Sunday, February 11, 2018

मून अँड सिक्सपेन्स – ४७

कॅप्टन निकोल्सने स्ट्रिकलँड बद्दल मला जी थोडी तुटक माहिती दिली त्यावरून एक संगतवार चित्र तयार करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केला. माझी आणि स्ट्रिकलँडची पॅरीसमध्ये जी शेवटची भेट झाली होती त्यानंतरच्या हिवाळ्यात त्याची निकोल्सशी गाठ पडली. मध्यंतरीच्या काळात त्याने काय केलं असावं ते मला माहित नाही. पण एकूण अंदाज घेता परिस्थिती कठीण असावी असं वाटतं. कॅप्टनने त्याला अझील द न्युई (रात्रीचा आसरा) मध्ये पहिल्यांदा पाहिलं. त्यावेळी मास्येझमध्ये बंदर कामगारांचा संप चालू होता. स्ट्रिकलँडकडची सगळी पुंजी संपली होती आणि शरीरात जीव टिकवून धरण्यासाठी आवश्यक असलेले किमान पैसे मिळवणेही त्याला अशक्य झालं होतं.
अझील द न्युई ही मास्येझमधील एक उंच दगडी इमारत आहे. तेथे दरिद्री आणि बेघर लोकांना एका आठवड्यापुरता आसरा मिळायचा. फक्त दोन अटींवर. पहिली - ओळख पटवण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे आणि दुसरी - ती व्यक्ती काम करत आहे याचा पाद्र्याने दिलेला दाखला. इमारतीचा दरवाजा उघडण्याची अनेकजण वाट बघत होते. काही जण येरझाऱ्या घालत होते तर काही नुसतेच इकडे तिकडे रेंगाळत होते. थोडे लोक गटाराच्या कठड्यावर बसले होते. त्या गर्दीमध्ये स्ट्रिकलँड त्याच्या धिप्पाड देहयष्टीमुळे उठून दिसत होता, त्यामुळे तो कॅप्टनच्या लक्षात राहिला. दरवाजा उघडल्यावर सर्व जण आत गेले. पाद्र्याने त्याला इंग्लीशमधून विचारलं पण तेवढ्यात दुसरा पाद्री हातात जाडजूड बायबल घेऊन आत आला त्यामुळे ते अर्धवटच राहिलं. बायबल हातात घेतलेल्या पाद्र्याने प्रवचन द्यायला सुरवात केली. त्या गरीब बिचाऱ्या गांजलेल्यांना ते ऐकणं भाग होतं. फुकट मिळणाऱ्या आसऱ्यासाठी किमान ही किंमत चुकवल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. स्ट्रिकलँड आणि कॅप्टन दोघांना वेगवेगळया खोल्या मिळाल्या. सकाळी त्या ब्रह्मचारी पाद्र्याने सर्वांना अंथरूणाच्या बाहेर काढलं. कॅप्टन तयार होईपर्यंत स्ट्रिकलँड गायब झाला होता. सकाळच्या बोचऱ्या थंडीत कॅप्टन थोडा वेळ रस्त्यात भटकल्यानंतर जेथे कामाच्या शोधात असलेले खलाशी गोळा होत त्या प्लास व्हिक्तोर जेल्यु येथे जाऊन पोचला. तेथे एका पुतळयाच्या चौथऱ्याला टेकून स्ट्रिकलँड डुलकी काढत होता. त्याने त्याला ढोसून उठवलं.
‘‘मित्रा, नाश्ता करायला येतोस का?’’
‘‘चल हट,’’ स्ट्रिकलँड खेकसला.
असा उद्धटपणा करणारा इसम म्हणजे स्ट्रिकलँड सोडून दुसरा कोण असणार.
कॅप्टन निकोल्स जे सांगत होता त्यात तथ्यांश असला पाहिजे.
‘‘तुझा खिसा रिकामा दिसतोय.’’ कॅप्टनने विचारलं.
‘‘तू इथनं सटकतोस की नाही.’’ स्ट्रिकलँड गुरगुरला.
‘‘माझ्या बरोबर चल. मी तुला नाश्ता खिलावतो.’’
थोडी कांकू केल्यानंतर स्ट्रिकलँड त्याच्या पायावर उभा राहिला आणि ते दोघं बुशी द पाँ (पावाचा तुकडा) या ठिकाणी गेले. इथे भुकेल्या लोकांना पाव देत असत, पण तो त्यांना तिथल्या तिथेच खावा लागे, बरोबर घेऊन जाण्याची बंदी होती. त्यानंतर ते क्युलीय द सूप (सूपचा चमचा) या ठिकाणी गेले. इथे त्यांना एक वाडगा भरून पाणचट आणि कोमट सूप मिळाले. त्या दोन इमारती एकमेकांपासून खूप दूर होत्या. त्यामुळे फक्त ज्यांची भुकेमुळे उपासमार होत आहे असे लोकच तेथे जात. अशा रितीने त्यांची न्याहारी आणि चार्लस् स्ट्रिकलँड आणि कॅप्टन निकोल्स यांच्या विचित्र मैत्रीची सुरूवात झाली.
त्या दोघांनी मास्येझला चार एक महिने काढले असावेत. या कालखंडात म्हणण्यासारखं काही घडलं नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी काही तरी लटपट करणं आणि रात्रीचा आसरा मिळवणं या उद्योगात त्यांचा दिवस निघून जायचा. या ठिकाणी कॅप्टन निकोल्सने त्याच्या कल्पनाशक्तीने रंगवून सांगितलेल्या काही गोष्टी देण्याचा मला मोह मला आवरला पाहिजे. मास्येझ हे सतत कार्यरत असलेल्या सागरी बंदराचं शहर आहे. मास्येझमधल्या तळागाळातल्या वस्तीने एका पुस्तकाला पुरेसा ऐवज पुरवला असता. त्या दोघांना ज्या व्यक्ति भेटल्या त्यांच्या चित्रणाने एखाद्या विद्यार्थ्याला बदमाषांचा कोष लिहीता आला असता. पण मी फक्त एखाद दोन परीच्छेदावरच समाधान मानाणार आहे. या बंदराच्या शहरात राहणाऱ्या वेगवेगळ्या रंगांच्या, वंशाच्या लोकांच्या जीवनाची एक झलक मला बघायला मिळाली होती. क्रूर आणि रानटी, आनंदी आणि उत्साही. त्यातून मास्येझची अशी वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती निर्माण झाली होती. हॉटेल आणि इतर करमणूकीच्या जागा श्रीमंत आणि गरीब, धाडसी आणि शामळू, प्रसिद्ध आणि सर्वसामान्य अशा सर्व थरातल्या लोकांनी नेहमी गजबजलेल्या असत. कॅप्टन निकोल्सने ज्या स्थळांचा उल्लेख केला होता ती स्थळं ज्यांनी प्रत्यक्ष पाहिली असतील त्यांचा मला हेवा वाटतो.
जेव्हा एका आठवड्याने अझील द न्युईचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद झाले तेव्हा स्ट्रिकलँड आणि कॅप्टन निकोल्सने टफ बिलचा आसरा घेतला. टफ बिल खलाशांच्या बोर्डिंग हाऊसचा प्रमुख होता. तो एक धिप्पाड आणि आडदांड असा मिश्र वंशीय मुलाटो होता. त्याचा एक गुद्दा बसला तर प्राण कंठाशी येत. तो बेकार खलाशांची जेवणा-खाण्याची आणि राहाण्याची सोय करीत असे. ते साधारण महिनाभर त्याच्याकडे राहत. स्वीडीश, काळे आफ्रिकन, ब्राझिलीयन असे नाना देशातील खलाशी त्याच्या घरातील दोन खोल्यात नुसत्या फरशीवर झोपत. दर दिवशी ते त्याच्या बरोबर प्लास व्हिक्तोर जेल्यु येथे जात. तेथे जहाजांचे कप्तान खलाशांच्या शोधात येत. त्याने एका जाड्या, गलिच्छ, गबाळ्या अमेरीकन बाई बरोबर लग्न केलं होतं. त्याच्या गळ्यात ती कशी पडली ते एक देवच जाणे. दर दिवशी त्याच्याकडे राहणारे तिला तिच्या घरकामात आळीपाळीने मदत करत. कॅप्टन निकोल्सने ते काम आनंदाने अंगावर घेतलं. स्ट्रिकलँडने त्याच्या पाळीच्या कामाऐवजी टफ बिलचं एक पोर्ट्रेट करून दिलं. टफ बिलने कॅनव्हास, रंग, ब्रश वगैरे गोष्टींचा खर्च तर केलाच वर चोरट्या आयातीचा एक पौंड तंबाखू दिला. माझ्या माहिती प्रमाणे ते पोर्ट्रेट अजूनही क्व डे ला जोलिएत च्या जवळपास असलेल्या एका लहानशा घरात आजही लावलेलं सापडेल. माझ्या अंदाजा प्रमाणे आजच्या तारखेला त्याला कमीत कमी पंधराशे पौंड तरी सहज येतील.
स्ट्रिकलँड न्युझीलंड नाहीतर ऑस्ट्रेलियाला जाणारी आगबोट पकडून तेथून नंतर सामोआ किंवा ताहिती बेटांवर जाण्याचा विचार करत होता. दक्षिण समुद्रात जाण्याची कल्पना त्याच्या मनात कशी आली ते मला माहित नाही. पण हिरव्यागार वनराजीने व्यापलेल्या, लख्ख उन्हात नहाणाऱ्या आणि निळाशार समुद्राने वेढलेल्या एखाद्या बेटावर जाण्याचा विचार तो पहिल्यापासून करीत असावा. उत्तरेपेक्षा दक्षिणेचा समुद्र जास्त निळाशार असतो.
तो कॅप्टन निकोल्सला धरून राहिला होता. कारण त्याला त्या भागाची फारशी माहिती नव्हती. कॅप्टननेच त्याला हवं ते सगळं ताहितीत मिळेल असं पटवून दिलं.
‘‘हे बघा, ताहितीत फ्रेंच आहेत आणि फ्रेंच लोक तांत्रिक गोष्टींचा जास्त बाऊ करत नाहीत.’’
त्याचा मुद्दा मला पटला.
स्ट्रिकलँडकडे कसलेच कागदपत्र नव्हते. पण टफ बिलला जो फायदा होणार होता त्याच्या पुढे हा प्रश्न फार मोठा नव्हता. त्याला स्ट्रिकलँडचा पहिल्या महिन्याचा पगार मिळणार होता. त्याच्याकडे राहणाऱ्या एका इंग्लीश खलाशाच्या नशीबात टफ बिलच्या हातून मृत्युयोग होता. त्या मृत खलाशाचे कागदपत्र टफ बिलने स्ट्रिकलँडला दिले. कॅप्टन निकोल्स आणि स्ट्रिकलँड दोघांनाही पूर्वेला जायचं होतं. त्यांना ज्या जहाजांवर जायची संधी मिळाली ती सर्व जहाजं पश्चिमेला जाणारी होती. स्ट्रिकलँडने दोन वेळा अमेरीकेला आणि एकदा न्युकॅसलला जाणाऱ्या जहाजाबरोबर जायला नकार दिला. असले नकार ऐकायची टफ बिलला सवय नव्हती, विशेषत: त्यात जर त्याचं आर्थिक नुकसान होणार असेल तर मुळीच नाही. त्याच्याकडे तेवढा धीर नव्हता. तिसऱ्या नकाराला त्याने त्या दोघांना हाकलून दिलं. ती दुक्कल पुन्हा रस्त्यावर आली.
टफ बिलच्या घरी मिळणारं जेवण म्हणजे मेजवानी नव्हती. जेवायला बसताना पोटात जेवढी भूक असायची, तेवढीच भूक जेवण झाल्यावरसुद्धा पोटात शिल्लक असायची. पण तरीही थोडे दिवस गेल्यानंतर त्यांना टफ बिलकडून हाकलले गेल्याचा पश्चाताप वाटू लागला. भूक म्हणजे काय ते त्यांना कळलं. क्युलीय द सूप आणि अझील द न्युईचे दरवाजे आता त्यांना बंद झाले होते. पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना फक्त बुशी द पाँचा आधार होता. जिथे जागा मिळे तिथे ते झोपत. कधी रिकामा ट्रक, कधी स्टेशनचं आवार, तर कधी गुदामाच्या वळचणीला. उघड्यावर मरणाची थंडी असायची. एक दोन तास कशा बशा डुलक्या काढून झाल्यावर उबदार जागेच्या शोधात पुन्हा रस्त्यावरून भटकणे. त्यांना खरी टंचाई कसली जाणवत असे ती तंबाखूची. कॅप्टन निकोल्सला तर त्यावाचून राहवत नसे. रात्रीच्या भटकंतीत लोकांनी टाकून दिलेली शोधून ठेवला होता.
‘‘मी पाईपमध्ये अगदी घाणेरड्यातला घाणेरड्या तंबाखूंचं मिश्रण भरून पाहिलेलं आहे,’’ मोठ्या तत्वज्ञाचा आव आणून तो म्हणाला. मी पुढे केलेल्या खोक्यातल्या दोन सिगार त्याने उचलल्या. एक तोंडात ठेवली तर दुसरी खिशात.
अधूनमधून त्यांना थोडे फार पैसे मिळत. कधीतरी टपालाची आगबोट यायची. धक्क्यावरील कारकुनाला मस्का मारून कॅप्टन निकोल्स हमालीचं काम मिळवायचा. जर इंग्लीश आगबोट असली तर ते सरळ डेकवर जाऊन घुसत असत आणि नजर चुकवून भटारखान्यात जात. मग तेथे भरपेट न्याहारी करता येई. एकदा त्यांना जहाजावरच्या अधिकाऱ्याने पाहिलं आणि त्यांना गँगवेमधूनच बाहेर काढलं. त्यांचा जाण्याचा वेग वाढावा म्हणून त्याने आपल्या बुटांचा प्रयोग केला.
‘‘पोट भरलं असेल तर पार्श्वभागावर बसलेली लाथ फारशी लागत नाही,’’ कॅप्टन निकोल्स म्हणाला. ‘‘मीही ते व्यक्तिश: फारसं मनाला लावून घेत नाही. शेवटी अधिकारी म्हटला की त्याला शिस्त पाळावीच लागते.’’
पांढऱ्या शुभ्र गणवेशातल्या तरणाबांड अधिकाऱ्याने उगारलेली लाथ आणि ढुंगणाला पाय लावून पळणारा कॅप्टन निकोल्स आणि हे दृष्य माझ्या नजरे समोर उभं राहिलं आणि मला हसू आलं.
कधी तरी मासळी बाजारात थोडं फार काम मिळे. एकदा त्यांना एका दिवसात अख्या फ्रँकची कमाई झाली. धक्क्यावर पडलेले संत्र्यांचे खोके ट्रकमध्ये चढवायचे होते. एके दिवशी त्यांच्यावर नशीबाची मेहेरनजर झाली. केप ऑफ गुड होप वरून मादागास्करची एक बोट येणार होती. त्या बोटीला रंग लावण्याचं काम या दोघांना मिळालं. बरेच दिवस ते दोघं बोटीच्या कठड्यावरून टांगलेल्या फळीवरून गंजलेला पत्रा रंगवत होते. या प्रसंगाने स्ट्रिकलँडच्या उपरोधिक विनोदबुद्धीला चांगलेच खाद्य पुरवलं असेल. त्याने या मानमोड्या कामातील कष्ट कसे सहन केले असं मी कॅप्टनला विचारलं.
‘‘तक्रारीचा एक शब्दसुद्धा त्याच्या तोंडातून कधी आला नाही.’’ कॅप्टनने उत्तर दिलं. ‘‘कधीतरी तो चिडायचा. पण जर सकाळपासून आमच्या पोटात काहीच गेलं नसेल तर तो शांत होई आणि मग उत्साहाने कामाला सुरवात करी.’’
एक एकाक्ष चिनी माणूस रू ब्युटेरी जवळ एक खानावळ चालवायचा. रस्त्यावर भटकणाऱ्या बेघर लोकांनी त्या खानावळीला चिंक्स हेड असं नाव दिलं होतं. तेथे अगदी स्वस्तात रात्रीची झोपायची सोय होत असे. सहा सो दिले की कॉटवर आणि तीन सो दिले की जमिनीवर. तिकडे त्यांच्यासारख्या इतर भणंग लोकांशी त्यांची मैत्री झाली. त्यात परस्परांची सोय होती. दिवसभर काबाडकष्ट करून एखाद्या फ्रँकची कमाई कोणाला तरी झाली असेल तर रात्रीच्या आसऱ्या करता त्याच्या कडून उधार मागता येई. ते लोक भणंग असले तरी कंजूष नव्हते. खिशात पैसे असले तर ते द्यायला खळखळ करत नसत.
जगातील सर्व देशातील लोक तेथे असत. पण मैत्रीसाठी देश, वंश, भाषा, धर्म कसलीच आडकाठी येत नसे. त्या दृष्टीने ते अखिल विश्वाचे नागरिक होते. कोकेनचं सर्वधर्मसमावेशक विशाल विश्व.
‘‘स्ट्रिकलँडला डिवचलं तर तो खतरनाक होता,’’ कॅप्टन निकोल्स हसत म्हणाला. ‘‘एके दिवशी टफ बिलची आणि आमची गाठ पडली. त्याने चार्लीला दिलेले कागदपत्र परत मागितले.’’
‘‘तुला हवे असतील तर माझ्याकडे ये आणि घेऊन जा.’’ चार्लीने सांगितलं.
‘‘टफ बिल अगदी आडदांड माणूस होता. त्याला चार्ली ज्या प्रकारे बोलला ते आवडलं नाही. त्याने त्याला शिव्या द्यायला सुरवात केली. त्याला आठवतील त्या सगळ्या शिव्या त्याने दिल्या. टफ बिल जेव्हा शिव्या देतो ते ऐकण्यासारखं असतं.
चार्लीने थोडा वेळ शांतपणे ऐकून घेतलं. नंतर तो एक पाऊल पुढे झाला आणि म्हणाला:
कुत्तरड्या, खूप ऐकलं तुझं. आता जातोस की नाही येथूनतो जास्त काही नाही फक्त एक वाक्य बोलला होता. पण तो ज्या पध्दतीने म्हणाला ते त्याला लागलं. तो पांढरा फटक पडला आणि त्याने हळूच काढता पाय घेतला. त्याला धडा शिकवायचा निश्चय करून.’’
कॅप्टन निकोल्सने जो वृत्तांत मला सांगितला त्यात स्ट्रिकलँडने वापरलेली भाषा मी वर दिली आहे त्यापेक्षा फार वेगळी होती. पण हे पुस्तक मी ज्या सभ्यगृहस्थांसाठी लिहीत आहे त्यांच्या पचनी पडावं म्हणून मी थोडासा सत्यापलाप करून सभ्य कुटुंबांना परिचित असलेली घरगुती भाषा वापरली आहे. शहराच्या बंदर विभागात यापेक्षा फार वेगळी भाषा वापरली जाते हे सुज्ञांस सांगणे न लगे.
टफ बिल एका सामान्य खलाशाकडून झालेला अपमान खपवून घेणाऱ्यातला नव्हता. त्याच्या प्रतिष्ठेतच त्याची ताकद होती. त्यानंतर त्याच्या घरात राहणाऱ्या एका खलाशाने दुसऱ्या एका खलाशाला टफ बिल स्ट्रिकलँडची धुलाई करण्याचा बेत आखत असल्याची बातमी दिली.
एके रात्री कॅप्टन निकोल्स आणि स्ट्रिकलँड रू ब्युटेरीमधल्या एका गुत्त्यात बसले होते. रू ब्युटेरी ही एक अरुंद गल्ली आहे. तिच्या दोन्ही बाजूला असलेली एका खोलीची छोटी घरं जत्रेत लावलेल्या ठेल्या प्रमाणे किंवा जनावरांच्या पिंजऱ्यासारखी दिसतात.
प्रत्येक घरात एक बाई असते. काही जणी दाराला टेकून उभ्या असतात तर काही जणी आळसावल्यासारख्या नुसत्या बसून असतात. गाणं गुणगुणत नाहीतर येणाऱ्या जाणाऱ्याला खुणावत कर्कश आवाजात हाका मारत. फ्रेंच, इटालीयन, स्पॅनीश, जपानी आणि जगातल्या नाना वंशाच्या. काही जाड्या काही बारीक. चेहेऱ्यावर भडक मेकअपच्या दाट थराखालीही त्यांचं वय दिसायचं लपत नव्हतं. काही जणींनी काळा झगा आणि त्वचेच्या रंगाचे स्टॉकिंग्ज घातले होते. काही बायकांनी लहान मुलीसारखा मलमलचा फ्रॉक घातला होता. उघड्या दरवाजातून आतली लाल फरशी आणि लाकडी पलंग दिसत होता. रस्त्यावरून जपानी, स्वीडीश, अमेरीकन, स्पॅनीश, फ्रेंच असे वेगवेगळ्या देशांतील खलाशी रेंगाळत फिरत होते. दिवसा ती एक नुसती घाणेरडी गल्ली असायची. रात्री दोन्ही बाजूच्या झोपड्यातील मिणमिणते दिवे एवढाच काय तो प्रकाश असायचा. वातावरण भयंकर कुबट वासाने भरलेलं असायचं. घृणा यायची. त्याच वेळेला एक प्रकारचं गूढ आकर्षणही वाटायचं. प्रखर सत्याला सामोरं गेल्यावर सभ्यता आणि नैतिकतेच्या कल्पना उघड्या पडतात. वातावरणात एकाच वेळी सुखांत आणि शोकांत यांचं मिश्रण असे.
ज्या बारमध्ये स्ट्रिकलँड आणि निकोल्स बसले होते तेथे एका यांत्रिक पियानोवर नृत्याची धून मोठ्याने वाजत होती. टेबलावर बसलेल्या खलाशांपैकी अर्धे अधिक पिऊन तर्र झाले होते. दुसऱ्या टेबलावर सैनिकांचा एक गट बसला होता. मधल्या भागातील गर्दीत काही जोडपी नाचत होती. दाढीदिक्षीत खलाशांनी आपल्या राकट हातांनी आपल्या साथीदार बाईला घट्ट आवळून धरलं होतं. बायकांनी फक्त झगे घातले होते. मध्येच एखाद दुसरा खलाशी उठे आणि नाचू लागे. तेथे चाललेल्या गोंगाटाने कोणाच्याही कानठळ्या बसल्या असत्या. लोक गात, हसत, ओरडत होते. जेव्हा एखादा खलाशी त्याच्या मांडीवर बसलेल्या बाईचं चुंबन घेई तेव्हा इंग्लीश खलाशी जोराने शिट्ट्या आणि टाळ्या वाजवून चालू असलेल्या गोंगाटात भर घालत. लोकांच्या बूटांनी उडालेल्या धुळीने आणि सिगारच्या धुराने वातावरण भरलं होतं. खूप उकडत होतं. बारच्या काऊंटरवर बसलेली एक बाई तिच्या मुलाला दूध पाजत होती. एक लहान चणीचा वेटर बिअरच्या ग्लासांनी भरलेला ट्रे सारखा इकडून तिकडे घेऊन जात होता.
थोड्या वेळाने टफ बिल सोबत दोन काळ्याकभिन्न धिप्पाड आफ्रिकनांना घेऊन आला. त्याच्याकडे बघता क्षणी तो तीन चार पेग दारू झोकून आला असावा ते कळत होतं. काही तरी गडबड करण्याचा त्याचा इरादा स्पष्ट दिसत होता. एका टेबलावर तीन सैनिक बसले होते. त्या टेबलाला तो अडखळला आणि एक बिअरचा ग्लास सांडला. तेथे थोडी बाचाबाची झाली. बारचा मालक पुढे आला आणि त्याने टफ बिलला जायला सांगितलं. तो सुद्धा तेवढाच तगडा होता आणि त्याला त्याच्या गिऱ्हाईकांना सांभाळायचं होतं. टफ बिल थोडा मागे हटला. त्याला त्या मालकाशी भांडण उकरून काढण्यात रस नव्हता. शिवाय पोलीसांनी मालकाचीच बाजू घेतली असती. त्याने त्याला धडा शिकवण्याची शपथ घेतली आणि तो बाजूला वळला. तेवढ्यात त्याला स्ट्रिकलँड दिसला. तो त्याच्याकडे सरसावला. त्याने तोंडातली थुंकी गोळा केली आणि सरळ स्ट्रिकलँडच्या तोंडावर थुंकला.
स्ट्रिकलँडने हातातला ग्लास त्याला फेकून मारला. नाचणारे लोक अचानक नाचायचे थांबले. सर्वत्र शांतता पसरली. पण टफ बिल स्ट्रिकलँडवर तुटून पडता क्षणी लोकांचा आरडा ओरडा चालू झाला. टेबलं उलथी पालथी झाली, ग्लास खाली पडून फुटले. एकच गोंधळ उडाला. बायका बार काऊंटर आणि दरवाजाच्या मागे लपल्या. रस्त्यावरून जाणारे काय चाललं आहे ते बघायला आत आले. जगातल्या सगळ्या भाषेतल्या शिव्या तेथे ऐकायला मिळाल्या असत्या. मध्यभागी दहा बारा माणसं सर्व शक्तिनीशी एकमेकांवर तुटून पडली होती. अचानक पोलीस आत आले. ज्यांना शक्य झालं ते सगळे दरवाजातून पळून गेले. जेव्हा गर्दी कमी झाली तेव्हा टफ बिल मध्य भागी पडलेला होता. त्याच्या डोक्याला मोठी खोक पडली होती. कॅप्टन निकोल्सने स्ट्रिकलँडला ओढून बाहेर काढलं. त्याच्या हाताला झालेल्या जखमेतून रक्त वाहत होतं. त्याच्या कपड्याच्या चिंध्या झाल्या होत्या. नाकावर बसलेल्या ठोशामुळे कॅप्टनचा चेहरा रक्ताने लाल झाला होता.
‘‘टफ बिल हॉस्पिटल मधून बाहेर येण्याच्या आधी तू मास्येझच्या बाहेर गेलास तर बरं होईल.’’ ते दोघं चिंक्स हेड मध्ये जाऊन हातपाय धूत असताना कॅप्टन स्ट्रिकलँडला म्हणाला.
‘‘कोंबड्यांच्या झुंजीपेक्षा हे भयानक आहे,’’ स्ट्रिकलँड म्हणाला.
असं म्हणाताना तो तिरकसपणे कसा हसला असेल ते माझ्या डोळ्यामसोर आलं.
कॅप्टन निकोल्स चिंतेत पडला. टफ बिल केवढा खुनशी आहे ते त्याला माहित होतं. स्ट्रिकलँडने त्या अक्करमाशा मुलॅटोला दोन वेळा खाली पाडलं होतं, एकदा शब्दश: तर दुसऱ्या खेपेला अक्षरश: मुलॅटो शुद्धीवर असताना त्याला हलकं लेखून चालणार नव्हतं. त्याने त्याला हव्या त्या संधीची सावकाश वाट पाहिली असती. त्याला घाई नव्हती. एखाद्या रात्री स्ट्रिकलँडच्या पाठीत चाकू घुसला असता आणि दोन तीन दिवसानंतर बंदराच्या घाणेरड्या पाण्यात एका अनामिक भणंग माणसाचा सडलेला मुडदा तरंगताना सापडला असता. निकोल्सने दुसऱ्या दिवशी संध्याकाळी टफ बिलच्या घरी जाऊन चौकशी केली. तो अजूनही हॉस्पिटलमध्ये होता. बरं होऊन बाहेर आल्यावर स्ट्रिकलँडला ठार मारण्याची त्याने शपथ घेतली होती.
एक आठवडा गेला.
‘‘मी नेहमीच सांगत असतो. जर एखाद्याला दुखापत करायची वेळ आली तर शक्यतो जेवढी जास्त करता येईल तेवढी करा. म्हणजे पुढे काय करायचं याचा विचार करायला दुखापतीच्या मानाने तेवढाच जास्त वेळ मिळतो.’’
स्ट्रिकलँडचं नशीब जोरदार होतं. ऑस्ट्रलियाला जाणाऱ्या एका आगबोटीवरच्या बॉयलरवर काम करण्याऱ्या एका माणसाने त्यांची बोट जिब्राल्टरच्या जवळ असताना वेडाच्या झटक्यात समुद्रात उडी मारली होती. त्याच्या बदली त्यांना तातडीने दुसरा माणूस हवा होता.
‘‘बाबा धावत बंदरावर जा,’’ कॅप्टन स्ट्रिकलँडला म्हणाला. ‘‘आणि ताबडतोब सही कर. तुझ्याकडे आवश्यक ती सगळी कागदपत्रं आहेतच.’’
स्ट्रिकलँड तात्काळ रवाना झाला. कॅप्टन निकोल्सची आणि त्याची पुन्हा भेट झाली नाही. बोट बंदरात फक्त सहा तास होती. संध्याकाळी बोट पूर्वेकडे रवाना झाली. हिंवाळ्याच्या थंड हवेत बोटीच्या धुरांड्यातून येणाऱ्या धुराच्या लोटाकडे कॅप्टन उदासवाण्या नजरेने बराच वेळ पहात होता.

स्ट्रिकलँडचं अ‍ॅशले गार्डन आणि मास्येझ मधील जीवन यात प्रचंड विरोधाभास होता. त्यामुळे मला जमेल तेवढं वर्णन करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. पण कॅप्टन एक नंबरचा थापाड्या आहे हे मला ठाऊक आहे. कदाचित स्ट्रिकलँडची आणि त्याची भेट प्रत्यक्षात झालेलीही नसली तरी मला त्याचं आश्चर्य वाटणार नाही. मास्येझची माहिती काय पुस्तकं वाचूनही मिळते.
Artist: Paul Gauguin
Title: The Athenaeum - Portrait of a Man Wearing a Lavalliere
Medium: Oil on canvas

5 comments:

  1. अजबच आहे सगळं । काय म्हणावं या स्ट्रिकलँडला ।
    अनुवाद तर एवढा प्रवाही झालाय । ग्रेट जॉब ।

    ReplyDelete
  2. Jayant, apratim anuvad. Tu nava bhag kadhi taktos vat baghat aste. Tasech, thanks for the great paintings. Really a privilege .

    ReplyDelete
  3. Replies
    1. चेक करून पाहिले. अपलोड झाले आहे, कदाचित अँड्रॉईड, ब्राऊजरचा वगैरे प्रॉब्लेम असू शकेल. रीफ्रेश, रीबूट करून बघ.

      Delete
  4. वाह , फारच धम्माल प्रसंग आहेत.मूळ कथा छानच .पण अनुवादही अप्रतिम झालाय... उत्कंठा वाढत जाते .
    👌👍🌷🌷🌷🌷🌷

    ReplyDelete