Saturday, February 17, 2018

मून अँड सिक्सपेन्स – ५७


तेवढ्यात मादाम कोत्रास आल्याने आमच्या गोष्टीत खंड पडला. वाऱ्याने तट्ट फुगलेल्या शिडाच्या जहाजासारखी ती आमच्या बैठकीत शिरली. तिचं व्यक्तिमत्व भारदस्त होतं. ती उंच आणि स्थूल होती. तिने घातलेल्या घट्ट कॉर्सेट मुळे तिचा लठ्ठपणा अधिक उठून दिसत होता. तिचं नाक बाकदार होतं. एकावर एक आलेल्या तीन हनुवट्यांनी तिची मान झाकली गेली होती. उष्ण कटीबंधातील लोकांत असते तशी मरगळ अजून तिच्या अंगात आलेली दिसत नव्हती. किंबहुना थंड प्रदेशातील लोकांपेक्षा ती जास्तच उत्साही दिसत होती. ती प्रचंड बडबडी असावी. कारण आल्याबरोबर तिने त्या दिवसभरातल्या घटना आणि त्यावरची तिची मतं घडाघडा सांगायला सुरवात केली. आम्ही जे बोलत होतो ते कुठल्या कुठे मागे पडलं.
डॉ. कोत्रास माझ्याकडे वळून म्हणाले.
‘‘स्ट्रिकलँडने दिलेलं पेंटींग अजून माझ्याकडे आहे. तुम्हाला बघायचं आहे का?’’
‘‘अलबत.’’
आम्ही उठलो. त्यांच्या मागोमाग व्हरांड्यातून जाताना आम्ही त्यांच्या बागेतील रंगीबेरंगी फुलं पाहण्यासाठी थांबलो.
‘‘स्ट्रिकलँडने पाना फुलांच्या ज्या विलक्षण आकारांचं त्याच्या घराच्या भिंतीवर चित्रण केलं होतं ते बरेच दिवस माझ्या मनात घोळत होतं.’’ डॉक्टर विचार करून म्हणाले.
माझ्याही मनात तोच विचार होता. स्ट्रिकलँडने स्वत:चं संपूर्ण अस्तित्वच त्यात पणाला लावलेलं होतं. ही त्याची शेवटची संधी आहे हे त्याला ठाऊक होतं. त्याला जीवनासंबंधी जे सांगायचं होतं ते सगळं त्याने त्याच्या कलाकृतीत ओतलं होतं. त्याला जे समाधान हवं होतं ते त्याला मिळालं असावं याची मला खात्री होती. त्याला ज्या शक्तिने झपाटलं होतं त्यातून तो मुक्त होऊन त्याचा अतृप्त आत्मा शेवटी शांत झाला असावा.
जीवनाचा उद्देश पूर्ण झाल्यावर आलेल्या मृत्युचा स्वीकार त्याने आनंदाने केला असावा.
‘‘चित्राचा विषय काय आहे?’’
‘‘मला सांगता येणार नाही. तो विलक्षण आणि अद्भूत आहे. या विश्वाची सुरवात कशी झाली असावी याची कल्पना त्यात केली आहे. एडनची बाग, आदम आणि इव्ह. क्वी सेज - किंवा तसंच काही तरी. मानवाकृतीतील ते एक काव्य आहे. स्त्री पुरूष आणि त्याचं निसर्गप्रेम, कामवासना आणि उदात्तीकरण, सौंदर्य आणि क्रौर्य. नग्नतेतील आदिम सहज-प्रवृत्ती पाहिली की भिती वाटू लागते कारण ते आपलंच प्रतिबिंब असतं.’’
‘‘अवकाश आणि काळाची अनंतता. त्याची चित्रं पाहिल्यानंतर माझ्या रोजच्या पाहाण्यातल्या ताड-माड, वड, केळी, पळस या सारख्या वृक्षवल्लींचे आकार आणि रंग मला वेगळेच दिसायला लागले. एवढंच नव्हे तर गंधही बदलले. चित्र काढताना कॅनव्हासवर उतरवलेला आकार आणि रंग मला प्रत्येक वेळी वेगळा वाटतो ही किमया अद्भूतच म्हटली पाहिजे. काही तरी दैवी शक्तिचा प्रादुर्भाव झाल्याशिवाय हे शक्य होणार नाही.’’
डॉ. कोत्रासनी खांदे उडवले आणि ते हसले.
‘‘तुम्ही मला हसाल. मी जडवादी आहे. त्यात माझा हा असा अवतार, जाड्या ढोल. काव्यातील तरलता माझ्या तोंडी शोभत नाही. पण मी एवढा भारावून जाईन असं चित्र, कलाकृती मी या पूर्वी पाहिली नव्हती. तेने... एक मिनीट थांबा. मी रोममध्ये सिस्टीन चॅपेल बघायला गेलो होतो तेव्हा माझ्या मनात अशाच भावना आल्या होत्या. तेव्हासुद्धा ज्या कलाकाराने त्या भव्य घुमटावर चित्रं रंगवली त्या कामाच्या भव्यतेतील दिव्यत्त्वाच्या जाणीवेने माझा थरकाप उडाला होता. त्याच्या समोर माझं अस्तित्व क्षुल्लक होतं. पण मायकेल अँजेलोच्या थोरवीची आपल्याला कल्पना असते त्यामुळे आपण एवढे दचकून जात नाही. पण तारावाओच्या जंगलातील, नागरी संस्कृती पासून हजारो मैल दूर, एका आदिवासीच्या झोपडीत तुम्हाला असं काही बघायला मिळतं तेव्हा त्याचा तुम्हाला केवढा धक्का बसतो. मायकेल अँजेलो हाती पायी तरी धड होता, चर्चचा त्याला पाठिंबा होता. पण इथे ज्याच्या हाताची बोटं झडून गेली आहेत, डोळ्यांच्या खाचा झाल्या आहेत, समोर मृत्यु उभा ठाकला आहे, सर्वांनी ज्याला बहिष्कृत केलं आहे अशा कलाकाराने तेवढीच भव्य आणि दिव्य कलाकृती निर्माण केली होती या विचाराने तुमचा थरकाप उडतो. तुमचं क्षुल्लक अस्तित्व अर्थहीन होऊन जातं. त्यामुळेच त्या कलाकृती नष्ट झाल्या तेव्हा मला आश्चर्य वाटलं नाही.’’
‘‘नष्ट झाल्या?’’ मी ओरडलो.
‘‘मे उई - होय. तुम्हाला माहित नव्हतं?’’
‘‘कसं ठाऊक असणार? या कामाविषयी मी फारसं काही ऐकलं नव्हतं. पण असं काही असलंच तर ते एखाद्या खाजगी संग्राहकाच्या हाती पडलं असेल असं मला वाटत होतं. अजून तरी स्ट्रिकलँडच्या पेंटींगची अधिकृत यादी कोणी बनवलेली नाही.’’
‘‘तो जेव्हा आंधळा झाला तेव्हा तो त्या दोन खोल्यात जाऊन त्याने रंगवलेल्या भित्तीचित्रांकडे तासन् तास त्याच्या दृष्टीहीन डोळ्यांनी बघत बसायचा. कदाचित त्याला आयुष्यात जे दिसलं नसेल ते त्याला आता दिसत असेल. आटा म्हणाली की त्याच्या नशीबी जे आलं होतं त्याबद्दल त्याची कसलीही तक्रार नसायची. त्याचा धीर कधीही सुटला नव्हता. शेवट पर्यंत त्याचं मन शांत होतं. पण त्याने तिच्याकडून एक वचन घेतलं होतं की त्याला पुरून झाल्यानंतर - मी तुम्हाला सांगितलं होतं का की त्याची कबर मी माझ्या हातांनी खोदली. गावातील कोणीही त्या संसर्गीत घराच्या जवळ यायला तयार नव्हतं. आटा आणि मी मिळून दोघांनी त्याला पुरलं. तीन परेओ एकत्र शिवून केलेलं प्रेतवस्त्र पांघरून त्याला आंब्याच्या झाडाखाली पुरलं. त्याने तिच्याकडून वचन घेतलं होतं की त्याला पुरून झाल्यानंतर ती त्यांचं घर संपूर्णपणे जाळून टाकेल, एक काडीही शिल्लक राहिली नाही याची खात्री करून नंतरच तेथून जाईल.’’
थोडा विचार करून झाल्यावर मी म्हणालो:
‘‘तो शेवट पर्यंत बदलला नाही.’’
‘‘तिला घर जाळण्यापासून परावृत्त करणं हे माझं कर्तव्य आहे असं मला वाटलं.’’
‘‘तुम्ही जे सांगितलं त्या नंतरसुद्धा तुम्हाला असं वाटलं.’’
‘‘होय. कारण ती झोपडी एका प्रतिभावान कलाकाराची असामान्य कलाकृती आहे याची मला कल्पना होती. जगाला या कलाकृती पासून वंचित ठेवण्याचा कोणताही हक्क आपल्याला पोचत नाही. पण आटा माझं ऐकायला तयार नव्हती. त्या रानटी कृत्याचा साक्षीदार होण्याची माझी इच्छा नव्हती. तिने ते जाळून टाकलं हे मला मागाहून कळलं. तिने लाकडी तक्तपोशी आणि गवती चटयांवर पॅराफिन टाकलं आणि त्याला आग लावली. थोड्याच वेळात आगीच्या ज्वाला भडकल्या आणि त्या आगीत त्या महान कलाकृतींचा मागमूसही शिल्लक राहिला नाही.’’
‘‘मला वाटतं स्ट्रिकलँडला आपण महान कलाकृती निर्माण केली आहे याची कल्पना असावी. त्याला जे हवं होतं ते त्याने मिळवलं होतं. त्याचं आयुष्य सफल झालं होतं. त्याने आपल्या प्रतिभेने एक वेगळं जग निर्माण केलं. गर्वाने आपल्या निर्मितीकडे एकदा पाहून झाल्यानंतर त्याने ते तुच्छतेने नष्ट केलं.’’
‘‘माझ्याकडचं पेंटींग तर तुम्हाला दाखवतो.’’ डॉ. कात्रोस म्हणाला.
‘‘आटा आणि त्या मुलाचं काय झालं?’’
‘‘ते मार्क्वेजला गेले. तेथे तिचे काही नातेवाईक राहतात. मी ऐकलंय की तो मुलगा कॅमेरूनच्या जहाजावर काम करतो. लोक म्हणतात की दिसायला तो अगदी त्याच्या वडिलांसारखा आहे.’’
व्हरांड्यातून कन्सल्टींग रूमकडे जाणाऱ्या दरवाजात ते थबकले आणि हसत म्हणाले, ‘‘हे एक फळांचं चित्र आहे. डॉक्टरच्या कन्सल्टींग रूममध्ये लावण्यात तसा अर्थ नाही. पण माझी बायको मला ते दिवाणखान्यात लावू देत नाही. तिच्या मते ते अश्लील आहे.’’
‘‘फळांचं चित्र आणि अश्लील!’’ मी आश्चर्याने ओरडलो.
आम्ही आत गेल्यावर ताबडतोब माझं त्या चित्राकडे लक्ष गेलं. मी ते बराच वेळ बघत होतो.
त्या चित्रात आंबे, केळी आणि संत्र्यांचा एक ढीग दाखवला होता. पहिल्या दृष्टीक्षेपात ते एक सामान्य निरागस चित्र वाटतं. पोस्ट-इंप्रेशनीस्टांच्या प्रदर्शनात सर्वसामान्य माणसाला ते चांगलं वाटलं असतं पण पोस्ट-इंप्रेशनीस्टांचं म्हणता येईल असं एखादं वैशिष्ट्य काही त्यात सापडलं नसतं. पण प्रदर्शन बघून झाल्यानंतरही कदाचित ते लक्षातही राहिलं असतं, पण का लक्षात राहिलं ते सांगता आलं नसतं. ते अगदिच विसरणं कठीण होतं.
त्यात वापरलेले रंग अगदी अनोखे होते. विशेषत: लेपिझ लझुली – फिरदोसीच्या रत्नप्रभेची आठवण करून देणारा निळा रंग. त्या रंगाने जागृत होणाऱ्या भावना शब्दाने वर्णन करून सांगणं कठीण होतं. मध्येच सडलेल्या मांसासारख्या दिसणारा जांभळा रंग – रोमन सम्राट हेलिओगॅब्युलसच्या दुष्कृत्यांची आठवण करून देणारा – आणि लाल रंगांच्या असंख्य छटा,  चेरीची आठवण करून देणाऱ्या लालचुटुक रंगाने तर इंग्लंडमधील नाताळ, बर्फवृष्टी आणि मुलांच्या ओसंडून वाहणाऱ्या उत्साहीची आठवण यावी. तर मध्येच बर्फासारखा, कबुतराच्या छातीसारखा वरखाली होणारा, शुभ्र पांढरा. डोंगरातून वाहत येणाऱ्या निर्झराच्या हिरव्या रंगात बुडलेला जर्द पिवळा. अ‍ॅडमने इव्हला दिलेल्या सफरचंदाची आठवण करून देणारी ही पॉलिनेशियाच्या मळ्यात बहरलेली रसाळ फळं. त्यांची चव चाखणाऱ्याला एक मोठा धोका अजाणता पत्करावा लागला असता. फळ खाणारा एक तर देवत्वाला जाऊन पोचला असता नाही तर पशुत्वाला. जाणतअजाणता असा धोका पत्करण्यामधेच मनुष्यपण असतं. ज्ञानवृक्षावरील चांगलं फळ कोणतं आणि वाईट फळ कोणतं हे चाखल्या शिवाय कसं कळणार.
चित्र बघून झाल्यावर मी बाजूला वळलो. स्ट्रिकलँडबरोबर त्याची गुपितंही त्याच्या कबरीत गाडली गेली आहेत असं मला वाटलं.
‘‘व्होयाँ, रेने, मॉन अ‍ॅमी, रेने मी आले,’’ मादाम कात्रोसची मोठ्याने मारलेली हाक ऐकू आली. ‘‘इतका वेळ तिकडे काय करत आहात? अ‍ॅपरीतीफ तयार आहेत. क्विनक्विना ड्युबोनेटचा एक एक पेला घ्यायला येता का, मस्यना विचारा.’’
‘‘व्हॉलंतीर, मादाम. मी आलोच,’’ मी उत्तर दिलं आणि व्हरांड्यात गेलो.
माझी तंद्री भंग पावली.

Paul Gauguin, Fruits, 1888
Oil on canvas, 58x43 cm
Pushkin Museum, Moscow


1 comment: