Tuesday, February 6, 2018

मून अँड सिक्सपेन्स – ३३

दोन तीन दिवसांनी मला डर्क स्ट्रोव्ह भेटला.
‘‘तू ब्लांशला भेटलास असं माझ्या कानावर आलं आहे.’’
‘‘अरे तुला कसं कळलं?’’
‘‘माझ्या एका मित्राने त्यांना तुझ्या बरोबर कॅफेत पाहिलं. तू मला का सांगितलं नाहीस?’’
‘‘मला वाटलं की तुला त्रास झाला असता.’’
‘‘त्रास होणार असला तर कसाही तो होणारच आहे. तुला ठाऊक असायला हवं की तिच्याबाबतीतील अगदी बारीकसारीक गोष्टसुद्धा मला कळायला हवी आहे.’’
त्याने मला स्पष्ट विचारेपर्यंत मी वाट पाहिली.
‘‘ती कशी दिसते?’’
‘‘काहीही फरक पडलेला नाही.’’
‘‘ती सुखी दिसत होती का?’’
मी खांदे उडवले.
‘‘मला सांगता येणार नाही. आम्ही कॅफेमध्ये होतो, आणि मी बुद्धीबळाचा डाव खेळत होतो. तिच्याशी बोलणं झालं नाही.’’
‘‘तिच्या चेहेऱ्यावरून सांगता येणार नाही का?’’
मी मान हलवली. तिला काय वाटतं होतं ते शब्दातून तर जाऊं दे तिच्या हावभावातूनसुद्धा कळत नव्हतं. तिची स्वत:वर ताबा ठेवण्याची क्षमता माझ्यापेक्षा त्यालाच जास्त माहित असायला हवी होती. त्याने भावनातिरेकाने हाताच्या मुठी आवळल्या.
‘‘अरे बापरे, काही तरी अघटीत घडणार आहे आणि मी काही करू शकणार नाही अशी मला भिती वाटत आहे.’’
‘‘तुला कसली भिती वाटत आहे?’’
‘‘सांगता येत नाही,’’ तो रडक्या आवाजात म्हणाला. त्याने आपले डोके दोन्ही हातात धरले. ‘‘भयंकर उत्पात होणार आहे असं मला दिसतंय.’’
स्ट्रोव्ह नेहमीच उत्तेजित होऊन बोलत असे. पण आज तो काही वेगळाच वाटत होता. त्याला जे वाटत होतं त्याला काही कारण देता आलं नसतं. ब्लांश स्ट्रोव्ह स्ट्रिकलँडचं वागणं फार काळ सहन करू शकली नसती. स्वत: घातलेल्या बिछान्यावर स्वत:लाच झोपावं लागतं ही म्हण नेहमीच लागू पडते असं काही म्हणता येणार नाही. आयुष्यात बरेचजण चुकतात, संकटात सापडतात, पण त्यातून मार्ग काढून सुटकाही करून घेतात.
जर ब्लांशचं स्ट्रिकलँडशी भांडण झालं असतं तर तिने सरळ त्याला सोडून द्यावं. स्ट्रोव्ह तिची वाट बघत होताच. मला तिच्या विषयी फारशी सहानुभूती वाटत नव्हती.
‘‘तू काही तिच्यावर माझ्यासारखा प्रेम करत नाहीस, म्हणून तुला काही वाटत नाही.’’
‘‘ती सुखी नाही हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा आपल्याकडे नाही. आपल्याला फक्त एवढंच माहित आहे की ते चारचौघांसारखे सुखाने संसार करत असावेत.’’
स्ट्रोव्हने माझ्याकडे दु:खी कष्टी नजरेने पाहिलं.
‘‘तुला काय फरक पडतो. माझ्यासाठी ती अतिशय महत्वाची गोष्ट आहे.’’
‘‘मी काही वावगं बोललो असेन तर मला माफ कर.’’
‘‘माझ्यासाठी एक गोष्ट करशील?’’ स्ट्रोव्हने विचारलं.
‘‘नक्की करेन.’’
‘‘माझ्या तर्फ ब्लांशला पत्र लिहिशील?’’
‘‘तू स्वत:च का लिहत नाहीस?’’
‘‘मी तिला बरीच पत्रं लिहिली. ती मला
उत्तर देईल असं वाटत नाही. माझी पत्रं ती वाचतही असेल की नाही याचीच शंका आहे.’’
‘‘स्त्रियांचं कुतुहल विलक्षण असतं हे तू विचारात घेतलेलं दिसत नाहीस. तिला पत्रं वाचण्याचा मोह टाळता येईल?’’
‘‘माझ्या बाबतीत ती तसं करू शकेल.’’
मी चटकन त्याच्याकडे पाहिलं. त्याने नजर खाली केली. ती त्याच्याकडे एवढं दुर्लक्ष करत होती की त्याच्या हस्ताक्षरातलं पत्र बघूनही तिच्यावर काहीही परिणाम होणं शक्य नव्हतं हे त्याला चांगलच ठाऊक होतं.
‘‘ती परत येईल याच्यावर तुझा खरंच विश्वास आहे?’’ मी विचारलं.
‘‘वाईटात वाईट काहीही झालं तरी मी तिला आसरा द्यायला तयार आहे हे तिला शेवटचं कळायला पाहिजे. तू तिला हेच सांग.’’
मी कागद घेतला.
‘‘मी काय लिहू?’’
मी खालील मजकुराचं पत्र लिहलं.
मिसेस स्ट्रोव्ह यांस,
जेव्हा कधी तुम्हाला डर्कची गरज भासेल तेव्हा तुमच्या उपयोगी पडायला तो मोठ्या आनंदाने तयार आहे. डर्कने मला तुम्हाला हे कळवायला सांगितलं आहे. जे होऊन गेलं त्याविषयी तुमच्याबद्दल त्याच्या मनात कोणताही किंतू नाही. त्याचं तुमच्यावरचं प्रेम कायम आहे. तो खाली दिलेल्या पत्त्यावर नेहमी उपलब्ध असेल:

1 comment: