Monday, February 12, 2018

मून अँड सिक्सपेन्स – ४८

या ठिकाणी पुस्तकाचा शेवट करायचा माझा पहिला बेत होता. स्ट्रिकलँडचे ताहितीतील दिवस आणि त्याचा भयानक मृत्यु यापासून सुरवात करून नंतर मला ठाऊक असलेल्या त्याच्या पुर्वायुष्यातील घटना सांगायच्या होत्या. आपल्या देशापासून इतक्या दूरवर असलेल्या एका अनोळखी, लहानशा बेटावर जावं असं त्याला का वाटलं, त्या मागे कोणती प्रेरणा होती, नक्की काय करण्याचा बेत होता वगैरे प्रश्नांती उत्तरं माझ्यापाशी नव्हती. जेव्हा सर्वसाधारण माणसं आयुष्यात स्थिर होतात त्यावेळी, वयाच्या सत्तेचाळीसाव्या वर्षी झोंबऱ्या वाऱ्यांना तोंड देत, खवळलेल्या समुद्रातून दूर जाणाऱ्या फ्रान्सच्या किनाऱ्याकडे, बघताना त्याच्या मनात काय विचार आले असतील. तो किनारा परत दृष्टीला पडायचं आपल्या नशीबी नाही याची कल्पना त्याला आली असेल का. तो साहसी आणि दृढनिश्चयी होता. शेवट मला आशादायक करायचा होता. दुर्दम्य इच्छाशक्तिच्या जोरावर माणूस काय करू शकतो, कुठे जाऊ शकतो ते मला दाखवायचं होतं. पण तसं लिहीणं मला जमलं नाही. म्हणून मी कालानुक्रमे लिहायला घेतलं. मला स्ट्रिकलँड विषयी जे काही माहित होतं ते मी जसं घडलं त्या क्रमाने लिहीत गेलो.
माझ्याकडे उपलब्ध असलेली माहिती तुकड्या तुकड्याने असल्यामुळे माझं लिखाणही तसंच झालं. माझी परीस्थिती नामशेष झालेल्या प्राण्याच्या एका हाडाच्या तुकड्यावरून संपूर्ण प्राण्याचं चित्र उभं करणाऱ्या जैववैज्ञानिकासारखी होती. ताहितीमध्ये स्ट्रिकलँडच्या संपर्कात आलेल्यांपैकी कोणावरही त्याचा फारसा प्रभाव पडला नव्हता. त्यांच्या दृष्टीने स्ट्रिकलँड हा सतत पैशाच्या चणचणीत असलेला एक भणंग इसम होता. तो चित्रसुद्धा काढत असे हे त्यांना माहित होतं पण त्यांना ती फारच विचित्र वाटत. त्याच्या मृत्युला काही वर्ष लोटल्यानंतर पॅरीस आणि बर्लिनवरून काही एजंट त्याने काढलेल्या चित्रांच्या शोधात ताहितीत आले, तेव्हा त्यांना एक दखलपात्र अशी मोठी व्यक्ति ताहितीमध्ये राहून गेली हे कळलं. आता ज्या कॅनव्हासना प्रचंड किंमत येत होती ते कॅनव्हास त्यांना तेव्हा जवळपास फुकटात मिळाले असते हे ही त्यांच्या लक्षात आलं. त्यांच्या हातून जी संधी निसटली होती त्याबद्दल ते स्वत:ला कधीच माफ करू शकले नाहीत. कोहेन नावाचा एक हसतमुख आणि प्रेमळ म्हातारा फ्रेंच ज्यु व्यापारी होता. त्याच्याकडे स्ट्रिकलँडचे एक पेंटींग अगदी योगायोगाने आलं. तो अर्धा व्यापारी आणि अर्धा दर्यावर्दी होता. त्याच्याकडे एक शिडाची होडी होती. त्यातून तो पमोट्यु आणि मार्क्वेझा बेटांवर फेऱ्या मारी. जाताना जीवनोपयोगी वस्तू घेऊन जाई. येताना बदल्यात खोबरं, शिंपले आणि मोती घेऊन येई. मला कोणी तरी सांगितलं की त्याच्याकडे एक मोठा काळा मोती आहे. तो स्वस्तात मिळण्याची शक्यता होती म्हणून मी त्याच्याकडे गेलो. जेव्हा मला कळलं की कितीही घासाघीस केली तरी त्याची किंमत मला परवडण्यासारखी नाही तेव्हा मी तो नाद सोडून दिला आणि सहज म्हणून स्ट्रिकलँडचा विषय काढला. तो त्याला चांगला ओळखत होता.
‘‘मला तो आवडायचा कारण तो एक चित्रकार होता,’’ तो मला म्हणाला. ‘‘चित्रकार या बेटांवर फारसे फिरकत नाहीत. चित्रकार म्हणून तो फारसा चांगला नव्हता याचं मला वाईट वाटायचं. मी त्याला पहिलं काम दिलं. माझ्या मालकीची काही बागाईत जमीन आहे. मला तेथे एक ओव्हरसियर पाहिजे होता. एका गोऱ्या माणसाला डोक्यावर बसवल्याशिवाय स्थानिक लोकांकडून काही काम करून घेणं अशक्य असतं. मी त्याला म्हणालो: चित्र काढायला तुला वेळही भरपूर मिळेल आणि थोडे पैसेही कमावता येतील.मला ठाऊक होतं की त्याची उपासमार होत आहे. मी त्याला पगारसुद्धा चांगला देऊ केला होता.’’
‘‘ओव्हरसियर म्हणून त्याने फार चांगलं काम केलं असेल असं मला वाटत नाही.’’
‘‘मला चित्रकारांबद्दल सहानुभूती आहे. ते आमच्या रक्तातच असतं, तुम्हाला माहित आहेच. कामात मी त्याला भरपूर सूट दिली. पण कॅनव्हास आणि रंग घ्यायला पुरेसे पैसे साठल्यावर तो माझी नोकरी सोडून गेला. त्या गावातले सर्व लोक त्याला ओळखायला लागले होते म्हणून त्याला अंतर्भागात जायचं होतं. मी त्याला अधूनमधून भेटायचो. तो दोन तीन महिन्यांतून एकदा पपीएतला येई आणि थोडे दिवस राही. तो कोणाकडून तरी पैसे घेई आणि नंतर अदृश्य होई. एका खेपेला त्याने माझ्याकडे दोनशे फ्रँक कर्ज म्हणून मागितले. त्याच्याकडे पाहिल्यावर तो आठवडाभर जेवला नसावा असं वाटत होतं. मी त्याला नाही म्हणू शकलो नाही. ते पैसे परत येतील याची मला अपेक्षा नव्हतीच. एका वर्षाने तो एक पेंटींग घेऊन माझ्याकडे परत आला. माझ्याकडून घेतलेल्या पैशांविषयी तो काहीच बोलला नाही. पण तो म्हणाला: हे तुमच्या मळ्याचं चित्र आहे. मी खास तुमच्यासाठी रंगवलंय. मी त्या चित्राकडे बघितलं. काय म्हणावं ते मला कळेना. मी आभार मानले. तो निघून गेल्यावर मी ते माझ्या बायकोला दाखवलं.’’
‘‘कसं होतं ते चित्र?’’
‘‘मला विचारू नका. मला चित्रातलं ओ का ठो कळत नाही. मी असलं चित्र आयुष्यात कधी पाहिलंच नव्हतं. आपण याचं काय करू या? भिंतीवर काही आपण लावणार नाही आहोत.मी माझ्या बायकोला म्हणालो. ती म्हणाली की, ‘लोक आपल्याला हसतील,’ तिनं ते उचललं आणि माळ्यावर इतर फालतू वस्तूंच्या ढीगात ठेऊन दिलं. माझ्या बायकोला काही फेकून देणं जमतच नाही. ती तिची एक खोडच आहे. आता एक गंमत बघा. लढाईला तोंड फुटायच्या थोडं अगोदर पॅरीस वरून माझ्या भावाने पत्र लिहून मला ताहितीत राहणाऱ्या एका इंग्लीश चित्रकाराची तुला माहिती आहे का असं विचारलं. तो एक मोठा प्रतिभावान चित्रकार असावा. त्याच्या चित्रांना हल्ली प्रचंड किंमत यायला लागली आहे. तुला त्याची काही चित्र सापडली तर बघ. ती विकत घे आणि माझ्याकडे पाठवून दे. भरपूर फायदा होईल. म्हणून मग मी माझ्या बायकोला विचारलं. स्ट्रिकलँडनं दिलेल्या त्या चित्राचं काय झालं? अजूनही ते माळ्यावर असण्याची शक्यता आहे का?’ प्रश्नच नाही. तुम्हाला माहित आहे, मी काहीच फेकून देत नाही. ती माझी खोड आहे. आम्ही माळ्यावर गेलो. गेल्या तीस वर्षांच्या संसारात तिथे काय काय साठलं होतं कोण जाणे. पण त्या ढीगात ते चित्र होतं. मी त्या चित्राकडे एकदा पाहिलं आणि म्हणालो, माझ्या शेतमळ्यावर काम करणारा एक अगदी भणंग इंग्लीशमन होता. त्याला मी एकदा दोनशे फ्रँक उसने दिले होते. तोच हा माझा भाऊ म्हणतोय तो प्रतिभावान चित्रकार असेल काय? तुला या चित्रात काय खास आढळलं कां?’ ‘काही नाही,’ ती म्हणाली. ते आपल्या बागेसारखं तर मुळीच दिसत नाही. मी तरी कधी निळ्या रंगाची नारळाची झाडं पाहिली नाहीत. पण तेथे पॅरीसमधले लोक वेडे झाले आहेत. तुमचा भाऊ हे चित्र दोनशें फ्रँकला विकू शकेल का? तुम्ही दिलेले पैसे तरी परत येतील.आम्ही ते चित्र बांधलं आणि माझ्या भावाकडे पाठवून दिलं. शेवटी मला त्याचं एक पत्र आलं. त्याने मला काय लिहीलं असेल असं तुम्हाला वाटतं?’ ‘त्याने लिहीलं होतं, मला चित्र मिळालं. मला वाटलं तू माझी मस्करी करत आहेस. मी तुला पोस्टाचा खर्च दिला नसता तर बरं झालं असतं. ज्याने मला सांगितलं होतं त्याला ते चित्र दाखवायला मी घाबरत होतो. ती जेव्हा एक उत्कृष्ट कलाकृती आहे असं समजलं तेव्हा मला आश्चर्याचा केवढा धक्का बसला असेल कल्पना कर. त्याने मला तीस हजार फ्रँक देऊ केले. थोडं ताणून धरलं असतं तर जास्त सुद्धा मिळाले असते. पण मला एवढा धक्का बसला होता की माझं डोकंच चाललं नाही. डोकं ताळ्यावर यायच्या आत मी पैसे स्वीकारून बसलो होतो.’’
त्यानंतर मस्य कोहेनने मला जे सांगितलं त्यात त्याच्या दिसून आलेल्या प्रामाणिकपणाचं कौतुक करावं तेवढं थोडंच होतं.

‘‘तो बिचारा स्ट्रिकलँड तेव्हा जिवंत असायला हवा होता. मी एकोणतीस हजार आठशे फ्रँक त्याच्या हातात ठेवल्यावर तो काय म्हणाला असता कोण जाणे?’’
Artist: Paul Gauguin
Title  French: Rue de Tahiti, Street in Tahiti, Date: 1891
Medium: oil on canvas, Dimensions   115.5 × 88.5 cm (45.5 × 34.8 in)
Current location: Toledo Museum of Art, Source: Wikidata

1 comment:

  1. सोबतची चित्रं वाचनाची रंगत वाढवतायेत...
    👌👍🌷🌷🌷🌷🌷

    ReplyDelete