Monday, October 8, 2018

मुलँ रूज - ३४

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी हेन्री ला नुव्हेलीत जाऊन बसला. पूर्वीचे बरेच दोस्त तिथे भेटले. पण तिथेही निराशाच पदरी आली.
‘‘कमर्शियल आर्ट,’’ गोझी आपल्या शर्टची फाटकी बाही वर करत म्हणाला, ‘‘खरा पैसा यातच आहे. कॅटलॉग, लेबल, पोस्टर, जाहिराती. भविष्यात याच गोष्टींना महत्त्व प्राप्त होणार आहे. साईन बोर्ड रंगवूनसुद्धा गरजेपुरते पैसे मिळवता येतात. पण एकदाची संधी मिळायला हवी.’’
आँक्तां पौराणिक चित्रे घाऊक प्रमाणात रंगवण्याच्या त्याच्या कौशल्याबद्दल मोठ्या अभिमानाने बोलत होता़
‘‘ख्रिस्ताचे स्वर्गावरोहण. मी तीन दिवसांत उडवतो. खरं तर दोनच दिवस पुरेसे आहेत. पण ते भोसडीचे देवदूत जाम वेळ खातात. आणि ख्रिस्तजन्माला एक दिवस जास्त लागतो. बारीकसारीक तपशील खूप आहेत त्यात.’’
गप्पागोष्टींत जान आणण्याचा सगळ्यांनी आपापल्यापरीने खूप प्रयत्न केला. सर्व भूतकाळ ढवळून काढला. ॲतेलीएमधले सगळे विनोद आठवून आठवून एकमेकांना ऐकवले. पण लवकरच विद्यार्थिदशेतल्या गमतीजमतींचा साठा संपून गेला.
संभाषणात रंग भरण्याचा ओढूनताणून आटापिटा चालला होता. आणलेले अवसान उसने होते. त्या क्षणी सर्वांना भविष्याची चिंता भेडसावत होती. गेलेल्या वर्षांबद्दल वेळ वाया गेल्याची हळहळ वाटत होती. हे सर्व हेन्रीच्या लवकरच लक्षात आले.
‘‘गंमतच आहे नाही?’’ गोझी म्हणाला, ‘‘त्या उर्मट कॉर्मेनची सगळी मनमानी निमूटपणे ऐकून घ्यायची आणि आपणच आपली मारून घ्यायची़. कशासाठी मन मारून हा जिवाचा आटापिटा करायचा तर सॅलूनसाठी आपलं पेंटिंग एकदाचं निवडल जावं म्हणून. एवढी घासल्यावर शेवटी अक्कल येते. काय तर सॅलूनसाठी पेंटिंग निवडलं गेलं काय आणि नाही काय ह्या सगळ्याचा दोन घास पोटात ढकलण्याच्या दृष्टीने झ्याटभरसुद्धा उपयोग होत नाही.’’
‘‘पॅरीसमध्ये या घटकेला उपाशीपोटी फिरणाऱ्या चित्रकारांपैकी अर्ध्याअधिक चित्रकारांवर एके काळी सॅलूनच्या मान्यतेचं शिक्कामोर्तब झालेलं असेल.’’ आँक्तांने दुजोरा दिला.
‘‘तो बुढ्ढा देगा जे म्हणत होता ते बरोबर आहे. चित्रकला हे काही उपजीविकेचं साधन होऊ शकत नाही. उलटपक्षी चित्रकला तुम्हाला आत्मघाताच्या मार्गाने घेऊन जाते. आयुष्य जाळणाऱ्या पार्थिव चिंतेतून शेवटी मेल्यावरच मुक्ती मिळते.’’
मोंमार्त्रमध्ये परतण्याच्या हेन्रीच्या निर्णयाबद्दल सर्वांना एकाच वेळी आश्चर्य आणि हेवा वाटत होता. त्याच्यामागचे कारण हळूहळू त्याच्या लक्षात येऊ लागले. सॅलूनचे अपयश त्याला परवडण्यासारखे होते. त्याच्या नीटनेटक्या उबदार स्टुडिओमध्ये बसून तो मनाला येतील ते रंग कॅनव्हासवर लावू शकत होता. अन्न, वस्त्र, निवारा असल्या कोणत्याही पार्थिव गोष्टींची चिंता त्याला नव्हती. तो एक गर्भश्रीमंत होता तर बाकीचे सगळे दरिद्रीनारायण. गेल्या दोन-तीन वर्षांच्या मैत्रीत त्यांच्यातील ह्या फरकाची जाणीव कोणालाही झाली नव्हती. पण आज हे विचार मनात आले आणि मने गढूळ झाली. काचेचा पेला खळ्ळकन फुटावा तशी मैत्री एका क्षणात संपली. हेन्रीच्या मित्रांच्या दृष्टीने तो आता एक श्रीमंत गुलहौशी चित्रकार होता. आठवणींच्या तुकड्यांत जुनी मैत्री शोधण्यात अर्थ नाही हे हेन्रीला उमगले. एकमेकांच्या कलाकृती बघण्याच्या निमित्ताने भेटत राहू या, असे वरपांगी ठरवून सर्वजण आपापल्या दिशांना पांगले.
फक्त व्हिन्सेंटला हेन्री मोंमार्त्रमध्ये परत आल्याचा मनापासून आनंद झाला होता. हेन्रीला पाहताक्षणी त्याचे नीलमण्यासारखे डोळे चमकले. आपला हडकुळा हात पुढे करत तो म्हणाला,
‘‘तुझ्यावाचून मला करमत नव्हतं यार. तुझ्याशी बऱ्याच गोष्टी बोलायच्यायत. चल घरी जाऊन तेओने पाठवून दिलेली स्कॉटव्हिश घेत गप्पा करू.’’
त्या दिवशी दोघांनी पहिल्यासारखाच वितंडवाद घालत गप्पा केल्या. त्यांच्या जाणिवा अजून पहिल्यासारख्याच धारदार होत्या. पण गेल्या काही महिन्यांत व्हिन्सेंट पार बदलून गेला होता. स्वतःच्याच भोवऱ्यात हरवल्यासारखा तो वाटत होता. त्याच्या अंतर्मनात जीव घुसमटवून टाकणारे, असे एक भयानक वादळ घोंघावत आकार घेत होते.
‘‘पॅरीसमध्ये माझा जीव घुसमटतोय. मला येथून दूर जायचंय. सूर्याच्या सान्निध्यात. मला रंगवायचीयत त्याच्या लख्ख प्रकाशात डोलणारी शेतं, त्यात घाम गाळणारी माणसं, तळपत्या उन्हाने सुकून पिवळे पडलेले गवतांचे ढीग आणि खूप खूप सूर्यफुलं. पिवळीजर्द.’’
एवढे बोलून त्याला धाप लागल्यासारखे झाले. त्याचे ओठ आकडी आल्यासारखे वेडेवाकडे झाले. त्याच्या स्वभावातल्या जन्मजात अस्वस्थपणाने एखाद्या नागासारखा फणा वर काढला होता. त्याची नजर एखाद्या श्वापदाप्रमाणे हिंस्र झाली. त्यात वेडाची क्षणिक लहर तरळत होती. पुढे होऊ घातलेल्या सर्वनाशाच्या चाहुलीने हेन्रीच्या अंगावर शहारे आले.
एके दिवशी व्हिन्सेंट हेन्रीच्या स्टुडिओत आला. पावसात नखशिखांत भिजून, दारू पिऊन तर्रर्र अवस्थेत. दरवाजातच तो फतकल मारून बसला.
‘‘मला पकडून कोठडीत टाकणारायत. खरंच पकडतील का रे मला. तुझा तो पीएर टँग्वी मला म्हणतो की, तुझी पेंटिंग एखाद्या वेडाने पछाडलेल्या माणसाने काढल्यासारखी वाटतात.’’
त्याने आपले डोके दोन्ही हातांत गच्च धरून ठेवले होते. तो स्फुंदून रडत होता. टँग्वीच्या त्या शेऱ्याने जणू दारूच्या कोठारावर ठिणगी पडल्यासारखे झाले होते. असा उद्रेक त्यानंतर वारंवार होऊ लागला. कोणालाही न सांगता तो मधेच चार-सहा दिवस गायब होई. बोलताना तो मधेच ओरडायचा. त्याच्या बोलण्यातली असंबद्धता वाढत गेली. बोलण्यातला तोतरेपणा वाढला. मधेच तो फ्रेंचऐवजी अचानक डचमध्ये बोलू लागे.
फेब्रुवारीत त्याने आर्ल्सला जाण्याचा निर्णय घेतला. हेन्री त्याला निरोप द्यायला रेल्वे स्थानकावर गेला. सकाळची वेळ होती. सूर्य अजून वर यायचा होता. थंडगार वारा सुटला होता. वातावरण खिन्न आणि उदास होते. व्हिन्सेंट तिसऱ्या वर्गाच्या डब्याच्या दारात उभा होता. रात्रभरच्या मद्यपानाने त्याचे डोळे तांबारलेले दिसत होते. दोघेही एकमेकांकडे मूकपणे बघत होते. गाडी सुटता सुटता व्हिन्सेंटच्या दाभणासारख्या राठ दाढी वाढलेल्या चेहऱ्यावर किंचित स्मितरेखा उमटली. गाडी सुटली. व्हिन्सेंटने हात हलवत हलवत निरोप घेतला. गाडीने सोडलेल्या वाफेच्या ढगामागे हळूहळू अदृश्य होणारा आपला मित्र हेन्रीला एखाद्या बुडणाऱ्या माणसाप्रमाणे भासला.
दोनच दिवसांनी पुन्हा एकदा रेल्वे स्थानकावर निरोप द्यायला जायची पाळी हेन्रीवर आली. रॅचो म्युझियम क्युरेटरची परीक्षा पास झाला होता. ड्रॅग्नॉन या शहरी त्याची नेमणूक झाली होती. निरोप घेताना बहुतेकजण एकमेकांना ज्या प्रकारे फुकट सल्ले देत धीराच्या पोकळ बाता मारत असतात त्याच प्रकारची निरर्थक वटवट करून उदास अंतःकरणाने हेन्री स्टुडिओवर परतला.

No comments:

Post a Comment