Saturday, October 20, 2018

मुलँ रूज - ६३

नाताळनंतर हेन्रीने पेर कोटेलकडे काही दिवसांची सुटी मागितली.
‘‘मला वाटतं आता पोस्टरच्या कामाला सुरुवात करायला हरकत नाही.’’
तो संपूर्ण आठवडा हेन्री स्टुडिओच्या बाहेर पडला नाही. फक्त दोन मॉडेल सोडून इतर कोणालाही तो भेटला नाही. मादाम ल्युबेत जे काही करून वाढी ते खाल्ले न खाल्ले, झोपले न झोपले असं करून तो रात्रंदिवस कामात मग्न होता. सिगरेट पेटवणे, कोनॅकचा पेला भरणे एवढाच काय तो त्यात खंड पडला असेल. फरशीवर सिगरेटच्या थोटकांचा आणि कच्च्या रेखाटनांच्या कागदांचा खच पडला होता. प्रत्येक नवे रेखाटन पहिल्यापेक्षा सोपे, सुबोध आणि जोरदार. शेवटी मनात जे होते ते आपल्या रेषेत पकडण्यात तो यशस्वी झाला.
आठवड्याच्या अखेरीस जलरंगात केलेले एक पोस्टर त्याने पेर कोटेलच्या समोर ठेवले. त्या वृद्ध लिथोग्राफरने एकवार ते पोस्टर निरखून पाहिले. व्हॅलेंटाईनची नशिली पडछाया आणि नर्तिकेने वर उचललेल्या पायावरून घसरणाऱ्या लिंगरीचा प्रचंड व्याप पाहून त्याच्या डोक्यावर जे काही थोडे केस उरले होते ते ताठ उभे राहिले.
‘‘हे आपल्याला छापता येणार नाही.’’
‘‘का?’’
‘‘एक म्हणजे असे रंग पूर्वी कधीही लिथोग्राफीमध्ये वापरले गेलेले नाहीत.’’
‘‘आपण वापरून पाहू.’’
‘‘दुसरं म्हणजे हे पोस्टर जेव्हा रस्त्यावर लागेल तेव्हा आपल्या सर्वांना तुरुंगाची हवा खावी लागेल. तुम्हाला पोस्टर केल्याबद्दल, मला तुम्हाला मदत केल्याबद्दल, चार्लस्‌ लेव्हींना छापल्याबद्दल तर झिडलरना प्रसिद्ध केल्याबद्दल.’’
‘‘जरा फुकटात थोडा हवापालट झाला तर मजा येईल. चला. ताबडतोब कामाला सुरुवात करू या.’’
आता सर्वात कठीण आणि अतिशय किचकट कामाला सुरुवात झाली. प्रथम रेखाटनाची प्रत्येक रंगछटेनुसार अनेक पायऱ्यांमध्ये विभागणी. प्रत्येक रेखाटन उलट बाजूने करायचे, त्यात मेणाच्या खडूने काळजीपूर्वक शेडिंग करायचे. नंतर त्यात छपाईची शाई भरायची. हेन्रीच्या कित्येक दिवसांच्या अथक परिश्रमानंतर लिथोग्राफीची शिळा तयार झाली.
यापुढचे काम पेर कॉटेलचे. ते तो मोठ्या नाटकी आविर्भावात करायचा. प्रत्येक वेळी श्वास रोखून, दाढी कुरवाळीत, आद्य लिथोग्राफर ॲलोइस सेनफेल्डरची करुणा भाकत.
‘‘एखादी चूक आणि सारा खेळ खल्लास.’’ डोके खाजवत तो म्हणाला. बाजूच्या शिरसाच्या द्रावणात त्याने नायट्रिक ॲसिडचे काही थेंब तोलूनमापून टाकले. ‘‘थोडं ॲसिड कमी पडलं तर इचिंग होणार नाही आणि जास्त झालं तर सर्व बारकावे जळून जायचे. मला वाटतं मनासारखं काम होईपर्यंत तीन-चार तरी शिळा फुकट जातील.’’
नशिबाने पहिल्याच शिळेचे इचिंग मनासारखे झाले आणि हेन्रीची तेच काम पुन्हा करण्यापासून सुटका झाली. दिवसरात्र सतत काम करून अखेर सर्व शिळांचे इचिंग निर्विघ्नपणे पार पडले. रंगांचे काम सुरू झाले आणि पेर कोटेलच्या चेष्टेला ऊत आला. मोठ्या मुष्किलीने त्याला हव्या त्या रंगांच्या शार्इंचे मिश्रण तयार झाल्यावर हेन्रीने सुटकेचा निःश्वास टाकला.
ज्या दिवशी इचिंगचे सर्व काम आटोपले त्या संध्याकाळी हेन्रीने मुलँ रूजमध्ये पाऊल ठेवले व पाय ओढत ओढत बार काउंटरवर गेला.
‘‘हॅलो. मस्य तुलूझ.’’ साराने बघता क्षणी हाक मारली. ‘‘बऱ्याच दिवसांत इकडे फिरकला नाहीत ते? काय झालं काय तुम्हाला? तब्येत ठीक आहे ना?’’
काउंटरच्या कठड्याचा आधार घेत धापा टाकत त्याने कोनॅक मागवली. साराने ग्लास भरून त्याच्यासमोर ठेवला.
‘‘थोडा दम खा आणि मग प्या. अशी घाईत प्याल्याने काळीज जळतं.’’
हाताच्या आधारावर आपल्या शरीराचा भार उचलून तो बारच्या स्टुलावर मोठ्या कष्टाने चढून बसला.
‘‘झिडलरना निरोप दे की पोस्टरच्या छपाईच्या शिळा तयार आहेत. लेव्हींना सांगून पेर कोटेलकडून मागवून घ्या आणि छापा म्हणावं हवी तेवढी.’’
‘‘माझी खात्री होती एक दिवस तुम्ही तुमचा शब्द खरा करून दाखवाल याची. आताच्या आता निरोप धाडते झिडलरना. तुमची रोज चौकशी करायचे ते.’’ तिच्या डोळ्यांत कौतुक होते.

No comments:

Post a Comment