Friday, January 19, 2018

मून अँड सिक्सपेन्स - ६

शेवटी एकदाची माझी चार्ल्स स्ट्रिकलँडशी भेट झाली. पण वेळ अशी होती की फक्त ओळख करून घेण्यापलीकडे काही झालं नाही. एके दिवशी सकाळीच मला मिसेस स्ट्रिकलँडची चिठी आली. तिने संध्याकाळी मला डिनर पार्टीला बोलावलं होतं. तिच्या एका पाहुण्याने ऐन वेळी नकार दिला होता म्हणून त्याची जागा भरून काढण्यासाठी मला आमंत्रण दिलं होतं. त्या चिठीत तिने लिहीलं होतं:
“तुम्हाला कदाचित कंटाळा येण्याची शक्यता याची मी आगाऊ सुचना देत आहे. ही पार्टी अगदी कंटाळवाणी होण्याची शक्यता आहे, पण तरीही तुम्ही आलात तर मी तुमची अत्यंत आभारी राहीन. कमीत कमी तुमच्याशी थोड्या गप्पा तरी मारता येतील.”
शेजारधर्म म्हणून तरी हे आमंत्रण स्विकारणं भाग होतं.
जेव्हा मिसेस स्ट्रिकलँडने तिच्या नवर्याशी ओळख करून दिली तेव्हा त्याने अगदी कोरडेपणाने हस्तांदोलन केले. त्याच्याकडे वळत थट्टेच्या सुरात ती म्हणाली,
“मला नवरा आहे हे मला यांना दाखवून द्यायचं होतं. त्यांना संशय यायला लागला होता की मी बिनलग्नाची आहे की काय.”
आपल्याला यात काहीच गंमत वाटत नाही हे दाखवून देण्यापुरतं तो जेवढ्याच तेवढं हसला. तेवढ्यात नवे पाहुणे आले आणि आम्हाला सोडून यजमानीणबाई त्यांच्याकडे वळल्या. शेवटी सगळी पाहूणे मंडळी जमली आणि जेवायला कधी सुरवात होत आहे त्याची वाट बघू लागली. मला स्पष्ट आठवतंय. न बोलता शहाणा अशा आविर्भावात तो आपला एक कोपरा पकडून उभा होता. या पार्टीच्या यजमानांनी एवढा आग्रह करून या सगळ्या पाहुण्यांना का बोलावलंय आणि ही सगळी मंडळी एवढी यातायात करून येथे का आली आहेत असं कोडं त्यावेळी मला पडलं. पार्टीला आलेल्या पाहुण्यात कसलाही उत्साह जाणवत नव्हता. जाते वेळी सगळ्यांच्या मनात एकदाची सुटका झाल्याची भावना होती. ती पार्टी म्हणजे केवळ एका उपचारासारखी वाटली. कारण स्ट्रिकलँड दांपत्य तेथे जमलेल्या पाहुण्यांपैकी बर्याच जणांना एक पार्टी देऊ लागत होते. पण पार्टीला येण्यात कोणालाच रस नव्हता. तरीही बहुतेक जण पार्टीला आले होते. का? तर कोणाला घरी एकट्याने जेवण्याचा कंटाळा आला होता, तर काहींना आपल् नोकरांना एक दिवस सुटी द्यायची होती, तर कोणाकडे नकार द्यायला सबळ कारण नव्हते आणि बर्याच जणांना एक फुकट जेवण वसूल करायचे होते.
जेवणाच्या खोलीत खूप गर्दी झाली होती. के.सी. दांपत्य, एक सरकारी उच्च पदस्थ आणि त्याची पत्नी, मिसेस स्ट्रिकलँडची बहीण आणि तिचा नवरा कर्नल मॅक-अँड्रयु आणि एक खासदार पत्नी. ज्याला संसदेच्या कामात अडकल्यामुळे यायला जमले नव्हते आणि ज्याच्या ऐवजी आयत्या वेळेला मला बोलावण्यात आलं होतं ती हीच व्यक्ति असावी. पार्टीला आलेली मंडळी भयंकर घरंदाज वगैरे होती. स्त्रिया आपल्या भपकेबाज कपड्यांचं प्रदर्शन करायला आल्यासारख्या वाटत होत्या. आपल्या वागण्या बोलण्यातून त्या आपला सामाजिक दर्जा ज्या कौशल्याने दाखवून देत होत्या की ते पहाणं मोठं गमतीचं होतं. पुरूष मंडळी आपापला आब सांभाळत वावरत होती.
पार्टीमध्ये आलोय तर काही तरी बोललं पाहिजे म्हणून सगळ्यांचे आवाज नकळत चढत होते. जेवणाच्या खोलीत एकच गोंगाट चालू होता. एकच एक विषय होता असं काही नव्हतं. प्रत्येक जण आपल्या शेजार्याशी, शेजारी त्याच्या शेजार्याशी बोलत होता. सूप, फिश, आँत्रे – मुख्य पदार्थ, भाजलेले पदार्थ, गोड आणि मसालेदार पदार्थ खाता खाता राजकिय परीस्थिती, गोल्फ, आपली मुलं-बाळं, नुकतंच आलेलं नाटक, रॉयल अकादमीला लागलेला नवा चित्रपट, हवापाणी, उन्हाळ्याच्या सुटीतील बेत असा कुठलाही विषय व्यर्ज नव्हता. क्षणाचीही उसंत नव्हती. आवाजाची पातळी हळूहळू वाढू लागली. पार्टी यशस्वी झाल्याबद्दल मिसेस स्ट्रिकलँडनी आपली पाठ थोपटून घेतली असती. तिचा नवराही त्याच्या वाटेला आलेली भूमिका वठवण्याचा प्रयत्नही करण्याच्या फंदात पडला नव्हता. मला वाटतं पार्टी सुरू झाल्यापासून तो कोणाशी एक शब्दही बोलला नसावा. त्याच्या बाजूला असलेली मंडळी पार कंटाळून गेलेली दिसत होती. एक दोन वेळा मिसेस स्ट्रिकलँडनी त्याच्याकडे वळून मोठ्या चिंतेने पाहिले.

शेवटी एकदा मिसेस स्ट्रिकलँड उठली आणि सगळ्या स्त्रियांना जेवणाच्या खोलीबाहेर घेऊन गेली. ती गेल्यावर स्ट्रिकलँडने दरवाजा लावून घेतला आणि के.सी. आणि सरकारी अधिकार्याच्या मधली जागा पटकावली. त्याने सगळ्यांच्या ग्लासात पोर्ट ओतली आणि सिगारचा खोका पुढे केला. के.सी. ने वाईनची तारीफ केली आणि तो ज्या एका प्रकरणात गुंतला होता ते प्रकरण थोडक्यात सांगितलं. कर्नल पोलोविषयी बोलला. माझ्याकडे बोलण्यासारखं काही नव्हतं म्हणून इतरांच्या बोलण्याकडे लक्ष आहे असं दाखवत मी गप्प बसलो. माझ्याशी बोलण्यात दुसर्या कोणाला रस नव्हता म्हणून मी स्ट्रिकलँडचं निरीक्षण करायला सुरवात केली. मला वाटलं होतं त्यापेक्षा तो चांगलाच धिप्पाड होता. पहिल्या भेटीत तो मला किरकोळ प्रकृतीचा असावा असं का वाटलं ते सांगता येत नाही. त्याचा बांधा आडवा होता. त्याचे हातपाय दणकट होते. त्याने संध्याकाळी पार्टीला म्हणून घातलेले कपडे कसे तरीच गबाळ्यासारखे वाटत होते. त्याच्याकडे पाहिल्यावर एखादा घोडागाडीवाला समारंभासाठी सजून तयार झाला आहे असं वाटत होतं. तो चाळीस एक वर्षांचा असावा. देखणा नाही पण त्याला कुरूपही म्हणता आलं नसतं. त्याने दाढी तुळतुळीत केली होती. त्यामुळे त्याचा रुंद चेहेरा उघडा बोडका वाटत होता. त्याने आपले लालसर रंगाचे केस अगदी बारीक कापले होते. त्याचे निळसर करड्या रंगाचे डोळे चेहेर्याच्या मानाने लहान वाटत होते. त्याचे एकूण व्यक्तिमत्व सर्वसाधारण म्हणता येईल असे होते. मिसेस स्ट्रिकलँडला त्याची लाज का वाटत होती ते माझ्या लक्षात आले. जिला साहित्यिक विश्वात आपली छाप पाडायची आहे अशा स्त्रीला त्याच्यासारख्या नवर्याकडून फारसा फायदा नव्हता. उच्चभ्रू समाजात वावरण्यासाठी उपयोगी पडतील असे कोणतेही गुण त्याच्या अंगी नव्हते. त्यातल्या त्यात जमेची बाजू म्हणजे त्याच्यात  विक्षीप्त म्हणावं असंही काही नव्हतं. अरसिक असला तरी मुदलातच तो एक चांगला, प्रामाणिक आणि सरळमार्गी इसम असावा असं दिसत होतं. असा सीधा-साधा गुणी माणूस कोणालाही आवडण्यासारखे असला तरी त्याच्याशी मुद्दाम मैत्री करावी असं कोणाला वाटणं कठीण होतं. समाजातील एक सन्माननिय घटक, एक सद्गृहस्थ, कुटुंबवत्सल पती आणि पिता म्हणून तो ठीक होता. पण त्याच्यापाय़ी आपला वेळ फुकट घालवावा असं कोणतंही कारण नव्हतं.



Paul Gauguin Wearing a Breton Jacket
Photography, ca. 1891, Isabell Cahn, Source: Wikipedia
Gauguin (exhibition catalogue, 1988, fig.47 p. 49), National Gallery of Washington


मून अँड सिक्सपेन्स - ५

त्या उन्हाळ्यात मिसेस स्ट्रिकलँडची आणि माझी बर्याच वेळा भेट झाली. तिने दिलेल्या छानशा लंच पार्टी नंतर मी बर्याच वेळा त्यांच्या घरी जायचो. त्या पार्टीला काही औरच मजा आली होती. आम्हाला एकमेकांशी गप्पा मारायला खूप आवडायचं. मी खूप तरूण होतो. लेखक म्हणून माझी कारकीर्द नुकतीच घडत होती. लेखनकामाच्या खडतर मार्गावर माझं बोट धरून मला घेऊन जाण्याची कल्पना तिला खूप आवडली असावी. अडचणीच्या वेळी लहानमोठी मदत करायला, आपलं म्हणणं, आपुलकीचा सल्ला ऐकणारा कोणीतरी मिळाला तर तिला ते हवंच होतं. दुसर्याचं म्हणणं सहानुभूतिने ऐकण्याची कला तिच्याकडे होती. बरेच जण या कलेचा दुरूपयोग करतात. सहानुभूती दाखवता येईल अशी कोणी व्यक्ति मिळते का याकडे असे लोक टपून बसलेले असतात. एकदा का एखादा दुर्दैवी माणूस अशा लोकांच्या तावडीत सापडला की लागलीच त्याच्यावर सहानुभूतिचा एवढा वर्षाव सुरू होतो की त्याला बिचार्याला ओशाळल्यासारखं होतं. त्यात त्यांना काय समाधान मिळते देव जाणे. माझे काही जीवलग मित्र अशा लोकांच्या सहानुभूतिचे शिकार झाले आहेत. मिसेस स्ट्रिकलँटमात्र सहानभूती दाखवताना अशा खूबीने दाखवायची की तिचं सहानुभूतिचं बोलणं ऐकणार्याला असं वाटावं की तिचं बोलणं ऐकून तोच तिच्यावर उपकार करीत आहे. मी या विषयी जेव्हा रोज वॉटरफोर्डशी बोललो तेव्हा ती म्हणाली,
“दूध चवीला छान लागतं आणि त्यात ब्रँडी घातलेली असेल तर फारच छान. पण गाईच्या आचळात साठलं तर मात्र गाईची आचळं भरून येतात आणि तिला केव्हा धार काढतायत असं होऊन जातं.”
रोज वॉटरफोर्ड फटकळ होती. तिच्यासारखं भोचक बोलणं कोणाला जमलं नसतं, तसंच तिच्यासारखं मिश्किल बोलणंही कोणाला जमणं कठीण होतं.
मिसेस स्ट्रिकलँडची आणखी एक गोष्ट मला आवडायची. तिचं वागणं, बोलणं आणि रहाणी यातून तिची उच्च अभिरूची दिसून येत असे. तिचा फ्ल्रॅट व्यवस्थित सजवलेला असे. घरात ताजी फुले ठेवलेली असत. त्यामुळे सजावट साधी असली तरी नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न वातावरण असे. डायनिंग हॉल लहान असला तरी मोठ्या कलात्मकतेने सजवलेला असल्यामुळे तेथे भोजन घेणे म्हणजे एक आनंददायक अनुभव असे. टेबल सुंदर होतं. काय हवं नको ते बघायला दोन नोकराणी मोठ्या तत्परतेने सज्ज असत. अन्न चांगलं रुचकर असे. दिवाणखान्यात तिच्या मुलाचे आणि मुलीचे फोटो होते. सोळा वर्षांच्या रॉबर्टचा रग्बी खेळतानाचा एक, फ्लॅनेल आणि क्रिकेटीची कॅप घातलेला आणि टेल कोट व स्टँडिंग कॉलरचा शर्ट असे आणखी काही फोटो होतो. तो नीट नेटका आणि सुदृढ प्रकृतीचा दिसत होता. त्यामुळे मिसेस स्ट्रिकलँड यजमानीणबाई म्हणून जेवढी आतिथ्यशील आहे तेवढीच आई म्हणूनही एक गृहकर्तव्यदक्ष गृहीणी असावी याची खात्री पटे.
“तो काही फार हुशार आहे असं काही म्हणता येणार नाही, पण तो एक फार गोड आणि आज्ञाधारक मुलगा आहे.”
मुलगी चौदा वर्षांची होती. तिचे खांद्यावर रुळणारे केस तिच्या आई प्रमाणेच दाट आणि गडद रंगाचे होते. आईसारखाच गोड चेहेरा आणि शांत नजर.
“दोन्ही मुलं तुमचंच रूप घेऊन आली आहेत.”
“खरं आहे. दोन्ही मुलं वडिलांपेक्षा माझ्यावरच जास्त गेली आहेत.”
“तुम्ही अजूनही त्यांची माझ्याशी ओळख करून दिलेली नाही.”
“ओळख करून घ्यायला आवडेल तुम्हाला?”
ती गोड हसत लाजत म्हणाली. तिच्या वयाच्या स्त्रिया एवढ्या लाजत नाहीत. तारूण्याचा बहर ओसरून गेल्यावरसुद्धा आकर्षक दिसण्याच रहस्य तिच्या या साधेपणातच असावं.
“तुम्हाला माहित नसेल म्हणून मी आगाऊ सूचना देऊन ठेवते. त्यांना या साहित्य वगैरे गोष्टींमध्ये मुळीत रस नाही. माझे यजमान म्हणजे अरसिकतेचा एक नमुनाच आहेत.”
आपल्या नवर्याला कमी लेखण्याचा हेतू तिच्या मनातसुद्धा नव्हता. किंबहुना मला तरी त्यात तिचं आपल्या नवर्यावरचं प्रेमच दिसलं. उलट आपल्या पतीच्या दोषांची आगाऊ कल्पना देऊन आपल्या मित्र-मैत्रीणींची संभाव्य शेरेबाजी टाळण्याचा तिचा उद्देश असावा.
“ते शेअर बाजारात असतात. ते अगदी हाडाचे शेअर ब्रोकर आहेत. मला वाटतं त्यांच्याशी गप्पा मारायला तुम्हाला खूप कंटाळा येईल.”
“तुम्हाला कंटाळा येतो?” मी उलट विचारलं.
“हे पहा मी त्यांची धर्मीपत्नी आहे आणि माझं त्यांच्यावर खूप प्रेमही आहे.”
हे बोलताना ती किंचीत लाजली आणि ते लपवण्यासाठी ती मुग्ध हसली. मला वाटलं की मी तिचा उपहास करीन अशी तिला भिती वाटली असावी. कारण रोज वॉटरफोर्डने माझ्यासमोर अशी कबुली कधीच दिली नसती. ती थोडी गांगरली आणि तिच्या डोळ्यात पाणी तरळले.
“आपण कोणी महान आहोत असं ते कधीच भासवत नाहीत. शेअर बाजारात ते फार पैसे मिळवतात असेही नाही. ते कसंही असलं तरी ते अतिशय चांगले आणि शांत स्वभावाचे आहेत.”
“मला त्यांच्याशी गप्पा मारायला आवडेल.”
“मी एकदा फुरसतीने तुम्हाला जेवायला बोलावीन. पण तुमची संध्याकाळ फुकट गेली म्हणून मागाहून मला नाव ठेऊ नका.”



The Bank of England and the Royal Exchange
Photograph by Sir William Tite, 1844, Source: Victorianweb.org

Thursday, January 18, 2018

मून अँड सिक्सपेन्स - ४

त्या दिवसात रोज वॉटरफोर्डने दाखवली तेवढी आपुलकी मला दुसर्या कोणी दाखवली नव्हती. तिच्यात पुरूषांची बुद्धी आणि स्त्रियांची कुटीलता या दोघांचा मिलाफ होता. ती ज्या कादंबर्या लिहायची त्या अगदी स्वतंत्र आणि अस्वस्थ करणार्या असत. तिच्यात घरी एके दिवशी चार्ल्स स्ट्रिकलँडच्या पत्नीशी माझी ओळख झाली. मिस वॉटरफोर्डने चहापानाला तिच्या घरी बोलावलं होतं. तिचं लहानसं घर आमंत्रितांनी भरून गेलं होतं. प्रत्येक जण बोलत होता. मी एकटाच अवघडून गप्प बसलो होतो. नव्याने ओळख झालेल्यांशी आपण होऊन बोलायला मला थोडं संकोचल्यासारखं वाटत असे. मिस वॉटरफोर्ड एक चांगली यजमान होती. तिने माझी अडचण ओळखली आणि ती आपण होऊन पुढे आली.
“तुम्ही मिसेस स्ट्रिकलँडशी बोला. त्यांना तुमचं पुस्तक खूप आवडलं आहे.”
“त्या काय करतात?” मी विचारलं.
माझ्या अज्ञानाबद्दल मी सजग होतो. जर मिसेस स्ट्रिकलँड लेखक असत्या तर मला महित असलेलं बरं.
“त्यांना लोकांना पार्टीला बोलवाला खूप आवडतं. त्यांच्याशी कोणी थोडंसं गोड गोड बोललात लगेच पुढच्या पार्टीचं आंमत्रण मिळतं.”
रोज वॉटरफोर्डला सगळ्या गोष्टीत खोड काढायची सवय होती. दुसर्याचं खाजगी आयुष्य चिवडून त्यात आपल्या कादंबरीसाठी काहीतरी कथासूत्र मिळतय का हे ती शोधत असायची. आपल्याला भेटणारी सगळी माणसं तिला कथालेखनासाठी कच्ची सामुग्री आहेत असं ती गृहीत धरत असे. कोणी तिची थोडीशी तारीफ केली की काही तरी कारण काढून तिच्याकडच्या पार्टीचं आमंत्रण मिळालंच समजा. साहित्यिकांबद्दल लोकांना वाटणार्या आदराची तिला चांगली कल्पना होती. साहित्यिक वर्तूळातील मोठ-मोठ्या पार्ट्यांना तिला आवर्जून आमंत्रण असे. त्यामुळे आपल्या आमंत्रणाचा अव्हेर होणार नाही याची तिला खात्री होती. त्यामुळे ती पाहुणी किंवा यजमान या दोन्ही भुमिकेत मोठ्या दिमाखाने वावरत असे.
तिने माझी मिसेस स्ट्रिकलँडशी ओळख करून दिल्यावर आम्ही दहा एक मिनीटे एकमेकांशी बोलत होतो. तिचा आवाज मंजूळ होता यापेक्षा त्या भेटीतील काहीही मला आठवत नाही. वेस्टमिनीस्टर या भागात तिच्या मालकीचा एक फ्लॅट होता. त्या फ्लॅटमधून बांधकाम चालू असलेल्या कॅथेड्रलचे दृश्य दिसे. मी सुद्धा त्याच भागात रहात होतो. एकाच विभागात रहाणार्या लोकांत उदाहरणार्थ नदी आणि सेंट जेम्स पार्क याच्यामधील विभाग जसा आर्मी अँड नेव्ही  स्टोर्समुळे जसा एकप्रकारचा आपलेपणाचा भाव आपोआपच प्रस्थापित होत असे तसा आमच्यात मैत्रीचा धागा आपसूकच निर्माण झाला. थोड्याच दिवसात तिच्या घरच्या एका लन्शन पार्टीचे मला आमंत्रण मिळाले.
मला फारसं कामच नसायचं. त्यामुळे कोणत्याही पार्टीचे आमंत्रण मी आनंदाने स्विकारीत असे. पार्टीला मी थोड्या उशीरानेच गेलो. खूप लवकर गेलो तर बरे दिसणार नाही म्हणून मी कॅथेड्रील भोवती तीन चार फेर्या मारल्या. परीणामी खूपच उशीर झाला. मी पोचलो तेव्हा पार्टी संपत आली होती. मिस वॉटरफोर्ड आणि मिसेस जे, रिचर्ड ट्विनींग आणि जॉर्ज रोड हे हजर होते. आम्ही सगळे लेखक होतो. वसंत ऋतुची सुरवात होती. त्या दिवशी हवा फार चांगली पडली होती. खेळकर वातावरणात गप्पा रंगल्या होत्या. आमच्या बोलण्यात शेकडो विषय येत होते. मिस वॉटरफोर्ड आपल्या ऐन तारूण्यात कोणत्याही पार्टीला सहसा शेवाळी रंगाचा ड्रेस घालून जात असे आणि हातात डॅफोडिल्सची फुलं असत. पण आता तारूण्याचा बहर ओसरला होता. तरूणपणीच्या अभिरूचीची जागा प्रौढत्वात येणार्या उच्छृंकुलपणाने घेतल्यामुळे ती उंच टाचांचे बूट, पॅरीस फॅशनचा नवा कोरा ड्रेस आणि नवी हॅट अशी नटून आली होती. नटल्यामुळे असेल पण तिचा उत्साह उतू जात होता. तिथे अनुपस्थित असलेल्या आमच्या लेखक मित्रांबद्दल एवढं आकसाने बोलताना तिला यापूर्वी मी कधी पाहिलं नव्हतं. मोठ्याने बोलून दुसर्यावर विनोद करणं अनुचित दिसलं असतं याची कल्पना मिसेस जेला असल्यामुळे ती अगदी हळू आवाजात कुजबुजत होती. रिचर्ड ट्विनींग काही तरी गमतीजमतीच्या गोष्टी सांगत होता. जॉर्ज रोडला बोलायला विषय न मिळाल्यामुळे त्याचे तोंड गप्प होते, फक्त खाण्यापुरते उघडत होते. मिसेस स्ट्रिकलँड फारशी बोलत नव्हती. न बोलता संभाषण चालू कसं ठेवयचं ती कला तिला चांगलीच अवगत होती. जेव्हा संभाषणाच खंड पडे तेव्हा एक दोन मोजक्या शब्दांत आपले मत व्यक्त करून ती संभाषण पुढे चालू रहाण्यास मदत करत होती. ती सदतीस वर्षांची होती. थोडी भरल्या अंगाची. तरीही तिला लठ्ठ म्हणता आलं नसतं. ती फार सुंदर होती अशातला काही भाग नाही, पण तिचा चेहेरा आकर्षक होता. मुख्यत: तिच्या टपोर्या बदामी डोळ्यांमुळे. तिची अंगकांती किंचीत तांबूस होती. तिचे काळसर केस व्यवस्थित विंचरलेले होते. तेथे उपस्थित असलेल्या तीन स्त्रियांपैकी मेकअप न केलेली अशी ती एकटीच होती. इतरांच्या तुलनेत तिचे सौंदर्य साधे वाटत असले तरी त्यात एक प्रकारचा डौल होता.
जेवणघराची सजावट साधी म्हणता येईल अशी असली तरी त्यात तत्कालीन अभिरूची दिसत होती. भिंतीवर उंचापर्यंत पांढर्या लाकडाचे जोडकाम केले होते. त्यावर लावलेल्या हिरवट रंगाच्या वॉलपेपरवर व्हिसलरची इचिंग काळ्या रंगाची शिसवी फ्रेम करून लावली होती. उंच खिडक्यांवर मोराचे डिझाईन काढलेल्या हिरव्यागार रंगाचे पडदे लावले होते. झाडाझुडपात बागडणार्या पांढर्या शुभ्र सशांचं चित्र असलेलं हिरव्या मखमली रंगाचं जाजम जमिनीवर अंथरलेलं होतं. एकूण सजावट आणि रंगसंगतीवर विल्यम मॉरीसच्या शैलीची छाप होती. निळ्या रंगाचं नक्षीकाम केलेलं चिनीमातीचं भांड फायरप्लेसच्या कठड्यावर ठेवलेलं होतं. त्यावेळी लंडनमध्ये अशा प्रकारची सजावट केल्या शेंपाचशें तरी डायनिंग रूम असाव्यात. सजावट कितीही कलात्मकतेने आणि टापटीपीने केली असली तरी ती एकंदरीत यांत्रिक आणि त्यामुळे निरस वाटत होती.
मी मिस वॉटरफोर्ड बरोबर बाहेर पडलो. बाहेर छान उन पडलं होतं. त्यात तिची हॅटही नवीन होती. त्यामुळे आम्ही बागेतून फेरफटका मारायचं ठरवलं.
“पार्टी छान झाली नाही.”
“खायचे पदार्थ काही खास नव्हते. मी तिला अगदी बजावून सांगितलं होतं. लेखक मंडळींना बोलावलं आहेस तर त्यांना चांगलं खिलवलं पाहिजे.”
“तुमचा सल्ला चांगला आहे. पण मला एक सांगा या बाईसाहेबांना मुळात लेखकांना बोलावून पार्टी द्यायची एवढी हौस का आहे.”
मिस वॉटरफोर्डने मान हलवली.
“तिला त्याची खूप हौस आहे. तिला सगळ्या साहित्यिक चळवळीत भाग घ्यायला मनापासून आवडतं. तिला बिचारीला असं वाटत असतं की आपण म्हणजे एक अगदी साधी गृहिणी आहोत आणि आपल्याकडे येणारे साहित्यिक म्हणजे कोणी खास माणसं आहोत. आपल्या सारख्या लेखकांना पार्टीला बोलावल्यामुळे तिला मनापासून आनंद होतो आणि हा आनंद तिला मिळू देण्यात आपलं काहीच नुकसान नाही. मला तिचं हे फार आवडतं.”
आपल्या पार्टीला साहित्यिक वगैरे मंडळी यावीत असं वाटणार्या तिच्या सारख्या उच्चभ्रू महिला हॅम्पस्टीड ते चेने वॉक पर्यंत डझनावारी मिळाल्या असत्या. लेखकांना आपल्या गटात ओढण्यासाठी त्यांच्यात नेहमी अहमिका लागायची. मागे वळून पहाताना आता मला असं वाटतं की त्या अतिविशाल महिलांत मिसेस स्ट्रिकलँड त्यातल्या त्यात बरी म्हणता आली असती. तिचं बालपण ग्रामिण भागात गेलं होतं. मुडीच्या लायब्ररीतून येणार्या पुस्तकांमुळे लंडनच्या सांस्कृतीक जीवनाशी तिचा परिचय झाला होता. तिला वाचनाची खरीखूरी आवड होती. तिच्या सारख्या महिलांमध्ये हे अपवादानेच आढळलं असतं. कारण बहुतेकांना लेखकाच्या पुस्तकापेक्षा किंवा चित्रकाराच्या पेंटींगपेक्षा त्याच्या खाजगी आयुष्यातच जास्त रस असतो. तिचं स्वत:चं असं एक कल्पनाविश्व होतं. नेहमीच्या रहाटगाड्यात न मिळणारं स्वातंत्र्य तिला तिच्या कल्पनाविश्वात मनमुराद घेता येई. इतके दिवस ती साहित्यिकांचं जग प्रेक्षकाच्या भूमिकेतून बघत असे. लेखकांशी जला परिचय होऊ लागला तसा पडद्यामागच्या जगात तिचा प्रवेश झाला. कलाकारांचं नाट्यमय आयुष्या तिला अगदी जवळून बघता येऊ लागलं. साहित्यिक मेजवान्यांना ती आवर्जून उपस्थित राही. लेखकांना आपल्या घरी बोलवून ती त्यांचं चांगलं आदरातिथ्य करी. तिने साहित्यिक जगाची संस्कृती चांगलीच आत्मसात केली. पण तिने आपला स्वतंत्र बाणा कधीच सोडला नव्हता. लेखकांची विक्षीप्त वर्तणूक, चित्रविचीत्र पेहेराव, भन्नाट कल्पना आणि चक्रमपणा या सगळ्यांनी तिचं चांगलं मनोरंजन होत असावं, पण त्याचा परिणाम तिच्यावर झालेला कधी दिसला नव्हता.
“मिस्टर स्ट्रिकलँड काय करतात?”
“इथेच रहातात. लंडनमध्ये त्यांचा शेअर दलाली की काहीतरी व्यवसाय आहे. ते बिचारे अगदी साधे आहेत.”
“मला एक शंका आहे. त्या दोघांचं आपापसात जमतं?”
“न जमायला काय झालं. चांगलं जमतं. त्यांच्याकडे कधी डिनरला जायची वेळ आली तर तुमची त्यांची भेट होईलच. पण त्यांच्याकडचं आमंत्रण सहसा डिनरचं नसतं. मिस्टर स्ट्रिकलँडना लोकांत मिसळायला आवडत नसावं. साहित्य, कला वगैरे गोष्टींमध्ये त्यांना रूची नाही.”
“सुसंकृत आणि बहुश्रुत स्त्रिया अशा अशा नीरस पुरूषांशी का बरं लग्न करतात?”
“कदाचित बुद्धीमान पुरूषांना सुसंकृत आणि बहुश्रुत स्त्रियांशीच लग्न करायला आवडत असावं.”
यावर चांगलं प्रत्युत्तर मला सुचलं नाही. म्हणून मी त्यांना मुलं आहेत का याची चौकशी केली.
“एक मोठा मुलगा आणि धाकटी मुलगी आहे. दोघंही शाळेत जातात.”
त्या विषयात बोलण्यासारखं काही उरलं नाही म्हणून आम्ही दुसर्या विषयाकडे वळलो.



Zaandam, the Netherlands, c. 1889 - etching by James McNeill Whistler
                                            Source: Wikipedia, Public  Domain

Wednesday, January 17, 2018

मून अँड सिक्सपेन्स - 3

हे झाले थोडेसे विषयांतर.
मी माझं पहिलं पुस्तक लिहीलं तेव्हा मी अगदी तरूण होतो.
सुदैवाने माझ्या पहिल्याच पुस्तकाकडे लोकांचं लक्ष गेलं आणि बरेच लोक मला ओळखू लागले.
लंडनच्या साहित्यिक वर्तुळात माझी उठबस सुरू झाली. माझा स्वभाव थोडासा उतावीळपणाचा असला तरी सुरवातीला भिडस्तपणामुळे मी मागेमागेच रहायचो. माझ्या भटकंतीच्या दिवसात सगळा आनंदी आनंद होता असं काही म्हणता येणार नाही. काही अगदी मन विषण्ण करणारे प्रसंगही येत. पण त्याला आता खूप काळ लोटला आहे. कादंबर्यांत वर्णन केलेल्या गोष्टी आणि घटना बर्याच अंशी अचूक असल्या तरी काळानुसार त्यातील काही तपशील आता बदलले आहेत. उदाहरणार्थ काही स्थळं. चेल्सी आणि ब्लुम्सबेरीने आता हॅम्पस्टीड, नॉटींग हिल गेट, हाय स्ट्रीट आणि केनिंगस्टनची जागा घेतली आहे. त्या काळी एखाद्याचा चाळीशीच्या आत साहित्यिक वर्तूळात समावेश होणं म्हणजे मोठा बहुमान समजला जायचा. पण आता पंचवीस वर्षावरील साहित्यिकाला अडगळीत काढलं जातं. त्या काळी आम्ही आमच्या भावनांचं प्रदर्शन करायला थोडे लाजायचो. आपली चेष्टा हाईल या भितीमुळे का होईना आमचा ढोंगीपणा थोडा काबूमध्ये असायचा. आम्ही फार सोज्वळ होतो अशातला भाग नाही, पण आजच्यासारखा चौफेर स्वैराचर मात्र आमच्या काळी नव्हता. क्वचित कधीतरी पाऊल वाकडं पडलं तर त्याची वाच्यता करण्याऐवजी आम्ही मौन बाळळगत असू. आम्ही फावड्याला फावडं म्हणणारी अगदी सरळसोट माणसं होतो. स्त्रियांनी त्यांची मर्यादा त्याकाळी ओलांडली नव्हती हे ही एक महत्वाचं कारण होतंच म्हणा.
मी व्हिक्टोरिया स्टेशनजवळ रहात असे. तेथून मी माझ्या साहित्यिक मित्र मंडळींना भेटण्यासाठी बसने शहरात ठिकठिकाणी जात असे. अशा माझ्या भटकंतीतील एक भेट मला आजही नीट आठवत आहे. भिडस्तपणामुळे मला दार ठोठावण्याचा धीर होत नव्हता. त्यामुळे धीर येण्यासाठी मी रस्त्यावरून फेर्या मारत होतो. अशा बर्याच फेर्या मारून झाल्यावर शेवटी धीर करून मी दार ठोठावले. दार उघडून कोणीतरी मला आत घेतल्यावरच माझा जीव भांड्यात पडला. आतल्या गर्दीत मी बुजर्यासारखा वावरत होतो. तेथे यजनामीण बाईंनी बर्याच मोठ्या लोकांशी माझी आवर्जून ओळख करून दिली. त्यांनी माझ्या पुस्तकाची जी स्तुती केली त्याने तर मी पार अवघडून गेलो होतो. मी लेखक असल्याने संभाषण चतुर असेन असं त्यांना वाटत असावं. पण बोलायला चातुर्यपूर्ण असं काहीतरी सुचेपर्यंत पार्टी संपून गेली होती. माझा अस्वस्थपणा लपवण्यासाठी मी चहाचा कप आणि पावाचा कसातरी कापलेला तुकडा हातात घट्ट धरून उभा होतो. माझ्याकडे कोणाचेही लक्ष जाऊ नये असं मला वारंवार वाटत होतं. कारण मला त्या सगळ्या सुप्रसिद्ध मंडळींकडे डोळे भरून पहायचं होतं आणि त्यांचं चातुर्यपुर्ण बोलणं माझ्या कानात साठवून घ्यायचं होतं.
तेथे जमलेल्या स्त्रिया नाकेल्या, टपोर्या डोळ्यांच्या आणि चांगल्या धष्टपुष्ट होत्या. त्यांनी घातलेले कपडे अंगावर घातलेल्या चिलखतासारखे दिसत होते. हळू आवाजात बोलत इकडे तिकडे फिरताना आपल्या अवतीभोवती काय चालंलय याच्यावर त्यांचं बारीक लक्ष होतं. पावाला लोणी लावतानासुद्धा हातमोजे न काढण्याचा हट्ट आणि कोणाचं लक्ष नाही असं पाहून हळूच खुर्चीला हात पुसण्याची चलाखी माझ्या अजूनही लक्षात आहे. फर्नीचरच्या दृष्टीने तसं करणं चांगलं नव्हतं पण यजनानीणबाईंनी त्याचा बदला त्या जेव्हा त्यांच्या मैत्रीणीकडे पार्टीला जातील तेव्हा तेथल्या फर्नीचरला हात पुसून घेतला असता. काही जणींनी अद्ययावत फॅशनचे कपडे घातले होते. एखाद्याने कादंबरी लिहीली आहे एवढ्यावरून त्याला गबाळेपणाने रहाण्याचा हक्क मिळतो असे नाही असं त्यांचं मत होतं. छाप पाडण्यासाठी चांगले रूबाबदार कपडे घालायला हरकत नसते. लेखकाने झकपक कपडे करून वर चकचकीत बूट घातले तर त्याचे लिखाण नाकारायची संपादकाची हिम्मत होणार नाही. पण काही स्त्रियांच्या मते व्यवस्थित कपडे केल्याने त्यातून थिल्लरपणा दिसतो. कलाकारासारखे दिसण्यासाठी त्या मुद्दाम गबाळे कपडे करून आल्या होत्या. त्यांनी घातलेले दागिने तर अगदी बघवत नव्हते. पुरूष सहसा असा आचरटपणा करत नाहीत. त्यांचा पहेरावर अगदी कुठल्याही ऑफिसमध्ये खपून जाईल असा होता. बहुतेकजण थकलेले आणि कंटाळलेले दिसत होते. तेथे जमलेल्या लेखक मंडळींपैकी बर्याच जणांशी माझा पूर्वपरिचय नव्हता. त्या तद्दन खोट्या आणि तकलादू वातावरणात मला अगदी अवघडून गेल्या सारखे वाटायला लागलं.

तेथे जमलेल्या मंडळींच संभाषण ऐकण्यासारखं होतं. कोणाची पाठ वळताच त्याची खिल्ली उडवली जायची. एखाद्या व्यक्तिच्या चारित्र्याची टिंगल उडवावी तशाच थिल्लरपणाने त्याचे गंभीर लेखनसुद्धा टिंगलीचा विषय होऊ शकतो हे मला नव्याने कळलं. मला समयोचित आणि हजरजबाबी बोलता येत नाही याचं मला वाईट वाटतं. त्या काळी संभाषणचातुर्य हे एक मोठं शास्त्र होतं. मार्मिक आणि चपखल उत्तर देणं ही एक कला होती. भट्टीमधील फुटाण्यासारखा ताडताड बोलणारा लेखक पार्टीमध्ये भाव खाऊन जाई. संभाषणात चुटके आणि चारोळ्या पेरून खोटी नाटकी रंगत आणली जाई. आता मला त्यातील फारसं काही आठवत नाही. पण मला वाटतं संभाषण जेव्हा लेखन व्यवसायाच्या प्रमुख अंगाकडे वळायचे तेव्हा कित्येकांना ते अडचणीचं वाटायचं. एखाद्या पुस्तकाच्या गुणवत्तेचा विषय निघाला की त्या पुस्तकाच्या किती प्रति विकल्या गेल्या, लेखकाला किती मानधन देऊ केलं आहे, त्यातील किती त्याला आगाऊ मिळाले, असे प्रश्न हटकून उपस्थित व्हायचे. मग आम्ही या ना त्या प्रकाशकाविषयी बोलत असू. एकाचं औदार्या तर दुसर्याचा कंजूषपणा यांची तुलना व्हायची. घसघशीत मानधन देणार्या प्रकाशकाकडे जावं की चांगल्या दर्जेदार पुस्तकांसाठी प्रसिद्ध असलेल्याकडे जावं. काही प्रकाशक जाहिरात चांगली करत तर काहींच जाहिरातीकडे पूर्ण दुर्लक्ष. नंतर एजंट आणि संपादकांचा विषय निघायचा. कोणता एजंट एकदा मान्य केलेलं मानधन वेळीच रोख देतो आणि कोणता नुसते वायदे करत बसतो? पुस्तकाचा खप वाढण्यासाठी संपादकांचा तसा उपयोग होतो का? अशा लेखकांच्या आतल्या वर्तुळात आपला समावेश झाल्याबद्दल मला त्यावेळी आतून फार बरं वाटायचं.


Victorian high tea party, Photograph on glass plate, Circa 1900.
Source: Wikipedia, Public Domain

Monday, January 15, 2018

मून अँड सिक्सपेन्स - २


चार्ल्स स्ट्रिकलँडवर आतापर्यंत एवढं लिहलं गेलंय की मला अधिक काही लिहीण्याची आवश्यकता उरलेली नाही. चित्रकाराचं खरं स्मारक त्याची चित्रंच असतात. त्याच्यावर ज्यांनी लिहीलं त्या सर्वांपेक्षा मी त्याला जास्त ओळखत होतो हे खरं आहे. तो चित्रकार होण्याच्या कितीतरी आधीच त्याची माझी भेट झाली होती. तो पॅरीसमध्ये अतिशय खडतर परिस्थितीत दिवस कंठत असतानाही मी त्याला बर्याच वेळा भेटलो होतो. जर युध्दाच्या निमीत्ताने मी ताहितीत गेलो नसतो तर मी माझ्या आठवणी शब्दबद्ध केल्या असत्या का नाही ते मला सांगता येत नाही. आपल्या आयुष्याच्या अखेरीला त्याचे वास्तव्य त्या कुप्रसिद्ध ताहिती बेटांवर होते. माझ्या ताहिती बेटांवरील मुक्कामात मला त्याच्या परिचयाच्या काही व्यक्ति भेटल्या. त्यामुळे कोणाला माहिती नसलेल्या त्याच्या आयुष्याच्या अखेरच्या काळावर प्रकाश टाकण्याची संधी मला मिळाली. स्ट्रिकलँड हा एक महान कलाकार होता असं ज्यांना वाटतं त्यांना ही चतुर्वैसत्यम माहिती महत्वाची वाटू शकेल. ज्यांना सोळाव्या शतकातील एल ग्रेको हा स्पॅनिश चित्रकार माहिती असेल त्यांना मला स्ट्रिकलँडबद्दल काय म्हणायचंय ते कळू शकेल.
चित्तशुद्धीसाठी प्रत्येकाने आपल्याला आवडत नाही अशी एक तरी गोष्ट रोज केली पाहिजे, असं ज्याने मला सांगितलं होतं त्याचं नाव आता या क्षणी मला आठवत नाही. पण मी सकाळी उठल्यापासून ते झोपे पर्यंत हा नियम कटाक्षाने पाळतो. माझ्या स्वभावातच थोडं फार वैराग्य आहे. मी बर्याच वेळा स्वत:ला खूप त्रास करून घेतो. शारिरीक तसाच मानसिकही. मी सहसा टाईम्स लिटररी सप्लिमेंट वाचण्याची संधी सोडत नाही. ज्या प्रमाणात आज पुस्तकं प्रसिद्ध होत आहेत ते बघता त्याची नुसती माहिती घ्यायची असेल तर अशी शिस्त लावून घ्यावीच लागते. सगळ्या लेखकांना आपलं पुस्तक कधीतरी प्रसिद्ध होईल, त्याला कोणीतरी वाचक मिळेल अशी आशा असतेच. ढीगभर प्रसिद्ध होणार्या एवढ्या पुस्तकातून आपल्या पुस्तकाच्या नशीबी काय वाढून ठेवलं आहे, कोणी त्याची दखल घेईल का हे प्रश्न लेखकाला छळत असतात? बरीच गाजलेली पुस्तकं चार दिवसांनी लोक विसरूनही जातात. आपले पुस्तक वाचून वाचकाला दोन घटका विरंगुळा मिळावा म्हणून त्या बिचार्या लेखकाने किती परिश्रम घेतले असतील, कोणकोणते बरे वाईट अनुभव त्याच्या वाटेला आले असतील, त्याने काय काय यातना भोगल्या असतील ते एका परमेश्वरालाच ठाऊक. परिक्षण वाचून आपलं मत बनवायचं तर यातील बरीचशी पुस्तकं लेखकाने खूप मेहनत घेऊन विचारपूर्वक लिहीलेली असतात, कित्येक पुस्तकं तर लेखकाच्या आयुष्यभराच्या परिश्रमाचे फलित असतात. एवढं करून त्यातील किती पुस्तकं किती लोक वाचतील, जाणकार त्याची कितपत दखल घेतील ते काहीच सांगता येत नसतं. तात्पर्य काय तर लेखकाने आपल्या लेखनाची कोण आणि किती जण दखल घेतात, त्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव होतो की त्याच्या वाटेला कठार टीका येते याचा फारसा विचार न करता त्याने आपल्या लेखन-कामाठीतच समाधान मानावे हेच खऱं.
आमच्या पिढीने आमच्या तरूणपणीच देवपूजा वगैरे करणं सोडून दिलं होतं. परंतु या युद्धाच्या दिवसात हल्लीचा तरूण वर्ग पुन्हा देवपूजेच्या मागे लागला आहे. पुढची पिढी कोणत्या मार्गाने चालली आहे ते आपल्याला यावरून कळून येईल. या पिढीला आजच्या गोंधळाच्या परिस्थितीची शक्तिस्थाने चांगलीच ठाऊक आहेत. आपली जागा घ्यायला ही तरूण पिढी तयार आहे. पण काही जेष्ठ मंडळी आपले दिवस आता गेल्यात जमा आहेत हे मानायला अजून तयार होत नाहीत. त्यांनी तरूणांसारखा कितीही आरडा ओरडा केला तरी त्यात काही दम नसतो हे लक्षात येतं. तारूण्याचा भर ओसरलेल्या वेश्येने कितीही रंगरंगोटी केली तरी त्याने गेलेली जवानी परत येणार नसते. शहाणी मंडळी आपला आब राखून वेळीच बाजूला होतात. त्यांचा आब त्यांच्या मिश्किल हास्यात दडलेला असतो. त्यांच्या तारूण्यात त्यांनी हेच केलेले असते. पुढची पिढी एक प्रकारे मागच्याच पिढीचे अनुकरण करत असते. काळ बदलला असला तरी शब्द तेच असतात. फक्त लंबकाचा झोका दुसर्या टोकाला गेलेला असतो एवढंच.

लेखकाचं मुल्यमापन कालसापेक्ष असू शकत नाही. एके काळी प्रसिद्धिच्या शिखरावर असलेल्या लेखकाचे एवढे कालांतराने अवमुल्यन होते की तो अगदी नगण्य होऊन जातो. जॉर्ज क्रॅब आता कोणाला आठवेल तरी का. एके काळी तो केवढा प्रसिद्ध कवी होता. जाणकार रसिकांनी त्याला अगदी डोक्यावर घेतलं होतं. त्याची प्रतिभा वादातीत होती. पण काळ बदलला आणि त्यामुळे आलेल्या व्यामिश्रतेपुढे त्याची कविता अगदी बाळबोध वाटायला लागली. त्याच्या कवितांवर अलेक्झांडर पोपचा प्रभाव होता. त्याच्या कवितेत जागो जागी बोधवचनांची पखरण केलेली असे. तेवढ्यात फ्रेंच राज्याक्रांती झाली आणि पाठोपाठ झालेल्या नेपोलियनच्या युध्दांमुळे कवितांचे विषय बदलले, गाण्यांचे सूर बदलले. पण क्रॅब महाशय मात्र तीच जुनी नितीमत्तेचे बोधामृत पाजणारी कविता उगाळत बसले होते. क्रॅबने जगात खळबळ उडवणारी नव्या जाणिवांची कविता वाचली नसेल असं काही म्हणता येणार नाही. पण वाचली असली तरी त्याला ती आवडली नसणार याची मला खात्री आहे. अर्थात बरीचशी नवकविता त्याच लायकीची होती म्हणा. बर्याच प्रमाणात कीट्स आणि वर्ड्सवर्थ, कोलरीजच्या दोन तीन, शेलीच्या आणखी काही अपवाद म्हणाव्या लागतील. पण क्रॅबने मात्र जुन्या वळणाच्या बोधप्रद कवितांचा रतीब घालणे काही थांबवले नाही. तरूण पिढीचे काव्य मी थोडेफार वाचले आहे. कीट्सच्या काव्यात तळमळ आहे, शेलीच्या काव्यातून स्वर्गीय आनंद मिळतो. या दोघांच्या बर्याच कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. पण काळाच्या ओघात त्यातील किती टिकून रहातात आणि किती वाहून जातात ते सांगणं कठीण आहे. त्यांच्या कवितेतील सफाई विलक्षण आहे. त्यांनी एवढ्या लहान वयात प्रसिद्धीचं शिखर गाठलं आहे की त्यांना उदयोन्मुख कवि म्हणणं तसं प्रस्तुत होणार नाही. त्यांची शैली कितीही सुरेख असली तरी त्यांचं काव्य माझ्या तरी मनाला भिडत नाही. त्यांच्या कवितेतील शब्दकळा पाहून रॉजेटचा थेसॉरस त्यांनी पाळण्यात असतानाच घोकून तोंडपाठ केला असावा की काय अशी शंका येते. माझ्या मते त्यांच्या काव्यातून त्यांचे माहितीचे ज्ञानभांडार आणि त्यांच्या भावना या दोन्ही गोष्टी खूपच उघडपणे व्यक्त होतात. त्यांच्या कवितेचं असं अंगावर येणं माझ्या पचनी पडत नाही. माझ्या मते त्यांच्या काव्यात जोश थोडा कमी पडतो. त्यांची स्वप्न थोडी फिकी वाटतात. मला ते फारसे आवडत नाहीत. तसं बघायला गेलं तर मी कुंपणावर बसलेलो आहे. मला आपल्या साध्या, सरळ, सोप्या, बोधकथा लिहायला आवडतील. पण अशा कथा लिहीण्यामागे माझा स्वप्नरंजन सोडून दुसर्या कोणताही हेतू असला तर त्याच्या सारखा दुसरा मूर्खपणा असणार नाही.


Artist: El Greco  (1541–1614)
Title: The Vision of Saint John, or The Opening of the Fifth Seal
Date between circa 1609 and circa 1614, Oil on canvas, : 87.5 × 76 in (222.3 × 193 cm)
Current location: Metropolitan Museum of Art, NY. Source :Wikimedia

Saturday, January 13, 2018

मून अँड सिक्सपेन्स - १


चार्ल्स स्ट्रिकलँडला मी जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हा पुढे भविष्यकाळात तो केवढा मोठा प्रसिद्ध माणूस होणार आहे याची यत्किंचीतही चुणूक मला त्याच्यात दिसली नव्हती, ही गोष्ट इथे मी कबूल करतो. पण आज बघायला गेलं तर त्याच्या मोठेपणाबद्दल कोणाचेही फारसे दुमत होणार नाही. एखादा राजकीय पुढारी किंवा पराक्रमी सेनानी जेव्हा वरच्या पदाला जाऊन पोचतो आणि त्याला लोक मोठा समजू लागतात तेव्हा त्यात बर्याच वेळा त्याच्या कर्तुत्वापेक्षा तो ज्या पदावर बसला आहे त्या पदाचा भाग जास्त असतो. नशीबाचे फासे कसे पडतात त्यावर सर्व काही अवलंबून असतं. पंतप्रधानसुद्धा एकदा आपल्या पदावरून पायउतार झाला की त्याची भाषणबाजी पोकळ वटवटीसारखी वाटू लागते. आणि सैन्याशिवाय सेनापती म्हणजे एखाद्या गल्लीतील दादासारखा. पण चार्ल्स स्ट्रिकलँडचं मोठेपण अगदी वेगळ्या प्रकारचं म्हणावं लागेल. तो एक मनस्वी आणि कलंदर पण अलौकिक प्रतिभेचं दैवी देणं लाभलेला चित्रकार होता. माणूस म्हणून भला विक्षिप्त असेल पण कलाकार म्हणून पहाल त्याची शैली स्वतंत्र अगदी शंभर ट्क्के अस्सल होती. त्याची चित्रं, पेंटींग कदाचित तुम्हाला आवडणार नाहीत पण एक एक अव्वल दर्जाची चित्रकला म्हणून त्यांचा विचार केल्या शिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही. त्याच्या कलाकृती आपलं लक्ष वेधून घेतात आणि आपल्याला अस्वस्थ करतात. एके काळी स्ट्रिकलँड आणि त्याच्या कलाकृती चेष्टेचा विषय व्हायच्या, आणि त्याची चित्रं त्याच्या सारखीच विकृत आहेत अशी टीका व्हायची. कोणी त्याची बाजू घेउन जरा त्याच्या विषयी बरं बोललं तर त्या बाजू घेणार्याचं डोकं फिरलंय असं म्हटलं जाईल. कोणी त्याच्या चित्रांविषयी थोडी जरी सहानभूती दाखवली तरी तो त्या चित्रांच्या कर्त्यासारखाच विकृत असला पाहिजे असं समजलं जाई. पण तु काळ आता मागे पडला आहे. आता स्ट्रिकलँडच्या दोषांकडे त्याच्या गुणवत्तेचा एक अपरिहार्य भाग म्हणून बघितलं जातं. कलाविश्वात त्याचे स्थान कोणते यावर समिक्षकांमध्ये चर्चा होते. त्याच्या कलेचे मुल्यमापन करताना समीक्षकांनी केलेली प्रशंसा त्याच्यावरील टीकेपेक्षा जास्त अडचणीची ठरण्याची शक्यता आहे. काहीही झालं तरी त्याला अलौकिक प्रतिभेचं देणं मिळालं होतं यावर कोणाचं दुमत होणार नाही. माझ्या मते एखाद्या कलाकृतीपेक्षा ती निर्माण करणार्या कलाकाराचं व्यक्तिमत्व हे जास्त महत्वाचं असतं आणि जर असं व्यक्तिमत्व जर एकमेकाद्वितीय असेल तर त्याला हजार गुन्हे माफ करायला हरकत नसते. सर्वसाधारणपणे वेलास्केजला एल ग्रेकोपेक्षा मोठा चित्रकार समजलं जातं. पण मला मात्र एल ग्रेकोच जास्त आवडतो. कारण एल ग्रेको मायकेल अँजेलोच्या सावलीतून जाणीवपूर्वक बाहेर आला आणि त्याने आपली स्वतंत्र शैली प्रस्थापित केली. चित्रकार, शिल्पकार, कवी आणि संगीतकार त्यांच्या कलेच्या माध्यमातून आपल्याला एक उत्कट अनुभूती देत असतात. ती अनुभूती एक प्रकारे लैंगिक अनुभूतीसारखी असते. त्यातील सृजन आणि विध्वंसक शक्ति सकट. कलाकार आपल्या प्रतिभेतून केलेली निर्मिती रसिकांसमोर ठेवतो. त्या कलाकृतीच्या निर्मितीमागील कारणमीमांसा जाणून घेणे एखाद्या गुप्तहेर कथेतील रहस्याची उकल करण्याएवढे उत्कंठावर्धक असू शकते. पण बर्याच वेळा त्यामागील सर्व कारणं आपल्याला अज्ञात रहातात. चार्ल्स स्ट्रिकलँडच्या एखाद्या नगण्य चित्रातूनसुद्धा त्याच्या व्यक्तिमत्वातील विक्षिप्तपणा, त्याचा सल, त्याच्या वेदना आपल्याला थोड्यातरी दिसून येतील. त्यामुळेच त्याची चित्र ज्यांना आवडत नाहीत त्यांनासुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करणं शक्य होत नाही. या वैशिष्ट्यामुळेच बर्याच जणांना त्याची जीवनकहाणी, त्याचं व्यक्तिमत्व आणि त्याचा कलाप्रवास यात त्यांना रस वाटू लागतो.
मॉरीस ह्युरेने स्ट्रिकलँडच्या मृत्यु पश्चात चार एक वर्षांनी मर्क्युर द फ्रान्समध्ये लिहीलेल्या एका लेखामुळे तो पर्यंत विस्मृतीत गेलेल्या या चित्रकाराकडे लोकांचं लक्ष गेलं. एवढेच नव्हे तर त्याच्यावर काही ना काही लिहीण्याची एक प्रकारे रीघच लागली. फ्रान्समध्ये बर्याच वर्षांनी अहमिकेने लिहायला लोकांना एक नवा विषय मिळाला होता. मॉरीस ह्युरेच्या लेखत थोडी फार अतिशोयक्ती असली तरी त्याची छाप पडल्या वाचून रहात नव्हती. पण जस जसे अधिक पुरावे मिळू लागले, अधिक सखोल आणि चौफेर समिक्षा होऊ लागली तशी त्याच्या दाव्याला पुष्टी मिळत गेली. त्यामुळे दिवसें दिवस चार्ल्स स्ट्रिकलँडची ख्याती जगभर पसरत गेली. त्याची किर्ती ज्या वेगाने वाढत गेली तो कलेच्या इतिहासातील एक अद्भूत अध्याय म्हणता येईल. तो चित्रकार म्हणून केवढा थोर आहे ते सिद्ध करण्याच्या फंदात मी पडणार नाही. मी त्याच्या कलाप्रवासाविषयी सांगणार आहे. सर्वसामान्य लोकांना कलेतील काहीच कळत नाही. चित्रांचं प्रदर्शन पहायला आलेल्यांनी गप्प बसणं हाच त्यांचा शहाणपणा. चित्र आवडलं तर सरळ पैसे मोजून विकत घ्यावं नाही तर तोंड फिरवून तेथून काढता पाय घ्यावा पण कोणत्याही परीस्थितीत आपलं तोंड उघडू नये. आपल्या चित्रांबद्दल इतरांना काय वाटतं याला कस्पटा एवढीसुद्धा किंमत न देणार्या आढ्याताखोर चित्रकारांशी मी सहमत आहे अशातला भाग नाही. कलेचे आकलन कलाकारांशिवाय दुसर्या कोणालाही जास्त चांगल्या रीतीने करता येणं शक्य नाही हा कलाकारांचा प्रचलित पूर्वग्रह म्हणजे एक मोठा गैरसमज आहे. कलेचा आविष्कार हा भावनांच्या उद्रेकातून होत असतो आणि कलाकृतीत जर भावना उतरल्या असतील तर त्या लपून रहात नाहीत. त्या सर्वांपर्यंत पोचतात. ज्या समीक्षकांना कलेच्या तांत्रीक अंगांची नीट माहिती नसते त्यांच्या मताला फारशी किंमत कोणी देत नाही याची मला कल्पना आहे. माझे चित्रकलेचे ज्ञान तसे यथातथाच आहे. त्यामुळे त्याच्या कलेची समीक्षा करण्याच्या फंदात मी पडणार नाही. माझ्या सुदैवाने या राखिव प्रांतात मुशाफिरी करण्याच्या धाडसाची जोखिम अंगावर घेण्याची मला गरज पडली नाही. कारण माझे एक दुसरे जाणकार लेखक मित्र मि.एडगर लेगॅट यांनी चार्ल्स स्ट्रिकलँडवर एक छोटीशी पुस्तिका लिहून माझं काम सोपं केलं. लेगॅट स्वत: एक बर्यापैकी चित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत. अशा प्रकारच्या शैलीदार लिखाणाची परंपरा इंग्लंडच्या मानाने फ्रान्समध्ये चांगली जोपासलेली आहे याची सुज्ञ वाचकांनी नोंद घ्यावी.
लोकांना कलाकारांच्या खाजगी आयुष्यात खूप रस असतो. लोकांचं कुतुहल किंचीत भागेल इतपतच स्ट्रिकलँडचं खाजगी आयुष्य मॉरीस ह्युरेने आपल्या लेखात आणलं आहे. त्याला चित्रकलेत एक कला म्हणून रस होता. स्ट्रिकलँडच्या कलेकडे एक कलाप्रकार म्हणून तटस्थपणे पहाण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. एखादी नवनिर्मिती त्याच्या बघण्यात आली तर त्याच्याकडे जाणकार रसिकांचं लक्ष वेधून घ्यायला त्याला आवडतं. तो पत्रकार म्हणून चांगला असला तरी मानवी स्वभावाचं त्याचं ज्ञान तोकडे असल्याने स्ट्रिकलँडवरचा त्याचा लेख जेवढा प्रभावी व्हायला हवा होता तेवढा प्रभावी झाला नाही. पण त्याच्या लेखाचा एक चांगला म्हणता येईल असा एक परीणाम मात्र झाला. तो परीणाम म्हणजे स्ट्रिकलँडला ओळखणारे लंडन मधील काही लेखक, मोंमार्त्रमधल्या कॅफेमध्ये नेहमी पडीक असणारी स्वत:ला महान समजणारी चित्रकार मंडळींना आपण इतके दिवस ज्याला एक भुक्कड भणंग चित्रकार समजत होतो तो किती प्रतिभावान होता हे समजून आश्चर्याचा धक्का बसला. अशा लोकांनी फ्रान्स आणि अमेरीकेतल्या नियतकालीकांत एका मागून एक असे लेख लिहिण्याचा सपाटा लावला. त्यातले काही लेख त्याची बेफाट स्तुती करणारे होते तर काहीत त्याला शिव्यांची लाखोली वाहिली होती. त्यामुळे एकाच वेळी स्ट्रिकलँडच्या किर्ती आणि अपकिर्तीत सारखीच भर पडली आणि त्यामुळे वाचकांचे कुतुहल शमण्याऐवजी वाढलेच.
एखाद्या गोष्टी भोवती अद्भूततेचं वलय निर्माण करण्यात लोक वस्ताद असतात. कथित आणि कल्पित अशा प्रत्येक घटनेत विस्मय आणि रहस्य यांचे असे काही मिश्रण होते की मग त्यातून एक दंतकथा तयार होऊ लागते. कालांतराने लोकांचा त्यावर ठाम विश्वास बसतो. कंटाळवाण्या जीवनक्रमात विरंगुळा म्हणून मारलेल्या गावगप्पांतून हळू हळू एका आख्यायिकेचा जन्म होतो. एकदा आख्यायिका तयार झाली की तिचा नायक अमर झालाच म्हणून समजा. एक थोर तत्ववेत्ता गमतीने म्हणायचा, की इंग्लंडचा राष्ट्रध्वज अमेरीकेत फडकवण्यात सर वॉल्टर रॅले यांचा कितीही मोठा हात असला तरी आज त्यांच्या अमेरीकेतील प्रदीर्घ आणि दैदीप्यमान कारकीर्दीपेक्षा त्यांनी व्हर्जिन मेरीला वस्त्रे अर्पण केली ही किरकोळ घटनाच लोकांच्या जास्त लक्षात राहिली आहे. तसा चार्ल्स स्ट्रिकलँड कोणत्याही प्रकारच्या प्रसिद्धीपासून कटाक्षाने दूर रहात असे. आपल्या आयुष्यात त्याने मित्रांपेक्षा शत्रूच जास्त निर्माण केले. त्यामुळे ज्यांनी स्ट्रिकलँडवर लिहीले त्यांनी त्याच्या विषयीच्या ऐकीव कथांना आपल्या पदरच तिखट मीठ लावून त्यात भर घातली यात नवल ते काय. या असल्या सांगोपांगी गोष्टींमुळे चटकदार लेखनाला आयतीच सामुग्री मिळाली असावी. ते काही असले तरी त्याचे आयुष्य अगदी विलक्षण होते हे मात्र निर्विवाद सत्य. तो एवढा पराकोटीचा माणूसाघाणा होता की त्याची पुढे जी काही दुर्दशा झाली, जे भयंकर भोग त्याच्या वाटेला आले त्याबद्दल कोणालाही सहानभुती वाटणं शक्य नव्हतं. हळू हळू त्याच्या आख्यायिकेवर शहाण्यासुरत्या माणसांचाही विश्वास बसू लागला आणि मग त्या आख्यायिका इतिहासात समाविष्ट झाल्या.
त्याचे सुपुत्र रेव्ह.रॉबर्ट स्ट्रिकलँड यांनी आपल्या वडिलांबद्दल पसरलेले गैरसमज दूर व्हावे म्हणून एक त्यांचे एक छोटेखानी चरित्र लिहीले. कारण त्या गैरसमजामुळे त्यांच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेला बाधा येत होती. त्या चरित्रात त्यांनी ते गैरसमज दूर करण्याचा त्यांच्यापरीने चांगला प्रयत्न केला आहे. कोणत्याही प्रतिष्ठीत कुटुंबाची कुचंबणा होईल अशा अनेक गोष्टी चार्ल्स स्ट्रिकलँडविषयी प्रचलित होत्या. मी ते पुस्तक मोठ्या चिकाटीने वाचले. अशा अर्थाने की ते अगदी रटाळ आणि कंटाळवाणे होते. रेव्ह. स्ट्रिकलँडनी आपल्या वडिलांचे चित्र एक आदर्श पती, आदर्श पिता, कुटुंबवत्सल आणि कर्तव्यतत्पर सद्गृहस्थ वगैरे वगैरे असे खूप तपशीलात जाऊन रंगविले होते. पाद्र्यांना एखाद्या अडचणीत आणणार्या गोष्टीचा खुलासा करायचा झाला तर तो लोकांना खरा वाटावा यासाठी कसा अभ्यासपूर्ण पद्धतीने सादर करावा याचं शिक्षण देत असावेत की काय याची मला हल्ली शंका यायला लागली आहे. या पाद्रीबाबांनी आपल्या पिताश्रींची जीवन कहाणी आदर्शवत भासावी अशी रंगवली खरी पण त्यांना पित्याच्या आयुष्यातील काही गैरसोईच्या घटनांचा सोईस्कर विसर पडला होता. त्यांच्या या कौशल्यामुळे त्यांची लवकरच आर्चबिशपच्या जागेवर बढती होण्याचा संभव आहे असं मला वाटतं. स्ट्रिकलँड एक आदर्श पिता वाटण्यासाठी त्याच्या चरित्रात थोडे फार फेरफार करण्याचा प्रयत्न तो चरित्रनायक आपला पिताच असल्याने एक वेळ स्तुत्य मानता येईल पण त्यात एक मोठा धोका संभवतो. कारण कित्येकांना चार्ल्स स्ट्रिकलँड हा माणूस म्हणून अजिबात आवडत नसे इतका की त्यांना त्याची घृणा येई. पण त्याचा जो करूण व भीषण शेवट झाला त्यामुळे त्यांना त्याची दयाही येई. तिरस्कार व सहानभूती या दोन पराकोटीच्या भावनांमुळे बर्याच जणांचे त्याच्या चित्रांकडे लक्ष गेले हेही तितकेट खरे आहे. मुलाने फेरफार करून पुनर्मांडणी केलेल्या पित्याच्या चरित्रामुळे चार्ल्स स्ट्रिकलँडच्या चहाते अस्वस्थ झाले. हे चरित्र प्रसिद्ध झाल्या झाल्या बर्याच चर्चा व वादविवाद झाले. परिणामी पाठोपाठ झालेल्या सॉदबीच्या लिलावात स्ट्रिकलँडच्या ‘वुमन ऑफ ताहिती’ या  ऑईल पेंटींगला अवघे २३५ पौंड मिळाले. फक्त नऊ महिन्यापूर्वी झालेल्या याच पेंटींगच्या लिलावात एका प्रख्यात संग्राहकाने विक्रमी बोली लावली होती. जगावेगळ्या गोष्टींचे लोकांना एक आकर्षण असतं. स्ट्रिकलँड चरित्राच्या या सुधारित आवृत्तीत त्याला चाकोरीतून जाणार्या एखाद्या सर्वसामान्य संसारी स्थासारखा दाखवण्याचा प्रयत्न केला होता. त्यात चाकोरीबाह्य, मुलखावेगळं असं काही नव्हतं. कदाचित त्यामुळे संग्राहक, खरेदीदार वगैरे मंडळींची निराशा झाली असावी. स्ट्रिकलँडची शैली कितीही स्वतंत्र आणि वेगळी वाट शोधणारी असली तरीही लोकांच्या निराशेची रसिकांच्या गैरसमजाचे निराकरण झाले.
मानवी स्वभाव कल्पना करता येणार नाही इतका विचीत्र असतो असे मानणार्यांपैकी डॉ.वेब्रेख्ट हे एक आहेत. काही इतिहासकारांना इतिहासातील थोर व्यक्तिंना सर्वसामान्या संसारी जनांचे घरेलू सद्गुण उगाच चिकटवण्यात एक प्रकारचं विकृत समाधान मिळत असावं असं माझं मत आहे. अशाने वाचकांचे थोडे बहुत रंजन होते, पण प्रबोधन मात्र डॉ.वेब्रेख्ट सारख्या रोखठोक माणसांच्या लिखाणानेच होत असते. ऐतिहासिक दृष्ट्या तपासायला गेलं तर अँटनी आणि क्लिओपात्रा यांचे एकमेकांशी संबंध होते एवढेच सिद्ध होऊ शकेल. ते प्रेमसंबंध होते हे सिद्ध करणारे पुरेसे पुरावे आजमितीला तरी मिळू शकलेले नाहीत म्हणून ते संबंध फक्त आर्थिक व्यवहारापुरतेच होते असं मानायला मलासुद्धा आवडणार नाही. पाद्रीबाबांनी सुधारीत चरित्रात आपल्या वडिलांचे एक सरळमार्गी आणि कुटुंबवत्सल गृहस्थ असे जे चित्र रंगवले होते त्याचा समाचार डॉ.वेब्रेख्टनी आपल्या लेखात असा काही घेतला आहे की त्या बिचार्या पाद्रीबाबांची कोणालाही किंव यावी. पाद्रीबाबांचा मितभाषीपणा ही एक मुद्दाम पांघरलेली झूल आहे, त्यांनी जेथे पाल्हाळ लावला होता तेथे त्यांना काहीतरी लपवायचे होते आणि त्यांनी ज्या बाबतीत मौन बाळगले आहे त्याल तर बदमाशी शिवाय दुसरं काही नाव देता येणार नाही. मुलाने आपल्या वडिलांच्या बाबतीत काही खोटेपणा केला तर ते एक वेळ चालू शकेल पण हाच खोटेपणा लेखकाला मात्र अक्षम्यच असतो. नाही तरी आपले अँग्लो-सॅक्सन लोक ढोंगीपणा, लबाडी, धूर्तपणा आणि बेचव स्वयंपाक याबद्दल प्रसिद्धच आहेत. पाद्रीबाबांच्या माता-पित्यांचे संबंध मुळीच चांगले नव्हते. तरीही ते चांगले होते हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी आपल्या वडिलांनी पॅरीसमधून लिहीलेल्या एक पत्राचा उल्लेख केला आहे. त्यात त्यांनी ‘माझी पत्नी एक चांगली गृहीणी आहे’ असं लिहीलं होतं. ही त्यांची मोठी घोडचूकच ठरली. कारण डॉ.वेब्रेख्टना ते मूळ पत्र सापडलं आणि त्यांनी त्या पत्राचे मुद्राचित्रच वृत्तपत्रात प्रसिद्ध केलं. आपल्या मित्राला लिहीलेल्या त्या पत्रात स्ट्रिकलँडने आपल्या पत्नीचा उल्लेख करून असं लिहीलं होतं ‘कोण म्हणतं माझी पत्नी एक चांगली गृहीणी आहे. देवा का बरं असली बाई माझ्या वाट्याला दिलीस. तिचं तळपट होवो.’ चर्चची जेव्हा चलती होती त्या काळात त्यांनी आपल्याला गैरसोईच्या वाटणार्या पुराव्यांची अशीच वासलात लावली असेल.

