Monday, January 15, 2018

मून अँड सिक्सपेन्स - २


चार्ल्स स्ट्रिकलँडवर आतापर्यंत एवढं लिहलं गेलंय की मला अधिक काही लिहीण्याची आवश्यकता उरलेली नाही. चित्रकाराचं खरं स्मारक त्याची चित्रंच असतात. त्याच्यावर ज्यांनी लिहीलं त्या सर्वांपेक्षा मी त्याला जास्त ओळखत होतो हे खरं आहे. तो चित्रकार होण्याच्या कितीतरी आधीच त्याची माझी भेट झाली होती. तो पॅरीसमध्ये अतिशय खडतर परिस्थितीत दिवस कंठत असतानाही मी त्याला बर्याच वेळा भेटलो होतो. जर युध्दाच्या निमीत्ताने मी ताहितीत गेलो नसतो तर मी माझ्या आठवणी शब्दबद्ध केल्या असत्या का नाही ते मला सांगता येत नाही. आपल्या आयुष्याच्या अखेरीला त्याचे वास्तव्य त्या कुप्रसिद्ध ताहिती बेटांवर होते. माझ्या ताहिती बेटांवरील मुक्कामात मला त्याच्या परिचयाच्या काही व्यक्ति भेटल्या. त्यामुळे कोणाला माहिती नसलेल्या त्याच्या आयुष्याच्या अखेरच्या काळावर प्रकाश टाकण्याची संधी मला मिळाली. स्ट्रिकलँड हा एक महान कलाकार होता असं ज्यांना वाटतं त्यांना ही चतुर्वैसत्यम माहिती महत्वाची वाटू शकेल. ज्यांना सोळाव्या शतकातील एल ग्रेको हा स्पॅनिश चित्रकार माहिती असेल त्यांना मला स्ट्रिकलँडबद्दल काय म्हणायचंय ते कळू शकेल.
चित्तशुद्धीसाठी प्रत्येकाने आपल्याला आवडत नाही अशी एक तरी गोष्ट रोज केली पाहिजे, असं ज्याने मला सांगितलं होतं त्याचं नाव आता या क्षणी मला आठवत नाही. पण मी सकाळी उठल्यापासून ते झोपे पर्यंत हा नियम कटाक्षाने पाळतो. माझ्या स्वभावातच थोडं फार वैराग्य आहे. मी बर्याच वेळा स्वत:ला खूप त्रास करून घेतो. शारिरीक तसाच मानसिकही. मी सहसा टाईम्स लिटररी सप्लिमेंट वाचण्याची संधी सोडत नाही. ज्या प्रमाणात आज पुस्तकं प्रसिद्ध होत आहेत ते बघता त्याची नुसती माहिती घ्यायची असेल तर अशी शिस्त लावून घ्यावीच लागते. सगळ्या लेखकांना आपलं पुस्तक कधीतरी प्रसिद्ध होईल, त्याला कोणीतरी वाचक मिळेल अशी आशा असतेच. ढीगभर प्रसिद्ध होणार्या एवढ्या पुस्तकातून आपल्या पुस्तकाच्या नशीबी काय वाढून ठेवलं आहे, कोणी त्याची दखल घेईल का हे प्रश्न लेखकाला छळत असतात? बरीच गाजलेली पुस्तकं चार दिवसांनी लोक विसरूनही जातात. आपले पुस्तक वाचून वाचकाला दोन घटका विरंगुळा मिळावा म्हणून त्या बिचार्या लेखकाने किती परिश्रम घेतले असतील, कोणकोणते बरे वाईट अनुभव त्याच्या वाटेला आले असतील, त्याने काय काय यातना भोगल्या असतील ते एका परमेश्वरालाच ठाऊक. परिक्षण वाचून आपलं मत बनवायचं तर यातील बरीचशी पुस्तकं लेखकाने खूप मेहनत घेऊन विचारपूर्वक लिहीलेली असतात, कित्येक पुस्तकं तर लेखकाच्या आयुष्यभराच्या परिश्रमाचे फलित असतात. एवढं करून त्यातील किती पुस्तकं किती लोक वाचतील, जाणकार त्याची कितपत दखल घेतील ते काहीच सांगता येत नसतं. तात्पर्य काय तर लेखकाने आपल्या लेखनाची कोण आणि किती जण दखल घेतात, त्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव होतो की त्याच्या वाटेला कठार टीका येते याचा फारसा विचार न करता त्याने आपल्या लेखन-कामाठीतच समाधान मानावे हेच खऱं.
आमच्या पिढीने आमच्या तरूणपणीच देवपूजा वगैरे करणं सोडून दिलं होतं. परंतु या युद्धाच्या दिवसात हल्लीचा तरूण वर्ग पुन्हा देवपूजेच्या मागे लागला आहे. पुढची पिढी कोणत्या मार्गाने चालली आहे ते आपल्याला यावरून कळून येईल. या पिढीला आजच्या गोंधळाच्या परिस्थितीची शक्तिस्थाने चांगलीच ठाऊक आहेत. आपली जागा घ्यायला ही तरूण पिढी तयार आहे. पण काही जेष्ठ मंडळी आपले दिवस आता गेल्यात जमा आहेत हे मानायला अजून तयार होत नाहीत. त्यांनी तरूणांसारखा कितीही आरडा ओरडा केला तरी त्यात काही दम नसतो हे लक्षात येतं. तारूण्याचा भर ओसरलेल्या वेश्येने कितीही रंगरंगोटी केली तरी त्याने गेलेली जवानी परत येणार नसते. शहाणी मंडळी आपला आब राखून वेळीच बाजूला होतात. त्यांचा आब त्यांच्या मिश्किल हास्यात दडलेला असतो. त्यांच्या तारूण्यात त्यांनी हेच केलेले असते. पुढची पिढी एक प्रकारे मागच्याच पिढीचे अनुकरण करत असते. काळ बदलला असला तरी शब्द तेच असतात. फक्त लंबकाचा झोका दुसर्या टोकाला गेलेला असतो एवढंच.

लेखकाचं मुल्यमापन कालसापेक्ष असू शकत नाही. एके काळी प्रसिद्धिच्या शिखरावर असलेल्या लेखकाचे एवढे कालांतराने अवमुल्यन होते की तो अगदी नगण्य होऊन जातो. जॉर्ज क्रॅब आता कोणाला आठवेल तरी का. एके काळी तो केवढा प्रसिद्ध कवी होता. जाणकार रसिकांनी त्याला अगदी डोक्यावर घेतलं होतं. त्याची प्रतिभा वादातीत होती. पण काळ बदलला आणि त्यामुळे आलेल्या व्यामिश्रतेपुढे त्याची कविता अगदी बाळबोध वाटायला लागली. त्याच्या कवितांवर अलेक्झांडर पोपचा प्रभाव होता. त्याच्या कवितेत जागो जागी बोधवचनांची पखरण केलेली असे. तेवढ्यात फ्रेंच राज्याक्रांती झाली आणि पाठोपाठ झालेल्या नेपोलियनच्या युध्दांमुळे कवितांचे विषय बदलले, गाण्यांचे सूर बदलले. पण क्रॅब महाशय मात्र तीच जुनी नितीमत्तेचे बोधामृत पाजणारी कविता उगाळत बसले होते. क्रॅबने जगात खळबळ उडवणारी नव्या जाणिवांची कविता वाचली नसेल असं काही म्हणता येणार नाही. पण वाचली असली तरी त्याला ती आवडली नसणार याची मला खात्री आहे. अर्थात बरीचशी नवकविता त्याच लायकीची होती म्हणा. बर्याच प्रमाणात कीट्स आणि वर्ड्सवर्थ, कोलरीजच्या दोन तीन, शेलीच्या आणखी काही अपवाद म्हणाव्या लागतील. पण क्रॅबने मात्र जुन्या वळणाच्या बोधप्रद कवितांचा रतीब घालणे काही थांबवले नाही. तरूण पिढीचे काव्य मी थोडेफार वाचले आहे. कीट्सच्या काव्यात तळमळ आहे, शेलीच्या काव्यातून स्वर्गीय आनंद मिळतो. या दोघांच्या बर्याच कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. पण काळाच्या ओघात त्यातील किती टिकून रहातात आणि किती वाहून जातात ते सांगणं कठीण आहे. त्यांच्या कवितेतील सफाई विलक्षण आहे. त्यांनी एवढ्या लहान वयात प्रसिद्धीचं शिखर गाठलं आहे की त्यांना उदयोन्मुख कवि म्हणणं तसं प्रस्तुत होणार नाही. त्यांची शैली कितीही सुरेख असली तरी त्यांचं काव्य माझ्या तरी मनाला भिडत नाही. त्यांच्या कवितेतील शब्दकळा पाहून रॉजेटचा थेसॉरस त्यांनी पाळण्यात असतानाच घोकून तोंडपाठ केला असावा की काय अशी शंका येते. माझ्या मते त्यांच्या काव्यातून त्यांचे माहितीचे ज्ञानभांडार आणि त्यांच्या भावना या दोन्ही गोष्टी खूपच उघडपणे व्यक्त होतात. त्यांच्या कवितेचं असं अंगावर येणं माझ्या पचनी पडत नाही. माझ्या मते त्यांच्या काव्यात जोश थोडा कमी पडतो. त्यांची स्वप्न थोडी फिकी वाटतात. मला ते फारसे आवडत नाहीत. तसं बघायला गेलं तर मी कुंपणावर बसलेलो आहे. मला आपल्या साध्या, सरळ, सोप्या, बोधकथा लिहायला आवडतील. पण अशा कथा लिहीण्यामागे माझा स्वप्नरंजन सोडून दुसर्या कोणताही हेतू असला तर त्याच्या सारखा दुसरा मूर्खपणा असणार नाही.


Artist: El Greco  (1541–1614)
Title: The Vision of Saint John, or The Opening of the Fifth Seal
Date between circa 1609 and circa 1614, Oil on canvas, : 87.5 × 76 in (222.3 × 193 cm)
Current location: Metropolitan Museum of Art, NY. Source :Wikimedia

Saturday, January 13, 2018

मून अँड सिक्सपेन्स - १


चार्ल्स स्ट्रिकलँडला मी जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हा पुढे भविष्यकाळात तो केवढा मोठा प्रसिद्ध माणूस होणार आहे याची यत्किंचीतही चुणूक मला त्याच्यात दिसली नव्हती, ही गोष्ट इथे मी कबूल करतो. पण आज बघायला गेलं तर त्याच्या मोठेपणाबद्दल कोणाचेही फारसे दुमत होणार नाही. एखादा राजकीय पुढारी किंवा पराक्रमी सेनानी जेव्हा वरच्या पदाला जाऊन पोचतो आणि त्याला लोक मोठा समजू लागतात तेव्हा त्यात बर्याच वेळा त्याच्या कर्तुत्वापेक्षा तो ज्या पदावर बसला आहे त्या पदाचा भाग जास्त असतो. नशीबाचे फासे कसे पडतात त्यावर सर्व काही अवलंबून असतं. पंतप्रधानसुद्धा एकदा आपल्या पदावरून पायउतार झाला की त्याची भाषणबाजी पोकळ वटवटीसारखी वाटू लागते. आणि सैन्याशिवाय सेनापती म्हणजे एखाद्या गल्लीतील दादासारखा. पण चार्ल्स स्ट्रिकलँडचं मोठेपण अगदी वेगळ्या प्रकारचं म्हणावं लागेल. तो एक मनस्वी आणि कलंदर पण अलौकिक प्रतिभेचं दैवी देणं लाभलेला चित्रकार होता. माणूस म्हणून भला विक्षिप्त असेल पण कलाकार म्हणून पहाल त्याची शैली स्वतंत्र अगदी शंभर ट्क्के अस्सल होती. त्याची चित्रं, पेंटींग कदाचित तुम्हाला आवडणार नाहीत पण एक एक अव्वल दर्जाची चित्रकला म्हणून त्यांचा विचार केल्या शिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही. त्याच्या कलाकृती आपलं लक्ष वेधून घेतात आणि आपल्याला अस्वस्थ करतात. एके काळी स्ट्रिकलँड आणि त्याच्या कलाकृती चेष्टेचा विषय व्हायच्या, आणि त्याची चित्रं त्याच्या सारखीच विकृत आहेत अशी टीका व्हायची. कोणी त्याची बाजू घेउन जरा त्याच्या विषयी बरं बोललं तर त्या बाजू घेणार्याचं डोकं फिरलंय असं म्हटलं जाईल. कोणी त्याच्या चित्रांविषयी थोडी जरी सहानभूती दाखवली तरी तो त्या चित्रांच्या कर्त्यासारखाच विकृत असला पाहिजे असं समजलं जाई. पण तु काळ आता मागे पडला आहे. आता स्ट्रिकलँडच्या दोषांकडे त्याच्या गुणवत्तेचा एक अपरिहार्य भाग म्हणून बघितलं जातं. कलाविश्वात त्याचे स्थान कोणते यावर समिक्षकांमध्ये चर्चा होते. त्याच्या कलेचे मुल्यमापन करताना समीक्षकांनी केलेली प्रशंसा त्याच्यावरील टीकेपेक्षा जास्त अडचणीची ठरण्याची शक्यता आहे. काहीही झालं तरी त्याला अलौकिक प्रतिभेचं देणं मिळालं होतं यावर कोणाचं दुमत होणार नाही. माझ्या मते एखाद्या कलाकृतीपेक्षा ती निर्माण करणार्या कलाकाराचं व्यक्तिमत्व हे जास्त महत्वाचं असतं आणि जर असं व्यक्तिमत्व जर एकमेकाद्वितीय असेल तर त्याला हजार गुन्हे माफ करायला हरकत नसते. सर्वसाधारणपणे वेलास्केजला एल ग्रेकोपेक्षा मोठा चित्रकार समजलं जातं. पण मला मात्र एल ग्रेकोच जास्त आवडतो. कारण एल ग्रेको मायकेल अँजेलोच्या सावलीतून जाणीवपूर्वक बाहेर आला आणि त्याने आपली स्वतंत्र शैली प्रस्थापित केली. चित्रकार, शिल्पकार, कवी आणि संगीतकार त्यांच्या कलेच्या माध्यमातून आपल्याला एक उत्कट अनुभूती देत असतात. ती अनुभूती एक प्रकारे लैंगिक अनुभूतीसारखी असते. त्यातील सृजन आणि विध्वंसक शक्ति सकट. कलाकार आपल्या प्रतिभेतून केलेली निर्मिती रसिकांसमोर ठेवतो. त्या कलाकृतीच्या निर्मितीमागील कारणमीमांसा जाणून घेणे एखाद्या गुप्तहेर कथेतील रहस्याची उकल करण्याएवढे उत्कंठावर्धक असू शकते. पण बर्याच वेळा त्यामागील सर्व कारणं आपल्याला अज्ञात रहातात. चार्ल्स स्ट्रिकलँडच्या एखाद्या नगण्य चित्रातूनसुद्धा त्याच्या व्यक्तिमत्वातील विक्षिप्तपणा, त्याचा सल, त्याच्या वेदना आपल्याला थोड्यातरी दिसून येतील. त्यामुळेच त्याची चित्र ज्यांना आवडत नाहीत त्यांनासुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करणं शक्य होत नाही. या वैशिष्ट्यामुळेच बर्याच जणांना त्याची जीवनकहाणी, त्याचं व्यक्तिमत्व आणि त्याचा कलाप्रवास यात त्यांना रस वाटू लागतो.
मॉरीस ह्युरेने स्ट्रिकलँडच्या मृत्यु पश्चात चार एक वर्षांनी मर्क्युर द फ्रान्समध्ये लिहीलेल्या एका लेखामुळे तो पर्यंत विस्मृतीत गेलेल्या या चित्रकाराकडे लोकांचं लक्ष गेलं. एवढेच नव्हे तर त्याच्यावर काही ना काही लिहीण्याची एक प्रकारे रीघच लागली. फ्रान्समध्ये बर्याच वर्षांनी अहमिकेने लिहायला लोकांना एक नवा विषय मिळाला होता. मॉरीस ह्युरेच्या लेखत थोडी फार अतिशोयक्ती असली तरी त्याची छाप पडल्या वाचून रहात नव्हती. पण जस जसे अधिक पुरावे मिळू लागले, अधिक सखोल आणि चौफेर समिक्षा होऊ लागली तशी त्याच्या दाव्याला पुष्टी मिळत गेली. त्यामुळे दिवसें दिवस चार्ल्स स्ट्रिकलँडची ख्याती जगभर पसरत गेली. त्याची किर्ती ज्या वेगाने वाढत गेली तो कलेच्या इतिहासातील एक अद्भूत अध्याय म्हणता येईल. तो चित्रकार म्हणून केवढा थोर आहे ते सिद्ध करण्याच्या फंदात मी पडणार नाही. मी त्याच्या कलाप्रवासाविषयी सांगणार आहे. सर्वसामान्य लोकांना कलेतील काहीच कळत नाही. चित्रांचं प्रदर्शन पहायला आलेल्यांनी गप्प बसणं हाच त्यांचा शहाणपणा. चित्र आवडलं तर सरळ पैसे मोजून विकत घ्यावं नाही तर तोंड फिरवून तेथून काढता पाय घ्यावा पण कोणत्याही परीस्थितीत आपलं तोंड उघडू नये. आपल्या चित्रांबद्दल इतरांना काय वाटतं याला कस्पटा एवढीसुद्धा किंमत न देणार्या आढ्याताखोर चित्रकारांशी मी सहमत आहे अशातला भाग नाही. कलेचे आकलन कलाकारांशिवाय दुसर्या कोणालाही जास्त चांगल्या रीतीने करता येणं शक्य नाही हा कलाकारांचा प्रचलित पूर्वग्रह म्हणजे एक मोठा गैरसमज आहे. कलेचा आविष्कार हा भावनांच्या उद्रेकातून होत असतो आणि कलाकृतीत जर भावना उतरल्या असतील तर त्या लपून रहात नाहीत. त्या सर्वांपर्यंत पोचतात. ज्या समीक्षकांना कलेच्या तांत्रीक अंगांची नीट माहिती नसते त्यांच्या मताला फारशी किंमत कोणी देत नाही याची मला कल्पना आहे. माझे चित्रकलेचे ज्ञान तसे यथातथाच आहे. त्यामुळे त्याच्या कलेची समीक्षा करण्याच्या फंदात मी पडणार नाही. माझ्या सुदैवाने या राखिव प्रांतात मुशाफिरी करण्याच्या धाडसाची जोखिम अंगावर घेण्याची मला गरज पडली नाही. कारण माझे एक दुसरे जाणकार लेखक मित्र मि.एडगर लेगॅट यांनी चार्ल्स स्ट्रिकलँडवर एक छोटीशी पुस्तिका लिहून माझं काम सोपं केलं. लेगॅट स्वत: एक बर्यापैकी चित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत. अशा प्रकारच्या शैलीदार लिखाणाची परंपरा इंग्लंडच्या मानाने फ्रान्समध्ये चांगली जोपासलेली आहे याची सुज्ञ वाचकांनी नोंद घ्यावी.
लोकांना कलाकारांच्या खाजगी आयुष्यात खूप रस असतो. लोकांचं कुतुहल किंचीत भागेल इतपतच स्ट्रिकलँडचं खाजगी आयुष्य मॉरीस ह्युरेने आपल्या लेखात आणलं आहे. त्याला चित्रकलेत एक कला म्हणून रस होता. स्ट्रिकलँडच्या कलेकडे एक कलाप्रकार म्हणून तटस्थपणे पहाण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. एखादी नवनिर्मिती त्याच्या बघण्यात आली तर त्याच्याकडे जाणकार रसिकांचं लक्ष वेधून घ्यायला त्याला आवडतं. तो पत्रकार म्हणून चांगला असला तरी मानवी स्वभावाचं त्याचं ज्ञान तोकडे असल्याने स्ट्रिकलँडवरचा त्याचा लेख जेवढा प्रभावी व्हायला हवा होता तेवढा प्रभावी झाला नाही. पण त्याच्या लेखाचा एक चांगला म्हणता येईल असा एक परीणाम मात्र झाला. तो परीणाम म्हणजे स्ट्रिकलँडला ओळखणारे लंडन मधील काही लेखक, मोंमार्त्रमधल्या कॅफेमध्ये नेहमी पडीक असणारी स्वत:ला महान समजणारी चित्रकार मंडळींना आपण इतके दिवस ज्याला एक भुक्कड भणंग चित्रकार समजत होतो तो किती प्रतिभावान होता हे समजून आश्चर्याचा धक्का बसला. अशा लोकांनी फ्रान्स आणि अमेरीकेतल्या नियतकालीकांत एका मागून एक असे लेख लिहिण्याचा सपाटा लावला. त्यातले काही लेख त्याची बेफाट स्तुती करणारे होते तर काहीत त्याला शिव्यांची लाखोली वाहिली होती. त्यामुळे एकाच वेळी स्ट्रिकलँडच्या किर्ती आणि अपकिर्तीत सारखीच भर पडली आणि त्यामुळे वाचकांचे कुतुहल शमण्याऐवजी वाढलेच.
एखाद्या गोष्टी भोवती अद्भूततेचं वलय निर्माण करण्यात लोक वस्ताद असतात. कथित आणि कल्पित अशा प्रत्येक घटनेत विस्मय आणि रहस्य यांचे असे काही मिश्रण होते की मग त्यातून एक दंतकथा तयार होऊ लागते. कालांतराने लोकांचा त्यावर ठाम विश्वास बसतो. कंटाळवाण्या जीवनक्रमात विरंगुळा म्हणून मारलेल्या गावगप्पांतून हळू हळू एका आख्यायिकेचा जन्म होतो. एकदा आख्यायिका तयार झाली की तिचा नायक अमर झालाच म्हणून समजा. एक थोर तत्ववेत्ता गमतीने म्हणायचा, की इंग्लंडचा राष्ट्रध्वज अमेरीकेत फडकवण्यात सर वॉल्टर रॅले यांचा कितीही मोठा हात असला तरी आज त्यांच्या अमेरीकेतील प्रदीर्घ आणि दैदीप्यमान कारकीर्दीपेक्षा त्यांनी व्हर्जिन मेरीला वस्त्रे अर्पण केली ही किरकोळ घटनाच लोकांच्या जास्त लक्षात राहिली आहे. तसा चार्ल्स स्ट्रिकलँड कोणत्याही प्रकारच्या प्रसिद्धीपासून कटाक्षाने दूर रहात असे. आपल्या आयुष्यात त्याने मित्रांपेक्षा शत्रूच जास्त निर्माण केले. त्यामुळे ज्यांनी स्ट्रिकलँडवर लिहीले त्यांनी त्याच्या विषयीच्या ऐकीव कथांना आपल्या पदरच तिखट मीठ लावून त्यात भर घातली यात नवल ते काय. या असल्या सांगोपांगी गोष्टींमुळे चटकदार लेखनाला आयतीच सामुग्री मिळाली असावी. ते काही असले तरी त्याचे आयुष्य अगदी विलक्षण होते हे मात्र निर्विवाद सत्य. तो एवढा पराकोटीचा माणूसाघाणा होता की त्याची पुढे जी काही दुर्दशा झाली, जे भयंकर भोग त्याच्या वाटेला आले त्याबद्दल कोणालाही सहानभुती वाटणं शक्य नव्हतं. हळू हळू त्याच्या आख्यायिकेवर शहाण्यासुरत्या माणसांचाही विश्वास बसू लागला आणि मग त्या आख्यायिका इतिहासात समाविष्ट झाल्या.
त्याचे सुपुत्र रेव्ह.रॉबर्ट स्ट्रिकलँड यांनी आपल्या वडिलांबद्दल पसरलेले गैरसमज दूर व्हावे म्हणून एक त्यांचे एक छोटेखानी चरित्र लिहीले. कारण त्या गैरसमजामुळे त्यांच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेला बाधा येत होती. त्या चरित्रात त्यांनी ते गैरसमज दूर करण्याचा त्यांच्यापरीने चांगला प्रयत्न केला आहे. कोणत्याही प्रतिष्ठीत कुटुंबाची कुचंबणा होईल अशा अनेक गोष्टी चार्ल्स स्ट्रिकलँडविषयी प्रचलित होत्या. मी ते पुस्तक मोठ्या चिकाटीने वाचले. अशा अर्थाने की ते अगदी रटाळ आणि कंटाळवाणे होते. रेव्ह. स्ट्रिकलँडनी आपल्या वडिलांचे चित्र एक आदर्श पती, आदर्श पिता, कुटुंबवत्सल आणि कर्तव्यतत्पर सद्गृहस्थ वगैरे वगैरे असे खूप तपशीलात जाऊन रंगविले होते. पाद्र्यांना एखाद्या अडचणीत आणणार्या गोष्टीचा खुलासा करायचा झाला तर तो लोकांना खरा वाटावा यासाठी कसा अभ्यासपूर्ण पद्धतीने सादर करावा याचं शिक्षण देत असावेत की काय याची मला हल्ली शंका यायला लागली आहे. या पाद्रीबाबांनी आपल्या पिताश्रींची जीवन कहाणी आदर्शवत भासावी अशी रंगवली खरी पण त्यांना पित्याच्या आयुष्यातील काही गैरसोईच्या घटनांचा सोईस्कर विसर पडला होता. त्यांच्या या कौशल्यामुळे त्यांची लवकरच आर्चबिशपच्या जागेवर बढती होण्याचा संभव आहे असं मला वाटतं. स्ट्रिकलँड एक आदर्श पिता वाटण्यासाठी त्याच्या चरित्रात थोडे फार फेरफार करण्याचा प्रयत्न तो चरित्रनायक आपला पिताच असल्याने एक वेळ स्तुत्य मानता येईल पण त्यात एक मोठा धोका संभवतो. कारण कित्येकांना चार्ल्स स्ट्रिकलँड हा माणूस म्हणून अजिबात आवडत नसे इतका की त्यांना त्याची घृणा येई. पण त्याचा जो करूण व भीषण शेवट झाला त्यामुळे त्यांना त्याची दयाही येई. तिरस्कार व सहानभूती या दोन पराकोटीच्या भावनांमुळे बर्याच जणांचे त्याच्या चित्रांकडे लक्ष गेले हेही तितकेट खरे आहे. मुलाने फेरफार करून पुनर्मांडणी केलेल्या पित्याच्या चरित्रामुळे चार्ल्स स्ट्रिकलँडच्या चहाते अस्वस्थ झाले. हे चरित्र प्रसिद्ध झाल्या झाल्या बर्याच चर्चा व वादविवाद झाले. परिणामी पाठोपाठ झालेल्या सॉदबीच्या लिलावात स्ट्रिकलँडच्या ‘वुमन ऑफ ताहिती’ या  ऑईल पेंटींगला अवघे २३५ पौंड मिळाले. फक्त नऊ महिन्यापूर्वी झालेल्या याच पेंटींगच्या लिलावात एका प्रख्यात संग्राहकाने विक्रमी बोली लावली होती. जगावेगळ्या गोष्टींचे लोकांना एक आकर्षण असतं. स्ट्रिकलँड चरित्राच्या या सुधारित आवृत्तीत त्याला चाकोरीतून जाणार्या एखाद्या सर्वसामान्य संसारी स्थासारखा दाखवण्याचा प्रयत्न केला होता. त्यात चाकोरीबाह्य, मुलखावेगळं असं काही नव्हतं. कदाचित त्यामुळे संग्राहक, खरेदीदार वगैरे मंडळींची निराशा झाली असावी. स्ट्रिकलँडची शैली कितीही स्वतंत्र आणि वेगळी वाट शोधणारी असली तरीही लोकांच्या निराशेची रसिकांच्या गैरसमजाचे निराकरण झाले.
मानवी स्वभाव कल्पना करता येणार नाही इतका विचीत्र असतो असे मानणार्यांपैकी डॉ.वेब्रेख्ट हे एक आहेत. काही इतिहासकारांना इतिहासातील थोर व्यक्तिंना सर्वसामान्या संसारी जनांचे घरेलू सद्गुण उगाच चिकटवण्यात एक प्रकारचं विकृत समाधान मिळत असावं असं माझं मत आहे. अशाने वाचकांचे थोडे बहुत रंजन होते, पण प्रबोधन मात्र डॉ.वेब्रेख्ट सारख्या रोखठोक माणसांच्या लिखाणानेच होत असते. ऐतिहासिक दृष्ट्या तपासायला गेलं तर अँटनी आणि क्लिओपात्रा यांचे एकमेकांशी संबंध होते एवढेच सिद्ध होऊ शकेल. ते प्रेमसंबंध होते हे सिद्ध करणारे पुरेसे पुरावे आजमितीला तरी मिळू शकलेले नाहीत म्हणून ते संबंध फक्त आर्थिक व्यवहारापुरतेच होते असं मानायला मलासुद्धा आवडणार नाही. पाद्रीबाबांनी सुधारीत चरित्रात आपल्या वडिलांचे एक सरळमार्गी आणि कुटुंबवत्सल गृहस्थ असे जे चित्र रंगवले होते त्याचा समाचार डॉ.वेब्रेख्टनी आपल्या लेखात असा काही घेतला आहे की त्या बिचार्या पाद्रीबाबांची कोणालाही किंव यावी. पाद्रीबाबांचा मितभाषीपणा ही एक मुद्दाम पांघरलेली झूल आहे, त्यांनी जेथे पाल्हाळ लावला होता तेथे त्यांना काहीतरी लपवायचे होते आणि त्यांनी ज्या बाबतीत मौन बाळगले आहे त्याल तर बदमाशी शिवाय दुसरं काही नाव देता येणार नाही. मुलाने आपल्या वडिलांच्या बाबतीत काही खोटेपणा केला तर ते एक वेळ चालू शकेल पण हाच खोटेपणा लेखकाला मात्र अक्षम्यच असतो. नाही तरी आपले अँग्लो-सॅक्सन लोक ढोंगीपणा, लबाडी, धूर्तपणा आणि बेचव स्वयंपाक याबद्दल प्रसिद्धच आहेत. पाद्रीबाबांच्या माता-पित्यांचे संबंध मुळीच चांगले नव्हते. तरीही ते चांगले होते हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी आपल्या वडिलांनी पॅरीसमधून लिहीलेल्या एक पत्राचा उल्लेख केला आहे. त्यात त्यांनी ‘माझी पत्नी एक चांगली गृहीणी आहे’ असं लिहीलं होतं. ही त्यांची मोठी घोडचूकच ठरली. कारण डॉ.वेब्रेख्टना ते मूळ पत्र सापडलं आणि त्यांनी त्या पत्राचे मुद्राचित्रच वृत्तपत्रात प्रसिद्ध केलं. आपल्या मित्राला लिहीलेल्या त्या पत्रात स्ट्रिकलँडने आपल्या पत्नीचा उल्लेख करून असं लिहीलं होतं ‘कोण म्हणतं माझी पत्नी एक चांगली गृहीणी आहे. देवा का बरं असली बाई माझ्या वाट्याला दिलीस. तिचं तळपट होवो.’ चर्चची जेव्हा चलती होती त्या काळात त्यांनी आपल्याला गैरसोईच्या वाटणार्या पुराव्यांची अशीच वासलात लावली असेल.

डॉ.वेब्रेख्टना चार्ल्स स्ट्रिकलँड चित्रकार म्हणून अतिशय प्रिय होता. त्यांची निरीक्षणशक्ति अतिशय विलक्षण होती. एखादी चुकीची गोष्ट मग ती कितीही साळसूदपणे केलेली असो त्यांच्या नजरेतून सुटणं शक्य नसे. ते स्वत: एक मनोविकार तज्ञ होते शिवाय चित्रकलेचे अभ्यासक. त्यांच्या सुक्ष्म दृष्टीला वर वर साध्या गोष्टीत लपलेला गूढ अर्थ दिसायचा आणि त्यांच्यातील मानोविकार तज्ञ लगेच त्याचे शब्दांकन करायचा. आपल्या आवडत्या कलाकाराच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीची त्यांनी ज्या कठोरतेने मीमांसा केली आहे ते पहाण्यासारखं आहे. ज्या प्रसंगातून चार्ल्स स्ट्रिकलँडचा दुष्टपणा अथवा त्याची क्षुद्रवृत्ती दिसत असेल तो प्रसंग वर्णन करायला चित्रकारावरील त्यांच्या प्रेमामुळे त्यांना मनापासून जरी आवडत नसले तरी ते एक लेखक म्हणून असेलेले आपले कर्तव्य पार पाडायला चुकले नाहीत. पाद्रीबाबांनी पितृप्रेमापोटी केलेल्या चलाख्या जेव्हा त्यांना पुराव्यासकट सापडल्या तेव्हा ते त्यांच्यावर केवढ्या त्वेषाने तुटून पडले ते पहाणं मोठं गमतीचं होतं. अगदी क्षुल्लक गोष्ट सुद्धा त्यांच्या नजरेतून सुटली नव्हती, मग ते चार्ल्स स्ट्रिकलँडचं एखादं लाँड्रीचं बिल असो की त्याने उधार घेतलेला एखादा क्राऊन असो.


Title: Two women of Tahiti, Artist: Paul Gauguin, Year 1891
Medium: oil on canvas, Dimensions: 69 cm × 91 cm (27.2 in × 35.8 in)
Location - Musée d'Orsay, Paris, Source: Wikimedia 

मून अँड सिक्सपेन्स - मनोगत

मनोगत
व्हॅन गॉग, तूलुज लोत्रेक आणि पॉल गोगँ हे पोस्ट इंप्रेशनिस्ट कालखंडतील तीन चित्रकार समकालीन तर होतेच शिवाय त्यांचा एकमेकांशी परिचयही होता. तिघेही चित्रकार म्हणून थोर होतेच शिवाय त्यांची जीवनकहाणी ही विलक्षण म्हणता येईल अशी आहे. या तिन्ही चित्रकारांना असामान्य प्रतिभेचं देणं लाभलं होतं. तिघांच्याही आयुष्यात संघर्ष, उपेक्षा आणि अवहेलना आहेत. पण या सर्वांचा सामना करत आपली स्वतंत्र शैली प्रस्थापित करण्यात त्यांना यश आले. पण त्यासाठी त्यांनी काय किंमत दिली याची प्रचिती त्यांची जीवनकहाणी वाचल्या शिवाय येत नाही. व्हॅन गॉगच्या जीवनावर आधारीत अर्विंग स्टोनच्या लस्ट फॉर लाईफचा अनुवाद माधूरी पुरंदरेंनी फार पूर्वीच केला आहे. तुलूज लोत्रेकच्या जीवनावर आधारीत पिएरे ल मूरच्या मुलँ रूजचा मी केलेला अनुवाद २०११ मध्ये प्रसिद्ध होताच मी पॉल गोगँच्या जीवनावर आधारीत सॉमरसेट मॉमच्या मून अँड सिक्सपेन्सचा अनुवाद करण्याचा दुसरा संकल्प सोडला होता.
गोगँची रंगांची हाताळणी आणि त्याची सिंथेटीस्ट या नावाने प्रसिद्ध झालेली शैली इंप्रेशनिस्ट चित्रकारांपेक्षा अगदी वेगळी होती. ताहिती बेटांवर तैलरंगांच्या उपलब्ध न झाल्यामुळे गोगँने शिल्पकला, लाकडावरचे कोरीवकाम आणि सेरॅमिक्स ही माध्यमेही कॅनव्हास एवढ्याच ताकदीने हाताळली आहेत. त्याने आपली कला व जीवना विषयी भूमिका वृत्तपत्र आणि नियतकालिकांमधून ठाम पणे मांडली. आपल्या ताहितीमधील वास्तव्यात तेथील फ्रेंच अधिकारी आणि चर्च यांच्या रोषाची पर्वा न करता त्याने तेथील आदिवासींची बाजू मांडली. सिंबॉलिस्ट चित्रकारांचा तो एक आदर्श होता. प्रिमीटीव्हिजन आणि खेड्याकडे वळा अशा चळवळींनी गोगँकडून प्रेरणा घेतली आहे. नवचित्रकलेचे उद्गाते पाब्लो पिकासो आणि हेन्री मातिस यांच्यावर गोगँचा प्रभाव होता.
मून अँड सिक्सपेन्स ही मॉमची सर्वात गाजलेली आणि त्याची स्वत:चीही आवडती कादंबरी आहे. ही कादंबरी मॉमच्या ‘मनुष्य त्याच्या विकारांचा आणि नियतीचा बळी असतो’ या लाडक्या संकल्पनेवर बेतलेली आहे. पण मॉमने कादंबरीच्या कथानकात पॉल गोगँच्या जीवनकहाणीपासून बरीच फारकत घेतल्याने त्याने कादंबरीतील मुख्य व्यक्तिरेखेचे नाव बदलले आहे. मूळ इंग्रजी भाषेतील कादंबरीत कित्येक ठिकाणी फ्रेंच भाषेतील संवाद तसेच ठेवले आहेत. अनुवाद करताना त्यांचा उच्चार आणि अर्थासाठी गुगल ट्रान्सलिटरची मदत घेतली आहे. तसेच कादंबरी चित्रकाराच्या जीवनावर असल्यामुळे प्रसंगोपात पॉल गागँची चित्रे उध्दृत करण्याचा मानस ही चित्रे विकीपिडीयावर पब्लिक डोमेनमधे उपलब्ध असल्यामुळे शक्य झाले.
अनुवाद करण्याचा संकव्प माझ्या हातून लगेच पूरा झाला तरी प्रसिद्धीचा योग काही जूळून येत नव्हता. शेवटी माझ्या ब्लॉगवर क्रमश: प्रसिद्ध करावा असा विचार आहे. पूर्वी एपीएस वापरून केलेले काम इ-आवृत्तीसाठी युनिकोडमध्ये रूपांतरीत करण्याचे काम मुळ अनुवादा एवढे कठीण नसले तरी चिकाटीची मागणी करणारे आहे. रूपांतर करताना काही दोष राहून गेले असल्यास त्याची जबाबदारी सर्वस्वी माझी आहे. वाचकांचा प्रतिसाद मिळाला तर माझ्या आनंदात भर पडेल आणि ब्लॉग नियमीत चालू ठेवण्यासाठी उत्साहाचे बळ मिळेल.

जयंत गुणे

११ जानेवारी २०१८, कार्लसबाद, सॅन दिआगो.

Tuesday, February 9, 2016

शेवटचं पत्र

माझे मित्र सतीश काळसेकर यांना लिहीलेलं पत्र.
8 फेब्रुवारी 2016. मुक्काम ... लॉस एंजेलिस.
प्रिय मित्रा,

येथे आल्यावरची आजची पहिली पायपीट. कौशिक बरोबर नसल्यामुळे आमच्या आम्हीच केलेली. तू पत्र लिहायला बजावून सांगितलं असल्याने सर्वप्स्ट ऑफिस शोधणं आवश्यक होतं. आयटीच्या क्षेत्रातील नव्या तंत्र युगाच्या अघाडीवर असलेल्या कॅलिफोर्नियात पोस्ट ऑफिस असेल न्स्की नाही याची शंका होती. म्हणून गुगल मॅपवर पोस्ट ऑफिस कुठे आहे ते नीट बघून घेतले आणि बाहेर पडलो. आश्चर्य म्हणजे आसपास दोन तीन पोस्ट ऑफिस होती त्यामुळे फारशी पायपीट करावी लागणार नव्हती. रस्त्यावर चिटपाखरू नव्हते. मोबाईल, गुगल मॅप, ट्रान्स्लेटर वगैरे सोई नव्हत्या तेव्हा लोक कसे काय नव्या शहरात फिरत असतील असा विचार आला. हु एन सॅंग, अल बैरूनी वगैरे लोकांना कोणी रस्ता दाखवला असेल. त्यांनी कोणत्या भाषेच संवाद साधला असेल.
लंडनमध्ये पोस्ट ऑफिस कौशिकच्या घरासमोरच होतं. पण त्या पोस्ट ऑफिसच्या अर्ध्या जागेत किराणा मालाचं दुकान थाटलेलं होतं. एरोग्रॅम मागितला तर तो बंद होऊन कित्येक वर्ष लोटली तुम्ही कोणत्या गावचे, तुम्हाला अजून माहित नाही असे भाव त्या काऊंटर पलीकडच्या चेहे-यावर दिसले होते त्याची आठवण झाली. इथे एरोग्रॅम हा शब्द तरी त्यांनी ऐकला असेल का या शंकेची पाल मनात चुकचुकत होती. पण पोस्टमास्तर माझ्या सारखाच साठी उलटलेला. त्याने एरोग्रॅम बंद झाल्याचं सांगून त्याऐवडी योग्य किंमतीचं तिकीट चिकटवून एक पाकिटच माझ्या हातात दिलं. फक्त एक डॉलर तेहतीस सेंट एवढी रक्कम क्रेडिट कार्ड न वापरता प्रत्यक्ष रोखीने कशी चुकती करायची ते हा मोठा प्रश्न होता. पण सुदैवाने नाणी पाडण्याची हु एन सँगच्या काळापासून चालू असलेली पद्धत अजून तरी बंद झालेली नसल्याने सुटे पैसे देत घेत व्यवहार रोखीने पूर्ण झाल्याचं समाधना दोघांच्याही चेहे-यावर होते. तार बंद व्हायला शंभर वर्षं लागली, एरोग्रॅमला पन्नास वर्ष. पोस्ट कार्ड फक्त आपल्या देशातच उरलं असावं. स्टॅंप बंद व्हायच्या मार्गावर असावेत. उरलेच तर फक्त संग्राहकांपुरते उरतील.

पोस्ट ऑफिसवरून घरी जाताना वाटेत Dave’s Old Book Stall हे जुन्या व दुर्मिळ पुस्तकांचं गुगल मॅपवर दिसलेलं दुकान सापडलं. किंडल आणि ई-बुक्सच्या जमान्यात पुस्तकांचं दुकान, ते सुद्धा जुन्या व दुर्मिळ. पुस्तकांच्या दुकानांच्या यादीत Borders चं नाव अजूनही असलं तरी जसं मृत व्यक्तिचा उल्लेख करताना नावामागे कै. किंवा Late अशी उपाधी लावतात तसं Borders च्या नावापुढे Defunct असं बिरूद लावलं होतं.  Barnes & Nobles अजून तगून आहेत. तसंच हेही असावं. दुकानाच्या दरवाजाबाहेरच एक डॉलर किंमतीच्या पुस्तकांचा स्टँड मांडलेला होता. त्यातील Fifty Shades of Grey & Memoires of a Geisha ही दोन पुस्तकं उचलली. बाकी डॅन ब्राऊन, सिडनी शेल्डन, मिल्स अँड बून वगैरे बरीच होती. दुकान फारसं मोठं नव्हतं. सगळी पुस्तकं विषयवार लेखकांच्या नावानीशी शेल्फवर नीट लावून ठेवलेली होती. कौशिकसाठी Story of Painting & Preble’s Art forms  ही दोन पुस्तकं घेतली. व्हिज्युअल आर्ट विषयी त्याची जाणिव अधिक विकसित व्हावी म्हणून. व्हिवीयनसाठी CHINA History in Art घेतलं. अमेरीकन आर्टच्या इतिहासातून अमेरीकेचा इतिहास अधिक चांगला समजायला कशी मदत होते ते माधव आचवलांनी जसं उलगडून दाखवलं आहे तसं या पुस्तकातून तिला तिने न पाहिलेल्या तिच्या मायदेशाची ओळख होईल अशी आशा करूया.

