Friday, October 5, 2018

मुलँ रूज - २७

वसंत ऋतूच्या उरलेल्या दिवसांत हेन्रीने स्वतःला कामात झोकून दिले. दिवसा ॲतेलीएमध्ये व्हीनस नाहीतर लॅडा, घरी स्टुडिओत इकॅरस. रंगकाम इतके घोटून घोटून गुळगुळीत केले की एकदा कॉर्मेनने त्याची चक्क तारीफसुद्धा केली. ‘चित्रकलेच्या नावाने अगदी मठ्ठ असलात तरी अशीच मेहनत घेत राहिलात तर मोठेपणी थोडीफार कामं मिळायला हरकत नाही. अर्थात तुम्हाला त्याची गरज नाही.वसंत ऋतू संपता संपता इकॅरस एकदाचा पूर्ण झाला. कॅनव्हासच्या कोपऱ्यात स्वतःची सही ठोकताना त्याला एकीकडे सुटल्याची भावना होती तर दुसरीकडे आता आपण ॲतेलीएमधील मित्रमंडळी, ओग्युस्तिनामधील जेवताना घातलेले वादविवाद, ल नुव्हेलीमधील बीअरपान, ल एलीसमधले कॅनकॅन नृत्य आणि मादाम ल्युबेतचे अगत्य या सर्वांना आता आपण मुकणार याची हळहळ वाटत होती.
एके दिवशी कॅनव्हासला फ्रेम करण्यासाठी म्हणून तो पीएर टँग्वीकडे चालला होता. स्वच्छ ऊन पडले होते. पाय पण दुखत नव्हते. म्हणून त्याने चालत जायचे ठरवले. मोंमार्त्रमधला त्याचा हा बहुधा शेवटचा फेरफटका असणार होता. तो थोडा रमतगमत चालला होता. जुनाट मोडकळीला आलेली घरे, अंधाऱ्या अरुंद गल्ल्या. वातावरणात स्वैंपाकघरातील तळण आणि कुजणाऱ्या केरकचऱ्याच्या वासाचा एक संमिश्र दर्प दरवळत होता. हाडीमाशी मुरलेल्या पिढ्यान्‌पिढ्याचा दारिद्र्याचा दर्प.
तो धोबीघाटावरून चालला होता. हा मोंमार्त्रमधला एकमेव उद्योग. बऱ्याच स्त्रियांना त्यातून रोजगार मिळायचा. म्हाताऱ्या, कुरूप, निराधार स्त्रिया व अजाण बालिका. वयाच्या सातव्या वर्षापासून सुरुवात होई. धुतलेले कपडे गावात घरोघरी पोचते करायचे, येताना धुवायचे कपडे घेऊन यायचे. वयाच्या चौदाव्या वर्षी बढती मिळे धुण्याच्या हौदावर. दहा तासांचे दोन फ्रँक. कपडे घासा, आपटा, धोपटा, पिळा. दिवसभराच्या श्रमाने अंग मोडून जायचे. साबणाच्या पाण्यात उभे राहून काम केल्याने हातापायांना खाज सुटे, बोटाच्या बेचक्यांमधली त्वचा कुजे. अंगाची आग होई. पाण्याच्या नुसत्या स्पर्शाने झोंबू लागे. एक-दोन वर्षांत कंबरेचा काटा ढिला होई. यातून केव्हा एकदा सुटका होतेय असे वाटे. सगळे सोडून पळून जावेसे वाटे. पण पळून जाऊन करणार काय? परिसरात धोबीघाट सोडून दुसरा कोणताही उद्योग नव्हता. राहिला वेश्याव्यवसाय. वय वर्षे सोळा आणि बऱ्यापैकी रूप एवढे भांडवल सुरुवातीला पुरेसे होई. पण वाढत्या वयाबरोबर रूपही ओसरू लागे. परिणामी दुसऱ्या एखाद्या कमी दर्जाच्या वेश्यागृहात जावे लागे. असे करता करता एक दिवस असा येई की अगदी तिसऱ्या दर्जाच्या वेश्यागृहातूनसुद्धा हकालपट्टी होई. मग मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी परत धुण्याच्या भट्टीसमोर उभे राहून धुणी धोपटण्याशिवाय दुसरा पर्याय नसे. भट्टीची आग, साबणाची राड व अंगमोड श्रम यामुळे येथून मृत्यू मात्र लवकरच त्यांची सुटका करी.
येथल्या बऱ्याच तरुण धोबिणी संध्याकाळी विरंगुळ्यासाठी ल एलीस किंवा नुव्हेलीत येत. त्यामुळे हेन्रीच्या चांगल्या परिचयाच्या होत्या. धुणी बडवता बडवता एखादी धोबीण रस्त्याने चाललेल्या हेन्रीकडे बघून आपुलकीने हसे. हेन्री थांबून, हॅट किंचित हातात घेऊन त्यांच्या अभिवादनाचा स्वीकार करी.
(खिडकीतून आतुरतेने बाहेर बघणाऱ्या लाँड्रेस ॲफ मोंमार्त्रह्या लोत्रेकच्या पेंटिंगची गणना त्याच्या महान कलाकृतींमध्ये केली जाते)
(लाँड्रेस – तुलूज लोत्रेक – तैलरंग, कॅनव्हास – ९३ x ७५ सेमी – १८८४ खाजगी संग्राहक)



No comments:

Post a Comment