डॉ.वेब्रेख्टना चार्ल्स स्ट्रिकलँड चित्रकार म्हणून अतिशय प्रिय होता. त्यांची निरीक्षणशक्ति अतिशय विलक्षण होती. एखादी चुकीची गोष्ट मग ती कितीही साळसूदपणे केलेली असो त्यांच्या नजरेतून सुटणं शक्य नसे. ते स्वत: एक मनोविकार तज्ञ होते शिवाय चित्रकलेचे अभ्यासक. त्यांच्या सुक्ष्म दृष्टीला वर वर साध्या गोष्टीत लपलेला गूढ अर्थ दिसायचा आणि त्यांच्यातील मानोविकार तज्ञ लगेच त्याचे शब्दांकन करायचा. आपल्या आवडत्या कलाकाराच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीची त्यांनी ज्या कठोरतेने मीमांसा केली आहे ते पहाण्यासारखं आहे. ज्या प्रसंगातून चार्ल्स स्ट्रिकलँडचा दुष्टपणा अथवा त्याची क्षुद्रवृत्ती दिसत असेल तो प्रसंग वर्णन करायला चित्रकारावरील त्यांच्या प्रेमामुळे त्यांना मनापासून जरी आवडत नसले तरी ते एक लेखक म्हणून असेलेले आपले कर्तव्य पार पाडायला चुकले नाहीत. पाद्रीबाबांनी पितृप्रेमापोटी केलेल्या चलाख्या जेव्हा त्यांना पुराव्यासकट सापडल्या तेव्हा ते त्यांच्यावर केवढ्या त्वेषाने तुटून पडले ते पहाणं मोठं गमतीचं होतं. अगदी क्षुल्लक गोष्ट सुद्धा त्यांच्या नजरेतून सुटली नव्हती, मग ते चार्ल्स स्ट्रिकलँडचं एखादं लाँड्रीचं बिल असो की त्याने उधार घेतलेला एखादा क्राऊन असो.


Title: Two women of Tahiti, Artist: Paul Gauguin, Year 1891
Medium: oil on canvas, Dimensions: 69 cm × 91 cm (27.2 in × 35.8 in)
Location - Musée d'Orsay, Paris, Source: Wikimedia 

मून अँड सिक्सपेन्स - मनोगत

मनोगत
व्हॅन गॉग, तूलुज लोत्रेक आणि पॉल गोगँ हे पोस्ट इंप्रेशनिस्ट कालखंडतील तीन चित्रकार समकालीन तर होतेच शिवाय त्यांचा एकमेकांशी परिचयही होता. तिघेही चित्रकार म्हणून थोर होतेच शिवाय त्यांची जीवनकहाणी ही विलक्षण म्हणता येईल अशी आहे. या तिन्ही चित्रकारांना असामान्य प्रतिभेचं देणं लाभलं होतं. तिघांच्याही आयुष्यात संघर्ष, उपेक्षा आणि अवहेलना आहेत. पण या सर्वांचा सामना करत आपली स्वतंत्र शैली प्रस्थापित करण्यात त्यांना यश आले. पण त्यासाठी त्यांनी काय किंमत दिली याची प्रचिती त्यांची जीवनकहाणी वाचल्या शिवाय येत नाही. व्हॅन गॉगच्या जीवनावर आधारीत अर्विंग स्टोनच्या लस्ट फॉर लाईफचा अनुवाद माधूरी पुरंदरेंनी फार पूर्वीच केला आहे. तुलूज लोत्रेकच्या जीवनावर आधारीत पिएरे ल मूरच्या मुलँ रूजचा मी केलेला अनुवाद २०११ मध्ये प्रसिद्ध होताच मी पॉल गोगँच्या जीवनावर आधारीत सॉमरसेट मॉमच्या मून अँड सिक्सपेन्सचा अनुवाद करण्याचा दुसरा संकल्प सोडला होता.
गोगँची रंगांची हाताळणी आणि त्याची सिंथेटीस्ट या नावाने प्रसिद्ध झालेली शैली इंप्रेशनिस्ट चित्रकारांपेक्षा अगदी वेगळी होती. ताहिती बेटांवर तैलरंगांच्या उपलब्ध न झाल्यामुळे गोगँने शिल्पकला, लाकडावरचे कोरीवकाम आणि सेरॅमिक्स ही माध्यमेही कॅनव्हास एवढ्याच ताकदीने हाताळली आहेत. त्याने आपली कला व जीवना विषयी भूमिका वृत्तपत्र आणि नियतकालिकांमधून ठाम पणे मांडली. आपल्या ताहितीमधील वास्तव्यात तेथील फ्रेंच अधिकारी आणि चर्च यांच्या रोषाची पर्वा न करता त्याने तेथील आदिवासींची बाजू मांडली. सिंबॉलिस्ट चित्रकारांचा तो एक आदर्श होता. प्रिमीटीव्हिजन आणि खेड्याकडे वळा अशा चळवळींनी गोगँकडून प्रेरणा घेतली आहे. नवचित्रकलेचे उद्गाते पाब्लो पिकासो आणि हेन्री मातिस यांच्यावर गोगँचा प्रभाव होता.
मून अँड सिक्सपेन्स ही मॉमची सर्वात गाजलेली आणि त्याची स्वत:चीही आवडती कादंबरी आहे. ही कादंबरी मॉमच्या ‘मनुष्य त्याच्या विकारांचा आणि नियतीचा बळी असतो’ या लाडक्या संकल्पनेवर बेतलेली आहे. पण मॉमने कादंबरीच्या कथानकात पॉल गोगँच्या जीवनकहाणीपासून बरीच फारकत घेतल्याने त्याने कादंबरीतील मुख्य व्यक्तिरेखेचे नाव बदलले आहे. मूळ इंग्रजी भाषेतील कादंबरीत कित्येक ठिकाणी फ्रेंच भाषेतील संवाद तसेच ठेवले आहेत. अनुवाद करताना त्यांचा उच्चार आणि अर्थासाठी गुगल ट्रान्सलिटरची मदत घेतली आहे. तसेच कादंबरी चित्रकाराच्या जीवनावर असल्यामुळे प्रसंगोपात पॉल गागँची चित्रे उध्दृत करण्याचा मानस ही चित्रे विकीपिडीयावर पब्लिक डोमेनमधे उपलब्ध असल्यामुळे शक्य झाले.
अनुवाद करण्याचा संकव्प माझ्या हातून लगेच पूरा झाला तरी प्रसिद्धीचा योग काही जूळून येत नव्हता. शेवटी माझ्या ब्लॉगवर क्रमश: प्रसिद्ध करावा असा विचार आहे. पूर्वी एपीएस वापरून केलेले काम इ-आवृत्तीसाठी युनिकोडमध्ये रूपांतरीत करण्याचे काम मुळ अनुवादा एवढे कठीण नसले तरी चिकाटीची मागणी करणारे आहे. रूपांतर करताना काही दोष राहून गेले असल्यास त्याची जबाबदारी सर्वस्वी माझी आहे. वाचकांचा प्रतिसाद मिळाला तर माझ्या आनंदात भर पडेल आणि ब्लॉग नियमीत चालू ठेवण्यासाठी उत्साहाचे बळ मिळेल.

जयंत गुणे

११ जानेवारी २०१८, कार्लसबाद, सॅन दिआगो.