Thursday, February 8, 2018

मून अँड सिक्सपेन्स – ३७

ब्लांश स्ट्रोव्हचा मृत्यु ज्या परिस्थितीत झाला होता त्यामुळे बऱ्याच सोपस्कारानंतर आम्हाला तिचं दफन करण्याची परवानगी मिळाली. स्मशानात जाताना शवपेटीबरोबर फक्त डर्क आणि मी होतो. जाताना गाडी हळू हळू जात होती. परत येताना गाडीवानाने गाडी चांगलीच पिटाळली. गाडीवान ज्या प्रकारे घोड्यांना चाबकाने फटकारत होता ते भयंकर होतं. मृत व्यक्तिचा विचार मनातून एका फटक्यासरशी उडवून लावण्यासारखं ते वाटत होतं. मलासुद्धा त्या प्रकरणातून मनाने बाहेर यायचं होतं. त्या प्रकरणाचा आणि माझा तसा अर्था अर्थी काही संबंध नव्हता. तो विषय बदलायचं खरं तर माझ्याच मनात होतं. पण स्ट्रोव्हचं मन दुसरीकडे वळवलं पाहिजे असं समाधान करून मी दुसरा विषय काढला.
‘‘थोडे दिवस बाहेरगावी गेलं तर बरं होईल असं तुला वाटत नाही का? पॅरीसमध्ये राहयचं आता काही कारण उरलेलं नाही.’’
तो काही बोलत नव्हता तरीही मी माझं म्हणणं निर्दयपणे पुढे रेटत होतो.
‘‘तू पुढे काय करायचं ठरवलं आहेस?’’
‘‘काही नाही.’’
‘‘तुला पुन्हा एकदा नव्याने सुरूवात केली पाहिजे. तू इटलीला जाऊन का बघत नाहीस?’’
त्याने काही उत्तर दिलं नाही. आमचा गाडीवान माझ्या मदतीला आला. वेग थोडा कमी करत मागे वळून त्याने आम्हाला कुठे जायचं आहे ते विचारलं. मी त्याला थोडं थांबायला सांगितलं.
‘‘तू माझ्या बरोबर जेवायला ये.’’ मी डर्कला म्हणालो. ‘‘मी त्याला आपल्याला प्लेस पिगालला सोडायला सांगतो.’’
‘‘नको. त्यापेक्षा मी स्टुडियोत जातो.’’
मी थोडा वेळ थांबून विचारलं.
‘‘मी तुझ्याबरोबर यायला हवं आहे का?’’
‘‘नको. मला एकट्याला राहूं दे.’’
‘‘ठीक आहे.’’

मी गाडीवानाला कुठे जायचं ते सांगितलं आणि आमचा प्रवास पुनश्च न बोलता चालू राहिला. ब्लांशला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यापासून डर्क स्टुडियोत गेला नव्हता. मला त्याच्या बरोबर जायला लागलं नाही ते एका परीने बरंच होतं. मी पॅरीसच्या रस्त्यांकडे नव्याने नजर फिरवली. रस्त्यावरच्या रहदारीकडे मी हसतमुखाने पाहिलं. हवा सुंदर पडली होती. स्वच्छ सूर्यप्रकाश पडला होता. माझ्या अंगात उत्साह संचारला. मी स्ट्रोव्हच्या दु:खद प्रकरणाचे विचार माझ्या मनातून झटकून टाकले. मला थोडी मौज करायची होती.

No comments:

Post a Comment