Saturday, February 10, 2018

मून अँड सिक्सपेन्स – ४३

मागे वळून पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं की चार्ल्स स्ट्रिकलँडबद्दल आतापर्यंत मी जे काही लिहीलं आहे ते फारसं समाधानकारक नाही. ज्या घटना माझ्या समोर घडल्या त्या विषयी मी लिहीलं आहे. पण त्यांची मला पुरेशी माहिती नव्हती. त्या का घडल्या ते मला सांगता आलं नसतं. चार्ल्स स्ट्रिकलँडने चित्रकार बनण्याचा जो निश्चय केला होता तो एक अचानक आलेला झटका होता. त्याच्या आयुष्यात घडलेल्या काही घटना त्याला कारणीभूत झाल्या असण्याची शक्यता होती. काहीही असलं तरी मुख्य कारण मला माहित नव्हतं. त्याच्या बोलण्यातून कसलाच पत्ता लागत नव्हता. चार्ल्स स्ट्रिकलँड नावाच्या एका विलक्षण चमत्कारीक व्यक्तिच्या आयुष्याचं, सत्य घटनांच्या आधारे वर्णन करण्याऐवजी मी जर एखादी कादंबरी लिहायला घेतली असती तर मग त्याने चाळीशी उलटल्यावर अचानक चित्रकार व्हायचा निर्णय का घेतला यासाठी मला काहीतरी कल्पनाचित्र उभं करावं लागलं असतं. लहानपणापासून चित्रकार बनण्याचा ध्यास घेतला होता पण केवळ वडिलांच्या इच्छेला मान देण्यासाठी त्याच्यावर पाणी सोडावं लागलं किंवा परीस्थितीने मजबूर झाल्यामुळे पोटापाण्याचा व्यवसाय पत्करावा लागला. आयुष्यातील मर्यादांमुळे झालेला कोंडमारा वगैरे गोष्टी दाखवून मी त्याला मोठा केला असता. वाचकांची सहानुभूती त्याला मिळावी अशी काळजी घेतली असती. कदाचित त्याला चित्रकलेच्या विश्वातील नव्या मनूचा उद्गाता केला असता. मानवाच्या कल्याणासाठी वैयक्तिक सुखांवर पाणी सोडणारा युगपुरूष चित्रकार.
दुसऱ्याही एका पध्दतीने मला त्याच्या वैवाहिक आयुष्याशी संबंध जोडून दाखवता आला असता. असं दाखवण्याचे अनेक मार्ग आहेत. बायकोचे एखाद्या लेखकाशी असणारे संबंध, काहीतरी घरगुती प्रश्न, त्यांच्या संसारात दुसऱ्या स्त्रीचे आगमन, मत्सराग्नीतून पेटलेला विद्वेषाचा वडवानल. त्या परिस्थितीत मिसेस स्ट्रिकलँड मी अगदी वेगळी दाखवली असती. सदैव कटकट करणारी, हटवादी, कजाग बायको किंवा आपल्या नवऱ्याचं कलाकार म्हणून कसलंही कौतूक, सहानुभूती नसणारी, एक तर अरसिक, किंवा सतत हेटाळणी करणारी. स्ट्रिकलँडचं वैवाहिक जीवन अयशस्वी, दु:खी दाखवता आलं असतं. बायको त्याच्या तोडीची नाही आणि तरीही त्याने भरपूर वाट पाहिली. तिच्या विषयी वाटणाऱ्या करूणेमुळे त्याने संसाराचं जोखड फेकून दिलं नव्हतं. असं दाखवायचं तर त्यांना विनापत्य दाखवावं लागलं असतं.
या कथेत आणखी रंग भरण्यासाठी एका बुजूर्ग चित्रकाराचं पात्र निर्माण केलं असतं. त्या चित्रकाराने व्यावसायीक दृष्ट्या यश मिळवण्यासाठी आपल्यातील कलेला दाबून ठेवलेलं असतं. त्याच्या उतारवयात त्याला स्ट्रिकलँड भेटतो. त्याच्यामध्ये त्याला मोठ्या चित्रकाराची बीजे दिसतात. आपल्याला जे जमलं नाही ते याला जमेल या विचाराने तो स्ट्रिकलँडला चित्रकलेसाठी सर्वस्व पणाला लावायाला सुचवतो. असं दाखवण्यात मोठी गंमत आली असती. स्वत: यश आणि संपत्तीत लोळत असताना दुसऱ्याला मात्र कलेसाठी भिकेला लावण्यातील विसंगती मोठी मनोरंजक ठरली असती.
पण प्रत्यक्षात असं काहीच नव्हतं. एक मुलगा शिक्षण संपवून सरळ शेअर ब्रोकरच्या ऑफिसमध्ये नोकरीला लागतो. त्यात मनाविरूद्ध असं फारसं काही नसतं. लग्न होईपर्यंत तो अगदी इतरां सारखा सामान्य आयुष्य जगत असतो. शेअर बाजारात थोडाफार सट्टा, कधीतरी डर्बी, ऑक्सफर्ड नाहीतर केंब्रिज रेसवर लावलेला एखाद दुसरा सॉव्हरीन. मला वाटतं कधीतरी फावल्या वेळात त्याने मुष्टीयुद्धसुद्धा खेळून पाहिलं असावं. तो पंच आणि स्पोर्टींग टाईम्स वाचत असे. नृत्यासाठी तो हॅम्पस्टीडला जाई.
त्याचा पॅरीसमध्ये चित्रकलेत प्राविण्य मिळवण्यासाठी झगडण्यात गेलेला काळ एकसुरी आणि कंटाळवाणा होता. तो पैसे मिळवण्यासाठी जे करत होता त्यात सांगण्यासारखं काही खास होतं असं मला वाटत नाही. पण पोटापाण्यापुरती कमाई निश्चित करत असावा. तो काय उद्योग करत होता त्याचा हिशेब ठेवला तर त्यात पॅरीसच्या गुन्हेगारी विश्वाचा इतिहास लिहीता आला असता. पण त्याचा त्या लोकांशी जरी संबंध आला असला तरी त्यांचा परिणाम त्याच्यावर झाला नसावा. त्याला आलेल्या अनुभवांच्या शिदोरीवर पॅरीसमधल्या बदमाशांच्या जीवनावर एखादी आधुनिक कादंबरी लिहीता आली असती. पण तो कशातही भाग घेत नसे. त्याच्यावर प्रभाव पडण्यासारखं त्याकाळात काही घडलं नव्हतं असं त्याच्याशी झालेल्या गप्पांमधून कळलं होतं. कदाचित तो पॅरीसला गेला तेव्हा पॅरीसच्या रंगढंगांना भुलून बळी पडण्याइतका तो तरूण नव्हता. विचित्र वाटेल, पण वागण्यात तो अगदी पक्का व्यवहारी होता. मला वाटतं त्याकाळातलं त्याचं आयुष्य तसं रोमांचकारी असावं पण त्याला काही ते रोमांचकारक वाटत नसे. आयुष्यतील रोमान्स समजण्यासाठी एखाद्या अभिनेत्यासारखं असावं लागतं. माणूस एक भूमिका घेऊन जगत असतो. त्या भूमिकेतून बाहेर येऊन स्वत:कडे बघता येण्याची कला अवगत असावी लागते. स्ट्रिकलँडचं मनएक मार्गी होतं. त्याचं आत्मभान पराकोटीचं होतं. चित्रकलेच्या तांत्रिक अंगांत त्याने जे प्राविण्य मिळवलं त्यासाठी त्याने किती परीश्रम घेतले असतील ते मला माहित नाही. पण कोणाचंही सहाय्य न घेता स्वत:च्या चुका सुधारत सुधारत तो एक एक गोष्ट शिकत गेला. मी स्ट्रिकलँडला चित्र काढताना कधी पाहिलेलं नव्हतं. तो स्टुडियोत एकटाच असायचा. त्याच्या प्राक्तनाबरोबर त्याचा जो लढा चालू होता त्यात त्याने कोणाचीही मदत घेतली नव्हती.
त्याचा आणि ब्लांश स्ट्रोव्हच्या संबंधांचा मी जेव्हा विचार केला तेव्हा माझ्या हाती इकडे तिकडे विखुरलेले काही तुकडे लागले. एका अटळ शोकांतिकेच्या दिशेने चाललेला प्रवास वर्णन करताना माझ्या कथेच्या दृष्टीने त्याची सुसंगत मांडणी करता येईल. पण ते तीन महिने एकत्र राहत होते त्या दरम्यान त्यांच्यात काय झालं ते मला काय दुसऱ्या कोणालाच माहित नाही. ते दिवसाचे चौवीस तास एकत्र राहत होते. शरीरसंबंध दिवसातून होऊन होऊन कितीवेळा करता येऊ शकेल. इतर वेळेला ते काय करत असतील त्याची मी फक्त कल्पनाच करू शकतो. जो पर्यंत दिवसाचा प्रकाश आहे आणि ब्लांश पोज देऊन थकत नाही तो पर्यंत स्ट्रिकलँडचं चित्र काढणं चालत असेल. त्याला चित्रात पूर्णपणे बुडालेला पाहून सहाजिकच ती वैतागून जात असेल. चित्र काढताना तिचं अस्तित्व फक्त एक मॉडेल म्हणून असेल. स्त्री म्हणून तिच्या अस्तित्वाला एरवीही त्याच्या लेखी किंमत शून्य होती. चित्र काढून झाल्यावर सुद्धा काही न बोलता तासंतास शांततेत बसून काढायचे त्याने ती घाबरली असेल. डर्क स्ट्रोव्हवर सूड उगवायला म्हणून ती त्याच्याकडे आपल्या पावलांनी चालत आली असेल असंही त्याने तिला सुचवायला कमी केलं नसेल. असं सुचवताना त्याने अनेक शक्याशक्यतांच्या काळोख्या गुहेचा दरवाजा उघडला होता. असं काही झालं नसेलही. पण असं झालं असेल तर ते महाभयंकर होतं. मानवी मनाच्या सूक्ष्म व्यवहारांचा थांग कोणाला लागला आहे का? जे फक्त नाजूक साजूक रूमानी भावनांचा विचार करतात त्यांना हे जमणार नाही. स्ट्रिकलँडचा अलिप्तपणा हा न संपणारा आहे हे जेव्हा ब्लांशच्या लक्षात आलं तेव्हा ती हताश झाली असेल. त्याच्या लेखी ती एक व्यक्ति नसून फक्त शरीरसुख मिळवण्याचं साधन आहे हे तिला कळून चुकलं असेल. तो अजूनही तिला परकाच आहे. तिने त्याला तिच्यामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न केला असेल. तिने त्याची काळजी घेतली असेल, त्याला चांगलं खाऊ पिऊ घातलं असेल. त्याच्या आवडीनिवडी अशा काही नव्हत्या तरीही त्याच्या बारीकसारीक सुखसोर्इंकडे तिने लक्ष दिलं असेल. पण त्याचं असल्या कोणत्याही गोष्टींकडे मुळीच लक्ष नव्हतं. त्याला एकट्याला सोडण्याची भिती वाटल्याने ती सतत त्याच्या अवतीभवती राहत असेल, त्याची कामवासना सतत जागृत ठेवण्याचा प्रयत्न करत असेल. त्याला आपल्या मुठीत ठेवण्यासाठी ती त्याला मिठीत घेण्याचा प्रयत्न करत असेल. तिचे सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत हे तिला जाणवलं असेल पण ते नाकारून ती त्याच त्या गोष्टी परत परत करत असेल. प्रेमाने ती आंधळी झाली होती, नाकासमोरचं सत्य तिला दिसत नव्हतं, आपल्या प्रेमाला प्रतिसाद मिळणं शक्य नाही हे तिला समजत नव्हतं.
मला बऱ्याच गोष्टींची माहिती नसल्यामुळे स्ट्रिकलँडच्या स्वभावाचा मी जो अभ्यास केला होता त्यात बऱ्याच त्रुटी राहून गेल्या होत्या. मी त्याच्या आयुष्यातील स्त्रियांविषयी खूप लिहीलं आहे, पण त्याच्या आयुष्यात स्त्रियांना फार महत्व नव्हतं. तरीही त्यातून शोकांतिका व्हावी हे एक दुर्दैव होतं. त्याच्या आयुष्यात खरं स्थान कशाला असेल तर ते फक्त भव्य स्वप्न आणि त्यासाठी उपसलेले प्रचंड कष्ट.
येथे कादंबरीतील कल्पित स्पष्ट होतं. पुरूषासाठी प्रेम म्हणजे दिवसात घडणाऱ्या अनेक घटनांपैकी एक घटना असते. कादंबऱ्यांतून प्रेमावर भर दिला जातो पण प्रत्यक्षात ते काही खरं नसतं. काही पुरूषांना प्रेम हे सर्वात महत्वाचे वाटत असते. पण प्रत्यक्षात ते स्वत: अगदी सामान्य असतात. प्रेमाला अत्युच्च महत्व देणाऱ्या स्त्रियांनासुद्धा ते आवडत नाहीत. पुरूष प्रेम करतात पण ते करत असतानाच त्यांचं मन दुसऱ्या गोष्टीत गुंतत असतं. उदा. त्यांचा पोटापाण्याचा उद्योग व्यवसाय, फावल्या वेळातील छंद, खेळ, कला, संगीत इत्यादी अनेक गोष्टीत त्यांचं मन गुंतलेलं असतं. या सगळ्या गोष्टी एकाच वेळी त्यांच्या मनाच्या वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये असतात. त्यापैकी जी गोष्ट चालू असेल त्या कोणत्याही एका गोष्टीवर लक्ष केंद्रीत करणं त्यांना सहज जमतं. एका कप्प्यातील गोष्टींच दुसऱ्या कप्प्यातील गोष्टीवर आक्रमण झालेलं त्यांना आवडत नाही. स्त्री आणि पुरूष प्रेमिकांमध्ये हा महत्वाचा फरक असतो. स्त्री दिवसाचे चोवीस तास प्रेम करू शकते पण पुरूष मात्र प्रेमाला फक्त अधूनमधूनच वेळ देऊ शकतो.
स्ट्रिकलँडची लैंगिक भूक खूप कमी होती. त्याच्या लेखी कामभावनेला फार महत्व नव्हतं. ती एक कटकट होती. त्याचा जीव रमायचा तो इतर गोष्टीत. त्याची कामेच्छा तीव्र होती. कधी कधी ती हिंदास्रपणे वर उफाळून येई आणि तो वासनेला बळी पडे. आत्मभान विसरायला लावणाऱ्या त्या वासनेचा त्याला तिटकारा होता. मला वाटतं त्यामुळे त्याला त्याच्या जोडीदाराचाही तिटकारा वाटत असावा. एकदा भानावर आल्यानंतर ज्या स्त्रीचा त्याने उपभोग घेतला होता ती स्त्री त्याला नजरेसमोर नको असायची. त्यावेळी त्याची अस्मानात तंद्री लागलेली असायची, गुलाबाच्या बागेत बागडणाऱ्या फुलपाखराला घाणेरीचं फुल बघून जसं वाटेल तसं त्याला त्यावेळी वाटत असावं. मला वाटतं कला ही लैंगिक प्रवृत्तीचा अविष्कार असते. सुंदर स्त्री, चंद्रप्रकाशात न्हाणाऱ्या नेपल्सच्या समुद्र किनाऱ्यासारखं सुंदर दृश्य किंवा टिशिअनच्या एन्टॉम्बमेंटसारखं सुंदर पेंटींग बघून ज्या भावना मनात उचंबळतात त्या सारख्याच असतात. स्ट्रिकलँडला लैंगिक समाधानापेक्षा कलानिर्मितीतून मिळणारे समाधान जास्त श्रेष्ठ वाटत असे. त्यामुळे लैंगिक भूक शमल्यावर त्याला त्याचा तिटकारा येई. एखादा क्रूर, स्वार्थी आणि लिंगपिसाट माणूस हा त्याच वेळी एक महान आदर्शवादीसुद्धा असू शकतो हे खरं आहे.
तो एखाद्या बिगाऱ्यापेक्षा दारिद्र्यात रहायचा. तो खूप मेहनत करायचा. इतर लोक ज्या छोट्या मोठ्या सुखसोर्इंनी आपलं जीवन सुखकर करत असत त्यांच्याकडे हा साफ दुर्लक्ष करत असे. त्याला पैशाची, प्रसिद्धीची हाव नव्हती. त्याची स्तुती करावी तर त्याला ते आवडत नसे. आपण ज्या तडजोडी करतो तशा प्रकारच्या कोणत्याही तडजोडी करण्याचा मोह तो टाळत असे. किंबहुना अशी तडजोड करणं शक्य आहे आणि त्यापासून काही तरी लाभ होईल हे त्याच्या डोक्यातच शिरत नसे. पॅरीससाख्या शहरात राहूनही तो एखाद्या तपस्व्यापेक्षा एकाकी होता. मित्रांनी त्याला एकटं सोडावं एवढं सोडलं तर त्यांच्याकडून त्याची कसलीही अपेक्षा नसे. त्याचं उद्दीष्ट स्पष्ट होतं. उद्दीष्ट गाठण्यासाठी बरेचजण स्वत:चं आयुष्य पणाला लावायला तयार असतात पण स्ट्रिकलँडची स्वत:च्या आयुष्याबरोबर दुसऱ्याचं आयुष्यसुद्धा पणाला लावायाची तयारी होती. त्याला खूप लांबचा पल्ला गाठायचा होता.

स्ट्रिकलँड माणूस म्हणून अत्यंत नीच आणि तिरस्करणीय होता पण तरीही मला वाटतं की तो चित्रकार म्हणून फार महान होता.
Artist: Titian (–1576)
Title: The Entombment of Christ, Date: between 1523 and 1526
Medium: oil on canvas, Dimensions: H 148 cm (58.3 in) W 205 cm (80.7 in)
Current location: Louvre Museum, Source: wikidata:Q3705716

7 comments:

  1. कादंबरीचा झपाटा, लेखकाची गुंगवून टाकणारी शैली, पोतडीतून एक एक अशी रहस्य बाहेर काढत वळणा वळणाने पुढे जाणारं कथानक आणि अनुवादकाने त्याचा बरोबर पकडलेला नेमका सूर या सगळ्यात माझ्यासारख्या वाचणाऱ्याला धाप लागते आणि मग प्रतिक्रिया द्यायची तर आहे पण पुढल्यावेळी देऊ असे करत राहून जातं.

    मलातर आत्तापर्यंत यातली मुख्य व्यक्तिरेखाच ध्यानात येत नव्हती. नक्की ही गोष्ट कोणाची आहे (अजूनही कदाचित मोठा ट्वीस्ट असला पुढे तर या कल्पनेने थांबावं लागत आहे) हेच ध्यानात येत नव्हत.

    चित्रकाराच्या ठाम फटका-यासारखे प्रत्येक व्यक्तिमत्वाचे ठाशीव रेखाटन वाचताना मजा येत आहे. लेखकाच्या लेखनाचं मर्म अनुवादकाला समजलं तर अनुवाद सशक्त होतो असं जाणकार म्हणतात. त्याचा प्रत्यय इथे येतो. चित्र आणि चित्रकलेविषयीची अनुवादकाची स्वतःची जाण या आधीच्या मुलॉ रूजमध्ये प्रत्ययाला आली होती. इथे त्याच्या पुढला पल्ला गाठलेला दिसतो. निवडलेली चित्र याची पुरेपूर साक्ष देतात.

    पुढील भाग वाचण्याची उत्कंठा आहे.

    ReplyDelete
  2. भन्नाट । हाच शब्द योग्य आहे ।आनंद पत्कीनं माझ्या मनातली कॉमेंट दिली आहे।
    माझ्या मनातली एक थेअरी ही कादंबरी वाचल्यामुळे उध्वस्त होत आहे। माणुसकीचा विचार करणाराच महान कलाकार होऊ शकतो असं आपलं मला वाटायचं । नीच माणूस महान कलाकार होऊच शकणार नाही असं मला वाटायचं । पण या कादंबरीन माझ्या मनातल्या या मुल्यालाच छेद दिला आहे।

    ReplyDelete
    Replies
    1. आनंद आणि रविसारख्या मित्रांच्या प्रतिक्रियांमुळे ब्लॉगवर कादंबरी पोस्ट करण्याचा उपक्रम केला त्याचं समाधान मिळतं अन्यथा तो एक उपद्वाप ठरला असता.

      Delete
  3. पूर्ण कादंबरी वाचल्यावर हा थोडा मत बदल होऊ शकतो. मुल्यविचार हा एक च्रर्चेचा वेगळाच मुद्दा होऊ शकेल. केशव कासार यांनी त्यांचे मत इथे द्यावे.

    ReplyDelete
  4. कलावंतांच्या कलनिर्मितीत त्याची नैतिकता किंवा अनैतिकता याने काहीही फरक पडत नाही. कलावंत नीतिमान असेल तर त्याची निर्मिती उत्कृष्ट , दर्जेदार अन्यथा निकृष्ट असं समजणे हा भाबडेपणा आहे. अनेक थोर होऊन गेलेली चित्रकार मंडळी तशी नीतिमान होती असं दिसून येत नाही. पिकासो वगैरेंचं उदाहरण पाहता येईल.
    आपल्याकडे ठाकूर सिंगांच्या 'ओलेती'मुळे कला आणि नीती यावर बरेच चर्वितचर्वण झाले. देसाईंनी राजा रविवर्मा कादंबरीत अश्या भाबडेपणाचा कळस केलेला आहे . आणि अश्या कादंबऱ्या वाचून मराठी वाचक कलावंतांच्या चारित्र्याविषयी भाबडेपणाने काहीबाही बोलत असतो .

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी मोजक्या शब्दात वर्णन केले.

      Delete
    2. आयन रँडच्या Virtue of selfishness किंवा Individualism च्या दृष्टीतून स्ट्रिकलँडकडे पाहिलं तर त्याचं वर्तन अनैतिक वाटेल का? मॉमला आयन रँडचा पूर्वसुरी म्हणता येईल का.

      Delete