Sunday, September 30, 2018

मुलँ रूज - १६


२१ रू कुलॅनकुर ही एक चार मजली जुनी इमारत होती. प्रथमदर्शनी हिरव्या काचांच्या खिडक्या व तिचे ऐसपैस लोखंडी सज्जे नजरेत भरत. इमारतीच्या मूळ आराखड्यात सर्व सुखसोयींची नीट योजना केलेली होती. तिच्या मालकाने सभ्य व इज्जतदार लोकांना राहायला चांगले घर मिळावे हा उच्च उद्देश ठेवून ती इमारत बांधायला घेतली होती. फ्रँको-प्रुशियन युद्ध संपता संपता ती तयार झाली. सुरुवातीला मोंमार्त्रची शुद्ध हवा, शांत वातावरण पसंत पडल्याने काही मध्यमवर्गीय कुटुंबे राहायला आली. पण मोंमार्त्रचे दिवसभरचे शांत वातावरण संध्याकाळ झाली रे झाली की पार बदलून जाई. रस्त्यावरची वर्दळ वाढू लागे. शहरातल्या दिवसभराच्या कामाने दमलेल्या पुरुषांना रस्त्यावरच्या गर्दीतून वाट काढणे कठीण जाई. वाटेत एखादी बाई हळूच धक्का मारी. कधी कधी सरळ हात पकडून बाजूला खेचे. घरी बायकोकडून काय मिळेल असे सुख देण्याची तयारी ती बेधडकपणे त्याच्या डोळ्याला डोळा भिडवून दर्शवी. हे सांगताना तिच्या उरोजांचा ओझरता स्पर्श होत असे. काही सभ्य गृहस्थ तरीही आपापल्या घरी सरळ परत जात. पण सगळ्यांनाच तसे सभ्य राहणे जमत नसे. मग घरी भांडणे होत. हळूहळू अशी कुटुंबे एक एक करून सोडून जाऊ लागली. मग घरमालकाला आपल्या भाडेकरूंना काही सवलती द्याव्या लागल्या. उदाहरणार्थ, नैतिक आचरणविषयक असलेल्या कडक अटी थोड्या शिथिल झाल्या. एक एक करून सर्व अटी कमी होत गेल्या. शेवटी फक्त भाडे भरले पाहिजे, याशिवाय दुसरी कोणतीही अट शिल्लक राहिली नाही. एके दिवशी चक्क एक वेश्या भाडेकरू म्हणून राहायला आली तेव्हा लॉजची व्यवस्थापक मादाम ल्युबेतला खूप वाईट वाटले. पण करता काय! भाडे वेळेवर मिळत असल्याने तिला तक्रारीला दुसरी जागा नव्हती.
तिच्यापाठोपाठ एक चित्रकार राहायला आला. चौथ्या मजल्यावर. उंचापुरा आडमाप देहाचा. त्याच्याकडे बघून भीतीच वाटायची. त्याने आल्या आल्या दोन खोल्यांमधील पार्टिशन पाडून टाकले आणि सगळा कचऱ्याचा ढीग जिन्यात लोटून दिला. रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांच्या डोक्यावर रॅबिटचा वर्षाव होऊ लागला. लोक वर बघून शिव्या देऊ लागले तर हा खिडकीतून त्यांच्यावर थुंकला. काय प्रकार आहे म्हणून बघायला मादाम ल्युबेत वर आली. दरवाजा बंद होता व आतून तोडफोडीचे आवाज येत होते. बराच वेळ दरवाजा ठोकल्यावर तिला चित्रकार महाशयांचे दर्शन झाले. संपूर्ण नग्न, घामाने भिजलेला, हातात हातोडा व दाढीत प्लास्टरची धूळ. रस्त्याकडच्या भिंतीला एक मोठे भगदाड पाडून झाले होते. आता पेंटिंग करायला हरकत नाही. झकास स्टुडिओ तयार झालाय. काय अंधार होता पहिल्यांदा.हवा खेळती राहावी म्हणून त्याने जेव्हा करवतीने दरवाजा कापायला घेतला तेव्हा मात्र पोलिसांना बोलावून जबरदस्तीने त्याला जागा खाली करायला भाग पाडावे लागले.
त्यानंतर आलेले भाडोत्री त्यामानाने सौम्य होते पण त्यांनी आपापल्या परीने लवकरच त्या इमारतीला अवकळा आणली. भिंतीवरचा रंग उडाला, छताच्या ढलप्या पडल्या, कॅारिडॉरमधून झुरळे फिरताना दिसू लागली. पण मादाम ल्युबेत आता त्याच्याकडे दुर्लक्ष करायला शिकली होती. फक्त आपल्यापुरते पहायचे व आला दिवस ढकलायचा. वर्तमानपत्र वाचत, खिडकीतल्या जेरेनियमच्या वेलाची काळजी घेत, मांडीतल्या मांजराला कुरवाळत वेळ कसाबसा निघून जायचा.
१८८५ च्या ऑक्टोबर मधली ती एक सकाळ होती. त्या दिवशी नेहमीप्रमाणे वर्तमानपत्र वगैरे वाचून झाल्यावर ती उगाचच खिडकीतून बाहेर बघत बसली होती. नुकताच पाऊस रिपरिपून गेला होता. वातावरणात एक प्रकारची मरगळ भरून राहिली होती. तेवढ्यात एक घोडागाडी लॉजसमोर येऊन उभी राहिली. त्यातून काळीभोर दाढी राखलेला एक बुटबैंगण तरुण उतरताना तिला दिसला. डर्बी हॅट, ओव्हरकोट अशा झकपक पोशाखातल्या तरुणाची बेढब शरीरयष्टी पाहून तिला आश्चर्याचा धक्का बसला. पण तो लॉजच्या दिशेने येतोय हे दिसताच ती सावरून लगबगीने पुढे झाली.
बाहेर फळ्यावर जे लिहिलंय ते स्टुडिओ अपार्टमेंट मला दाखवता का?” आपली हॅट काढीत त्या तरुणाने मोठ्या अदबीने विचारले.
दाखवते ना,” त्याच्या खुरट्या पायांकडे बघत ती म्हणाली, “पण जागा आहे चौथ्या मजल्यावर आणि या पायऱ्या तशा खूप उंच आहेत.
दिसतायत खऱ्या पायऱ्या उंच. चला बघूया मला कितपत जमतंय ते.एका हाताने जिन्याचा कठडा धरून दुसऱ्या हाताने काठीचा आधार घेत त्याने मोठ्या कष्टाने जिना चढायला सुरुवात केली. चौथ्या मजल्यावर पोहचेपर्यंत त्याला जोराची धाप लागली.
अगदी आल्प्स पर्वत चढल्यासारखं वाटतंय.तो हसून म्हणाला.
त्याचे हास्य एखाद्या लहान मुलासारखे निर्मळ होते. पांढरीशुभ्र दंतपंक्ती आणि गडद तपकिरी डोळे यांमुळे त्याचा चेहरा थोडा बालिश वाटत होता. बुटक्या व बेढब शरीरयष्टीमुळे दुरून तिला तो सर्कशीतल्या एखाद्या विदूषकासारखा वाटला. पण जवळ आल्यावर तिला तो आवडू लागला.
मस्य. तुम्ही आर्टिस्ट वगैरे आहात की काय.तिने संशयाने विचारले.
छे छे ! मी अजून विद्यार्थीच आहे. तिसरं वर्ष चालू आहे. कॉर्मेनच्या ॲतलिएमध्ये. या वर्षी आम्हाला सॅलूनसाठी एक पेंटिंग करायचंय. त्याकरता जागा बघतोय.
चित्रकारांच्या वाऱ्यालासुद्धा उभे राहायचे नाही असा निश्चय तिने केला होता. पण हेन्रीचा एकूण सभ्यपणा व कोवळे वय पाहता हा काही आपल्याला फारसा त्रास देणार नाही असे तिला वाटले. तिने चावीने दरवाजा उघडला.
ओह! काय छान स्टुडिओ होईल येथे.
प्रशस्त जागा, उंच छत, मध्यभागी गॅसचा स्टोव्ह, मोठी खिडकी वगैरे गोष्टी पाहून त्याला आनंद झाला. खिडकीतून बाहेर दिसणारे दृश्य मोठे विलोभनीय होते. जिकडे पाहावे तिकडे घरांची वेगवेगळ्या आकारांची छपरे, त्याच्यातून डोकावणाऱ्या चिमण्या आणि वर मोकळे आकाश. हेन्री खिडकीजवळ गेला व त्या दृश्याकडे लांबवर नजर लावून बघू लागला.
आकाश स्वच्छ असेल तर येथून नोत्र दॅमचा घुमट दिसतो.
त्या अपार्टमेंटमध्ये वर एक शयनगृह व बाथटबची सोय असलेले स्नानगृह होते. त्याने ताबडतोब जागा आवडल्याचे सांगून वर्षाला चारशेवीस फ्रँकचे भाडे कोणतीही घासाघीस न करता तात्काळ कबूल केले. एवढेच नव्हे तर वर आगाऊ भाडे देण्याची तयारी दाखवली.
तुमचं नाव काय?” मादाम ल्युबेतने विचारले, “येथे नोंद करायचीय.
हेन्री द तुलूझ.
तुलूझ हे काय नाव झालं. गावाचं नाव नको. खरं नाव सांगा.
मी खरं तेच सांगतोय.
चेष्टा करू नका. तुलूझ हे नाव कधी ऐकलं नाही. ते गावाचं नाव आहे.
माझं नावच तसं आहे त्याला मी तरी काय करणार. तरी मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय. संपूर्ण नाव पाहिजे ना. मग घ्या लिहून. हेन्री मारी रेमंड द तुलूझ लोत्रेक मोंफा. जन्म आल्बी. नोव्हेंबर चोवीस, अठराशे चौसष्ट.
संध्याकाळी लॉजसमोर एक राजेशाही थाटाची घोडागाडी येऊन उभी राहिलेली पाहून मादाम ल्युबेत अगदी चकित झाली. त्यातून फिकटलेल्या चेहऱ्याची पण खानदानी व्यक्तिमत्वाची एक स्त्री उतरली. त्या स्त्रीने तिच्याकडे चौकशी केली.
माझ्या मुलाने तुमच्या येथे जागा भाड्याने घेतल्याचं मला सांगितलंय.
तो बुटका...तिने चटकन जीभ चावली.
होय.एक सुस्कारा सोडून ती म्हणाली. मग तिने मादाम ल्युबेतला हेन्रीच्या विचित्र आजारपणाची हकिगत सांगितली. मादाम ल्युबेतचे डोळे पाणावले.
तुम्ही काही काळजी करू नका. मी त्यांची माझ्या मुलासारखी काळजी घेईन.तिने आश्वासन दिले.
जाता जाता तिने हेन्रीच्या आईला मधेच थांबवून विचारले.
हेन्रीचं खरं नाव काय? त्यांनी तुलूझ म्हणून सांगितलंय. मस्करीत तर सांगितलं नाही ना.
मस्करी नाही. खरंच त्यांचं नाव तुलूझ आहे. त्यांच्या वडलांचं नाव कॉम्ते अल्फान्सो द तुलूझ लोत्रेक.
अग बाई. म्हणजे ते काउंट आहेत म्हणायचं की.
होय. पण काउंट ही उपाधी लावायला त्यांना आवडत नाही. म्हणून ते फक्त तुलूझ एवढेच लावतात.
(फोटो - हेन्री तुलूझ लोत्रेक)




No comments:

Post a Comment