Wednesday, October 3, 2018

मुलँ रूज - २३


वर्ग संपल्यानंतर दुपारच्या जेवताना भरणाऱ्या गप्पांच्या मैफिलीत आज तेओचा भाऊ व्हिन्सेंटची भर पडली होती.
तुम्ही लुव्हरमध्ये आमची मोनालिसा नक्कीच पाहिली असेल.आँक्तां साळसूदपणे म्हणाला. ‘‘अप्रतिम मास्टरपीस. असं पेंटिंग करणं लिओनार्दोसारख्या प्रतिभेची दैवी देणगी असलेल्या चित्रकारालाच शक्य आहे. मोनालिसा ही या पृथ्वीतलावरची एक उत्कृष्ट कलाकृती आहे. काय म्हणताय, माझं म्हणणं मान्य आहे ना?’’ सर्वांकडे एक आव्हानात्मक दृष्टिक्षेप टाकत तो पुढे म्हणाला, ‘‘ज्याला मान्य नसेल त्यानं माझ्याकडे मान वर करून तर पाहा. मी त्याच्या थोबाडावर थुंकेन. काय समजलात!’’ व्हिन्सेंटकडे वळून तो पुढे म्हणाला, ‘‘मागच्याच आठवड्यात मी लुव्हरला जाऊन आलो. एवढी परिपूर्ण कलाकृती जगात दुसरीकडे असणं शक्यच नाही. काय काम आहे मोनालिसाचं! नतमस्तकच व्हायला होतं तिच्यासमोर.’’
‘‘मग का नाही तिथल्या तिथे गुडघे टेकून गांड वर केलीस.’’ हेन्री कुचेष्टेने हसत म्हणाला, ‘‘तुला कसं कळलं की मोनालिसा जगातील एक उत्कृष्ट कलाकृती आहे म्हणून? जगातील अशी कितीशी पेंटिंग तू पाहिलीयस? जगातील जाऊ दे. फ्रान्समध्ये एकूण किती म्युझियम्स आहेत ते तरी तुला ठाऊक आहे का? तेसुद्धा लांब राह्यलं. आपल्या पॅरीसचं सांग. लुव्हरला किती वेळा गेला आहेस? जे पाहिलंस ते तरी नीट विचक्षण दृष्टीने पाहिलंयस का? अरे जग खूप मोठं आहे. पॅरीसच्या जरा बाहेर बघ. युरोप, रशिया, अरेबिया, आशिया, अमेरिका, आप्रिका. कित्येक देश, भाषा, धर्म, संस्कृतींचे विविध कालखंड. या सगळ्यात विखुरलेल्या अगणित कलाकृती. त्यांच्या सौंदर्याचे आकलन करण्यासाठी वेगवेगळ्या मापदंडांचा शोध घ्यावा लागेल. आणि तू मात्र लुव्हरमधलं रेनेसान्सवरील एखादं दालन जेमतेम बघून झाल्यावर बिनधास्त ठोकून देतोस, मोनालिसा जगातील एक उत्कृष्ट पेंटिंग आहे म्हणून.’’
हेन्रीच्या धडाक्याने आँक्तां गारच झाला. आपल्या बोलण्याचा परिणाम अजमावण्यासाठी हेन्री थोडा वेळ थांबून पुढे म्हणाला, ‘‘मोनालिसा उत्कृष्ट कलाकृती आहे की नाही हे एक वेळ बाजूला ठेवू या. मुळात प्रश्न आहे ती नक्की लिओनार्दोचीच आहे, हे तुला कशावरून कळलं?’’
