Friday, October 19, 2018

मुलँ रूज - ६१

एके दिवशी त्याने हळूच जाहीर केले की एका महत्वाच्या कामासाठी त्याला दोन-तीन दिवस पॅरीसच्या बाहेर जावे लागणार आहे. तीन दिवस बेबेरबरोबर घालवायला मिळणार याचा आनंद तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून जात होता, पण तिने मी घरीच राहते वगैरे खूप नाटक केले. इतके की त्या तद्दन खोटेपणाची त्याला उबग आली. मग त्यानेसुद्धा अधिक खोलात न जाता तिला तिच्या बहिणीकडे जाण्याची परवानगी दिली व वर थोडे पैसेही. त्या दिवसांत त्याने स्वतःला स्टुडिओत कोंडून घेतले व सपाटून काम केले. त्या तीन दिवसांत तो पूर्ण ताळ्यावर आला. शेवटचा फटका मारण्याचा कठोर निर्णय त्याने घेतला. एकदा हे नक्की झाल्यावर त्याला जाणवले की हे वाटते तितके सोपे नाही. संसारात दुःखी असणारी कित्येक जोडपी वेगळे होण्यापेक्षा आहे तसेच फरफटत जगणे का पसंत करतात हे त्याला उमगले. सहजीवनातल्या परवडीपेक्षा वेगळे होण्यातील दुःख कितीतरी पटीने मोठे असते.
तिची पाठवण कशी करावी याचा त्याने नीट विचार केला. आपण तिला घालवून दिल्यावर मिळकत बंद झाली म्हणून बेबेर तिला थारा देणार नाही याची त्याला कल्पना होती. मग ती कुठे जाईल, काय करेल, कशी जगेल? अंधाऱ्या गल्लीबोळातील चोरटा वेश्या व्यवसाय, पाठीवर पोलिसांचा ससेमिरा, कधीतरी पकडले जाऊन सँ लझार सुधारगृहात रवानगी, कार्ड, फार तर एखादे अधिकृत वेश्यागृह, दारूचे व्यसन, घाणेरडे रोग व शेवटी एखाद्या गटाराच्या कडेला आलेला बेवारशी मृत्यू.
मनाचा निश्चय करण्यात एक आठवडा गेला. सप्टेंबरमधल्या एका शांत दुपारी सगळे धैर्य गोळा करून तो म्हणाला,
‘‘मारी, बरेच दिवस मी या गोष्टीचा विचार करतोय. आता हे सगळं थांबवायची वेळ आलीय.’’
हे तिला अगदी अनपेक्षित होते. तिने गोंधळून त्याच्याकडे पाहिले व म्हणाली,
‘‘म्हणजे मी तुम्हाला नकोशी झालेय का?’’
‘‘तसं नव्हे. प्लीज मला समजून घे. हे बघ, तू एका रात्रीसाठी म्हणून माझ्याकडे आलीस. त्याला आता सात महिने होतील. या सात महिन्यांत तू मला खूप सुख दिलंस. त्याबद्दल मी तुझा आभारी आहे. पण कोणत्याही गोष्टीला शेवट हा असतोच. तेव्हा शक्य तितक्या समजुतीने आपण हे थांबवूया.’’
त्याने आपल्या कोटाच्या खिशातून एक पाकीट बाहेर काढले. ‘‘हे बघ. मी तुझ्यासाठी काय आणलंय ते.’’
तिचा चेहरा काळाठिक्कर झाला. या गोष्टीचा नेमका अर्थ तिच्या मठ्ठ डोक्यात नीट शिरला नसला तरी तिच्या शरीराला मात्र तो चांगलाच जाणवला होता. कसायाच्या पुढ्यातील बकरी जशी प्राणभयाने थरथर कापू लागते तसे तिचे सर्वांग कंप पावू लागले. जैविक अस्तित्वाला धोका पोचल्यावर शारीरिक जाणीव बौद्धिक जाणिवेवर कशी कुरघोडी करते ते पाहणे मोठे भयप्रद होते.
‘‘इथे बस बघू माझ्या जवळ.’’
ती अगदी खिळून गेल्यासारखी उभी होती.
‘‘मी काय केलं? माझं काही चुकलं का?’’ बोलताना ती अडखळत होती. ‘‘मी एवढी चांगली वागत होते. पाहिजे तर नागव्याने पोज देईन...रोज फरशी घासेन.’’ तिला जसे पढवले होते त्याबरहुकूम वागूनसुद्धा अखेर हेच फळ पदरात पडले काय असा दयनीय भाव तिच्या बोलण्यातून प्रकट होत होता.
‘‘तुझा यात काही दोष नाहीय.’’
‘‘आता बघा तुम्ही आपल्या तोंडाने कबूल करताय की माझे काहीही चुकलेलं नाही. तरी तुम्ही...’’
‘‘तसं नाही मारी. पाहिजे तर माझंच चुकलं असं म्हणेनास का? शब्दाला शब्द वाढवण्यात काय अर्थ आहे.’’
त्याने ते पाकीट पुन्हा तिच्या पुढे केले. ‘‘उघडून तर बघ. तुझ्या नावाचा ढकलगाडीचा परवाना. यासाठीच तू बँकेत पैसे साठवीत होतीस ना?’’
तिच्यावर ओढवलेल्या प्रसंगाचे परिणाम तिच्या लक्षात येऊ लागले. बेबेरने सांगितलेल्या नाटकातील भूमिकेचे भान विसरून अनावधानाने ती म्हणाली, ‘‘हे सगळं मी बेबेरला कोणत्या तोंडाने सांगू? तो म्हणेल माझंच काही चुकलं असेल. कृपा करून मला माघारी जायला सांगू नका. तुमच्या पाया पडते मी. तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे. शंभर फ्रँक जास्त वाटत असतील तर पहिल्यासारखे पन्नास द्या. चाळीससुद्धा चालतील. नाही तर तुम्हाला काय द्यायचे असतील तेवढे द्या. पण कृपा करून मला येथून जायला सांगू नका.’’
तिच्या गळ्यात हुंदका दाटून आला. डोळे पाण्याने डबडबले. ती त्याच्यासमोर गुडघे टेकून बसली आणि त्याच्या हाताची चुंबने घेऊ लागली.
‘‘प्लीज. माझं ऐक.’’
पण ती काही ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हती. तिने आवेगाने ब्लाऊज फाडून आपली छाती त्याच्यासमोर उघडी केली. दोन हातात आपला स्तन घेऊन त्याला दाखवीत ती म्हणाली,
‘‘बघा माझी थानं कशी घट्ट आहेत. तुम्हाला आवडतात ना. घ्या तुमच्या हातात. काय पाहिजे ते करा. दाबा, आवळा, मी काहीही बोलणार नाय.’’
हुंदके देत तिने आपली चड्डी काढली व स्कर्ट वर करीत त्याला कोचावर खेचण्याचा प्रयत्न केला. पण या वेळी ही मात्रा लागू पडत नाहीसे पाहून तिने अचानक आपला पवित्रा बदलला, नांगी वर उचलेल्या विंचवासारखा.
‘‘तुमचे मनसुद्धा तुमच्या चेहऱ्यासारखे कुरूप आहे. तुम्ही अगदी नंबर एकचे दुष्ट माणूस आहात. फेंगड्या पायाचा बुटबैंगण. जशी चाल तसेच वागणे. तुमचा हात अंगाला लागला की अंगावर झुरळ चढल्यासारखं वाटतं. बेबेरने माझ्यावर जबरी केली नसती तर कितीही पैसे दिले तरी मी तुम्हाला जवळसुद्धा येऊ दिलं नसतं एवढे तुम्ही विद्रुप आहात.’’
‘‘तुमचं हे खुरटेपण म्हणजे तुम्हाला मिळालेली एक शिक्षाच आहे. लई बेस्ट झालं तुम्ही खुरटे निपजलात ते. मी काय म्हणतेय ते कानात शिरतंय का तुमच्या?’’
किंचाळल्यासारख्या आवाजात बोलताना ती कुचेष्टेने हसत होती. तिच्या प्रत्येक शब्दात नागिणीच्या फुत्कारातील विखार होता. सगळे तारतम्य सोडून ती बरळत होती. ज्या समंजसपणाने हा प्रश्न सोडवण्याचे त्याने ठरविले होते ते आता शक्य नव्हते. त्याचा निश्चय अधिकच दृढ झाला आणि पुढचे काम सोपे झाले. शेवटी तिचे तोंड बंद करण्यासाठी त्याला पाटूला बोलावण्याची धमकी द्यावी लागली तेव्हा कुठे ती ताळ्यावर आली. तिने पटापट कपडे केले.
‘‘माझं सगळं सामान माझ्या बहिणीकडे पाठवून द्या.’’
‘‘तू बेबेरकडे का जात नाहीस?’’
‘‘तो मला घरात घेणार नाही. त्याचं दुसऱ्या एका मुलीवर प्रेम आहे. त्याला फक्त माझे पैसे हवेयत.’’
‘‘आपलं ज्याच्यावर प्रेम नाही अशा व्यक्तिवर प्रेम करण्याचे दुःख तुझ्याही वाटेला आलेलं दिसतंय. ठीक आहे. काही काळ एकट्याने काढावा लागेल. एखादा दयाळू, प्रेमळ माणूस तुझ्या जीवनात लवकरच येवो अशी आशा करू या.’’
त्याच्या बोलण्याकडे तिचे लक्ष नव्हते. तिने केस सारखे केले. एखाद्या लहान मुलीसारखे गालावरचे अश्रू पालथ्या मुठीने पुसले. तिच्या त्या बालिश आविर्भावाने त्याचे मन करुणेने भरून आले. तिने त्याच्या हातातील पाकीट घेतले आणि आभारसुद्धा न मानता मागे वळून यंत्रवत जडपणे दरवाजाबाहेर निघून गेली.
ती गेल्यावर स्टुडिओ सुना सुना वाटू लागला. संध्याकाळची वेळ होती. सूर्यकिरणांच्या तिरिपीत माशा उडताना दिसत होत्या. तिच्या पावडरीचा उग्र वास मागे दरवळत होता. तो जायला आणखी दोन-तीन दिवस लागले असते.
तो जागचा उठून इझलजवळ गेला. त्याने पॅलेट हातात घेतले व झपाट्याने रंगकाम करायला सुरुवात केली.

(रेड हेअर गर्ल वुईथ व्हाईट ब्लाऊज – तुलूझ लोत्रेक – तैलरंग, कॅनव्हास, १८८८)
म्युझियम ऑफ फाईन आर्ट्स, पॅरीस

No comments:

Post a Comment