Monday, October 1, 2018

मुलँ रूज - १८


हेन्री आणि त्याच्या मित्रांच्या गप्पा ऐन भरात होत्या तेवढ्यात कॅफेमध्ये दोन इसम शिरले. त्यांच्यापैकी एक बुस्साँ अँड व्हलादों गॅलरीचा व्यवस्थापक तेओ व्हॅन गॉग होता.
तो दुसरा कोण?” हेन्रीने कुजबुजत विचारले.
कोणीतरी फुकट्या दिसतोय.
तो दुसरा इसम मजबूत बांध्याचा होता. त्याच्या वेल्वेटच्या तुमानीवर रंगांचे ठिपके उडालेले होते. भुरकटलेल्या निळसर रंगाचा जर्सी त्याच्या भरदार छातीवर अगदी घट्ट बसला होता. त्याच्या डोक्यावर हॅट नव्हती. त्याचे केस विस्कटलेले होते. हेन्री व रॅचोला तेथे बसलेले पाहून तो त्यांच्या दिशेने आला.
पॉल, तुम्हाला काय हवं ते मागवा. माझं जेवण झालंय. ह्यांच्याकडे माझं थोडं काम आहे.तेओ व्हॅन गॉग त्या तरुणाची माफी मागून त्यांच्या टेबलावर येऊन बसला.
कोण तो.रॅचोने विचारले.
पॉल गोगँ. पूर्वी शेअरच्या धंद्यात होता. आता आर्टिस्ट होण्याचा किडा त्याच्या डोक्यात वळवळतोय. चांगला चालणारा धो धो पैसे देणारा धंदा सोडून इकडे आलाय.
काय भिकेचे डोहाळे लागलेयत. येडपट दिसतोय.रॅचो त्याच्याकडे बघत म्हणाला.
तो एकटाच नाहीय. माझा मोठा भाऊही त्याच माळेतला म्हणता येईल. त्यालासुद्धा आर्टिस्ट बनण्याच्या वेडाने झपाटलंय. बरेच धंदे करून पाहिलेत त्याने. बेल्जममधल्या खाण कामगारांमध्ये पाद्री म्हणून काम करून पाहिलं. पण कशातच जीव रमला नाही.
काय वयाचा आहे तुमचा भाऊ?” हेन्रीने सहज विचारले.
तेहतीस,” तेओ व्हान गॉगला थोडं संकोचल्यासारखं झालं, “मला माहीतेय, या वयात काही नवं शिकणं विशेषतः चित्रकला तर खूप कठीण आहे. कदाचित यातसुद्धा तो फारसा रमणार नाही. पण माझा भाऊ म्हणून मला थोडी मदत करायचीय. या नाताळमध्ये तो पॅरीसला येतोय. तुमच्या कॉर्मेनच्याच वर्गात मी त्याचं नाव घातलंय. माझी तुम्हा मित्रांना एक विनंती आहे. त्याला जरा समजावून घ्या. खूप हळव्या स्वभावाचा आहे तो. त्याचे फ्रेंचचे उच्चार व त्याचं वय यावरून त्याच्या फिरक्या घेऊन त्याला सतावू नका.
नाव काय त्याचं?”
व्हिन्सेंट. व्हिन्सेंट व्हॅन गॉग. तुम्ही त्याला सहज ओळखाल. अगदी माझ्यासारखा दिसतो. त्याची दाढीसुद्धा लालसर आहे माझ्यासारखी. तो तसा गमत्या आहे. फक्त ओळख व्हायचा अवकाश.

No comments:

Post a Comment