Saturday, February 3, 2018

मून अँड सिक्सपेन्स – २७

दोन तीन आठवडे गेले. मला काही काम नव्हतं म्हणून एक दिवस मी सुट्टी घेतली आणि लुवरला गेलो. मला जी पेंटींग आवडायची त्या पेंटींगसमोर जाऊन मी उभा राहिलो आणि माझ्या कल्पनाशक्तीचं वारू मोकाट सोडलं. गॅलेरीत रमतगमत भटकत असताना मला अचानक स्ट्रोव्ह दिसला. त्याचा तो गोल गुबगुबीत देह आणि पडलेला दु:खी चेहेरा पाहून मला हसू आलं. पाण्यात बुडता बुडता वाचलेल्या एखाद्या माणसासारखा त्याचा अवतार दिसत होता. कपडे घामाने थबथबलेले, चेहेरा घाबरा-गुबरा आणि दु:खी-कष्टी, तरीही बघता क्षणी हसू पुâटेल असा. त्याने वळून माझ्या दिशेने पाहिलं पण त्याला मी दिसत नव्हतो. त्याच्या चष्म्यातून त्याचे टपोरे निळे डोळे केविलवाणे दिसत होते.
‘‘स्ट्रोव्ह,’’ मी हाक मारली.
तो भानावर येऊन बापूडवाणा हसला.
‘‘तू अशा अवतारात का भटकत आहेस?’’
‘‘बरेच दिवस मी लुवरमध्ये आलो नव्हतो. वाटलं बघावं काय नवीन आलं आहे का.’’
‘‘पण तू म्हणाला होतास की मला या आठवड्यात एक चित्र पूर्ण करायचं आहे म्हणून.’’
‘‘माझ्या स्टुडियोत बसून स्ट्रिकलँड चित्रं काढतोय.’’
‘‘असं का?’’
‘‘मीच त्याला सुचवलं. स्वत:च्या स्टुडियोत जाण्याएवढा तो अजून बरा झालेला नाही. मला वाटलं आम्हा दोघांना तेथे काम करता येईल. या विभागातले बरेच चित्रकार एकच स्टुडियो दोघे तिघे मिळून वापरतात. मला वाटलं असं करण्यात दोघांना मजा येईल. काम करून दमल्यावर गप्पा मारायला कोणी तरी बरोबर असला तर बरं होईल.’’
हे त्याने अगदी सावकाश एक एक वाक्य तोडत सांगितलं. मध्येच तो अवघडल्यासारखा होऊन गप्प बसे. हे सांगताना त्याचे डोळे भरून आले होते.
‘‘काय झालं नीट सांग मला.’’
‘‘स्ट्रिकलँडला तो काम करत असताना स्टुडियोत दुसरं कोण असलेलं चालत नाही.’’
‘‘तेल लावत गेला तो. अरे स्टुडियो तुझा आहे. तो त्याचं काय ते बघून घेईल.’’
तो थोडा वेळ थांबला आणि किंचीत लाजला. भिंतीवरच्या एका चित्राकडे दु:खी नजरेने बघत म्हणाला.
‘‘तो मला चित्र काढायला देत नाही. त्याने मला घालवून दिलं.’’
‘‘तूच का नाही त्याची गचांडी धरून त्याला स्टुडियो बाहेर काढलंस?’’
‘‘त्याने मला धक्के देऊन बाहेर काढलं. मी त्याच्याशी धक्काबुक्की करू शकलो नाही. त्याने मला ढकलून माझी हॅट बाहेर फेकली आणि धाडकन दार लावून घेतलं.’’
स्ट्रिकलँडची एवढी मजल. मी भयंकर भडकलो. मला डर्क स्ट्रोव्हची किंव आली.
मी चिडलो होतो तरीही मला हसल्यावाचून राहवलं नाही.
‘‘तुझी बायको काय म्हणाली?’’
‘‘ती बाजारात गेली होती.’’
‘‘तो तिला तरी घरात येऊ देईल का?’’
‘‘मला सांगता येणार नाही.’’
मी स्ट्रोव्हकडे गोंधळून पाहिलं. मास्तरांनी शिक्षा केलेल्या शाळकरी मुलासारखा तो दिसत होता.
‘‘तुझ्यावतीने मी स्ट्रिकलँडची गचांडी धरून त्याला बाहेर काढू का?’’
तो थोडा अडखळला. त्याचा घामेजलेला चेहेरा लाल झाला.
‘‘नको. सध्यातरी तू काही करू नकोस.’’

तो मान हलवत निघून गेला. त्याला माझ्याशी बोलायचं नव्हतं त्याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण असालं पाहिजे. खरं काय कारण होतं ते मला तेव्हा कळलं नाही.

6 comments:

  1. फारच छोटा chapter वाटतो

    ReplyDelete
  2. काही प्रकरणे अगदी दोन पानीच आहेत. मुळ कादंबरीत आहेत तशीच ठेवली आहेत. पण या पुढे सकाळी आणि संध्याकाळी अशी दोन प्रकरणे एका दिवसात प्रसिद्ध करायचं ठरवलं आहे. बहुुतेक जमेल असं वाटतंय.

    ReplyDelete
  3. मूळ कादंबरी इंग्रजी नसून मराठीच आहे असं जेव्हा वाचताना वाटू लागतं,तेव्हा अनुवाद उत्तम जमलाय असं समजावं. जयंत,तुझा अनुवाद वाचताना याचा प्रत्यय येतोय.याचं कारण तुझी अस्सल,अकृत्रिम आणि ओघवती भाषा व शैली.इंग्लिश कादंबरी तर मला आवडलीच होती,आता तू केलेला अनुवादही तेवढाच आवडतोय.मी ५ प्रकरणे एकत्र वाचतोय.मजा येतेय वाचायला.अभिनंदन आणि शुभेच्छा!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद देणं अगदीच औपचारीक होईल तरीही ते देणं आवश्यक आहे कारण अशा शुभेच्छांमुळेच काम पुढे चालू ठेवण्याच्या उत्साहात भर पडते. मॉमने कादंबरीत दिलेले चित्रकारांचे आणि चित्रांचे सगळे संदर्भ इंटरनेटवर उपलब्ध आहेत. त्यातील महत्वाचे संदर्भ माझ्या ब्लॉगवर देण्याचा प्रयत्न करत आहे, पण उरलेलेल संदर्भ इंटरनेट वरून सर्च करून पाहील्यास कादंबरीचा आस्वाद घेणं जास्त आनंददायक ठरेल. कादंबरी लिहीताना असे संदर्भ वाचाकाला तपासून बघता येतील असं मॉमला निश्चित वाटलं नसणार. आजच्या काळात या कादंबरीच्या आस्वादक मुल्यात नक्कीच वाढ झाली आहे.

      Delete
    2. खरंय..तू उत्तम आणि कल्पकपणे काम करतोयस.

      Delete