Thursday, October 18, 2018

मुलँ रूज - ५९

२७ मेच्या सकाळी तो असाच उद्विग्न मनःस्थितीत सतरंजीवर पडलेल्या उन्हाच्या कवडशाकडे बघत बसला होता. एवढ्यात जिन्यावर कोणाची तरी पावले वाजली. क्षणभर त्याची आशा पल्लवित झाली, पण ती काही मारी नव्हती. पावलांचा आवाज दबका, पुरुषी वाटत होता. इतक्या दिवसांच्या निष्क्रियतेनंतर अचानक त्याला काम करण्याचा झटका आला. तो उठून इझलपाशी गेला व पॅलेटवर रंग काढू लागला. तेवढ्यात कोणीतरी दरवाजा ठोठावला.
‘‘एन्‌त्रेज.’’ हेन्री बसल्या जागेवरून म्हणाला. दरवाजा उघडला जाता क्षणी त्याच्या तोंडून आनंदाचा चीत्कार आला, ‘‘व्हिन्सेंट!’’
हातातील रंगाची ट्यूब तशीच खाली टाकून त्याने आपली काठी उचलली व तो लगबगीने त्याच्या दिशेने गेला.
‘‘कधी आलास तू पॅरीसला? इकडे ये. बस असा. मला जरा बघू दे तरी कसा आहेस तो.’’
‘‘थोडा आजारी होतो, पण आता ठीक आहे.’’ मोठ्या आजारातून उठलेल्या माणसासारख्या खोल आवाजात तो म्हणाला. ‘‘परवाच आलो. दोन दिवस तेओ व जोहान्नाकडे होतो. तुला माहितेय त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव व्हिन्सेंट ठेवलंय ते.’’
बोलताना व्हिन्सेंटमध्ये पडलेला फरक त्याला जाणवला. नेहमीचा परिचयाचा व्हिन्सेंट कुठच्या कुठे हरवून गेला होता. डोळ्यांतील आग विझून शांत झाली होती. काखोटीला पोर्टफोलियो नाही की खिशात रमची बाटली. ना बोलताना हातवारे. एखाद्या सद्‌वर्तनी गुणी मुलासारखा शांत दिसत होता. त्यामुळेच तो परक्यासारखा वाटत होता.
‘‘किती छान ऊन पडलंय नाही?’’ त्याच्या चेहऱ्यावर शुष्क हास्य पसरले, पण त्याच्या आवाजात जान नव्हती.
‘‘आर्ल्समध्ये ऊन खूप कडक असायचे. कदाचित तेच मला बाधलं असेल.’’
‘‘तेथे तुला तुझा आवडता पिवळा रंग अगदी मनमुरादपणे वापरायला मिळाला असेल नाही? तुला आठवतंय? तू म्हणायचास की पिवळा रंग देवाचा रंग आहे म्हणून आणि मी तुला सांगायचो की आपला देव कॉर्मेन आहे आणि या देवाला व्हॅन डाईक सोडून इतर कोणताही रंग आवडत नाही.’’
सुरुवातीचा अवघडलेपणा हळूहळू कमी होत गेला. गतस्मृतींना उजाळा मिळताच जुनी जवळीक पुन्हा प्रस्थापित झाली. दोघांचे चेहरे स्नेहार्द स्मिताने खुलले.
‘‘तू भेटल्याने किती बरं वाटलं म्हणून सांगू? मला सारखी तुझी आठवण यायची. तू गेल्यापासून मोंमार्त्र खूप बदललंय. तुला आठवतो आपला चित्रकलेचा वर्ग?’’
‘‘मी आणखी थोडे दिवस ॲतलिएमध्ये यायला पाहिजे होतं. माझी ॲनाटॉमी एकदा कच्ची राहिली ती राहिलीच.’’
‘‘ॲनाटॉमीला मार गोळी. भर रस्त्यावर, बागेत, कॅफेत बसून चित्र काढताना जी मजा आली ती कार्मोनच्या वर्गात चार भिंतींच्या आत कोंडून ॲनाटॉमी घोटवताना आली असती काय? अरे, अशी धमाल करत असताना नकळत आपण स्वतःचा मार्ग शोधत होतो.’’
‘‘तू म्हणतोस ते एका अर्थी खरं आहे.’’ व्हिन्सेंट आपल्या शिरांच्या गाठी वर आलेल्या हाडकुळ्या हातांकडे पाहत म्हणाला, ‘‘हा शोध घेता घेता मी जवळपास मरणाच्या दारात जाऊन आलोय. कदाचित या शोधासाठी अशी किंमत चुकवावी लागत असेल... वेड्याचे इस्पितळ. हेन्री, एखाद्याला वेड्यांच्या इस्पितळात ठेवणे म्हणजे काय याची कल्पना आहे तुला?’’
‘‘शू! तो विषयसुद्धा आता काढू नकोस. विसरून जा ते सगळे. तू आता बरा झालायस.’’
‘‘पण मला त्याविषयीच बोलायचंय.’’ व्हिन्सेंट आग्रहाने म्हणाला, ‘‘कदाचित बोलण्याने माझ्या डोक्यातून तो विचार निघून जायला मदत होईल. एकांतवास एक वेळ सहन करता येईल, पण वेड्यांचा सहवास फारच भयंकर. त्यांचे ते वेडे चाळे. रात्री-अपरात्री बेभान होऊन आसपासचे वेडे ओरडू लागत. त्यांच्या काळीज गोठवणाऱ्या किंकाळ्यांनी दचकून जाग येई. पहारेकरी बेभान झालेल्या त्या वेड्यांना फरफटत लांबच्या खोल्यांमध्ये नेऊन कोंडून ठेवीत. तरीही त्यांचे भीषण ओरडणे ऐकू येईच. कधी कधी मला वाटायचं मीसुद्धा त्यांच्यासारखा ठार वेडा होईन.’’
त्याच्या मनाचे बंद दरवाजे उघडले व तो त्याच्या आर्ल्समधल्या दिवसांविषयी घडाघडा सांगू लागला. तो रोज सकाळी गावाबाहेरच्या शेतात जाऊन पेंटिंग करायचा. दोन-तीन तासांत एक पेंटिंग पूर्ण व्हायचे. दिवसभर तळपत्या उन्हात उभे राहून केलेले दोन-तीन कॅनव्हास घेऊन संध्याकाळी तो लॉजवर परतायचा. पाठीवर इझल लटकावलेले, काखोटीला अर्धवट सुकलेले कॅनव्हास, दुसऱ्या हातात ट्यूब, ब्रश, पॅलेट वगैरे सामानाची पेटी, डोक्यावर हॅट असा व्हिन्सेंट गावात सगळ्यांच्या परिचयाचा झाला होता.
(ह्याच विषयावरचे व्हॅन गॉगचे सेल्फ पोर्ट्रेट जगप्रसिद्ध आहे.)
व्हॅन गॉगच्या पाठोपाठ पॉल गोगँ आर्ल्समध्ये येऊन थडकला. सुरुवातीला दोघांचे चांगले जुळले. इतके की दोघे एकत्रच राहत, पण हळूहळू कुरबुरींना सुरुवात झाली. क्षुल्लक गोष्टींवरून झालेल्या वादाचे रूपांतर पाहता पाहता भांडणात होई. मुद्द्यांवरून गुद्द्यांवर यायला त्यांना मुळीच वेळ लागत नसे. शेवटी कॅफेमध्ये ॲबसिंथ पिता पिता नाही तर वेश्येच्या माडीवर त्यांची दिलजमाई होई. एके दिवशी एका क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात व्हिन्सेंटने ॲबसिंथ भरलेला ग्लास गोगँला फेकून मारला. त्या दिवशी दोघांचे संबंध तुटले. आर्ल्समधल्या तळपत्या उन्हात झपाटल्यासारखे सतत काम करत राहिल्यामुळे असेल कदाचित व्हिन्सेंटच्या डोक्यातला घंटानाद दिवसेंदिवस वाढतच होता. एके दिवशी त्याच्या डोळ्यांत रक्त उतरले. पायाखालची जमीन फिरू लागली. एका झटक्यात त्याने दाढीच्या वस्तऱ्याने आपला कान कापला व एका कागदात गुंडाळून त्याच्या लाडक्या वेश्येला नजर केला. कापलेल्या कानाच्या जागेवरून रक्त ओघळतेय अशा अवस्थेत लॉजवर परत येताना त्याच्या डोक्यातला तो घंटानाद अधिकच वाढत होता. शेवटी सहन न होऊन तो खाली कोसळला. त्याच्या नजरे समोर सतत धगधगणारा जाळ विझला आणि हळूहळू सर्व शांत होत गेले.
(कापलेल्या कानावरून बँडेजची पट्टी गुंडाळली आहे असे एक व्हॅन गॉगचे सेल्फ पोर्ट्रेट प्रसिद्ध आहे.)
‘‘तुला पुढची हकिकत ठाऊक आहेच. तेओ मला पॅरीसमध्ये घेऊन आला व त्याने मला सेंट रेमीमध्ये ठेवले. तिथल्या नन खूप चांगल्या होत्या. त्यांनी मला पेंटिंग करायची परवानगी दिली होती. इस्पितळातले दिवस कसे भुर्रकन उडून गेले कळलेच नाही.
‘‘तिथून बाहेर आलो ते तडक तुझ्याकडे. एखाद्या दुःस्वप्नातून जागं व्हावं तसं वाटतंय. जणू काही मी मोंमार्त्र सोडून आर्ल्सला कधी गेलोच नव्हतो.’’
हेन्रीने मोठ्या आश्वासकपणे आपला हात त्याच्या खांद्यावर ठेवला, ‘‘खरंय व्हिन्सेंट. ते एक दुःस्वप्नच होतं. आता सगळं संपलंय. आयुष्याला नव्यानं सुरुवात झालीय असं समज.’’
व्हिन्सेंट आशेने किंचित हसला, ‘‘तुझं कसं काय चाललंय?’’
‘‘माझं काय,’’ हेन्री खांदे उडवत उसासा सोडत म्हणाला, ‘‘ठीक चाललंय. जसा जमेल तसा वेळ ढकलतोय झालं. कधी पेंटिंग, कधी मासिकांची, गाण्याच्या चोपड्यांची मुखपृष्ठं, वर्तमानपत्रासाठी इलस्ट्रेशन असं काहीतरी चालू असतं. मुलँ रूजसाठी एक पोस्टर करायचं कबूल केलंय. कधी जमतंय कोण जाणे. बरं तू पॅरीसमध्ये किती दिवस आहेस?’’
‘‘मी उद्याच ओव्हेरला जायचं म्हणतोय. इथे तेओची जागा खूप लहान आहे. त्यात लहान मूल.’’
‘‘त्यासाठी पॅरीस थोडंच सोडायला पाहिजे. तू इथे माझ्याकडे येऊन राहा. मी एकटाच आहे.’’
व्हिन्सेंटने मोठ्या प्रेमाने हेन्रीचा हात आपल्या हातात घेतला. ‘‘तुझ्या आपुलकीबद्दल धन्यवाद. पण पॅरीस माझ्यासारख्याला मानवणार नाही.’’
तो कोचावरून उठून भिंतीच्या दिशेने गेला व म्हणाला, ‘‘मला तुझी पेंटिंग बघू दे. बऱ्याच दिवसांत कोणाचं काम पाहिलं नाहीय.’’
‘‘सावकाश बघ. तोपर्यंत मी कपडे बदलून येतो. आपण जेवायला बरोबरच जाऊ, ओग्युस्तिनाजमध्ये. ठीक आहे ना?’’ त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिले. गतस्मृती चाळवल्या गेल्या. जवळच्या आणि दूरच्याही.
त्या दोघांची जोडी पाहताच ओग्युस्तिना एप्रनला हात पुसत धावत बाहेर आली.
‘‘व्हिन्सेंतो, कॅरिस्सिामो, व्हिन्सेंतो!’’
तिने व्हिन्सेंटला दोन्ही हातांनी धरले. क्षणभर त्याच्या डोळ्यांत रोखून पाहिले व आनंदाने उचंबळून मिठी मारली. गालाचे चुंबन घेतले. जेव्हा तिने त्याला सोडले तेव्हा तिच्या गालांवरून अश्रू ओघळत होते.
‘‘मला वाटलं नव्हतं आपली पुन्हा कधी भेट होईल म्हणून.’’ ती हुंदके देत म्हणाली, ‘‘आणि तुम्ही मस्य तुलूझ्‌, किती दिवसांनी इकडे फिरकलात. तेसुद्धा अशा वेळी की सगळे निघून गेल्यावर.’’ तिच्यातील आनंदी वृत्ती व उत्साह अजून टिकून होता, पण तरीही कालानुसार तिच्यात थोडासा फरक पडला होताच. काळ्याभोर केसात रुपेरी तारा डोकावत होत्या. गोबरे गाल निबर दिसू लागले होते.
त्या दोघांनी एका कोपऱ्यात बसून शांतपणे जेवण घेतले. जेवण संपल्यावर ती लिक्युअरची बाटली घेऊन त्यांच्या टेबलावर येऊन बसली.
‘‘हे खास आजचा दिवस साजरा करण्यासाठी. ल स्ट्रेटा. जगातील उत्कृष्ट लिक्युअर आहे हे. याचं वैशिष्ट्य म्हणजे हे प्याल्याने प्रेमभंगामुळे झालेला दाह शांत होतो.’’ ती तीन ग्लास भरत म्हणाली.
‘‘काय झालं एवढं उदास व्हायला?’’ हेन्रीने विचारले.
तिच्या भोकरासारख्या मोठ्या सुंदर समजूतदार डोळ्यांमध्ये काहीतरी हरपल्याची जाणीव दिसत होती. पॅरीसमध्ये तिचा जीव रमत नव्हता. तिला तिच्या घरची ओढ लागली होती. समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या, वर्षभर भरपूर सूर्यप्रकाशात न्हाणाऱ्या, टुमदार गावातल्या लहानशा घराची. ओग्युस्तिनाजमधून निघाल्यावर हेन्रीने एक घोडागाडी केली व व्हिन्सेंटला आयफेल टॉवर दाखवायला घेऊन गेला. ऑपेरा, प्लेस द ल कॉनकॉर्ड, शाँझ्‌ एलिजे असे करीत ते आयफेल टॉवरपाशी आले.
‘‘कधी कधी मला वाटतं संगीतापेक्षा वास्तुकलेच्या दर्शनाने भावना जास्त उचंबळून येतात.’’ हेन्री म्हणाला.
आयफेल टॉवर पाहून झाल्यावर ते इकडे तिकडे मनमुराद भटकत होते. कॉनसर्जरी, लूव्हर असे फिरत फिरत ते सीन नदीच्या डाव्या काठावर आले.
‘‘पॅरीस किती सुंदर शहर आहे नाही? मी विसरूनच गेलो होतो.’’ व्हिन्सेंट म्हणाला.
‘‘खरं आहे तू म्हणतोस ते. हा एक असा रंगमंच आहे की येथे नटांपेक्षा नाटकाचे पडदेच जास्त भाव खाऊन जातात.’’ हेन्री म्हणाला.
आकाशात मावळतीला नोत्र दॅमची भव्य कमान उठून दिसत होती. ते दोघे सहज चर्चमध्ये गेले. मेणबत्तीच्या फडफडत्या ज्योतीकडे बघत व्हिन्सेंट अस्पष्ट आवाजात काही तरी पुटपुटत होता, जणू काही देवाशी बोलत असल्यासारखा. बिचारा व्हिन्सेंट. तो जिंकला होता तसाच थकलाही होता. जीवनाचा प्रवाह एखाद्या प्रपातासारखा कोसळून गेल्याने पार रिता झाला होता.
‘‘आज पीएर टँग्वीने आपल्या सगळ्या मित्रांना जेवायला बोलावलंय. तू आल्याचं माहीत असतं तर तुलाही बोलावलं असतंच. तू चल आमच्याबरोबर. तुला भेटून सर्वांना आनंदच होईल.’’
त्या दिवसाच्या फेरफटक्याची अखेर पीएर टँग्वीच्या दुकानासमोर झाली. त्यांना घोडागाडीतून उतरताना पाहताच टँग्वीने धावत पुढे होऊन व्हिन्सेंटला मिठी मारली.
‘‘तुमचीच काय ती कमी होती. आता पार्टीला खरी रंगत येईल.’’
पीएर त्या दोघांना घेऊन स्वयंपाकघरात गेला. वाफाळलेल्या सुपाच्या पातेल्यासमोर उभी असलेली त्याची बायको एखाद्या चेटकिणीसारखी वाटत होती. व्हिन्सेंटच्या अनपेक्षित येण्यामुळे स्वयंपाकघरात परत एकदा आनंदाचे चीत्कार, मिठ्या, गालांचे चुंबन वगैरे भावनांचे उत्स्फूर्त आविष्कार झाले. नंतर टँग्वी सर्वांना घेऊन पाठच्या अंगणात गेला. अंगणात जेवणाचे टेबल मांडले होते.
‘‘बघ कसं एखाद्या खेडेगावासारखं मोकळं वाटतं की नाही? हवासुद्धा कशी छान पडलीय. तुला मी सांगतच होतो की या वातावरणासाठी पिस्सारोसारखं पॅरीस सोडून दूर रहायला जाण्याची काही गरज नाही.’’
सर्वांनी जेवायला सुरुवात केली, पण टँग्वी मात्र वाइन किंवा जेवण कशालाही हात न लावता तसाच बसून होता.
‘‘तुम्ही का थांबला आहात?’’ हेन्रीने विचारले.
‘‘मस्य तुलूझ्‌ माझं पोट बिघडलंय. थोडं कमी जेवलेलं बरं.’’
‘‘हा त्रास बरेच दिवस चालू आहे. मी किती वेळा सांगितलं की डॉक्टरला दाखव म्हणून. दवाखाना अगदी आमच्या शेजारीच आहे, पण हा काही ऐकायला तयार नाही. आता तुम्ही काही समजावलंत तर तुमच्या या म्हाताऱ्या मित्राला.’’ टँग्वीची बायको म्हणाली.
‘‘मी काही त्या बुर्झ्वा डॉक्टरला माझ्या पोटाला हात लावू देणार नाही. काही झालं तरी हा तत्वाचा प्रश्न आहे.’’ टँग्वी एकेकाळीचा खंदा अराजकवादी. मित्रांच्या आग्रहाला त्याने भीक घातली नाही. चर्चा टँग्वीच्या पोटदुखीवरून अराजकवाद्यांनी केलेले फ्रान्सचे नुकसान यावर घसरण्याच्या पूर्वीच त्याने होकूसाईच्या (प्रसिद्ध जपानी चित्रकार) प्रिंट्‌सचा फोल्डर दाखवायला काढला.
रात्र हळूहळू सरत होती. हवा शांत होती. सभोवताली टिपूर चांदणे पडले होते. टेबलावरच्या एकुलत्या एक दिव्यावर रात्रीच्या अंधारात उडणारे पतंग झडप घालीत होते. त्यांच्याकडे पाहत हेन्री म्हणाला, ‘‘या कीटकांच्या आणि काही माणसांच्या वर्तनात किती साम्य आहे नाही? सर्वनाश समोर दिसत असूनही आपला ध्यास सोडायचा नाही.’’
हेन्रीच्या या बोलण्यावर निःशब्द शांतता पसरली. रातकिड्यांच्या किर्र आवाजाच्या पार्श्वर्भूमीवर दिव्यावर झडप घालून मरून पडणाऱ्या पतंगांकडे सर्वजण गंभीरतेने बघत होते.
‘‘हेन्री,’’ शांततेचा भंग करीत व्हिन्सेंट म्हणाला, ‘‘काल तू कपडे करीत असताना मी तुझी पेंटिंग पहात होतो. ती भुऱ्या केसांची मुलगी आहे ना, तुझ्या पोर्ट्रेटमध्ये वारंवार दिसणारी, तिच्यापासून तू सांभाळून रहा. तिला तुझं आयुष्य उध्वस्त करू देऊ नकोस. मी तुझ्यापेक्षा दहा पावसाळे जास्त पाहिलेयत. या जगाला सांगण्यासारखं अजून बरंच काही तुझ्याकडे आहे. ते सर्व कॅनव्हासवर उतरव. त्या मुलीच्या नादामुळे तुला जे सांगायचं आहे ते राहून जाईल.’’
व्हिन्सेंटची आणि आपली पुन्हा भेट होणार नाही असं हेन्रीला आत खोल कुठेतरी जाणवले. त्याला आठवणारा व्हिन्सेंट केव्हाच संपला होता. अंतर्यामी असलेल्या कणवेमुळे त्याच्या ओबडधोबड चेहऱ्यावर एक प्रकारची ऋजुता दिसून येई. ती ऋजुता, अस्वस्थपणा, अंतर्मनातील खळबळ आता शांत झाली होती. त्या जागी एक धीरगंभीर भाव आला होता आणि निळीशार नजर दूर पैलतिरी लागल्यासारखी दिसत होती.
टँग्वी झोपायला गेल्यानंतरसुद्धा बराच वेळ त्यांच्या गप्पा चालू होत्या. निघताना हेन्री त्याच्याबरोबर तेओच्या सिटी पिगालमधल्या घरापर्यंत गेला.
‘‘मित्राचा निरोप घेताना डचमध्ये आम्ही फारवेल म्येन फ्रिएंद असं म्हणतो. फ्रेंचमध्ये याचा अर्थ अदियू मोन आमी असा होतो.’’ व्हिन्सेंटचा चेहेरा प्रसन्न हास्याने खुलला होता.
अदियू. म्हणजे ही भेट अखेरची ठरणार आहे याची व्हिन्सेंटलाही कल्पना होती की काय. हेन्रीने व्हिन्सेंटचा हात हातात घेतला. त्याच्या एकाकी, खिन्न चेहऱ्याकडे पोटभर पाहून घेतले.
‘‘अदियू मोन आमी. अदियू व्हिन्सेंट.’’ त्याचा आवाज रुद्ध झाला होता.
(पोर्ट्रेट ऑफ पीएर टँग्वी – व्हॅन गॉग – तैलरंग, कॅनव्हास, ६५x५१ सेमी, १८८७ – रोदँ म्युझियम)

No comments:

Post a Comment