आता या क्षणी अहमदाबादचे गुजराती फुलके अबोटाबादच्या पाकिस्तानी लोणच्याला लावून खात आहे. संध्याकाळचे शीतल वारे वाहत आहेत. स्वच्छ उन पडलं आहे. लॉस एंजेलीस सुंदर शहर आहे असं जे ऐकत होतं तसंच ते आहे. कदाचित त्यामुळे कौशिकने इथे स्थायिक व्हायचं ठरवलं असावं. सुंदर, सुखद हवामान, उत्तम पायाभूत सोई, शिवाय सुरक्षित जीवन. नैरोबीची आठवण झाली. सुरक्षा सोडली तर बाकी सगळं तसंच होतं. थोडं तरी सुरक्षित वाटलं असतं तर कदाचित तेथून परत आलोच नसतो. वर्षातील बारा महिने सुंदर हवामान, घरा पासून पाच मिनीटांवर सार्वजनीक वाचनालय, थोडं पुढे गेलं की बार्नस अँड नोबेल, डेव्हज ओल्ड बुक स्टॉल, पंधरा मिनीटांवर  निळाशार समुद्र, सुर्यास्ताला साक्षी ठेवून घेतलेले सांग्रियाचे घुटके जगायला आणखी काय हवं असतं.

पत्र लिहायला लेखणी हातात घेतली पण लॅपटॉपवर लिहायची एवढी सवय झालीय की कागद पेनाने नीट लिहीताच येईना. पण लेखी पत्र लिहून पोस्टात टाकण्याची अट असल्यामुळे पहिल्यांदा फेसबुकवर टाकून नंतर कागदावर कॉपी-पेस्ट करावं लागलं. एकूण पत्र लिहून पोस्टात टाकण्याची अट व्याप न ठरता माझे डोळे उघडणारी झाली.

नव्यायुगातील ई-मेल, ई-बुक्स, गुगल, किंडल वगैरे तंत्रज्ञानचा जेथे आरंभ झाला त्या कॅलिफोर्नियात पुस्तकांची दुकानं, वाचनालय आणि पोस्ट ऑफिस यांची संस्कृती जोपर्यंत टिकून आहे तो पर्यंत तुझ्यासारख्या पुस्तकं, मित्र आणि एकूण जगण्यावर नितांत प्रेम करणा-या मित्राला स्वत:च्या हाताने कागदावर लिहिलेलं पत्र शेवटचं ठरणार नाही याची खात्री वाटते.

प्रकृतीची काळजी घे, विद्या वैनींना नमस्कार,

जय

http://www.davesoldebookshop.com/

Wednesday, April 2, 2014

जगदिश स्वामिनाथन – एक झपाटलेला अवलिया

जगदिश स्वामिनाथन – एक झपाटलेला अवलिया
माझा जन्म इतरांना प्रभावित करण्यासाठी झाला आहे, प्रभावित होण्यासाठी नव्हे



यशस्वी होण्यासाठी आत्मभान असण्याची गरज असते. किंबहूना सर्वच यशस्वी व्यक्तिंना त्यांच्यातील सुप्त शक्तिंची जाणीव असते. आत्मभान आणि आढ्यता यातील सीमारेषा अंधूक आहे. आत्मभानाला जर विचारांची आणि कतृत्वाची जोड नसेल तर ती पोकळ दर्पोक्ती ठरण्याची शक्यता असते. जगदीश स्वामीनाथन यांच्याकडे या दोन्ही गोष्टी होत्या.
कला आणि राजकारण हे दोन टोकाचे प्रांत आहेत. कलाकार आणि राजकारण्यांचे पिंडही भिन्न असतात. त्यासाठी अगदी वेगळ्याच गुणांची आवश्यकता असते. कलाकार अतिसंवेदनाशील असतो तर राजकारणी दुसरा संवनेदनाशून्य. त्यामुळे राजकारण सोडून कोणी कलेच्या प्रांतात मुशाफिरी केली आहे असं उदाहरण आपल्याला क्वचितच मिळेल. पण अशी दोन उदाहरणे आपल्याकडे आहेत. एक आहे ऋत्विक घटक व दुसरा जगदिश स्वामिनाथन. ऋत्विक सक्रीय राजकारण सोडून सिनेक्षेत्रात गेले तर जगदिश स्वामिनाथननी ब्रश हातात घेतला.
जगदिश स्वामिनाथनना जाऊन आता जवळ जवळ वीस वर्ष होतील. पण भारतीय चित्रकलेला त्यांनी दिलेले योगदान विचारात घेतल्याशिवाय आज आपल्याला पुढे जाता येत नाही. ते स्वत: एक सृजनशील चित्रकार तर होतेच शिवाय त्यांची वैचारिक बैठकही पक्की होती. भारतीय अनागर कलेचा (रूरल, ट्रायबल, फोक आर्ट) त्यांच्यावरील प्रभाव फक्त त्यांच्या स्वत:च्या निर्मितीपुरता मर्यादित नव्हता. आदिवासी चित्रकलेचा त्यांच्या एवढ्या खोलात जाऊन कोणीच विचार केला नसेल. नुसता विचारच नव्हे तर म्युझियममध्ये बंदिस्त झालेल्या आदिवासी कलेला आणि कलाकारांना आधुनिक चित्रकलेच्या मुख्य प्रवाहाबरोबरीने स्थान मिळवून देण्यासाठी त्यांच्या एवढे प्रयत्न कोणीही केले नसतील. दृष्यकलांकडे बघण्याच्या आपल्या दृष्टीला पाश्चात्य प्रभावाखालून मुक्त करण्याचे बरेचसे श्रेय स्मामीनाथननाच द्यावे लागेल. एक कलाकार आणि एक जाणकार विचारवंत म्हणून राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय क्षेत्रात त्यांचा चांगलाच दबदबा होता. नोबेल पारीतोषक विजेत्या ऑक्टोव्हिया पाझने प्रसिद्ध चित्रकार मार्सेल ड्युचॅम्पवर लिहीलेल्या कॅसल ऑफ प्युरीटी ची एक प्रत स्वामिनाथनना दिली होती. त्यावर त्याने लिहीलं होतं, टू स्वामी ... हू लिव्हज् नॉट इन कॅसल बट इन फ्युरियस प्युरीटी.
स्वामिनाथनचं व्यक्तिमत्व बघताक्षणी छाप टाकणारं होतं. मध्यम उंची, शिडशीडीत अंगयष्टी, एखाद्या आध्यात्मिक गुरूसारखे लांब केस व दाढी, व्याकूळ नजर, भारावून टाकणारं बोलणं. लोभसवाणं व्यक्तिमत्व. स्वामी जेथे असायचे तेथे काही तरी सांगत असायचे आणि त्यांच्या सभोवती असणा-या लोकांना ते ऐकत रहावसं वाटायचं. त्यांच्या बोलण्यातून प्रत्येकाला घेण्यासारखं काहीना काही तरी निश्चित मिळायचं. इंग्रजी, हिंदी आणि उर्दूवर प्रभूत्व. संस्कृतही ब-यापैकी, वेद आणि उपनिषद वाचलेली. मार्क्स, देरिदा, मार्कूस, बुबेर, लेव्ही स्ट्राउस, डार्विन, रोमा रोलाँ यांच्या बरोबरीने प्रेमचंद, निराला, महादेवी वर्मा, हरिवंशराय बच्चन यांचे वाचन, सहज तोंडावर येणारी गालीब, फिराक, जिगर आणि फैझ याचीं शायरी. स्मामी यांची मातृभाषा तामीळ आहे हे कळल्यावर तर आश्चर्याचा धक्काच बसायचा. ते सतत काही ना काही तरी करत असायचे. जे करायचे ते सर्वस्व ओतून. त्यांच्याकडे प्रचंड उर्जा होती. सर्व जगभर त्यांचा संचार होता. त्यांचा मित्र परिवार आणि चाहाते सर्वत्र पसरलेले होते. स्वामी एक सृजनशील कलाकार होते. पण त्यांची कला फक्त स्वत: पुरती स्वांतसुखाय अशी कधीच नव्हती. राजकीय तसेच साहित्यिक आणि सांस्कृतीक क्षेत्रात ते ठोस भूमिका घेऊन उभे होते. आपल्या मतांसाठी ते नेहमीच आग्रही असायचे. मोठ-मोठ्या लोकांत त्यांची उठ-बस होती. ते विनम्र होते पण त्यांनी कोणाचीही भीड-मुर्वत बाळगली नाही. ते कोणाच्याही दबावाला बळी पडत नसत. मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती कोणीही असो, आपली मते रोख ठोकपणे मांडताना ते कधीही बिचकले नाहीत. प्रसंगी विरोधाला तोंड देऊन ते आपल्या भूमिकेवर ठाम उभे राहिले आणि त्याची किंमतही त्यांनी चुकवली. त्यांचा पाया राजकीय कार्यकर्ता म्हणून घडला असल्यामुळे त्यांनी चळवळी उभारल्या, लोकांना संघटीत केले. ललित कला अकादमीमध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांनी आंदोलन उभारले. शेवटी त्यांनी केलेल्या सगळ्या सुचना मान्य झाल्या. संघटन कौशल्य आणि आपले मुद्दे मांडण्यातील प्रभुत्वामुळे त्यांची सांस्कृतीक आणि कला जगतातील ब-याच समित्या, संस्थांवर निवड झाली. भारत भवन, भोपाळ येथील रूपांकार हा आदिवासी कलेला वाहिलेल्या विभागाच्या उभारणीचे श्रेय सर्वस्वी स्वामिनाथन यांना द्यावे लागते.
स्वामीनाथन यांचा जन्म १९२८ साली सिमल्यामध्ये एका तामीळ कुटुंबात झाला. त्यांचे वडिल तेथे सरकारी सेवेत होते. त्यांचं बालपण हिमालयातील पहाडांच्या कुशीत गेलं. एरवी खर्डेघाशी करणा-या त्या मध्यमवर्गीय सरकारी कारकूनाला साहित्य आणि कलेच्या प्रांतात खूप रस होता. त्यांचे वडिल त्यांना चार्ल्स डिकन्स तथा कालिदासाचं साहित्य वाचून दाखवत. आई निरक्षर असली तरी तिच्याकडे तामिळ लोककथांचं चांगलं भांडार होतं. सगळ्या जगाकडे पाहण्याची निकोप दृष्टी आणि कलेचं भान हा वारसा त्यांना त्यांच्या आई-वडिलांकडून मिळाला असं म्हणता येईल. लहानपणी द-याखो-यात भटकाताना त्यांचं स्केचबुक नेहमी त्यांच्याजवळ असायचं. पण पुढे जाऊन ते मोठा चित्रकार होणार आहेत असं काही त्यांच्या मित्रांना तेव्हा वाटलं नव्हतं.
त्यांचे कुटुंब १९४० मध्ये दिल्लीत आले. स्वामी यांनी मॅट्रीकनंतर दिल्लीतील हिंदू कॉलेजमध्ये प्री-मेडिकलला प्रवेश घेतला तो डॉक्टर होण्याच्या उद्देशाने. पण प्राण्यांचं डिसेक्शन करण्यापेक्षा त्यांना त्यांची चित्रं काढण्यात जास्त रस वाटू वागवा. प्री-मेडिकलच्या अभ्यासात त्यांचं मन रमेना. काय करावं ते कळत नव्हतं. त्याकाळी न्यु थिएटर्सचे नायक जसं अब मुझे कलकत्ता जाने पडेगा असं म्हणून थेट कलकत्त्याची गाडी पकडायचे तसं एके दिवशी त्यांनी कोणालाही न सांगता तडकाफडकी कलकत्त्याला प्रयाण केले. तेथे त्यांनी विवीध उचापत्या केल्या. जगण्यासाठी रस्त्यावर कपडे विकण्याचा व्यवसाय केला, हॉटेलमध्ये कपबशा विसळल्या, सिनेमाची तिकीटं काळ्या बाजारात विकली. दिवस स्वातंत्र्य चळवळीचे होते. सर्व तरूणाई भारलेली होती. काम करून थकल्यानंतर रात्री वळचणीला लवंडण्यापूर्वी रस्त्यावर बोलघेवड्या बंगाल्यावरोबर चाललेल्या गप्पांचा अड्डा पहाटेपर्यंत रंगायचा.
कलकत्यातील दीड एक वर्षांच्या वास्तव्यात त्यांची राजकीय जाणीव हळू हळू तयार होऊ लागली होती. त्यानंतर ते जेव्हा दिल्लीला परतले ते पूर्णवेळ राजकीय कार्यकर्ता व्हायचं ठरवून. दिल्लीत त्यांनी काँग्रेस सोशॅलिस्ट पार्टीचं काम करायला सुरूवात केली. तेथे त्यांचा लोहियांशी संबंध आला. पण सामाज परीवर्तन करयाचं असेल तर अधिक जहाल मार्ग स्विकारल्याशिवाय गत्यंतर नाही अश्या विचाराने त्यांनी सोशॅलिस्ट पार्टीला रामराम ठोकून कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. दिल्लीच्या रस्त्यांवर पोस्टर लावण्यापासून सुरूवात करून त्यांनी सर्व उत्तर भारत ढवळून काढला. थोडा काळ त्यांनी दैनिक हिंदुस्तान आणि सरितामध्ये पत्रकारीता केली. या दरम्यान त्यांचा भवानी या तरूण राजकीय कार्यकार्तीशी परिचय झाला. या परिचयातून त्यांनी १९५५ मध्ये विवाह केला.

 सक्रीय राजकीय जीवनातही त्यांचं मन घुसमटत होतं. पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करणे सोडून दिल्यावर ते लिंक आणि पेट्रीयटमध्ये पत्रकार म्हणून काम करायला लागले. त्यांची लेखणी सगळ्या विषयांवर चालायची. पेट्रीयटमध्ये ते दक्षिण-पूर्व आशियातील परिस्थितीवर अभ्यासपूर्ण लेख लिहीत असत तर लिंकमध्ये कला समीक्षा. तात्कालिन कला समीक्षेमध्ये काही नवे मुद्दे पहिल्यांदा मांडण्याचं श्रेय स्वामींकडे जाते.
वैचारिक कक्षा रुंदावल्या. त्यातूनच पुढे जाऊन त्यांनी काँट्रा हे समकालिन दृश्यकलांना वाहिवलेले स्वत:चे मासिक चालू केले. त्यांनी तारूण्यसुलभ संवेदनाशीलतेत कविताही केल्या. लहानपणी असलेल्या चित्रकलेच्या ओढीने त्यांचं मन अस्वस्थ होत होतं. त्यामुळे त्यांनी चित्रकलेकडे एक करीयर म्हणून पाहायला सुरवात केली. चित्र काढता काढता दिल्ली पॉलीटेक्नीकमध्ये (दिल्ली ललित कला महाविद्यालय) त्यांनी चित्रकलेचं पध्दतशीर शिक्षण घ्यायला सुरवात केली. अकादमी ऑफ फाईन आर्टस, वॉर्सॉ येथे शिक्षण घेण्यासाठी त्यांना एक स्कॉलरशिप मिळाली. पाठोपाठ समकालीन कलेच्या अभ्यासासाठी १९६८-१९७० मध्ये जवाहरलाल नेहरू फेलोशिप आणि १९६९ मध्ये साओ पावलो, ब्राझिल येथील द्वैवार्षीक कलासम्मेलनात परीक्षक मंडळावर निवड. त्यांनी आपल्या चित्रांचं १९६० साली दिल्लीमध्ये पहिलं प्रदर्शन केलं. त्यानंतरच्या वीस एक वर्षात त्यांची अठरा राष्ट्रीय, एक जपान आणि एक ऑस्ट्रेलिया अशी वीस प्रदर्शने झाली. या प्रदर्शनांनी एक सृजनशील कलाकार म्हणून त्यांनी स्वत:ला सिद्ध केलं.

त्याकाळी दिल्लीमध्ये स्वामी आणि गुलाम मोहमद शेख, जेराम पटेल, हिम्मत शाह, अंबादास वगैरे स्वतंत्र विचारांच्या चित्रकारांचा गप्पांचा अड्डा होता. ललित कला अकादमी, दिल्ली पॉलीटेक्नीक संस्थामध्ये चालणारं राजकारण, तेथील ढुढ्ढार्यांचा कलेकडे बघण्याचा वसागतकालीन दृष्टीकोन वगैरे गोष्टींना त्यांचा विरोध होता. हे सगळे चित्रकार स्वतंत्र विचारांचे होते. पण हे एक सोडलं तर त्यांच्यात दुसरं काहीही साम्य नव्हतं. प्रत्येकाचे विचार, मार्ग आणि शैली वेगवेगळी होती. ते एकत्र जमत. वेगवगळ्या विषयांवर त्यांच्यात तासंतास चर्चा चाले. हमरीतुमरीवर येऊन वादविवाद होत. त्यांच्यामध्ये पांड्या नावाचे एक चित्रकार होते. सर्वजण एकदा त्यांच्या भावनगर येथील घरी जमले होते. तेथे त्यांनी आपला स्वतंत्र गट स्थापन करायचं ठरवलं. पांड्या यांच्या भावनगरमधील ज्या घरात ते जमले होते त्याचा घर नंबर १८९० होता. त्यावरून त्यांनी आपल्या गटाचं नाव ग्रुप १८९० असं ठेवलं. त्यांच्या पहिल्या प्रदर्शनाच्या उद्-घाटनाला जवाहरलाल नेहरूंना बोलवायचं ठरवलं. स्मामींच्या आग्रहाने प्रकृती बरी नसतानाही ते आले. ऑक्टाव्हियो पाझच्या उपस्थितीत ऑक्टोबर १९६३ मध्ये रविंद्र भवनात त्यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्-घाटन पार पडलं. यावेळी ऑक्टाव्हियो पाझने स्मामींवर केलेली एक कविता टू माय फ्रेंड, स्वामी या नावाने त्यांना अर्पण केली.
स्वामींनी आपल्या चित्रातून इतिहासाचे वेगवेगळे कालखंड मांडण्याचा प्रयत्न केला. असं करताना त्यांनी प्रचलित युरोपीयन इतिहासकारांची युरोपकेंद्रित मांडणी नाकारून नवी मांडणी केली. युरोपीयन इतिहासकारांनी कला आणि संस्कृतीची ऐतिहासिक विकासक्रमाशी सांगड घातलेली आहे. संस्कृतीचा विकास ही एक ऐतिहासिक कालानुक्रमे होणारी एक प्रक्रिया आहे. नागरीकरणाबरोबरच संस्कृतीचाही विकास होत असतो. कलाभान हे एक संस्कृचीचे अविभाज्य अंग असते. त्यामुळे यात जुन्या काळची कला, अनागरी कला ही कनिष्ठ पातळीवरची असते असं सहाजिकच गृहीत धरलं जातं. संस्कृतीच्या विकासाची भौतिक प्रगतीशी सांगड घातली जाते. ऐतिहासिक काळापासून कला आणि संस्कृतीचाही विकास होत गेला आणि त्याचं परमोच्च शिखर युरोपियन प्रबोधनकाळात गाठलं गेलं. युरोपियन वसाहतवादामागे हीच वंशश्रेष्ठत्वाची विचारसरणी होती. त्यातूनच जगभरातील कलावस्तू गोळा करून युरोपियन म्युझियममध्ये ठेवल्या जाऊ लागल्या. त्यांच्या मांडणीतून युरोपियन वसाहतवादी दृष्टीकोन दिसून येते.
इतिहासात काळाबरोबर कलेचा, सांस्कृतीचाही विकास होत असतो हे स्वामी यांना मान्य नव्हतं. आदिमानवालाही सौंदर्याचं भान होतं. कलेची अभिव्यक्ती त्याच्या जगण्याच्या परीसरातून दिसून येते. इतिहासातील कोणत्याही टप्प्यावरची श्रेष्ठ कला आजच्या समकालीन श्रेष्ठ कलेपेक्षा कोणत्याही दृष्टीने कमी नसते. कालक्रमानुसार परीमाणं बदलतात पण मूळ सौंदर्यतत्व तेच असतं. कलात्मकता कालातीत असली पाहिजे यावर त्यांचा विश्वास होता. त्यांनी आपल्या चित्रातून इतिहासातील या कालातीत तत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. स्वामींच्या चित्रांचे एकूण चार विभाग पाडता येतात. पहिला भाग १९५९ च्या आसपासचा. त्यावेळी स्वामींनी आपल्या चित्रातून प्रागऐतिहासिक किंवा प्राचिन कुलचिन्हांचा आणि संकेतांचा वापर केला. त्यावेळची त्यांची चित्रं, तर्कसंगती पेक्षा एक प्रकारची अद्भूततेकडे जास्त झुकलेली दिसून येतात. त्यानंतर स्वामी हळू हळू आपल्या लोकसंस्कृती आणि लोककलांकडे वळले. या काळात त्यांनी ओम, स्वस्तिक, कमळ, शिवलिंग, सर्प व हाताचे ठसे अशा मोटीफचा चिन्हभाषेचा वापर आपल्या चित्रात करून इतिहासाच्या निकट जाण्याचा प्रयत्न वारंवार केला. उदाहरणार्थ पिंपळाच्या झाडाखालची सर्पाकृती शिळा किंवा मंदिराच्या गाभा-यातील प्रचंड शिवलिंग. आज आपल्या नागर जीवनातून अशा चिन्हांचा वापर अदृश्य होत चालला असला तरी मुख्य प्रवाहापासान तुटलेल्या अनागर, आदिवासी जनांच्या जीवनात या चिन्हांचा वापर अजूनही होताना दिसतो. जेमिनी रॉय ते हुसेन अशा साठोत्तरी पिढीतील ब-याच चित्रकारांनी या प्रतिकांचा आपल्या चित्रात वापर केला. या चित्रकारांना परांपरांच्या सहाय्याने आपले पाय रोवायचे होते. पण या बाबतीत स्वामींना इतरांपेक्षा काहीतरी वेगळं सांगायचं होतं. त्यांनी चिन्हांचा प्रचलित अर्थ, त्यांचं सुलभीकरण करायचं नाकारलं. स्वामींनी आपल्या चित्रांसाठी प्रामुख्याने कॅनव्हास व तैलरंग वापरले. कधी कधी जलरंगांचाही वापर केला. स्वामींनी चित्र रंगवण्याच्या तंत्रात बरेच प्रयोग केले. पॅलेटमधील रंगात हात बुडवून सरळ कॅनव्हासवर रंगवणं तर कधी बोटांनी कॅनव्हासवर लिहील्यासारखं करून रंगकाम करणं. स्वामींनी आधुनिक चित्रसाहित्याचा वापर केला असला तरी त्यांचं तंत्र मात्र अनागरी कलाकारांचं होतं. स्वामींच्या सुरवातीच्या चित्रांची तुलना आपल्याला एखाद्या आदिमानवाची गुहेशी, मंदिराच्या गाभा-याशी किंवा ग्रामिण भागीतील घरांच्या बाह्य भिंतींच्या भौमितिक रचने करता येईल. या चित्रांना ते अवकाशाची रंग-भूमिती (कलर जॉमेट्री ऑफ स्पेस) असं म्हणत असत. एका प्रदर्शनाच्या कॅटलॉगमध्ये त्यांनी लिहीलं होतं, त्रिकोण आणि आयताकृती या रंगांच्या अव्यक्त खिडक्या आहेत. या दरम्यानच्या स्वामींच्या चित्रांतील आकारातून, रंगयोजनेतून तांत्रिक प्रतिमांचा प्रभाव दिसून येतो. चित्रांच्या बाह्यस्वरूपात आकर्षकता आली. पॅलेटमध्ये गुलाबी, फिका जांभळा, फिका पोपटी, फिका पिवळा अशा रंगांचा वापर दिसू लागला. चित्र-विचार प्रामुख्याने रंगांच्या अंगाने व्हायला लागला. रंगछटा गेल्या, आकारातील घनत्व कमी झालं. सरळ साधे भौमितिक आकार. एका चौकोनावर ठेवलेला त्रिकोण. खाली उतरणारी एक शिडी आणि त्रिकोणरूपी शिखरावर फडकणारी पताका काढली की झालं मंदिर. १९६८ नंतर स्वामींच्या चित्रांत सृष्टीतून निवडलेली प्रतिकं यायला लागली. या प्रतिकातून स्वामी आपला आध्यात्मिक अनुभव व्यक्त करू पहात होते. वेडे वाकडे डोंगर, वसंताच्या आगमनाने पल्लवीत झालेलं एखादं झाड, गुरूत्वाकर्षणाच्या नियमांविरुद्ध अवकाशात विहार करणरे अश्मखंड. कधी कधी त्या अश्मखंडात पक्ष्यांचं घरटं असायचं. त्यांच्या चित्रात आता पोपट, कोकिळा, बुलबुल किंवा मोरासारखा दिसणारा एखादा व्याकूळ पक्षी किंवा पक्ष्यांची जोडी वारंवार यायला लागली. त्यांच्या चित्रातील अवघं अवकाशच प्रकाशमान असतं. अवकाशात क्षितीजावरील सुर्य अथवा डोंगराआडून डोकावणारी चंद्रकोरही असते. पण अवकाशकेंद्री रचनेमुळे तो प्रकाश त्यांच्या चित्रातील चंद्र-सुर्यातून आल्यासारखा वाटत नाही. स्वामींच्या चित्रात वारंवार येणारी पक्षी, वृक्ष, पर्वत ही रूपं चित्राच्या अवकाशात स्थिर असतात. हे अवकाश रंगाने सिद्ध झाले आहे. स्वामींनी त्यांच्या एका कॅटलॉगमध्ये ईशावास्योपनिषदामधील पुढील वचन उद्धृत केलं होतं ज्याला स्वतःमध्ये सारी चराचर सृष्टी दिसते किंवा जो सा-या चराचर सृष्टीमध्ये स्वतःला बघू शकतो तो कधीच दुःखी होत नाही. स्वामींवर उपनिषद आणि वेदांप्रमाणेच पॉल क्ली आणि जॅक्सन पोलॉकचाही प्रभाव होता. स्वामींच्या चित्रातील सौंदर्यबोध हा प्राकृतीक रहस्यवादाच्या जवळ जाणारा आहे.

स्वामींनी दिलेलं दुसरं महत्वाचं योगदान म्हणजे त्यांनी अनागर कलांकडे पाहाण्याची दिलेली नवी दृष्टी. ब्रिटीशांनी वसाहातींतून मौल्यवान वस्तूंची आर्थिक लूट करताना बरोबर नेलेल्या येथील स्थानिक कलाकारांच्या कलाकृतीही गंमत म्हणून बरोबर नेल्या. आर्थिक लूटीने त्यांच्या खजिन्यात भर पडली आणि कुतूहल म्हणून आणलेल्या कलाकृतींनी त्यांच्या म्युझियमची शोभा वाढवली. त्यांच्या दृष्टीने या अप्रगत मागासलेल्या जगातील गंमती जमती होत्या. पौर्वात्य जग सर्वार्थाने मागासलेलं होतं. ऐहिक, सांस्कृतीक, धर्मिक सर्व बाबतीत ते खालच्या पायरीवर उभे होते. युरोपियन वंश हा संस्कृतीच्या सर्वोच्च शिखरावर आहे. युरोपियन कला म्हणजेच अभिजात कला. माकडवाल्याच्या खेळातील दोन पायांवर चालणा-या माकडाचं जसं आपण कौतूक करतो ते कौतूक वासहातिक देशातील कलाकारांच्या वाट्याला यायचं. राजकीय व आर्थिक वर्चस्व गाजवताना युरोपियनांनी आपला धर्म, मूल्य आणि संस्कृती त्यांच्या दृष्टीकोनोतील अप्रगत जगावर लादण्याचा प्रयत्न केला. भारताला स्वातंत्र्या मिळाले खरे पण राज्यकर्त्यांचा हा वासहातिक दृष्टीकोन काही बदलला नाही. बंगाल स्कूलने भारतीय कलेकडे पाहाण्याची नवी दृष्टी दिली पण ती पुनरूज्जीवनवादी होती. त्यांनी सुद्धा येथल्या स्थानिक आदिवासींच्या कलेला म्युझियमच्या बाहेर आणण्याची प्रयत्न केला नव्हता. अनागर कला हा एक स्वतंत्र कलाप्रकार असून त्याचे स्थान समकालिन नागर कलेच्या बरोबरीचे आहे असं स्वामींचं ठाममत होतं आणि त्याचा पाठपुरावा त्यांनी आपल्या कलेतून, विचारातून, लिखाणातून तसेच आंदोलनात्मक आणि रचनात्मक कृतीतून सातत्याने केला. त्यासाठी त्यांनी आपलं सर्व आयुष्य वाहून घेतलं. नॅशनल म्युझियमची पुनरर्चना करताना त्यांच्या या दृष्टीची प्रचिती येते.
स्वामी भोपाळच्या भारत भवनमध्ये सुरवातीपासून एक संस्थात्मक आणि क्रियाशील सदस्य होते. तेथे मॉडर्न आर्टची गॅलेरी स्थापन करण्यासाठी त्यांना बोलावून घेतलं गेलं. तेथे आल्यावर त्यांनी एक वेगळीच संकल्पना मांडली. ललित कला अकादमी किंवा नॅशनल गॅलेरी ऑफ मॉडर्न आर्ट प्रमाणे दर वर्षी समकालिन चित्रकारांची वेगवेगळी चित्रे खरेदी करून एक भोंगळ संग्रह करण्यापेक्षा आपण एक निश्चीत उद्दीष्ट ठेवून काही तरी वेगळं करायला हवं. सरसकट खरेदी करत बसलं तर प्रत्येकी एखाद दुसरं चित्र गोळा होतं. त्याने कोणत्याच चित्रकाराच्या कामाची नीट कल्पना येत नाही. एखाद्या चित्रकाराच्या शैलीची, त्याच्या कामाची थोडी फार तरी ओळख होण्यासाठी निदान त्याची किमान दहा-पंधरा चित्रं उपलब्ध असावी लागतात. स्वामींनी इतर सहकारी कलाकारांच्या सहाय्याने चाळीस एक कलाकारांची निवड करून त्यांची किमान दहा चित्रं विकत घेऊन संग्रह करायचं ठरवलं. त्याच वेळी भारत भवनच्या प्रकल्पाचे काम अर्धवट अवस्थेत लटकलेले होते. अशोक बाजपेयी, बी. व्ही. कारंथ, स्वामी आणि त्यांच्या सहका-यांनी भारत भवनाची नाट्य, आर्ट गॅलेरी, काव्य आणि संगीत अशी एकूण चार भाग विभागणी करायचं ठरवलं. याशिवाय रूपांकर नावाच्या म्युझियमच्या निर्मितीची संपूर्ण जबाबदाही स्वामींच्या खांद्यावर टाकण्यात आली होती. रूपांकर आणि संपूर्ण भारत भवनाच्या निर्मितीवर स्वामींच्या सौंदर्य विषयक विचारांची दाट छाप आहे. दिल्लीच्या एन.जी.एम.ए. वर नागरी संस्कृतीची छाप आहे तर क्राफ्ट म्युझियममध्ये अनागरी कलाकुसरीच्या वस्तूंचा (रूरल, फोक आणि ट्रायबल क्राफ्ट) संग्रह करण्यात आला आहे. आता म्युझियम म्हटलं की त्यात प्रामुख्याने ऐतिहासिक दस्तऐवजीकरणच असतं. स्वामींनी या संकल्पनेलाच आव्हान दिलं. भारत भवनमधील संग्रहात वसाहतीत्तोर स्वतंत्र भारताचे खरे प्रतिबिंब असायला हवं ही संकल्पना स्वामी यांची.
पेपरवरील चित्र — आदिवासी कलाकार—जांगड सिन शाम — १९८३
रूपांकरमध्ये समकालीन नागरी आणि अनागरी कलाकृतींचा संग्रह करायचं एकदा ठरवल्यावर तो कसा करायचा हा मोठा प्रश्न होता. येथे स्वामींची धाडसी कल्पकता, संघटन कौशल्य, उद्यमशीलता आणि सहका-यांकडून काम करून घेण्याचं कसब हे अंगभूत गुण उपयोगी पडले. या कामासाठी त्यांनी मध्यप्रदेशातील सगळ्या कलासंस्थातून तीस एक तरूण तरूणींची निवड केली. त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांची कलादृष्टी तयार केली. त्यानंतर त्यांचे पाच-सहा गट पाडले आणि कलाकृती गोळा करण्याच्या कामावर त्यांची सर्व देशभर रवानगी केली. या प्रचंड कामासाठी स्वामींनी स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करत  जवळ जवळ वीस हजार किलोमीटरची भटकंती केली असेल. एवढे कष्ट घेणारे स्वामी हे एकटेच कलाकार होते. हा सगळा अव्यापरेषु व्यापर स्वामींनी अवघ्या ४,५०० रूपये पगारवर केला याच्यावर विश्वासच बसणार नाही. त्यांच्या भोपाळमधील नऊ वर्षांच्या वास्तव्यात त्यांच्याकडे फक्त एक ट्रंक, एक सुटकेस, कॅनव्हासच्या गुंडाळ्या आणि रंग साहित्याचा खोका एवढंच सामान होतं. रूपांकरच्या उभारणीच्या प्रचंड व्यापातही त्यांच्यातील सृजनशील कलावंत जिवंत होता. मिळालेल्या फावल्या वेळात त्यांनी केलेली चित्र निर्मितीही प्रचंड आहे.
भारत भवनसाठी कलाकृती गोळा करण्यात स्वामींच्या डोक्यात काही निश्चित अशी योजना होती. ते आपल्या चिकीत्सक दृष्टीने पण उत्स्फुर्तपणे कलाकृतींची निवड करत. माणसामध्ये सौंदर्याचं भान निर्माण होण्यासाठी फुरसतीची आवश्यकता असते. असा फुरसतीचा वेळ फक्त श्रीमंत आणि सुखवस्तु लोकांकडेच असतो. सर्वसामान्य गरीब आणि कष्टक-यांकडे फुरसतीचा वेळही नसतो आणि त्यांना सौंदर्याचा विचार करण्याची गरजही नसते. या गृहितकाला स्वामींचा ठाम विरोध होता. तळागाळातल्या गरीबातल्या गरीब माणसाकडे सुद्धा सौंदर्यादृष्टी असते आणि त्यांची सृजनशक्ती त्यांच्या भवतालच्या परीसरातून त्यांच्या जगण्यातून व्यक्त होत असते. स्वामींच्या पूर्वीही अनेकांनी हा विचार मांडला होता, पण तो सिद्ध करण्याचा, त्याला संस्थात्मक अधिष्ठान मिळवून देण्याचा प्रयत्न यापूर्वी कोणी केला नव्हता. स्वामींनी आदिवासी, गरीब, तळागाळातील वंचितांची कला प्रकाशात आणली, त्या कलाकारांना प्रतिष्ठा मिळवून दिली. प्रेमा फाया आणि भुरी बाई यांच्यासारख्या आदिवासी कलाकारांना मनजीत बावा, हुसेन आणि राम कुमार यांच्या बरोबरीचे स्थान मिळवून दिले. असा भ्रातृभाव निर्माण करण्याची कल्पना करणे आणि प्रत्यक्षात आणणे फक्त स्वामींनाच जमू शकले.
भारत भवनमधील डिझाईन सेंटरची स्थापना स्वामींनी केली. त्यात प्रामुख्याने ग्राफिक आणि सेरॅमिक्स सारख्या कार्यशाळा आहेत. तेथे देशभरातून तरूण विद्यार्थी कलाकार येतात. अनागरी, आदिवासी आणि नागरी कलाकार तेथे एकत्र येऊन काम करतात. तेथे त्यांनी द पर्सिव्हिंग फिगर्स हे मध्य प्रदेशातील आदिवासी कलाकारांवरचे मोठं दस्तऐवजीकरण केलं. कलाकाराला व्यवस्थापन जमत नाही, त्यांना फक्त शोभेचं पद द्याव असा जो समज होता त्याला स्वामी आणि बी.व्ही. कारंथ यांनी भारत भवन मध्ये छेद दिला. दृष्यकले व्यतिरिक्त काव्य, संगीत, साहित्य अशा इतर कलाप्रकारातसुद्धा स्वामींना तेवढीच जाण होती. भारत भवनमध्ये त्यावेळी असलेल्या सर्वच कलाकारांवर स्वामींचा प्रचंड प्रभाव होता. भोपाळमधील आपल्या वास्तव्यात स्वामींने ब-याच कलाकारांना घडवलं, त्यात काही लेखक आणि कवी सुद्धा होते. स्वामींच्या प्रभावामुळे भारत भवन मधील कारकूनसुद्धा कलाकार झाले. त्यांचा नेपाळी नोकर बहादूरनेसुद्धा ब्रश हातात धरला. स्वामींचं हृदयही विशाल होतं. स्वामींनी गरीब आदिवासी कलाकारांच्या चित्रांना चांगली किंमत मिळवून दिली. पण फक्त यावरच ते थांबले नाहीत. त्यांना माहित होतं की रोख पैसा कधीही न पाहिलेल्या त्या गरीब खेडूतांकडच्या पैशाला हजार वाटा फुटतील. त्यांनी त्या कलाकारांना त्यांचे पैसे त्यांचे जीवनमान उंचावेल अशा प्रकारे गुंतवण्यास मदत केली.
 इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालयाचे (नॅशनल म्युझियम ऑफ मॅन) चेअरमन झाल्यानंतर स्वामींनी म्युझियमची संकल्पनाच नव्याने लिहून काढली. मानवाच्या उत्क्रांतीमध्ये आदिवासी आणि भटक्या जमातींचे प्राथमिक पातळीवरचं जीवन, ग्रामिण शेतकरी जीवन अशा टप्याटप्यातून शेवटी नागरी संस्कृती विकसित झाली. आधुनिक युरोपीन संस्कृती ही या विकासक्रमाचा उत्कर्षबिंदू आहे या दृष्टीकोनाला त्यांनी आव्हान दिले. त्यांनी त्यावर एक सविस्तर निबंधच लिहीला. विकासक्रमानुसार किंवा ऐतिहासिक कालक्रमानुसार केलेली संस्कृतींची उतरंड त्यांना मान्य नव्हती. त्यांच्या मते सर्व संस्कृती या एकाच वेळी समान पायावर अस्तित्वात असतात. त्यात विकसित अथवा मागासलेली संस्कृती असं काही नसतं. म्युझियमसाठी कलावस्तूंची निवड निव्वळ ऐतिहासिक किंवा सांस्कृतीक निकषांवर करता कामा नये. कारण तशी निवड करण्याचा नैतिक आणि बौद्धिक अधिकार आपल्याला नाही. त्यासाठी समकालीन कलेला आणि जगण्यालाही तेवढेच महत्वाचे स्थान दिले पाहिजे. ह्या संकल्पना नव्या नसल्या तरी संस्थात्मक पातळीवर यापूर्वी कोणीही प्रत्यक्षात उतरवल्या नव्हत्या. भारत भवन ही पहिलीच संस्था अशी आहे की तिची उभारणी या संकल्पनेनुसार झाली आणि त्यासाठी स्वामी यांचे योगदान फार महत्वाचे ठरते. एकोणीसाव्या शतकापर्यंत आपल्या देशात संगीत, नाट्य, काव्य आणि दृष्यकलांची वाटचाल हातात घालून होत होती. कला म्हणून प्रत्येक कला स्वतंत्र असली तरी त्यांचा पाया एकच होता. त्यांचे स्रोत, चिन्हव्यवस्था, प्रतिमासृष्टी, प्रतिकं, प्रतिमानं, अभिव्यक्ति समान होती. त्यानंतर त्यांच्यातील एकात्मभाव दुरावला. दृश्यकला आणि साहित्य यांची वाटचाल एका दिशेने झाली तर संगीत आणि नृत्य यांची दुस-या दिशेने. स्वामी यांच्या अधिरत्याखाली भारत भवन आणि म्युझियम ऑफ मॅन मध्ये या सर्व कलांना पुन्हा एका छत्राखाली आणण्याचा उपक्रम हाती घेतला गेला.


स्वप्निल डोळे, मानेवर रुळणारे लांब केस, दाढी, लुंगी, खादीचा झब्बा, खांद्यावर पांघरलेली शाल या अवतारात स्वामी एखाद्या झपाटलेल्या अवलियासारखे दिसत. त्यांच्या घरात, स्टुडियोत अवतीभोवती कलंदर कलाकाराला साजेलसा अस्ताव्यस्तपणा असायचा. पण ते मनाने अंतर्बाह्य स्वच्छ आणि पारदर्शक होते. त्यांच्या विचारात स्पष्टता होती. आपल्याला काय करायचं आहे हे त्यांना पक्कं ठाऊक होतं. एवढ्या कार्यबाहुल्यातूनही त्यांची सृजनशीलता शेवट पर्यंत त्यांच्या सोबत होती. आपल्या चित्रातील रंग रेषांची मांडणी, आराखडा आणि तात्विक भूमिका यांच्यातील परस्पर संबंधांची आणि परीमाणांची त्यांना जाणीव होती. जे विचार ते त्यांच्या कार्यातून मांडत तेच त्यांच्या कलाकृतीतून प्रतिबिंबीत होत. त्यांनी चित्र रंगवणे सोडून इतर काहीही केलं नसतं तरीही त्याक्षेत्रात ते उद्-गातेच ठरले असते. काँट्राच्या एका अंकात आकृतीबंध, समकालीकता आणि मी या कवितेत स्वामींनी म्हटलंच आहे ...
इतिहासाच्या हमरस्त्यावर ते दबा घरून उभे आहेत दिपवून टाकण्यासाठी
पण मी मुळीच चकाचौंध होत नाही
कारण भूतकाळातील ज्ञानाच्या अपराधगंडाने मी पछाडलेलो नाही
माझा काळ माझ्यासमोर उलगडतो, माझ्याबरोबर वाहतो, माझ्या सहस्त्रकात
चित्रकल्पनेचे रेखाटन करताना जेथे योगायोग हाच नियम होतो.
विकासच नसतो कारण तशी परंपरांच नसते.
जेथे पहिला मानव उभा होता तेथेच मी सुद्धा आज उभा आहे.
एकटाच, समोर उभ्या ठाकलेल्या माझ्या युगातील आव्हानाने भयकंपीत.