोज्‌ रंगवता येतील. हौशी चित्रकार असण्याचा हा एक फायदा असतो. कॉर्मेन, सॅलून सबको मारो गोली.’’
‘‘तू आपल्या मनाप्रमाणे काम करायला मोकळा आहेस रे बाबा. आमच्यासारखी पोटाची खळगी कशी भरावी याची काळजी नाही तुला.’’ रॅचोने एक मोठा उसासा टाकला.
संभाषणात अचानक खंड पडला आणि त्याच्या लक्षात आले की आता बोलण्यासारखे काही उरलेच नव्हते. मैत्री पुढे चालू राहायला हरकत नव्हती पण येथून पुढे आयुष्याचे मार्ग भिन्न असणार होते. त्यांना एकत्र बांधून ठेवणारे धागे आता तुटल्यातच जमा होते. उरल्या होत्या फक्त एकत्र घालवलेल्या दिवसांच्या स्मृती. त्या आठवणींची शिदोरी संपल्यावर त्यांना आपण दोन अनोळखी इसम असल्यासारखे वाटू लागले.
‘‘मला आता निघायला पाहिजे.’’ हेन्री कोचावरून उठत म्हणाला, ‘‘तुझा अभ्यास चालू राहू दे. अधनंमधनं असंच भेटत राहू.’’
रॅचो उठून दरवाजापर्यंत आला. दोघांच्याही ओठांवर हसू होते. पण अवघडलेले.
‘‘जाण्यापूर्वी माझी काही अलीकडची पेंटिंग्स बघून जा.’’ एक क्षणभर थांबून रॅचो म्हणाला, ‘‘बाय द वे, तुला ज्युलीबद्दल काही कळलं का?’’
‘‘नाही.’’
‘‘तिने नदीत जीव दिला. तू गेल्यानंतर एका आठवड्याने.’’
‘‘तिचे दफन कुठे केलंय?’’
‘‘कोण जाणे. आपले म्हणावेत असे कोणी नातेवाईक नाहीत, जवळ फुटकी कवडी नाही... आपली कबर मागे ठेवण्यासाठी जवळ पैसे असावे लागतात गाठीला मस्य.’’
शेवटची पायरी येईपर्यंत हेन्रीने स्वतःला कसेबसे आवरून धरले. ती पायरी येताच तो मटकन खाली बसला आणि शांतपणे अश्रू ढाळू लागला.

No comments:

Post a Comment