‘‘मला कसं काय कळलं?’’ कपाळावर आठ्या घालत तो त्वेषाने ओरडला. त्याला हेन्रीच्या वादविवादपटुत्वाचा नेहमी हेवा वाटायचा. आता त्याला त्याच्यावर मात करण्याची संधी आली होती. त्याने टेबलाभोवती जमा झालेल्या विद्यार्थ्यांच्या कोंडाळ्यावरून एकदा नजर फिरवून हेन्रीकडे बोट दाखवीत म्हटले, ‘‘बघा. हा मच्छर मला विचारतोय मोनालिसाचा कर्ता लिओनार्दोच कशावरून?’’ गोलिएथने डेव्हिडकडे बघून असेच दात विचकले असतील. त्याने पुढ्यातला ॲबसिंथचा पेला एका दमात घशात ओतून आपला आवेश द्विगुणित केला. मिशा पुसत तो पुढे म्हणाला, ‘‘अरे अर्धवटा, ते कळायला काही फारशी अक्कल लागत नाही. ते इथे जाणवतं. अभिजात कलाकृतीचं सौंदर्य या इथे हृदयाला भिडतं.’’
‘‘तुला कुठे जाणवतं हृदयात, पोटात की आणखी कुठे याला काहीच किंमत नाही. मलासुद्धा इथे माझ्या हृदयात जाणवतंय की तू एक निव्वळ गाढव आहेस. पण माझ्या जाणवण्याने तू गाढव ठरतोस का? की मला जाणवायला लागल्याबरोबर झालास की काय गाढव?’’
सर्वजण हसू लागले. व्हिन्सेंटने आपला पाइप पेटवला. आँक्तां रागाने लालबुंद झाला. त्याला वाटले होते की पुराव्यांची चिरफाड करत बसण्यापेक्षा आतल्या आवाजावर काम सोपविले की हेन्रीला प्रतिवाद करणे कठीण जाईल पण झाले उलटेच.
‘‘ते तिच्या नजरेतलं गूढ स्मित.’’ अचानक त्याच्या डोक्यात नवा मुद्दा डोकावला, ‘‘ते अनोखे, कंपायमान, संमोहित करणारे सांद्र स्मित अगदी आंधळ्यालासुद्धा दिसेल. आता तुला जर असं म्हणायचं असेल की ते स्मितच नव्हे तर मात्र मला तुझ्या थोबाडावर थुंकायलाच हवं.’’
‘‘ती तुझी मोनालिसा. तिला तिच्या ओठातून हसू दे, डोळ्यांतून नाही तर बेंबीतून. माझं काही म्हणणं नाही. मला फक्त एवढंच विचारायचंय की तू म्हणतोस त्याप्रमाणे त्या जगप्रसिद्ध पोर्ट्रेटचा चित्रकार लिओनार्दोच कशावरून?’’ हेन्री प्रत्येक शब्दावर जोर देत म्हणाला.
थोडा वेळ शांतता.
‘‘हात्तीच्या. त्यात काय. टेक्निकवरून सांगता येईल. प्रत्येक चित्रकाराची स्वतःची अशी शैली असते. आता लिओनार्दोसारख्या जगप्रसिद्ध चित्रकाराच्या हाताचं काम त्याच्या शैलीवरून एखाद्या शेंबड्या शाळकरी मुलालासुद्धा ओळखता येईल. पण काही ठोकळ्यांना तीन वर्षं घासूनसुद्धा शैली म्हणजे काय ते समजत नसेल तर त्याला माझा नाइलाज आहे.’’ आपण हेन्रीला निरुत्तर केले या विश्वासाने आँक्तां खुर्चीत थोडा मागे रेलला.
‘‘अरे फुकट तू लुव्हरमध्ये खेपा मारल्यास. तिथल्या त्या बागेतल्या कीडमुंग्यांनासुद्धा तुझ्यापेक्षा जास्त अक्कल असेल. आता नीट लक्ष देऊन ऐक मी काय सांगतोय ते. लंडनमध्ये नॅशनल गॅलेरी नामक एक म्युझियम आहे. आपल्या लुव्हरसारखं. त्यात मॅडोना ॲट रॉक या आपल्या लुव्हरमधल्या प्रसिद्ध पेंटिंगची एक दुसरी प्रतिकृती आहे. ते लिओनार्दोने आपल्या एका शिष्याच्या मदतीनं रंगवलेलं आहे. जरा थांब. मधेच बोलू नकोस. अजूनपर्यंत कोणत्याही तज्ञाला त्या पेंटिंगमधला कोणता भाग लिओनार्दोचा आणि कोणता त्याच्या शिष्याचा असा फरक दाखवून देता आलेला नाही. तू जे म्हणतोस ती शैली, ते ब्रशस्टो्रक्स सर्व पेंटिंगभर अगदी सारखे आहेत. कदाचित सगळं पेंटिंगच त्या अनामिक शिष्याने केलं असेल आणि तुझ्या लिओनार्दो महाशयांनी आपल्या सिद्धहस्त हातांनी खाली फक्त सही ठोकून दिली असेल. झालं.’’
आँक्तांने आपला पाइप शिलगावला व हेन्रीच्या तोंडावर धुराचे लोट सोडायला सुरुवात केली. वाग्‌युद्धात मुद्दे संपल्यावर खेळली जाणारी एक सर्वसाधारण चाल तो वापरू पाहत होता. हेन्री ते धुराचे लोट आपल्या हाताने बाजूला सारत म्हणाला, ‘‘आता मीच तुम्हाला सांगतो की ते पेंटिंग लिओनार्दोनेच केलं याचा ठोस पुरावा काय तो.’’ असे म्हणून तो नाट्यपूर्ण रीतीने थांबला.
‘‘चल सांग पाहू लवकर.’’ सर्वांची उत्सुकता ताणली होती.
‘‘त्या पेंटिंगखाली ती छोटीशी चकचकीत पितळी पाटी आहे ना त्यावर लिहिलंय, ‘लिओनार्दो द व्हिन्सी. १४५२-१५१९’. ती पाटी नसती तर तुला समजलं असतं का ते पेंटिंग एक महान कलाकृती आहे म्हणून. ते पेंटिंग लुव्हरऐवजी तुला एखाद्या रद्दीच्या दुकानात धूळ खात पडलेलं दिसलं असतं तर जाणवली असती का त्याची महानता तुझ्या त्या हृदयात. तू काय म्हणाला असतास ते मी सांगतो तुला. रेनेसान्सच्या काळातलं दिसतंय. रंगकाम बरं केलंय पण खूप तडे गेलेयत. शिवाय वॉर्निशसुद्धा जास्तच लावलेलं दिसतंय. पाचशे फ्रँकपेक्षा एक छदामसुद्धा कोणी जास्त मोजला नसता.’’ हेन्रीने सर्वांकडे मिस्कील हसत पाहिले, ‘‘काय बरोबर आहे की नाही?’’
हेन्रीचा युक्तिवाद इतका बिनतोड होता की पुढे वादाला वावच नव्हता. त्यामुळे विषय आपोआपच बदलला. ‘‘पाचशे फ्रँक माझ्याकडे असते तर मी काय केलं असतं माहितेय?’’ रॅचो मधेच म्हणाला आणि मग सर्वांनीच पाचशे फ्रँकमध्ये आपण काय काय केलं असतं त्याचे हवेत किल्ले बांधायला सुरुवात केली. त्यात कोणी कल्पनेतसुद्धा पाच फ्रँक खर्चून एखादं पेंटिंग विकत घेण्याची तयारी दाखवली नाही.
‘‘पण लुव्हरची बातच न्यारी.’’ गप्पांचे रूळ बदलले तरी हेन्री आपला मुद्दा सोडायला तयार नव्हता. ‘‘आत शिरताच लोक अगदी गंभीर होतात. एकदम चिडीचूप. डोक्यावरची हॅट हातात. दबक्या पावलांनी चालत. तोंडावर आश्चर्याचे भाव. आता काही अप्रूप पाहायला मिळणार आहे असे. कसले मूर्ख चुत्ये लोक लुवरमध्ये येत असतात. पेंटिंगकडे कोणाचंही लक्षच नसतं. सगळ्यांच्या नजरा खालच्या पितळी पाट्यांकडे. एखादं ओळखीचं नाव दिसलं रे दिसलं की मान वर करून पेंटिंगकडे एक दृष्टिक्षेप टाकला की ताबडतोब यांचा शेरा तयार. वा! कॉरेज्जो काय, उत्तम! काय टॉप काढलंय. इकडे बघ, रेब्रांद! किती मस्त आहे नाही. अय्याऽ हा पाहिलास का तितीअन. इकडे बघ रूबेन्स आहे.येथे येऊन जन्माचं सार्थक झालं असा भाव सगळ्यांच्या चेहऱ्यावर झळकत असतो. पेंटिंग कोणती पाहिली, त्यात काय पाहिलं म्हणून विचारलं तर कोणाला काही सांगता येणार नाही. पण कोणाची पाहिलीत म्हणून विचारलंत तर पोपटासारखी सगळी यादी घडाघडा म्हणून दाखवतील. खरं सांगू, त्या मोनालिसाच्या पेंटिंगला प्रत्यक्ष सामोरं जाण्यापूर्वीच एका प्रचंड आदराच्या भावनेखाली आपण दडपून गेलेलो असतो. साहजिकच प्रत्यक्ष चित्रासमोर येऊन उभे ठाकतो तेव्हा फ्लॉरेन्समधल्या एका व्यापाऱ्याच्या कुटुंबातील, साधारण व्यक्तिमत्वाची, हाताची घडी घालून ओठांच्या कोपऱ्यातून किंचित हसणारी एक मध्यमवयीन स्त्री असं रूप आपल्याला दिसतच नाही. आपल्याला दिसतो तो लिओनार्दो. एक ख्यातनाम रोमँटिक नायक. लांब दाढी व प्रतिभेच्या वलयामागे झाकलेला त्याचा चेहरा. नकळत तुमच्या नजरेसमोर येतात ते चारशे वर्षांपूर्वीचे फ्लॉरेन्सवासी. त्यांची उच्च अभिरुची आणि कलेची जाण. वैभवसंपन्न जीवन. दागिन्यांनी मढलेल्या लावण्यवान दरबारी स्त्रिया. आणि तुम्ही पेंटिंगसमोर नतमस्तक होता ते या जाणिवेने. अभिजात कलेच्या अनुभूतीने नव्हे.’’
‘‘ही सगळी बंडलबाजी आहे.’’ आँक्तांचा पारा आता खूप चढला होता, ‘‘मूर्खा, जातीच्या प्रतिभावंताची कला आपल्या स्वयंभू तेजाने एखाद्या हिऱ्यासारखी झळकत असते. भर दिवसासुद्धा त्या तेजाने डोळे दिपतात. ते तेज एका दृष्टिक्षेपातच ओळखू येतं. रेम्ब्रांद, तितीअन, लिओनार्दो...’’
‘‘थांब, थांब-’’ हेन्रीचा स्वर उत्तेजित झाला होता. ‘‘तसं असेल तर त्या मोनालिसाच्या नवऱ्याला बरं दिसलं नाही आपल्या बायकोच्या पोर्ट्रेटचं ते दैदीप्यमान तेज?’’ रॅचोने आपल्या शिष्याकडे अभिमानाने पाहिले.
‘‘तुला माहितेय त्याला ते पोर्ट्रेट मुळीच आवडलं नव्हतं. इतकं की त्याने ते स्वीकारायला चक्क नकार दिला होता. आणि त्याला ते पसंत पडावं म्हणून लिओनार्दो त्यात सुधारणा करून देणार होता. स्वतः चित्रकारालासुद्धा आपल्या कलाकृतीचं तेज जाणवलं नव्हतं. कलाकृतीमधील तेज कोणालाही जाणवतं असं म्हणतोस तर ते त्या फ्लॉरेन्सच्या राजाला का नाही रे दिसलं. तो तर एवढा मोठा जाणकार, सर्व कलांचा आश्रयदाता. तू म्हणतोस तसं असतं तर लिओनार्दोला नाट्यगृहाच्या कपडेपटात पडदे रंगवण्याचं काम करायला लागलं नसतं. तुझ्या त्या रेम्ब्रांदच्या नाइटवॉच या चित्राची लोकांनी कुचेष्टा नसती केली. त्याच्या आयुष्याची अखेर निष्कांचन अवस्थेत झाली नसती. वॉत्तोवर दुकानांच्या पाट्या रंगवायची वेळ आली नसती. तिनिअर्स माहित्येय तुला? आपल्या पेंटिंगला पाच-दहा फ्रँकचं गिऱ्हाईक मिळावं म्हणून चक्क आपण मेल्याची हूल त्याला उठवावी लागली. शॅद्राँ. कुडकुडणाऱ्या थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याला आपलं पेंटिंग एका फाटक्या कोटाच्या बदल्यात विकावं लागलं. हे सगळे लोक प्रतिभावान होते. पण त्यांच्या प्रतिभेचा प्रत्यय त्यांच्या समकालीन एकाही महाभागाला जाणवला नव्हता. मागचा भूतकाळ कशाला तपासायला पाहिजे. आपलंच उदाहरण घेऊ. आपण स्वतःला एवढे मर्मज्ञ जाणकार समजतो. आपल्या पूर्वसूरींची महानता कळण्याएवढी उमज आपल्यापाशी आहे असाही गर्व आपल्याला असतो. पण आपल्या समकालीन चित्रकारांकडे बघताना ती दिव्य दृष्टी कुठे जाते. सेझानचंच उदाहरण घेऊ या. सेझान या जमान्यातला एक महान चित्रकार आहे हे मत किती जणांना मान्य होईल कोण जाणे. एखाद्या दिवशी त्याची पेंटिंग लुव्हरमध्ये लिओनार्दोच्या बरोबरीने लटकतील. खाली एक पॉलीश केलेली छोटीशी पाटी चमकत असेल. पॉल सेझान.’’
‘‘हा सेझान कोण?’’ इतका वेळ गप्प बसलेल्या व्हिन्सेंटने निरागसपणे विचारले.
‘‘आहे एक असाच कोणीतरी. वादासाठी कोणाचंतरी नाव घ्यायचं म्हणून सेझानचं घेतलं. एवढंच.’’ गोझी म्हणाला.
रॅचो हेन्रीला शाबासकी देण्याच्या सुरात म्हणाला.‘‘तू म्हणतोस ते सर्व खरंय. पण उदाहरण देण्याच्या भरात फार वाहवत गेलास. आता सेझानची चित्रकला काय लायकीची आहे ते एक हा व्हिन्सेंट सोडला तर इथे सगळ्यांना चांगलंच ठाऊक आहे. अगदी इंप्रेशनिस्टांनासुद्धा त्याला आपला म्हणवून घ्यायला लाज वाटते. इंडिपेन्डन्सच्या प्रदर्शनात त्याची पेंटिंग लावायचीच झाली तर ते अगदी नाइलाजाने एखाद्या काळोख्या कोपऱ्यात कोणाच्या चटकन दृष्टीला पडणार नाहीत अशी लावतात.’’ रॅचोने हेन्रीकडे अभिमानाने पाहिले. आईचे बोट धरून चालणाऱ्या एका मुलाचे रूपांतर मोंमार्त्रमधल्या एका चित्रकलेत मुरलेल्या विद्यार्थ्यांत झाले होते.
‘‘अरे अज्ञ बालका, लुव्हरमध्ये प्रवेश मिळणं हे काही इतकं सोपं नाहीये. सेझानच्या पेंटिंगला लुव्हरमध्ये कधी काळी जागा मिळेल असं चेष्टेतसुद्धा म्हणणे मोठ्या धाडसाचे ठरेल. आता तुझी पेंटिंगसुद्धा लुव्हरमध्ये लागतील असंही कोणी म्हणेल एखादे वेळेस.’’ रॅचो मोठा गडगडाट करून हसला.

No comments:

Post a Comment