Thursday, October 11, 2018

मुलँ रूज - ४१

१८८८ चा वसंत ऋतू अशा रीतीने मोठ्या मजेत गेला. हेन्रीच्या आयुष्यातील हे वर्ष सुखाने आकंठ भरलेले होते. पुढल्या वर्षी बॅस्टीलचा तुरुंग फोडण्याच्या घटनेला शंभर वर्षे पूर्ण होत होती. त्यामुळे ते वर्ष फ्रेंच क्रांतीची शताब्दी म्हणून दणक्यात साजरे करायचे असे सरकारने ठरविले होते. त्या निमित्ताने एक्स्पोझिशन युनिवर्सलनामक एक मोठे प्रदर्शन भरविले जाणार होते. अशा प्रदर्शनांबद्दल पॅरीसची ख्याती पूर्वीपासून होती. त्यामुळे या वर्षी जगभरातून खूप गर्दी लोटणार याची खात्री होती.
शॉँ द मार्सच्या विस्तीर्ण मैदानावर थाउजंड अँड वन नाइट्‌सनावाचे एक छोटेसे शहरच वसविले जात होते. पांढऱ्या प्लॅस्टरचे महाल, त्यांना लागून जनानखाना, मशिदी आणि मिनार, फरसबंदी चौक, माडाच्या झापांनी शाकारलेल्या ताहिती झोपड्या, कंबोडियन देवळे, ट्युनिशियन बाजार आणि अल्जेरियन कसबा. या पार्श्वभूमीवर आयफेल टॉवर हळूहळू उभारला जात होता. बांधकामाच्या प्रगतीनुसार दिवसेंदिवस तो अधिकाधिक उंच व निमुळता होताना दिसायचा. त्या राक्षसी पोलादी सांगाड्याला कामगार मुंग्यांसारखे अहोरात्र चिकटलेले असत. एखाद्या भाल्याच्या अग्रासारखे दिसणारे टॉवरचे टोक आकाशात घुसू पाहत होते. त्याचे वर्णन करताना निरनिराळ्या उपमा-उत्प्रेक्षांच्या शोधात संपादकांत अहमहमिका लागली होती. हा टॉवर संपूर्णपणे पोलादापासून बनवण्यात येणार होता. त्याचा पाया अठ्ठेचाळीस फूट खोल खणला होता. त्याच्या उभारणीत चोवीस लक्ष रिव्हेट लागणार होते. पूर्ण झाल्यावर हा टॉवर न्यूयॉर्कमधील फ्लॉरिटॉन इमारत, सेंट पीटर चर्चचा घुमट, वॉशिंग्टनमधली ओबेलिक्स या मानवनिर्मित वास्तूंपैकी सर्वात उंच वास्तू म्हणून जगातले एक नवे आश्चर्य होणार होता.
 त्या वेळी मोंमार्त्रमधील वातावरणसुद्धा आनंद व उल्हास यांनी भारून गेले होते. ल एक्स्पोझिशनशी त्याचा अर्थाअर्थी काही संबंध नव्हता. ती किमया होती वसंत ऋतूची. झाडांना नवी पालवी फुटू लागली होती. बुलेव्हार क्लिशीमधल्या चेस्टनट वृक्षांवर पक्षी किलबिलाट करू लागले होते. फुटपाथवर बसवलेल्या फरशीच्या फटींतून गवताचे कोवळे कोंभ डोकावू लागले होते.
पाठोपाठ उन्हाळा सुरू झाला. ला नुव्हेलच्या आगाशीवर दाढीधारी चित्रकार मंडळी मोठमोठ्या हॅट घालून ॲबसिंथ पीत बसलेले आढळू लागली. कित्येक लोक आपल्या घराच्या सज्जात सहकुटुंब बसून ऊन खात खात दुपारचे जेवण घेताना आढळत. अशा वेळी समोरच्या घरातील मंडळींशी तासन्‌तास गप्पा चालत. गाडीवान आपल्या बग्गीचे लगाम ढिले सोडून उन्हे खात डुलक्या काढत बसलेले आढळत. घोडे गटाराच्या कडेला उभे राहून आपल्या पुठ्ठ्यांवर बसलेल्या माशा शेपटीने उडवण्यात दंग असत. निवांतपणा नसे फक्त रू कुलँकूरमधील धोबिणींच्या वाट्याला. त्यांना आपल्या कपाळावरचा घाम पुसायलासुद्धा फुरसत नसायची.
१८८८ मधल्या उन्हाळ्यातील मोंमार्त्र हे असे होते. सभोवतालच्या सनातनी विचारांच्या व्हिक्टोरियन वाळवंटातील सुखलोलुपतेचे ओॲसिस. स्वच्छंदी बोहेमियन लोकांचा जणू स्वर्गच. हा पॅरीसच्या वेशीवर असलेला भाग. त्याचे खेडवळ स्वरूप बदलले नव्हते. येथे अजूनही उघड्या जागा शिल्लक होत्या. तेथे चेरीच्या झाडांना बहरायला मोकळीक होती. प्रेमिकांना आपल्या घराच्या दारातच एकमेकांचे चुंबन घेण्यात संकोच वाटत नसे. तरुण धोबिणी कंबर मोडून टाकणाऱ्या कामातून विरंगुळा म्हणून कॅनकॅन नावाचे नृत्य करीत. सतत साबणाच्या पाण्यात काम करून त्यांच्या पायाला खरूज झाल्यासारखे फोड येत. नाचताना गिरकी मारल्यावर स्कर्टमधून त्यांचे ते फोडांनी भरलेले पाय दिसत. अजूनही ही वस्ती गलिच्छ, गावंढळ व रांगडी म्हणून ओळखली जायची. पण शहरीकरणाच्या प्रक्रियेत हे स्वरूप हळूहळू बदलत होते.

No comments:

Post a Comment