Wednesday, October 3, 2018

मुलँ रूज - २२

अर्धवट केलेल्या न्युडकडे तंद्रीत बघत असताना पाच मिनिटांची सुटी केव्हा झाली ते हेन्रीला कळलेच नाही. तो जागेवरून उठला. फक्त एका नवीन आलेला विद्यार्थी सोडला तर इतर सर्वांनी हातातले काम थांबवले होते. हेन्री त्या नवशिक्या विद्यार्थ्याकडे गेला.
‘‘तुम्ही व्हिन्सेंट व्हॅन गॉग ना? तुम्ही नाताळच्या सुटीनंतर या वर्गात नाव घालणार आहात म्हणून तुमच्या भावानं सांगितलं होतं.’’
‘‘आणि तुम्ही तुलूझ लोत्रेक.’’ नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्याने आपले चित्र काढण्याचे मधेच थांबविले व मान वर करून हेन्रीकडे बघितले. त्याचे डोळे नीलमण्याप्रमाणे चमकत होते.
‘‘तेओ व्हॅन गॉगनी मला तुमच्याविषयी सांगितलं होतं.’’
‘‘तुम्ही कधी आलात?’’
‘‘कालच. आल्याबरोबर ताबडतोब लुव्हर बघायला गेलो.’’ त्याने लुव्हरचा उल्लेख इतक्या भाबड्या उत्साहाने केला की हेन्रीला आपले हसू आवरता आले नाही. हेन्रीला हसताना बघून त्या नवख्या तरुणाच्या चेहऱ्यावरचे भाव पालटू लागले. त्याच्या नजरेतील स्निग्धता लोपली.
‘‘माझं काही चुकलं का?’’ तो चाचरत म्हणाला.
हेन्रीला वाटले की किती संवेदनशील आहे हा. तरी त्याच्या भावाने बजावून सांगितले होते.
‘‘अहो तुमची चेष्टा करण्याचा माझा उद्देश नव्हता. पॅरीसमध्ये लुव्हरशिवाय बघण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. त्या बघायच्या ऐवजी तुम्ही सरळ लुव्हरमध्ये जाऊन टपकलात. आम्ही लुव्हरला कबरस्तान म्हणतो. माहित्येय तुम्हाला.’’
लुव्हरसारख्या जगप्रसिद्ध कलासंग्रहालयाचा उल्लेख हेन्रीने कबरस्तान असा केलेला पाहून व्हिन्सेंट एक क्षणभर गोंधळला पण त्यातील व्यक्रोक्ती ध्यानात येताच त्याच्या तोंडावर हसू फुटले. त्याचा चेहरा उन्हातान्हात रापलेला होता व गालफडे थोडी वर आलेली दिसत होती. त्याच्या ओठातील हास्य हळूहळू सर्व शरीरभर पसरू लागले. लुव्हर एक कबरस्तान असे म्हणत हसता हसता त्याची लांबुडकी मान, खांदे, छाती, लांबलचक हात असे सर्व शरीर त्याच्या खदाखदा हसण्याने गदगदू लागले. त्याचे ते शरीर पिळवटल्यासारखे हसणे एखाद्या भुताने झपाटल्यासारखे वाटत होते.
हेन्री अवघडून त्याच्याकडे बघत राहिला. सर्व डच लोक असेच हसत असतील का? त्या अचानक झालेल्या हास्यस्फोटाने वर्गातल्या सर्वांच्या गप्पा थांबल्या. मॉडेलच्या स्टुलावर शून्यात नजर लावून बसलेल्या मारियाने दचकून बाजूला पडलेला गाऊन उचलून आपल्या विवस्त्र अंगावर पांघरला. एखादी प्रचंड लाट किनाऱ्यावर फुटून गेल्यानंतर वाळूवर पसरणाऱ्या फेसाप्रमाणे हळूहळू त्याचे हसू विरत गेले.
‘‘लुव्हर एक कबरस्तान. क्या बात है!’’ डोळ्यातील पाणी पुसत पुसत व्हिन्सेंट म्हणाला. त्याच्या डोळ्यांत पूर्वीची चमक परत आली होती.
‘‘तुम्ही आज आमच्याबरोबर जेवायला चला. ओग्युस्तिनाच्या हाताची चव एकदा चाखून पाहिल्यावर जन्मभर विसरणार नाही. मग वाटलं तर माझ्या स्टुडिओवर चला.” जेवताना व्हिन्सेंटला सर्वांनी प्रश्न विचारून भंडावून सोडले. हॉलंड, तेथल्या प्रसिद्ध पवनचक्क्या व कालवे, ट्युलिपची फुले, चीज वगैरे. त्याच्या नावाचा योग्य उच्चार. गॉग. डच उच्चार हॉप्‌. फ्रेंचांच्या कानाला डच भाषा तोंडात पाण्याची गुळणी केल्याप्रमाणे वाटे. हॉलंडमधील कलाविश्वाची परिस्थिती काय आहे? इथल्यासारखी कलाविद्यालये तेथे आहेत का? असल्यास तिथले पंतोजीसुद्धा इथल्यासारखे रंग घोटायला शिकवतात का? आणि ती वैताग आणणारी ॲनाटॉमीची घोकंपट्टी? रेब्रांदची कितीशी पेंटिंग तिथे आहेत? त्यातली कितीशी तुम्ही पाहिली आहेत? आणि रेब्रांदचे ते ॲमस्टरडॅम का रॉटरडॅममधील घर? पॅरीससारखी लज्जतदार खाद्य संस्कृती तिकडे आहे का? एक ना हजार प्रश्नांची सरबत्ती त्याच्यावर चालू होती आणि सर्वात मुख्य म्हणजे तिथल्या पोरी कशा आहेत? इथल्या पोरी कशा सुरुवातीला तोऱ्यात असतात. अगदी ओझरता स्पर्शही करू देत नाहीत. पण एकदा प्रेमात पडल्यावर सरळ बिछान्यात शिरतात. जेवढे जास्त डिवचावे तेवढ्या जास्त चवताळून उठतात.
तो वयाच्या बत्तिशीतला ताम्रकेशी तरुण त्या कोवळ्या पोरसवदा विद्यार्थ्यांच्या घोळक्यात घोडाच वाटत होता. त्याच्या ससाण्यासारख्या तीक्ष्ण गहिऱ्या निळ्या डोळ्यांत एक प्रकारचे गूढ आकर्षण होते. शिवाय त्याचे फ्रेंचवरील प्रभुत्व. अगदी शिव्यांसकट. त्यामुळे थोड्याच वेळात तो सर्वांच्या आकर्षणाचा विषय झाला.

No comments:

Post a Comment