Saturday, October 27, 2018

मुलँ रूज - ८२

दुसऱ्या दिवशी दुपारी तो उठला तेव्हा त्याचे डोके प्रचंड दुखत होते. तोंड कडूजार झाले होते. काल नक्की काय झाले ते तो आठवण्याचा प्रयत्न करीत होता. पण काही केल्या कसलीही सुसंगती त्याला लागत नव्हती. त्याने नकळत ग्लासात कोनॅक ओतली व एक घोट घेतला. घसा जाळत जेव्हा थोडीशी कोनॅक पोटात गेली तसे हळूहळू सगळे ताळ्यावर येऊ लागले. मग परत एक पेला...
गेल्या वर्षभरात सगळे मित्र एक एक करून तुटले होते. कोण किती सहन करील? प्रत्येकाला आपापला उद्योग होता. मॉरीसने त्याला सावरण्याचा पोटतिडिकेने खूप प्रयत्न केला खरा, पण त्यानेही कंटाळून हात टेकले. हेन्री कॉम्ते द तुलूझ लोत्रेक. इतिहास प्रसिद्ध तुलूझ लोत्रेक घराण्याच्या वंशाचा एकुलता एक दिवा. ॲबसिंथ, अपोलो बार, नावाची पाटीही नसलेला कळकट बिस्ट्रो, असह्य दुर्गंधी येणारी मुत्री, तेथे बसून केलेल्या वांत्या. यातच एके दिवशी तुलूझ लोत्रेकांच्या शेवटच्या वंशजाचा अंत होणार या कल्पनेने त्याच्या अंगावर काटा उभा राहिला. कसेही करून यातून स्वतःला बाहेर काढले पाहिजे. मॉरीससुद्धा अंतरल्यात जमा होता. त्याला आईची आठवण झाली. ममा, मला तुझ्या कुशीत घे ग.
‘‘रिरी. मों पेती. बरं झालं तुम्ही इकडे रहायला आलात.’’ आई शेकोटी जवळच्या आरामखुर्चीत बसली होती. ‘‘किती वाट बघत होते तुमची.’’
जोसेफने चहा व बिस्किटे आणून ठेवली. जोसेफ गेल्यावर हेन्रीने आईजवळ जाऊन तिच्या गालाचे हळूच चुंबन घेतले.
‘‘काय दशा करून घेतलीयत स्वतःची.’’ आईने त्याला थोपटत म्हटले, ‘‘अगोदर थोडी बिस्किटे खाऊन घ्या व गरमागरम चहा प्या.’’ तिने बिस्किटांची बशी पुढे केली व कपात चहा ओतला.
पुढचा एक तासभर ती त्याला संसारातील किरकोळ घरगुती गोष्टी मोठ्या आस्थेने तपशीलवार सांगत होती. बशीभर बिस्किटे, दोन कप चहा आणि शेकोटीची ऊब यांनी हेन्रीला थोडे बरे वाटले आणि डोळ्यांवर झोपेची झापड आली. डोळे क्षणभर मिटतात तोच त्याच्या घशाला कोरड पडली. डोळ्यांसमोर हिरव्या रंगाच्या ॲबसिंथची बाटली दिसू लागली. बार काउंटरचे दृश्य नजरेसमोर तरळू लागले.
त्याने डोळे उघडले व आईच्या हातावर हात ठेवून म्हणाला, ‘‘ममा, प्लीज मी एक ड्रिंक घेऊ का?’’
त्याचे हात कापत होते, कपाळाववर घर्मबिंदू गोळा झाले, अंग थंडगार पडू लागले. आईने त्याची अवस्था पाहिली व ती ताबडतोब उठली. तिने कपाटातून कोनॅकची बाटली काढली व एका ग्लासात ओतली.
‘‘हेन्री! ही घ्या.’’ त्याच्यासमोर ग्लास ठेवीत ती म्हणाली.
‘‘मला माफ करा ममा.’’ त्याने एका घोटात पेला रिकामा केला. मद्य पोटात जाताच त्याच्या हाताचा कंप थांबला. आईच्या नजरेला नजर देत तो म्हणाला, ‘‘आता तुम्हाला समजलं असेल?’’
‘‘मला ठाऊक होतं रिरी.’’
