Sunday, October 28, 2018

मुलँ रूज - ८४

मेझाँ द साँते मधून लवकर सुटका होईल याची आशा त्याने जवळपास सोडून दिली होती. शेवटी त्याचा बालमित्र मॉरीस त्याच्या मदतीला धावून आला. मॉरीसला खोलीच्या दारात पाहून हेन्रीला रडू कोसळले. त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. मॉरीसने पाठीवर थोपटत त्याला धीर दिला.
‘‘तुला कसं काय सोडलं आतमध्ये.’’
‘‘अरे, तुला काय सांगू? एक वेळ इंग्लंडच्या राणीची भेट घेता येईल. पण इथे कोणाला भेटायची परवानगी काढणं म्हणजे महाकठीण काम आहे. एवढ्या चौकश्या, एवढे प्रश्न. एवढे करून शेवटी परवानगी मिळाली नाहीच. मग सरळ पहारेकऱ्याच्या हातावर पन्नास फ्रँक टेकवले आणि आत आलो.’’
‘‘हे बघ. तो पहारेकरी मला येथे फार वेळ थांबू देणार नाही. तेव्हा तू मला नक्की काय झालं ते सांग पाहू. वर्तमानपत्रातून आलं होतं तेवढंच मला ठाऊक आहे.’’
हेन्रीने त्या दिवशी पाटूने त्याला मादाम ल्युबेतच्या लॉजवर कसं पोचवलं, तो जिन्यावरून कसा पडला ती हकिगत तपशीलवार सांगितली. मॉरीस त्याने काढलेली चित्रे पाहत होता.
‘‘इतक्या वर्षांनी तू सर्कशीची चित्रे काढतोयस? तीसुद्धा कसल्याही संदर्भाशिवाय. फार चांगली जमलीत. ही चित्रे काढणाऱ्या चित्रकाराला जर कोणी वेडा म्हणणार असेल तर मला काय म्हणतील? तू कधी कधी डोकं फिरल्यासारखा वागतोस. पण तेवढ्याने तू काही वेडा होत नाहीस. ते काही नाही. मी तुला येथून लवकरच बाहेर काढीन. ही चित्रे मी घेऊन जाऊ का आमच्या गॅलरीत ठेवायला?’’
‘‘वाटल्यास सगळी घेऊन जा, पण मला एकदाचा येथून सोडव.’’
‘‘त्याची काही चिंता करू नकोस. दोन-तीन दिवसांतच मी तुला येथून बाहेर काढतो की नाही ते बघ. तुला सोडवण्यासाठी एखादा बाँब वगैरे फोडून मारामरी करावी लागली तरी त्याला माझी तयारी आहे.’’
मॉरीस आला होता त्या संध्याकाळी हेन्रीला कलासंचालनयाच्या मंत्र्यांकडून एक पत्र आले. कलावंतांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी त्या वर्षी लोत्रेकची निवड करण्यात आली होती. फ्रेंच कलेची आणि संस्कृतीची बहुमूल्य सेवा केल्याबद्दल दर वर्षी लीजन ऑफ ऑनर हा किताब एका समारंभात कलाकारांना दिला जायचा. चित्रकलेतील नव्या प्रवाहांची दखल घेतली पाहिजे अशा मताच्या मंडळींची वर्णी समितीवर लागली होती. त्यांनी त्या वर्षी एकमताने लोत्रेकची निवड केली. हा बहुमान स्वीकारायला त्याची मान्यता आहे का, अशी विचारणा त्या पत्रातून खास सरकारी भाषेत केली होती. हेन्रीला हा बहुमान वयाच्या अवघ्या पस्तिसाव्या वर्षी मिळत होता. ज्या वयात बहुतेक चित्रकार कोणीतरी आपली साधी दखल घ्यावी म्हणून धडपडत असतात त्या वयात हेन्रीला हा सर्वोच्च बहुमान मिळत होता. स्त्रीच्या प्रेमाला तो अजून पारखा असला तरी प्रसिद्धीची देवता मात्र त्याच्या प्रेमात पडली होती.
हा बहुमान स्वीकारावा की नाही, असा प्रश्न हेन्रीला पडला. स्वीकारला तर वर्तमानपत्रांना एक सनसनाटी विषय चघळायला मिळेल. वेड्या चित्रकाराला लीजन ऑफ ऑनर. एकाच वाक्यात स्तुती व निंदा. झाली तेवढी प्रसिद्धी खूप झाली. परत वर्तमानपत्रातून एखादा रकाना भरून यायला नको. आईला काही फारसे वाटणार नाही. ती तर कोणत्याही सुखदुःखाच्या पलीकडे गेली आहे. पपा. ते तर नक्कीच म्हणतील अश्लील चित्र काढणाऱ्याला लीजन ऑफ ऑनर. चित्रकाराचेच नव्हे तर सरकारचेही डोके फिरलेले दिसतेय. या बातमीमुळे आनंद झालाच तर तो फक्त मिरीयम आणि मॉरीसला झाला असता.
पत्र वाचून विचारात पडलेला पाहून पहारेकऱ्याने विचारले, ‘‘काय वाईट बातमी तर नाहीय ना?’’
‘‘छे छे. तसं काही विशेष नाही.’’ असे बोलून त्याने पत्राचा बोळा करून तो समोरच्या शेकोटीत टाकला.
दुसऱ्या दिवशी मॉरीस ल फिगारोच्या आर्सेन अलेक्सांद्र या कला समीक्षकाला बरोबर घेऊन आला.
‘‘मी तुला सांगितलं होतं ना, मी काही तरी शक्कल लढवतो म्हणून.’’
‘‘मला जरा तुमची चित्रं बघायला मिळतील का?’’ समीक्षक महाशय म्हणाले.
‘‘वा! फारच छान. प्राथमिक रेखाटने, नोंदी वगैरे कोणत्याही पूर्वतयारीशिवाय फक्त आठवणींवर विसंबून एवढं तपशीलवार चित्र काढणं म्हणजे विलक्षणच आहे. विश्वास बसत नाही.’’
या गोष्टीला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे थोड्याच दिवसात हेन्रीची विचारपूस करायला त्याच्या मित्रमंडळींची रीघ लागली. मॉरीस, मिसीया, मादाम पोतीएरों, बेर्थ. आर्टिस्ट इंडिपेंडंटसने हेन्री रुसॉच्या नेतृत्वाखाली एक छोटीसी तुकडीच पाठवली. जेन ॲव्हरीलबरोबर तिचा तो कादंबरीकार मित्र भावी दोस्तोयव्हस्की कुठे दिसत नव्हता. त्याऐवजी एक नवा तरुण होता. त्याची एक कवी म्हणून तिने मोठ्या उत्साहात ओळख करून दिली. पुढच्याच महिन्यात प्रसिद्ध होणाऱ्या त्याच्या काव्यसंग्रहाने साऱ्या फ्रान्सला वेड लागणार होते.
‘‘ती कादंबरी म्हणजे एक कंटाळवाणं चऱ्हाट होते. मी पहिलं प्रकरण वाचून त्याच्या प्रेमात पडण्याची घाई केली. पण तेव्हा मला काही कळत नव्हतं.’’ जेन म्हणाली.
‘‘प्रेमातलं की कादंबरीतलं?’’ हेन्रीने हसून विचारले. ‘‘आता कविता तरी नीट समजावून घेतल्यास ना?’’ मिरीयमचा विषय दोघांनीही टाळला.
दोन दिवसांनी आई आली. ‘‘तुम्ही आता काय करायचं ठरवलंयत.’’
‘‘ठरवण्यात काही अर्थ नाही. मी ठरवतो एक आणि होतं दुसरंच. आता मॉरीस म्हणतोय पुढच्या वर्षी एक शो करूया. तसं झालं तर कदाचित अमेरिकेला जाईन म्हणतो.’’ बोलताना हेन्रीचा चेहरा उजळला होता.
‘‘त्याला अजून खूप वेळ आहे, पण तोपर्यंत काय?’’
‘‘येथून सुटल्यावर ताबडतोब मॉरीसचं पोर्ट्रेट करायला घेणार आहे. इतक्या जणांची पोर्ट्रेट केली. मॉरीसचं राहून जायला नको.’’ बोलता बोलता तो गंभीर झाला.
‘‘ते तुम्ही करालच रे. पण तुमचा मुक्काम कोठे असणार आहे?’’
‘‘कुठे म्हणजे? मादाम ल्युबेतच्या लॉजवर.’’
‘‘तिकडे नको. तुमचं एवढ्या उपचारांनंतर सुटलेलं दारू पिणं तिकडे गेल्यावर पुन्हा सुरू होईल.’’
‘‘ममा, झालं गेलं विसरून जा. मी तुम्हाला वचन देतो. मी दारूला पुन्हा स्पर्श करणार नाही.’’
‘‘रिरी, मला तुमची फार काळजी वाटते. तुम्ही अगदीच माझ्या जवळ राहायला पाहिजे असे नाही. मी तुमच्या सोबतीला म्हणून एकाला पाठवणार आहे. चालेल ना?’’
‘‘तुमचा माझ्यावर विश्वास दिसत नाहीय म्हणून तुम्ही एक रखवालदार पाठवताय. असंच ना?’’
‘‘होय रिरी. तुम्हाला सांभाळण्यासाठी एका रखवालदाराचीच गरज आहे.’’

No comments:

Post a Comment