Thursday, February 1, 2018

मून अँड सिक्सपेन्स – २३

स्ट्रिकलँड आणि माझी यानंतर कित्येक वेळा गाठ पडली. बऱ्याच वेळा आम्ही बुद्धीबळाचा डाव मांडून बसत असू. बऱ्याच वेळा तो शांतपणे शून्यात नजर लावून बसलेला असे. स्वारी खुशीत असली तर तुटक तुटक काही तरी बोलायची. त्याने हुशारीने एखादा मुद्दा मांडलाय असं कधी होत नसे. पण दुसऱ्याची क्रूर चेष्टा करण्यात त्याचा हात कोणी धरला नसता. त्याला जे वाटत असे ते तो अगदी स्वच्छपणे सांगायचा. दुसऱ्याला वाईट वाटेल, भावना दुखावतील याची तो मुळीच पर्वा करत नसे. त्याचं बोलणं कोणाला लागलं तर त्याला त्याची गंमत वाटे. डर्क स्ट्रोव्हची तर तो जाता येता एवढी टिंगल करायचा की कित्येक वेळा डर्क त्याच्याशी पुन्हा बोलणार नाही अशी शपथ घेऊन तेथून निघून जायचा. पण स्ट्रिकलँडच्या व्यक्तिमत्वात एक विलक्षण आकर्षण होतं. तो जाड्या डचमन त्याचा पिट्ट्या पडणार आहे हे ठाऊक असूनही लोचट कुत्र्यासारखा त्याच्याकडे परत येई, आणि त्याने हाड हाड करून हाकलेपयर्यंत तो त्याच्या पायाशी लाळ घोटत बसून राही.
स्ट्रिकलँड मला का खपवून घेत असे ते मला समजलं नव्हतं. आमचे संबंध तसे मैत्रीपूर्ण होते. एके दिवशी त्याने माझ्याकडे पन्नास फ्रँक उसने मागितले.
“स्वप्नातसुद्धा मी देणार नाही.”
“का नाही?”
“मला त्यात गंमत वाटत नाही.”
“मला फाके पडताहेत, तुला ठाऊक आहे ना.”
“त्याने मला काय फरक पडतो.”
“मी उपाशी मेलो तर तुला काही फरक पडणार नाही?”
“का पडावा?”
त्याची अस्ताव्यस्त वाढलेली दाढी खाजवत तो एक दोन मिनीटं माझ्याकडे बघत राहिला. मी त्याच्याकडे पाहून हसलो.
“तुला कसलं हसू येतंय?”
“तू अगदी साधा आहेस. तू ना कधी कोणावर उपकार केले आहेस, ना कोणी तुझ्यावर कधी उपकार करायला तयार होईल.”
“घराचं भाडं न दिल्यामुळे मला हाकलून दिलं आणि मी गळफास लावून घेतला तर तुला वाईट वाटणार नाही का?”
“जरासुद्धा वाईट वाटणार नाही.”
तो गालातल्या गालात हसला.
“तू बंडल मारत आहेस. मी तसं खरंच केलं तर तुला पश्चाताप होईल.”
“तू करून तर बघ, मग कळेल.”
तो किंचीत हसला आणि त्याने आपल्या पुढ्यातील ऍबसिंथ ढवळली.
“आपण बुद्धीबळाचा एक डाव खेळू या का.” मी विचारलं.
“चालेल.”
आम्ही पटावर मोहरा लावल्या. पट तयार झाल्यावर त्याने बारकाईने पाहिला. आपली मोहरी पुढच्या लढाईला तयार आहेत हे पहाण्यात मोठी मौज असते.
“मी तुला पैसे देईन असं वाटलं तरी कसं?” मी विचारलं.
“न द्यायला काही कारण नव्हतं.”
“तू मला धक्का दिलास.”
“कसा काय?”
“तुला भावना आहेत हे मला कळल्याने माझी निराशा झाली. माझ्या सहानुभूतीला तू आव्हान केलं नसतंस तर ते मला फार आवडलं असतं.”
“आणि तू त्या आव्हानाला बळी पडला असतास तर ते मला आवडलं नसतं.”
“तर मग ठीक आहे.”
आम्ही शांतपणे खेळायला सुरवात केली. आम्ही खेळात गढून गेलो होतो. डाव संपल्यावर मी त्याला म्हणालो:
“”जर तुझी परीस्थिती अगदीच कठीण असेल तर मला तूझी पेंटींग दाखव. आवडलं तर एखादं विकत घेईन.”
“गो टू हेल.”
तो जायला उठला तेव्हा मी त्याला थांबवलं.
“तू तुझ्या ऍबसिंथचे पैसे दिले नाहीस.” मी हसत हसत म्हणालो.
त्याने मला शिव्या दिल्या, पैसे टेबलावर फेकले आणि तो निघून गेला.
त्यानंतर बरेच दिवसात तो मला दिसला नाही. एक दिवस मी कॅफेत बसून वर्तमानपत्र वाचत होतो तेवढ्यात तो आला आणि माझ्या शेजारी येऊन बसला.
“शेवटी तू गळफास लावून घेतलेला दिसत नाही.”
“तशी वेळ आली नाही. मला एक काम मिळालंय. एका निवृत्त झालेल्या प्लंबरचं पोर्ट्रेट मी दोनशे फ्रँकला करायला घेतलं आहे.”
“हे काम कसं मिळवलंस?”
“मी जेथून पाव आणतो त्या बाईने माझं नाव सुचवलं. त्याला एक चित्रकार हवा होता हे तो प्लंबर तिच्याजवळ बोलला होता. त्यासाठी तिला फ्रँक कमिशन द्यावं लागलं.”
“कसा आहे तुझा तो प्लंबर.”
“उत्कृष्ट. तंगडीच्या मटणासारखा लालबुंद आहे. त्याच्या उजव्या गालावर एक मोठा चामखिळ आहे. त्या चामखिळाच्या भोवती लांब केस उगवले आहेत.”
स्ट्रितलँड खूश दिसत होता. तेवढ्यात डर्क स्ट्रोव्ह आला आणि आमच्या बाजूला येऊन बसला. तो मोठ्या त्वेषाने त्याच्यावर तुटून पडला. थट्टा करण्यासाठी तो डचमनच्या नाजूक आणि हळव्या जागा अशा कौशल्याने शोधत असे की त्याला मानावंच लागेल. नुसती बोचरी आणि लागट थट्टा करून तो थांबला नाही तर त्याने घणाघाती हल्ला करून त्याचा पार चेंदामेंदा करून टाकला. हल्ला इतका अचानक होता की तो बिचार पार गडबडून गेला. घाबरलेलं मेंढरू कसं इकडे तिकडे उड्या मारत असतं त्याची आठवण झाली. तो पार गांगरून गेला. शेवटी त्याच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. स्ट्रिकलँडचा तुम्हाला कितीही राग येत असला, तो करत असलेली चेष्टा कितीही भयंकर क्रूर असली तरीही त्या क्षणी हसू आल्याशिवाय रहात नाही. त्यात डर्क स्ट्रोव्ह एवढा भावडा होता की त्याने कितीही कळकळीने सांगितलं तरी त्याचं हसू होई.
जेव्हा मी पॅरीसमध्ये घालवलेल्या त्या हिवाळ्याचा विचार करतो तेव्हा मला डर्क स्ट्रोव्ह बरोबर घालवलेल्या क्षणांची आठवण आल्याशिवाय रहात नाही. त्याच्या घरी खरंच धमाल यायची. आदर्श जोडप्याच्या कल्पनेत ती दोघं अगदी फिट बसत होते. डर्कचं त्याच्या बायकोवरचं प्रेम ही एक खास गोष्ट होती. तो एक बावळट व मूर्ख होता. पण त्याच्या कळकळीमुळे त्याची दया यायची. त्याच्या बायकोला त्याच्याबद्दल काय वाटत असेल त्याची मला कल्पना होती. तरीही ती त्याचं सगळं मायेने करत असे. त्याने तिला देव्हाऱ्यात बसवून तिची पूजा करायला कमी केलं नसतं. तिला विनोदाचं अंग असतं तर तिला त्याच्यातील गंमत कळली असती आणि त्या पूजेचं हसू आलं असतं. तो चिरंतन प्रेमिक होता. वयोमानपरत्वे तिचं शरीर सौष्ठव आणि सौंदर्य उतरणीला लागल्यावरसुद्धा त्याचं तिच्यावरचं प्रेम आटलं नसतं. त्याच्या दृष्टीने ती कायमच जगातील सर्वात सुंदर स्त्री राहिली असती. त्यांच्या साध्या सरळमार्गी आयुष्यातही एक मजा होती. त्यांच्या घरात डर्कचा स्टुडियो, बेडरूम आणि एक छोटंस किचन होतं. सगळं घरकाम मिसेस स्ट्रोव्ह स्वत: करत असे. डर्क जेव्हा आपली टुकार पेंटींग रंगवत बसे तेव्हा ती बाजारहाट, स्वयंपाक, साफसफाई, असल्या घरगुती कामात दंग असे. संध्याकाळी ती जेव्हा शिवणकाम हातात घेई तेव्हा डर्क संगीताचा आस्वाद घेत असे. त्याला अभिजात संगीताची आवड होती. त्याची उत्कृष्ट जाण त्याच्याकडे होती. पण कोणत्याही कलेचा आस्वाद घेणं तिच्या कुवती बाहेर होतं.

त्यांचा दिनक्रम अगदी संथ होता. पण त्यात साधेपणाचे म्हणून एक सौंदर्य होते. डर्क स्ट्रोव्हशी संबंधीत प्रत्येक गोष्टीतून त्याचा बावळटपणा दिसून येई. त्याच्या आवडी निवडी अभिजात होत्या, अभिरूची उच्च होती पण त्याचा बावळटपणामळे त्याच्यावर पाणी फिरे. गंभीर विषयावरच्या नाटकात टाकलेल्या विनोदी प्रवेशामुळे नाटकात रंगत येते तसेच ते होते.

5 comments:

  1. आतापर्यंतचे सगळे भाग वाचले। व्यक्तिरेखा ठसठशीत उभ्या करण्यात मोमचा हातखंडा आहेच। अनुवाद चांगला होतोय । मस्त ।

    ReplyDelete
    Replies
    1. व्यक्तिरेखांप्रमाणेच मॉमचं दुसरं वैशिष्ट्य की जे मला आवडतं ते म्हणजे उपमा, उत्प्रेक्षांचा (literary and cultural allusions) सढळ उपयोग. त्याने ज्या चित्रकारांचा, कवींचा वगैरे उल्लेख केला आहे त्यांचा कथानकाशी काही तरी संबंध असतो. त्यामुळे जेथे शक्य होईल तेथे त्याने उल्लेखलेली पेंटींग देण्याचा माझा प्रयत्न आहे. अर्थात ब्लॉग असल्याने ते शक्य आहे. पुस्तक छापलेले असेल तर कठीण होईल. उदा. एकोणिसाव्या भागात शेदाँ (Chadrin) चा उल्लेख आहे. तेथे मी पहिल्यांदा पेंटींग दिले नव्हते. आता दिले आहे ते बघ.

      Delete
    2. जयंत, तुझ्या अश्या समीक्षेमुळे मॉम कळायला मदतच होईल. थँक्स.

      Delete
    3. मॉमने या कादंबरीत युरोपियन पेंटींगचा जागो जागी संदर्भ देऊन उपमा आणि उत्प्रेक्षांच्या (literary allusions) रूपाने भरपूर वापर केला आहे. त्यामुळे मॉम समजून घेताना युरोपियन संस्कृतीचाच विशेषत: चित्रकला समजूून घेण्यात मदत होते.

      Delete