Sunday, February 11, 2018

मून अँड सिक्सपेन्स – ४५

मी जर ताहितीत जाण्याच्या भानगडीत पडलो नसतो तर हे पुस्तक मला लिहता आलं नसतं. इकडे तिकडे खूप भटकंती केल्यावर चार्ल्स स्ट्रिकलँड शेवटी तेथे गेला होता. तेथेच त्याने त्याची महत्वाची चित्रं काढली होती. आज तो त्याच्या ताहितीतील कामामुळेच जास्त ओळखला जातो. कोणत्याही कलाकाराला आपली सगळी स्वप्नं प्रत्यक्षात आल्याचं बघायला मिळत नाही. स्ट्रिकलँडचा बहुतेक वेळ तांत्रिक बाबींशी झगडण्यात गेला. त्यामुळे त्याच्या प्रतिभेच्या अंत:चक्षूंना जे दिसलं होतं ते कॅनव्हासवर उतरवायला त्याला इतरांपेक्षा खूप कमी वेळ मिळाला. पण ताहितीत परिस्थिती त्याच्या बाजूला होती. त्याच्या प्रतिभेला वाव देणारे बरेच घटक त्याच्या अवती भवती होते. त्याच्या नंतरच्या काळातील चित्रांतून तो कशाच्या शोधात होता ते कळून येतं. ही चित्र रसिकांना नवं खाद्य पुरवतात. ताहितीसारख्या दूरच्या प्रदेशात त्याच्या तरल कल्पनाशक्तिला दृष्य स्वरूप मिळालं. वापरून गुळगुळीत झालेले शब्द वापरायचे तर त्याला स्वत:चा शोध लागला असं म्हणावं लागेल.
प्रशांत महासागरातील त्या दूरच्या बेटांवर उतरल्याबरोबरच मला स्ट्रिकलँडची आठवण यायला हवी होती. पण मी दुसऱ्या एका अगदी वेगळ्याच कामात अडकलो होतो. तेथे गेल्याला काही दिवस झाल्यावर मला स्ट्रिकलँडसुद्धा ताहितीमध्ये होता त्याची आठवण झाली. मी त्याला शेवटचा भेटलो होतो त्याला आता पंधरा वर्ष झाली होती आणि त्याचं निधन झाल्याला नऊ. मी इथे आल्यावर माझ्या कामात एवढा गुंतून पडलो होतो की मला दुसरा विचार करायला फुरसत मिळाली नव्हती. मी एके दिवशी सकाळी लवकर उठलो आणि गच्चीवर येऊन पाहिलं तर कोणीच उठलेलं दिसत नव्हतं. स्वयंपाकघराला कुलूप होतं. बाहेर बाकड्यावर एक स्थानिक मुलगा झोपला होता. नाश्ता मिळायला अजून खूप अवकाश होता म्हणून मी समुद्र किनाऱ्यावर चक्कर मारली. चिनी माणसांची दुकानं उघडली होती. आकाशात पहाटेचा फिकट प्रकाश अजून रेंगाळत होता. भयाण शांततेत बुडालेलं लगून, एखाद्या रहस्यमय गुपितासारखं दिसणारं मुरीआ बेट.
माझ्या डोळ्यांवर माझा विश्वास बसेना. वेलिंग्टन सोडल्यानंतरचे दिवस अगदी विलक्षण होते. वेलिंग्टन टुमदार आहे. त्याच्यावर इंग्लिश संस्कृतीची छाप आहे. तिथे आल्यावर इंग्लंडच्या दक्षिण किनारपट्टीवरच्या बंदराची आठवण येते. तीन दिवस समुद्र खवळलेला होता. आकाशात काळ्या ढगांचा पाठशिवणीचा खेळ चालला होता. नंतर वारा पडला. शांत झालेला समुद्र निळाशार दिसू लागला. इतर महासागरांच्या तुलनेत प्रशांत महासागरावर जास्तच एकाकी वाटतं. त्याचा विस्तार महाप्रचंड आहे. अगदी छोट्या सफरीतसुध्दा मोठं साहस केल्यासारखं वाटतं. या द्वीपसमूहावरून वहाणारी हवासुद्धा एवढी शुद्ध आणि ताजीतवानी असते की त्याने कोणीही वारं प्यालेल्या वासरासारखा हुंदडू लागतो. ताहितीला जाणं म्हणजे स्वर्गीय आनंद असतो. अथांग महासागराच्या क्षितीजावर जादूची कांडी फिरल्याप्रमाणे अचानक ताहिती आणि मुरिया बेटं दिसू लागतात. बेटांवरील पर्वत शिखरांमुळे ही बेटं म्हणजे प्रशांत महासागराच्या गळ्यातील रत्नहाराप्रमाणे भासतात. जसं अंतर कमी होत जातं तसं या बेटांचं सौंदर्य हळू हळू दृगोचर होऊ लागतं. उंच पर्वतांच्या आणि दाट जंगलाच्या आड लपलेली काही गुपितं हातची राखून निसर्ग आपलं सौंदर्य मुक्त हातांनी उधळत असतो.
ताहिती हे एक पाचूसारखं हिरवेगार बेट आहे. किनाऱ्यापासून अंतर्भागापर्यंत हिरव्या रंगाच्या विविध छटा उलगडत जातात. डोंगर दऱ्या, घनदाट झाडी, झुळूझुळू वाहणाऱ्या नद्या-नाले, कूजन करणारे पक्षी आणि अनादीकालापासून नांदत असलेली जीव सृष्टी. या वर्षानुवर्ष चाललेल्या सृष्टीचक्रात कुठेतरी काहीतरी खटकत असावं असं उगाचच वाटतं, पण काय ते उमगत नाही. कधी कधी निसर्गातील भव्यतेच्या दर्शनाने मन उगाचच उदास होतं, पण क्षणभरातच आनंदाने उचंबळून येतं. विदूषकाच्या एका डोळ्यात आसू तर दुसऱ्या डोळ्यात हसू असतं तसंच. सगळं जग जेव्हा आनंदी असतं तेव्हा तो विदूषक अंतर्यामी एकटाच रडत असतो. आपल्याला हसत हसत नेत्रपल्लवी करणाऱ्या मदनमस्त सुंदरीसारखी ताहिती आपल्या सौंदर्याची चौफेर उधळण करत तुम्हाला आव्हान देत असते. खडतर आणि प्रदीर्घ प्रवास एकदाचा संपला म्हणून आपण अधीर झालेलो असतो. पपीएत बंदरात जहाज नांगर टाकत असताना इतका वेळ खुणावणारे सौंदर्य एकदाचं आपल्या हाताशी आल्याचं समाधान मिळतं. छोटी छोटी शिडाची जहाजं धक्यावर नीट बांधून ठेवलेली होती. किनाऱ्याच्या पांढऱ्या आणि लाल रंगाच्या इमारती निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर खुलून दिसत होत्या. त्यात शहरवासियांचं सुसंस्कृत आणि रंगेल जीवन दिसून येत होतं. धक्यावर जमा झालेले लोक आनंदी आणि देखणे होते. त्यांची चाललेली लगबग, आरडाओरडा आणि हातवारे मजेशीर वाटत होते. गव्हाळ रंगाच्या नगरवासियांचा समुद्रच धक्यावर गोळा झाला आहे असं वाटत होतं. सामान खाली उतरवणं, जकात आकारणी अधिकाऱ्यांची त
पासणी वगैरे गोष्टी मोठ्या लगबगीने चालल्या होत्या. प्रत्येक जण तुमच्याकडे बघून हसत आहे असं वाटत होतं. हवेत प्रचंड उकाडा होता. रंगांची चौफेर उधळण डोळ्यात भरत होती.
Artist: Paul Gauguin
Tahitian Landscape, Date: 1891, Dimensions: H 68cm L 92cm, Medium: Oil on Canvas
Current Location: Minneapolis Institute of Arts, Source: Wikipedia

1 comment: