Thursday, September 27, 2018

मुलँ रूज - ६


नीसमध्ये मुक्काम असताना एक चमत्कार घडला. त्या वेळी ती दोघे ग्रँड हॉटेल द सिमेझमध्ये राहत होती. एके दिवशी उठल्याबरोबर हेन्रीला काहीतरी वेगळेच वाटले. रोजच्यासारखी तापाची कडवट चव आज तोंडात नव्हती. त्याने श्वास घेतला. त्याला मिमोसाच्या फुलांचा ओळखीचा वास आला. बागेत मिमोसाला मोसमातला पहिला बहर आला होता. त्याने आनंदाने आईला हाक मारली.
ममा, ममा. काल रात्री माझे पाय दुखले नाहीत. आतासुद्धा दुखत नाहीयेत. आणि बघितलेत का. मला आज ताप नाही आलाय.त्याने एका दमात सगळे सांगून टाकले.
ताप नाही आला. तुम्हाला कसं कळलं?” आईने कपाळाला हात लावून पाहिला.
तिने जेव्हा थर्मामीटर लावून पहिला तेव्हा तिला आपले आनंदाश्रू लपवता आले नाहीत. गेल्या दोन वर्षांत सकाळी ताप आला नाही असे पहिल्यांदाच घडत होते. त्या दिवशी संध्याकाळीसुद्धा ताप आला नाही. थोड्या दिवसांनी डॉक्टरांनी निश्चित स्वरूपाची सुधारणा होतेय हे मान्य केले. त्याची मोडलेली हाडेसुद्धा जुळून यायला लागली होती. निराशेच्या खोल गर्तेत पडलेल्या मायलेकरांना आशेचा किरण दिसतोय हे कबूल करायला भीती वाटत होती.
शेवटी तो सुदिन एकदाचा उगवला. हेन्रीच्या पायांचे प्लॅस्टर डॉक्टरांनी काढून टाकले. पायांची हाडे इतक्या ठिकाणी सांधली होती की त्यांची वाढ पहिल्यासारखी होणे कठीण होते. पण हेन्रीला कुबड्या घेऊन चालणे शक्य होणार होते. सुधारणा अशाच वेगाने चालू राहिली तर काय सांगावे. हेन्री कदाचित आपल्या पायांनी चालू शकणार होता. फक्त आधाराला एखादी काठी लागली असती इतकेच. हेन्री आता पौगंडावस्थेत प्रवेश करत होता आणि त्या वयाचा त्याच्या शरीरावर जादूई परिणाम व्हायला लागला होता.
डॉक्टर गेल्यावर त्या मायलेकरांनी एकमेकांच्या कुशीत तोंड लपवून मनसोक्त रडून घेतले.
दिवस भराभर उलटत होते. आई त्याला पुस्तक वाचून दाखवे. बिछान्यावर पट ठेवून ती दोघे चेकर्स खेळत. कधी कधी उशांची फेकाफेक. आजारपणात करपून गेलेल्या बालपणातल्या दिवसांची जणू भरपाईच चालू होती. कित्येक वेळा हसण्या-खिदळण्याला इतका ऊत येई की मायलेकरांचे ते खेळणे बघून नोकरचाकरांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहत. जेवताना हेन्रीला कोंबडीचा एखादा तुकडा नाहीतर पावाची एखादी काप किंवा चमचाभर कस्टर्ड यांचा आग्रह व्हायचा. आईने त्याला चित्रकलेचे सर्व साहित्य नव्याने आणून दिले. हेन्रीला तर कानात वारे शिरलेल्या शिंगरासारखे झाले होते. आपल्याला पुन्हा चालता येईल, चित्रे काढता येतील या सर्वांपेक्षा त्याला आनंद व्हायचा तो आईला आनंदी बघून.
डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्याची आजारपणामुळे तीन-चार वर्षं खुंटलेली वाढ चालू झाली खरी, पण फक्त कंबरेच्या वरील शरीराची. छाती रुंदावली, खांदे भरले, पण पाय मात्र होते तसेच राहिले. किडकिडीत, लहानखुरे. त्याच्या चेहऱ्यावरील बाल्याचा नाजूकपणा एखाद्या मुखवट्यासारखा गळून पडला. आवाज फाटला. चाफेकळीसारख्या नाजूक नाकाचे रूपांतर फताड्या नाकात झाले. ओठ बाहेरच्या अंगाला वळल्याने बटबटीत दिसू लागले. डोळ्यांना जाड भिंगांचा चष्मा लागला. चेहऱ्यावर, हातांवर आणि छातीवर दाट काळेभोर केस उगवू लागले. वर्षभरातच हेन्री एखाद्या मोठ्या पुरुषासारखा बाप्या दिसू लागला. इतके दिवस थांबलेल्या निसर्गाने घाईघाईत शैशवातील एका कोवळ्या मुलाचे मोठ्या पुरुषात रूपांतर केले. पण त्या घाईत पौगंडावस्थेची पायरी गळून गेली होती.
अशा रीतीने थोड्याच दिवसात त्याच्या कंबरेच्या वरचे शरीर एका मोठ्या दांडग्या पुरुषासारखे दिसू लागले. पण कंबरेच्या खालचा भाग मात्र एखाद्या किडकिडीत लहान मुलाचा राहिला. त्याच्या शरीरात झपाट्याने होत असलेला हा विचित्र बदल पाहून त्याची आई घाबरून गेली. तिने डॉक्टरांना विचारले. त्यांनी कोणत्यातरी ग्रंथींच्या स्रावात काहीतरी बिघाड झाला असावा असे निदान केले. पण त्यावर काही इलाज नव्हता. हा नवा आघात, नवे सत्य तिला स्वीकारणे खूप कठीण गेले. अंथरुणाला खिळलेला एक पांगळा लहान मुलगा पत्करायची तिच्या मनाची तयारी होती. पण खाली लहानखुरे आखूड पाय आणि वर मात्र बटबटीत चेहऱ्याचे बेंगरूळ शरीर असे विचित्र मूल स्वीकारायला तिचे मन तयार होईना. हाच का आपला लहानगा रिरी. तिने काउंटना पत्र लिहून बोलावून घेतले.
