Thursday, October 4, 2018

मुलँ रूज - २४

लूव्हरवरून चाललेल्या वादविवादाचा ओघ व्हिन्सेंटकडे वळला. रोजच्या जगण्यातील विषय जास्त महत्वाचे होते. रंग उधारीवर कुठून घ्यावेत, चारकोल फिक्सर स्वस्तात कुठे मिळतो, ॲनाटॉमीचे मॅन्युअल जुन्या बाजारात कुठे मिळते या आणि इतर अनेक बारीकसारीक बाबतीत उलटसुलट सल्ले व्हिन्सेंटला बसल्या जागी मिळाले. तो अगदी गोंधळून गेला. गप्पांच्या ओघात लांबलेले जेवण संपता संपता फिरून एकदा, चित्राच्या त्रिकोणात्मक रचनेचे महत्त्व, रंगांचे गुणधर्म, रंगचक्रावरील त्याचे स्थान आणि रंगसंगती, रेषेवरील हुकमत वगैरे बाबींचा आपल्या पेंटिंगची सॅलूनमध्ये निवड होण्यासाठी कितपत उपयोग होईल यावर जोरदार वितंडवाद झाला. जेवण संपले तरी मुद्दे संपले नाहीत. त्यामुळे कॅफेमधून बाहेर पडल्यावर भर रस्त्यात त्याच विषयांवर नव्या मुद्द्यांनी जोरदार चर्चा चालूच राहिली. दिवसाअखेरी सर्वजण आपापल्या दिशांना पांगेपर्यंत.
रू कुलँकूर येईपर्यंत व्हिन्सेंट अगदी गप्प होता. जिना चढता चढता तो गंभीरपणे म्हणाला, ‘‘मला वाटलं होतं पॅरीसला येऊन चित्रकलेतलं काहीतरी शिकता येईल. पण भावाचं म्हणणं खरं दिसतंय. नवं काही शिकण्याच्या दृष्टीने माझं वय जास्त आहे.’’ मोंमार्त्रमध्ये फिरताना रस्ता चुकलेल्या नवख्या माणसासारखा तो गोंधळलेला दिसत होता.
‘‘तुम्ही असे निराश होऊ नका मस्य व्हिन्सेंट. ही त्रिकोणात्मक रचना, रंगांचं संतुलन जेवढं वाटतं तेवढं मुळीच कठीण नाहीय. सुरुवातीला सगळ्यांनाच नवीन असतं. थोड्या दिवसात सगळं जमू लागेल तुम्हाला.’’ हेन्रीने दिलासा दिला.
स्टुडिओ येईपर्यंत त्या दोघांतील औपचारिकपणा जाऊन तो हेन्रीच्या मोंमार्त्रमधील मित्रांच्या टोळक्यातील एक सदस्य झाला. स्टुडिओत शिरल्यावर हेन्रीने व्हिन्सेंटकडे त्याची स्केचेस बघायला मागितली.
‘‘पहिल्यांदा तुझं पेंटिंग बघू दे.’’ अर्धवट काढून झालेल्या इकॅरसकडे बघत व्हिन्सेंट म्हणाला, ‘‘वा! काय छान काम केलंयस. तुझी ॲनाटॉमी अगदी पक्की दिसतेय बरं का. ती नावं माझ्या लक्षात राहत नाहीत.’’
‘‘असा घाबरतोस काय ॲनाटॉमीला. नागडी बाई काढता येते ना. आता उरोजांना आणि कुल्ल्यांना लॅटिनमध्ये काय म्हणतात ते लक्षात ठेवलं की झालं. तुझं म्हणणं खरंय. लॅटिन लक्षात ठेवायला थोडं कठीण जातं. तू असं कर. अभ्यास करायला माझ्याकडेच येत जा. सगळी ॲनाटॉमी आपण पाठ करून टाकू.’’
‘‘स्त्रियांपेक्षा मला शेतात राबणारे शेतकरी रंगवायला आवडेल. दिवसभराच्या अंगमेहनतीने दमलेले शेतकरी कधी पाहिलेयस तू? आपल्या शर्टाच्या बाहीने कपाळावरचा घाम कसा पुसतात ते. माझी रेषा त्यांचे श्रम घेऊन कागदावर उमटली पाहिजे. उन्हात चमचमणारी शेते, झाडे, फुले आणि आकाशीचा सूर्य हे सगळं काही मी रंगांत पकडण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी मला केवढा पिवळा रंग लागेल नाही? एकदम पिवळाधम्मक. देवाचा रंग कोणता ठाऊक आहे. पिवळा. म्हणूनच त्याने सूर्य पिवळ्या रंगाचा केलाय.’’
व्हिन्सेंटचे असे भारावून जाऊन बोलणे हेन्रीला थोडसे चक्रमपणाचे वाटले. तो त्याच्याकडे नजरेच्या कोपऱ्यातून बघत होता. ‘‘तुझ्या देवाला ढीग पिवळा रंग आवडत असेल, पण आपल्या कॉर्मेन मास्तरांना मात्र फक्त तपकिरी आणि तपकिरी रंगच आवडतो बरं का. व्हॅन डाइक आणि रॉ अँबर. येथे असेपर्यंत दुसऱ्या रंगाचं नावसुद्धा काढू नकोस.’’
व्हिन्सेंटचे लक्ष कोपऱ्यात पडलेल्या एका लहान कॅनव्हासकडे गेले. त्याने झटकन पुढे जाऊन तो कॅनव्हास उचलला.
‘‘ल एलीसमध्ये नाचणाऱ्या एका मुलीचं पेंटिंग आहे ते. आज रात्री प्रत्यक्षच बघू या तिला.’’
‘‘ओह! काय छान जमलंय तुला. तुझ्या या मोठ्या कॅनव्हासपेक्षा खूपच जिवंत आणि अस्सल. नर्तकीच्या नाचाची गती, मद्य आणि संगीताची धुंद चढलेली गर्दी सर्व काही अप्रतिमपणे उतरलंय या कॅनव्हासवर. एवढंच नव्हे तर वातावरणातील मद्य आणि तंबाखूचा गंधसुद्धा येतोय या कॅनव्हासमधून. टक लावून पाहिलं तर यातील संगीताच्या सुरावटीवर नकळत पाय ताल धरतील. त्या इकॅरसपेक्षा तू हाच कॅनव्हास अगोदर पुरा कर.’’
‘‘मी ऐकलं होतं की डच लोक चटकन आपल्या भावना व्यत्त करत नाहीत. पण तू अपवाद दिसतोयस. आमच्या पिताजींचं या पेंटिंगविषयी काय मत आहे ते तुला माहीत नाहीय. त्यांच्या मते हे एकदम फालतू आणि अश्लील आहे.’’
‘‘तू सगळ्या गोष्टी त्यांच्या परवानगीनेच करतोस वाटतं?’’
‘‘तसं मुळीच नाही.’’
‘‘मग तर तुला काय हरकत आहे?’’
‘‘इकॅरसला अगोदर हात घालायला आणखी एक कारण आहे. सॅलूनच्या वार्षिक प्रदर्शनासाठी एक पेंटिंग पाठवायचंय. तेथे या कॅनकॅन नर्तकीला हाकलवून देतील. चल. आता तुझं स्केच बुक दाखव बरं.’’
व्हिन्सेंटने भीत भीत आपला पोर्टफोलियो त्याच्या हातात दिला. ‘‘मी चित्रकलेचा तसा अभ्यास केलेला नाहीय. काहीतरी खरडलंय झालं.’’ तो संकोचाने अगदी आक्रसून गेला होता.
‘‘हे अगदी सुरुवातीच्या चित्रांपैकी. ही मिलेटची कॉपी,’’ तो एकामागोमाग एक चित्रे दाखवीत होता. ‘‘हे रॉटरडॅमचे दृश्य, हे फिशरमन, ही सीन नदी आणि हे ब्रेबँटचे शेतकरी. पोटॅटो इटर्स.’’
(पोटॅटो इटर्स हे गडद काळपट रंगातील पेंटिंग पुढे जगप्रसिद्ध झाले. ते सध्या ॲमस्टरडॅममधल्या व्हिन्सेंट व्हॅन गॉग म्युझियममध्ये आहे)
‘‘आणखी आहेत की एवढीच.’’
‘‘आणखी बरीच आहेत. खाणीतल्या कामगारांची, शेतकऱ्यांची. भावाकडे ठेवायला दिलीयत.’’
बाहेर हळूहळू अंधारून येत होते. हेन्रीने चित्रे खाली ठेऊन दिली.
‘‘माझा पोर्टफोलियो बघून तुला काय वाटतं? जमेल मला चित्रकार व्हायला.’’
‘‘व्हिन्सेंट, तुझी चित्रं मला खूपच आवडलीत. असं वाटतं की तुला काहीतरी सांगायचंय तुझ्या चित्रांतून. पोटॅटो इटर्स. उकडलेले बटाटे खाऊन भूक भागवणारे ते गरीब शेतकरी अगदी विलक्षण प्रत्ययकारी वाटतात.’’
‘‘तुला खरंच असं वाटतं का? अगदी मनापासून? ’’ तो कापऱ्या आवाजात म्हणाला, ‘‘खरं सांग. जमेल ना मला चित्रकार व्हायला?’’
‘‘जमेल म्हणून काय विचारतोस? तू एक चांगला चित्रकार आहेसच.’’
व्हिन्सेंटला धन्य वाटले. ‘‘थँक्यू सो मच. कोणाला तरी असं वाटतंय हेच खूप आहे.’’
बराच वेळ ते दोघे एकमेकांकडे मूकपणे बघत होते. शेवटी शांततेचा भंग करत व्हिन्सेंट म्हणाला, ‘‘आपली दोस्ती चांगली जमेल.’’
‘‘तू पॅरीसला आलास ते किती बरं झालं. चल, आपण नुव्हेलमध्ये जाऊन बीअर घेऊ या.’’

(पोटॅटो ईटर्स – व्हॅन गॉग – तैलरंग कॅनव्हास – ८२x११४ से.मी. - १८८५ –
व्हॅन गॉग म्युझियम, अमस्टऱडॅम)



No comments:

Post a Comment