Saturday, February 3, 2018

मून अँड सिक्सपेन्स – २५

आम्ही तेथून निघालो. डर्क जेवायला घरी जाणार होतो आणि मी स्ट्रिकलँडला तपासायला एका डॉक्टरला घेऊन येणार होतो. आम्ही माळ्यावरच्या त्या कोंदट जागेतून खाली उतरून मोकळ्या हवेत श्वास घेतो न घेता तोच डचमनने मला त्याच्याबरोबर स्टुडियोत येण्याची विनंती केली. त्याच्या मनात काहीतरी करण्याचं घोळत होतं पण त्याच्याकडे माझं काय काम आहे ते तो मला सांगत नव्हता. त्याच्याकडे मी येण्यासाठी त्याने गळ घातली. या घटकेला डॉक्टरसुद्धा आम्ही जे करत होता त्याच्यापेक्षा फार वेगळं काही करून शकणार नव्हता असा विचार करून मी त्याला मान्यता दिली. ब्लांश स्ट्रोव्ह जेवणाचं टेबल मांडत होती. डर्कने तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले.
“लाडके, माझ्यासाठी एक करशील?” त्याने विचारलं.
तिने त्याच्याकडे लाडिक नजरेने पाहिलं. प्रेमळपणा हा तिचा एक गुण होता. त्याच्या लालबुंद चेहेरा घामेजून गेला होता. त्याच्या टपोऱ्या डोळ्यांमधून उत्साह ओसंडून वाहत होता. त्याची तारांबळ पाहून कोणालाही हसूं फुटलं असतं.
तिने चटकन आपले हात त्याच्या हातातून काढून घेतले. एवढ्या चटकन एखादी प्रतिक्रिया देताना मी तिला पूर्वी कधी पाहिलं नव्हतं. तिची कानशीलं लाल झाली.
“छे:! नाही.”
“माझ्या लाडके. नाही म्हणू नकोस. त्याला आहे त्या अवस्थेत सोडून जाण्याची कल्पना मला सहन होणार नाही. त्याची नीट सोय लागल्याशिवाय माझा डोळा लागणार नाही.”
“तुम्ही त्याची शुश्रूशा खुशाल करा. माझी त्याल हरकत नाही.”
ती थंड आणि कोरड्या आवाजात म्हणाली.
“त्याचा जीव जाईल.”
“त्याला खुशाल मरूं दे.”
स्ट्रोव्हने एक आवंढा गिळला, घाम पुसला आणि माझ्याकडे मदतीच्या अपेक्षेने पाहिलं. पण काय बोलावं ते मला कळेना.
“तो एक महान चित्रकार आहे.”
“असेल. त्याला मी काय करू. मला तो मुळीच आवडत नाही.”
“माझ्या लाडके मी तुला पुन्हा एकदा विनंती करतो. त्याला इकडे घेऊन येऊ या. आपल्याकडे त्याला थोडं बरं वाटेल. आपण त्याची शुश्रूशा केली तर त्याचा जीव वाचवू शकतो. तुला काही त्रास होणार नाही. सगळं काम मी करीन. माझ्या स्टुडियोत त्याची खाट टाकता येईल. त्याला एखाद्या कुत्र्यासारखं वाऱ्यावर सोडून कसं द्यायचं? ते माणूसकीला धरून होणार नाही.”
“त्याला एखाद्या हॉस्पिटलमध्ये का ठेवत नाही?”
‘‘हॉस्पिटल! अग त्याला आपुलकीची गरज आहे. त्याची खूप काळजी घ्यायला हवी
आहे.’’
तिच्या मनाला केवढं लागलं होतं ते पाहून मला आश्चर्य वाटलं. तिचं टेबल लावण्याचं काम चालूच होतं, पण आता तिचे हात कापत होते.
‘‘तुम्हाला आता कसं समजवणार ते मला कळत नाही. तुम्ही जर आजारी पडला असता तर त्याने तुमच्या मदतीसाठी करंगळी तरी पुढे केली असती का?’’
‘‘पण त्याचा इथे काय संबंध? माझी काळजी घ्यायला तू आहेस, त्यामुळे माझ्यावर अशी वेळ येणारच नाही. शिवाय माझी बाब वेगळी. मी त्याच्या एवढा महत्वाचा चित्रकार थोडाच आहे.’’
‘‘एखाद्या बेवारशी कुत्र्याएवढासुद्धा अभिमान तुमच्यामध्ये नाही. लोकांनी पेकाटात लाथा मारल्या तरी तुम्हाला त्याचं काही नाही. उलट तुम्ही खाली पडून, या मला तुडवून जा असं वर आमंत्रण देऊन बोलवाल.’’
आपली बायको असं का म्हणत आहे ते लक्षात आल्यासारखं स्ट्रोव्ह कसंनुसं हसला. ‘‘लाडके, तो माझी पेंटींग बघायला आला होता ते तुला अजून आठवत आहे. त्याला ती आवडली नाहीत तर त्याने काय फरक पडतो?  त्याला दाखवायला गेलो हा माझाच मूर्खपणा झाला. ती तशी फारशी चांगली नव्हतीच.’’
त्याने स्टुडियोवरून निराशेने नजर फिरवली. इझलवर एक अर्धवट झालेलं इटालियन शेतकऱ्याचं चित्र होतं. शेतकऱ्याने आपल्या हातातील द्राक्षांचा घड एका काळ्याभोर डोळ्यांच्या मुलीच्या डोक्यावर धरला होता.
‘‘त्याला चित्रं आवडली नसतील तर त्याने किमानपक्षी गप्प तरी बसावं. तुमचा अपमान करायची गरज नव्हती. त्यातून तुम्हाला तो किती तुच्छ समजतो हे त्याने दाखवून दिलं आणि तुम्ही त्याचे पाय चाटायला निघालात. तुम्हाला कसं सांगायचं. तो अगदी हलकट माणूस आहे.’’
‘‘ए मुली. तो एक खरा प्रतिभावान कलावंत आहे. माझ्यात प्रतिभा आहे असं मला वाटत नाही. असती तर बरं झालं असतं. पण प्रतिभेचं देणं कोणाला मिळालं आहे ते मला बघताक्षणी उमगतं. आणि मी त्या प्रतिभेचा मनापासून मान राखतो. प्रतिभा ही जगातील एक अद्भूत गोष्ट आहे. ज्याला ती लाभते तो तिच्या ओझ्याखाली दबून जातो. अशा माणसांना आपण सांभाळून घेतलं पाहिजे.’’
मी एका बाजूला उभा होतो. त्यांच्या वादामुळे मला अवघडल्यासारखं झालं.
स्ट्रोव्हने एवढ्या आग्रहाने मला का बोलावून घेतलं होतं ते मला कळेना. त्याच्या बायकोची तर कोणत्याही क्षणी रडू कोसळेल अशी अवस्था झाली होती.
‘‘तो प्रतिभावान आहे म्हणून काही मी त्याला आपल्याकडे आणू या असं म्हणत नाही. तो अतिशय आजारी आहे, त्याची देखभाल करणारं कोणी नाही, तो गरीब आहे. माणुसकीच्या नात्याने तरी त्याला आपल्याकडे आणू या.’’
‘‘आपल्या घरात मी त्याला कधीही पाऊल ठेऊ देणार नाही. कधीही नाही.’’
स्ट्रोव्ह माझ्याकडे वळला.
‘‘हा स्ट्रिकलँडच्या जीवन मरणाचा प्रश्र्न आहे हे तिला समजावून सांग. तसल्या भिकार जागी त्याला राहू दिलं तर कसं होईल.’’
‘‘इथं त्याची काळजी घेणं त्यामानानं खूप सोपं आहे,’’ मी म्हणालो. ‘‘पण त्यात तुमची थोडी गैरसोय होईल. मला वाटतं त्याच्या सोबतीला रात्रंदिवस कोणी तरी राहिलं तर फार बरं होईल.’’
‘‘लाडके, थोडासा त्रास घ्यायला तू नाही म्हणणार नाहीस.’’
‘‘तो जर इथे आला तर मी निघून जाईन,’’ ती चिडून म्हणाली.
‘‘मी तुला ओळखतो. तुझं अंत:करण प्रेमळ आहे.’’
‘‘कृपा करून मला माझी राहूं दे. अशानं माझं डोकं फिरून जाईल.’’
शेवटी तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. ती खुर्चीवर बसली आणि तिने आपले तोंड हाताने झाकून घेतले. तिचं अंग गदागदा हलू लागलं. डर्क तिच्या शेजारी गुडघ्यावर बसला. त्याने तिला गोंजारत तिचं चुंबन घेतलं. तिला लाडक्या नावानं हाक मारली. त्याच्याही गालांवरून अश्रू ओघळू लागले. तिने डोळे पुसले आणि ती सावरून बसली.
‘‘कृपा करून माझ्यावर जबरदस्ती करू नका,’’ ती शांतपणे म्हणाली, नंतर माझ्याकडे वळून हसण्याचा प्रयत्न करीत म्हणाली, ‘‘माझ्याबद्दल तुमचं काय मत आहे?’’
स्ट्रोव्ह तिच्याकडे बावरून गेल्यासारखा बघत होता. त्याच्या कपाळावर आठ्यांचं जाळं होतं. त्याने त्याच्या लालचुटुक ओठांचा चंबू केला होता. एखाद्या रुसून बसलेल्या गोंडस मुलासारखा तो दिसत होता.
‘‘म्हणजे तुझा नकार आहे तर?’’ त्याने तिला शेवटचं विचारलं. ती अगदी गळून गेली होती. तिचा चेहेरा म्लान दिसत होता.
‘‘स्टुडियो तुमच्या मालकीचा आहे. इथली प्रत्येक वस्तू तुमची आहे. त्याला जर तुम्ही इथे आणायचंच ठरवलं असेल तर विरोध करणारी मी कोण?’’
