Friday, February 9, 2018

मून अँड सिक्सपेन्स – ४१

आम्ही चालत चालत माझ्या घरापर्यंत आलो. त्याला आत ये असं मी म्हणणार नव्हतो. म्हणूत न बोलता मी पायऱ्या चढायला सुरवात केली. तो पावलावर पाऊल ठेऊन माझ्या मागोमाग घरात आला. तो पूर्वी कधीच माझ्या घरी आला नव्हता. माझी जागा मी एवढ्या मेहनतीने सजवली होती पण त्याने एक साधा दृष्टीक्षेपही टाकला नाही. टेबलावर तंबाखूचा डबा होता. त्याने आपला पाईप काढून त्यात तंबाखू भरला. एकच खुर्ची बिनहातांची होती. तो त्या खुर्चीवर पाठचे दोन पाय मागे झुकवून बसला.
‘‘तू त्या आरामखुर्चीत का बसत नाहीस? तुला घरच्यासारखं वाटेल.’’ मी किंचित चिडून विचारलं.
‘‘माझ्या आरामाची तू एवढी काळजी का करतोयस?’’
‘‘मी मुळीच करत नाही, मी स्वत:ची काळजी करतोय. कोणाला असं अवघडलेल्या अवस्थेत बसलेलं पाहिलं की मलाच अस्वस्थ वाटायला लागतं.’’
तो गालातल्या गालात हसला. पण तो जागेवरून हलला नाही. माझ्याकडे लक्ष न देता तो शांतपणे धुम्रपान करत होता. तो कोणत्यातरी विचारात गढून गेला होता. तो माझ्याकडे का आला आहे याचं मला आश्चर्य वाटायला लागलं.
माणसाचा स्वभाव विचित्र असतो. त्यातील वैशिष्ट्यांचा अभ्यास करताना लेखकाला त्याची नैतिक भूमिका बाजूला ठेवावी लागते. सुरूवाती सुरूवातीला लेखक अस्वस्थ होतो. पण कालांतराने मन घट्ट होतं आणि त्याची सवय होऊन जाते. असं करणं वाईट आहे अशी त्याला टोचणी असते. पण विश्र्लेषणाने मिळणाऱ्या कलात्मक समाधानाच्या पुढे त्याला ती जाचक वाटत नाही. सद्सद्विवेकबुद्धीवर कुतूहलबुद्धी मात करते. बदमाश इसम समाजाचे कायदे कानून मानत नसला तरी त्याला गुन्हेगारांच्या का होईना पण नितीनियमांच्या चौकटीतच राहवे लागते. शेक्सपीअरला इयागोचं पात्र रंगवताना जी मजा आली असेल ती कदाचित डेस्डिमोनाच्या वेळेला आली नसेल. लेखकाच्या स्वत:च्या व्यक्तिमत्वातील दु:प्रवृत्ती सामाजिक बंघनांमुळे त्याच्या अंतर्मनात खोल दबलेल्या असतात. आपल्या पात्रांना जिवंत करताना लेखक कदाचित त्याच दु:प्रवृत्ती त्यांना बहाल करीत असेल. त्याला मिळणारं कलात्मक समाधान म्हणजे कदाचित त्याने टाकलेला सुटकेचा निश्वास असू शकेल.
लेखकाला न्याय करायचा नसतो. त्याला फक्त समजून घ्यायचं असतं.
एक माणूस म्हणून स्ट्रिकलँड भयंकर होता. मला तो मुळीच आवडते नसे. पण त्याच वेळी त्याच्या वर्तनामागचा उद्देश शोधून काढण्याचं जबरदस्त कुतूहलही होतं. त्याने मला गोंधळात टाकलं होतं. ज्या स्ट्रोव्ह दांपत्याने त्याला एवढ्या मायाळूपणे वागवलं, त्याच्या गंभीर आजारात त्याची सेवा करून त्याला जीवदान दिलं, त्यांचं आयुष्य उध्वस्त करायला तो पूर्णपणे जबाबदार होता. त्या बद्दल त्याला काय वाटतं हे जाणून घ्यायला मी उत्सुक होतो. मी सरळ विचारलं.
‘‘स्ट्रोव्ह मला म्हणाला की तू त्याच्या बायकोचं एक पेंटींग केलं आहेस आणि ते अगदी उत्कृष्ट झालंय.’’
स्ट्रिकलँडने तोंडातला पाईप काढला आणि त्याच्या डोळ्यात हसू फुललं.
‘‘ते करताना मजा आली.’’
‘‘ते तू त्याला का देऊन टाकलंस?’’
‘‘एकदा काढून झाल्यावर मला त्याचा काही उपयोग नव्हता.’’
‘‘स्ट्रोव्ह ते जवळ जवळ फाडून टाकणार होता तुला माहित आहे?’’
‘‘नाही तरी ते एवढं कुठे चांगलं झालं होतं.’’
तो एक दोन क्षण काही बोलला नाही. नंतर त्याने पाईप परत तोंडात ठेवला आणि माझ्याकडे बघून गालातल्या गालात हसला.
‘‘तो जाड्या मला भेटायला आला होता हे तुला ठाऊक आहे का?’’
‘‘त्याने तुला जे सांगितलं त्याने तुला काहीच वाटलं नाही?’’
‘‘मुळीच नाही. असं भावनेच्या आहारी जाणं म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे.’’
‘‘मला वाटतं तू त्यांचं आयुष्य उध्वस्त केलं आहेस हे तू विसरतो आहेस.’’
त्याने त्याची दाढी खाजवली.
‘‘तो अगदी फालतू चित्रकार आहे.’’
‘‘पण तो माणूस म्हणून किती चांगला आहे.’’
‘‘तो आचारी म्हणून त्याहून चांगला असेल.’’ स्ट्रिकलँड उपहासाने म्हणाला.
त्याचा निगरगट्टपणा कमालीचा होता. मी एवढा संतापलो की मी त्याची चांगलीच खरडपट्टी काढायचं ठरवलं.
‘‘मी निव्वळ कुतूहलापोटी तुला विचारत आहे. ब्लांश स्ट्रोव्हच्या दुर्दैवी मृत्युमुळे तुला एक क्षणभर तरी पश्चाताप झाला का?’’
मी त्याच्या चेहेऱ्यावरचे भाव बदलत आहेत का ते बघत होतो. पण तो दगडासारखा अविचल होता.
‘‘मला का व्हावा?’’
‘‘सत्य परिस्थिती तुला एकदा समजावून सांगितली पाहिजे. तू मरायला टेकला होतास. डर्क स्ट्रोव्हने तुला घरी आणलं. आईने घेतली नसती एवढी तुझी काळजी घेतली. स्वत:ची गैरसोय करून, स्वत:चा वेळ, पैसा तुझ्यासाठी खर्च केला. मृत्युच्या जबड्यातून तुला बाहेर काढलं.’’
स्ट्रिकलँडने खांदे उडवले.
‘‘त्या जाड्याला हे सगळे उपद्व्याप करण्यात मजा वाटत होती त्याला मी काय करणार? तो त्याचा प्रश्न होता.’’
‘‘आपण मान्य करूया की तुला कृतज्ञता व्यक्त करण्याची गरज नव्हती, पण याचा अर्थ असा नव्हे की तू त्याच्या बायकोला त्याच्यापासून हिरावून घ्यावंस. तू त्यांच्या आयुष्यात येईपर्यंत त्या दोघांचा संसार सुखाने चालू होता. तू त्यांना ते होते तसंच का राहू दिलं नाहीस?’’
‘‘ते दोघं सुखी होते असं तू कशावरून म्हणत आहेस?’’
‘‘ते सरळ दिसत होतं.’’
‘‘तुझ्या नजरेतून काही सुटत नाही असं तू म्हणतोस ना. त्याने तिला जे काही केलं होतं त्यानंतर तिने त्याला माफ केलं असतं असं तुला वाटतं का?’’
‘‘तुला काय म्हणायचं आहे?’’
‘‘त्याने तिच्याशी का लग्न केलं असेल असं तुला वाटतं?’’
मी मान हलवली.
‘‘ती एका कोणातरी रोमन प्रिन्सच्या श्रीमंत कुटुंबात गव्हर्नेस म्हणून नोकरी करत होती. त्यांच्या मुलाने तिला आपल्या जाळ्यात फसवलं. तिला वाटलं की तो तिच्याशी लग्न करेल. पण सगळी श्रीमंत माणसं करतात तसं त्याने तिला हाकलून दिलं. ती रस्त्यावर आली. तिच्या पोटात मुल होतं. तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. स्ट्रोव्हने तिला वाचवलं आणि तिच्याशी लग्न केलं.’’
‘‘त्याचा स्वभावच तसा आहे. त्याच्या एवढ्या मोठ्या मनाचा माणूस मी तरी दुसरा पाहिला नाही.’’
एकमेकांना मुळीच अनुरूप नसणाऱ्या त्या दोघांनी लग्न का केलं असा मला नेहमी प्रश्न पडायचा पण त्याचं उत्तर मला मिळालं नव्हतं. त्यांच्या लग्नामध्ये केवळ प्रेमाचा भाग नसावा असं मला राहून राहून वाटायचं. तिच्या अबोलपणाचं काय कारण असावं हे मला कळत नसे, पण आता मात्र तिला काहीतरी लज्जास्पद असं लपवायचं असावं असा मला संशय यायला लागला. एखाद्या बेटावर तुफानाने झोडपून काढल्यावर जी शांतता पसरते तसं मला तिच्या बाबतीत वाटायला लागलं. तिचा उल्हास नैराश्यातून आलेला असावा. माझी तंद्री स्ट्रिकलँडने भंग केली. त्याच्या बोलण्यातील उपरोधाने मी उडालो.
‘‘स्त्री तिला फसवणाऱ्या पुरूषाला एक वेळ माफ करेल, पण मात्र तिच्यावर उपकारकर्त्याला ती कधीही माफ करत नाही.’’
‘‘म्हणजे तुझ्या संपर्कात येणाऱ्या कोणत्याही स्त्रीकडून तुला धोका नाही, हे तू स्वत:च्या उदाहरणावरून म्हणत आहेस.’’
त्याचे ओठ किंचीत विलग झाले.
‘‘मार्मिक उत्तर देण्यासाठी तू स्वत:च्या तत्वांशी तडजोड करायला नेहमीच तयार असतोस.’’
‘‘त्या मुलाचं काय झालं.’’
‘‘ते जन्मत:च मृतावस्थेत होतं. त्यांनी लग्न केल्यानंतर तीन चार महिन्यांनी असेल.’’
त्यानंतर मला सर्वात जास्त कोड्यात पाडणारा प्रश्न मी विचारला.
‘‘मला एक सांग ब्लांश स्ट्रोव्हला तुझ्यात एवढं काय वाटलं?’’
त्याने बराच वेळ उत्तर दिलं नाही. तो प्रश्न मला परत विचारावा लागला.
‘‘मला कसं सांगता येईल?’’ शेवटी एकदाचं त्याने सांगितलं. ‘‘तिला तर मी डोळ्यासमोरसुद्धा नको असायचो. मला त्याची खूप गंमत वाटायची.’’
‘‘असं काय.’’
अचानक तो चिडला.
‘‘ते सगळं गेलं तेल लावत. मला ती हवी होती.’’
पण त्याने स्वत:चा राग चटकन काबूत आणला. माझ्याकडे बघत तो हसला.
‘‘सुरूवातीला ती घाबरली होती.’’
‘‘तू तिला सांगितलं होतंस?’’
‘‘तशी काही गरज नव्हती. तिला ठाऊक होतं. मी एका शब्दानेही कधी बोललो नव्हतो. ती प्रचंड घाबरली होती. शेवटी मी तिला बिछान्यात घेतली.’’
कामवासनेमुळे तो किती हिंस्र आणि हीन पातळीला जाऊ शकत होता हे यातून दिसत होतं. पण त्याने मला ते ज्या पद्धतीने सांगितलं ते भयंकर अस्वस्थ करणारं होतं. त्याला भौतिक सुखांची आस नव्हती. पण त्याचं शरीर कधी कधी त्याच्या आत्म्यावर सूड उगवत होतं. त्याच्यामध्ये दडलेला दैत्या त्याचा ताबा घेत असावा. त्या आदिम शक्तिपुढे तो अगदी हतबल होत असावा. त्याच्या नितीमत्तेच्या चौकटीत सारासार विवेक किंवा कृतज्ञता असल्या मूल्यांना स्थान नव्हतं.
‘‘पण तिला तू तुझ्या बरोबर का घेऊन गेलास?’’ मी विचारलं.
‘‘मी तिला बोलावलं नव्हतं,’’ त्याच्या कपाळाला आठ्या पडल्या. ‘‘ती जेव्हा म्हणाली की मी येत आहे तेव्हा स्ट्रोव्ह एवढंच मला सुद्धा आश्चर्य वाटलं. मी तिला स्पष्ट सांगितलं होतं की मला तिचा कंटाळा आला तर तिला जावं लागेल. तिला त्याची तयारी होती.’’ तो थोडा थांबला. ‘‘तिचं शरीर अतिशय कमनीय होतं आणि मला एक नग्न चित्र काढायचं होतं. माझं चित्र काढून झालं आणि माझा तिच्यातील रस संपला.’’
‘‘तिचं मात्र तुझ्यावर मनापासून प्रेम होतं.’’
तो अचानक उठून उभा राहिला आणि त्या छोट्या खोलीतून येराझाऱ्या घालू लागला.
‘‘प्रेम मला नको होतं. माझ्याकडे त्याच्यासाठी वेळ नाही. तो एक मनाचा दुबळेपणा असतो. मी पुरूष आहे आणि अधून मधून मला स्त्रीची गरज लागते. माझी वासना पूर्ण झाली की मी दुसऱ्या गोष्टी करायला मोकळा होतो. माझ्या वासनेवर मला काबू मिळवता येत नाही. याचा मला तिरस्कार वाटतो. त्याने माझ्या निर्मिती क्षमतेवर मर्यादा पडतात. ज्यावेळी मला या सगळ्या मोहातून मुक्त होता येईल त्या क्षणाची मी वाट बघत आहे. मग मला माझ्या कामाकडे विनाअडथळा लक्ष देता येईल. स्त्रियांना प्रेम करण्यापलीकडे काही करता येत नाही. त्यामुळे त्यांनी प्रेमाला उगाचच महत्व दिलं आहे. प्रेम म्हणजेच सारं आयुष्य आहे असं त्यांना वाटतं. प्रेम हा आयुष्याचा एक भाग आहे हे खरं असलं तरी तो आयुष्यातील अगदी क्षुल्लक भाग असतो. वासना मी एक वेळ समजू शकतो. ती नैसर्गिक असते. शिवाय शरीरस्वस्थ्यासाठी आवश्यकही असते. प्रेम म्हणजे एक रोग असतो. स्त्री म्हणजे माझ्या दृष्टीने शरीरसुखाचं एक खेळणं आहे. प्रेम, जीवनसाथी, लग्न असल्या फालतू गप्पा मारायला माझ्याकडे वेळ नाही.’’
स्ट्रिकलँडला एवढं एका दमात बोलताना मी कधीच ऐकलेलं नव्हतं. तो चिडीला येऊन बोलत होता. तो जे बोलला ते मला शब्दश: सांगणं शक्य नाही. त्याची शब्दकळा तुटपुंजी होती, त्याचं बोलणं तुटक होतं. त्याचा अर्थ लावण्यासाठी मला बरीच कसरत करावी लागली. गाळलेले शब्द भरायचे, पुनरावृत्तीत शब्द गाळायचे, जेथे अर्थ लागणार नाही तेथे त्याच्या तोंडावरील हावभाव बघायचे आणि त्याच्या हातवाऱ्यांचा अर्थ लावायचा.
‘‘जेव्हा स्त्रिया ह्या जंगम मालमत्तेचा भाग होत्या आणि पुरूषांच्या मालकीचे गुलामांचे तांडे असत त्या काळात तू जन्मायला हवं होतस.’’ मी म्हणालो.
‘‘असं होतं कधी कधी, मी अगदी शंभर टक्के डोकं ताळ्यावर असलेला माणूस आहे. घाबरू नकोस.’’
मला हसू आवरलं नाही. तो अगदी गंभीरपणे बोलत होता. तो पिंजऱ्यात सापडलेल्या श्वापदासारखा फेऱ्या मारत होता. त्याला जे जाणवलं होतं ते त्याला सांगायचं होतं पण त्यासाठी त्याला योग्य शब्द सापडत नव्हते.
‘‘जेव्हा स्त्री प्रेमात पडते तेव्हा त्या पुरूषावर पूर्ण ताबा मिळवेपर्यंत तिचं समाधान होत नाही. स्त्री निसर्गत:च पुरूषापेक्षा दुबळी असते. म्हणून तिला पुरूषावर आपली सत्ता प्रस्थापित करायची असते, त्याशिवाय तिचं समाधान होत नाही. तिची बुद्धी कोती असते. अमूर्त अशी कोणतीही गोष्ट तिला आवडत नाही. कारण ते समजून घेणं तिच्या आवाक्या बाहेर असतं. भौतिक गोष्टींमध्येच तिचा सगळा वेळ जातो. आदर्श, ध्येय वगैरे गोष्टींचा तिला मत्सर वाटतो. पुरूषाच्या संचाराला सारे विश्व अपुरं पडत. स्त्री पुरूषाला आपल्या स्वयंपाकघरात डांबून ठेवण्याचा प्रयत्न करत असते. तुला माझी बायको आठवत असेलच. ब्लांश सुद्धा हळू हळू त्याच मार्गाने चालली होती. ऍमी लढवत असे त्या सगळ्या क्लृप्त्या ब्लांशही लढवायला लागली होती. मला जाळ्यात गुंतवून ठेवण्याचा तिचा उद्योग चिकाटीने चालला होता. ती मला तिच्या पातळीवर आणायला बघत होती. तिला माझी पर्वा नव्हती. मी तिला फक्त तिचा व्हायला हवा होतो. माझ्यासाठी ती जगातली कोणतीही गोष्ट करायला तयार होती फक्त एक गोष्ट सोडून. ती म्हणजे मला एकट्याला जगूं देणं.’’
मी थोडा वेळ गप्प होतो.
‘‘तू तिला सोडून गेल्यावर तिने काय करावं अशी तुझी अपेक्षा होती?’’
‘‘ती स्ट्रोव्हकडे परत जाऊ शकली असती. तो तिला परत घ्यायला तयार होता.’’ तो चिडून म्हणाला.
‘‘तू माणूस म्हणवून घेण्याच्या लायकीचा नाहीस. या गोष्टींवर तुझ्याशी बोलणं म्हणजे एखाद्या जन्मांधळ्या माणसाशी रंग म्हणजे काय त्यावर चर्चा करण्यासारखं आहे.’’
तो माझ्या खुर्चीसमोर येऊन थांबला आणि माझ्याकडे आश्चर्याने बघत म्हणाला.
‘‘ती ब्लांश स्ट्रोव्ह जिवंत आहे की मेली याला तू तरी कवडीची किंमत देत आहेस का? कशाला फुकाच्या माणूसकीच्या गमजा मारतोयस?’’
त्याने विचारलेला प्रश्न मलाही पडला होता आणि मी त्या प्रश्नाचं कोणत्याही परीस्थितीत अगदी प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं ठरवलं होतं.
‘‘तिच्या मृत्युने मला जर फारसा फरक पडत नसेल तर त्याचा अर्थ माझ्यामध्ये तेवढी सहानुभूती नाही असा होतो. तिला आयुष्य अजून खूप बघायचं बाकी होतं. तिचा जगण्याचा हक्क अशा क्रूरपणे हिरावून घेणं हे भयंकर आहे. मला त्याचं काही वाटत नाही याची मला शरम वाटत आहे.’’
‘‘तुला जे पटलंय ते कबूल करण्याचं धैर्य तुझ्यात नाही. मी सोडून गेलो म्हणून ब्लांश स्ट्रोव्हने आत्महत्या केली असं नाही. तिने आत्महत्या केली कारण ती मूर्ख होती, तिच्या मनाचं संतुलन बिघडलेलं होतं म्हणून. तिच्या बद्दल आपण खूप बोललो आहोत. ती एवढी महत्वाची मुळीच नाही. चल मी तुला माझी चित्रं दाखवतो.’’
मी एखादं लहान मुल असल्याप्रमाणे माझ्याशी बोलून तो माझं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत होता. मी भयंकर चिडलो होतो. त्याच्यापेक्षा जास्त माझ्या स्वत:वरच. मोंमात्रमधल्या एका छानशा स्टुडियोत त्या दोघांचा जो सुखाचा संसार चालू होता त्याची मला आठवण झाली. त्यांचा प्रेमळपणा, आतिथ्यशीलता या सगळ्यांच्या एका फटक्यात अशा ठिकऱ्या ठिकऱ्या उडाव्यात हे क्रूरपणाचं होतं. पण सगळ्यात क्रौर्याची गोष्ट म्हणजे ते बंद झाल्याने काही फरक पडत नव्हता. जग रहाटी चालू होती. काडीचाही फरक पडला नव्हता. मला वाटलं डर्कसुद्धा थोड्या दिवसांनी झालं गेलं विसरून जाईल. बिचारी ब्लांश, कोणत्या उमेदीनं, कोणती स्वप्न बघत तिने नुकतीच आयुष्याला सुरवात केली होती. तिच्या वाटेला आलेलं जीवन जगून नसल्यासारखंच होतं. असा शोक करण्यात आता काही उपयोगही नव्हता, अर्थही नव्हता.
स्ट्रिकलँडने त्याची हॅट घेतली आणि माझ्याकडे पाहिलं.
‘‘माझ्याबरोबर येतोस?’’
‘‘मला कशाला बोलावतोस? तू मला आवडत नाहीस, मी तुझा तिरस्कार करतो हे तुला माहित आहे.’’
तो गालातल्या गालात हसला.
‘‘तुझं माझ्याशी फक्त एकाच गोष्टीवरून भांडण आहे, ते म्हणजे तुला माझ्याबद्दल काय वाटतं, तुझं काय मत आहे याला मी पेनीचीही किंमत देत नाही.’’
मी रागाने लाल झालो. त्याच्या निबर स्वार्थीपणामुळे दुसऱ्याला राग येऊ शकतो हे त्याला समजावणं अशक्य होतं. त्याने उदासीनतेच हे जे कातडं पांघरलं होतं ते मला फाडायचं होतं. तो जे बोलत होता त्यात तथ्यांश आहे हे ही मला माहित होतं. आपल्या मताला लोक जी किंमत देतात त्यामुळेच आपण त्यांच्यावर सत्ता गाजवू शकतो. या सत्तेची आपल्याला नकळत चटक लागते. ज्यांच्यावर आपण ही सत्ता गाजवू शकत नाही त्यांच्याशी आपलं जमत नाही, त्यांच्या सहवासात स्वाभिमान दुखावला जातो. पण मी त्याला असा सोडणार नव्हतो.
‘‘दुसऱ्याच्या मताची मुळीच दखल न घेणं शक्य आहे का?’’ हे त्याच्यापेक्षा मी स्वत:लाच विचारलं. ‘‘आपण या ना त्या प्रत्येक गोष्टीसाठी कोणा ना कोणा वर तरी अवलंबून असतो. फक्त स्वत:पुरतं स्वत:साठीच जगणं हे किती हास्यास्पद होईल. तू आजारी पडलास, थकलास, म्हातारा झालास की मग झक्कत तुला आपल्या माणसांत रांगत यावं लागेल. थोड्या आरामाची, सहानुभूतीची गरज भासली की मग पश्चाताप होईल. तू एका अशक्यप्राय गोष्टीच्या मागे लागला आहेस. तुझ्यातील माणसाला कधी ना कधी तरी माणूसकीची गरज लागेल.’’
‘‘चल माझी चित्रं तर बघ.’’
‘‘तू कधी मरणाचा विचार केला आहेस?’’
‘‘मी कशाला विचार करू. त्याने काय फरक पडणार आहे?’’
मी त्याच्याकडे टक लावून पाहिलं. तो माझ्या समोर निस्तब्ध उभा होता. त्याच्या डोळ्यात वरवर मिश्किल हसू होतं. पण आत खोलवर कुठेतरी थंडगार अग्नी धुमसत असला पाहिजे. आत अशरीर वेदनेने पिळवटणारं दु:ख होतं. एक निस्तब्ध वादळ आकारत होतं. माझ्या समोर बसलेल्या त्या घाणेरड्या कपड्यातल्या इसमाकडे मी बघितलं. त्याचं मोठं नाक, लाल दाढी, विस्कटलेले केस आणि डोळ्यातील चमक. त्या देहातील अशरीर चैतन्य मला खुणावत होतं.
‘‘चला, तुझी चित्रं बघूया.’’ मी म्हणालो.


Artist: Paul Gauguin
Title: Nude Study, Meddium: Water colour
Source: Wikipedia

2 comments:

  1. वाह , खूप छान छान प्रसंगांची मालिकाच येतेय ...👌👍💐

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete