Tuesday, February 6, 2018

मून अँड सिक्सपेन्स – ३२

यानंतर स्ट्रिकलँडची आणि माझी कित्येक आठवडे गाठ पडली नाही. मला त्याचा अत्यंत तिटकारा यायचा. संधी मिळाली असती तर त्याला मी तसं तोंडावर सांगायला कमी केलं नसतं. पण त्या एका कारणासाठी त्याला गाठण्यात काही अर्थ नव्हता. नैतिक भूमिकेवरून संतापायला मला आवडत नाही. त्यात एक प्रकारची स्वसंतुष्टता असते. ज्याला विनोदाचं इंद्रिय आहे अशा कोणालाही थोडंस अवघडल्यासारखं होईल. स्वत:चाच उपहास करण्यासाठी स्वभाव जिंदादिल असावा लागतो. स्ट्रिकलँडपाशी एक प्रकारचा उपरोधिक प्रामाणिकपणा होता. त्यामुळे कोणी एखादी भूमिका घेऊन बोलायला लागलं की मी थोडा सावरून बसत असे.
एके दिवशी मी अ‍ॅव्हेन्यु द क्लिशीवरून जात होतो. ज्या कॅफेत स्ट्रिकलँड नेहमी बसलेला असायचा तो कॅफे मी हल्ली टाळत असे. त्याच कॅफेत माझी आणि स्ट्रिकलँडची अचानक गाठ पडली. त्याच्या बरोबर ब्लांश स्ट्रोव्ह होती. स्ट्रिकलँड तिला घेऊन त्याच्या नेहमीच्या टेबलाकडे जात होता.
‘‘इतके दिवस कुठे गायब झाला होतास?’’ मला पाहून त्याने विचारलं. ‘‘मला वाटलं तू बाहेरगावी गेला असशील.’’
तो ज्या नम्रतेने बोलत होता त्यावरून हे सिद्ध होतं की मला त्याच्याशी बोलायचं नाही हे त्याला कळलं होतं. ज्याच्याशी नम्रतेने बोलावं अशा लायकीचा इसम तो नव्हता.
‘‘नाही, मी कुठेही गेलो नव्हतो.’’
‘‘मग इथे का आला नाहीस?’’
‘‘वेळ घालवण्यासाठी पॅरीसमध्ये इतर भरपूर कॅफे आहेत.’’
ब्लांशने हात पुढे करून मला गुड इव्हीनींग केलं. का कोण जाणे ती थोडी बदलली असावी असं मला वाटलं. ती नेहमी घालत असे तेच करड्या रंगाचे कपडे तिने घातले होते. स्वच्छ आणि नीटनेटके. तिच्या भुवया तशाच रेखीव होत्या. तिचे डोळे शांत होते. स्ट्रोव्हच्या स्टुडियोत घरकामात गर्क असताना ती पूर्वी दिसायची तशीच ती आता दिसत होती.
‘‘चल आपण बुद्धीबळाचा एक डाव खेळू या,’’ स्ट्रिकलँड म्हणाला.
त्या क्षणी मला एखादं कारण कसं सुचलं नाही ते मला सांगता येणार नाही. मी रागानेच त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या टेबलावर गेलो. त्याने पट आणि मोहरी मागवून घेतले.
ती दोघं इतक्या सहजतेने वागत होते की दुसरं काही बोलणं मला अवघड वाटायला लागलं. अगम्य चेहेऱ्याने ती आमचा खेळ बघत होती. ती गप्प होती. पण तशी ती नेहमीच गप्प असायची. तिला काय वाटतं हे कळावं म्हणून मी तिच्या तोंडाकडे बघत होतो. आश्चर्य, कडवटपणा, दु:खाच्या कोणत्याही खाणाखुणा दिसत नव्हत्या. तिचे डोळे अबोल होते. तिचा चेहेरा मख्ख होता. तिने तिचे हात एकातएक एक घट्ट गुंफून मांडीवर ठेवले होते. मी जे ऐकून होतो त्यावरून चिडल्यावर तिला आवरणं कठीण होई. ज्याने तिच्यावर जीवापाड प्रेम केलं त्या तिच्या नवऱ्याच्या एक जबरदस्त थोबाडीत ठेऊन द्यायला तिने मागे पुढे पाहिलं नव्हतं. नवऱ्याचा, त्याच्या उबदार घराचा तिने एका क्षणात त्याग केला होता. तिच्यातील साहसी वृत्ती, धोका पत्करायची, त्यासाठी कष्ट उपसायची तयारी लक्षणीय होती. तिच्या स्वभावातील हा भाग तिच्या वरवरच्या शांत आणि गंभीर स्वभावाशी विसंगत होता.
आमच्या भेटीमुळे माझा उत्साह वाढला. खेळावर लक्ष केंद्रीत करता करता माझ्या कल्पनेचा वारू मी मुक्त सोडला. मी नेहमी स्ट्रिकलँडवर मात करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असे. तो त्याच्या प्रतिस्पध्र्याचा तिरस्कार करत असे. जिंकल्यावर तो ज्या उन्मादाचं प्रदर्शन करी ते सहन करण्याच्या पलिकडचं असे. पण तेच तो जर हरला तर ते तो हसण्यावर नेई. जिंकला की तो वाईट असे पण हरला की तो चांगला असे. खेळताना माणूस उघडा पडतो. त्याच्या वागण्यातील विसंगती दिसून येतात.

जेव्हा खेळ संपला तेव्हा मी वेटरला बोलवून माझ्या बिलाचे पैसे दिले आणि मी निघून गेलो. त्या भेटीत खास काही झालं नाही. एका शब्दानेही माझ्या विचारांना चालना मिळाली नाही. माझी उत्सुकता ताणली होती. त्यांचं कसं चाललं होतं ते मला सांगता आलं नसतं. ते त्यांच्या स्टुडियोच्या भिंतीआड काय करतात ते जाणण्यासाठी मला एखाद्या अदृश्य शक्तीची मदत घ्यावी लागली असती. एकही सुचक दुवा हाताशी नसताना उगाच कल्पनेची भरारी मारण्यात अर्थ नव्हता.



Artist: Paul Gauguin
Title: Night Café at Arles, Date: 1888,
Medium: oil on canvas, Source: Wikipedia

6 comments:

  1. फक्त पॉल गोगँची पेंटींग देण्यापेक्षा मी या कादंबरीत लेखकाने ज्या इतर पेंटींगचा किंवा चित्रकारांचा उल्लेख केला आहे ती देण्याचा प्रयत्न करत आहे. तो बघून संदर्भ लगेच कळेल असं नाही. उदा. मला एल ग्रेको का आव़डतो. किंवा मॉने ग्रेट आहे म्हटल्यावर मला त्यापेक्षा विंटरहॉल्टर जास्त आवडतो असं म्हण्यात कुचेष्टा कशी. ब्रुघेलचा प्रभान गोगँवर कसा वगैरे कुतुहल शमवण्यासाठी इंटरनेट गुगल इमेजवर भरपूर माहिती उपलब्ध आहे. माझा उद्देश फक्त कुतुहल डिवचणे एवढाच आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. Good idea...yamule kutuhal vadhelach....

      Delete
    2. पॉल गोगँ ची चित्रे आपसूकच पाहीली जातील .
      परंतु कादंबरी वाचत असताना कथानकात येणाऱ्या इतर चित्रकारांची चित्रे पहात पहात वाचत गेल्यास कादंबरीतला काळ आणि तिचे वाचन अधिक जिवंत होते.त्यादृष्टीने तुम्ही अशी चित्रे देण्याचा तुमचा प्रयोग अगदी उत्तम आहे.
      मी स्वतः एखादं पुस्तक वाचताना त्यातील दृश्यसंदर्भ गुगल वरून शोधून , ती पहात वाचन करतो . त्यामुळे वाचनाला अधिक आयाम मिळतात असा अनुभव आहे.
      स्तुत्य प्रयोग .... 👌👍🌷😍

      Delete
    3. पेंटींग सहज उपलब्ध व्हावी म्हणून मी त्या प्रकरणाखाली दिली आहेत. उदा. प्रकरण 1 व 2 मध्ये मला व्हेलास्केजपेक्षा एल ग्रेको जास्त आवडतो असं विधान आहे. गोगँ तसेच पिकासोला 16व्या शतकातील एल ग्रेको का भावला. प्रकरण 39 मध्ये परत एकदा व्हेलास्केजचा उल्लेख आहे. ब्लांशला बघून शेदाँ Chadrin ची आठवण का येते. ही कादंबरी लिहीताना मॉमने 1650 ते 1850 या कालखंडातील युरोपियन चित्रकारांच्या पेंटींगचा मोठ्या खुबीने वापर केला आहे (उपमा आणि उत्प्रेक्षा ... literary allusions) पण त्याचा कादंबरीतील मॉमला अभिप्रेत असलेला संदर्भ मला वाटतं तुम्ही जास्त चांगला उलगडून दाखवू शकाल.

      Delete