Monday, February 5, 2018

मून अँड सिक्सपेन्स – ३१

दुसऱ्या दिवशी मी स्ट्रोव्हला माझ्याकडेच राहण्याचा आग्रह केला तरीही तो निघून गेला. त्याच्या स्टुडियोत जाऊन त्याचं सामान आणायची मी तयारी दाखवली पण त्याला स्वत:च जायचं होतं. त्याला वाटलं असावं की त्याच्या बायकोने अजून त्याचं सामान बांधलं नसावं. त्या निमित्ताने त्याला तिला भेटता येईल आणि तिचं मतपरिवर्तन करण्याची एक संधी मिळेल. पण त्याला त्याच्या सामानाचं गाठोडं कन्सर्जकडे ठेवलेलं मिळालं. कन्सर्जने त्याला ब्लांश बाहेर गेल्याचं सांगितलं. विरहाचं दु:ख तिला सांगायचा मोह त्याला आवरता आला नसता पण ती नसल्यानं नाईलाज झाला होता. सहानुभूतीच्या अपेक्षेने तो भेटणाऱ्या प्रत्येकाला आपली कर्मकहाणी सांगत सुटायचा. पण त्याच्या वाटेला सहानुभूतीच्या ऐवजी चेष्टा यायची.
त्याच्या अशा वागण्याने तो जास्तच हास्यास्पद व्हायला लागला. तिचा विरह सहन न झाल्याने एके दिवशी ती खरेदीला जाताना त्याने तिला रस्त्यातच गाठलं. तिने ढुंकूनही पाहिलं नाही. माझं काही चुकलं असेल तर मला माफ कर, माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे, माझ्यासाठी तरी परत चल वगैरे पालुपद तो पुटपुटत होता. तिच्या तोंडातून एक शब्दही फुटत नव्हता. ती तोंड फिरवून भरभर चालत होती. गिड्ड्या लठ्ठ पायांनी तिच्या बरोबर चालताना त्याची तारांबळ उडत होती. त्याने दयेची भीक मागून पाहिली, परत आलीस तर तुला हवा तसा वागेन असं आश्वासन देऊन पाहिलं. स्ट्रिकलँड लवकरच तुला सोडून जाईल, मग तू कुठे जाशील असा इशारा देऊन पाहिला. त्याने हे सगळं शब्द न शब्द मला सांगितलं तेव्हा मी जाम भडकलो. त्यात ना शान होती ना मान. बायकोला आपली किळस येऊ नये असं काहीही सांगायचं त्याने बाकी ठेवलं नव्हतं. एका पुरूषाचं एका स्त्रीवर मनापासून प्रेम करत आहे पण त्या स्त्रीचं मात्र त्याच्यावर मुळीच प्रेम नाही या सारखा दुसरा क्रूरपणा जगात नसेल. अशा वेळी स्त्रीला तिचा प्रेमळपणा, समंजसपणा सोडून जातो. उरतो फक्त वैताग. ब्लांश स्ट्रोव्ह चालता चालता अचानक थांबली आणि तिने तिच्या नवऱ्याच्या चक्क एक थोबाडीत ठेऊन दिली. तिचा नवरा स्तंभित झाला. त्याचा फायदा घेऊन ती स्टुडियोच्या दिशेने धावत धावत गेली. तिने तोंडातून चकार शब्दही काढला नव्हता.
त्याने हे सांगितलं तेव्हा त्याचा हात नकळत त्याच्या गालाकडे गेला. जणू काही अजूनही त्याच्या झिणझिण्या गेल्या नव्हत्या. त्याच्याकडे बघून सहानुभूतीही वाटत होती आणि हसूही येत होतं.
एवढं झाल्यावरही ती बाजारात जायच्या वेळेला तो तिची वाट बघत उभा असायचा. आता तो रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभा असे. तिच्याशी पुन्हा बोलण्याची त्याची छाती नव्हती. तो शोकाकुल नजरेने तिच्याकडे बघत असे. आपल्या डोळ्यातील दु:ख बघून तिचं हृदय द्रवेल असा त्याने का कोण जाणे आपल्या मनाचा ग्रह करून घेतला होता. तो आपल्याला दिसला आहे असं तिने चुकूनही दाखवलं नाही. तिने आपला जाण्या येण्याचा रस्ता, वेळ सुद्धा बदलली नाही. तिच्या या उदासीनतेत एक प्रकारचा क्रूरपणा होता. कदाचित त्याचा असा छळ करण्यात तिला मजा वाटत असावी. ती त्याचा एवढा तिरस्कार का करत होती ते मला कळलं नाही.
स्ट्रोव्हने थोडं शहाणपणाने वागावं म्हणून मी त्याला सांगून पाहिलं. त्याचं कणाहीन वर्तन संतापजनक होतं.
‘‘तुझ्या अशा वागण्याने काही होणार नाही.’’ मी त्याला सांगितलं. ‘‘मला वाटतं त्यापेक्षा तू एकदा तिला काठीने चांगलं झोडपून काढलंस तर ते जास्त शहाणपणाचं होईल. कमीत कमी ती आज तुझा जो तिरस्कार करते तो तरी करणार नाही.’’
थोड्या दिवसांसाठी मी त्याला त्याच्या मूळ गावी जायचा सल्ला दिला. हॉलंडच्या उत्तर भागात कुठेतरी त्याचं गाव होतं. त्याचे आई-वडिल अजून हयात होते. ते परिस्थितीने गरीब होते. त्याचे वडिल सुतारकाम करत. एका संथ वाहणाऱ्या कालव्याच्या काठी त्यांचं लाल वीटांचं छोटसं घर होतं. गावातील रस्ते मोठे आणि शांत होते. गेल्या दोन एकशे वर्षात गावात काहीही बदल झाला नव्हता. जुनी संस्कृती लयाला जात होती. तरी गावातील वातावरण साधं आणि घरगुती होतं. पूर्वेकडील देशांच्या व्यापारात गडगंज संपत्ती मिळवलेल्या श्रीमंत व्यापाऱ्यांची गावात घरं होती. त्यांचं वैभव आता उतरणीला लागलं असलं तरी त्यांच्या घरांवर जुन्याकाळची शान अजूनही कायम होती. कालव्याच्या काठी फिरता फिरता हिरव्यागार कुरणांचा प्रदेश लागे. दोन चार पवनचक्क्या फिरत आहेत, काळ्या पांढऱ्या रंगांची गुरं आरामात चरत आहेत. मला वाटलं या वातावरणात लहानपणच्या आठवणीत रममाण झाल्यावर डर्क स्ट्रोव्ह आपलं दु:ख विसरायला लागेल. पण कसंचं काय. त्याने जायला ठाम नकार दिला.
‘‘तिला जर माझी गरज लागली तर मी इथे असलो पाहिजे. काहीतरी भयंकर घडलं आणि मी इथे नाही असं व्हायला नको.’’
‘‘असं काय भयंकर होईल असं तुला वाटतं?’’
‘‘मला सांगता येणार नाही, पण मला भिती वाटत आहे.’’
मी डोक्याला हात लावला.

डर्क स्ट्रोव्हवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळलेला असला तरीही इतरांच्या दृष्टीने तो चेष्टेचाच विषय होता. तो जर थोडा रोडावला असता तर त्याला थोडीशी सहानुभूती मिळालीही असती. पण तो होता तसाच गुबगुबीत, सफरचंदासारखा लालबुंद राहिला. त्याची राहणी अतिशय नीटनेटकी होती. काळा कोट आणि बाऊलर हॅट घालणं त्याने सोडलं नव्हतं. त्याचं पोटही पुढे आलेलं होतं. दु:खाचा त्याच्या तब्येतीवर जरासुद्धा परिणाम झालेला नव्हता. एखाद्या श्रीमंत उडाणटप्पू माणसासारखा तो दिसत असे. माणसाचं बाह्यस्वरूप आणि त्याचा स्वभाव याचा काही ताळमेळ नसल्याचं ते एक अपवादात्मक उदाहरण होतं. डर्क स्ट्रोव्ह म्हणजे एक फोपश्या शरीरातील प्रेमवीर होता. सुस्वभावी, पण नको तिथे चांगुलपणा दाखवणारा. कलेची उत्तम जाणकारी असलेला पण स्वत: मात्र अत्यंत सुमार दर्जाची चित्र काढणारा. इतरांशी वागताना तो हुशारीने वागे पण स्वत:वर वेळ येताच ती हुशारी कुठे जाई ते कळत नसे. दैवाने एवढा विरोधाभास एकाच पारड्यात टाकून काय बरं साधलं होतं?

1 comment:

  1. डर्क चं व्यक्तिचित्रण अफलातून आहे . एकीकडे त्याचा वागण्याचा संतापही येतो दुसरीकडे तो योग्य आहे असंही वाटत राहतं.
    👌👍🌷🌷🌷

    ReplyDelete