Sunday, February 4, 2018

मून अँड सिक्सपेन्स – २९

स्ट्रोव्हने जे काही मला सांगितलं होतं त्यावर विचार करीत मी थोडा वेळ शांत बसलो. त्याचा पुचाटपणा माझ्या पचनी पडत नव्हता. मी त्याला तसं सरळ सांगितलंही.
‘‘स्ट्रिकलँड कसा आहे, कसा रहात होता ते आपल्या दोघांनाही चागलंच माहित आहे.’’ तो थरथर कापत होता.
‘‘अशा परिस्थितीत मी तिला त्याच्या घरी कसं जाऊ देणार? अशक्यच होतं.’’
‘‘तो तुझा प्रश्न आहे.’’
‘‘तू माझ्या जागी असतास तर काय केलं असतंस?’’
‘‘ती डोळे उघडे ठेऊन गेली. त्यात तिची कोणती गैरसोय होणार असेल तर तिचं तिने बघून घेतलं असतं.’’
‘‘तू म्हणतोस ते खरं आहे. पण तुझं तिच्यावर प्रेम नाही म्हणून तू असं म्हणू शकतोस.’’
‘‘तुझं अजून तिच्यावर प्रेम आहे?’’
‘‘पूर्वीपेक्षा जास्तच. स्ट्रिकलँड हा असा माणूस आहे की कोणत्याही स्त्रीला त्याच्यापासून सुख मिळणार नाही. मिळालं तरी ते जास्त दिवस टिकणार नाही. मी तिला कधीही अंतर देणार नाही हे तिला कळायला हवं.’’
‘‘याचा अर्थ तू तिला परत घ्यायला तयार आहेस?’’
‘‘अलबत. तिलासुद्धा मी हवा असणार. उद्या त्याने तिला झिडकारलं, त्यांचं भांडण झालं, त्याने तिचा अपमान करून तिला घालवून दिलं, तिच्या प्रेमाचा अव्हेर केला, तिचं हृदय विदीर्ण झालं, ती एकाकी झाली अशा वेळी तिला जायला कोणतीही जागा नाही असं व्हायला नको.’’
त्याच्यात पश्चातापाचं कसलंही चिन्ह दिसत नव्हतं. त्याच्या पुचाटपणाची मला चीड आली. कदाचित माझ्या मनातलं त्यानं ओळखलं असावं.
‘‘माझं तिच्यावर जसं प्रेम आहे तसं तिने माझ्यावर करावं अशी माझी अपेक्षा नाही. स्त्रियांनी ज्याच्या प्रेमात पडावं असा पुरूष मी नाही याची मला कल्पना आहे. ती स्ट्रिकलँडच्या प्रेमात पडली याचाही मी तिला दोष देत नाही.’’
‘‘तुझ्या इतका स्वाभिमानशून्य पुरूष मला अजून भेटलेला नाही.’’
‘‘मी तिच्यावर स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतो. प्रेमात स्वाभिमान येतो तेव्हा त्याचं स्वत:वरचं प्रेम जास्त असतं. लग्न झालेला पुरूष नेहमीच दुसऱ्या स्त्रीच्या प्रेमात पडत असतो. पण ते जेव्हा संपतं तेव्हा तो आपल्या बायकोकडे परत येतो आणि ती त्याला परत घेते. यात कोणाला काही वावगं वाटत नाही. पण हेच उलटं झालं तर त्यात वावगं काय?’’
‘‘तू जे म्हणतोस ते तर्कशुद्ध आहे हे कबूल केलंच पाहिजे,’’ मी हसत म्हणालो, ‘‘पण पुरूष इतके तर्कशुद्ध नसतात आणि बहुतेकांना हे सहन होणार नाही.’’
मी स्ट्रोव्हशी बोलत असताना हे सगळं इतक्या अचानक कसं घडलं या विचाराने अचंब्यात पडलो होतो. इतक्या दिवसात स्ट्रोव्हला कसलाही संशय आला नसावा हे मला पटलं नाही. ब्लांश स्ट्रोव्हच्या डोळ्यात तरळणारी ती विचित्र चमक मला आठवली. कदाचित तिला तिच्या हृदयातील चलबिचल जाणवली असावी आणि तिचं तिलाच आश्चर्य वाटलं असेल.
‘‘त्यांच्यात असं काही चालंल आहे याचा तुला पूर्वी कधी संशय आला नव्हता का?’’
त्याने काहीच उत्तर दिलं नाही. टेबलावर एक कागद आणि पेन्सिल पडलेली होती. त्या कागदावर त्याने नकळत एका चेहेऱ्याची आकृती काढली.
‘‘माझा प्रश्न तुला आवडला नसेल तर तसं स्पष्ट सांग.’’
‘‘बोलल्यानं मला किती बरं वाटतं ते माझ्यावर काय दु:ख कोसळलं आहे याची तुला कल्पना आली तरच तुला कळेल.’’ त्याने पेन्सिल खाली ठेवली. ‘‘मला गेले पंधरा दिवस माहित होतं, तिने सांगण्याच्या पूर्वी.’’
‘‘तू तेव्हाच स्ट्रिकलँडला का घालवून दिलं नाहीस?’’
‘‘माझा विश्वास बसत नव्हता. ते अगदी अशक्यच आहे असं मी धरून चाललो होतो. मला वाटलं की मत्सरामुळे मला तसं वाटत असेल. मी मुळात थोडासा मत्सरी आहेच. पण मत्सर दाखवायचा नाही असा माझा प्रयत्न असतो. माझं तिच्यावर जेवढं प्रेम आहे तेवढं तिचं माझ्यावर नाही हे मला ठाऊक होतं. ते साहजिकच होतं, नाही का. तिने मला तिच्यावर प्रेम करू दिलं तेवढ्यावरच मी खूश होतो. त्यांना वेळ मिळावा म्हणून मी तासंतास बाहेर जायचो. माझी लायकी नसताना ती मला तिच्यावर प्रेम करू देत होती आणि मी संशय घेत होतो म्हणून मी माझी मलाच शिक्षा करून घेत होतो. मी त्यांना नको आहे हे माझ्या लक्षात आलं होतं. स्ट्रिकलँडला नव्हे. त्याच्या लेखी मी असलो काय आणि नसलो काय काही फरक पडत नव्हता. ब्लांशलाच मी नको होतो. मी तिचं चुंबन घ्यायचा प्रयत्न केला की तिच्या अंगावर शहारे येत. मला काय करावं ते कळेना. मी जर काही तमाशा करण्याचा प्रयत्न केला असता तर ते मला हसले असते. मी तोंड बंद ठेवलं. जे होतंय त्याच्याकडे डोळे झाक केली तर सर्वकाही पूर्वपदावर येईल असं मला वाटलं. तो काही भांडणतंटा न करता गेला तर बरं यासाठी मी मनाची तयारी केली होती. मला ज्या यातना झाल्या त्या तुला कळल्या असत्या तर!’’
त्याने स्ट्रिकलँडला जायला कसं सांगितलं होतं त्याचं त्याने पुन्हा एकदा वर्णन केलं.
त्याला जा म्हणून सांगायची वेळ त्याने खूप काळजीपूर्वक निवडली होती. त्याने सहज वाटेल अशा शब्दात विनंती करण्याचं ठरवलं होतं. पण ऐन वेळी त्याचा आवाज कापायला लागला. त्याला स्वत:वर ताबा ठेवता आला नाही. विनंती करताना त्याने हसत हसत सौहार्दपूर्ण वातावरणात केली होती. पण त्याच्या शब्दात मत्सराचा कडवटपणा कधी आला ते त्याला कळलं नाही. स्ट्रिकलँड तिथल्या तिथे ताबडतोब निघून जायची तयारी करेल असं त्याला वाटलं नव्हतं. त्याहून त्याच्या बायकोने घेतलेला निर्णय त्याला मुळीच अपेक्षित नव्हता. आपण ठरवल्याप्रमाणे गप्प बसलो असतो तर फार बरं झालं असतं असं त्याला वाटायला लागलं. वियोगाच्या दु:खापेक्षा मत्सराग्नीचा जळफळाट परवडला असती.
‘‘माझ्या मनातून त्याचा जीव घ्यायचा होता पण त्याची परिणिती माझ्या फजितीत कशी झाली ते तुला मघाशीच सांगून झालं आहे.’’
तो खूप वेळ गप्प होता. नंतर तो त्याच्या मनातलं बोलला.
‘‘मी जर आणखी वाट पाहिली असती तर कदाचित सर्व काही ठीक झालं असतं. मी एवढं उतावीळ व्हायला नको होतं. अरे देवा, त्या गरीब बिचाऱ्या मुलीला मी कोणत्या संकटात ढकलून दिलं आहे.’’
मी कपाळावर हात मारला पण काही बोललो नाही. ब्लांशबद्दल मला थोडीसुद्धा सहानुभूती वाटत नव्हती. पण तिच्याविषयी मला काय वाटतं ते त्याला सांगितलं असतं तर त्याला खूप वाईट वाटलं असतं. त्याचं सारासार विवेकाचं भान हरपलं होतं. तो तीच ती गोष्ट परत परत सांगत होता. आलटून पालटून तीच वाक्य, तेच शब्द. त्याला एकदम पूर्वी न सांगितलेली गोष्ट आठवली. त्याने जे सांगितलं होतं त्या ऐवजी त्याने जे सांगायला हवं होतं त्याचं रडगाणं त्याने चालू केलं. त्याने जे केलं नव्हतं त्याचा आता त्याला पश्चाताप व्हायला लागला. तो स्वत:ला दूषणे देऊ लागला. ते रडगाणं संपता संपेना. मला कंटाळा यायला लागला.
‘‘आता तू काय करायचं ठरवलं आहेस?’’ शेवटी मी त्याला विचारलं.
‘‘मी काय करू? तिचा निरोप येईपर्यंत वाट बघणं याशिवाय माझ्या हातात काय आहे?’’
‘‘तू थोडे दिवस बदल म्हणून बाहेरगावी का जात नाहीस?’’
‘‘छे! छे! तसं करून चालणार नाही. तिला जर मदतीची गरज लागली तर मला येथेच असलं पाहिजे.’’

त्याला काळाचं भान उरलं नव्हतं. काय करायला हवं आहे हे ही त्याला कळत नव्हतं. मी त्याला झोपायला जायची सूचना केली तेव्हा तो म्हणाला की त्याला झोप येत नाही. बाहेर जाऊन दिवस उजाडेपर्यंत रस्त्यावर भटकत राहण्याचा त्याचा विचार होता. त्याला एकटं सोडण्यात अर्थ नव्हता. मी त्याला रात्र माझ्या घरी काढण्याची सूचना केली. त्याला माझ्या स्वत:च्या पलंगावर झोपवलं आणि मी बैठकीच्या खोलीतील दिवाणावर जाऊन झोपलो. तो एवढा थकून गेला होता की तो मला विरोध करू शकला नाही. तो कित्येक तास झोपून राहिल एवढा व्हेरोनॉलचा डोस मी त्याला पाजला. त्या क्षणी त्याच्यासाठी मी एवढंच करू शकत होतो.

1 comment: