Monday, October 29, 2018

मुलँ रूज - ८७

हेन्री बिस्ट्रोतून बाहेर आला. अंधारून आले होते. पाऊस थांबला होता. उरलेली रात्र कुठे घालवायची त्याचा निर्णय होत नव्हता. एखादी घोडागाडी करावी. गाडीत बसल्यावर काहीतरी सुचेल या विचाराने हेन्री गाडी शोधत पावलोपावली दम घ्यायला थांबत, लडखडत, काठीवर जोर देत पाय उचलत रस्त्याने चालत होता. वाटेत तो पीएर टँग्वीच्या दुकानासमोर नकळत थांबला. त्याने दुकानाकडे पाहिले. नावाच्या पाटीचा रंग केव्हाच उडाला होता. दरवाजा सताड उघडा होता. आत अंधार होता. काउंटरच्या बाजूची कपाटे अजून तशीच होती. फक्त त्यावर भरपूर धूळ साठली होती. भिंतींचा रंग पार उडाला होता. जेथे पूर्वी सेझान, व्हॅन गॉग वगैरे चित्रकारांची पेंटिंग टांगलेली असायची तेवढी जागा आता पेंटिंग नसल्यामुळे ओकीबोकी दिसत होती. एखाद्या वेताळाचे प्रदर्शन भरले असावे अशी अवकळा त्या जागेला आली होती. सेझान, जॉर्ज सुरा, व्हॅन गॉग, पीएर टँग्वी, त्याची बायको सगळे केव्हाच मृत्यू पावले होते. एकटा हेन्री तिथे भुतासारखा उभा होता.
तसाच पाय ओढत तो रू द मर्टीरपर्यंत आला. पाऊस परत भुरभुरायला सुरुवात झाली. चौकात एकही घोडागाडी नव्हती. आयुष्य अशाच लहानमोठ्या आशा-निराशेच्या अभ्यासातून समजून घ्यायचे असते. थंडीने त्याच्या अंगावर शहारे आले. तो तसाच प्लास पिगालपर्यंत चालत गेला. पाऊस गळतच होता. एवढ्यात त्याला एक चुकार घोडागाडी दिसली. तो चटकन आत शिरला. कुठे जावे? बिचारा व्ह्यू. या पावसात त्याला अजून शोधत असेल. त्या साध्या सरळ मनाच्या तरुणाला असा गुंगारा द्यायला नको होता. त्याला वाईट वाटले. पण दारुड्या माणसाचा दारूच्या व्यसनापायी नाइलाज होतो आणि आयुष्यभर मग त्याला सारखे वाईट वाटत राहते. आईबद्दल, मादाम ल्युबेतबद्दल, व्ह्यूबद्दल आणि नंतर स्वतःबद्दल. ओह. जाऊ दे तेल लावत.
‘‘मुलँ रूज.’’ त्याने गाडीवानाला सांगितले.
‘‘आता या वेळी अजून उघडले नसेल.’’
‘‘अं. मग ल एलीसमध्ये चल.’’
‘‘मस्य या भागात तुम्ही नवखे दिसताय. ल एलीस बंद होऊन कित्येक वर्षं झाली.’’
‘‘अं. मी विसरलोच होतो. मग आपण गेर द नॉरमध्ये जाऊ.’’
घोडागाडी चालू झाली. त्याने खिशातून एक सिगरेट काढली. हातांना थरथर लागली होती. कापणाऱ्या हातांनी त्याला धड काडीसुद्धा ओढता येईना. त्याला वाटले पूर्वीपेक्षा आता थरथर वाढली आहे. कशीबशी एकदाची काडी ओढून त्याने सिगरेट शिलगावली. एक खोल झुरका घेतला. अर्ध्या रस्त्यावर बेत बदलून गाडी ल नुव्हेलकडे घ्यायला सांगितली. गाडी परत मागे वळून प्लास पिगालवरील ल नुव्हेलच्या रस्त्याला लागली. पावसाने भिजलेल्या रस्त्यावर घोड्याच्या खुरांचा पचक पचक आवाज येत होता.
गाडी ल नुव्हेलसमोर येऊन उभी राहिली. पण हेन्रीला खाली उतरावेसे वाटेना. आत जाऊन करणार काय? एक वयस्कर गृहस्थ शांतपणे पेपर वाचत बसला होता. चित्रकलेच्या विद्यार्थ्यांचा गोंगाट चालू होता. क्वार्दुरॉयचे जाकीट व तुमानी घातलेले मध्यमवयीन बेकार लोक आपले आयुष्यातील अपयश ॲबसिंथमध्ये बुडवीत बसले होते. जुन्या आठवणींची भुते जागोजागी तरंगत होती. रॅचो, ज्युली, व्हिन्सेंट आणि हेन्री स्वतः.. लिओनार्दो, मी तुझ्या थोबाडावर थुंकतो, नॉम दे दियू, मेर दलोर. सगळे काही भूतकाळात जमा झाले होते. वातावरणात मेलेल्या शब्दांचा कुजका वास येत होता. त्याने गाडी परत गेर द नॉरकडे घ्यायला सांगितली.
‘‘सावकाश घे. काही घाई नाहीय.’’
गाडी चालू झाली. एकदा त्याला मिसीया नातानसोनकडे जावेसे वाटले. बऱ्यात दिवसांत भेटलेली नाहीय. तिने स्वागत नक्कीच केले असते. पण त्यात पहिल्यासारखा आपलेपणा नसण्याची शक्यता होती. वेड्यांचे इस्पितळ किंवा तुरुंग यातून माणूस बाहेर आला तरी लोकांना वाटते की तो परत वेड्यासारखे चाळे करू लागेल नाही तर घरातल्या किमती वस्तू खिशात घालेल. त्याला ऑस्कर वाईल्डची आठवण झाली. समसंभोगी असल्याच्या आरोपावरून त्याला तुरुंगात पाठवले होते, पण त्याची खरी शिक्षा तो तुरुंगातून सुटल्यावरच चालू झाली. एरवी दयेच्या नावाने नारा पिटणारे ख्रिश्चन जग त्याच्या बाबतीत केवढे निष्ठुर व निर्दयतेने वागले. त्या अवहेलनेतून अखेर मृत्यूनेच त्याची सुटका केली. साध्या देवदाराच्या शवपेटीत तो केवढा रुबाबदार वाटत होता. ना हार ना तुरे, ना फुले ना गुच्छ. फक्त गळ्यात रोझरी व छातीवर सेंट फ्रान्सिसचे पदक.
मिसीया नातानसोनकडे जाण्यात काही अर्थ नाही. ले फोली बर्जेर, ल एलदोरॅदो, ल रीश, मॅक्झीम्स्‌, सर्कस. छे, कुठेही जाण्यात त्याला रस वाटेना. ऑपेराला गेले तर तेथे मिरीयमच्या आठवणींचे भूत मानेवर बसले असते. आता उरलेले ठिकाण म्हणजे ल फ्लूर ब्लां. तेथे त्याला ओळखणारे आता कोणीही राहिले नव्हते. बेर्थशिवाय पेरॉक्वे ग्रीमधल्या मरगळलेल्या वातावरणात त्याला मळमळायला झाले असते.
आता आजची रात्र कशी आणि कुठे घालवणार? त्याच्यापुढे मोठा यक्षप्रश्न उभा राहिला. आजचा प्रश्न सुटला तरी उद्या, परवा, तेरवा काय करायचे हा प्रश्न होताच.
निराशेने त्याने आपला चेहरा दोन्ही हातांनी झाकून घेतला. खाली वाकून तोंड गुडघ्यात खुपसले, दुःखाच्या कढाने त्याचे सर्व शरीर गदगदले. ममा... ममा..तो अस्फुट हुंदके देत रडू लागला.
ममा... ममा...खोल गर्तेत पडून भयाकुल होऊन तो आईला साद घालत होता. नुसती हाक मारण्याने त्याच्या मनाला दिलासा मिळाला. मृत्यूच्या भयाने त्याला ग्रासले. काखेत फ्लेगच्या गाठी आढळल्यावर माणूस जसा गर्भगळीत होतो तसे त्याचे झाले. आता असे झटके वारंवार येणार होते. शरीरावर वर्षानुवर्षे केलेल्या अत्याचाराच्या परिणामाने सर्व इंद्रिये मोडकळीस आली होती. मृत्यू कणाकणाने शरीराला ग्रासत होता. डोळे जड होतील व मिटतील. परत आपण डोळे उघडून हे जग पाहू शकणार नाही. श्वास हळूहळू मंदावत जाईल. हृदयाची धडधड थांबेल. मग आपले पार्थिव शरीर जमिनीत खोल गाडले जाईल. सडण्याच्या दुर्गंधीने कोणा जीवित व्यक्तींना त्रास होऊ नये म्हणून.
मृत्यूच्या क्षणिक दर्शनाने एक विचित्र गोष्ट घडते. इतका वेळ ज्या गोष्टी महत्वाच्या वाटत असतात त्यांचे महत्त्व आता वाटेनासे होते. आपल्या अवतीभवतीचे बरेचसे लोक आपल्याला विसरून जातील, त्यांचे आपल्यावाचून काहीही अडणार नाही याची जाणीव होते. मग लख्ख प्रकाशात काही गोष्टी नव्याने दिसू लागतात.
पहिली गोष्ट म्हणजे जर मरायचे असेल तर आपल्याला मोंमार्त्रमध्ये मरून चालणार नाही. तुलूझ लोत्रेकांच्या शेवटच्या वंशजाला एखाद्या बिस्ट्रोमध्ये, घोडागाडीत नाही तर गटाराच्या कडेला मृत्यू आला तर कसे दिसेल?
दुसरी गोष्ट म्हणजे मरण्यापूर्वी काही ऋणे फेडली पाहिजेत. ज्या काही मोजक्या लोकांनी माझ्यावर निरपेक्षपणे माया केली... मॉरीस, मादाम ल्युबेत, पाटू आणि बेर्थ. त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवे.
उद्याच या सर्वांचे आभार मानून घेऊ. माझ्यासाठी ज्यांनी खस्ता काढल्या, मनस्ताप भोगला त्याची भरपाई करणे तसे कठीण असले तरी शब्दांनी, थोड्या फार पैशांनी, जेवढे जमेल तसे काहीतरी केले पाहिजे. मॉरीस आणि पाटूच्या बाबतीत पैशांनी काही करणे तसे कठीण होते. पैशांचा त्यांना काही उपयोग नव्हता असे नाही. पण पैशांनी काही केले तर लोकांचा गैरसमज होतो. आयुष्यभर सर्वजण पैसे मिळवण्यासाठी धडपडतच असतात, पण कोणी कृतज्ञतेपोटी आपल्याला पैसे दिले तर त्याने अपमानित व्हायला होते.
बेर्थ कदाचित समजून घेईल की हे पैसे म्हणजे तिने जे दिले त्याची किंमत म्हणून दिलेले नाहीत तर तिच्या ऋणाची अल्पांशाने केलेली परतफेड म्हणून आहेत. मादाम ल्युबेतला समजावणे मोठे कठीण होते. शेवटी गरीब घ्या किंवा श्रीमंत घ्या. कोणीही काही द्यायचे झाले तर आपल्याकडे असलेली गोष्टच देणार.
सर्वात शेवटी त्याला आईची क्षमा मागायची होती. आयुष्याची दोरी थोडी लांबली असती तर उरलेला जो काही काळ मिळाला असता तो तिच्या सहवासात काढायचे त्याने ठरवले. आपले तिच्यावर केवढे प्रेम आहे ते सिद्ध करण्याचा प्रयत्न करायला हवा. तिने त्याच्यासाठी जे काही केले त्यातून उतराई होणे त्याला शक्य नव्हते तरीही तिला जे दुःख आणि जो मनस्ताप त्याने आतापर्यंत दिला त्याबद्दल सुचतील त्या शब्दांत क्षमा मागायचे त्याने मनोमनी ठरवले.

No comments:

Post a Comment