काउंटसाहेब जेव्हा हेन्रीच्या खोलीत शिरले तेव्हा त्यांनी त्याला ओळखलेच नाही.
पपा,” पलंगावर पडलेल्या हेन्रीने हाक मारून त्यांचे लक्ष वेधले. आता मला चालता यायला लागलं बरं का.पांघरूण उडवून मोठ्या उत्साहाने तो पलंगावर उठून बसला. हा कोण अनोळखी इसम, दाढीदीक्षित, बुटबैंगण, खुरट्या पायांचा, खुजा, जाड भिंगांच्या चष्म्यामधून आपल्याकडे बघत हसतोय. हा आपला एकुलता एक मुलगा, तुलूझ लोत्रेकांच्या घराण्याचा वंशज. छे. शक्यच नाही. काउंट त्याच्या दिशेने दोन पावले सरकले. ते धेडगुजरे रूप पाहताना त्यांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना.
तोंडाने चुकचुक असा आवाज करत ते गरकन मागे वळले आणि ताडकन चालते झाले. पाठोपाठ आई धावत खोलीत आली.
पपा असे अचानक निघून का गेले?” हेन्रीने आईला विचारले.
तुला माहितेय ना त्यांना नेहमी किती काम असतं ते,” उशी सारखी करायचे नाटक करीत ती म्हणाली. ‘‘ते काम संपलं की लगेच परत येणारेत.’’
आई आपल्याला बनवतेय हे त्याच्या लक्षात आले. दुसऱ्या दिवशी आईने सांगितले की काउंटना एका महत्वाच्या कामासाठी पॅरीसवरून तातडीचा निरोप आला होता म्हणून त्यांना असे अचानक जावे लागले, तेव्हा तो मोठ्या समंजसपणे म्हणाला, “आपल्या पपांच्या मागे किती कामं असतात नाही.
थोड्याच दिवसांत त्याला हॉटेलच्या परिसरात फिरण्याची परवानगी मिळाली. स्वच्छ ऊन पडले होते. बागेत पक्षी कुजन करीत होते. हेन्री कुबड्यांचा आधार घेत घेत बागेत फिरत होता आणि आई त्या दृश्याकडे टक लावून पाहत होती.
आई म्हणाली, “डॉक्टर म्हणतायेत की आपल्यालासुद्धा थोड्या दिवसांत घोडागाडीतून फिरायला हरकत नाही. पण त्याच्या आधी आपल्याला नवीन कपडे शिवायला हवेत.
शिंप्याला मापे घ्यायला जाण्यापूर्वी सगळे नीट समजावून सांगितले होते. म्हणूनच तो अगदी ठरवून कोऱ्या चेहऱ्याने हेन्रीच्या खोलीत गेला. इतके असूनही हेन्रीला पाहिल्यावर तो क्षणभर दचकलाच. फक्त अगोदर पूर्वकल्पना दिली असल्याकारणाने त्याने स्वतःला सावरून घेतले आणि चेहरा असा काही मख्ख ठेवला की जणू काही हेन्रीला तो रोजच बघत होता.
कपडे शिवून आल्यानंतर ते दोघे रोज संध्याकाळी घोडागाडीतून फेरफटका मारायला बाहेर पडू लागले. हेन्रीला अगदी नव्याने जन्म झाल्यासारखे वाटत होते. त्याचा उत्साह उतू जात होता. योगायोगाने इंग्लंडची राणी व्हिक्टोरियासुद्धा त्याच हॉटेलात मुक्कामाला होती. मोठ्या लवाजम्यासह घोडागाडीतून तिचा संध्याकाळचा फेरफटका चालला होता. एकदा सहज त्यांची गाठ पडली असता त्यांनी हवापाण्यावर गप्पा मारल्या.
असे थोडे दिवस अगदी मजेत, आनंदात गेले. एके दिवशी रात्री झोपताना आई हेन्रीला म्हणाली, “रिरी, मों पेती, डॉक्टरांचं म्हणणं आहे की तुम्ही आता चांगले बरे झाला आहात. आता आपल्याला अगदी हवं तिकडे जाता येईल. तुम्हाला हवं असेल तर अगदी पॅरीसलासुद्धा जायला हरकत नाही.
हेन्रीने आपल्या आईकडे पाहिले. ती अगदी पार गळून गेल्यासारखी वाटत होती. केसांची सोनेरी झळाळी गेल्याने ते कोरडे तपकिरी दिसत होते. सततच्या जागरणांमुळे तिच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे पडली होती. भोगलेल्या दुःखाच्या खुणा तिच्या चेहऱ्यावर उमटल्या होत्या. इतके दिवस महत्‌प्रयासाने दाबून ठेवलेल्या भावना अचानक अनावर झाल्या आणि तिला हुंदका आवरला नाही. तिने तोंड उशीत खुपसले. त्या रात्री खूप उशिरापर्यंत तिच्या शयनगृहातून हुंदक्यांचे दबके आवाज ऐकू येत होते.

(प्रोमोनेद दी अँग्लीस, नीस – तुलूझ लोत्रेक, तैलरंग लाकडी पृष्ठभाग, लोत्रेक म्युझियम, आल्बी)

(फोटो – तारूण्याच्या उंबरठ्यावरील हेन्री)



No comments:

Post a Comment