‘‘पण तुम्हाला माहीत नसेल मी किती पितो ते.’’ हेन्रीचा आवाज पडला, मान खाली गेली. ‘‘मी तुम्हाला फसवायचो. पहिल्यांदा जेव्हा दारू प्यालो तेव्हा तुम्हाला वास येऊ नये म्हणून मी तुमच्या जवळ येण्याचे टाळलं. सुरुवाती सुरुवातीला दारू प्याल्यावर पायातील वेदनांचा थोडा वेळ विसर पडायचा. शिवाय आपण दारू पचवू शकतो याचा किंचित अभिमानही वाटायचा. एखाद्या सद्‌गृहस्थाप्रमाणे माझा आपल्या पिण्यावर ताबा आहे असं वाटायचं. पण हळूहळू दारूने माझ्यावर केव्हा ताबा मिळवला ते कळलंच नाही. आता दारू प्या किंवा न प्या पाय दुखतच असतात. या दारूमुळे मी कोणत्या गर्तेत पडलोय याची तुम्हाला कल्पना नसेल. कालच एका बिस्ट्रोमध्ये झिंगून पडलो होतो. मला उचलून लॉजवर न्यावं लागलं. दिवसातील बराच वेळ मी शुद्धीत नसतो. जेव्हा शुद्धीत येतो तेव्हा मला काहीही आठवत नसतं. मी कोणतेही काम करीत नाही. जवळ जवळ वर्षभर मी ब्रशसुद्धा हातात धरला नाहीय. मला कोणी मित्र उरले नाहीयत. फक्त मॉरीस राहिला होता. काल त्याच्याशीसुद्धा भांडून मी इकडे आलोय.’’
‘‘ममा, मला जगायचंय. प्लीज. मला तुमची मदत हवीय. मला यातून सुटायचंय. मी डॉक्टरांचे उपचार घेईन. आपण कुठेतरी जाऊ या. बर्जेस्‌ नाही तर एव्हीअँ. आठवतंय? मी लहान असताना तुम्ही मला घेऊन गेला होतात.’’
त्याचे बोलणे आई लक्ष देऊन ऐकत होती. त्याच्या बोलण्यातील लहान मुलाचा उत्साह करुणाजनक वाटत होता. त्याच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग प्रौढ न होता आहे तसाच बालीश राहिल्याने त्याची सत्य व भ्रम यात सदैव गल्लत होत होती.
‘‘ठीक आहे. तुम्हाला आवडत असेल तर आपण एव्हीअँला जाऊ या. उद्या चालेल. दुपारी गाडी आहे. आता झोपा. सकाळी उठल्यावर तयारी करू.’’ असे म्हणून ती झोपण्याच्या खोलीत निघून गेली.
इकडे हेन्री बिछान्यात तळमळत पडला होता. एका क्षणिक उत्साहाच्या लाटेत त्याने आईबरोबर एव्हीअँला जायचे ठरविले होते. एव्हीअँ एक निसर्गसुंदर स्थळ आहे. हॉटेल समोर तलाव आहे. खिडकीतून आल्प्स पर्वत दिसतो. पण तेथे आईबरोबर असताना दारू पिण्याची तलफ आली तर काय करणार? जेव्हा घशाला कोरड पडेल, जीभ जड होईल तोंडातील थुंकीसुद्धा गिळण्याचे त्राण उरणार नाही तेव्हा काय? एखाद्या रात्री स्त्रीदेहाची आठवण होईल. तिथे थोडीच ल फ्लूर ब्लांसारखी सोय असेल? पूर्वी ठीक होते. तेव्हा मी एक लहान मुलगा होतो. आता पस्तिशी उलटलेला घोडा झालोय. त्यात दारुडा. आपल्याला हे एव्हीअँ वगैरे काही परवडणार नाही. त्यापेक्षा मोंमार्त्र व तेथील बिस्ट्रो बरे. आईसमोर जास्त काही तमाशा होऊन तिला जास्त दुःख देण्यापेक्षा लवकरच येथून काढता पाय घेतलेला बरा.
त्याने हळूच आपली काठी उचलली आणि तो पाऊल न वाजवता तिथून सटकला.
रात्री मादाम ल्युबेतला कसल्यातरी गडबडीने जाग आली. तिने हेन्रीचा आवाज ताबडतोब ओळखला. तो कोणावर तरी जोरात ओरडत होता. एवढ्या मोठ्याने की आसपासच्या सगळ्यांना जाग आली. तिने खिडकीतून खाली पाहिले. हेन्री पाटूला मोठमोठ्याने शिव्या घालत होता.
‘‘तुला माझ्या भानगडीत नाक खुपसायची गरजच काय? माझ्यावर येथे लॉजवर येण्याची जबरदस्ती तू का करतोयस? मला तिथे जायचं नाहीय. तिथे किती झुरळं आहेत तुला ठाऊक नाहीय. पाजी. डुक्कर कुठला.’’
पाटूने गाडीवानाच्या मदतीने त्याला बाहेर काढले. मादाम ल्युबेत धावत धावत खाली गेली. हेन्रीचे कपडे चुरगळलेले होते. टायची गाठ ढिली झाली होती. नाकातून किंचित रक्त येत होते. ओठ सुजले होते. कपाळावर टेंगूळ आले होते. डोक्यावरची महागडी डर्बी हॅट कुठेतरी हरवलेली दिसत होती. गेल्या सहा महिन्यांत अशा डझनभर हॅट हरवल्या होत्या. पाटूने त्याला उचलून वर आणले व मादाम ल्युबेतच्या मदतीने बिछान्यात आडवे केले.
‘‘काउंटनी फारसा त्रास दिला नाही ना?’’ मादाम ल्युबेतने विचारले.
‘‘पिऊन ओकले नाहीत एवढेच. दिवसेंदिवस यांचं पिणं फार वाढत चाललंय. मोंमार्त्रमधल्या सगळ्या बिस्ट्रोना तंबी देऊन ठेवलीय की यांना जास्त दारू देऊ नका म्हणून. तर आज हे साहेब दुसऱ्या भागात गेले. तेथे या काउंटना ओळखणारं कोणी नव्हतं. यांनी तिथे होत्या नव्हत्या त्या सगळ्या प्रकारच्या दारूचा एक एक पेग मागवला. व्हिस्की, रम, ब्रँडी, व्हरमाउथ, ॲबसिंथ, कॅल्व्हॅडोज्‌. एवढ्याने एखादा घोडासुद्धा आडवा होईल.’’ पाटू सांगत होता, ‘‘गेली पंधरा वर्षे मी यांना ओळखतोय. तुमच्यासारखी माझीही माया आहे त्यांच्यावर. समजवायला हे काही लहान राहिले नाही. स्वतःलाच मारायचे ठरवल्यावर आपण दोघं किती पुरे पडणार? मी बरेच दारुडे पाहिलेयत. पण यांच्यासारखा पागल कोणी अजून पाहिला नव्हता.’’
हेन्रीची अवस्था पाहून मादाम ल्युबेतच्या डोळ्यांतून पाणी आले. त्याच्या काळजीने त्या दोघांचाही जीव तीळ तीळ तुटत होता. दोघांनी हेन्रीची दारू कशी सोडवता येईल याचा बराच खल केला. रात्रीचा शेवटचा प्रहर चालू होता. पाटू जायला निघणार एवढ्यात हेन्रीच्या किंकाळ्यांनी ते दचकले. हेन्री आपल्या खोलीचा दरवाजा धाडकन उघडून बाहेर आला. त्याचे डोळे भीतीने विस्फारले होते.
‘‘मादाम ल्युबेत मला वाचवा. मला वाचवा. ती झुरळं येतायत. कितीही मारली तरी संपत नाहीयत. एका मागोमाग एक हजारो, लाखो झुरळं माझ्या अंगावर येतायत. मला वाचवा. नाही तर ही झुरळं मला कुरतडून खाऊन टाकतील.’’ हेन्री नसलेली झुरळं झटकून टाकण्याचा प्रयत्न करीत होता. त्याचा चष्मा त्याच्या नाकावर नव्हता. अर्धवट उजेडात चाचपडत त्याने जिन्याच्या कठड्याचा आधार घेण्याचा प्रयत्न केला. त्याचा पाय त्याच्या पायघोळ पायजम्यात अडकला व तो जिन्यावरून गडगडत खाली गेला.
(फोटो – लोत्रेक मद्यपान करताना)



No comments:

Post a Comment