Sunday, January 21, 2018

मून अँड सिक्सपेन्स - ९

“हे मात्र फारच भयंकर झालं.” आम्ही बाहेर पडून रस्त्यावर येताच कर्नल मॅक-अँड्रयु म्हणाला.
मेव्हणी बरोबर त्याची जी चर्चा चालू होती तीच चर्चा पुढे चालू ठेवण्यासाठी तो माझ्या बरोबर बाहेर आला होता हे माझ्या लक्षात आलं.
“ती बया कोण हे आपल्याला अजूनही ठाऊक नाही. या घटकेला तो हलकट इसम पॅरीसला पळून गेला आहे एवढीच माहिती आपल्या हाताशी आहे.”
“मला वाटत होतं ऍमी आणि चार्ल्सचं चांगलं चाललं असावं.”
“चांगलंच चाललं होतं. तुम्ही येण्यापूर्वी ऍमी म्हणाली की इतक्या वर्षांच्या संसारात त्यांचं नवराबायकोमध्ये होतात तसं एखादं साधं भांडणही कधी झालं नव्हतं. तिला तुम्ही ओळखताच. तिच्या एवढी चांगली बायको कोणाला शोधूनही मिळणार नाही.”
त्याने माझ्यावर टाकलेल्या विश्वासामुळे एखादा दुसरा अधिक प्रश्न विचारायला हरकत नसावी असं मला वाटलं.
“तिला कसलाही संशय आला नव्हता असं तुम्हाला म्हणायचंय का?”
“जरासुद्धा संशय आला नव्हता. गेल्या ऑगस्टमध्येच तो तिला आणि मुलांना नॉरफोकला घेऊन गेला होता. त्यावेळी मी सुद्धा माझ्या पत्नी बरोबर तेथेच होतो. तो अगदी नेहमीसारखा वागत होता. आम्ही गोल्फ खेळायलासुद्धा बरोबर गेलो होतो. त्याच्या ऑफिसमधल्या एका भागीदाराला सुट्टी घ्यायची होती म्हणून तो सप्टेंबरमध्ये थोडा लवकर लंडनला परत गेला. त्यांनी भाड्याने घेतलेल्या घराची मुदत तोपर्यंत संपली नव्हती म्हणून ऍमी तेथेच राहिली. भाड्याची मुदत संपता संपता तिने लंडनमध्ये परत येण्याचा दिवस त्याला पत्र लिहून कळवला. त्या पत्राचं उत्तर पॅरीसवरून आलं. त्यात त्याने लिहीलं होतं की यापुढे त्याला तिच्या बरोबर रहाण्यात रस नाही.”
“त्याचं त्याने काय कारण दिलं होतं.”
“महाशय, त्याने काहीही कारण दिलं नव्हतं. मी स्वत: ते पत्र पाहिलं आहे. त्यात फक्त दहा ओळीच आहेत.”
“हे मात्र अगदी विलक्षण आहे.”
आम्हाला रस्ता ओलांडायचा होता. रहदारीमुळे जास्त बोलता येईना. कर्नल जे सांगत होता ते मला असंभव वाटत होतं. मला वाटलं मिसेस स्ट्रिकलँड त्याच्यापासून काहीतरी लपवत असावी. तिने असं करण्यामागे काही तरी कारण असण्याची शक्यता होती. सतरा वर्षांच्या संसारानंतर कोण पत्नीला सोडून जात असेल तर काही ना काही तरी कारण असलंच पाहिजे आणि इतक्या वर्षात पत्नीला कुठे तरी बिनसतंय याची जाणीवही व्हायला पाहिजे. तेवढ्यात रहदारीत मागे पडलेल्या कर्नलने मला गाठलं.
“आपण एका बाईच्या नादाला लागून तिच्या बरोबर पळून गेलो या शिवाय दुसरा कोणता खुलासा त्याच्याकडे आहे. त्याला वाटलं असेल बाकी सगळे तपशील ऍमी शोधून काढेलच, आपल्या तोंडाने स्पष्टपणे कशाला सांगा. तो माणूस म्हणून काय लायकीचा आहे ते यावरून कळतं.”
“मिसेस स्ट्रिकलँडनी काय करायंच ठरवलं आहे.”
“पहिल्या प्रथम आम्ही पुरावे गोळा करणार आहोत. त्यासाठी मी स्वत: पॅरीसला जातोय.”
“चार्ल्सच्या व्यवसायाचं काय?”
“आपल्या संसाराची नसली तरी स्वत:च्या व्यवसायाची मात्र त्याने अगदी पद्धतशीर काळजी घेतली आहे. गेल्या वर्षापासून त्याने आपल्या धंद्यातील व्यवहार आटोपते घ्यायला सुरवात केली होती.”
“आपण व्यवसाय सोडून जात आहोत हे त्याने त्यांच्या भागीदारांना सांगितलं होतं का?”
“एका शब्दानेही नाही.” कर्नल मॅक-अँड्रयुला आर्थिक व्यवसाय कसे चालतात याची फारशी माहिती नव्हती आणि मला तर ती मुळीच नव्हती. त्यामुळे स्ट्रिकलँड आपला चालू व्यवसाय सोडून असा अचानक कसा काय गेला असेल हे माझ्या आकलना पलीकडचं होतं. मला खूप नंतर कळलं की त्याच्या अशा अचानक जाण्याने त्याचा भागिदार खूप संतापला आणि त्याने स्ट्रिकलँडवर खटला भरण्याची धमकी दिली. ते सगळं प्रकरण मिटवायला त्याला कमीत कमी चारशे ते पाचशे पौंड लागणार होते.
“नशीबाने फ्लॅमधील फर्नीचर ऍमीच्या नावावर आहे. ते तिला कोणत्याही परीस्थित मिळेलच.”
“तिच्याकडे एक छदामही नाही हे तुम्ही म्हणाला होता ते खरं आहे का?”
“खरंच आहे. हे फर्नीचर सोडलं तर तिच्याकडे फारतर दोन-तीनशे पौंड निघतील. त्या व्यतिरिक्त अक्षरश: काहीही नाही.”
“यावर किती दिवस निभावतील?”
“देवालाच तिची काळजी.”
या प्रकरणातील गुंतागुंत वाढत चालली होती आणि कर्नल रागाच्या भरात शिव्याशाप देऊन जे बोलत होते त्याने माझ्या ज्ञानात भर पडण्या ऐवजी गोंधळातच भर पडत होती. आर्मी अँड नेव्ही स्टोर्सचे घड्याळ दिसताच क्लबमध्ये पत्ते खेळायला जायची वेळ झाली हे त्याच्या लक्षात आलं. त्याने मला सोडलं आणि तो सेंट जेम्स पार्कच्या रस्त्याने निघून गेला. माझी सुटका झाल्याने माझा जीव भांड्यात पडला.

Saturday, January 20, 2018

मून अँड सिक्सपेन्स - ८

मी स्ट्रिकलँड दाम्पत्याविषयी आतापर्यंत जे लिहीलं आहे ते वाचून ते प्रत्यक्षात कसे होते याची नीट कल्पना येणार नाही याची मला जाणीव आहे. कादंबरीतील पात्रं विश्वसनीय वाटण्यासाठी त्यांना सहसा ज्या लकबी चिकटवल्या जातात तसं मी काहीही मी केलेलं नाही. यात जर काही दोष असलाच तर तो माझा आहे. ती पात्रं जिवंत वाटण्यासाठी त्यांची काही स्वभाववैशिष्ट्य दाखवता येतील का हे आठवण्यासाठी मी मेंदूला बराच ताण दिला. मला वाटलं वागण्या-बोलण्यातील एखादा ढंग किंवा खोड, तर्हेवाईक स्वभाव त्यांना बहाल केला तर त्यांचं चित्रण वैशिष्ट्यपूर्ण होऊ शकेल. सद्यस्थितीत ते दांपत्य चित्रपटाच्या पडद्यावरील दृष्यासारखं सपाट वाटत होतं. जरा दुरून पाहिलं तर आकार पाठीमागच्या दृष्यात मिसळून गेलेले असतात आणि उरलेली असते फक्त रंगांची आकारहीन मनोवेधक उधळण. माझ्या मन:पटलावर त्यांचं उमटलेलं चित्रच मुळी असं होतं. कदाचित त्यामुळेच मी शब्दात पकडलेलं त्यांचं चित्रणसुद्धा तसच अंधूक अस्पष्ट उतरलं असावं. ज्यांचं आयुष्य विशाल जनप्रवाहात मिसळून गेललं असतं अशी असंख्य माणसं आपल्या आसपास असतात, शरीरातील मांसपेशी सारखी, जोपर्यंत त्या निरोगी असतात तोपर्यंत आपण त्यांच्या अस्तित्वाची दखल घेत नाही. स्ट्रिकलँड दांपत्याचं आयुष्य हे एका मध्यमवर्गीय सुखी कुटुंबासारखं होतं. एक मध्यमवयीन सुंदर गृहीणी, छोट्या मोठ्या लेखकांना अधून मधून बोलावून मेजवान्या देण्याची निरूपद्रवी हौस असलेली. तिचा पती एक सद्गृहस्थ, तिच्या हौसेला प्रतिसाद न देणारा अरसिक, पण नियतीने त्याच्यावर सोपवलेली भूमिका इमानेइतबारे वठवणारा. दोन छानशी गोंडस मुलं. सामान्य माणूस म्हणतात तो यापेक्षा अधिक वेगळा नसतो. लक्ष वेधावं असं काहीही या दांपत्याकडे मला त्यावेळी आढळलं नव्हतं.
आज मागे वळून पहाताना मला असं वाटतं की त्यावेळी मी खूपच मठ्ठ असलो पाहिजे. नाहीतर चार्ल्स स्ट्रिकलँड पुढे जाऊन एक असामान्य कलाकार होणार आहे याची एक तरी खूण मला त्या वेळी आढळली असती. इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर मला मनुष्यस्वभावाची चांगली ओळख झाली आहे. पण स्ट्रिकलँड आजही मला भेटला असता तरीही त्याच्यातील सुप्तावस्थेतील असामान्यत्व ओळखण्यात मी किती यशस्वी झालो असतो याची शंकाच आहे. मानवी जीवन कशी वळणे घेईल याचा थांगपत्ता लागणं कठीण असतं हे आता मला चांगलंच उमगलं आहे. त्यामुले शरद ऋतुच्या सुरूवातीला लंडनमध्ये पाऊल टाकताच माझ्या कानावर जे आलं त्याचं मला फार आश्चर्य वाटलं नाही.
मी लंडनमध्ये आलो त्याच दिवशी जेर्मीन स्ट्रीटवर माझी रोज वॉटरफोर्डशी गाठ पडली.
“तुम्ही एकदम मजेत दिसताय. काय विशेष?”
ती हसली. तिचे डोळे चमकले. तिला कोणाची तरी भानगड समजली असावी आणि ती मला सांगण्यासाठी ती अगदी अधीर झाली असावी हे मी माझ्या अनुभवावरून ओळखलं.
“तुम्हाला चार्ल्स स्ट्रिकलँडला भेटला होता ना?”
तिचा उत्साह उतू जात होता हे तिच्या चेहेर्यावरूनच नव्हे तर तिच्या देहबोली सांगत होती. मी मान डोलावली. मला वाटलं त्या बिचार्याचं शेअर बाजारात दिवाळं वाजलं असावं किंवा त्याला रस्त्यावरून चालताना ओम्नीबसने उडवलं असावं.
“तो बायकोला टाकून पळाला. किती भयंकर आहे ना.”
या विषयाला जर्मेन स्ट्रीटच्या नाक्यावर उभं राहून अधिक न्याय देता येणार नाही म्हणून तिने एखाद्या कसलेल्या नाटककाराप्रमाणे मला थोडीशी माहिती दिली आणि मला यापेक्षा अधिक काही ठाऊक नाही असं जाहीर केलं. ही हसण्यावर नेण्याएवढी क्षुल्लक गोष्ट नसल्यामुळे मी तिच्याकडून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. पण मला जास्त काही ठाऊक नाही यावर ती ठाम होती.
“मला खरंच काही ठाऊक नाही.” मी वैतागून विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ती म्हणाली. “मला वाटतं शहरातल्या एका टी शॉपमध्ये काम करणारी मुलगीसुद्धा बेपत्ता झाली आहे.”
तिने माझ्याकडे बघून एक अर्थपूर्ण कटाक्ष टाकला आणि मला डेंटीस्टकडे जायचं असल्याचं कारण सांगून तिने हसत हसत काढता पाय घेतला. मला वाईट वाटलं होतं, पण त्यापेक्षाही माझं कुतुहल जास्त चाळवलं गेलं होतं. त्याकाळी माझ्या गाठीला आयुष्याचा प्रत्यक्ष अनुभव फार कमी होता. एखाद्या कादंबरीत घडावी अशी घटना माझ्या परीचयातील व्यक्तिंबाबत घडली की सुरवातीला माझा उत्साह उतू जाई. नंतर अशा अनेक घटना घडत गेल्या आणि मला त्याची सवय झाली. पण तरीही त्यावेळी मला त्याचा धक्का बसला होता. स्ट्रिकलँड त्याच्या वयाच्या चाळीशीत होता आणि या वयाच्या माणसाने प्रेमात पडून असं वहावत जाणं घृणास्पद होतं. एखाद्या पुरूषाला प्रेमात पडायचं असेल तर वयाच्या पस्तीस वर्षांपर्यंत हरकत नसते अशी वयोमर्यादा त्याकाळी मी माझ्या तारूण्यातील उथळपणामुळे घालून घेतली होती. या बातमीमुळे मी अस्वस्थ का झालो याला दुसरं एक कारण होतं. मिसेस स्ट्रिकलँडला मी पत्र लिहून लंडनला माझा परत येण्याचा दिवस कळवला होता आणि वर लिहीलं होतं की तुमची हरकत नसेल तर एके दिवशी संध्याकाळच्या चहाला मी तुमच्या घरी येणार आहे. तो दिवस आजच होता. तिच्याकडून अजून काहीच निरोप आला नव्हता. मी तिला यायला हवा होतो की नाही? या अस्वस्थ मनस्थितीत माझ्या पत्राचा तिला विसर पडलेला असण्याचीही शक्यता होती. मी न जावं हेच शहाणपणाचे ठरण्याची शक्यता होती. दुसरीही एक शक्यता होती. तिला हे प्रकरण शक्य तो कोणाला कळू द्यायचं नसावं. मी न गेल्याने ही बातमी माझ्या कानावर आली आहे हे आपोआप जाहीर झालं असतं. तसं असेल तर माझं न जाणं बरोबर दिसलं नसतं. मी पेचात पडलो. तिचं दु:ख हलकं करण्यासाठी मी काहीही करू शकत नसताना उगाच तेथे जाऊन तिच्या दु:खात मला भर घालायची नव्हती. तिच्या दु:खाला ती कसं तोंड देत आहे ते आपण जाऊन बघावं असं तेव्हा मला आतून वाटत होतं याची आता मला लाज वाटते. त्यावेळी मात्र आपण नक्की काय करावं हे मला कळेनासं झालं होतं.
शेवटी मी विचार केला की काहीच घडलं नाही असं भासवून आपण ठरल्याप्रमाणे जावं आणि नोकराणीकडून आपण आल्याचा निरोप पाठवल्यावर काय होतंय याची वाट बघावी. असं केल्याने मी यायला नको असेन तर मला परत पाठवण्याची तिला संधी मिळाली असती. पण प्रत्यक्षात मी मनात योजलेला निरोप नोकराणीला सांगताना मला प्रचंड अवघडल्यासारखं झालं होतं. पॅसेजमधल्या अंधारात उभं राहून वाट पहाताना हा दरवाजा कधीच उघडू नये असं मला राहून राहून वाटत होतं. नोकराणी परत आली. मालकिणीवर कोसळलेल्या कौटुंबीक संकटाची तिला पूर्ण जाणीव असावी असं तिच्या देहबोलीतून जाणवत होतं. 
“आत या साहेब.”
मी तिच्या पाठोपाठ बैठकीच्या खोलीत गेलो. ब्लाईंड्स खाली ओढून घेतल्याने खोलीत अर्धवट प्रकाश पडला होता. मिसेस स्ट्रिकलँड प्रकाशाकडे पाठ करून बसली होती. तिचा मेहूणा, कर्नल मॅक अँड्रयू फायर प्लेसकडे पाठ करून उभा होता. मला आत जाताना प्रचंड अवघडलो होतो. मला वाटलं होतं की माझ्या येण्याचं त्यांना आश्चर्य वाटेल. किंवा मिसेस स्ट्रिकलँडनी मला चुकून आत घेतलं असावं. कर्नलना तर मी आल्याची चीडच आली असावी.
“मी येईन असं तुम्हाला वाटत होतं की ते कळत नव्हतं.” मला काही कळलं आहे हे न दाखवता मी म्हटलं.
“अर्थात तुम्ही याल अशी खात्री होती. ऍन थोड्या वेळात चहा आणेल.”
मिसेस स्ट्रिकलँडचे डोळे रडून सुजले असावेत हे त्या अंधारातसुद्धा कळत होतं. तिचे गाल तर लाल झालेले अंधूक प्रकाशातही दिसत होते.
“हे माझे मेव्हणे, तुम्ही ओळखता यांना. सुट्टी लागायच्या आधी एका डिनरला तुम्ही आला होता तेव्हा यांच्याशी ओळख करून दिली होती.”
आम्ही हस्तांदोलन केलं. काय बोलावं हे न सुचल्यामुळे मी ओशाळून गेलो होतो. पण त्या परीस्थितीतून मिसेस स्ट्रिकलँडनेच माझी सुटका केली. मी उन्हाळ्याच्या सुटीत काय केलं याची तिने चौकशी केली. म्हणून चहा येईपर्यंत मला कशीतरी वेळ मारून नेता आली. कर्नलनी स्वत:साठी व्हिस्की आणि सोडा घेतला.
“ऍमी. तू सुद्धा थोडी व्हिस्की घेऊन बघ.”
“नको. मी चहाच घेईन.”
काही तरी विपरीत घडलं असावं याची ही पहिली खूण होती.
काहीच दखल न घेता मी मिसेस स्ट्रिकलँडला संभाषणात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला. फायरप्लेसच्या जवळ उभ्या असलेल्या कर्नलच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडला नव्हता. तेथून सभ्यपणे शक्य तितक्या लवकर कसे सटकता येईल याचा मी विचार करत होतो. मिसेस स्ट्रिकलँडने मुळात मला घरात येऊ का दिलं तेच मला कळत नव्हतं. नेहमीच्या जागी फुलं ठेवलेली दिसत नव्हती. सुट्टीत बाहेरगावी जाताना आवराआवर करून ठेवलेल्या वस्तू अजून त्यांच्या नेहमीच्या जागेवर ठेवलेल्या दिसत नव्हत्या. जी बैठकीची खोली एरवी अगदी हवेशीर वाटायची ती आज कोंदट वाटत होती. काहीतरी बिघडलं होतं खास. कोणीतरी गेलेलं असावं आणि मृतदेह बाजूच्या खोलीत ठेवला असावा असं वाटत होतं. मी चहा संपवला.
“तुम्हाला सिगरेट हवी आहे का?”
तिने इकडे तिकडे पाहिलं पण सिगरेटचं पाकिट काही मिळालं नाही.
“मला वाटतं संपल्या असाव्यात.”
तिला अचानक रडू कोसळलं आणि ती बैठकीच्या खोलीतून निघून गेली.
मी गोंधळून गेलो. सिगरेट संपल्या की आणून ठेवण्याचं काम नेहमी तिचा नवरा करत असावा. मला वाटलं सिगरेट शोधताना त्याची आठवण झाली आणि तिला दु:खाचा उमाळा आला असावा. या पुढे तिला अशा छोट्या छोट्या गैरसोईंच्या सामना एकट्याने करायचा होता. जुना आयुष्यक्रम आता संपला होता. रीती रिवाजांचं ढोंग पुढे चालू ठेवणं आता कठीण होतं.
“मला वाटतं मी आता जावं हे बरं.” मी उठून कर्नलना विचारलं.
“तो हलकट हिला सोडून गेला हे तुम्हाला कळलं असेलच.” तो जवळपास किंचाळत म्हणाला.
मी जायचा थांबलो.
“लोक कश्या वावड्या उठवतात तुम्हाला कल्पना असेलच. कुठेतरी पाणी मुरत होतं एवढंच माझ्या कानावर आलं होतं.”
“त्याने आम्हाला मोठा धक्का दिला. तो एका बाई बरोबर पॅरीसला पळून गेलाय. बरं जाताना त्याने आपल्या कुटुंबासाठी एक पेनीसुद्धा मागे ठेवली नाही.”
“मला खरंच वाईट वाटतंय.” आणखी काय बोलावं ते मला सुचलं नाही.
कर्नलने व्हिस्कीचा एक मोठा घोट घेतला. कर्नल अक्कडबाज मिशी राखलेला, करड्या केसांचा, पन्नाशीचा, उंच आणि सडपातळ बांध्याचा इसम होता. त्याची जिवणी पातळ होती आणि डोळे निळसर होते. मागच्या भेटीतील काही गोष्टी मला आठवत होत्या. चेहेर्यावरून तो अगदी बथ्थड असावा असं वाटत होतं. सैन्यातील नोकरी सोडून त्याला दहा वर्षं झाली होती. सैन्यात असताना आठवड्यातून तीन दिवस तो पोलो खेळायचा हे तो मोठ्या प्रौढीने सांगत असे.
“मिसेस स्ट्रिकलँडना या क्षणी त्रास द्यावा असं मला वाटत नाही. मला किती वाईट वाटतंय ते त्यांना कळवा. त्यांना कसली गरज लागली तर मला तसं कळवा. मला मदत करायला आवडेल.”
कर्नलचं माझ्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हतं.
“तिचं काय होणार आहे मला कळत नाही. त्यात तिला दोन मुलं आहेत. ती काय हवा खाऊन जगणार आहेत. सतरा वर्ष.”
“सतरा वर्षांच काय?”
“त्यांच्या लग्नाला सतरा वर्ष झाली आहेत. मला तो कधीच आवडायचा नाही. अर्थात तो माझा मेव्हणा होता हे खरं आहे. आमचं नातं सांभाळायचा मी माझ्या परीने चांगला प्रयत्न करत होतो. तुम्हाला चार्ल्स सभ्य माणूस वाटायचा का? मला विचाराल तर तिने त्याच्याशी लग्नच केलं नसतं तर फार बरं झालं असतं.”
“त्यांचा निर्णय अगदी पक्का आहे का?”
“यापुढे तिला करता येण्यासारखी एकच गोष्ट आहे. ते म्हणजे त्याला घटस्फोट देणं. तुम्ही जेव्हा आलात तेव्हा मी तिला तेच सांगत होतो. ऍमी घटस्फोटाची नोटीस पाठव. तुला स्वत:च्या आणि मुलांच्या हितासाठी हे केलंच पाहिजे. तो माझ्या समोर आला तर त्याला जन्माची अद्दल घडेल असा बदडून काढीन.”
कर्नल मॅक-अँड्रयूला तसं करणं खूप जड गेलं असतं. कारण स्ट्रिकलँड त्याच्यापेक्षा चांगलाच तगडा होता असा विचार माझ्या मनात आल्यावाचून राहिला नाही. पण मी गप्प राहिलो. शिक्षा करण्याचं सामर्थ्य नसेल तर केवळ नैतिक भूमिकेवरून आलेला क्रोध हास्यास्पद ठरण्याची शक्यता असते. मी तेथून सटकण्याची आणखी एकदा विचार करत असतानाच मिसेस स्ट्रिकलँड आली. तिने तिचे डोळे पुसले होते आणि चेहेर्याला थोडी पावडर लावली होती.
“मला रहावलं नाही. माफ करा. तुम्ही तेवढ्यात गेला नाहीत ते एक बरं केलंत.”
ती खाली बसली. काय बोलावं ते मला मुळीच सुचत नव्हतं. संबंध नसलेल्या गोष्टीत माझं मत व्यक्त करायला मला नेहमी संकोच वाटतो. संकटाने घेरलेल्या स्त्रिया त्यांचं ऐकून घेणारा कोणी मिळाला तर कोणाही तिर्हाईताला त्यांच्या खाजगी गोष्टी सांगायला किती उत्सुक असतात हे मला तेव्हा ठाऊक नव्हतं. मिसेस स्ट्रिकलँड तिचं मन मोकळं करण्याची तयारी करत होती.
“लोक या विषयी काय बोलत आहेत का?”
तिचं सर्वस्वी खाजगी असं गुपीत मला ठाऊक असेल हे तिने ज्या सहजतेने गृहित घरलं होतं त्याने मला धक्का बसला.
“मी नुकताच लंडनमध्ये आलोय. मला फक्त एकच व्यक्ति भेटली ती म्हणजे मिसेस वॉटरफोर्ड.”
मिसेस स्ट्रिकलँडने हाताच्या मुठी वळल्या.
“ती नक्की काय म्हणाली मला नीट सांगा.” मी कांकू करत होतो पण तिने हट्टच धरला.
“लोक कसं बोलतात तुम्हाला चांगलं ठाऊक आहे. तिनं जे सांगितलं त्याच्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. ती म्हणाली की तुमचे पती तुम्हाला सोडून गेले आहेत.”
“फक्त एवढंच?”
रोज वॉटरफोर्ड काय म्हणाली ते मी काही सगळंच शब्दश: सांगितलं नाही. विशेषत: जाता जाता तिने टी शॉप मधल्या मुलीचा तिने जो उल्लेख केला होता ते मी तिच्यापासून लपवलं.
“माझा नवरा कोणा बरोबर पळून गेला असावा त्याबद्दल ती काहीच म्हणाली नाही?”
“नाही” मी खोटंच दडपून दिलं.
“मला तेवढंच जाणून घ्यायचं होतं.”
मी कोड्यात पडलो. पण सगळा विचार करता आता तेथून काढता पाय घेणं श्रेयस्कर आहे या निष्कर्षाप्रत मी आलो. मिसेस स्ट्रिकलँडशी निरोपाचं हस्तांदोलन करताना मी तिला मदत करायची तयारी दर्शवली आणि तिचा निरोप घेतला. ती क्षीणपणे हसली.
“मी तुमची आभारी आहे. माझ्यासाठी एवढं कोणी केलं नसतं.”
संकोचामुळे सहानुभूतीचे दोन अधिक शब्द बोलायला मला सुचलं नाही. मी निरोप घेण्यासाठी कर्नलकडे वळलो. पण त्याने माझा हात हातात घेतला नाही.
“मी सुद्धा निघतोय. तुम्ही जर चालत जाणार असाल तर व्हिक्टोरिया स्ट्रीटपर्यंत मी तुमची सोबत करीन.”

“ठीक आहे, चला तर मग.”

Friday, January 19, 2018

मून अँड सिक्सपेन्स - ७

वसंत ऋतुचे अखेरचे दिवस होते. माझ्या माहितीतील सर्वजण कुठे ना कुठे गेलेले तरी होते किंवा जायच्या तयारीत होते. मिसेस स्ट्रिकलँड नॉरफोकला जाण्याच्या तयारीत होती. मुलांना समुद्रकिनारी खेळायला मिळालं असतं आणि नवर्याला गोल्फ. मीही बाहेरगावी जाण्याच्या तयारीत होतो. आम्ही नंतर शरद ऋतुत भेटायचं ठरवून एकमेकांचा निरोप घेतला. जाण्याच्या आदल्या दिवशी शेवटची खरेदी करावी म्हणून मी एका दुकानात गेलो होतो. माझ्यासारखी ती सुद्धा त्याच दुकानात बाहेरगावी जाताना शेवटच्या क्षणी आठवलेल्या गोष्टी खरेदी करायला म्हणून आपल्या मुलांना घेऊन आली होती. खूप उकडत होतं आणि खरेदी करून आम्ही दमलो होतो म्हणून मी समोरच्या बागेत जाऊन आईस्क्रीम खाऊया असं सुचवलं.
मिसेस स्ट्रिकलँडला तिच्या मुलांशी माझी ओळख करून द्यायला मनापासून आवडलं असावं कारण तिने माझं आमंत्रण तत्परतेने स्वीकारलं. तिची मुलं फोटोत दिसत होती त्यापेक्षा खूपच छान दिसत होती. मुलांचा तिला अभिमान होता ते अनाठायी नव्हतं. मी तरूण असल्याने मुलं न संकोचता माझ्याशी आनंदाने गप्पा मारू लागली. ती सुस्वभावी आणि सुदृढ प्रकृतीची होती आणि बागेत बागडताना तर फारच छान दिसत होती.
तासाभरानंतर ते कुटुंब टॅक्सीतून घरी जायला निघाले आणि मी माझ्या क्लबच्या दिशेने हळू हळू चालत निघालो. सुखी कुटुंब कसं असतं त्याची एक झलक नुकतीच बघायला मिळाली होती. मला त्यांचा हेवा वाटायला लागला. त्या कुटुंबीयांच एकमेकांवर अपार प्रेम असावं असं वाटत होतं. कुटुंबाबाहेरच्या व्यक्तिला समजणार नाहीत अशा त्यांच्या म्हणून खास गमती-जमती होत्या. त्यात सर्व कुटुंब रमत असे. चमकदार बोलता येणं या एकाच गुणावरून चार्ल्स स्ट्रिकलँडवर अरसिकतेचा शिक्का मारण्यात आपण फार मोठी चूक करतोय असं मला वाटलं. सभोवतालच्या कौटुंबीक वातावरणात समाधानाने जगण्यासाठी जेवढी आवश्यक तेवढी हुशारी त्याच्याकडे निश्चित होती. जीवनात यशस्वी होण्यासाठी याचा फारसा उपयोग पडणार नाही पण आयुष्यात सुखी होण्यासाठी मात्र हे पुरेसं आहे. मिसेस स्ट्रिकलँटडसारख्या सुंदर सहचारिणीचं त्याच्यावर प्रेम आहे. नकळत मी त्यांच्या सुखी संसाराचं चित्र मनासमोर उभं करू लागलो. साधं नाकासमोर जाणारे सरळमार्गी चाकोरीबद्ध आयुष्य. गृहकृत्यदक्ष सुंदर पत्नी, दोन गोंडस मुलं. मोठी झाली की लग्न करून मार्गी लागतील. आजची सुंदर मुलगी पुढच्या पिढीची प्रेमळ आई होईल. तरूण देखणा मुलगा कर्तबगार सेनाधिकारी होईल. मुलं, नातवंड आपला वारसा पुढे चालवत आहेत. असं सुखी आणि समृद्ध आयुष्य जगून तृप्त झाल्यावर एके दिवशी निवृत्त होऊन कालमानपरत्वे कबरीत कायमची विश्रांती घ्यायला मोकळे. आयुष्याचं सार्थक म्हणतात ते याहून वेगळे काय असतं.

अगणित दांपत्यांची कहाणी याहून वेगळी नसते. अशा शांत जीवनात एक प्रकारची घरगुती अशी शान असते. हिरव्या कुरणातून बागडत, दर्या खोर्यातून वाट शोधत शेवटी विशाल सागराला मिळणार्या एखाद्या निर्झराची मला येथे आठवण झाली. त्या निर्झराच्या अस्तित्वाची दखलही न घेणारा समुद्र मात्र शांत असतो. त्या शांततेनेच मला अस्वस्थ वाटायला लागतं. आयुष्याच्या अस्तित्वहीनतेने मी अस्वस्थ होतो. सर्वसामान्य लोकांना ज्यामुळे समाधान वाटतं त्याचा माझ्यात मुळातच अभाव आहे. सामान्यजनांचं जीवन सुखी आणि संथ असणं हे समाजस्वस्थ्याच्या दृष्टीने किती महत्वाचं असतं याची मला कल्पना आहे. पण माझं रक्त नव्या वाटा धुंडाळण्यासाठी नेहमी सळसळत असतं. सरळ सोप्या वाटेवरून चालण्यात मला फारसं स्वारस्य वाटत नाही. ज्यामुळे नित्याच्या शिरस्त्यात बदल होणार असेल अशा अपरीचित वाटेवरील खाचखळगे आणि धोके पत्करायला माझी हरकत नसते. बदलामुळे येणार्या अनिश्चिततेने मी हुरळून जातो. अनिश्चिततेचे आव्हान स्विकारणे हे कदाचित माझ्या स्वभावातच असावे.Paul Gauguin and his wife Mette Copenhagen 1885, Photograph


Paul Gauguin and his children Emil and Alina, Photograph

Thursday, January 18, 2018

मून अँड सिक्सपेन्स - ६

शेवटी एकदाची माझी चार्ल्स स्ट्रिकलँडशी भेट झाली. पण वेळ अशी होती की फक्त ओळख करून घेण्यापलीकडे काही झालं नाही. एके दिवशी सकाळीच मला मिसेस स्ट्रिकलँडची चिठी आली. तिने संध्याकाळी मला डिनर पार्टीला बोलावलं होतं. तिच्या एका पाहुण्याने ऐन वेळी नकार दिला होता म्हणून त्याची जागा भरून काढण्यासाठी मला आमंत्रण दिलं होतं. त्या चिठीत तिने लिहीलं होतं:
“तुम्हाला कदाचित कंटाळा येण्याची शक्यता याची मी आगाऊ सुचना देत आहे. ही पार्टी अगदी कंटाळवाणी होण्याची शक्यता आहे, पण तरीही तुम्ही आलात तर मी तुमची अत्यंत आभारी राहीन. कमीत कमी तुमच्याशी थोड्या गप्पा तरी मारता येतील.”
शेजारधर्म म्हणून तरी हे आमंत्रण स्विकारणं भाग होतं.
जेव्हा मिसेस स्ट्रिकलँडने तिच्या नवर्याशी ओळख करून दिली तेव्हा त्याने अगदी कोरडेपणाने हस्तांदोलन केले. त्याच्याकडे वळत थट्टेच्या सुरात ती म्हणाली,
“मला नवरा आहे हे मला यांना दाखवून द्यायचं होतं. त्यांना संशय यायला लागला होता की मी बिनलग्नाची आहे की काय.”
आपल्याला यात काहीच गंमत वाटत नाही हे दाखवून देण्यापुरतं तो जेवढ्याच तेवढं हसला. तेवढ्यात नवे पाहुणे आले आणि आम्हाला सोडून यजमानीणबाई त्यांच्याकडे वळल्या. शेवटी सगळी पाहूणे मंडळी जमली आणि जेवायला कधी सुरवात होत आहे त्याची वाट बघू लागली. मला स्पष्ट आठवतंय. न बोलता शहाणा अशा आविर्भावात तो आपला एक कोपरा पकडून उभा होता. या पार्टीच्या यजमानांनी एवढा आग्रह करून या सगळ्या पाहुण्यांना का बोलावलंय आणि ही सगळी मंडळी एवढी यातायात करून येथे का आली आहेत असं कोडं त्यावेळी मला पडलं. पार्टीला आलेल्या पाहुण्यात कसलाही उत्साह जाणवत नव्हता. जाते वेळी सगळ्यांच्या मनात एकदाची सुटका झाल्याची भावना होती. ती पार्टी म्हणजे केवळ एका उपचारासारखी वाटली. कारण स्ट्रिकलँड दांपत्य तेथे जमलेल्या पाहुण्यांपैकी बर्याच जणांना एक पार्टी देऊ लागत होते. पण पार्टीला येण्यात कोणालाच रस नव्हता. तरीही बहुतेक जण पार्टीला आले होते. का? तर कोणाला घरी एकट्याने जेवण्याचा कंटाळा आला होता, तर काहींना आपल् नोकरांना एक दिवस सुटी द्यायची होती, तर कोणाकडे नकार द्यायला सबळ कारण नव्हते आणि बर्याच जणांना एक फुकट जेवण वसूल करायचे होते.
जेवणाच्या खोलीत खूप गर्दी झाली होती. के.सी. दांपत्य, एक सरकारी उच्च पदस्थ आणि त्याची पत्नी, मिसेस स्ट्रिकलँडची बहीण आणि तिचा नवरा कर्नल मॅक-अँड्रयु आणि एक खासदार पत्नी. ज्याला संसदेच्या कामात अडकल्यामुळे यायला जमले नव्हते आणि ज्याच्या ऐवजी आयत्या वेळेला मला बोलावण्यात आलं होतं ती हीच व्यक्ति असावी. पार्टीला आलेली मंडळी भयंकर घरंदाज वगैरे होती. स्त्रिया आपल्या भपकेबाज कपड्यांचं प्रदर्शन करायला आल्यासारख्या वाटत होत्या. आपल्या वागण्या बोलण्यातून त्या आपला सामाजिक दर्जा ज्या कौशल्याने दाखवून देत होत्या की ते पहाणं मोठं गमतीचं होतं. पुरूष मंडळी आपापला आब सांभाळत वावरत होती.
पार्टीमध्ये आलोय तर काही तरी बोललं पाहिजे म्हणून सगळ्यांचे आवाज नकळत चढत होते. जेवणाच्या खोलीत एकच गोंगाट चालू होता. एकच एक विषय होता असं काही नव्हतं. प्रत्येक जण आपल्या शेजार्याशी, शेजारी त्याच्या शेजार्याशी बोलत होता. सूप, फिश, आँत्रे – मुख्य पदार्थ, भाजलेले पदार्थ, गोड आणि मसालेदार पदार्थ खाता खाता राजकिय परीस्थिती, गोल्फ, आपली मुलं-बाळं, नुकतंच आलेलं नाटक, रॉयल अकादमीला लागलेला नवा चित्रपट, हवापाणी, उन्हाळ्याच्या सुटीतील बेत असा कुठलाही विषय व्यर्ज नव्हता. क्षणाचीही उसंत नव्हती. आवाजाची पातळी हळूहळू वाढू लागली. पार्टी यशस्वी झाल्याबद्दल मिसेस स्ट्रिकलँडनी आपली पाठ थोपटून घेतली असती. तिचा नवराही त्याच्या वाटेला आलेली भूमिका वठवण्याचा प्रयत्नही करण्याच्या फंदात पडला नव्हता. मला वाटतं पार्टी सुरू झाल्यापासून तो कोणाशी एक शब्दही बोलला नसावा. त्याच्या बाजूला असलेली मंडळी पार कंटाळून गेलेली दिसत होती. एक दोन वेळा मिसेस स्ट्रिकलँडनी त्याच्याकडे वळून मोठ्या चिंतेने पाहिले.

शेवटी एकदा मिसेस स्ट्रिकलँड उठली आणि सगळ्या स्त्रियांना जेवणाच्या खोलीबाहेर घेऊन गेली. ती गेल्यावर स्ट्रिकलँडने दरवाजा लावून घेतला आणि के.सी. आणि सरकारी अधिकार्याच्या मधली जागा पटकावली. त्याने सगळ्यांच्या ग्लासात पोर्ट ओतली आणि सिगारचा खोका पुढे केला. के.सी. ने वाईनची तारीफ केली आणि तो ज्या एका प्रकरणात गुंतला होता ते प्रकरण थोडक्यात सांगितलं. कर्नल पोलोविषयी बोलला. माझ्याकडे बोलण्यासारखं काही नव्हतं म्हणून इतरांच्या बोलण्याकडे लक्ष आहे असं दाखवत मी गप्प बसलो. माझ्याशी बोलण्यात दुसर्या कोणाला रस नव्हता म्हणून मी स्ट्रिकलँडचं निरीक्षण करायला सुरवात केली. मला वाटलं होतं त्यापेक्षा तो चांगलाच धिप्पाड होता. पहिल्या भेटीत तो मला किरकोळ प्रकृतीचा असावा असं का वाटलं ते सांगता येत नाही. त्याचा बांधा आडवा होता. त्याचे हातपाय दणकट होते. त्याने संध्याकाळी पार्टीला म्हणून घातलेले कपडे कसे तरीच गबाळ्यासारखे वाटत होते. त्याच्याकडे पाहिल्यावर एखादा घोडागाडीवाला समारंभासाठी सजून तयार झाला आहे असं वाटत होतं. तो चाळीस एक वर्षांचा असावा. देखणा नाही पण त्याला कुरूपही म्हणता आलं नसतं. त्याने दाढी तुळतुळीत केली होती. त्यामुळे त्याचा रुंद चेहेरा उघडा बोडका वाटत होता. त्याने आपले लालसर रंगाचे केस अगदी बारीक कापले होते. त्याचे निळसर करड्या रंगाचे डोळे चेहेर्याच्या मानाने लहान वाटत होते. त्याचे एकूण व्यक्तिमत्व सर्वसाधारण म्हणता येईल असे होते. मिसेस स्ट्रिकलँडला त्याची लाज का वाटत होती ते माझ्या लक्षात आले. जिला साहित्यिक विश्वात आपली छाप पाडायची आहे अशा स्त्रीला त्याच्यासारख्या नवर्याकडून फारसा फायदा नव्हता. उच्चभ्रू समाजात वावरण्यासाठी उपयोगी पडतील असे कोणतेही गुण त्याच्या अंगी नव्हते. त्यातल्या त्यात जमेची बाजू म्हणजे त्याच्यात  विक्षीप्त म्हणावं असंही काही नव्हतं. अरसिक असला तरी मुदलातच तो एक चांगला, प्रामाणिक आणि सरळमार्गी इसम असावा असं दिसत होतं. असा सीधा-साधा गुणी माणूस कोणालाही आवडण्यासारखे असला तरी त्याच्याशी मुद्दाम मैत्री करावी असं कोणाला वाटणं कठीण होतं. समाजातील एक सन्माननिय घटक, एक सद्गृहस्थ, कुटुंबवत्सल पती आणि पिता म्हणून तो ठीक होता. पण त्याच्यापाय़ी आपला वेळ फुकट घालवावा असं कोणतंही कारण नव्हतं.Paul Gauguin Wearing a Breton Jacket
Photography, ca. 1891, Isabell Cahn, Source: Wikipedia
Gauguin (exhibition catalogue, 1988, fig.47 p. 49), National Gallery of Washington


मून अँड सिक्सपेन्स - ५

त्या उन्हाळ्यात मिसेस स्ट्रिकलँडची आणि माझी बर्याच वेळा भेट झाली. तिने दिलेल्या छानशा लंच पार्टी नंतर मी बर्याच वेळा त्यांच्या घरी जायचो. त्या पार्टीला काही औरच मजा आली होती. आम्हाला एकमेकांशी गप्पा मारायला खूप आवडायचं. मी खूप तरूण होतो. लेखक म्हणून माझी कारकीर्द नुकतीच घडत होती. लेखनकामाच्या खडतर मार्गावर माझं बोट धरून मला घेऊन जाण्याची कल्पना तिला खूप आवडली असावी. अडचणीच्या वेळी लहानमोठी मदत करायला, आपलं म्हणणं, आपुलकीचा सल्ला ऐकणारा कोणीतरी मिळाला तर तिला ते हवंच होतं. दुसर्याचं म्हणणं सहानुभूतिने ऐकण्याची कला तिच्याकडे होती. बरेच जण या कलेचा दुरूपयोग करतात. सहानुभूती दाखवता येईल अशी कोणी व्यक्ति मिळते का याकडे असे लोक टपून बसलेले असतात. एकदा का एखादा दुर्दैवी माणूस अशा लोकांच्या तावडीत सापडला की लागलीच त्याच्यावर सहानुभूतिचा एवढा वर्षाव सुरू होतो की त्याला बिचार्याला ओशाळल्यासारखं होतं. त्यात त्यांना काय समाधान मिळते देव जाणे. माझे काही जीवलग मित्र अशा लोकांच्या सहानुभूतिचे शिकार झाले आहेत. मिसेस स्ट्रिकलँटमात्र सहानभूती दाखवताना अशा खूबीने दाखवायची की तिचं सहानुभूतिचं बोलणं ऐकणार्याला असं वाटावं की तिचं बोलणं ऐकून तोच तिच्यावर उपकार करीत आहे. मी या विषयी जेव्हा रोज वॉटरफोर्डशी बोललो तेव्हा ती म्हणाली,
“दूध चवीला छान लागतं आणि त्यात ब्रँडी घातलेली असेल तर फारच छान. पण गाईच्या आचळात साठलं तर मात्र गाईची आचळं भरून येतात आणि तिला केव्हा धार काढतायत असं होऊन जातं.”
रोज वॉटरफोर्ड फटकळ होती. तिच्यासारखं भोचक बोलणं कोणाला जमलं नसतं, तसंच तिच्यासारखं मिश्किल बोलणंही कोणाला जमणं कठीण होतं.
मिसेस स्ट्रिकलँडची आणखी एक गोष्ट मला आवडायची. तिचं वागणं, बोलणं आणि रहाणी यातून तिची उच्च अभिरूची दिसून येत असे. तिचा फ्ल्रॅट व्यवस्थित सजवलेला असे. घरात ताजी फुले ठेवलेली असत. त्यामुळे सजावट साधी असली तरी नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न वातावरण असे. डायनिंग हॉल लहान असला तरी मोठ्या कलात्मकतेने सजवलेला असल्यामुळे तेथे भोजन घेणे म्हणजे एक आनंददायक अनुभव असे. टेबल सुंदर होतं. काय हवं नको ते बघायला दोन नोकराणी मोठ्या तत्परतेने सज्ज असत. अन्न चांगलं रुचकर असे. दिवाणखान्यात तिच्या मुलाचे आणि मुलीचे फोटो होते. सोळा वर्षांच्या रॉबर्टचा रग्बी खेळतानाचा एक, फ्लॅनेल आणि क्रिकेटीची कॅप घातलेला आणि टेल कोट व स्टँडिंग कॉलरचा शर्ट असे आणखी काही फोटो होतो. तो नीट नेटका आणि सुदृढ प्रकृतीचा दिसत होता. त्यामुळे मिसेस स्ट्रिकलँड यजमानीणबाई म्हणून जेवढी आतिथ्यशील आहे तेवढीच आई म्हणूनही एक गृहकर्तव्यदक्ष गृहीणी असावी याची खात्री पटे.
“तो काही फार हुशार आहे असं काही म्हणता येणार नाही, पण तो एक फार गोड आणि आज्ञाधारक मुलगा आहे.”
मुलगी चौदा वर्षांची होती. तिचे खांद्यावर रुळणारे केस तिच्या आई प्रमाणेच दाट आणि गडद रंगाचे होते. आईसारखाच गोड चेहेरा आणि शांत नजर.
“दोन्ही मुलं तुमचंच रूप घेऊन आली आहेत.”
“खरं आहे. दोन्ही मुलं वडिलांपेक्षा माझ्यावरच जास्त गेली आहेत.”
“तुम्ही अजूनही त्यांची माझ्याशी ओळख करून दिलेली नाही.”
“ओळख करून घ्यायला आवडेल तुम्हाला?”
ती गोड हसत लाजत म्हणाली. तिच्या वयाच्या स्त्रिया एवढ्या लाजत नाहीत. तारूण्याचा बहर ओसरून गेल्यावरसुद्धा आकर्षक दिसण्याच रहस्य तिच्या या साधेपणातच असावं.
“तुम्हाला माहित नसेल म्हणून मी आगाऊ सूचना देऊन ठेवते. त्यांना या साहित्य वगैरे गोष्टींमध्ये मुळीत रस नाही. माझे यजमान म्हणजे अरसिकतेचा एक नमुनाच आहेत.”
आपल्या नवर्याला कमी लेखण्याचा हेतू तिच्या मनातसुद्धा नव्हता. किंबहुना मला तरी त्यात तिचं आपल्या नवर्यावरचं प्रेमच दिसलं. उलट आपल्या पतीच्या दोषांची आगाऊ कल्पना देऊन आपल्या मित्र-मैत्रीणींची संभाव्य शेरेबाजी टाळण्याचा तिचा उद्देश असावा.
“ते शेअर बाजारात असतात. ते अगदी हाडाचे शेअर ब्रोकर आहेत. मला वाटतं त्यांच्याशी गप्पा मारायला तुम्हाला खूप कंटाळा येईल.”
“तुम्हाला कंटाळा येतो?” मी उलट विचारलं.
“हे पहा मी त्यांची धर्मीपत्नी आहे आणि माझं त्यांच्यावर खूप प्रेमही आहे.”
हे बोलताना ती किंचीत लाजली आणि ते लपवण्यासाठी ती मुग्ध हसली. मला वाटलं की मी तिचा उपहास करीन अशी तिला भिती वाटली असावी. कारण रोज वॉटरफोर्डने माझ्यासमोर अशी कबुली कधीच दिली नसती. ती थोडी गांगरली आणि तिच्या डोळ्यात पाणी तरळले.
“आपण कोणी महान आहोत असं ते कधीच भासवत नाहीत. शेअर बाजारात ते फार पैसे मिळवतात असेही नाही. ते कसंही असलं तरी ते अतिशय चांगले आणि शांत स्वभावाचे आहेत.”
“मला त्यांच्याशी गप्पा मारायला आवडेल.”
“मी एकदा फुरसतीने तुम्हाला जेवायला बोलावीन. पण तुमची संध्याकाळ फुकट गेली म्हणून मागाहून मला नाव ठेऊ नका.”The Bank of England and the Royal Exchange
Photograph by Sir William Tite, 1844, Source: Victorianweb.org

Wednesday, January 17, 2018

मून अँड सिक्सपेन्स - ४

त्या दिवसात रोज वॉटरफोर्डने दाखवली तेवढी आपुलकी मला दुसर्या कोणी दाखवली नव्हती. तिच्यात पुरूषांची बुद्धी आणि स्त्रियांची कुटीलता या दोघांचा मिलाफ होता. ती ज्या कादंबर्या लिहायची त्या अगदी स्वतंत्र आणि अस्वस्थ करणार्या असत. तिच्यात घरी एके दिवशी चार्ल्स स्ट्रिकलँडच्या पत्नीशी माझी ओळख झाली. मिस वॉटरफोर्डने चहापानाला तिच्या घरी बोलावलं होतं. तिचं लहानसं घर आमंत्रितांनी भरून गेलं होतं. प्रत्येक जण बोलत होता. मी एकटाच अवघडून गप्प बसलो होतो. नव्याने ओळख झालेल्यांशी आपण होऊन बोलायला मला थोडं संकोचल्यासारखं वाटत असे. मिस वॉटरफोर्ड एक चांगली यजमान होती. तिने माझी अडचण ओळखली आणि ती आपण होऊन पुढे आली.
“तुम्ही मिसेस स्ट्रिकलँडशी बोला. त्यांना तुमचं पुस्तक खूप आवडलं आहे.”
“त्या काय करतात?” मी विचारलं.
माझ्या अज्ञानाबद्दल मी सजग होतो. जर मिसेस स्ट्रिकलँड लेखक असत्या तर मला महित असलेलं बरं.
“त्यांना लोकांना पार्टीला बोलवाला खूप आवडतं. त्यांच्याशी कोणी थोडंसं गोड गोड बोललात लगेच पुढच्या पार्टीचं आंमत्रण मिळतं.”
रोज वॉटरफोर्डला सगळ्या गोष्टीत खोड काढायची सवय होती. दुसर्याचं खाजगी आयुष्य चिवडून त्यात आपल्या कादंबरीसाठी काहीतरी कथासूत्र मिळतय का हे ती शोधत असायची. आपल्याला भेटणारी सगळी माणसं तिला कथालेखनासाठी कच्ची सामुग्री आहेत असं ती गृहीत धरत असे. कोणी तिची थोडीशी तारीफ केली की काही तरी कारण काढून तिच्याकडच्या पार्टीचं आमंत्रण मिळालंच समजा. साहित्यिकांबद्दल लोकांना वाटणार्या आदराची तिला चांगली कल्पना होती. साहित्यिक वर्तूळातील मोठ-मोठ्या पार्ट्यांना तिला आवर्जून आमंत्रण असे. त्यामुळे आपल्या आमंत्रणाचा अव्हेर होणार नाही याची तिला खात्री होती. त्यामुळे ती पाहुणी किंवा यजमान या दोन्ही भुमिकेत मोठ्या दिमाखाने वावरत असे.
तिने माझी मिसेस स्ट्रिकलँडशी ओळख करून दिल्यावर आम्ही दहा एक मिनीटे एकमेकांशी बोलत होतो. तिचा आवाज मंजूळ होता यापेक्षा त्या भेटीतील काहीही मला आठवत नाही. वेस्टमिनीस्टर या भागात तिच्या मालकीचा एक फ्लॅट होता. त्या फ्लॅटमधून बांधकाम चालू असलेल्या कॅथेड्रलचे दृश्य दिसे. मी सुद्धा त्याच भागात रहात होतो. एकाच विभागात रहाणार्या लोकांत उदाहरणार्थ नदी आणि सेंट जेम्स पार्क याच्यामधील विभाग जसा आर्मी अँड नेव्ही  स्टोर्समुळे जसा एकप्रकारचा आपलेपणाचा भाव आपोआपच प्रस्थापित होत असे तसा आमच्यात मैत्रीचा धागा आपसूकच निर्माण झाला. थोड्याच दिवसात तिच्या घरच्या एका लन्शन पार्टीचे मला आमंत्रण मिळाले.
मला फारसं कामच नसायचं. त्यामुळे कोणत्याही पार्टीचे आमंत्रण मी आनंदाने स्विकारीत असे. पार्टीला मी थोड्या उशीरानेच गेलो. खूप लवकर गेलो तर बरे दिसणार नाही म्हणून मी कॅथेड्रील भोवती तीन चार फेर्या मारल्या. परीणामी खूपच उशीर झाला. मी पोचलो तेव्हा पार्टी संपत आली होती. मिस वॉटरफोर्ड आणि मिसेस जे, रिचर्ड ट्विनींग आणि जॉर्ज रोड हे हजर होते. आम्ही सगळे लेखक होतो. वसंत ऋतुची सुरवात होती. त्या दिवशी हवा फार चांगली पडली होती. खेळकर वातावरणात गप्पा रंगल्या होत्या. आमच्या बोलण्यात शेकडो विषय येत होते. मिस वॉटरफोर्ड आपल्या ऐन तारूण्यात कोणत्याही पार्टीला सहसा शेवाळी रंगाचा ड्रेस घालून जात असे आणि हातात डॅफोडिल्सची फुलं असत. पण आता तारूण्याचा बहर ओसरला होता. तरूणपणीच्या अभिरूचीची जागा प्रौढत्वात येणार्या उच्छृंकुलपणाने घेतल्यामुळे ती उंच टाचांचे बूट, पॅरीस फॅशनचा नवा कोरा ड्रेस आणि नवी हॅट अशी नटून आली होती. नटल्यामुळे असेल पण तिचा उत्साह उतू जात होता. तिथे अनुपस्थित असलेल्या आमच्या लेखक मित्रांबद्दल एवढं आकसाने बोलताना तिला यापूर्वी मी कधी पाहिलं नव्हतं. मोठ्याने बोलून दुसर्यावर विनोद करणं अनुचित दिसलं असतं याची कल्पना मिसेस जेला असल्यामुळे ती अगदी हळू आवाजात कुजबुजत होती. रिचर्ड ट्विनींग काही तरी गमतीजमतीच्या गोष्टी सांगत होता. जॉर्ज रोडला बोलायला विषय न मिळाल्यामुळे त्याचे तोंड गप्प होते, फक्त खाण्यापुरते उघडत होते. मिसेस स्ट्रिकलँड फारशी बोलत नव्हती. न बोलता संभाषण चालू कसं ठेवयचं ती कला तिला चांगलीच अवगत होती. जेव्हा संभाषणाच खंड पडे तेव्हा एक दोन मोजक्या शब्दांत आपले मत व्यक्त करून ती संभाषण पुढे चालू रहाण्यास मदत करत होती. ती सदतीस वर्षांची होती. थोडी भरल्या अंगाची. तरीही तिला लठ्ठ म्हणता आलं नसतं. ती फार सुंदर होती अशातला काही भाग नाही, पण तिचा चेहेरा आकर्षक होता. मुख्यत: तिच्या टपोर्या बदामी डोळ्यांमुळे. तिची अंगकांती किंचीत तांबूस होती. तिचे काळसर केस व्यवस्थित विंचरलेले होते. तेथे उपस्थित असलेल्या तीन स्त्रियांपैकी मेकअप न केलेली अशी ती एकटीच होती. इतरांच्या तुलनेत तिचे सौंदर्य साधे वाटत असले तरी त्यात एक प्रकारचा डौल होता.
जेवणघराची सजावट साधी म्हणता येईल अशी असली तरी त्यात तत्कालीन अभिरूची दिसत होती. भिंतीवर उंचापर्यंत पांढर्या लाकडाचे जोडकाम केले होते. त्यावर लावलेल्या हिरवट रंगाच्या वॉलपेपरवर व्हिसलरची इचिंग काळ्या रंगाची शिसवी फ्रेम करून लावली होती. उंच खिडक्यांवर मोराचे डिझाईन काढलेल्या हिरव्यागार रंगाचे पडदे लावले होते. झाडाझुडपात बागडणार्या पांढर्या शुभ्र सशांचं चित्र असलेलं हिरव्या मखमली रंगाचं जाजम जमिनीवर अंथरलेलं होतं. एकूण सजावट आणि रंगसंगतीवर विल्यम मॉरीसच्या शैलीची छाप होती. निळ्या रंगाचं नक्षीकाम केलेलं चिनीमातीचं भांड फायरप्लेसच्या कठड्यावर ठेवलेलं होतं. त्यावेळी लंडनमध्ये अशा प्रकारची सजावट केल्या शेंपाचशें तरी डायनिंग रूम असाव्यात. सजावट कितीही कलात्मकतेने आणि टापटीपीने केली असली तरी ती एकंदरीत यांत्रिक आणि त्यामुळे निरस वाटत होती.
मी मिस वॉटरफोर्ड बरोबर बाहेर पडलो. बाहेर छान उन पडलं होतं. त्यात तिची हॅटही नवीन होती. त्यामुळे आम्ही बागेतून फेरफटका मारायचं ठरवलं.
“पार्टी छान झाली नाही.”
“खायचे पदार्थ काही खास नव्हते. मी तिला अगदी बजावून सांगितलं होतं. लेखक मंडळींना बोलावलं आहेस तर त्यांना चांगलं खिलवलं पाहिजे.”
“तुमचा सल्ला चांगला आहे. पण मला एक सांगा या बाईसाहेबांना मुळात लेखकांना बोलावून पार्टी द्यायची एवढी हौस का आहे.”
मिस वॉटरफोर्डने मान हलवली.
“तिला त्याची खूप हौस आहे. तिला सगळ्या साहित्यिक चळवळीत भाग घ्यायला मनापासून आवडतं. तिला बिचारीला असं वाटत असतं की आपण म्हणजे एक अगदी साधी गृहिणी आहोत आणि आपल्याकडे येणारे साहित्यिक म्हणजे कोणी खास माणसं आहोत. आपल्या सारख्या लेखकांना पार्टीला बोलावल्यामुळे तिला मनापासून आनंद होतो आणि हा आनंद तिला मिळू देण्यात आपलं काहीच नुकसान नाही. मला तिचं हे फार आवडतं.”
आपल्या पार्टीला साहित्यिक वगैरे मंडळी यावीत असं वाटणार्या तिच्या सारख्या उच्चभ्रू महिला हॅम्पस्टीड ते चेने वॉक पर्यंत डझनावारी मिळाल्या असत्या. लेखकांना आपल्या गटात ओढण्यासाठी त्यांच्यात नेहमी अहमिका लागायची. मागे वळून पहाताना आता मला असं वाटतं की त्या अतिविशाल महिलांत मिसेस स्ट्रिकलँड त्यातल्या त्यात बरी म्हणता आली असती. तिचं बालपण ग्रामिण भागात गेलं होतं. मुडीच्या लायब्ररीतून येणार्या पुस्तकांमुळे लंडनच्या सांस्कृतीक जीवनाशी तिचा परिचय झाला होता. तिला वाचनाची खरीखूरी आवड होती. तिच्या सारख्या महिलांमध्ये हे अपवादानेच आढळलं असतं. कारण बहुतेकांना लेखकाच्या पुस्तकापेक्षा किंवा चित्रकाराच्या पेंटींगपेक्षा त्याच्या खाजगी आयुष्यातच जास्त रस असतो. तिचं स्वत:चं असं एक कल्पनाविश्व होतं. नेहमीच्या रहाटगाड्यात न मिळणारं स्वातंत्र्य तिला तिच्या कल्पनाविश्वात मनमुराद घेता येई. इतके दिवस ती साहित्यिकांचं जग प्रेक्षकाच्या भूमिकेतून बघत असे. लेखकांशी जला परिचय होऊ लागला तसा पडद्यामागच्या जगात तिचा प्रवेश झाला. कलाकारांचं नाट्यमय आयुष्या तिला अगदी जवळून बघता येऊ लागलं. साहित्यिक मेजवान्यांना ती आवर्जून उपस्थित राही. लेखकांना आपल्या घरी बोलवून ती त्यांचं चांगलं आदरातिथ्य करी. तिने साहित्यिक जगाची संस्कृती चांगलीच आत्मसात केली. पण तिने आपला स्वतंत्र बाणा कधीच सोडला नव्हता. लेखकांची विक्षीप्त वर्तणूक, चित्रविचीत्र पेहेराव, भन्नाट कल्पना आणि चक्रमपणा या सगळ्यांनी तिचं चांगलं मनोरंजन होत असावं, पण त्याचा परिणाम तिच्यावर झालेला कधी दिसला नव्हता.
“मिस्टर स्ट्रिकलँड काय करतात?”
“इथेच रहातात. लंडनमध्ये त्यांचा शेअर दलाली की काहीतरी व्यवसाय आहे. ते बिचारे अगदी साधे आहेत.”
“मला एक शंका आहे. त्या दोघांचं आपापसात जमतं?”
“न जमायला काय झालं. चांगलं जमतं. त्यांच्याकडे कधी डिनरला जायची वेळ आली तर तुमची त्यांची भेट होईलच. पण त्यांच्याकडचं आमंत्रण सहसा डिनरचं नसतं. मिस्टर स्ट्रिकलँडना लोकांत मिसळायला आवडत नसावं. साहित्य, कला वगैरे गोष्टींमध्ये त्यांना रूची नाही.”
“सुसंकृत आणि बहुश्रुत स्त्रिया अशा अशा नीरस पुरूषांशी का बरं लग्न करतात?”
“कदाचित बुद्धीमान पुरूषांना सुसंकृत आणि बहुश्रुत स्त्रियांशीच लग्न करायला आवडत असावं.”
यावर चांगलं प्रत्युत्तर मला सुचलं नाही. म्हणून मी त्यांना मुलं आहेत का याची चौकशी केली.
“एक मोठा मुलगा आणि धाकटी मुलगी आहे. दोघंही शाळेत जातात.”
त्या विषयात बोलण्यासारखं काही उरलं नाही म्हणून आम्ही दुसर्या विषयाकडे वळलो.Zaandam, the Netherlands, c. 1889 - etching by James McNeill Whistler
                                            Source: Wikipedia, Public  Domain

Tuesday, January 16, 2018

मून अँड सिक्सपेन्स - 3

हे झाले थोडेसे विषयांतर.
मी माझं पहिलं पुस्तक लिहीलं तेव्हा मी अगदी तरूण होतो.
सुदैवाने माझ्या पहिल्याच पुस्तकाकडे लोकांचं लक्ष गेलं आणि बरेच लोक मला ओळखू लागले.
लंडनच्या साहित्यिक वर्तुळात माझी उठबस सुरू झाली. माझा स्वभाव थोडासा उतावीळपणाचा असला तरी सुरवातीला भिडस्तपणामुळे मी मागेमागेच रहायचो. माझ्या भटकंतीच्या दिवसात सगळा आनंदी आनंद होता असं काही म्हणता येणार नाही. काही अगदी मन विषण्ण करणारे प्रसंगही येत. पण त्याला आता खूप काळ लोटला आहे. कादंबर्यांत वर्णन केलेल्या गोष्टी आणि घटना बर्याच अंशी अचूक असल्या तरी काळानुसार त्यातील काही तपशील आता बदलले आहेत. उदाहरणार्थ काही स्थळं. चेल्सी आणि ब्लुम्सबेरीने आता हॅम्पस्टीड, नॉटींग हिल गेट, हाय स्ट्रीट आणि केनिंगस्टनची जागा घेतली आहे. त्या काळी एखाद्याचा चाळीशीच्या आत साहित्यिक वर्तूळात समावेश होणं म्हणजे मोठा बहुमान समजला जायचा. पण आता पंचवीस वर्षावरील साहित्यिकाला अडगळीत काढलं जातं. त्या काळी आम्ही आमच्या भावनांचं प्रदर्शन करायला थोडे लाजायचो. आपली चेष्टा हाईल या भितीमुळे का होईना आमचा ढोंगीपणा थोडा काबूमध्ये असायचा. आम्ही फार सोज्वळ होतो अशातला भाग नाही, पण आजच्यासारखा चौफेर स्वैराचर मात्र आमच्या काळी नव्हता. क्वचित कधीतरी पाऊल वाकडं पडलं तर त्याची वाच्यता करण्याऐवजी आम्ही मौन बाळळगत असू. आम्ही फावड्याला फावडं म्हणणारी अगदी सरळसोट माणसं होतो. स्त्रियांनी त्यांची मर्यादा त्याकाळी ओलांडली नव्हती हे ही एक महत्वाचं कारण होतंच म्हणा.
मी व्हिक्टोरिया स्टेशनजवळ रहात असे. तेथून मी माझ्या साहित्यिक मित्र मंडळींना भेटण्यासाठी बसने शहरात ठिकठिकाणी जात असे. अशा माझ्या भटकंतीतील एक भेट मला आजही नीट आठवत आहे. भिडस्तपणामुळे मला दार ठोठावण्याचा धीर होत नव्हता. त्यामुळे धीर येण्यासाठी मी रस्त्यावरून फेर्या मारत होतो. अशा बर्याच फेर्या मारून झाल्यावर शेवटी धीर करून मी दार ठोठावले. दार उघडून कोणीतरी मला आत घेतल्यावरच माझा जीव भांड्यात पडला. आतल्या गर्दीत मी बुजर्यासारखा वावरत होतो. तेथे यजनामीण बाईंनी बर्याच मोठ्या लोकांशी माझी आवर्जून ओळख करून दिली. त्यांनी माझ्या पुस्तकाची जी स्तुती केली त्याने तर मी पार अवघडून गेलो होतो. मी लेखक असल्याने संभाषण चतुर असेन असं त्यांना वाटत असावं. पण बोलायला चातुर्यपूर्ण असं काहीतरी सुचेपर्यंत पार्टी संपून गेली होती. माझा अस्वस्थपणा लपवण्यासाठी मी चहाचा कप आणि पावाचा कसातरी कापलेला तुकडा हातात घट्ट धरून उभा होतो. माझ्याकडे कोणाचेही लक्ष जाऊ नये असं मला वारंवार वाटत होतं. कारण मला त्या सगळ्या सुप्रसिद्ध मंडळींकडे डोळे भरून पहायचं होतं आणि त्यांचं चातुर्यपुर्ण बोलणं माझ्या कानात साठवून घ्यायचं होतं.
तेथे जमलेल्या स्त्रिया नाकेल्या, टपोर्या डोळ्यांच्या आणि चांगल्या धष्टपुष्ट होत्या. त्यांनी घातलेले कपडे अंगावर घातलेल्या चिलखतासारखे दिसत होते. हळू आवाजात बोलत इकडे तिकडे फिरताना आपल्या अवतीभोवती काय चालंलय याच्यावर त्यांचं बारीक लक्ष होतं. पावाला लोणी लावतानासुद्धा हातमोजे न काढण्याचा हट्ट आणि कोणाचं लक्ष नाही असं पाहून हळूच खुर्चीला हात पुसण्याची चलाखी माझ्या अजूनही लक्षात आहे. फर्नीचरच्या दृष्टीने तसं करणं चांगलं नव्हतं पण यजनानीणबाईंनी त्याचा बदला त्या जेव्हा त्यांच्या मैत्रीणीकडे पार्टीला जातील तेव्हा तेथल्या फर्नीचरला हात पुसून घेतला असता. काही जणींनी अद्ययावत फॅशनचे कपडे घातले होते. एखाद्याने कादंबरी लिहीली आहे एवढ्यावरून त्याला गबाळेपणाने रहाण्याचा हक्क मिळतो असे नाही असं त्यांचं मत होतं. छाप पाडण्यासाठी चांगले रूबाबदार कपडे घालायला हरकत नसते. लेखकाने झकपक कपडे करून वर चकचकीत बूट घातले तर त्याचे लिखाण नाकारायची संपादकाची हिम्मत होणार नाही. पण काही स्त्रियांच्या मते व्यवस्थित कपडे केल्याने त्यातून थिल्लरपणा दिसतो. कलाकारासारखे दिसण्यासाठी त्या मुद्दाम गबाळे कपडे करून आल्या होत्या. त्यांनी घातलेले दागिने तर अगदी बघवत नव्हते. पुरूष सहसा असा आचरटपणा करत नाहीत. त्यांचा पहेरावर अगदी कुठल्याही ऑफिसमध्ये खपून जाईल असा होता. बहुतेकजण थकलेले आणि कंटाळलेले दिसत होते. तेथे जमलेल्या लेखक मंडळींपैकी बर्याच जणांशी माझा पूर्वपरिचय नव्हता. त्या तद्दन खोट्या आणि तकलादू वातावरणात मला अगदी अवघडून गेल्या सारखे वाटायला लागलं.

तेथे जमलेल्या मंडळींच संभाषण ऐकण्यासारखं होतं. कोणाची पाठ वळताच त्याची खिल्ली उडवली जायची. एखाद्या व्यक्तिच्या चारित्र्याची टिंगल उडवावी तशाच थिल्लरपणाने त्याचे गंभीर लेखनसुद्धा टिंगलीचा विषय होऊ शकतो हे मला नव्याने कळलं. मला समयोचित आणि हजरजबाबी बोलता येत नाही याचं मला वाईट वाटतं. त्या काळी संभाषणचातुर्य हे एक मोठं शास्त्र होतं. मार्मिक आणि चपखल उत्तर देणं ही एक कला होती. भट्टीमधील फुटाण्यासारखा ताडताड बोलणारा लेखक पार्टीमध्ये भाव खाऊन जाई. संभाषणात चुटके आणि चारोळ्या पेरून खोटी नाटकी रंगत आणली जाई. आता मला त्यातील फारसं काही आठवत नाही. पण मला वाटतं संभाषण जेव्हा लेखन व्यवसायाच्या प्रमुख अंगाकडे वळायचे तेव्हा कित्येकांना ते अडचणीचं वाटायचं. एखाद्या पुस्तकाच्या गुणवत्तेचा विषय निघाला की त्या पुस्तकाच्या किती प्रति विकल्या गेल्या, लेखकाला किती मानधन देऊ केलं आहे, त्यातील किती त्याला आगाऊ मिळाले, असे प्रश्न हटकून उपस्थित व्हायचे. मग आम्ही या ना त्या प्रकाशकाविषयी बोलत असू. एकाचं औदार्या तर दुसर्याचा कंजूषपणा यांची तुलना व्हायची. घसघशीत मानधन देणार्या प्रकाशकाकडे जावं की चांगल्या दर्जेदार पुस्तकांसाठी प्रसिद्ध असलेल्याकडे जावं. काही प्रकाशक जाहिरात चांगली करत तर काहींच जाहिरातीकडे पूर्ण दुर्लक्ष. नंतर एजंट आणि संपादकांचा विषय निघायचा. कोणता एजंट एकदा मान्य केलेलं मानधन वेळीच रोख देतो आणि कोणता नुसते वायदे करत बसतो? पुस्तकाचा खप वाढण्यासाठी संपादकांचा तसा उपयोग होतो का? अशा लेखकांच्या आतल्या वर्तुळात आपला समावेश झाल्याबद्दल मला त्यावेळी आतून फार बरं वाटायचं.


Victorian high tea party, Photograph on glass plate, Circa 1900.
Source: Wikipedia, Public Domain