त्याचा चेहरा अचानक उजळला.
‘‘म्हणजे तुझी संमती आहे. मला वाटलंच होतं. माझ्या लाडके.’’
ती एकदम ताठ बसली. मोठ्या दु:खाने त्याच्याकडे पाहिलं. हातात हात गुंफून आपल्या छातीवर घेतले. जणू काही ती आपल्या हृदयातील असह्य धडधड दाबून ठेवण्याचा प्रयत्न करत होती.
‘‘मी आजवर तुमच्याकडे माझ्यासाठी म्हणून काहीही मागितलेलं नाही.’’
‘‘जगात अशी एकही गोष्ट नाही की जी मी तुझ्यासाठी करणार नाही हे तुला माहित आहे.’’
‘‘मी भीक मागते पण स्ट्रिकलँडला इकडे आणू नका. दुसऱ्या कोणालाही आणलं तरी चालेल. अगदी चोर, दारूडा, रस्त्यावरचा भिकारी कोणीही चालेल. त्यांच्यासाठी मी काहीही आनंदाने करीन असं पाहिजे तर मी वचन देते. मी तुमच्या पाया पडते पण त्या स्ट्रिकलँडला इथे आणू नका.’’
‘‘पण का?’’
‘‘मला त्याची भीती वाटते. का ते मला सांगता येत नाही. पण त्याच्यात असं काही तरी आहे त्याची मला भयंकर भीती वाटते. तो आपल्याला काही तरी दगाफटका करेल. काय ते सांगता येत नाही पण मला आतून नक्की जाणवतंय. तुम्ही त्याला इथे घेऊन आलात तर त्याचा शेवट काही तरी भयंकर वाईट होईल.’’
‘‘काही तरीच काय बोलतेस!’’
‘‘नाही. मी बरोबर सांगतेय. काहीतरी भयंकर वाईट घडणार आहे असं माझं मन मला सांगतय.’’
‘‘आपण केलेल्या चांगूलपणाचं फळ असं वाईट कसं मिळेल?’’
तिला धाप लागली होती. ती भयंकर घाबरली होती. तिच्या मनात काय चाललं होतं ते मलाही कळत नव्हतं. कसल्यातरी अनामिक भीतीने तिला घेरलं होतं. तिचा स्वत:वरील ताबा सुटला होता. सहसा ती शांत असायची म्हणून तिचं घाबरणं आश्चर्यकारक होतं. स्ट्रोव्ह तिच्याकडे गोंधळून पाहत होता.
‘‘तू माझी पत्नी आहेस. इतर कोणाहीपेक्षा माझं तुझ्यावर जास्त प्रेम आहे. तुझ्या संमतीशिवाय मी कोणालाही इथे आणणार नाही.’’
तिने आपले डोळे मिटून घेतले. एक क्षणभर मला वाटलं की तिला मूर्छा येईल. मी थोडी घाई केली. ती एवढी भावनाप्रधान असेल असं मला वाटलं नव्हतं. स्ट्रोव्हच्या आवाजाने त्या शांततेचा भंग केला.
‘‘तू सुद्धा एकदा एका संकटातून गेली होतीस. तेव्हा तुला अशीच कोणीतरी मदत केली नव्हती का? अशी मदत किती मौल्यवान असते ते तुला ठाऊक असेलच. संधी मिळेल तेव्हा त्याची परतफेड करावी असं तुला वाटत नाही का?’’
ते अगदी साधे शब्द होते. पण त्यात कळकळीचा आग्रह होता. मी हसलो. त्या शब्दांचा ब्लांश स्ट्रोव्हवर झालेल्या परिणामाने मला आश्र्चर्याचा धक्का बसला. त्याला त्यात एवढं अवघडल्यासारखं का वाटावं ते मला कळलं नाही. तिचे गाल क्षणभर आरक्त झाले पण नंतर ती पांढरी फटक पडली. जणू काही एका क्षणात तिच्या शरीरातील सर्व रक्त आटून गेलं असावं. शक्तिपात झाल्यासारखे तिचे हात निर्जीव दिसू लागले. भूतासारखी प्रेतवत दिसू लागली. तिचं शरीर शहारलं. तिचं अस्तित्व सोडता स्टुडियोत भयाण शांतता पसरली. मी भयचकीत झालो.
‘‘तुम्ही स्ट्रिकलँडला आणा. मी माझ्या प्रयत्नांची शिकस्त करीन.’’
‘‘माझ्या लाडके.’’ तो हसला.
त्याला तिला कवेत घ्यायचं होतं. पण ती त्याच्यापासून दूर झाली.
‘‘परक्यांसमोर प्रेमाचं प्रदर्शन करू नका. मला काही तरीच वाटतं.’’ ती म्हणाली. तिचं वागणं पुन्हा ताळ्यावर आलं. थोड्या वेळापूर्वी ती एवढी हादरून गेली होती याच्यावर कोणाचा विश्वास बसला नसता.

1 comment: