Thursday, February 15, 2018

मून अँड सिक्सपेन्स – ५४


चालता चालता मी स्ट्रिकलँडविषयी सद्ध्या जी माहिती मला मिळाली होती त्या संदर्भात विचार करू लागलो. त्याच्या मायदेशी त्याची जी हेटाळणी व्हायची ती या दूरच्या प्रदेशात होत नव्हती. येथील लोकांनी त्याच्याकडे सहानुभूतीने पाहिले. त्याचा लहरीपणा येथे खपवून घेतला गेला. इथले युरोपियन आणि स्थानिक अगदी आदिवासीसुद्धा त्याला वेडपट समजत. पण त्यात एक फरक होता. त्यांना असल्या वेडपटपणाची सवय होती. इंग्लंड आणि फ्रान्समध्ये तो गोल भोकातील चौकोनी खुंटीसारखा होता. येथे वेगवेगळ्या आकाराच्या खुंट्या आणि तशाच आकाराची भोकं होती. इथे त्याचा विक्षिप्तपणा, स्वार्थीपणा, रानटीपणा सौम्य झाला होता अशातला भाग नाही. पण इथली परिस्थिती वेगळी होती. तो इथे पहिल्यापासून राहिला असता तर तो इथल्या सर्वसामान्या माणसांहून फार वेगळा झाला नसता. कारण इथे त्याला जी सहानुभूती मिळाली ती त्याला त्याच्या मायदेशात मिळात नव्हती.
मला जे वाटलं ते मी कॅप्टन ब्रुनोला सांगितलं. तो थोडा वेळ काहीच बोलला नाही.
‘‘मला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटली होती यात काही नवल नाही. आम्ही दोघं एकाच ध्येयाने प्रेरित होतो.”
‘‘तुम्हा दोघांचं जग एवढं भिन्न आहे तरी तुमचं ध्येय एक हे कसं?’’ मी हसत विचारलं.
‘‘सौंदर्य.’’
‘‘या शब्दाचा आवाका खूप मोठा आहे.’’ मी पुटपुटलो.
‘‘प्रेमात पडलेल्या लोकांना जगातलं इतर काहीच दिसत नसतं. जहाजावर साखळदंडांनी जखडून ठेवलेल्या गुलामांसारखे ते एकाच तालावर वल्हवत असतात. प्रेमाचे गुलाम. विकारवशता मग ती प्रेमामुळे असो की दुसऱ्या कशाने, जो त्यात फसतो त्याला सारखेच क्लेश होतात.’’
‘‘हे तुम्ही म्हणताय! किती विचित्र आहे. मला वाटायचं की त्याला सैतानाने पछाडलं असेल.’’ मी म्हणालो.
‘‘स्ट्रिकलँडला सौंदर्य निर्माण करायचं होतं. त्याच्या ध्यासाने त्याला पछाडलं होतं. अविश्रांत ध्यास. त्यासाठी त्याची अखंड भटकंती चालू होती. काही लोकांना सत्याचा शोध घ्यायचा असतो. त्यांची सत्याची आच एवढी तीव्र असते की त्यात ते स्वत:चं आयुष्य उधळून टाकतात. स्ट्रिकलँड हा असा होता. इथे फक्त सत्याची जागा सौंदर्याने घेतली होती. मला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटते.’’
‘‘हे सुद्धा तेवढंच विचित्र आहे. ज्या माणसाला त्याने दुखावलं होतं त्या माणसाला त्याच्या विषयी अतिशय सहानुभूती वाटत असे. शिकारीला शिकाऱ्या विषयी वाटावी किंवा दुखावला गेलेल्याला दुखावणाऱ्या विषयी सहानुभूती वाटते तशी.’’ मी थोडा वेळ काहीच बोललो नाही. ‘‘त्याच्या स्वभावाने मला नेहमीच गोंधळायला होतं. एक चित्रकार म्हणून त्याची जडण-घडण कशी झाली असावी ह्या प्रश्नाचं उत्तर मला अजून सापडलेलं नाही. तुम्हाला कसं काय उत्तर मिळालं?’’
तो माझ्याकडे बघून हसला.
‘‘मी सुद्धा एका प्रकारे कलाकार आहे हे मी तुम्हाला सांगितलं होतं. ज्या ध्यासाने त्याला पछाडलं होतं त्याच ध्यासाने मीही पछाडलो होतो. चित्रकला हे त्याचं माध्यम होतं तर माझं माध्यम जीवन आहे.’’
कॅप्टन ब्रुनोने मला जी कहाणी सांगितली ती मला तुम्हाला सांगायलाच हवी.
त्यातील विरोधाभासाने स्ट्रिकलँडला जाणून घेण्यात मदत होईल. माझ्या दृष्टीने त्या कहाणीमध्येसुद्धा एक मजा आहे.
कॅप्टन ब्रुनो हा मूळचा फ्रान्समधील ब्रिटनी या भागात राहणारा. तो फ्रेंच नौदलामध्ये होता. लग्न झाल्यावर त्याने नेव्ही सोडली. क्विंपर येथे त्याच्या मालकीचा एक शेतजमिनीचा तुकडा होता. त्याने तेथे स्थायिक होण्याचं ठरवलं. पण त्याच्या वकिलाने त्याला फसवलं. त्यात तो पार निष्कांचन झाला. जिथे त्याने प्रतिष्ठेत दिवस काढले तेथे आता दारिद्र्यात दिवस कंठायला त्याचं मन होईना. नौदलाच्या दर्यावर्दी कारकीर्दी दरम्यान तो प्रशांत महासागराच्या दक्षिणेकडील प्रदेशात गेलेला होता. त्यामुळे नशीब काढण्यासाठी त्याने तिकडे जायचं ठरवलं. पपीएतमध्ये आल्यावर त्याने अनुभव घेण्यासाठी आणि काय करायचं ते नक्की करण्यासाठी थोडे दिवस काढले. नंतर फ्रान्समधील मित्रांकडून थोडे पैसे उधार घेऊन त्याने पमेट्यु मधील एक निर्मनुष्य बेट विकत घेतलं. ते बेट म्हणजे एका समुद्र तलावातील अर्धचंद्राकृती आकाराचा जमीनीचा तुकडा होता. त्यावर फक्त खुरटी झुडपं आणि जंगली पेरुची झाडं होती. त्याची बायको त्याच्यासारखीच अत्यंत धाडसी होती. त्याने बेटावर गेल्यावर काही स्थानिक आदिवासींच्या मदतीने घर बांधणे, जंगलाची साफ सफाई आणि नारळाची लागवड करणे हे दोन कार्यक्रम मोठ्या धडाक्याने हाती घेतले. वीस वर्षांच्या ढोर मेहनतीनंतर त्या ओसाड बेटाचं एका स्वर्गीय बागेत रूपांतर झालं.
‘‘सुरूवातीला ते एक महाप्रचंड कठीण काम वाटायचं. मनात योजलंय ते पूर्ण होईल की नाही याची चिंता वाटायची. मी भल्या पहाटेच उठायचो. दिवसभराच्या श्रमानंतर रात्री बिछान्यावर अंग टाकलं की मेल्यासारखी झोप लागायची. आम्ही दोघांनी प्रचंड मेहनत केली. नंतर आम्हाला मुलं झाली. पहिला मुलगा पाठोपाठची मुलगी. आम्हाला जे माहित होतं ते सगळं आम्ही त्यांना शिकवलं. आमच्याकडे फ्रान्सवरून आणलेला एक पियानो होता. बायकोने त्यांना पियानो वाजवायला आणि इंग्लीश शिकवलं. मी लॅटिन आणि गणित. आम्ही दोघं त्यांना इतिहासाची पुस्तकं वाचून दाखवायचो. त्यांना शिडाची नाव चालवता येते. स्थानिक आदिवासी लोकांइतक्या सफाईने ते पोहतात. आमच्या जमिनी संबंधात त्यांना माहित नाही असं काहीही नाही. आम्ही लावलेल्या झाडांना फुलंफळं आली. जवळच्या किनाऱ्यावर शिंपले सापडतात. मी पपीएतला दोन शिडांचं जहाज घ्यायला आलो आहे. जहाजाची किंमत वसूल होण्या इतके मासे मला मिळतील का नाही याची शंका आहे. कोणास ठाऊक, नशीब असेल तर मासे पकडता पकडता मोत्यांचे शिंपलेही मिळतील. काही नसताना मी एवढं उभं केलं. मीसुद्धा एक सौंदर्य निर्माण केलं आहे. त्या फळाफुलांनी बहरलेल्या उंच हिरव्यागार झाडांकडे बघून ही झाडं मीच लावली आहेत यावर विश्वास बसत नाही.’’
‘‘स्ट्रिकलँडला जो प्रश्न तुम्ही विचारला होता तोच प्रश्न मी तुम्हाला विचारू का? तुम्हाला तुमच्या ब्रिटनीमधल्या जुन्या घराची आणि फ्रान्सची आठवण येऊन पस्तावा वाटत नाही का?’’
‘‘ज्या दिवशी माझ्या मुलीचं लग्न होईल, माझा मुलगा माझी जागा घेण्या इतपत तयार होईल त्या दिवशी मी ज्या घरात माझा जन्म झाला त्या घरात परत जाऊन माझं उर्वरित आयुष्य घालवायचं मी ठरवलं आहे.’’
‘‘तेव्हा तुमच्या गेल्या दिवसांच्या आठवणीने तुम्हाला गहिवरून येईल.’’
‘‘एव्हिदेमो, अर्थात आमच्या बेटावर फार काही घडत नसतं. आम्ही जगापासून अगदी वेगळे पडलो आहोत. कल्पना करा, ताहितीला जायलाच मला चार दिवस लागतात. पण इकडे आम्ही फार सुखी आहोत. जे काम करायचं असेल ते आम्ही मनापासून करतो. आमचं जीवन साधं, सुखी आणि समाधानी आहे. इर्षेचा आम्हाला स्पर्शही झालेला नाही. जे काम हातात घेतलं आहे ते पूरं झालं की तेवढ्या पुरताच आम्हाला त्याचा अभिमान वाटतो. नंतर दुसरं काम हाती घेतो. द्वेष, आकस, मत्सर अशा गोष्टी आमच्या पासून चार हात लांब आहेत. अहाहा माँ शेर मस्यु, महाराज, श्रमसाफल्याच्या आनंदाविषयी खूप काही बोललं जातं ते तसं निरर्थक असतं. पण आमच्या दृष्टीने मात्र तो आनंद खूप महत्वाचा आहे. होय मी सुखी आणि समाधानी आहे.’’
‘‘तुम्ही जी सृष्टी उभी केली आहेत ती पहाता असं नक्कीच म्हणू शकता. तुम्हाला तसा अधिकारच आहे.’’
‘‘माझी तशी योग्यता असली तर मला सुद्धा बरं वाटेल. माझ्या पत्नीने सहचरणी, गृहिणी आणि माता म्हणून मला माझ्या जीवनात साथ दिली हे माझं केवढं भाग्य.’’
कॅप्टन ब्रुनोने सांगितलेल्या जीवनक्रमावर मी थोडा वेळ विचार केला.
‘‘परिस्थितीवर मात करून जगणं आणि त्यात यशस्वी होणं याला केवढं धैर्य, इच्छाशक्ति आणि चिकाटीची गरज आहे.’’
‘‘कदाचित एक गोष्टी नसती तर आम्ही यशस्वी झालो नसतो.’’
‘‘ती गोष्ट कोणती?’’
तो थांबला आणि त्याने नाट्यमय रितीने आपला हात वर केला.
‘‘देवावरचा विश्वास. त्या शिवाय आम्ही यशस्वी झालो नसतो.’’
डॉ.कोत्राजांचं घर आलं होतं.

Artist: Paul Gauguin
Title: Tahiti - Le paysage au paon - Landscape with peacock
Oil on canvas, Date 1892,  Source: Wikipedia



1 comment: