Monday, October 1, 2018

मुलँ रूज - १७


दोन दिवसांनी मोंमार्त्रमधल्या लोकांना एक विचित्र प्रेतयात्रा बघायला मिळाली. मरतुकडे घोडे एक जुनाट शववाहिनी कसेबसे ओढत होते. त्यात वेताचे फर्निचर, तीन इझल, ड्रॉइंग टेबल, एक उंच शिडी वगैरे चित्रविचित्र सामान शिगोशीग भरलेले होते. शवपेटीऐवजी मधेच आडवा ठेवलेला व्हीनस द मिलोचा प्लॅस्टरमधला मळकट पांढरा पुतळा डुगडुगत होता. जणू काही मुडद्यात पुन्हा धुगधुगी येत असावी. गाडीवानाच्या जागी एक उंचापुरा, तगडा दाढीवाला तरुण बसला होता. मोठ्याने गाणे गात, खिडकीतून गंमत बघणाऱ्या मुलींना बघून शिटी मारून डोळा मारीत, वाटेत मधे येणाऱ्यांना अस्सल शिव्या घालीत तो मजेत गाडी हाकत होता. मागून पिंजारलेल्या केसांचे, गबाळ्या कपड्यातील चार तरुण चालले होते. हेन्री मात्र काठी टेकून पाय ओढत चालल्यामुळे थोडासा मागे पडला होता. गाडी लॉजसमोर येताच सगळ्या मंडळींनी भराभर सामान सोडले व आरडाओरडा करत मोठ्या गडबड-गोंधळात वर चढवले. शेवटी रहायला व्हीनस द मिलोचा प्लॅस्टर कास्ट. एकमेकांना भरपूर शिव्या घालत तो अवजड पुतळा सगळ्यांनी मिळून चार मजले चढवून एकदाचा खोलीत आणून टाकला.
नॉम दे दियू! काय वजन आहे भडवीचं. कमीत कमी एक टन भरेल.
सगळं वजन त्या कुल्ले आणि स्तनांमध्ये भरलंय. कसले गोल गुबगुबीत आहेत बघ.
पुतळा वर चढवता चढवता ॲनाटॉमीचा अभ्यास करत होतो. तीन वर्षं वर्गात बसून जे डोक्यात शिरलं नाही ते आज ओझं खांद्यांवर घेतल्यावर समजलं.
हेन्रीचा स्टुडिओ सगळ्यांना आवडला. मोठ्या आपुलकीने त्यांनी सगळे सामानसुमान नीट लावून ठेवले. हेन्री मित्रांच्या आपुलकीने अगदी भारावून गेला. त्याला सगळ्यांचे अगदी मनापासून आभार मानायचे होते. पण असे भावनांचे प्रदर्शन करणे त्याच्या मित्रमंडळीत भंपकपणाचे समजले जाई. म्हणून त्याने आपले आभारप्रदर्शन मनातच ठेवले.
हेन्री मग सर्व मित्रांच्या टोळक्याला श्रमपरिहारासाठी म्हणून ला नुव्हेलमध्ये घेऊन गेला. तेथे यथेच्छ बीअरपान झाले. सर्वांनी व्हेरोनीस, गोया व दलाक्रवावरून भांडण होईस्तोवर एकमेकांशी वितंडवाद घातला. शेवटी आणखी वाद घालण्याचे अंगात त्राण न उरल्याने एकमेकांचा उद्धार करत सर्वजण थकून-भागून संध्याकाळी खूप उशिराने आपापल्या घरी गेले. फक्त हेन्री आणि रॅचो सोडून. त्यांची सॅलूनमध्ये पाठवायच्या पेंटिंगविषयी चर्चा चालू होती.
बायबलमधला एखादा प्रसंग घेऊ या का. उदाहरणार्थ, मुलाचा बळी देताना अब्राहम. नाहीतर मोझेसचा शिलाभंग.हेन्री म्हणाला.
खूप किचकट विषय आहेत ते. फार पसारा मांडावा लागेल.रॅचोने त्याला कल्पना दिली.
इकॅरस कसा वाटतो. तुला माहितेय ना ती गोष्ट. इकॅरस भुयारांच्या भूलभुलय्यातून निसटल्यावर मेणाच्या पंखांनी आकाशात उडण्याचा प्रयत्न करतो ती. त्याने शरीराला मेणाचे पंख चिकटवले आहेत. तो एका खडकावर ते मेणाचे पंख पसरून आकाशात झेप घेऊन उडण्याची पोज घेऊन उभा आहे. त्रिकोणात्मक रचनेत छान बसेल.हेन्रीच्या चेहऱ्यावरून उत्साह उतू जात होता.
त्यापेक्षा तू नेहमीचे यशस्वी व्हीनस किंवा डायना असे विषय का निवडत नाहीस. लूव्हरमध्ये जा. बोशेच्या एखाद्या पेंटिंगची नक्कल कर. स्टुडिओत येऊन थोडे इकडेतिकडे फेरफार कर की काम झालं. कशाला ती इकॅरसची झगझग. संदर्भ मिळण्याचं तर सोडा, ती गोष्टसुद्धा फारशी कोणाला माहीत नसेल.रॅचोने प्रतिवाद केला.
हे बघ. उगाच काहीतरी नवीन करण्यात काही अर्थ नाही. आपल्याला काय. सॅलूनमध्ये पेंटिंग झळकल्याशी कारण. त्यासाठी क्रूसिफिक्शन अगदी उत्तम. लूव्हर तर क्रूसिफिक्शनने भरलेलंच आहे. एक महत्वाची गोष्ट ध्यानात ठेव. क्रूसिफिक्शन, पिएता, मेरी मॅग्दालेन सॅव्हिअरचे पाय पुसतेय, सेंट सॅबॅस्टिअन आपल्या छातीवर बाण झेलतोय या विषयांवरची पेंटिंग निवड समिती सहसा नाकारत नाही.रॅचो थोडे थांबून पुढे म्हणाला, “वा! काय कल्पना सुचलीय. घोडदळाची लढाई. किती जबरदस्त ॲक्शन आहे बघ.
अरे पण पेंढा भरलेला घोडा चार मजले वर चढवणार कसा.
त्याची काही गरज नाही. फक्त लक्झेंबर्गला एक फेरी टाकली की झालं. तिथल्या म्युझियममध्ये स्टब्सची घोड्यांवरची भरपूर पेंटिंग आहेत. स्टब्सच्या घोड्यांची नीट नक्कल केलीस आणि नशीब बरोबर असेल तर एखाद्या वेळेस चक्क ब्राँझ पदक वगैरे मिळून जाईल.
घोड्यांचं ठीक आहे. पण बाकीच्या साधनसामग्रीचं काय?” हेन्रीने विचारले.
‘‘तुझं म्हणणं बरोबर आहे. तो व्हीनसचा पुतळा चढवतानाच माझी फाटलीय. या बायबलच्या विषयांसाठी लागणारं सामान गोळा करता करता अर्धी शक्ती खर्च होते. त्यापेक्षा एखादा साधा, कौटुंबिक प्रसंग घेऊया. नेहमीच्या जीवनातला.’’
उदाहरणार्थ. बाहुली मोडलेली पाहून रडणारी लहान मुलगी, आईच्या नकळत जॅम चोरून खाणारा छोटा मुलगा.हेन्री वेडावत म्हणाला.
काय वाईट आहे यात?” रॅचो.
भातुकली खेळणं, रात्री अंथरूण ओलं करणं यात काही वाईट नसतं रे. पण ते कधी. लहानपणी. जन्मभर तसंच करत राह्यलं तर कसं होईल?”
ठीक आहे बाबा. तू म्हणतोस तसा इकॅरस करायला घे. पण त्यात भरपूर घोटकाम करावं लागेल. आणि तुला तर घोटकाम मुळीच आवडत नाही.
हेन्रीचे लक्ष दुसरीकडेच होते. बाजूच्या टेबलावर एक तरुणी एकटीच बसली होती. तिचे कपडे हलक्या दर्जाचे होते. तिने चेहऱ्यावर भडक रंगरंगोटी केली होती. ती आपले खाणे संपवून बिल देण्याच्या तयारीत होती.
तिच्या मानेवर बघ कशी हिरवट शॅडो आहे ती.
मानेवर हिरवट शॅडो काय च्यायला. सगळ्या शॅडोज्‌ रॉ अँबर, डार्क ब्राऊन ते ब्लॅक या दरम्यानच असतात. मस्य कॉर्मेनची शिकवण एवढ्यात विसरलास की काय? डोकं ठिकाणावर आहे का तुझं.रॅचो वैतागून म्हणाला.
तिचा चेहरा बघ कसा विलक्षण पारदर्शी आहे तो. खिडकीच्या तावदानासारखा.हेन्रीची तंद्री दुसरीकडेच लागली होती. ते जाऊ दे. तू इकॅरस घोटण्याविषयी काय म्हणत होतास?”
तुझं आज लक्षण ठीक दिसत नाहीय. त्या गावभवानीचं पोर्ट्रेट करायचा विचार आहे की काय तुझा. गळ्याभोवतीची हिरवट शॅडो, काचेसारखा पारदर्शी चेहरा. अशानं एक दिवस गोत्यात येशील तू.
मी तिचं पोर्ट्रेट करणारय असं काही नाही. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की...
बकवास करू नकोस. माझं ऐक. हे पोर्ट्रेट करून काय फायदा होणार आहे. कोण विकत घेईल. कोणत्या प्रदर्शनात पाठवशील. कोणाला रस आहे मोंमार्त्रमधल्या रांडांच्या पोर्ट्रेटमध्ये. एखाद्या रात्री दारू पिऊन धुंद झाल्यावर झोपायला बऱ्या वाटल्या तरी त्यांचं पोर्ट्रेट काही कोणी आपल्या दिवाणखान्यात टांगायला तयार होणार नाही.
तू म्हणतोयस ते अगदी सगळं बरोबर आहे. एखादं कुत्रंसुद्धा ढुंकून बघणार नाही अशा पेंटिंग कडे. पण तुझा तो घोडेस्वार, जॅम चोरणारा मुलगा, माझा इकॅरससुद्धा त्यात आला, या सर्वांपेक्षा तिच्या चेहऱ्यात जान आहे. त्यातला जिवंतपणा अगदी अल्पांशाने जरी कॅनव्हासवर उतरवता आला तरी ते एक ग्रेट पोर्ट्रेट होईल.हेन्री थोडे थांबून पुढे म्हणाला, “तू कधी स्वतःच्या निव्वळ आनंदासाठी म्हणून एखादं पेंटिंग केलंयस. मी लहानपणी खूप पोर्ट्रेट करायचो. माझ्या आईची. घरातल्या सगळ्यांना मला पोज द्या पोज द्या म्हणून भंडावून सोडायचो.
आणि आता पेंटिंग करायचं म्हणजे जिवावर येतं असंच ना.
अगदी जिवावर येतं असंच काही नाही. पण च्यायला आपण ते ॲतलिएमध्ये रोज व्हीनस आणि डायना घोटत बसतो ना त्याने जाम वात आणलाय बघ. प्रायमरी शॅडोज्‌ नेहमी रॉ अँबरनेच भरायच्या, रचना त्रिकोणात्मकच करायची, ब्रशस्ट्रोक्स चाटून-पुसून गुळगुळीत करायचे. असंच का? कोणी ठरवलं हे? एखाद्याला जसं आवडतं तसं तो का रंगवू शकत नाही? एकदा कॅनव्हासवर ब्रशचा फटकारा मारला की तो कायमचा. मनासारखा आला नाही तर दुसरा घ्या. नाही जमलं तर पेंटिंग सोडून द्या. त्याच कॅनव्हासवर रंगाचे थरांवर थर देत बसणं म्हणजे फारच भयंकर आहे. कोणाला शॅडोज्‌ हिरव्या आणि निळ्या दिसत असतील तर त्याने तशा का रंगवू नयेत? मला त्या तशाच दिसतात.
तुला तसं रंगवता येणार नाही. तुझ्या पेंटिंगची सॅलूनमध्ये वर्णी लागायला हवी तर मस्य कॉर्मेन जसं सांगतात तसंच तुला रंगवायला हवं. वेगळा मार्ग चोखाळायचा विचारसुद्धा मनात आणलास तर त्याचा अर्थ काय तो तुला ठाऊक आहे ना. आर्टिस्ट म्हणून तुझं भवितव्य खल्लास.
ठीकय,” एक उसासा सोडून हेन्री म्हणाला, “मधूनच डोक्यात काय वारं शिरतं काही कळत नाही. मी आता माझा इकॅरस बघ कसा घोटून घोटून तयार करतो ते. एवढ्या शिव्या खाऊन गाढवासारखं राबल्यावर आता सॅलूनमध्ये माझ्या पेंटिंगची वर्णी लागण्यासाठी तेवढंच करायचं उरलं असेल तर माझी काही हरकत नाही. माझं चित्र सॅलूनमध्ये लागलं तर मला नाही तरी आईला खूप आनंद होईल.
(फोटो - 'व्हीनस डी मिलो' चा प्लास्टर कास्ट)


No comments:

Post a Comment